मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 231 ☆ कुठे शोधू…? ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 231 – विजय साहित्य ?

कुठे शोधू…? ☆

हरवले सौख्य माझे

कुठे शोधू विठूराया.?

पामराला देशील का  ?

तुझी नित्य कृपा छाया. १

*

हरवले गाव माझे

वेळेकाळी धावणारे

संकटांत अगत्याने

पाठी उभे राहणारे ..! २

*

पैसा झाला जगी प्यारा

हरवली नाती गोती.

मातीमोल झाले कारे ?

सुविचार शब्द मोती..! ३

*

परतुनी येईल का

माझे कुटुंब एकत्र

नको द्वेष राग लोभ

नको अहंकारी सत्र…! ३

*

कुठे शोधू विठूराया

माझी कैवल्याची वारी

हरवलो मीच येथे

वेगे संकट निवारी…! ४

*

स्वार्थी जगात धावतो

विसरून हरिनाम

पैसा संपता आठवे

ज्याला त्याला विठू धाम..! ५

*

विसरली बासनात

संत साहित्याची गाथा

सांग कधी कुठे कसा ..?

टेकवावा लीन माथा..! ६

*

युगे सरली अनंत

नच सरे विठू माया

कुठे शोधू  चंद्र भागा..?

आणि तुझी छत्रछाया.! ७

*

विसरून सारें काही,

जग जाहले दिखाऊ..!

वारीतले निरामय

चला विश्व डोळा पाहू..! ८

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वर्षाधारा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ वर्षाधारा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

(राजा छत्रसाल यांनी महाराजांकडे कर्जाची मागणी केली होती आणि महाराजांनी त्यांना दान दिले आणि त्यांची अवस्था सुधारली अशी कथा आहे )

मी पावसावरील कविता लिहिताना त्यात प्रयोग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा त्यात कशा दिसतात हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अशा 12 प्रसंगांवर मी कविता लिहिल्या आहेत. त्यातील एका प्रसंगावरील ही कविता….

वरूणराजा तो झाला, राजा शिवछत्रपती

ढगांच्या घोड्यावर आरूढ़,गड़गडाच्या नौबती

सौदामिनीचे दाणपट्टे, सूर्यकिरणाच्या तलवारी

अशा मोठ्या दलासवे,राजा शोभे तालेवारी

*

आता आमचा बळीराजा,झाला छत्रसाल राजा

ऋण फिटता फिटेना,भेटू म्हणे महाराजा

शेत जमीन नांगरून गार्हाणे हे घातले

यथाशक्ती मदत व्हावी, मागणे हे मागितले

*

छत्रसालाने पसरले बाहू,शिवराय सरसावले

उराऊरी ते भेटताच, दैन्य सारे हे संपले

मृद्गंधाचे अत्तर लावले,थेंबांची ती पुष्पवृष्टी

धरे पासुनी आसमंतापर्यंत, सारी सुखावली सृष्टी

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘पानशेत’ नंतर… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

🌸 विविधा 🌸

☆ ‘पानशेत’ नंतर… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

१२ जुलै १९६१. पानशेत धरण फुटलं. नदीकाठच्या पेठा वाहून गेल्या. संसार उध्वस्त झाले. वाडे पडले. घरं वाहून गेली. माणसं गेली, पैसाआडका गेला, दागिने वाहून गेले, पुण्याचं होत्याचं नव्हतं झालं.

त्याआधीचं पुणं वेगळं होतं. पुण्यात गुरांचे गोठे होते. बरेच बोळ होते. रस्त्यांवर फारसा प्रकाश नसे. घोड्यांच्या पागा होत्या, टांगे होते, बग्ग्या होत्या. खूप साऱ्या सायकली होत्या. घरोघरी चुली होत्या, शेगड्या होत्या, कोळशाच्या वखारी होत्या. कंदील होते. पलंग होते. खाटा होत्या. हौद होते…

पहाटे पिंगळे यायचे, सकाळी वासुदेव यायचे. दुपारी डोंबारी आणि दगडफोडे आपापला खेळ करून पैसे मागायचे. खोकड्यातला सिनेमा यायचा. मुलं त्याला डोळा लावून ‘शिणूमा’ बघायची. माकडाचे खेळ यायचे. नागसापवाले गारूडी यायचे. डोंबारी दोरीवरून चालायचे. ‘जमूरे’ चादरीत लपून गायब व्हायचे.

पुणं पहाटेचंच उठायचं. पूजाअर्चा चालायच्या. खूप मंदिरं होती. त्यात घंटानाद व्हायचे. धूपदीपांचा सुगंध दरवळायचा. आरती नैवेद्य व्हायचे. व्रतवैकल्यं असायची. सण जोरात साजरे व्हायचे. त्यात धार्मिकता ठासून भरलेली असे. अगदी पाडव्यापासून सुरू होऊन, वटसावित्री, श्रावण, मंगळागौरी, नारळीपौर्णीमा, रक्षाबंधन, गणपती, नवरात्र, दिवाळी, रथसप्तमी, होळीपर्यंत सण उत्साहात साजरे होत. गणपतीत वाड्यावाड्यात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होत. गणपती चौकात सतरंज्या टाकून लोक गजानन वाटव्यांची गाणी ऐकत. घरोघरी धार्मिकतेनं गणपती बसे. सत्यनारायण वगैरेही जोरात होई. घरोघरी नवरात्र बसे. वाड्यावाड्यात भोंडले होत. ‘ऐलोमा पैलोमा गणेश देवा…’ ऐकू येई. अनेक बायकांच्या अंगात देवी येई. दिवाळीत घरोघरी फराळाचे पदार्थ बनत. मुलं किल्ले करत. मुली रांगोळ्या काढत. वर्षभर सणसमारंभ चालत.

त्याकाळी बरेच पुरुष धोतर नेसत. बायका नऊवारी साडी नेसत. पाचवारी साडी अजून रूळायची होती. बालगंधर्व बायकांचे आवडते होते. त्यांचे हावभाव, साडी नेसणं याची बायका नक्कल करत. ‘असा बालगंधर्व पुन्हा न होणे…’ हे सर्वमान्य होतं.

मुलं पतंग उडवत, विट्टीदांडू खेळत. आट्यापाट्या, लगोरी, सूरपारंब्या वगैरे मुलांचे आवडते खेळ होते. मुली सागरगोटे, बिट्ट्या वगैरे खेळत. भातुकली हा मुलींचा आवडीचा खेळ होता. मुलं चड्ड्या घालत. मुली परकर पोलकं घालत. बायका अंबाडा घालत. त्यात एक फूल खोचत. ठसठशीत कुंकू लावत. मंगळसूत्र घालत. मुली कानात डूल घालत. काही मुलं शेंडी ठेवत.

पानशेत पुरामुळेच पुण्याचं रूप पालटलं. मुकुंदनगर, महर्षीनगर, सहकारनगर, दत्तवाडी, पानमळा असे अनेक नवीन भाग उदयाला आले. वाड्यांच्या पुण्यात बंगल्यांची एंट्री झाली. तिथून पुणं वाढायला सुरुवात झाली. पेठांमध्ये वसलेलं पुणं, ही पुण्याची ओळख पुसून नवीन पुढारलेलं पुणं दिसू लागलं. जसं ते रहाणीमानात बदललं, तसं ते आचारविचार आणि संस्कृतीतही बदलू लागलं. कर्मठ पुण्याचं आता प्रगतीशील पुण्यात रुपांतर होऊ लागलं. संस्कृती, आचारविचार, रुढी, परंपरा या मागासलेपणाचं निदर्शक मानल्या जाऊ लागल्या. साठच्या दशकात संसाराला लागलेल्या पिढीची तारेवरची कसरात झाली. रुढी परंपरांवर त्यांच्या आईवडिलांच्या दबावामुळे असलेला अर्धवट विश्वास आणि आभासी प्रागतिक विचारांचं सुप्त आकर्षण यात त्यांची कुतरओढ झाली. म्हणून ते आपल्या मुलांवर कुठलेच संस्कार नीट करू शकले नाहीत. कर्मठपणावरून त्यांचा विश्वास  उडाला होता आणि नवीन, प्रागतिक विचार पचवायला ते असमर्थ होते.

या दरम्यान पुणं वाढतच होतं. साठच्या दशकात जन्माला आलेली नवीन पिढी मोठी होत होती. धार्मिकता, कट्टरता यावर आपल्या आईवडिलांचा डळमळीत झालेला विश्वास त्यांना जाणवत होता. ही पिढी प्रागतिक विचार बोलू लागली होती. त्यांच्या या विचारांपुढे त्यांचे आईवडील हतबल झालेसे वाटत होते. आईवडीलांच्या पिढीत आईवडील मोठे असत. मुलं त्यांच मनोभावे ऐकत असत. पुढच्या पिढीत आईवडील मुलांच्या प्रागतिकतेनं मंत्रमुग्ध झाल्यानं आईवडील मुलांचं ऐकू लागले.

नव्वदच्या दशकात पुढची पिढी आली. तिच्या आईवडिलांवरच पुरेसे संस्कार झालेले नव्हते. तिच्यावर कसलेच संस्कार करायला तिच्या आईवडिलांना वेळ नव्हता. वेळही नव्हता आणि माहितीही नव्हती. आजी आजोबा ही स्थानं संपली होती. गोष्टी सांगणारी आजी लुप्त झाली होती. ‘ममा, पप्पां’ना गोष्टी सांगता येत नाहीत. त्यांना तेवढा वेळही नाही. त्यात टीव्ही घरात आले. आजीपासून नातवापर्यंत सगळे निरनिराळ्या सिरीयल्समध्ये अडकले. त्यात ‘डिस्टर्ब’ नको, म्हणून आईबापांनीं मुलांच्या हातात मोबाईल दिला. त्यानं ती व्हिडिओ गेम्सच्या आहारी गेली. बहुतेकसे आईवडील एकपुत्र असल्यानं मुलांना बोलायला घाबरू लागले. आपल्या मास्तरांनी मारलेल्या छड्यांचे वळ अभिमानाने मिरवणारे आईबाप मुलांच्या अंगावर हात टाकायला बिचकू लागले. मुलांच्याही ते लक्षात आले. ती अवास्तव मागण्या करू लागली. त्यांचे हट्ट पुरवले जाऊ लागले. आजीआजोबा किंवा आईवडीलांचा  ‘धाक’ संपला. धाक हा शब्द डिक्शनरीत जाऊन पडला. शिक्षकांनी मुलांना मारणं गुन्हा ठरू लागला. मारलं तर मुलं आत्महत्या करू लागली. शिक्षकांना जेल होऊ लागली. मुलांवरचा धाक संपला!

त्यात आय.टी. इंडस्ट्री पुण्यात आली. जो तो आयटीत पळू लागला. त्यांना अवाच्यासवा पगार मिळू लागले. त्यातल्या प्रत्येकानं दोनदोन चारचार फ्लॅट्स विकत घेतले. त्यानं पुणं अजूनच विस्तारलं. पुण्याची राक्षसी वाढ होऊ लागली. खराडी, वाकड, धानोरी, अशी अनेक पूर्वी कधी पुण्यात न ऐकलेली नावं सर्रास ऐकू येऊ लागली. पेठेत रहाणारी लोकं आपापली घरं व्यापाऱ्यांना विकून तिकडे रहायला जाऊ लागली. आयटी क्षेत्रानं पुण्याची संस्कृती अजून रसातळाला गेली. आजचं आणि आत्ताचं पहा, आम्हाला कोणी मोठे नाहीत. अगदी आईवडील सुद्धा नाहीत. त्यांना असा कितीसा पगार होता. आत्ताच आम्ही त्यांच्या दसपट कमावतो, असा गंड मनात मूळ धरू लागला. मुली सर्रास दारू पिऊ लागल्या. रस्त्यावर सिगारेटी पिऊ लागल्या. वीतभर चड्ड्या घालून रस्त्यावरून फिरू लागल्या. लग्न करायची गरज कमी होऊ लागली. ‘लिव्हिंग रिलेशनशिप’ नावाचा नवीन विचार पुढे आला. आईवडील अधिकच हतबल होऊन पहात राहिले. अनेक कुटुंबं आयटीमधल्या मुलींच्या पैशावर पोसली जात असल्यानं, आईवडील मुलींना काही बोलू शकत नव्हते. आता पुणं, आयटी पुणं झालं होतं. जागांच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. खूप हॉटेलं झाली होती. अनेकांच्या घरी स्वयंपाक बनत नव्हता. बाहेरचं खाण्याची संस्कृती रुजत चालली होती. दारू फारच सामान्य झाली होती. ड्रग्जचे नवनवीन प्रकार येत होते. एकमेकांच्या संगतीनं नवी पिढी त्यात ओढली जात होती.

आयटी बरोबर परप्रांतीयही पुण्यात खूप आले. त्यांनी त्यांची संस्कृती पुण्यात मिसळली. रंगपंचमी बंद होऊन पुण्यात धुळवड जोरात खेळली जाऊ लागली. प्रचंड पैसा घेऊन पुण्यात शिकायला आणि नोकरीला आलेल्यांनी नीतिमत्ता पूर्णपणे धाब्यावर बसवली. पुण्यात बुद्धिमत्ता कमी झाली आणि पैसा बोलू लागला.

या आयटीयन्स् मुळे जागांना प्रचंड भाव आले. पुण्याभोवतालचे शेतकरी शेती बंद करून ‘स्कीमा’ करू लागले. बिल्डर बनू लागले. ‘गुंठामंत्री’ नावाची एक नवीन जमात उदयाला आली.

साठ वर्षांत पुणं आता पूर्णपणे बदललं आहे. ब्राम्हणी पुणं तर केव्हाच लोप पावलंय.  सांस्कृतिक, बौद्धिक, वैचारिक अशी पुण्याची ओळख पुसली गेली आहे. पुरणावरणाच्या पुण्यात, सदाशिव पेठेत मटण आणि बिर्याणीची दुकानं दाटी करू लागली आहेत.

आता पुण्यात फारसे वाडे शिल्लक नाहीत. सकाळी वासुदेव येत नाही. दगडफोडे, डोंबारी, भुते, ‘जग्ग’ डोक्यावर घेऊन फिरणाऱ्या बायका, कुडमुडे, पोपटवाले ज्योतिषी, ‘जमूरे’ वाले नाहीसे झालेत. नदीचं आता गटार झालंय. पानशेतफुटीपूर्वी ओंकारेश्वराजवळ सुद्धा नदीचं पाणी पिता यायचं. आता त्यात पाय घालायचीही किळस येते. पानशेत फुटीनंतर पुणं बदललं, वाढलं, विस्तारलं. पण जे रूप बदललं, ते पुणं नाही राहिलं. ते बौद्धिक, तात्विक, विचारवंतांचं, शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणं पानशेतच्या पुरात वाहून गेलं. उरलं आणि वाढलं ते पुणं नाहीये, एक अक्राळविक्राळ संस्कृतीहीन, चेहेरा नसलेलं, मुंबईच्या पावलावर पाऊल टाकायला निघालेलं एक चेहेराहीन, पानशेतफुटीनं  बकाल केलेलं गर्दीचं एक शहर!

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “कर चले हम फिदा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “कर चले हम फिदा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

# कर चले हम फ़िदा… अब तुम्हारे हवाले… #

“… हे काय? अजून तुम्ही स्टूलावरच उभे आहात काय? गळफास लावून घ्यायला धीर होत नाही ना? …पाय लटलट कापायला लागलेत ना! तो फास गळ्यात अडकवून घ्यायला हात थरथरायलाही लागलेत का?.. अगं बाई! चेहरा कसा भीतीने फुलून गेलाय… अंगालाही कापरं भरलयं वाटतं… आणि छप्पन इंचाची नसलेली छाती कशी उडतेय धकधक… ह्यॅ तुमची.. तुमच्याने साधं फासाला जाणं देखील जमणारं नाही…  घरातल्या इतर कामा सारखंच फाशी घेण्याचं कामं सुध्दा तुम्हाला जमत नाही…म्हणजे बाई कमालच झाली म्हणायची…अहो बाकीच्या  संसाराच्या कामात मेलं एकवेळ राहू दे हो  पण निदान फासावर जाण्याच्या कार्यात तरी पुरूषार्थ दाखवयाचा होताना…तितही डरपोक निघालात….तुका म्हणे तेथे हवे जातीचे हे येरागबाळ्याचे काम नोव्हे… आणि हे काय हातात लिहिलेला कागद कसला घेतलाय? बघु दे मला एकदा वाचून… आपल्या आत्महत्येला जबाबदार म्हणून माझं नावं वगैरे तर लिहिले नाही ना त्यात… हो तुमचा काय भरवंसा.. तुम्ही मनात आलं नाही तर फासावर लटकवून घ्याल नि व्हालं मोकळे एकदाचे… आणि मी बसते इथे  विनाकारण पोलिसांच्या ससेमिऱ्याला तोंड देत नि कोर्ट कचेऱ्याच्या हेलपाट्या टाकत आयुष्यभरं… तसं जिवंत पणीही तुम्ही मला सुखानं जगू दिलं तर नाहीच पण मेल्यावर सुद्धा माझ्या आयुष्याची परवड परवड करून गेल्याशिवाय चैन ती तुम्हाला कसली पडायची नाही… जळ्ळं माझं नशिब फुटकं म्हणून देवानं हा असला नेभळट नवरा माझ्या नशीबी बांधून दिला… अरेला कारे केल्याशिवाय का संसाराचा गाडा चालतोय… पण ती धमकच तुमच्या खानदानातच नाही त्याला तुम्ही तरी काय करणार… अख्खं गावं तुम्हाला भितरा ससोबा महणतयं आणि मला  जहाॅंबाज गावभवानी… पण कुणाची टाप होती का माझ्या वाटेला येण्याची… एकेकाची मुंडीच पिरगाळू टाकली असती… मी होते म्हणून तर इथवरं संसार केला… आणखी कुणी असती तर तेव्हाच गेली असती पाय लावून पळून… चार दिडक्या कमवून घरी आणता म्हणजे वाघ मारला नाही… घर संसार माझा तसाच तुमाचाही आहे… नव्हे नव्हे बायको पेक्षा नवऱ्याचा संसार जास्त महत्त्वाचा.. त्याचा वंशवेल वाढत जाणार असतोना पुढे… मग तो कर्ता पुरुष कसा असायला हवा हूशार, तरतरीत, शरीरानं दणकट नि मनानं कणखरं.. हयातला एकही गुण तुमच्याजवळ असू नये… जरा बायकोनं आवाज चढवला कि तुम्ही घरातून पळून जाता… कंटाळले मी तुमच्या या पळपुटेपणाला… एकदाचं काय ते कायमचे पळूनच का जात नाही म्हणताना आज तुम्ही हि फिल्मी स्टाईल स्टंटबाजीनं फासावर लटकवून घेण्याचं काढलतं.. कशाला मला भीती घालायला… असल्या थेरांना मी भिक घालणारी बाई नाही… माझ्या मनगटातलं पाणी काही पळून गेलंल नाही… माझं मी पुढचं सगळं निभावून न्यायला खंबीर आहे… तुम्ही तुमचं बघा… आणि काय ते लवकरच आटपा … आज एकच रविवारची सुट्टी असल्याने सगळं घरं झाडून घ्यावं म्हणतेय मी… मला ते तुमच्या पायाखालचं स्टूल हवयं.. तेव्हा तुमचा निर्णय लवकर अंमलात आणा… मला थांबायला वेळ नाही बरीच कामं पडलीत घरात… नाहीतर असं कराना एवीतेवी तुम्ही फासावर लटकायचं हे ठरवलंय ना.. मग जाण्यापूर्वी शेवटचं एकदा घर झाडून द्यायला मदत करुनच गेलात जाता जाता तरं माझ्या मनाला तेव्हढचं समाधान मिळेल हो… आणि त्या आधी तुमचे आवडीचे दडपे पोहे  नि त्याबरोबर गरम गरम चहा ठेवलाय तोही पिऊन घ्यालं… नाहीतर उगाच माझ्या मनाला नकोती रुखरुख लागेल… आता बऱ्या बोलानं खाली उतरतायं कि कसं.. का मारू लाथ त्या स्टूलाला अशीच… “

… ” नको नको…मी खाली उतरतो… तू म्हणतेय तसं फासावर जाण्यापूर्वी दडपे पोहे नि चहा घेतो… ते घरं झाडायला तुला मदतही करतो… पण पण तू असं समजू नकोस कि मी माझ्या निर्णायापासून परावृत्त झालो म्हणून… ते आपलं तुझ्या शब्दाचा मान राखावा आणि तुला ते स्टूल हवयं म्हणून… हे सगळं आवरून झालं कि मी माझा निर्णय  अंमलात आणणारं हं… मग भले त्यावेळी तू कितीही मधे मधे आढेवेढे आणलेस तरी माघार घेणार नाही… पण त्यावेळी तू मात्र दडपे पोहे नि गरमागरम चहाच्या मोहात फशी पाडू नकोस बरं… नाहीतर…. “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शीरखुर्मा… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे ☆

प्रा. विजय काकडे

? जीवनरंग ❤️

☆ शीरखुर्मा… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे 

शीरखुर्मा  हे एक वर्षातून एकदाच मिळणारे दुर्मिळ असे पक्वान ! रमजान ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या घरी मोठा उत्सव असतो त्यांच्या आनंदाला त्यादिवशी उधान असते. त्यादिवशी मुस्लिम बांधव आपल्या सर्व नातेवाईकांना,शेजाऱ्यांना, प्रतिष्ठित, निमंत्रित, मित्रपरिवार, जमातवाले इत्यादी सर्वांना अतिशय प्रेमाने आणि आग्रहाने आपल्या घरी बोलावतात आणि शीरखुर्मा खाऊ घालतात.

त्यादिवशी शीरखुर्मा हे जगातले सगळ्यात मोठे पक्वान असते. ती केवळ एक शिरखुर्माची वाटी नसते… तर ती वाटी असते बंधुत्वाची…! ती वाटी असते समतेचे प्रतीक…! एवढेच नव्हेतर ते असते समाजा समाजातील माणसांच्या प्रेमाचे अलोट प्रतिक…!   म्हणूनच तर गावातील कुठल्याही जातीचा माणूस असो तो वर्षातून एकदा आपल्याला शीरखुर्मा खायला मिळणार याची वाट पाहत असतो आणि तो खायला मिळाल्यावर स्वतःला भाग्यवान समजत असतो.

तसे पाहिले तर शीरखुर्मा म्हणजे  एक शेवयांची खीर असते जी मुस्लिमेत्तर लोकांच्या घरी सुद्धा खूप छान पद्धतीने बनवता येते. त्यामध्ये सुद्धा दूध, केशर आणि महागातले ड्रायफ्रूट्स घातलेले असतात. तरीपण त्याला शीरखुर्माची गोडी येत नाही कारण शिरखुर्म्यात मुस्लिम बांधवांचे प्रेम असते… त्याचा गोडवा खिरीमध्ये मिसळलेला असतो.तर त्याची सर दुसऱ्या कशाला कशी येईल?

खूप वर्षापूर्वीची माझ्या बालपणीची एक गोष्ट आहे. त्यावेळी मी साधारणपणे 11ते 12 वर्षांचा असेन. तो एक रमजान इदचा दिवस होता.  सकाळचे नऊ साडेनऊ वाजले होते. आम्ही आंघोळ करून चावडीपुढे खेळत असताना पोपटदादा अचानक तिथे आला. तो खूपच खुशीत दिसत होता. दररोज याच वेळी तो अर्धी पावशेर घेऊन टाईट असायचा. त्यामुळे त्याच्याकडे कोणी फारसे लक्ष देत नसे. कोणाची तरी दारू पिऊन दुसऱ्याच कोणालातरी शिवीगाळ करणे,  कोणाबरोबर तरी भांडण करणे हे त्याचे रोजचे ठरलेले असे परंतु त्यादिवशी मात्र तो एकदम खडकमध्ये होता. विशेष म्हणजे तो आपल्या दोन्ही पायावर सरळ उभा होता…!

आपल्या ओठावरून जीभ फिरवत आमच्याकडे बघून तो म्हणतो कसा, ”  पोराहो, जावा… शीरखुर्मा पिऊन या, मी आत्ताच चार वाट्या शीरखुर्मा पिऊन आलो. ” एवढे बोलून त्याने एक जोरकास ढेकर दिला.

आम्ही त्याला विचारलं, ” दादा शीरखुर्मा म्हणजे काय असतं?”

“अरे येड्यांनो, आज  ईद आहे ना? त्यामुळं मुसलमानांच्या घरी प्रसाद म्हणून सगळ्यांना शीरखुर्मा देत्यात.”

तुम्हाला मोठ्या माणसांना देत असत्याला आम्हाला बाराक्या पोरांना कोण देणार?मी विचारले.

“अरे पोरांनो, ते लहानांना,थोरांना सगळ्यांनाच देत्यात जावा तुम्हाला बी देत्याल, आजच्या दिवशी कोण न्हाय म्हणणार न्हाय. ” 

 “पण,कुणाच्या घरी जायचं आम्ही? ”  मी विचारलं. 

“अरे, कोणाच्या बी घरी जायचं… समशेर,ताया, रमजानभाई, बरकतभाई जाफरभाई,मुन्नाभाई नाहीतर आपला बाळूभाई आहेच की..! त्याच्या घरी जा. सगळी आपलीच हाईत.

पोपटदादांनी आम्हाला अगदी सविस्तर माहितीदेवून आम्हाला शीरखुर्मा खायला जाण्यासाठी प्रोत्साहीत केले.

मग मी हळूच म्हटलं,” आम्हाला सोडा की कुणाच्यातरी घरी, तुमच्या वशिल्याने.”

“अरे,त्याला वशिला कशाला लागतोय?कोणीबी जातय कोणाच्याबी घरी आज सण आहे त्यांचा कोणी कोणाला नाही म्हणत नाही.जावा, पळा लवकर… “

“आईला ‘लईच भारी झालं की! मग जाऊ का मी समदीच ?%

” अरे जावा जावा लवकर नाहीतर सगळा शीरखुर्मा संपून जाईल… “

संपून जाईल म्हटल्याबरोबर आम्ही सणाट पळालो…

सगळेजण वाडा ओलांडून मशिदीकडे गेलो. तिथे माशिदीवर भलमोठ्ठा स्पीकर लावला होता.  स्पीकरवर बहारदार  कव्वाली ऐकायला येत होती.

सगळे मुस्लिम बांधव नवनवीन कपडे घालून डोक्यावर अर्ध चंद्राकर टोप्या घालून आनंदाने इकडून तिकडे धावत होते. समोर आल्यावर एकमेकांच्या गळाभेटी करत होते. त्यांच्या भाषेत एकमेकांना काहीतरी म्हणत होते. सगळेजण आपापल्या घराच्या विरुद्ध दिशेला जात होते. ते एकमेकांकडे शीरखुर्मा खायला जात होते असा त्याचा अर्थ होता. आम्ही ते सगळे लांबून पाहत होतो. तर गावातले बरेच लोक सुद्धा मुसलमानाच्या वाड्यातून अगदी मिटक्या मारत बाहेर येत होते. शीरखुर्मा खाऊन आलो म्हणजे गावात आपला किती वट आहे, आपली किती पथ आहे, मुसलमान लोक आपल्याला किती मानतात.हे प्रत्येकाच्याच देहबोलीतून जाणवत होते.

आमच्यातले दोघेजण समशेर भाईच्या वाड्याकडे गेले. दोघे आताराच्या घराकडे गेले. बरकत भाईच्या घराकडे मी आणि भूषण वळलो. बरकत भाईंचे घर खूप मोठे होते. इकडे गावी त्यांचा मटणाचा धंदा होता. घरातल्या महिलांचा बांगड्याचा धंदा होता. त्यामुळे घरात चांगलीच बरकत होती. परंतु त्या घरी माणसांची खूपच गर्दी असल्यामुळे आम्हाला आत जाण्याची डेरिंग होत नव्हती.

पांढराशुभ्र कुर्ता पायजमा घातलेले मोठमोठाले, दाढीवाले लोक,पान खाऊन लालसर तोंड झालेले ते मोठे लोक पाहिल्यावर आम्ही त्यांच्या दारातूनच काढता पाय घेतला.

बरकत भाईच्या शेजारीच एका मिलिटरीमनचे घर होते पण तिथे भाभी  घरी एकटीच होती. लहान पोरं कुठेतरी खेळायला गेली होती.  आम्ही तिच्या घरात डोकावल्यासारखं केलं तर आतून आवाज आला, ” कोण पाहिजे रे इनको? किसके लडके है तुम?” भाभींचा  असा आवाज कानावर पडताच आम्ही तिथून कलटी मारली अन थेट मशिदीच्या मागे उभे येऊन उभे राहिलो… मनात विचार केला आज काय आपल्याला शीरखुर्मा मिळत न्हाय. पण शीरखुर्मा न खाता घरी परत जायचं तरी कसं? मन माघर घ्यायला तयार होत नव्हते. मग मी भूषणला म्हटलं, ” काय होईल ते होईल आपण आता माघार घ्यायची नाही. ” भूषणही म्हणाला होय चाललं. ” शिरखुर्मा खाल्ल्याशिवाय आज घरी जायचं नाही. असा आम्ही चंगच बांधला होता. तेवढ्यात समोरून रामूसवाड्यातून आमचा नाना आला. तो स्वभावाला एकदम भारी आणि दिलदार माणूस होता. त्याच्याजवळ पैसे असल्यावर कोणी काही मागावं तो कोणाला नाही म्हणायचा नाही. प्रेमाच्या माणसावर तर तो  पैशांची उधळण अगदी मुक्तपणे करीत असे परंतू त्याचा एक वीक पॉइंट होता तो असा की तो अत्यंत स्वाभिमानी होता. त्याला कुणी कुणापुढे हात पसरलेलं आवडायचं नाही. आता आम्ही शीरखुर्मा पिण्यासाठी दारोदारी फिरतोय हे त्याला कधीच आवडलं नसतं. त्याला तसं कळलं तर तो आम्हाला फोकाने मारल्याशिवाय राहणार नाही. त्या भीतीनेच मग आमची गाळण उडाली! नानाला समोर पाहताच भूषण पळाला. मी ही त्याच्या मागे पळालो. बाकीचेही वाट दिसेल तिकडे पळाले.भूषण पुढे आणि मी मागे मशिदीला वेडा मारून रस्त्याने सरळ नळापर्यंत जाऊन नळापासून बोंदऱ्याच्या  बागेतून थेट धोंडीरामनानाच्या दुकानाला वळसा घालून गावात शिरलो…! पुढे भिमजी नानांच्या दुकानासमोरून तेली नानाच्या दारातून जाफर भाईंच्या दारात आलो.

जाफरभाई आपला गरीब मनुष्य होता.टेलरिंग काम करायचा. तो एक साधा टेलर होता. त्याच्याकडे नवीन कपडे कमी पण जुनेच कपडे जास्त शिवायला यायचे. तो आणि त्याची बहीण कसेबसे दिवस काढत होते. त्याची ती परिस्थिती आम्हाला माहीत असल्यामुळे त्यांच्या घरी शीरखुर्मा खाण्यासाठी जाताना मला वाईट वाटायला लागले.त्यामुळे आम्ही ते टाळले. त्याच्या पुढचं घर माझा वर्गमित्र असलेल्या फरीदचं होतं म्हणजे ते बंदच असायचं कारण ते सगळे लोक मुंबईला असायचे. फक्त झेंड्याला म्हणजे यात्रेला सगळे गावात यायचे.

फरीदचे घर ओलांडून आम्ही पुढे आलो पुन्हा त्या भाभीच्या दारात आलो जिने मघाशीच आम्हाला हाकललं होतं. आता त्यापुढे एकच घर होतं ते म्हणजे बाळू भाईचं. तेवढा एकच पर्याय आता आमच्याकडे होता. बाळूभाई सुद्धा अत्यंत गरीब मनुष्य होता.  त्याला चार मुली आणि दोन मुलगे होते. त्यांचा सायकल दुरुस्तीचा व्यवसाय असल्याने संसार कसाबसा तरी चालत होता. आम्हाला तर आता कशाचाच विचार करून चालणार नव्हतं कारण ते आमच्या दृष्टीने शेवटचं घर होतं.

– क्रमशः भाग पहिला 

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दोन अक्षरी मंत्र… – लेखिका : सुश्री मंगला खानोलकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ दोन अक्षरी मंत्र… – लेखिका : सुश्री मंगला खानोलकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

अणुशक्ती नगर मधल्या माझ्या एका मैत्रिणीला दोन्ही मुलगेच होते.आम्हा सर्वांची मुलं एकत्रच लहानाची मोठी झाली. जेव्हा आमची मुलं काॅॅलेजातही जायला लागली तेव्हा आमच्या group मधली  ती मैत्रीण आम्हाला म्हणाली की ‘ मला दोन्ही मुलगेच आहेत ग. कधीकधी ना मला, आज ना उद्या त्यांची लग्नं होऊन

घरी सुना येतील या विचाराची भीतीच वाटते. काय माहीत मला कशा सुना मिळतील….? हल्लीच्या मुलींच्या इतक्या गोष्टी ऐकतो ना आपण…. !’

आम्हाला तर तिचं बोलणं ऐकून हसूच आलं.आम्ही तिघी मैत्रिणी दोन दोन मुलीवाल्या होतो.आम्ही

म्हटलं की ‘ आम्ही मुलींच्या आयांनी घाबरायचं , त्यांना घर कसं मिळेल.. ? सासरची माणसं कशी असतील..म्हणून. तर तूच काय घाबरते आहेस… ?’ मग आम्ही सर्वांंनी तिची समजूतही 

घातली आणि चेष्टाही केली. पण तिच्या मनात या विचाराने घर केलेलं होतंच. 

एकदा आम्हाला आमच्या काॅलनीतल्या एक ओळखीच्या बाई भेटल्या.त्या आमच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या.त्यांना पण दोन्ही मुलगेच होते आणि त्यांची लग्नं झालेली होती.

त्यांच्याशी गप्पा मारताना माझी मैत्रीण त्यांना म्हणाली, ‘तुम्हाला दोन सुना आहेत. तुम्हाला टेन्शन नाही का येत त्यांच्याशी बोलताना किंंवा वागताना… ?’

त्यावर त्या म्हणाल्या, ‘ नाही हो. या मुली तशा चांगल्या असतात. फक्त त्यांच्या बाबतीत आपण काही पथ्यं पाळली ना , की  काहीच  प्रॉब्लेम येत नाही.मग सुनांचे आपल्याशी संबंध कायम गोडीगुलाबीचेच राहातात. 

माझ्या मुलांची लग्नं ठरल्यानंतर लगेेचच, ‘घरात सून आली की तिच्याशी कसं वागायचं ‘ते मी ठरवून टाकलेलं होतं.

– – पहिली गोष्ट म्हणजे तिला कधीही कुठल्याही बाबतीत टोकायचं नाही…मुुळात तिच्याकडून फार 

अपेक्षाच ठेवायच्या नाहीत..!

आता समजा मुलगा आणि सून अचानक बाहेर जायला निघाले, तर ‘कुठे जाता? कधी येणार.. ?जेवायला  असणार का….. ?’ यातलं काहीही त्या दोघांना विचारायचं नाही… !

कधी मुलाने येऊन सांगितलं की ‘ ‘आज ‘ही’ office मधून येताना परस्पर माहेरी जाणार आहे राहायला..’ 

तर त्यावर ,’ किती तारखेला परत येणार… ?’असा प्रश्न विचारायचा नाही.किंवा ‘ तिनेच का नाही मला

सांगितलं.. ? तू मध्यस्थ कशाला हवास.. ? मी काय तिला नको म्हणणार होते का..?असलं 

काहीही बोलायचं नाही. फक्त ”बरं !” एवढंच म्हणायचं.

जर मुलगा सून खरेदी करून आले आणि मुलगा म्हणाला की दुकानात नेमका सेल लागलेला होता.म्हणून हिने चपलांचे तीन जोड घेतले. तर, ‘चपलांचे चार जोड आधीचेच घरात पडले आहेत.आता हे कशाला हवे होते? आम्ही तर चपलांचा एकच जोड तुटेपर्यंत वापरायचो..!’ असं पुटपुटायचं सुद्धा नाही..काय

म्हणायचं.. ? ” हो का … बरं… !”

कधी सून म्हणाली की,’आई , आज माझ्या 5- 6 मैत्रिणी येणार आहेेत घरी. तेव्हा तुम्हालाआणि 

बाबांंना आज संध्याकाळी TV वरच्या संंध्याकाळच्या serials नाही बघता येणार. मग तुमच्या खोलीतच बसून राहाण्यापेक्षा संध्याकाळी तुम्ही थोडावेळ गार्डनमधे जाल का..?म्हणजे तुम्हालाही कंटाळा येणार नाही आणि माझ्या मैत्रिणींनाही मोकळं वाटेल.’तर  ह्यावर आपण काय म्हणायचं…..? ” बरं…!”

समजा त्या दोघांचा अचानक बाहेेर जेवायला जायचा बेत ठरला तर मुलगाच सांगेल तुम्हाला.’आई 

आम्ही बाहेर जातोय.बाहेरून जेवूनच येऊ. तर ‘ अरे मग आधी सांगायला काय झालं होतं… ? बाईला चार पोळ्या कमीच करायला सांगितलं असतं ना ? आता सगळं अन्न उरणार. आणि उद्या आम्हाला सगळं शिळं खावं लागणार… !’ अशी कुरकुर करायची का…?छे …छे… ! 

मग आपण काय म्हणायचं..? ” बरं !”

आजकाल तर अगदी दिवसाआड Amazon मधून खरेदी केलेली parcels घरी येत असतात. मुलं

दिवसभर घरात नसतातच.तेव्हा आपणच ती घेऊन ठेवतो.पण ती अजिबात उघडायची नाहीत. संध्याकाळी सून घरी आल्यावर, कपाळावर अगदी एकही आठी न घालता, शांतपणे ‘ हे तुझं काय काय मागवलेलं आलंय बरं का ग ‘  असं म्हणून सगळं तिच्या ताब्यात द्यायचं.’एवढं काय काय मागवलं आहेस… ?’ असं ही विचारायला जायचं नाही.. आणि तिने दाखवलंच तर ”वा.. छान.. !”‘ म्हणायला देखील विसरायचं नाही.

अगदी, आपल्याला नातू किंवा नात झाल्यानंतर, पाच सहा महीन्यांनी कामावर हजर होताना जर सून म्हणाली की ‘आता रोज office ला जाताना मी बाळाला माझ्या आईकडेच सोडून जात  जाईन आणि संध्याकाळी येताना घेऊन येत जाईन.’ तर अशा वेळी, तुुमच्यात अगदी बाळाला सांंभाळायची आवड आणि ताकद दोन्ही असली तरीदेखील फक्त एकच  दोन अक्षरी मंत्र उच्चारायचा …! 

सांंगा कोणता….? ” बsssरं…! “

‘फक्त हा एकच ‘मंत्र’ तुम्ही सदैव जपत राहिलात, तर मग तुमचं मुलाशी नि सुनेशी असलेलं नातं अगदी निश्चित छान राहील….!’

….खरंतर हा मंत्र मुलांच्या आणि मुलींच्या, दोन्ही आयांनी पक्का लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

एकूणच मुलांच्या संसारात कोणतीच लुडबूड करायची नाही. की त्यांना सल्ले द्यायलाही जायचं

 नाही…मग कित्ती सोपं होऊन जाईल ना सगळं….?

मात्र कायम हे लक्षात असू दे की कधीकधी,अगदी सोप्प्या वाटणा-या गोष्टीच सगळ्यात कठीण असतात

लेखिका : सुश्री मंगला खानोलकर

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक १ ते ११) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक…

अमी हि त्वां सुरसङ्‍घा विशन्ति केचिद्भीताः प्राञ्जलयो गृणन्ति।

स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्‍घा: स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः ॥२१॥

*

प्रवेशताती तुमच्यामध्ये समूह कितीक देवतांचे

काही होउन भयभीत करिती आर्त स्तवन तुमचे  

सिद्ध-महर्षींच्या कल्याणास्तव मधुर स्तोत्र गाती

प्रसन्न करण्या तुम्हा परमेशा अमाप  करती स्तुती ॥२१॥

*

रुद्रादित्या वसवो ये च साध्याविश्वेऽश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च ।

गंधर्वयक्षासुरसिद्धसङ्‍घावीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ॥२२॥

*

आदित्य रुद्र तथा वसू साध्य सवे

अश्विनीकुमार मरुद्गण पितर देवविश्वे

गंधर्व सिद्ध असूर आणि उपदेव यक्ष 

विस्मित घेत दर्शन विस्फारुनीया अक्ष ॥२२॥

*

रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रंमहाबाहो बहुबाहूरूपादम्‌ ।

बहूदरं बहुदंष्ट्राकरालंदृष्टवा लोकाः प्रव्यथितास्तथाहम्‌ ॥२३॥

*

नयन आनन भुजा जंघा तथा उदर पाद बहुत

विक्राळ बहुत दंत देखुनी व्याकुळ सकल होत ॥२३॥

*

नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णंव्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम्‌ ।

दृष्टवा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ॥२४॥

*

दर्शन होता तुमचे विष्णो विशाल व्योमव्याप्त  

बहुवर्णी बहूत आनन अष्टदिशांना आहे पहात

विशाल तव नयन देदिप्यमान मुखावरी अगणित

शांती ढळली धैय गळाले अंतर्यामी मी भयभीत ॥२४॥

*

दंष्ट्राकरालानि च ते मुखानिदृष्टैव कालानलसन्निभानि ।

दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास ॥२५॥

*

प्रलयकाली अग्नी सम मुखात कराल दंत

हरपले दिशाभान सुखचैन ना मज प्राप्त

विराट कराल तव या दर्शने मी भयभीत

जगन्निवासा देवेशा प्रसन्न व्हा करण्या शांत ॥२५॥

*

अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसंघैः ।

भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ॥२६॥

*

वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि ।

केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्‍गै ॥२७॥

*

धृतराष्ट्रपुत्र तथा समस्त राजे तुझ्यात प्रवेशतात

भीष्म द्रोण प्रधान वीर अंगराज कर्ण समवेत 

तव कराल मुखात वेगे वेगे प्रवेर करत दौडत

कित्येक शीरे चूर्ण दिसतात तुझ्या भयाण मुखात ॥२६,२७॥

*

यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति ।

तथा तवामी नरलोकवीराविशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ॥२८॥

*

दुथडी सरिता वेगाने वाहते विलिन व्हावया दर्यात

नरवीर तद्वत  प्रवेशती विलिन व्हावया तव मुखात ॥२८॥

*

यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगाविशन्ति नाशाय समृद्धवेगाः ।

तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः ॥२९॥

*

पतंग झेपावे मोहवशे धगधगत्या अग्नीमध्ये

जळुन खाक व्हावया  अनलाच्या ज्योतीमध्ये

समस्त लोक विवेकशून्य स्वनाश करुन घ्यावया

मुखात तुमच्या वेगाने धावतआतुर प्रवेशावया ॥२९॥

*

लेलिह्यसे ग्रसमानः समन्ताल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वलद्भिः ।

तेजोभिरापूर्य जगत्समग्रंभासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो ॥३०॥

*

ग्रास करुनिया त्या सकलांचा माधवा चर्वण करिता

उग्र तेज आपुले तापुनी भाजुन काढी समस्त जगता ॥३०॥

 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उसनं… लेखिका : सुश्री प्रणिता स्वप्निल केळकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ उसनं… लेखिका : सुश्री प्रणिता स्वप्निल केळकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

वैशाली आणि गौरवचं नुकतंच एका महिन्यापूर्वी लग्न झालेलं… दोघेही मूळ अकोल्याचे. नोकरी निमित्त गौरव आधीच मुंबईमध्ये स्थाईक झालेला आणि आता लग्नानंतर वैशालीने देखील मुंबईमध्ये नोकरी बघण्याचे ठरले. वैशाली जरी अकोल्यात वाढलेली तरी एकदम स्मार्ट, प्रचंड हुशार आणि हुशार असल्याने साहजिकच थोडीशी आत्मकेंद्री.. नाही म्हणजे मित्र मैत्रीण होते तिला, पण तरीही तिचा अभ्यास वगैरे सांभाळून मगच त्यांच्या बरोबर मज्जा करायला, फिरायला जाणारी अशी होती ती. आई अनेकदा तिला सांगत, अगं असं घुम्या सारखं राहू नये.. चार लोकात मिसळावं, आपणहून बोलावं, ओळखी करून घ्याव्यात… पण तेव्हा तिला काही ते फार पटत नसे.. आई सतत तिच्या बरोबर असल्यामुळे तिलाही कधी एकटं वगैरे वाटलं नाही…

आता मुंबईमध्ये आल्यावर हळू हळू इथलं वातावरण अंगवळणी पडत होत तिच्या.. वैशालीला मुंबईला घरी येऊन १०/१२ दिवस झाले होते.. कामवाली बाईसुद्धा मिळाल्याने वैशालीचा भार एकदम कमी झाला होता… 

ती अशीच एका दुपारी पुस्तक वाचत बसली होती तेवढ्यात दारावरची बेल वाजली.. तिने थोडंसं नाराजीनेच दार उघडलं.. पाहते तो साधारण ७० च्या आसपास वय असलेल्या आज्जी उभ्या होत्या दारात… 

तिने दारातूनच विचारलं, “आपण कोण? काय हवं आहे?”

“मी, लतिका देवस्थळी.. इथे शेजारच्या फ्लॅट मध्ये राहते.” आज्जीबाईंनी माहिती पुरवली.

“बरं…काही काम होतं का??”, आपली नाराजी सुरातून फार जाणवू न देता वैशालीने विचारलं.

” १०/१२ दिवस झाले तुम्हाला येऊन , म्हटलं ओळख करून घेऊ.. म्हणून आले… आत येऊ? ” 

वैशालीने थोडं नाराजीनेच दार उघडलं… तशी आज्जीबाई आनंदाने घरात येऊन सोफ्यावर बसल्या…

“थोडं पाणी देतेस??”, आज्जी नी विचारलं.

“हो…”

वैशाली स्वयंपाक घरातून पाण्याचा ग्लास घेऊन आली…

“छान सजवलयस हो घर… निवड चांगली आहे तुझी… मला थोडी साखर देतेस.. घरातली संपली आहे… ह्यांना चहा करून द्यायचाय.. मेला, तो किराणावाला फोन उचलत नाहीये माझा.. कुठे उलथलाय देव जाणे..” आज्जी एका दमात सगळं बोलून गेल्या.

“हो आणते…”  वैशाली वाटी भरून साखर घेऊन आली….. 

“चला आज साखर दिलीस.. आपलं नातं साखरे सारखं गोड राहील हो पोरी “, असं म्हणून देवस्थळी आज्जी तिच्या गालाला हात लावून निघून गेल्या…

जरा विचित्रच बाई आहे?? असं पहिल्याच भेटीत कोणी काही मागत का.. आणि हे काय, गालाला काय हात लावला तिने.. जरा सांभाळूनच राहावं लागणार असं दिसतंय… वैशालीचं आत्मकथन सुरू होतं.. तेवढ्यात गौरव आला….. 

तिने गौरवच्या कानावर घडलेला प्रकार घातला… तो म्हणाला, ” अग म्हाताऱ्या आहेत ना वाटलं असेल तुझ्याशी बोलावं म्हणून आल्या असतील.. नको काळजी करूस..”

एक दोन दिवस गेले अन् परत दुपारी दारावरची बेल वाजली..

वैशालीने दार उघडलं तर समोर आज्जी… आणि हातात वाटी…. आज ही काहीतरी मागायला आल्यात वाटतं…

“जरा थोडा गूळ देतेस का?? ह्यांना आज गूळ घातलेला चहा प्यायचाय आणि घरातील गूळ संपलाय…” इति आज्जी

“हो.. देते…”

वैशाली वाटीतून गूळ घेऊन आली … 

“वा .. धन्यवाद हो पोरी… चांगली आहेस तू… असं म्हणून तिच्या हाताला हात लावून आज्जी घरी गेल्या..”

तिला परत असं त्यांनी स्पर्श करणं जरा खटकलं ….. 

पुन्हा एक दोन दिवस झाले आणि आज्जी दारात उभ्या आणि हातात वाटी, “जरा दाणे देतेस…”

— हे असं हल्ली दर एक दोन दिवस आड चाले… काहीतरी मागायचं आणि जाताना हाताला, गालाला, पाठीला, डोक्याला हात लावून निघुन जायचं… वैशालीला ते अजिबात आवडत नसे, अस परक्या बाईने आपल्याला हात लावणं..

ती आपली गौरवला नेहमी सांगायची पण तो काही हे सगळं फार सिरीयसली घेत नव्हता…

एके दिवशी न राहवून तिने ठरवलं आता आज आपण त्यांच्या घरी जाऊन काहीतरी मागू या… हे काय आपलं सारखं घेऊन जातात काही ना काही….. 

वैशाली ने आज्जींचं दार वाजवलं.. आजींनी दार उघडलं तशी वैशाली घरात गेली..

आज्जी, ” अरे व्वा, आज चक्क तू माझ्या घरी आलीस.. छान छान.. खूप बरं वाटलं…” 

वैशाली आपलं स्मितहास्य करत घरावरून नजर फिरवत होती आणि एका जागी तिची नजर खिळली… भिंतीवर २५/२६ च्या आसपास असलेल्या एका सुंदर मुलीचा फोटो आणि त्याला हार…

आज्जीच्या लक्षात आलं… 

” ही माझी वैशाली… काय गंमत आहे नाही… सेम नाव… काही वर्षांपूर्वी अपघातात गेली… मला कायमच पोरकं करून… जेव्हा तू इथे रहायला आलीस आणि तुझं नाव ऐकलं ना तेव्हा सगळ्या आठवणी एकदम ताज्या झाल्या… खूप अडवलं ग मी स्वतःला की माझी वैशाली आता नाहीये आणि परत कधीच येणार नाहीये… पण मन फार वेड असतं पोरी… बुद्धीवर मात करतंच….  

…. आणि मग मी सुरू केलं तुझ्याकडे उसनं सामान घ्यायला येणं… पण खरं सांगू, मी सामान नाही ग .. 

स्पर्श उसना घेत होते… !! ” 

लेखिका : सुश्री प्रणिता स्वप्निल केळकर 

प्रस्तुती: सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ लघुकथा – मुंह दिखाई… ☆ सुश्री नरेंद्र कौर छाबड़ा ☆

सुश्री नरेंद्र कौर छाबड़ा

(सुप्रसिद्ध हिंदी साहित्यकार सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा जी पिछले 40 वर्षों से अधिक समय से लेखन में सक्रिय। 5 कहानी संग्रह, 1 लेख संग्रह, 1 लघुकथा संग्रह, 1 पंजाबी कथा संग्रह तथा 1 तमिल में अनुवादित कथा संग्रह। कुल 9 पुस्तकें प्रकाशित।  पहली पुस्तक मेरी प्रतिनिधि कहानियाँ को केंद्रीय निदेशालय का हिंदीतर भाषी पुरस्कार। एक और गांधारी तथा प्रतिबिंब कहानी संग्रह को महाराष्ट्र हिन्दी साहित्य अकादमी का मुंशी प्रेमचंद पुरस्कार 2008 तथा २०१७। प्रासंगिक प्रसंग पुस्तक को महाराष्ट्र अकादमी का काका कलेलकर पुरुसकर 2013 लेखन में अनेकानेक पुरस्कार। आकाशवाणी से पिछले 35 वर्षों से रचनाओं का प्रसारण। लेखन के साथ चित्रकारी, समाजसेवा में भी सक्रिय । महाराष्ट्र बोर्ड की 10वीं कक्षा की हिन्दी लोकभरती पुस्तक में 2 लघुकथाएं शामिल 2018)

आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा मुंह दिखाई

? लघुकथा – मुंह दिखाई… ? सुश्री नरेंद्र कौर छाबड़ा ?

बहुत धूमधाम से शादी सम्पन्न हुई। अगले दिन वधू की मुंह दिखाई की रस्म अदा होनी थी। सभी रिश्तेदार बड़ी उत्सुकता से इंतजार कर रहे थे, देखें सास अपनी बहू को मुंह दिखाई में क्या देती है?

बहूू जब पूूूरी तरह से तैयार होकर आई तो सास के चरण छूए। सास ने आशीर्वाद में सर पर हाथ फेरा फिर पूछा- “बहुुरानी क्या चाहिए तुम्हें मुंह दिखाई में..?”

‘दुल्हन, आज तो तुम्हारा दिन है। जडाऊ कंगन मांग लो’ एक रिश्तेदार ने कहा,

‘अरे नहीं हीरे का नेकलेस मांग लो… ‘दूसरे ने कहा हंसी ठठ्ठा चलने लगा। तीसरे ने कहा- ‘अपने लिए गाड़ी मांग लो…’ दुल्हन भी सभी के साथ मंद-मंद मुस्करा रही थी और सास भी लेकिन सास के मन में कुछ धुकधुकी भी होने लगी। रिश्तेदारों की बातों में आकर कहीं बहू सचमुच कोई ऐसी मांग न रख दे जिसे वे पूरी न कर सके।

कुछ समय तक चुहलबाजी, हंसी ठठ्ठा चलता रहा। फिर सास ने बहू से कहा- ‘हां बहू, क्या चाहिए तुम्हें?’

‘मम्मी जी, जब मैं बहुत छोटी थी तो मेरे पिताजी का देहांत हो गया था, पिता का प्यार क्या होता है कभी जाना ही नहीं। माँ ने ही दोनों बहनों को पाला पोसा है। मैं चाहती हूँ आपके प्यार आशीर्वाद के साथ-साथ पापा जी का प्यार भी मिले ताकि मैं भी पिता के प्यार को अनुभव कर सकूं। बस और कुछ नहीं चाहिए मुझे __‘बहू ने बड़ी विनम्रता से कहा। सारे रिश्तेदारों की आंखों में बहू के प्रति प्रशंसा के भाव नजर आने लगे थे। सास ने बहू के सिर पर हाथ फेरा उसके माथे पर चुंबन जड़ा और उसे अपने अंक में भींच लिया।

© नरेन्द्र कौर छाबड़ा

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

 

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 206 ☆ विस्तार है गगन में… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना विस्तार है गगन में। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – आलेख  # 206 ☆ विस्तार है गगन में

खेल जीतने के लिए की गयी चालाकी ,अहंकार, अपने रुतबे का गलत प्रयोग, गुटबाजी, धोखाधड़ी ये सारी चीजें दूसरे की नज़रों में गिरा देती हैं। भले ही लोग अनदेखा कर रहे हों किंतु आप उनकी नज़रों से गिरते जा रहे हैं। इसका असर आगामी गतिविधियों में दिखेगा। जब सच्ची जरूरत होगी तो कोई साथ नहीं देगा।

ईमानदार के साथ लोग अपने आप जुड़ने लगते हैं ,जो भी उसका विरोध करता है उसे खामियाजा भुगतना पड़ता है। पहले सामाजिक बहिष्कार होता था अब डिजिटल संदेशों के द्वारा बायकाट की मुहिम चला दी जाती है। जनमानस की भावनाओं के आगे उसे झुकना पड़ता है।

जिस तरह भक्त और भगवान का साथ होता है ठीक वैसे ही आस्था और विश्वास का भी साथ होता है। जब हम किसी के प्रति पूर्ण आस्था रख कोई कार्य करते हैं तो अवश्य ही सफल होते हैं। अपने लक्ष्य की प्राप्ति हेतु पूर्णमनोयोग से, गुरु के प्रति मन वचन कर्म से जिसने भी निष्ठा रखी वो अवश्य ही विजेता बन आसमान में सितारे की तरह चमका।

बिना आस्था के हम जीवन तो जी सकते हैं पर संतुष्ट नहीं रह सकते कारण ये कि हमें जितना मिलता है उससे अधिक पाने की चाह बलबती हो जाती है। ऐसे समय में आस्थावान व्यक्ति स्वयं को संभाल लेता है जबकि केवल लक्ष्य को समर्पित व्यक्ति राह भटक जाता है और धीरे- धीरे मंजिल उससे अनायास ही दूर हो जाती है।

जीवन में आस्थावान होना बहुत आवश्यक है आप किसी भी शक्ति के प्रति आस्था रखिए तो तो आप ये महसूस करेंगे कि उसकी शक्ति आपमें समाहित हो रही है।

ईश्वर में विश्वास ही, जीवन का आधार।

प्रेम भाव चलता रहे, सफल सुखद परिवार।।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares