मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मुलगी – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ मुलगी – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

कुठेतरी वीज कडाडली.त्या आवाजाने शहारुन अंजलीने खिडकीतून बाहेर पाहिलं.पावसाचा जोर खूप वाढला होता.सकाळपासूनच तो वेड्यासारखा कोसळत होता.सकाळी रितेश आँफिसला जायला निघाला तेव्हाही तो कोसळतच होता पण आतासारखं त्याचं स्वरुप रौद्र नव्हतं म्हणून तर रितेशला तिने अडवलं नव्हतं.सात वाजले होते.थोड्याच वेळात रितेश येणार होता.रेनकोट घालून गेला असला तरी तो थोडाफार ओला होणारच होता.’

आई बाबा आले नाही का गं?”छोटी पाच वर्षांची प्रिया बाहेर येवून विचारत होती.अंजली भानावर आली.”

 नाही अजून. येतील थोड्याच वेळात.तुझा अभ्यास झाला?”

मान डोलावत प्रियाने आपल्या हातातली वही तिच्यासमोर केली.एक ते दहा अंक लिहायचे होते.ते तिने व्यवस्थित लिहिले होते.

“आई देवाघरी जाणं म्हणजे काय गं?”तिच्या शेजारी सोफ्यावर बसत अचानक प्रियाने विचारलं.अंजली चमकली.

“का गं कुणी काही म्हंटलं का?”

” हो.ती आर्या आहे ना आमच्या क्लासमध्ये. तिचे बाबा देवाघरी गेले म्हणून ती आज आली नव्हती.”

अंजली अवघडली.त्या लहानग्या जीवाला काय सांगावं ते तिला सुचेना.शेवटी तिने खरं सांगायचं ठरवलं.

” बेटा आपण जन्म घेतो.मोठे होतो.शेवटी वय वाढलं की आपल्या सर्वांना मरण येतं.मरणं येणं म्हणजेच देवाघरी जाणं”

“हो पण मरणं म्हणजे काय?” प्रियाने निरागस चेहऱ्याने अजून एक गुगली टाकला.

” मरण म्हणजे आपलं आयुष्य संपणं.आपण मेलो की आपण नंतर कधीही कुणाला दिसत नाही.तू मोठी झाली की तुला सगळं व्यवस्थित कळेल.चल आता मला स्वयंपाक करु दे.बाबा येऊन फ्रेश झाले की आपण जेवायला बसू.”

लेकीच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघून तिला हसू आलं.पण तिचे प्रश्न लवकर संपणार नाहीत हे तिला अनुभवावरुन माहित होतं.प्रिया मग पुस्तक उघडून वाचत बसली.अंजली किचनमध्ये आली पण येतायेता प्रियाचा जन्म झाला तो दिवस तिला आठवला.मुलगीच झाली म्हणून सगळं घराणं नाराज होतं.कारणही तसंच होतं.तिच्या मोठ्या दिराला आणि नणदेलाही दोन्ही मुलीच होत्या.रितेशला तरी मुलगा व्हावा म्हणून तिच्या सासुबाईंनी कितीतरी नवस कबूल केले होते.रितेशला स्वतःला मुलगाच हवा होता.तोच काय अंजलीच्या भावानांही मुलीच असल्याने आपल्याला तरी मुलगा हवा याची तिने स्वतःही स्वप्नं रंगवली होती.अर्थातच प्रियाच्या जन्मामुळे सर्वच नाराज होते.तिच्या सासुबाईंनी तर महिनाभर नातीचं तोंड पाहीलं नव्हतं.प्रिया मोठी झाली ,गोड दिसायला लागली.मग मात्र सर्वांची नाराजी कमी होत गेली.तिच्या बाललीलांनी आणि बडबडीने सर्वांना वेड लावलं.पण आता दुसऱ्यावेळी मात्र मुलगाच हवा असंच सगळ्यांचं म्हणणं होतं.

अंजलीचा स्वयंपाक झाला पण रोज सात वाजेपर्यंत घरी येणाऱ्या  रितेशचा पत्ता नव्हता.पावसामुळे त्याला उशीर होईल हे तिने ग्रुहित धरलंच होतं.पण सव्वाआठ झाले होते.प्रियाला भुक लागली असणार म्हणून तिने त्याला फोन लावला.बराच वेळ टूकटूक वाजत राहिलं .शेवटी फोन न लागताच बंद झाला.तिने लागोपाठ तीन चार वेळा फोन लावला पण प्रत्येक वेळी बराच वेळ टूक टूक वाजून फोन बंद होत होता.शेवटी कंटाळून तिने प्रियाला हाक मारली.

“प्रियू.ये आतमध्ये आणि जेवून घे”

प्रिया आत आली आणि म्हणाली

” मी बाबा आले की जेवणार आहे”

“अगं वेडी आहेस का?बाहेर पाऊस सुरु आहे.त्यांना किती वेळ लागेल माहित नाही. तू जेवून घे आणि झोप”

” नाही. मी बाबांसोबतच बसेन”

ती जणू हट्टालाच पेटली होती.

“बरं ठिक आहे.नऊपर्यंत वाट पाहू या.मग मात्र जेवून घ्यायचं हं मुकाट्याने”

प्रियाने मान डोलावली.

दोघीही हाँलमध्ये येऊन बसल्या.अंजलीने टिव्ही लावला.सिरीयलमध्ये नेमका एका पात्राचा अपघाती म्रुत्यु दाखवल्या जात होता.तो पाहून अंजलीला अस्वस्थ वाटू लागलं.तिने चँनल बदललं पण मनाची अस्वस्थता काही कमी झाली नाही.

“आई बाबांना खुप ऊशीर झाला ना?फोन कर ना त्यांना”प्रिया म्हणाली .तिच्या बोलण्यात आणि चेहऱ्यावर चांगलीच बैचेनी दिसत होती.अंजलीने मोबाईल घेऊन रितेशचा नंबर डायल केला पण मघासारखाच त्याचा फोन लागला नाही. काय करावं याचा विचार करत असतांनाच तिला एक कल्पना सुचली.रितेशचा मित्र प्रकाशचा नंबर तिच्याकडे होता.तिने प्रकाशला फोन लावला

” भाऊजी हे अजून घरी आले नाहीत. त्यांचा फोनही लागत नाहिये.काही आँफिसचं महत्वाचं काम होतं का?” प्रकाशने फोन उचलल्यावर तिने विचारलं

“नाही तसं तर काही काम नव्हतं आणि रितेश तर साडेसहालाच आँफिसमधून बाहेर पडला.आतापर्यंत घरी पोहचायला हवा होता.मीसुद्धा आताच घरी आलोय.वाटेत खुप पाणी साचलंय.पण तुम्ही काळजी करु नका वहिनी. येईल तो.रस्त्यात कुठंतरी अडकला असेल”

” तुम्ही फोन करुन बघता का त्यांना?”

” हो करतो ना!आणि लगेच तुम्हांला अपडेट्स कळवतो”

“ओके.थँक्स” तिने फोन ठेवला

दहा मिनिट्स झाले पंधरा झाले तरी प्रकाशचा फोन आला नाही. शेवटी अंजलीने त्याला फोन करण्यासाठी मोबाईल उचलला तेवढ्यात त्याचाच फोन आला

“वहिनी तीनचार वेळा त्याला फोन लावायचा प्रयत्न केला पण फोन काही लागत नाहिये. मला काय वाटतं आपण अकरापर्यंत थांबावं.मग नंतर मी कुणालातरी घेऊन त्याला पहायला जातो”

” भाऊजी पोलीस कंम्प्लेंट केली तर?”

” त्यासाठी आपल्याला सिटी पोलिस स्टेशनला जावं लागेल.एकतर सध्या जोरदार पाऊस सुरु आहे शिवाय ठिकठिकाणी झाडं कोसळून पडली आहेत.त्यामुळे आपल्याला तिथपर्यंत जाणंच मुश्कील. दुसरं म्हणजे मला नक्की नियम माहित नाही पण पोलिसही किमान चोवीस तास वाट बघायला सांगतात मगच तक्रार स्विकारतात.आपण असं करु उद्या सकाळी पोलिस स्टेशनला जाऊ तोपर्यंत वाट बघूया रितेशची “

“चालेल भाऊजी मी अकरा वाजता फोन करते तुम्हांला”

तिने फोन ठेवला तशी प्रिया एकदम येऊन तिला बिलगली

“आई बाबा येतील ना गं?” तिच्या डोळ्यात आसवं जमा होत होती.

” हो गं बेटा.येतील.तू चल बरं जेवून घे आणि झोप.उद्या सकाळी शाळेत जायचंय ना?”

प्रियाने मान डोलावली

” पण मला भुक नाहिये.बाबा आल्यावर आपण एकत्रच जेवूया ना “

” नको.त्यांना उशीर झाला तर तू झोपून जाशील.आणि मग जेवणार नाहीस “

तिला ते पटलं असावं.म्हणून मग ती आईच्या मागे किचन मध्ये गेली.अंजलीने तिला वाढलं

“आई तू पण जेव ना!”

“नाही बेटा मी बाबांसोबतच जेवते तुला माहितेय ना?”

“हो”

प्रियाने जेवायला सुरुवात केली पण चतकोर पोळी खाऊन होत नाही तर ती म्हणाली

“आई बस झालं मला भुक नाहिये”

“अगं असं काय करतेस?तेवढी पोळी संपव तरी!रोज तर दोन पोळ्या खातेस.”

“नको ना आई प्लीज.मला खरंच भुक नाहिये”

“बरं चल.हात धू आणि झोप”

तिला बेडरुममध्ये झोपवून ती बाहेर हाँलमध्ये आली.परत तिने रितेशला फोन लावला पण तोच प्रकार पुन्हा घडला.मग तिने टिव्ही लावला.तिची आवडती सिरीयल सुरु होती पण ती बघण्यातही तिचं मन लागेना.नवरा करतो तशी चँनल वारंवार बदलून ती सर्फिंग करु लागली पण मन मात्र थाऱ्यावर नव्हतं.जरासा गाडीचा आवाज आला की तिचे कान टवकारायचे.टिव्ही म्युटवर करुन ती फाटक उघडण्याचा आवाज ऐकायचा प्रयत्न करायची.दोनतीनदा तर तिने दरवाजा उघडून बाहेरही बघितलं होतं.पाऊस सुरुच होता.खरंतर पाऊस तिला खुप आवडायचा.रिमझिम पावसात तिला भिजायला खुप आवडायचं.पण आताचा पाऊस जीवन देणारा नसून जीवन हिरावून घेणारा होता.या पावसाने आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार कोसळणार होते.उभ्या पिकांना झोपवून टाकल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची स्वप्नं भंग पावणार होती.अर्थातच एरवी रोमँटिक वाटणाऱ्या या पावसाला आता मात्र ती मनातल्या मनात  शिव्याच देत होती.

दहा वाजले.आता बेडरुममध्ये जाऊन पडावं असं वाटून ती उठायला लागली तोच प्रिया बाहेर आली

“आई बाबा अजून आलेच नाही का गं?”तिने रडक्या आवाजात विचारलं

“नाही बेटा.पण येतील.तू जाऊन झोप”

” मला झोप येत नाहिये.बाबांचा फोन आला होता?”

“नाही. पण मला वाटतंय ते लवकरच येतील” आपल्या स्वतःच्या बोलण्यावर तिला विश्वास नव्हता पण तीच्या समाधानाकरता ती बोलली.

प्रिया एकदम जोरजोरात रडायला लागली

“आई मला बाबांची खुप आठवण येतेय गं!”

अंजलीने तिला जवळ घेतलं

“अगं वेडाबाई इतकं रडायला काय झालं?अगं येतील बाबा”

“आई त्या आर्यांच्या बाबांसारखे माझे बाबा देवाघरी तर नाही ना गेले?”

अंजलीला एकदम धक्का बसला.लेकीच्या मनातली खळबळ तिच्या लक्षात येऊन तीही अस्वस्थ झाली

“चल काही काय बोलतेस.असं काही होणार नाही. आणि असं वाईट बोलायचं नसतं बेटा.चल तू झोप बरं”

“नाही. मला झोप येत नाहिये. मला माझे बाबा पाहिजेत” ती अजुनच जोरात रडायला लागली

“हो पण तू रडल्यामुळे तुझे बाबा परत येतील का?चल आपण दोघीही झोपू”

तिला तसंच उचलून अंजली बेडरुममध्ये आली.तिला झोपवून थोपटू लागली.प्रिया अजून रडतच होती.थोड्या वेळाने तिचा आवाज कमीकमी होत गेला आणि शेवटी ती झोपली.ती झोपल्याचं पाहून अंजलीने स्वतः झोपायचा प्रयत्न केला.पण नाना शंका कुशंकांनी भरलेलं मन तिला झोपू देत नव्हतं.ती उठून हाँलकडे आली.वाटेत देवघर दिसलं आणि ती थबकली. देवासमोर उभं राहून तिने हात जोडले.

” देवा काही चुकलं असेल तर माफ कर पण माझ्या नवऱ्याला सुरक्षित घरी येऊ देरे बाबा” तिने प्रार्थना केली.संकटाच्या वेळी तिची आई गणपती पाण्यात ठेवायची याची तिला आठवण आली.”आपणही ठेवावा का तसा?” तिला प्रश्न पडला.”नको.अजून तितकी वाईट वेळ आली नाहिये”तिने स्वतःच त्याचं उत्तर दिलं आणि ती हाँलमध्ये येऊन सोफ्यावर बसून राहिली. हाँलमधला लाईटही लावायची तिला इच्छा झाली नाही.बसल्याबसल्या रितेशचा हसरा तिच्या नजरेसमोर उभा राहिला.त्याच्यासोबत घालवलेल्या गेल्या सहासात वर्षातले अनेक बरेवाईट प्रसंग तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले. रितेश तसा चांगलाच होता.हसमुख होता,समजदार होता.पण आईवडिलांबाबतीत नको तेव्हढा संवेदनशील होता.त्यांच्यातले दोष दाखवलेले  त्याला आवडायचे नाहीत.याचं कारणही तसंच होतं.रितेशला त्याच्या आईवडिलांनी अतिशय विपरीत परिस्थितीत वाढवलं होतं.त्याची जाण रितेशला होती म्हणून तो नेहमी आईवडिलांची बाजू घ्यायचा.मग ते चुकीचे असले तरीही. त्यामुळे अंजलीला  सासूसासरे असेपर्यंत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला होता.सासूसासरे वारल्यानंतर मात्र सगळं सुरळीत झालं होतं.

क्रमश: भाग १

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रजासत्ताक दिन ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

प्रजासत्ताक दिन ☆ श्री सुनील काळे 

आज सकाळी लाऊडस्पीकरवर देशभक्तीची गाणी ऐकू येत होती . शाळेंच्या बक्षीस वितरणांचा कार्यक्रम , विविध गुणदर्शनांचा कार्यक्रम , झेंडा वंदनाचा कार्यक्रम व नेत्यांची भाषणे ऐकू येत होती . त्यामुळे आज प्रजासत्ताक दिनाची जोरदार सुरुवात दरवर्षीप्रमाणे सुरु आहे हे कळत होते .

नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला निघालो होतो . सकाळची थंडी इतकी प्रचंड होती की दोनतीन कपडे, जॅकेट , कानटोपी , पायात वॉकींग शूज , अशा कडक बंदोबस्तात मी निसर्गात फिरत होतो . येताना गरमागरम जिलेबी आणायची म्हणजे 26 जानेवारी साजरी केल्यासारखे वाटते हा गोंडस विचारही मनात घोळत होता .

परत येताना नदीच्या किनारी जाऊन नंतर पुढे निवांत जावू असा विचार करून मी थोडी नेहमीची वाट बदलली . नदी किनारी आलो तर दोन निळ्या रंगाचे प्लास्टीक टाकून लाकडांचा आधार देऊन दोन तात्पुरत्या झोपड्या दिसल्या . पाच सहा उघडीनागडी चार पाच वर्षाची मुले एका चादरीवर लोळत पडलेली होती तर त्यातला एक सहा सात वर्षाचा मुलगा चाकूला धार करत होता .

मग त्याला हिंदीतून विचारले क्या करता है ? तर म्हणाला अभी रानडुक्कर मारनेको जाना है। इस लिए चाकू को धार करता हु. 

इतक्यात दाढीवाला , मोठे केस सोडलेला बरेच दिवस अंघोळ न केलेला त्याचा बाप आला व निवांत बसला . क्या काम करते हो ? तर म्हणाला रानडुक्करे मारायची व खेडेगावात विकायची आमचा धंदा आहे . मग थोड्या गप्पा मारल्या त्यातून समजले अशा थंडगार हवामानात , झोंबणाऱ्या थंडीत नदीकिनारी एक दोन दिवस मुक्काम करायचा . रानडुक्कर मारायचे . दिवसभर त्यासाठी जवळपास रानोमाळ भटकंती करायची . रानडुक्कर मिळाले तर विकायचे  नाहीतर निवांत पडी मारायची .

उघड्यावरच अंघोळी, उघड्यावर दगडाच्या चुलीवर स्वयंपाक, जंगलातील ओली सुकी झाडे शोधून बांधलेल्या उघड्या झोपड्या. त्याला कसलेही संरक्षण नाही. आयुष्याला कसलेही भविष्य नाही, पोरानां शाळा दफ्तरे नाहीत. कसली स्वप्ने, कसले अच्छे दिन, प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? स्वातंत्र्य दिन म्हणजे काय? हे माहीत नाही.

त्याला सहज विचारले तुझे नाव काय ? तर म्हणाला रामजी . त्यांच्या मुलांची नावे तर खूप भारीभारीच होती . आता देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली . आपल्या देशाने तर खुप प्रगती केली .पाचशे वर्षानंतर रामाला घर मिळाले . अयोध्येत राममंदीर 

बांधण्यासाठी किती हजार कोटी गेले व अजून जाणार आहेत याची गणतीच नाही . आजच कळाले तीन कोटी रुपये तर एका दिवसात भक्तांकडून दानपेटीत जमा झाले .

हातातली जिलेबीची बॅग रामजीच्या मुलानां दिली .त्यानां प्रजासत्ताक दिनाचे महत्व समजावत बसलो नाही . कारण जिलेबी खाताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद मला प्रजासत्ताक दिन साजरा केल्यासारखा वाटला .

या रामजीसारख्यांचा वनवास कधी संपणार ? त्यांच्या मुलानां शाळा दफ्तरे कधी मिळणार ? त्यांनां राहायला घरेदारे , पोटासाठी कामधंदा कधी मिळणार ? त्यांच्या बायकांनां  ओल्या लाकडांची चुल जावून गॅसवर स्वयंपाक बनवायला कधी मिळणार ? त्यानां अच्छेदिन कधी येणार ?

पच्च्यांहत्तर वर्षात आपण किती प्रगती केली या विचारात ,देशभक्तीची गाणी मोठ्याने ऐकत मी परत निघालो . प्रजासत्ताक दिनाचा अर्धा दिवस आता संपला . . .

प्रत्येकाचा प्रजासत्ताक दिन सारखा नसतो .

प्रत्येकाचा प्रजासत्ताक दिन सारखा नसतो .

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ✹ Teachers… ✹ ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ✹ Teachers… ✹ ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाने प्रसिद्धीस आलेले प्रख्यात नाट्यकलावंत डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचा एक किस्सा शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज तुमच्यासोबत शेअर करतोय. ते व त्यांची पत्नी विजया जर्मनीला नाटकाच्या दौऱ्यानिमित्त गेले होते. दौरा आटोपून पुढच्या शहरात जाण्यासाठी ते फ्रँकफुर्ट विमानतळावर आले. तेथून त्यांना पुढच्या प्रवासाला जायचे होते. नेमका गडबडीत त्यांचा पासपोर्ट बॅगमध्ये सापडत नव्हता. खूप शोधाशोध सुरु होती. दोन-तीन वेळेस अनाउन्समेंट झाली. शेवटी विमानतळाचे काही अधिकारी त्यांना तुम्हाला जाता येणार नाही, असे म्हणू लागले.

त्यांच्यातील एका अधिकाऱ्याने त्यांना एक फॉर्म भरायला दिला. जर तुम्ही खोटा प्रवास केला असे सिद्ध झाले तर तुमच्याकडून दंड वसूल केला जाईल, अशा आशयाचा तो फॉर्म होता. त्या फॉर्मवर तुमच्या व्यवसायाचे स्वरूप लिहायचे होते. त्या जागी त्यांनी ‘Teacher’ असा उल्लेख केला.

तो पाहताच क्षणार्धात तेथील वातावरण बदलले. तो अधिकारी कमरेत वाकून म्हणाला, “We Germans, Believe in two things. One is God..Another is Teacher! ते दोघेही खोटं बोलत नसतात.. मी परमेश्वराला दुखावले आहे. तुम्ही तुमच्या वतीने माझ्यासाठी प्रार्थना करा. म्हणजे मी पापमुक्त होईन…” अशी अॅपॉलॉजी व्यक्त करीत त्या अधिकाऱ्यांने देशपांडे दाम्पत्याला थेट विमानात नेऊन बसविले.

प्रवासाच्या शेवटी देशपांडे दाम्पत्य मुंबईत आले. विमानतळावरील ग्रीन बेल्टमधून बाहेर पडण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. तेव्हा एका अधिकाऱ्याने त्यांना टोकले. तर दुसऱ्या अधिकाऱ्याने ते काय करतात, त्यांना विचार, असे फर्मान हाताखालच्या अधिकाऱ्यावर बजावले. यांच्या मनात टीचरची प्रतिमा उजळ झाली होती. त्यांनी ताठ मानेने आम्ही टीचर आहोत, असे सांगितले. त्याच्या दुसऱ्याच क्षणाला तो वरिष्ठ अधिकारी ओरडून म्हणाला, ‘अरे वो फटिचर के पास क्या होगा? जाने दो उसे…’ वऱ्हाडकरांचे टीचर नावाचे विमान झटक्यात जमिनीवर आले.

कालांतराने ते औरंगाबादला गेले. काही दिवसांनी त्यांच्या घरी फ्रैंकफर्ट एअरपोर्टवरून एक टपाल आले. ज्यात आपण टीचर असतानाही आम्ही आपल्याला त्रास दिला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारे पत्र होते. देशपांडे यांना ते पाहून हसावे की रडावे ते कळेना.

संग्रहिका –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘स्वर्गाच्या दारावर पोचल्यावर…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘स्वर्गाच्या दारावर पोचल्यावर…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

झाडावरून गळून पडलेलं, कोमेजलेलं, सुगंध मालवलेलं निस्तेज फूल वाऱ्याबरोबर हेलखावे खात हळुवार मातीवर पहुडलं…..

मातीने त्याच्या नाजूक पाकळयांना जोजवत विचारलं, “काही त्रास नाही ना झाला ?”

सुकून गेलेल्या फुलाने देठापासून देह हलवण्याचा असफल प्रयत्न केला आणि पाकळयांनीच नाही म्हणून खुणावलं. 

काही क्षण असेच गेले…

आपल्या कुशीत घेण्यास आतुर झालेल्या मातीने पुन्हा कातर आवाजात विचारलं, “झाडावरून गळून पडल्याचं खूप दुःख होतंय का ? फार वाईट असतं का हे सर्व ?”

म्लान पाकळ्यावर मंद स्मित झळकलं. 

फुल म्हणालं, “निमिषार्धासाठी वाईट वाटलं..कारण झाडाशी, पानांशी, गुच्छातल्या सोबती फुलांशी, उमलत्या कळ्यांशी, ओबड धोबड फांद्यांशी आता ताटातूट होणार म्हणून वाईट वाटलं. 

पण पुढच्याच क्षणाला आनंदही वाटला. जितका काळ झाडावर होतो तेंव्हा वारा येऊन कानात गुंजन करायचा, पाकळयांशी झटायचा, झोंबायचा… कधी त्याचा राग यायचा तर कधी त्याच्यासोबत अल्लड होऊन उडत जावं असं वाटायचं….. पण तेंव्हा मी झाडाचा एक भाग होतो त्यामुळे माझा एकट्याचा निर्णय घेण्यास मी स्वतंत्र नव्हतो… “

“तू आता स्वतंत्र झालास खरा, पण आता तू क्षणाक्षणाला कोमेजत चाललायस …. आता काय करणार ?” – मातीचा प्रश्न.

दीर्घ उसासा टाकत फूल म्हणालं, “आता वारा जिकडे नेईल तिकडे मी जाईन… वाऱ्यावर स्वार होऊन जीवात जीव असे तोवर जमेल तितके जग पाहून घेईन… मग एकेक पाकळ्या झडतील, देठापासून तुटून पडेन… पण जिथं अखेरचे श्वास घेईन तिथल्या मातीशी एकरूप होईन. त्या मातीचं एक अंग होऊन जाईन आणि तिच्या कुशीत येऊन पडणाऱ्या नव्या बीजासाठी खत होऊन जाईन, त्या बीजातून अंकुरलेल्या रोपा वर कोवळ्या फुलांचा एक टवटवीत गुच्छ असेल, माझं कर्म चांगलं असेल तर मीही त्या गुच्छात असेन !”

फुलाचं उत्तर ऐकून सदगदीत झालेल्या मातीने त्याच्या सुरकुतल्या पाकळयांचे हलकेच चुंबन घेतले. 

काही वेळ निशब्द शांतता राहिली आणि पुढच्याच क्षणी मंद वाऱ्याची एक झुळूक आली आणि फुलाला त्याच्या अंतिम सफरीवर घेऊन गेली… 

आपलं आयुष्यही असंच आहे….  आपलं जीवन ही तसेच – एक फूल आहे…. 

संसार कुटुंब आप्तेष्ट मित्र ही सगळी त्या झाडाची भिन्न अंगे. आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या की कुणी स्वखुशीने त्यातून बाहेर पडतो तर कुणा कमनशिबींना परागंदा व्हावं लागतं. 

मग सुरु होतो एका जीवाचा एकाकी सफर, जो आपल्याला आयुष्यातलं अंतिम सत्य दाखवून देतो. 

… आयुष्यातली सत्कर्माची शिदोरी मजबूत असली की हा प्रवास सुसह्य असतो, इथं आपल्याला मदत करायला कुणी येत नसतं….  नियतीच्या वाऱ्यावर आपल्याला उडावं लागतं. आपणही असेच पंचतत्वात विलीन होतो आणि प्रारब्धात असलं तर जीवनाच्या पुष्पगुच्छात पुन्हा अवतीर्ण होतो !

…. स्वर्गाच्या दारात उभे असताना काही आठवणी उफाळून आल्या… 

….जीवन सुंदर तर आहेच पण ते अर्थपूर्णही व्हावे !

लेखक : अज्ञात

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ लावा एक पणती ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? लावा एक पणती श्री प्रमोद वामन वर्तक ☆

राख झाली क्षणात लाखोंची

नाही फिकीर पर्यावरणाची,

वृद्ध, आजारी असतील कोणी

का काळजी करू कोणाची ?

*

हौसेला मोल नसलं तरी

थोडं तरी समाजभान ठेवा,

ज्या घरी नाही लागत पणती

त्यांची तरी आठवण ठेवा !

*

साध्या कंदील, रोषणाईने 

दिवाळी होते बघा साजरी,

मदत करून गोर गरिबांना

हास्य आणा त्यां मुखांवरी !

*

गडबडीत या दीपोत्‍सवाच्‍या

लावा एक पणती त्‍यांच्‍यासाठी,

नका विसरू शूर सैनिकांना

जे रक्षितात सीमा देशासाठी !

जे रक्षितात सीमा देशासाठी !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares