☆ जय जय महाराष्ट्र माझा!… ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
महाराष्ट्र दिनाच्या आपण सर्वांना अनेकानेक शुभेच्छा!
एक मे, महाराष्ट्र दिन! माझ्या लाडक्या महाराष्ट्राचे पोवाडे मुक्तपणे गायचा दिवस! ज्या पवित्र भूमीत मी जन्म घेतला, त्या भूमीचे स्तवन, कीर्तन, पूजन, अर्चन इत्यादी कसे करावे? त्यापेक्षा या मंगलमय दिनी शब्दपुष्पांची सुंदर माळच तिच्या कंठात घालते!
महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत जन्म घेतला ही माझी पूर्वजन्मीची पुण्याईच! या महान महाराष्ट्र देशाची महती अन श्रीमंती मी एका मुखाने काय आणि कशी वर्णावी? त्यासाठी प्रतिभावंत शब्दप्रभू गोविंदाग्रज यांनी रचलेले मनमोहक महाराष्ट्राचे महिमा-गीत “मंगल देशा” ऐकायला हवे. महाराष्ट्र म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज, मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच महाराष्ट्र, हा कोता विचार मनात आणणे, म्हणजे प्रत्यक्ष महाराजांचा अपमान करणे होय. त्यांच्या संघटन शक्तीचे उदाहरण जरी घेतले तरी त्यांची दूरदृष्टी आपल्याला स्तिमित केल्याशिवाय राहत नाही. त्यांचे शौर्य, रणकौशल्य, पराक्रम, बुद्धिमत्ता, इत्यादी इत्यादी विषयी मी पामराने काय लिहावे, केवळ नतमस्तक व्हावे अन “शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप”! आपल्या मूठभर फौजेला हाताशी धरून “गनिमी कावा” अंमलात आणीत या “दक्खन के चूहे” ने औरंगजेबाच्या नाकी नऊ आणले. त्याचे वर्चस्व झुगारून “स्वराज्याचे तोरण” बांधणारे आपले खरे हृदयसम्राट गो-ब्राम्हण प्रतिपालक असे शिवाजी महाराज!
आमची लाडकी दैवते म्हणजे, विठू माऊली, साडेतीन शक्तीपीठे, अष्टविनायक, शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा इत्यादी इत्यादी! माझा महाराष्ट्र देश हा संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेला देश आहे. “पाऊले चालती पंढरीची वाट” या हाकेनिशी संतांच्या मागे हजारोंनी दिंडीत सामील होत “राम कृष्ण हरी” चा टाळ मृदुंगासहित गजर करणारे वारकरी आजही त्याच भक्तीने वारी करीत हा अनमोल भक्तीचा नजराणा विठ्ठलाच्या चरणी अर्पण करीत आहेत. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय आणि समाज प्रबोधनाची श्रीमंती काय वर्णावी? फक्त नाव जरी उच्चारले तरी आपोआपच “तेथे कर माझे जुळती”! आपण ज्या स्वातंत्र्याचा मनमुराद उपभोग घेतोय, ते मिळवून देण्यात येथील अनेक क्रांतिकारकांनी आपले सर्वस्व अर्पण केले. किती म्हणून नावे घ्यावीत! आज त्यांच्या स्मृती-चरणी नतमस्तक होऊ या!
अभिजात भाषा आणखी किती समृद्ध असू शकते? सरकारदरबारी “मराठी” या माझ्या मायबोलीला हा दर्जा केव्हा मिळेल? या महाराष्ट्रात निर्माण झालेले साहित्य म्हणजे साक्षात अमृत ठेवाच! तिची थोरवी गातांना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, “माझ्या मराठीचे बोल कवतुके। परी अमृतातेंही पैजा जिंके। ऐसी अक्षरेरसिकें। मेळवीन॥“ ज्या महाराष्ट्रात गर्भश्रीमंत सुविचारांची अन अभिजात संस्कारांची स्वर्णकमळे प्रफुल्लित आहेत, जिथे भक्तिरसाने ओतप्रोत अभंग अन शृंगाररसाने मुसमुसलेली लावण्यखणी लावणी ही बहुमोल रत्ने एकाच इतिहासाच्या पेटिकेत सुखाने नांदतात, तिथेच रसिकतेच्या संपन्नतेचे नित्य नूतन अध्याय लिहिले जातात.
हे अभिजात साहित्य रचणारे हरी नारायण आपटे, आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी, कुसुमाग्रज, पु.ल.देशपांडे, किती म्हणून नावे घ्यावीत! या साहित्याचे सोने जितके लुटावे तितके वृद्धिंगत होणारे! महाराष्ट्राची संगीत परंपरा अतिशय जुनी अन समृध्द आहे. संगीत नाटकांची परंपरा म्हणजे आपल्या महाराष्ट्राची खासियत आणि मक्तेदारीच समजा ना! स्त्रीसौंदर्याचे नवथर निकष निर्माण करणारे बालगंधर्व, त्यांचे आम्हा रसिकांना कोण अप्रूप. ज्यांच्या स्त्रीसुलभ विभ्रमांचे इथल्या स्त्रियांनीच अनुकरण करावे असा रसिकांना वेड लावणारा हा एकमेवाद्वितीय कलाकार!
मुंबापुरी अन कोल्हापूर म्हणजे सिनेसृष्टीची खाणच! रजतपटाचा “प्रथम पटल” निर्माण करणारे दादासाहेब फाळकेच! इतर प्रांतातून मुंबईच्या मायानगरीत स्थायिक झालेले अन कर्माने मराठीची बिरुदे अभिमानाने मिरवणारे संगीतकार, गायक, गीतकार अन कलाकारांची तर यादी संपता संपत नाही. अश्या या महाराष्ट्राला १ मे १९६० रोजी स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. या स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री होते, यशवंतराव चव्हाण!
आता आपण महाराष्ट्र दिनाचा इतिहास जाणून घेऊ या. त्याला काळी चौकट आहे हुतात्म्यांच्या रक्तलांछित बलिदानाची! २१ नोव्हेंबर १९५६ या दिवशी मुंबईच्या फ्लोरा फाउंटनच्या आसपास तणाव जाणवत होता. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता. या अन्यायकारक निर्णयामुळे मराठी माणसाचा संताप शिगेला पोचला होता. सर्वदूर होणाऱ्या सभांमधून या निर्णयाचा जाहीर निषेध होत होता. याचा परिणाम म्हणजे मराठी अस्मिता जागी झाली. सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांचा एक विशाल मोर्चा फ्लोरा फाऊंटन समोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर मोठा जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून अत्यंत त्वेषाने घोषणा देत, फ्लोराफाउंटनच्या ठिकाणी गोळा झाला. तो पांगवण्याकरता पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र मोर्चेकरी बधले नाहीत. मग मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला झुकावे लागले आणि शेवटी १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. या १०६ हुतात्म्यांनी जिथे बलिदान केले त्या फ्लोरा फाउंटनच्या चौकात १९६५ मध्ये हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. आता तो ‘हुतात्मा चौक’ म्हणून ओळखला जातो.
१ मे हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणूनही ओळखला जातो. ४ मे १८८६ मध्ये अमेरिकेतील कामगारांनी आठ तास काम करण्यास नकार दिला आणि आपल्या न्यायहक्कासाठी संप केला, शिकागोत अनेक कामगार ठार झाले. त्यानंतर १८८९ मध्ये या कामगारांच्या स्मरणार्थ १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्याची घोषणा समाजवादी संमेलनात करण्यात आली. म्हणूनच दरवर्षी जगभरात १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.
मी जन्मले आणि वाढले या पुण्य-पावन मातीत, जिथे सुवर्णालंकार अन रत्ने तितकी नव्हती, मात्र होते सुवर्णकांचनासम झळाळणारे अस्सल संस्काराचे तेज! पुस्तके वाचता-वाचता, नाटके बघता-बघता अन वय वाढता- वाढता ओळख पटली इथल्या साहित्यिक वैभवाची! मन मोहोरून विचारायचे; आचार्य अत्रे लिखित ‘कऱ्हेचे पाणी’ चाखू, की, गडकऱ्यांच्या सुधाकर अन सिंधूच्या संसाराची राखरांगोळी करणाऱ्या ‘एकच प्याल्याचे’ रंग रंगमंचावर बघू, की पु ल देशपांडेंच्या त्या अवखळ फुलराणीचे “तुला शिकवीन चांगलाच धडा!” हे प्रसिद्ध स्वगत आत्मसात करू, की ‘मृत्युंजयाच्या’ उत्तुंग विविधरंगी व्यक्तिमत्वाने स्तिमित होऊ! “घेता किती घेशील दो कराने” अशी तेव्हा माझी अवस्था व्हायची! नागपूरच्या नामवंत वैद्यकीय महाविद्यालयात मेडिकलचे शिक्षण घेतले अन चाकरी केली तिथेच, भरून पावले अन आयुष्य सार्थकी लागले. इथल्या मातीचे ऋण चुकवण्याचा विचार पण मनात येत नाही, कसा येणार? इतके विशाल आहे ते! ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना करते की, वारंवार याच पवित्र मातीत जन्मावे अन तिच्याच कुशीत शेवटी विश्रांती घ्यावी, यापरीस सौभाग्य ते कोणते!
कुणीतरी म्हटले आहे की ठेच लागल्यावर “आई ग!” म्हणून कळवळतो तो खरा मराठी माणूस, पण आता इंग्रजाळलेले ओरिजिनल मराठी बॉय आणि गर्ल म्हणतात “ओह मम्मा!” ते बी मराठीच हायेत की! परप्रांतातून आलेले, येथील मातीशी नाते जोडून आता महाराष्ट्रीयन झालेल्यांचे काय? (याचे उत्तर जाणून घ्यायला अवधूत गुप्ते यांचे गाणे अवश्य ऐका अन पहा, ते देखील मनोभावे गाताहेत “जय जय महाराष्ट्र मेरा!”) शेवटी मने जुळली की मातीशी नाते जुळणारच की भावा! बंबैय्या मराठीची सवय झाली की, सारे सारे कसे सोपे होते!
मंडळी, हा दिवस केवळ सार्वजनिक सुट्टी म्हणून उपभोगण्याचा नसून मराठी माणसाची अस्मिता जागवण्याचा आणि ती जपण्याचा आहे. मोठ्या उत्साहाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करतांना धोतर, फेटे, नऊवार साडी, नथ इत्यादी पारंपरिक वेषभूषांपुरतेच आणि मराठी पाट्यांपुरतेच मराठीपण जपायचे की त्यापलीकडील आपला जाज्वल्य इतिहास देखील आठवायचा हे आपले आपणच ठरवणे योग्य!!!
बाथरुममध्ये फ्रेश झाल्यावर तो पटकन अण्णांच्या रुममध्ये गेला.नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावर झोपले होते.जवळ जाऊन शिरीषने त्यांच्याकडे पाहिलं.खरंच अस्वस्थ वाटत होते.त्यांचे खोल गेलेले डोळे,निस्तेज नजर,चेहऱ्यावरची उद्विग्नता पाहून त्याला गलबलून आलं.लक्षण काही ठिक दिसत नव्हतं.
” काय झालं अण्णा?काय होतंय?”स्वतःलाच धीर देत त्यानं विचारलं.अण्णांनी काही न बोलता उजवा हात आकाशाकडे नेला.त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले पण ते शिरीषला समजले नाहीत. त्यांच्या तोंडाजवळ कान नेत तो म्हणाला, “काय म्हणालात कळलं नाही. परत एकदा सांगा.
“”म….ला…..दे……वा……क…..डे……जा….य…चं….य” परत हात वर करुन ते म्हणाले. शिरीषच्या डोळ्यात पाणी आलं.तरी स्वतःला सावरत तो म्हणाला,
“मी कोण तुम्हांला देवाकडे नेणारा? त्याला न्यायचं तेव्हा नेईल आणि अजून तुम्हांला नातवंडांची लग्न बघायची आहेत.इतक्या लवकर कुठे निघालात देवाकडे?”
अण्णांनी जोरजोरात नकारार्थी मान हलवली.परत एकदा हात वर दाखवून ते अस्पष्ट बडबडले,
“बरं बरं तुम्ही पडा.काही दुखतंय का तुमचं?”
त्यांनी नकारार्थी मान हलवली.मग हाताने त्याला जवळ बोलावलं.तो जवळ येताच त्यांनी त्याच्या डोक्यावरुन,पाठीवरुन प्रेमाने हात फिरवला.का कुणास ठाऊक त्यांचा जाण्याचा क्षण जवळ आलाय असं शिरीषला जाणवून गेलं.त्या विचाराने त्याला गहिवरुन आलं.पण असं रडून चालणार नव्हतं.स्वतःचे डोळे पुसत त्याने त्यांना विचारलं,
“डाँक्टरांना बोलावू?”
त्यांनी नकारार्थी मान हलवल्यावर तो म्हणाला.
“बरं बरं.मी रोहनचं जेवण झालं की त्याला पाठवतो तुमच्याजवळ बसायला”
अण्णांनी होकारार्थी मान हलवली.शिरीष बाहेर आला.
“काय झालं?काय होतंय त्यांना?”नेहाने विचारलं.
” काही होत नाहिये. त्यांना आता जायचे वेध लागलेत.त्यांचंही बरोबर आहे.किती दिवस अशा स्थितीत रहाणार आहेत.कधी ना कधी माणसाचा धीर खचणारच” शिरीष गहिवरुन म्हणाला.
शिरीष योग्यच म्हणतोय हे नेहाच्या लक्षात आलं.गेली सात वर्ष अण्णा पँरँलिसीस होऊन पडले होते.त्यांचं सगळं काही बेडवरच करावं लागायचं.नाही म्हणायला कधीतरी उठून ते चालायचा प्रयत्न करायचे.पण ते तेवढंच.खरं तर शिरीषची आई वारली तेव्हाच ते खचले होते.पण तीन मुलांच्या सहाय्याने आपलं जीवन निर्धोकपणे चालू राहील असं त्यांना वाटलं.सुरवातीचं एक वर्ष बरं गेलं.एकत्र कुटुंबात शिरीषचे दोन्ही मोठे भाऊ निर्मल आणि गुणवंत तसंच त्यांच्या दोघांच्या बायका नोकरीला जात.नेहा एकटी घरी असायची.अण्णांची मेडिकल एजन्सी शिरीषने स्वबळावर भरभराटीला आणली होती.नवऱ्याचं चांगलं उत्पन्न असल्यामुळे नेहाला उच्चशिक्षित असूनही नोकरी करायची गरज नव्हती.पण ती घरी असते म्हणून तिने मोलकरणीसारखी घरातली सर्व कामं केली पाहिजेत,घरी आलो की चहापाणी, स्वयंपाक करुन वाढणं,नंतर सगळं आवरणं केलं पाहिजे असा शिरीषच्या दोन्ही वहिन्यांचा समज झाला होता.घरात कामावरुन कटकटी वाढल्या आणि बायकांची भांडणं होऊ लागली तसं निर्मल आणि गुणवंत यांनी शिरिषला वेगळं निघायला सांगितलं. नेहाही जावांच्या अरेरावीला आणि या रोजच्या कटकटींना कंटाळली होती.शिरीषची इच्छा नसतांना त्याला वेगळं व्हावं लागलं.अण्णा मात्र आपल्या दोन्ही मोठ्या मुलांसोबतच राहिले.शेवटी ते त्यांनी बांधलेलं घर होतं.त्याचे ते मालक होते.पण नंतरच्या सहाच महिन्यात दोन्ही मुलं आणि सुनांनी या मालकाचं जीवन आश्रितासारखं करुन टाकलं.नेहा आणि शिरीष असतांना त्यांची खुप काळजी घेतली जायची.वेळच्या वेळी जेवण,औषधं असायची.त्यामुळे अण्णा ठणठणीत होते.नेहा आणि शिरीष वेगळं निघाल्यापासून त्यांची फार आबाळ होऊ लागली.जेवणाचं तर सोडाच संपलेली औषधंसुध्दा कुणी त्यांना लवकर आणून द्यायचं नाही.त्याचा परीणाम व्हायचा तोच झाला. त्यांना पँरँलिसीसचा अटँक आला.आता तर निर्मल,गुणवंतची चांगलीच पंचाईत झाली.अण्णांकडे लक्ष देण्यासाठी कुणाला तरी नोकरी सोडण्याची गरज होती पण कुणीही तडजोड करायला तयार होईना.सुट्या तरी घेऊन किती घेणार?माणूस ठेवला तर त्याचे पैसे कोण देणार?शिवाय त्यानं घरात चोऱ्यामाऱ्या केल्या तर?घरात परत एकदा भांडणं होऊ लागली.अण्णा त्यांच्याच घरात सर्वांना नकोसे झाले.शेवटी दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांनी संगनमत केलं आणि अण्णांना एक दिवस शिरीषकडे आणून टाकलं.शिरीषची संमती घ्यायचीही त्यांना गरज वाटली नाही. अर्थात शिरीष आणि नेहाला अगोदरच निर्मल आणि गुणवंत यांनी अण्णांच्या चालवलेल्या हेळसांडीबद्दल वाईट वाटत होतं.दोघांनीही आनंदाने अण्णांची जबाबदारी स्विकारली. एजन्सीत जाण्याअगोदर शिरीष त्यांची अंघोळ वगैरे सगळं आटोपून जायचा. नेहा त्यांना जेवू घालणं,त्यांना औषधं देणं,त्याच्या हातापायाला मालीश करणं वगैरे आनंदाने करायची. शिरीषचं आपल्या वडिलांवर अतिशय प्रेम होतं.त्यांच्यामुळेच आपल्याला चांगले दिवस आलेत यावर त्याची श्रद्धा होती.त्यामुळे तो अण्णांची काळजीने सेवा करायचा.अतिशय कामात असतांना देखील दिवसातून एकदा तरी तो अण्णांची चौकशी करायचा.त्यांच्याशी जमेल तसं बोलायचा.रात्री जेवण झालं की अण्णांना उचलून तो गाडीत बसवायचा आणि पुर्ण शहरातून फिरवून आणायचा.तो आणि नेहा करत असलेल्या सेवेमुळे अण्णांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती.पण दुर्दैवाने एक दिवस अण्णांचा जीवलग मित्र वारल्याची बातमी अण्णांनी पेपरमध्ये वाचली.मित्राच्या निधनाचा जबरदस्त धक्का अण्णांना बसला.त्या दिवसापासून त्यांची जगण्याची इच्छा कमीकमी होत गेली.त्याबरोबरच त्यांची तब्येतही खालावू लागली.आता तर ते पलंगावरच दिवस काढत होते.
झोपण्याची वेळ आली तसा शिरीष आपला मुलगा रोहनला म्हणाला,
” आज तू राहू दे, मी झोपतो अण्णांसोबत. रात्री काही झालं तर अण्णा तुला सांगणार नाहीत” मग अण्णांच्या खोलीत जाऊन तो त्यांना म्हणाला,
” अण्णा आज मी झोपतोय तुमच्यासोबत. रात्री काही वाटलं तर उठवा बरं का मला.’ अण्णांनी मान डोलावली.
रात्री दोन तीन वेळा उठून शिरीषने अण्णांकडे बघितलं.पण ते शांत झोपले होते.त्यांचा श्वासही नियमित सुरु होता.
सकाळी तो उठला तेव्हा अण्णा जागे होते.आज रविवार असल्याने मुलं आणि नेहा अद्याप झोपलेली होती.शिरीषने अण्णांकडे बघितलं.ते फ्रेश वाटत होते.त्याला हायसं वाटलं.
” कसं वाटतंय?”त्याने विचारलं.त्यांनी हाताने ठिक असल्याचं सांगितलं. मग पाणी हवं असल्याचा इशारा केला.शिरीषने पाणी आणून त्यांना पाजलं.
“अण्णा मी येतो अंघोळ करुन.मग तुमचा चहा झाला की तुम्हाला अंघोळ घालेन.” अण्णांनी मान डोलावली. शिरीष रुमच्या बाहेर आला तर नेहा उठलेली दिसली.शिरीषने अण्णांना बरं वाटतंय असं सांगितल्यावर तिलाही हायसं वाटलं.
शिरीष अंघोळ करुन बाथरुमच्या बाहेर आला तशी नेहा त्याला म्हणाली, “अहो अण्णा परत झोपले वाटतं. मघाशी मी आवाज दिला तर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही” शिरीषला शंका आली.एकदा उठल्यावर अण्णा कधी परत झोपायचे नाहीत.त्यांच्या रुममध्ये जाऊन त्याने त्यांना हाक मारली. त्यांनी डोळे उघडले नाहीत. शिरीषने त्यांच्या नाकाजवळ हात धरला. काहीही जाणवलं नाही.त्याने घाबरुन नेहाकडे पाहिलं आणि म्हणाला, “डाँक्टरांना पटकन फोन लाव.अण्णा….”पुढे त्याला काही बोलता येईना.
डाँक्टर आले.अण्णा गेल्याचं निदान करुन गेले.शिरीष त्यांच्या पार्थिवाला कवटाळून हमसून हमसून रडू लागला.घरात शेजारपाजाऱ्यांची गर्दी जमली तसा शिरीष भानावर आला.सगळ्यांना कळवणं भाग होतं.त्याने बाहेर येऊन मोठ्या भावाला-निर्मलला फोन लावला.” ‘दादा अण्णा गेले” तो रडत रडत म्हणाला.
“काय?असे कसे गेले?मागच्या आठवड्यात तर चांगले होते. तू त्यांची व्यवस्थित काळजी घेत होतास ना?”
“सकाळपर्यंत चांगले होते.अचानक काय झालं माहीत नाही.बरं तू लवकर ये मग सांगेन तुला सविस्तर.”
” शिरीष भाऊजी,अण्णांना बरं वाटत नव्हतं तर आम्हांला रात्रीच कळवायचं ना! आता आम्ही ट्रीपला जाण्यासाठी गाडी बोलावून ठेवलीये.तिचे पैसे आता कोण देणार?”
शिरीषला संताप आला पण तो शांत राहिला.वाद घालायची ही वेळ नव्हती.त्याने फोन बंद करुन मधला भाऊ-गुणवंतला फोन लावला.अण्णांची बातमी सांगितली.
“ओ माय गाँड! शिरीष मी आता जालन्यात आहे.मला यायला उशीर लागेल.पण तू रात्रीच मला का कळवलं नाहीस?”
“अरे,असं होईल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती.तू लवकर ये मग मी तुला सगळं सांगतो.”
” मी निघतोय आता इथून.अण्णांना स्मशानात न्यायची तयारी झाली की मला कळव.” शिरीषला गुणवंतच्या निर्लज्ज आणि कोडगेपणाची चीड आली.वडिल वारल्याचं कोणतंच दुःख त्याच्या बोलण्यातून जाणवत नव्हतं.पण आता ते बोलून दाखवण्यात अर्थ नव्हता. आपल्या भावांना तो चांगलाच ओळखत होता.
निर्मल लवकर आला खरा पण त्याने कोणत्याही कामाला हात लावला नाही.पाठीमागे हात बांधून तो शिरीषची होणारी धावपळ बघत राहिला. अण्णांना न्यायची वेळ झाली तरी गुणवंतचा पत्ता नव्हता.शेवटी शिरीषने त्याला फोन लावला तेव्हा तो म्हणाला, “अरे मी दोन तासापुर्वीच आलो. तुझ्याच फोनची वाट बघत होतो. झाली तयारी?बरं आलोच” जसा वडिलांच्या अंत्यविधीला येऊन तो शिरीषवर उपकारच करणार होता.
सगळेजण त्याची वाट पहात बसले.अर्ध्या तासाने एखाद्या परक्या माणसासारखा तो उगवला.
चार दिवसांपूर्वी झाडांची माती बदलण्यासाठी वेळ काढला. सगळी झाडं झाली, एक वेल राहिला- गोकर्णचा. त्याला फुलं कमी यायला लागलेली, पण वेल काढायचा म्हणजे रिस्कच. त्यात एकाच कुंडीत पाच बिया लावून त्या एकाच दोऱ्याने वर गेलेल्या. एकात एक गुंतलेल्या पाच वेलींना बाहेर काढून परत मातीत रुजवायचं म्हणजे दिव्यच वाटलं. फुलं नाही दिली तरी जिव्हाळा जमला होता त्यांच्यासोबत. काढून परत लावल्याने त्या वेली जगतील की नाही समजत नव्हतं. रिस्क घेतली आणि बदलली माती.
संध्याकाळपर्यंत वेल सुकल्यासारखी झाली. जीव झुरझुरला. सकाळी उठल्या उठल्या वेलीकडे गेले. बघितलं तर वेल पूर्ण सुकला, जीव गेल्यासारखा वाकला होता. खूप वाईट वाटलं.पण पाणी घालत राहिले, आणि आज चार दिवसांनी त्याच्यात हिरवेपण दिसू लागलं.
त्यावरून असं वाटलं की आपण बायका पण त्या झाडासारख्याच असतो .काही वेलीसारख्या नाजूक, तर काही डेरेदार – काही रुक्ष, तर काही अल्लड, सुबक, सुंदर – काही नुसताच दिखावा, तर काही दिसायला बेढब पण उपयुक्त – काही लाजऱ्या -बुजऱ्या, तर काही स्वतःच्या अस्तित्वाने आकर्षित करणाऱ्या – काही बोचऱ्या तर काही मुलायम.
आपणही लहानपणी माहेरी रुजतो, फुलतो, बहरतो. लग्नानंतर आपली पाळेमुळे उखडून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला रुजवलं जातं. आपणही या वेलीसारखं थोडं सुकतो, बिचकतो ,नवीन बदल पचवतो आणि आपली मुळे रोवायला सुरुवात करतो, बहरायला लागतो. तिथं आपल्याला खत,पाणी, वातावरण कसं मिळतं त्यावर प्रत्येकीचं बहरणं वेगवेगळे होतं. काहींना खूप खत, पाणी, काळजी मिळते, त्या खूप बहरतात, फुलतात. काहींना मिळतं पाणी खत, पण त्या दुर्लक्षित असतात. अशावेळी त्या फक्त वाढतात. पण फुलण्याची, बहरण्याची उमेद नसते. त्या स्वतःला हरवून बसतात. काहींना काहीच मिळत नाही. त्या हळूहळू एक एक पान गळून गळून जातात.
असे हे झाडांशी बाईपण जुळतं-
लेखक : सुश्री प्रिया कोल्हापुरे
मो. -9762154497
संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एक हुरहूर वाटते बंद दाराकडे बघून.. निरोप देताना मग मनातल्या मनात आपणच घरात सांगतो, “येतो परत आठ दिवसांत तोवर सांभाळ रे बाबा”.. तेव्हा घरही उदासल्यासारखं भासतं !
मग कधी कधी आठ दिवसांनी परतण्याचा वायदा पाळायला जमत नाही.. आणखी चारेक दिवस जास्तीचे घेऊन आपण जेव्हा परततो आणि आपल्या घराच्या दरवाजा समोर उभे राहतो ना तेव्हाचा सुकून काही वेगळाच असतो..! पण बहुधा वाट पाहून घर जरा रुसलेलं असतं..!
दार उघडल्यानंतर घराचं हिरमुसलेपण जागोजागी जाणवतं.. जाताना बदललेले कपडे कुठल्याशा खुर्चीवर, बेडवर नाहीतर सोफ्यावर तसेच आळशासारखे गपचिप पडून असतात. तेव्हा गडबडीत विसळलेल्या कपबश्या तशाच ओट्यावर उपड्या निपचीत असतात … पोरांची वह्यापुस्तकं अन् खेळण्यांचा पसारा कोपऱ्यातल्या टेबलावर निवांत हातपाय पसरून बसलेला असतो.. कपाटाच्या आरश्यात स्वतः आरशालाही बघू वाटू नये असा एक धुळीचा बारीक थर चढलेला असतो..! रोजचीच फरशी डोळ्यांना अन् पायांना वेगळीच लागते, किचन मधली काही भांडी जाळीत मान टाकून बसलेली असतात.. फ्रीज उघडल्यावर त्यात उरल्या सुरल्या भाज्या, फळे, लोणची, तुपाचे डबे, विरजण दाटीवाटीने डोळे वटारून बघायला लागतात.. आपण गेल्यावर जागावाटपासाठी यांच्यातही युद्ध झालेलं असतं बहुतेक! त्याच हातापायीत कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो अन् दोनचार फळंही शहीद झालेली असतात..!! बेडरूमच्या दरवाजामागे निघताना खराखर विंचरलेल्या केसांची गुंतावळ लपून बसलेली असते… सिंक वॉशबेसिन बाथरूम बिचारे सुकून गेलेले असतात..वाट पाहून घराच्या छताचा जीव त्याला टांगलेल्या फॅन सारखाच टांगणीला लागलेला असतो …भरीस भर म्हणून प्रवासातून आणलेल्या बॅगा व सामान हॉलमध्येच अंग पसरून बसलेलं असतं… आता सांगा बरं, घर कसं रुसणार नाही!
रुसलेल्या रागावलेल्या घराला मग “ती” आवरायला घेते! मलूल झालेल्या तुळस, मोगरी, गुलाबाच्या रोपट्यांना न्हाऊ घातलं जातं, इतके दिवस अंधार पांघरून बसलेल्या खिडक्यांचे पडदे सर्रकन दूर होतात आणि श्वास कोंडलेल्या घराला ताज्या हवेच्या झुळुकीने हायसं वाटते..! दोन तीन तासांत सारं काही जाग्यावर पोहचतं ! ती भरभर तिच्या लाडक्या घराला पुन्हा “देखणं” करते.. गोंजारते.. त्याला त्याचं “घरपण” पुन्हा मिळवून देते.. घराच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते ..त्या ओळखीच्या स्पर्शाने मग मरगळलेलं घरही विरघळतं अन् सुखावून खुदकन हसू लागतं..!
घराला स्पर्श कळतात???.. हो कळतात !! त्याला आपली माणसेही कळतात.. आपली सुखदुःखंही त्याला ठाऊक असतात .. आठवून पहा, काही आनंदाश्रू, काही हुंदके, दुःखाचे कढ कधीकधी फक्त घराच्या भिंतींनाच माहिती असतात.. !!
तर अशा आवरलेल्या घराला मग हातात चहाचा कप घेऊन थोडी दमलेली ती समाधानाने न्याहाळत दोन घटका बसते तेव्हा लाडात आलेल्या लेकरासारखं घर तिच्याकडे पाहत असतं.. तिलाही मनात वाटतं, “कोणाची दृष्ट न लागो”…!
शेवटी “बाई” घराचीही “आई”च असते..!! हो नं!
लेखक : अज्ञात
संग्रहिका : मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ सांगावा… श्री सचिन वसंत पाटील ☆ परिचय – सुश्री सुनिता गद्रे ☆
पुस्तकाचे नाव- सांगावा
लेखक -श्री सचिन वसंत पाटील
पृष्ठ संख्या -135
मूल्य- दोनशे रुपये.
अलीकडेच सांगावा हा खूप चांगला कथासंग्रह वाचनात आला.कर्नाळ या सांगली जवळच्या एका छोट्या गावात राहणारे लेखक सचिन पाटील यांचा!… त्यांना नुकताच भेटण्याचा योग आला. अक्षरशः विकलांग अवस्थेत जगणारा, सगळ्या विपरीत परिस्थितीशी लढणारा हा योध्दा!…त्याच्याबरोबरच्या नुसत्या बोलण्याने सुद्धा आपल्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.’ सांगावा ‘या कथासंग्रहाची मी वाचली ती चौथी आवृत्ती ! दहा वर्षात चौथी आवृत्ती निघणे ही कुठल्याही नवोदित लेखकाला अभिमान वाटावा अशीच गोष्ट आहे.
श्री सचिन वसंत पाटील
संग्रहातील सर्व कथा ग्रामीण जीवनाचा चेहरा मोहरा दाखवितात. यात एकूण बारा कथांचा समावेश आहे .कथा बीजाची दोन रूपे येथे आढळतात. पहिले रूप म्हणजे आजच्या खेड्यातील मूल्य संस्कृतीचा होऊ घातलेला -हास आणि दुसरे म्हणजे बदलत्या परिवर्तन प्रक्रियेत माणूस, माणुसकी,नाती, निती,आणि माती पण टिकली पाहिजे हा लेखकाचा दृष्टिकोन. या दोन कथा बीजांभोवती ‘सांगावा’ कथासंग्रहातील कथांचे वर्तुळ तयार झाले आहे.
संग्रहातील भूल ही पहिली कथा! स्वतःच्या हाताने जीवनाची शोकांतिका करणाऱ्या शेतकऱ्याची अंधश्रद्धा, अडाणी समजूत यातून ती साकारली गेलेली आहे. हणमा शेतकरी ऐकीव गोष्टीला बळी पडून ,आपल्या संसाराला रान भूल लागू नये म्हणून भ्रमिष्टासारखा जेव्हा आपल्या शेतातील वांग्याचे बहारातील पीक उध्वस्त करून टाकतो, तेव्हा वाचकाला खूप हळहळ वाटत राहते.
दुसरी कथा ‘काळीज’! ग्रामीण परिसरात ‘सेझ’चे आगमन आणि कृषी जीवनाची फरपट लेखकाने येथे चित्रित केली आहे. शामू अण्णा ,काळी आईचे जिवापाड सेवा करणारा शेतकरी! पण त्याचाच मुलगा जेव्हा त्यांना न विचारता जमीन विक्रीची परवानगी देतो, तेव्हा तो खचून जातो आणि वेडा बागडा बिन काळजाच्या, निर्जीव बुजगावण्यागत जगत राहतो. कथा वाचकाच्या काळजाला एकदम भिडते.
‘पावना ‘कथेत खेडेगावातल्या जीवन मूल्यांचा -हास चित्रित होतो. कितीही कष्ट, त्रास झाला तरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे, त्याला आधार देणे ,विचारपूस करणे हा ग्रामीण माणसाच्या मनाचा मोठेपणा कालौघात ग्रामीण माणसाकडून हिरावला गेलेलाआपल्याला या कथेत दिसतो.
‘मांडवझळ ‘ही एका लाली नावाच्या पाळीव कुत्रीची कथा! ती कुत्रीच येथे सगळं विषद करतेय. भरल्या घरात, लग्न समारंभा दिवशी त्या बिचारीला किती अग्नी दिव्यातून जावे लागले, किती यातना सोसाव्या लागल्या हे वाचून मन विषण्ण होते.त्या पाळलेल्या बिचारीला खायला द्यायची पण कोणाला सवड आणि आठवण नाहीय. तिचे झालेले हाल आणि अगतिकता बघून मुक्या प्राण्यांना भूक असते, भावना असतात त्यांचे मन समजून घ्या असा मोलाचा संदेश ही कथा देते.
‘वाट ‘कथेत मोठ्या बाहुबली शेतकऱ्याने जाण्या-येण्याच्या वाटेसाठी एका गरीब शेतकऱ्याची लावलेली वाट….आजही शेतकऱ्यांच्या नशिबीचा वनवास कसा असतो हे दाखवते.
‘धग’ ही संभा या कष्टाळू प्रामाणिक इस्त्री वाल्याची कथा आहे. त्याच्या जीवन प्रवास बघता, साध्या सरळ स्वभावाच्या माणसांची ही शोकांतिकाच असते काय?.. की त्याला उन्हाळ्याची धग, पोटातील भुकेची धग, न मिळालेल्या मायेची धग यात पिळपटून टाकलं जातं… असा प्रश्न मनात उभा राहतो.
मरणकळा ही नव्या जुन्या पिढीतील खाईची कथा. कथा नायकाला कितीही वाटलं तरी पत्नी विरुद्ध जाऊ न शकल्याने वडिलांचे होणारे हाल.. आणि त्यामुळे वडिलांच्या बरोबरच हळव्या मनाचा तो मरण कळा सोसतोय हे वास्तवाचं विदारक चित्रण येथे आहे.
‘सय’ एक स्वप्न कथा आहे. आपल्या आजोळी गेलेल्या सहा, सात वर्षाच्या मुलाची सय कथा नायकाला किती विचित्र स्वप्न पाडते हे लेखकाने छान रंगवले आहे.
‘चकवा’ ही खेड्यातील प्रेमाचा चकवा देणारी कथा! बाजारातून घरी जाणाऱ्या बज्याला लग्नाचा चकवा, स्त्री भेटल्याचा चकवा, अंधाराचा चकवा इत्यादी प्रतिमांमधून समाजातील अंधश्रद्धा, भूत, पिशाच्यावर विश्वास यावर प्रकाश टाकला आहे.
‘ओझ’एक सुंदर कथा आहे. गावातून शहरात जाऊन खूप मोठा आणि धनाढ्य झालेला मुलगा .गावात पंचवीस वर्षानंतर येऊन गावाचं… बारा बलुतेदारांचं आपल्यावर असलेलं ओझं उतरवतो खूप खुमासदार पद्धतीनं गावाचं चित्र रंगवलं गेलंय.
सांगावा ही संग्रहातील शीर्षककथा! मातृ हृदयानं आपल्या प्रिय पुत्रासाठी, किंबहुना हा एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेला सांगावा आहे. आपल्या निर्वसनी मुलाला नाईलाजानं आईनं शहरात पाठवलंय. चार पैसे कमावले तर कर्ज फिटेल, गावात शेती करून मानानं राहता येईल हा त्यातला विचार. पण शहरातील छंदी-फंदीपणा,व्यसनं या सगळ्यामुळे पैसा हातात आला की नको ते करणं, संगतीचा परिणाम, सखू म्हातारीच्या मनात असंख्य चित्रे तयार होतात. नको तो पैसा नको ते शहरात रहाणं !पोराला बहकू द्यायचं नसतं. शेवटी मुलाला सांगावा देते”जसा असचील तसा घराकडे निघून ये.”ही कथाही काळजाला जाऊन भिडते.
आशय, अभिव्यक्ती भाषा मूल्य याने सांगावा कथा संग्रह वाचकांचे लक्ष खिळवून ठेवतो. लेखक सचिन पाटील यांनी ग्रामीण संस्कृती, लोकसंकेत, व्यक्ति, प्रवृतीचं दर्शन मोठ्या सूचकतेने केलं आहे. बोलीभाषा, निवेदनातील सजगता ,सहजता, घडलेला प्रसंग साक्षात् डोळ्यासमोर उभा करण्याची धाटणी खूपच वाखाणण्याजोगी आहे .एक उत्कृष्ट कथासंग्रह वाचल्याचा आनंद ‘सांगावा’ निश्चितच देतो.
** समाप्त**
परिचय – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(मागील भागात आपण पाहीलं – सगळेजण त्याची वाट पहात बसले.अर्ध्या तासाने एखाद्या परक्या माणसासारखा तो उगवला. आता इथून पुढे)
तेराव्या पर्यंतचे सगळे विधी आटोपले.आतापर्यंत शिरीषच्या दोन्ही भावांनी एक रुपयासुध्दा खर्च केला नव्हता.तेराव्याच्या जेवणाचा मोठा खर्चही शिरीषनेच सहन केला.
चौदाव्या दिवशी सगळे बसले असतांना निर्मलने न रहावून विषय काढला,
“अरे शिरीष अण्णांनी काही म्रुत्युपत्र करुन ठेवलं होतं का? नाही म्हणजे आता अण्णा गेले. त्यांच्या संपत्तीचे वाटे, हिस्से नको का व्हायला?”
” दादा मला तरी म्रुत्युपत्राबद्दल काही माहीत नाही आणि असंही तुम्ही रहाता तो बंगला, हा फ्लँट आणि आपली एजन्सी याव्यतिरिक्त दुसरं काही असेल असं मला वाटत नाही.”
“असं कसं म्हणता भाऊजी? त्यांची काही फिक्स्ड डिपाँझिट्स असतील किंवा एखादा प्लाँट वगैरे असेल तर आपल्याला माहीत नको?” शोभा वहिनी मध्येच बोलली.
“हो शिरीष” गुणवंत म्हणाला “मरण्यापुर्वी त्यांनी तुला काही सांगितलं असेल तर आम्हाला स्पष्ट सांग किंवा त्यांचा एखादा वकील असेल तर त्याला फोन करुन बोलावून घे.”
वडिलांच्या मरणाचं दुःख नसणाऱ्यांना त्यांच्या प्राँपर्टीची मात्र खुप काळजी होती हे स्पष्ट दिसत होतं.
” रणदिवे नावाचे वकील अण्णांचे मित्र होते ते बऱ्याचदा घरी यायचे.अण्णांच्या अंत्यविधीलाही ते हजर होते. त्यांना विचारायला हवं.“ शिरीष आठवून म्हणाला.
” अरे मग वाट कसली बघतोस? लाव त्यांना फोन ताबडतोब” दोघंही भाऊ एकदमच ओरडले.
शिरीषने डायरीतून वकीलाचा फोन नंबर शोधून त्यांना फोन लावला. त्यांच्याशी बोलून फोन ठेवत तो म्हणाला, ” ते आपल्याकडेच यायला निघालेत. त्यांच्याकडे मृत्युपत्र आहे.”
दोन्ही भाऊ आणि त्याच्या बायकांचे चेहरे प्रफुल्लित झाले.
वकीलसाहेब आले. सगळी मंडळी उत्सुकतेने त्यांच्याभोवती जमा झाली.
” मृत्युपत्रात खास असं काही सांगण्यासारखं नाही. ” वकीलसाहेबांनी म्रुत्युपत्र काढून सांगायला सुरुवात केली ” निर्मल आणि गुणवंत ज्या बंगल्यात रहातात तो बंगला त्यांच्याच नावे करण्यात आलाय. पुढेमागे निर्मल आणि गुणवंत यांचं पटलं नाही तर तो बंगला विकून आलेली रक्कम दोघांनी वाटून घ्यायची आहे. सध्या या बंगल्याची किंमत एक कोटी रुपये आहे. शिरीष ज्या फ्लँटमध्ये रहातोय म्हणजे हाच फ्लँट अण्णांनी शिरीषच्याच नावे केलाय. सध्याच्या घडीला या फ्लँटची किंमत पस्तीस लाख आहे. तसंच मेडिकल एजन्सी ज्या जागेत आहे तिची बाजारभावाने किंमत पंचवीस लाख आहे. तीसुध्दा शिरीषच्या नांवे करण्यात आली आहे.”
” याचा अर्थ शिरीषला अण्णांनी दहा लाख जास्त दिले आहेत” निर्मल अस्वस्थ होऊन रागाने म्हणाला.
वकीलसाहेबांनी त्याच्याकडे काही क्षण रागाने पाहिलं.मग म्हणाले “अण्णांच्या तीस लाखाच्या मुदतठेवी तुम्ही दोघां भावांनी अण्णा आजारी असतांना मोडल्या. शिरीषला त्याबद्दल का सांगितलं नाही आणि त्या तीस लाखाचं तुम्ही काय केलं? त्याचं स्पष्टीकरण द्या अगोदर.”
निर्मल चपापला. त्याने घाबरुन गुणवंतकडे पाहिलं. गुणवंतने त्याला नजरेने शांत बसायची खुण केली.
“तुमच्या कौटुंबिक भानगडीत मला पडायचं नाहिये. नाहीतर तुमची एक एक प्रकरणं उकरुन काढायला मला वेळ लागणार नाही. मी तुमच्या वडिलांचा वकीलच नाही तर चांगला मित्र होतो हे ध्यानात ठेवा आणि अण्णा तुमच्याकडे असतांना तुम्ही त्यांचे काय हाल केले हेही मला चांगलंच माहित आहे. तेव्हा बोलतांना सांभाळून बोला. ”
वकीलसाहेब तीव्र स्वरात म्हणाले तशा दोन्ही भावांनी माना खाली घातल्या.
“बस एवढंच होतं म्रुत्युपत्र” वकीलसाहेबांनी ते शिरीषच्या हातात दिलं.
“पण वकीलसाहेब अजून काही प्राँपर्टी नव्हती का अण्णांकडे?” गुणवंतने विचारलं.
” ते मला कसं माहित असणार? तुम्ही शोधून काढा आणि मला सांगा, पण लक्षात ठेवा ते सापडलं तरी तुम्हांला सहजासहजी काहीही मिळणार नाही. कदाचित कोर्टाची पायरीही चढावी लागेल” गुणवंतच्या बोलण्यातला लोभीपणा ओळखून वकीलसाहेब रागाने म्हणाले. वकीलसाहेब गेले. त्यांच्यापाठोपाठ निराश होऊन निर्मल, गुणवंत त्यांच्या बायका-मुलांसह निघून गेले. ते गेल्यावर शिरीष नेहाला म्हणाला, “चला बरं झालं. सगळं व्यवस्थित पार पडलं. वाटे, हिश्शांच्या भानगडीही मिटल्या.” ” ते ठिक आहे हो.पण तुम्हांला नाही वाटत अण्णांनी आपल्याला त्यामानाने खूपच कमी दिलंय?”
” त्यामानाने म्हणजे?”
” म्हणजे आपण जे काही त्यांच्यासाठी केलं त्याचा खुपच कमी मोबदला त्यांनी आपल्याला दिलय.”
शिरीष हसला. “नेहा,अण्णांनी मला जन्म दिला, मला वाढवलं,शिकवलं,मोठं केलं, मेडीकल एजन्सी माझ्या नावावर केली. ह्याचा तर त्यांनी कधी मला मोबदला मागितला नाही.”
“अहो मला तसं म्हणायचं नाहिये. तुमच्या दोन भावांच्या मानाने,असं मला म्हणायचं होतं.विचार करा.तुमच्या भावांनी अण्णांसाठी काय केलं?त्यांच्या तब्ब्येतीची कधी काळजी घेतली नाही. त्यामुळेच अण्णांना पँरँलिसीस झाला. पँरँलिसीस झाल्यावरही अण्णांना साधं सहा महिने त्यांनी घरात राहू दिलं नाही. लगेच आपल्या घरात आणून टाकलं. विचार करा या सात वर्षांत आपण अण्णांसाठी काय नाही केलं? या सात वर्षात कधीही आपण टुरला नाही गेलो। अण्णांना एकटं राहू द्यायचं नाही म्हणून आपण कधी जोडीने लग्नासमारंभाला गेलो नाही. अण्णांना त्रास होऊ नये म्हणून कधी नातेवाईकांना आपल्या घरी बोलावलं नाही. या सात वर्षात अण्णा चार वेळा हाँस्पिटलमध्ये अँडमीट होते. तुमचे भाऊ परक्या माणसांसारखे भेटायला यायचे. कधी त्यांनी विचारलं की ‘शिरीष किती बिल झालं? आम्ही काही मदत करु का तुला?’ अण्णांच्या आजारपणात किती रात्री तुम्ही आणि मी जागून काढल्या आहेत. मान्य आहे की ते आपलं कर्तव्य होतं. पण मग तुमच्या भावांची, वहिनींचीही काही कर्तव्यं नव्हती का? अण्णांनी केवळ तुम्हांलाच नाही तर तुमच्या भावांनाही जन्म दिलाय, त्यांनाही शिकवलं, मोठं केलंय मग त्यांचीही काही जबाबदारी नाही का? तुम्ही पाहिलंच असेल की अण्णा वारले पण अंत्यविधीपासून तेराव्यापर्यंतच सगळा खर्च आपल्यालाच करावा लागला. इस्टेटीत वाटा हवा पण बापाला मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही लागलेल्या खर्चात वाटा नको ही कोणती पध्दत? निर्मल आणि गुणवंतने अण्णांचे हाल केले तरीही अण्णांनी इस्टेटीत त्यांना समान वाटा दिला.त्याचं मला वाईट वाटत नाही.पण आपण केलेल्या त्यागाचा,सेवेचा,खर्चाचा अण्णांनी आपल्याला काय मोबदला दिला सांगा.”
शिरीष निशब्द होऊन ऐकत होता. नेहाचा एक एक शब्द त्याचं काळीज चिरुन जात होता. काय चुकीचं बोलत होती ती? आजवर तिने जे पाहिलं, अनुभवलं तेच तिच्या तोंडून बाहेर पडत होतं.शिरीषला ते पटत होतं त्यामुळे काय उत्तर द्यावं ते त्याला कळेना.काहीतरी बोलावं म्हणून तो म्हणाला, “तुझं म्हणणं बरोबर आहे गं,पण आपल्याला एक्स्ट्रा देण्यासारखं अण्णांकडे काही असायला हवं ना? जे होतं ते त्यांनी वाटून दिलं. कदाचित निर्मलदादा,गुणवंत दादा आणि त्यांच्या बायका खूप कमी पगारावर नोकऱ्या करतात हाही मुद्दा अण्णांनी लक्षात घेतला असावा. “
नेहा क्षणभर काहीच बोलली नाही. मग उसासा टाकून म्हणाली, “तसं असू शकतं. पण मन काही मानत नाही हेच खरं. “
रात्री बराच वेळपर्यंत शिरीषला झोप लागली नाही. नेहाचे शब्द आठवून तो वारंवार बैचेन होत होता.
दुसऱ्या दिवशी तो आँफिसला गेला खरा पण जेव्हा जेव्हा कामातून फुरसत व्हायची तेव्हां तेव्हा नेहाचं बोलणं त्याला आठवायचं आणि तो मग भुतकाळात जायचा. त्या सात वर्षात अण्णांच्या आजारपणामुळे आलेल्या अडचणी, काही बरेवाईट प्रसंग त्याला आठवू लागायचे आणि मग तो अस्वस्थ व्हायचा. अण्णांनी खरंच आपल्यावर अन्याय केला ही भावना त्याच्यात दृढ होऊ लागायची. आपल्या तुलनेत आपल्या स्वार्थी आणि लोभी भावांना अण्णांनी भरभरुन दिलं याचं त्याला दुःख होऊ लागायचं.आठवडाभर त्याला या विचारांमुळे काम सुचत नव्हतं. कितीही झटकून टाकायचा प्रयत्न केला तरीही ते विचार पुन्हापुन्हा त्याच्या मनाला चिकटून बसायचे. अर्थात आता करण्यासारखं त्याच्या हातात तरी काय होतं?