आपल्या समुहातील ज्येष्ठ लेखिका श्रीमती मीनाक्षी सरदेसाई यांची दोन पुस्तके नुकतीच प्रकाशित झाली आहेत.‘दुसरी बाजू’ हा नवा कथासंग्रह व ‘आभाळमाया’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे.
ई मराठी समुहातर्फे श्रीमती मीनाक्षी सरदेसाई यांचे साहित्यसेवेबद्दल मनःपूर्वक अभिनंदन
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मानवी जीवनाची कूस बदलवून टाकणारा तो शब्द …अवघ्या चारपाचशे वर्षात पृथ्वीच्या रंगमंचावर दाखल झाला आणि बघता बघता संपूर्ण मानवी आयुष्य व्यापून टाकले. तो शब्द केवळ शब्द नसून मानवी जीवनाची गुरुकिल्ली म्हणावी इतपत तो महत्त्वाचा बनला आहे. त्या शब्दाचे फायदे अगणित आहेत आणि काही तोटे देखील आहेत. हा शब्द मानवी जीवनात तंत्रज्ञान म्हणून सत्ता गाजवतो मात्र या शब्दाला मानवी जीवनात जेव्हा “मुल्यात्मक” वजन प्राप्त होईल तेव्हा मानवी जीवनाचा संपूर्ण हितवर्धक कायापालट होईल याची नक्कीच खात्री देता येते. संपूर्ण जगाला खेडे बनवण्याची किमया याच शब्दाच्या प्रभावाने घडवून आणली आणि दुसऱ्या टोकावर संपूर्ण जगाचा विनाश करण्याची ताकद देखील याच शब्दाच्या विकृत वापराने मनुष्याच्या वाट्याला आली आहे.हा शब्द आणि त्याच्या योग्य जाणीवा समजून घेऊन मानवी जीवन फुलवले पाहिजे .
विज्ञान …..एक जादुई शब्द आहे. जादुई याकरिता म्हटले की, जादूची कांडी फिरवल्याचा जो परिणाम कल्पनेत दिसून येतो त्याहून अधिक जादुई परिणाम या शब्दाच्या वापराने मानवी सृष्टीत झाला आहे. अवघ्या चारपाचशे वर्षापूर्वी विज्ञान सर्वार्थाने मानवी नजरेत भरले आणि जगाचे स्वरूप आरपार बदलले. मनुष्याच्या प्रगतीच्या वाटा विज्ञानानेच मोकळ्या केल्या आणि आकाशाला गवसणी घालण्याची कल्पना जवळपास प्रत्यक्षात आणून दाखवली. तंत्रज्ञान ही विज्ञानरुपी नाण्याची एक बाजू आहे. या बाजूने आता मानवी जीवनाचा कोपरा न् कोपरा व्यापलेला आहे. मनुष्याने या तंत्रज्ञान रुपी विज्ञानाचा अतोनात फायदा उपटला आहे. याचबरोबर या तंत्रज्ञान रुपी विज्ञानाची घातक बाजू म्हणून अण्वस्त्ररुपी विनाशकी हत्यारे निर्माण झाली आणि पृथ्वी विनाशाच्या टोकावर उभी राहीली हे देखील काळे सत्य आहे. विज्ञानाची सृष्टी जेवढी मोहक आहे , उपयोगी आहे त्यापेक्षा अधिक सुंदर व बहुपयोगी आहे विज्ञानाची दृष्टी. ही दृष्टी मानवी वर्तनात व्यवहारात आली की … अंधश्रध्दा, कर्मकांडे, धर्मांधता, जातीयता , भयता , प्रांतीयता , वंशवादता , अलैंगिकता अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे मिळून जातात. विज्ञानाची दृष्टी म्हणजे विज्ञानाला ” मुल्यात्मक जाणीवेने ” मानवी जीवनात प्रतिष्ठीत करणे. विज्ञानाची नेमकी जाणीव म्हणजे विज्ञान तुमच्या मनांत असंख्य प्रश्न उभे करते आणि त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा मार्ग देखील ” वैज्ञानिक दृष्टिकोन ” ठेवून मिळवता येतो ही सकारात्मक विधायक भावना रुजवते. विज्ञानाची नेमकी जाणीव हीच की , मनुष्याचे पृथ्वीवरील क्षुद्रत्व समोर ठेवते आणि पुन्हा मनुष्याच्या बुध्दीला उत्तेजना देऊन त्याचे प्राणी सृष्टीहूनचे अधिकचे महत्त्व ठळकपणे समोर आणते. विज्ञानाची जाणीव म्हणजे जादूची कांडी फिरवायला देखील योग्य ध्यास व ध्येय असावे ही भावना प्रबळ करून मनुष्यच पृथ्वी जगवू शकतो असा ठाम आत्मविश्वास मानवी मनांत निर्माण करते. विज्ञानाची ठळक जाणीव म्हणजे जोवर विज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे तोवरच माणसाला शक्तीशाली बनण्याची संधी आहे , आव्हान आहे आणि त्याचबरोबर समस्त सृष्टीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असल्याचे भानं देखील उपलब्ध आहे. विज्ञान हा शब्द वगळून मानवी जीवनाचा भूतकाळ नाही …वर्तमानकाळ नाही …अन् भविष्यकाळ अजिबात नाही.
विज्ञानाचा नैतिक दबदबा इतका की, धर्म नावाच्या संघटीत क्षेत्राला बाजूला करण्याची हिंमत बाळगून आहे. धर्माला योग्य पर्याय म्हणून विज्ञानवादी असणे ही एक वैचारिक भुमिका मांडली जात आहे. विज्ञानाएवढा ताकदीचा आणि संपूर्ण मानवी समाज व्यापणारा दुसरा शब्दच उपलब्ध नाही . विज्ञानाची ही किमया अफाट आहे, जादूई आहे, प्रगतीशील आहे. फक्त जाणीव हीच राखली पाहिजे की, विज्ञानाच्या सृष्टीबरोबरच विज्ञानाची दृष्टी मानवी समाजात अधिक फैलावली पाहिजे.
☆ वृध्दाश्रमातील आजी – लेखक – श्री चंद्रकांत घाटाळ ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆
“आजी! काय करताय?”
“काही नाही, थोडी सफाई करतेय पोरा!”
सामजिक सेवा संस्थेत हजर झाल्यापासुन या वृध्दाश्रमात माझी पाचवी फेरी. आमच्या संस्थे मार्फत काही खाण्या पिण्याची पाकिटे या वृध्दाश्रमात घेवुन यायचो. मी जेंव्हा कधी यायचो तेंव्हा या वृद्ध आजी खराटा घेवुन साफ सफाई करतांना दिसत. त्यांचे वय आणि कुबड निघालेल्या त्या शरीरला असं काम करून पाहताना मला मनातल्या मनांत खुपच दुःख होई. त्याच बरोबर त्यांना या परिस्थीतीत सोडणाऱ्या घराच्या सदस्यांबद्दल देखिल प्रचंड चीड येई. खरंच माणुसकी संपलीय असे वाटे.
माझं काम महिन्यातुन एकदा त्या वृध्दाश्रमात खाण्याची पाकिटे देणं. म्हणजे फक्त दहा- पंधरा मिनिटांचं काम, मात्र त्या दहा-पंधरा मिनिटांत मला जे अनुभवायला मिळायचे ते इतके दुःखद आणि वेदनादायी असायचे की, दोन-तीन दिवस मला नीट झोप देखिल लागत नसे. नेहमी वृध्दाश्रमातील त्या वृद्ध आजी आजोबांचे दुःखी चेहरे दिसत.
आज नेहमी प्रमाणे मी आमच्या संस्थेमार्फत या महिन्यात दान म्हणून दिली जाणारी खाण्याची पाकिटे घेवुन त्या वृध्दाश्रमात माझ्या नेहमीच्या वेळेत गेलो. साधारणतः सकाळचे आठ वाजले असतील.आज देखिल त्या कुबड निघालेल्या आजी झाडु मारताना दिसल्या आणि काळजात चर्रर्रर्र झालं. मी सामान देवून त्या आजीकडे गेलो. “आजी! तुम्ही इतक्या म्हाताऱ्या असुन रोज झाडु का मारता?”
“काय करु पोरा, आता सवय झालीय!”
“आजी तुमच्या घरी कोण कोण आहेत?”
“पोरा! मला दोन मुलं आहेत. एक बाहेर देशात नोकरी करतो आणि दुसरा आपली पालिका आहे ना! त्यांत सगळ्यात मोठा साहेब आहे.”
“आजी! म्हणजे आयुक्त?”
“हो पोरा!”
“म्हणजे आपले समीर गायकवाड साहेब?”
“हो पोरा! तोच तो.”
आजीच्या त्या बोलण्याने मला धक्काच बसला. कारण गायकवाड साहेबांविषयी आजपर्यंत चांगले ऐकून होतो की, त्यांनी फार गरीबीतुन शिक्षण पुर्ण केले. ते खुप संस्कारी, इमानदार वगैरे वगैरे. शेवटी काय, तेही माणूसच.. भले ते चांगले असतील पण त्यांची पत्नी, ती खडूस असेल तर? पण तरिही आयुक्त असुन आपल्या आईला वृध्दाश्रमात ठेवणे हे कितपत योग्य आहे?
ते काही नाही! माझं पालिकेत संस्थेच्या कामानिमित्त जाणं होतेच, तेंव्हा साहेबांना विचारूच! असं मी मनोमन ठरवले. कारण त्या आजीची मला फार काळजी वाटायची.
येथील वृध्द आपल्याच मुलांविषयी काय-काय विचार करत असतील? किती स्वप्न, इच्छा, अपेक्षा ठेवल्या असतील त्यांनी त्यांच्या मुलांकडुन. आणि आज काय वाटत असेल त्यांना? मी विचार करता करता आश्रमाच्या गेट बाहेर पडलो. तोपर्यंत त्या आजी झाडु मारतच होत्या. माझ्या भावनिक काळजावर तो एक आणखी प्रहार होता.
आता तर मी मनाशीच ठाण मांडले की, या बाबत गायकवाड साहेबांना विचारायचेच!
दोन दिवसांनी मला संस्थेच्या कामानिमित्त पालिकेत जायची संधी मिळाली. मी आयुक्तांची भेट मागितली आणि मला ती लगेचच मिळाली, कारण आमची संस्था खुपच नावाजलेली संस्था होती.
“साहेब आत येवू?”
“हो! या बसा!!”
“सर! मी मोहन माळी, आधार सेवा संस्थे मार्फत आलोय!!”
“हा बोला! तुमची संस्था तर समाजात अतिशय चांगले काम करतेय!! माळी साहेब काय करु शकतो मी आपल्यासाठी?”
“आयुक्त साहेबांचे हे इतके आदरयुक्त बोलणे ऐकून मी अगदी भारावून गेलो. इतके संस्कारी साहेब आपल्या स्वतः च्या आईच्या बाबतीत असं वागू शकतात? काय आणि कसं बोलावं काही सुचत नव्हतं.
“बोला माळी साहेब! काय करु शकतो मी आपल्या संस्थेसाठी?”
साहेबांच्या प्रश्नाने मी भानावर आलो. “काही नाही साहेब जरा पर्सनल होतं !”
“पर्सनल?”
“हो साहेब! कसं सांगु तेच समजत नाही?”
“काय असेल ते स्पष्ट बोला माळी साहेब!”
“साहेब! मी आमच्या संस्थेमार्फत महिन्याच्या चार- पाच तारखेला सदानंद वृध्दाश्रमात जातो. तेथे एक आजी आहेत. त्या झाडु मारत असतात. एक दिवस मी त्यांची विचारपूस केली असता त्या आपल्या आई आहेत असं समजलं!”
माझ्या या बोलण्याने साहेब खुपच गंभीर झालेले दिसले. तश्याच गंभीर आवाजात ते म्हणाले. “काय सांगु माळी साहेब? खरंतर मलाही हे पटत नाही! पण माझा नाईलाज आहे हो!!”
“नाईलाज! कसला नाईलाज?”
“माळी साहेब प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात हो!”
“हो साहेब ! प्रत्येकाच्या अडचणी असतात हे खरं आहे, पण तुम्ही आयुक्त पदावर आहात. तुमच्या आईला एखाद्या नातेवाईकाकडे ठेऊ शकता. सरळ वृध्दाश्रमात?”
माझ्या या प्रश्नावर साहेब बराच विचार करून म्हणाले, “माळी साहेब, तुम्ही आश्रमात किती वेळ थांबता?”
“साधारणतः पंधरा- वीस मिनिटे फार तर अर्धा तास!”
“माळी साहेब, आता पुढच्या वेळेस अजुन एखाद दोन तास थांबा!”
“चालेल गायकवाड साहेब!”
मी साहेबांच्या केबिन बाहेर पडतांना विचार करत होतो की, साहेबांचा नक्की काय नाईलाज असेल? असो! पुढच्या वेळेस मी आश्रमात दुपार पर्यंत थांबतो. कदचित साहेबांचा नाईलाज समजेल!
जून महिन्याच्या पाच तारखेला मी समान घेवुन आश्रमात पोहोचलो. आजही नेहमीचं दृश्य. त्या आजी झाडु मारत होत्या. मी माझं काम आटोपून आजी जवळ गेलो. “कश्या आहात आजी?”
“मला कसली धाड भरलीय, मी बरी आहे पोरा! तु कसा आहेस?”
“मी पण बरा आहे आजी! काही दिवसांपूर्वी मी आपल्या मुलाला, म्हणजे गायकवाड साहेबांना भेटलो आणि तुमच्या विषयी बोललो!”
“असं! मग काय बोलला तो ?”
“काही विशेष नाही. ‘नाईलाज आहे’ असं म्हणाले!”
“वाटलंच मला, तो तसंच बोलणार! आणखी काही बोलला नाही ना?”
“नाही आजी!” मी साहेबांच्या सांगण्याप्रमाणे आज थोडा वेळ थांबण्याचा निर्णय घेतला.
दहा- साडे दहा झाले असतील. आजी झाडु मारून थकलेल्या अवस्थेत झाडाखाली एका बाकड्यावर बसल्या होत्या. मी देखिल त्यांच्या बाजुला जावून बसलो. इतक्यात एक आलिशान गाडी वृध्दाश्रमात येतांना दिसली.
तसं ते नेहमीचं दृश्य होतं, कारण बहुतेक श्रीमंत घरची वृध्द मंडळी आश्रमात जास्त असतात. ज्यांची मुलं परदेशात नोकरीला वगैरे असतात. त्यांच्या अश्या गाड्या असतात.
आता मात्र त्या नेहमीच्या दृश्यात काहीसा बदल झालेला दिसला. ती आलिशान गाडी मी आजी सोबत बसलेल्या बाकड्याजवळ येवुन थांबली व गाडीचा मागचा दरवाजा उघडला तश्या आजी खराटा घेवूनच त्या आलिशान गाडीत बसल्या. ती गाडी तेथेच यु टर्न मारून निघुन गेली. ते पाहुन मी थक्क झालो. हा नक्की काय प्रकार आहे तो मात्र समजला नाही.
शेवटी न रहावून मी अधीक्षकांना भेटलो आणि हा काय प्रकार आहे ते विचारले.
“माळी साहेब! ह्या शांता आजी. आपल्या आयुक्त साहेबांच्या आई आहेत हे अगदी खरं आहे. मात्र त्या आपल्या सदानंद वृध्दाश्रमात राहत नाही तर आयुक्त साहेबांच्या, म्हणजे त्यांच्याच घरी अगदी सुखात आपल्या नातवंडां सोबत राहतात. आधी तर त्या नातवंडांना देखिल आणायच्या. मग त्यांना जाणीव झाली की, त्यामुळे येथील वृद्धांना त्यांच्या नातवंडांची आठवण येते म्हणुन आता आणत नाहीत.”
अधीक्षकांच्या या बोलण्याने मला धक्काच बसला, पण आता मात्र हा सुखद धक्का होता.
“म्हणजे मी समजलो नाही अधिक्षक साहेब?”
“माळी सर, त्याचं कसं आहे नां! शांताबाई आपल्या याच पालिकेत सफाई कामगार होत्या. त्या त्यांचे काम अतिशय इमाने इतबारे करीत. त्यांचे पती गिरणी कामगार होते. तेंव्हा गिरणी कामगारांच्या संपामुळे पतीची नोकरी अध्यात ना मध्यात होती. मात्र अश्या परिस्थीतीत शांताआजीने कुठूंबाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेवून आपल्या दोन्ही मुलांचे शिक्षण पुर्ण केले. त्यांत लहानग्याला विदेशात चांगली नोकरी मिळाली. तर मोठा म्हणजे आपले आयुक्त समीर गायकवाड साहेब.
शांताआजींनी सफाई कामगाराची नोकरी फक्त नोकरी म्हणून नाही तर सेवा म्हणून केली. आणि आज सुद्दा त्यांनी ती सेवा सोडलेली नाही. म्हणून त्या रोज आठ ते दहा या वेळेत येवून साफ सफाई करतात फक्त सेवा म्हणून. खरंतर या वयात शांताआजीने काम करणे गायकवाड साहेबांना अजिबात पटत नाही. मात्र शांताआजींच्या हट्टापुढे त्यांचा देखिल नाईलाज होतो. पण त्यांना घ्यायला व सोडायला ते रोज गाडी मात्र पाठवतात.
त्यामुळे आयुक्त साहेब तर ग्रेट आहेतच पण शांताआजी त्या पेक्षाही म्हणजे एकदम.. एकदम ग्रेट आहेत़.”
ओ! मला आणखीन एक सुखद धक्का. आता तर माझा देखिल हात आजीला सेल्यूट करण्यासाठी आपोआप कपाळा जवळ आला.
वृध्दाश्रमात आजी दिसल्या म्हणजे त्या येथेच राहत असतील असा गैरसमज झाल्यामुळे मी स्वतःशीच हसलो..
लेखक – श्री चंद्रकांत घाटाळ,
मो 7350131480
संग्राहक – मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
“हा लेख सेनेच्या सर्व Lady Wives ना समर्पित करते.”
“Proud To Be A Wife Of Indian Soldier.”
आज आम्ही सर्व बहिणी एकत्र जमलो होतो .आमचे स्पेशल गेटटूगेदर होते . ताईच्या घरी नुकतेच renovation झाल्यामुळे घर मस्त दिसत होते. आता त्यांनी वयाच्या व सवयींच्या अनुरूप घरात चेंजेस केले होते.
ताई म्हणाली,
अग !! तीस वर्षे झाली. लग्नानंतर काही वर्षांनी आम्ही या घरात रहायला आलो. तेच ते बघून बघून कंटाळा आला होता . मुलांची शिक्षण ,लग्न सर्व याच घरात झाली .••••
मी हसले, … तर ताई म्हणाली,… का ग ? कशाला हसलीस ?? …
मी म्हटलं,… अगं!! या तीस वर्षांत तर मी अक्षरशः अर्ध्या भारतभर फिरले . या अवधीत किती घर बदलली ???व मुलांच्या किती शाळा बदलल्या ??? मोजावेच लागेल मला.
आता मात्र सर्वांची उत्सुकता वाढली.
‘आर्मी लाईफ’ वेगळेच असते. त्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकताही असते. काही समज गैरसमज ही असतात .आज सर्वांनी आग्रह केला , म्हणून मी त्यांना माझ्या तीस वर्षांहून जास्त आर्मी लाईफचा अनुभव सांगायला सुरुवात केली.
मी म्हटलं,
लग्नानंतर सामान्यतः एका स्त्रीचे आयुष्य म्हणजे तिचा नवरा त्याची नोकरी, मुले त्यांचे शिक्षण, घर सांभाळणे. प्रामुख्याने हेच तिचे विश्व असते . नवऱ्याच्या नोकरीवर तिचे आयुष्य अवलंबून असते . दोघांनी मिळून घराकडे लक्ष द्यायचे. हा एक साधारण अलिखित करार असतो.
परंतु ‘आर्मी ऑफिसर’ बरोबर लग्न झाल्यावर हे समीकरण थोडं बदलत. कारण,
“An Army man is on duty for 24 hours.”
येथे ‘No ‘ शब्द चालतच नाही. It is always ‘YES ‘ and only ‘YES.’
नोकरी बरोबर मधून मधून कोर्सेसही असतात. युद्ध व्हाव अस कधीच कोणाला वाटत नाही. पण झालंच तर तुमची तयारी असावी. म्हणून “जीत का मंत्र ” द्यायला,
“लक्ष की ओर हमेशा अग्रसर’ रहायला ‘physically mentally toughness’ जागृत ठेवायला , वेगवेगळे कोर्सेस होत राहतात. कोणत्याही वेळेस युद्ध जिंकायला तयार असणे. याची तयारी होत असते.
“Actually, any army personnel is paid for this day only.”
“आधी देशाचे काम मग घरचे.” हा साधा सरळ हिशोब असतो.
हे सर्व नोकरीत रुजू व्हायच्या आधी माहीत असतंच. ही नोकरी करणे तुमचा ‘choice’ असतो. तुम्हीच ठरविलेले असते. आर्मी ऑफिसर शी लग्न झाल्यावर का?? कशाला?? मीच का?? असे प्रश्न उद्भवतच नाही.
म्हणून बायकोची जबाबदारी वाढते.
आता थोडं माझ्याबद्दल म्हणजे जनरल ‘army wives’ बद्दल सांगायचे झाले तर थोडयाफार फरकाने सर्वांची स्टोरी मिळतीजुळतीच असते.
रिटायरमेंट नंतर, सध्या ज्या घरात मी पर्मनंट राहते आहे , ते माझ्या आयुष्यातले ‘विसावे’ घर आहे. म्हणजे आजपर्यंत मी वेगवेगळ्या शहरात वेगवेगळया घरात राहिले. कधी दहा खोल्यांच्या जुन्या ब्रिटिशकालीन बंगल्यात, तर कधी अगदी दोन खोल्यांचे घर.
प्रत्येक ‘Posting’ मधे अशीच तयारी करायची की, कुठेही सहज राहता येईल, स्वयंपाक करता येईल . म्हणजे प्रत्येक Posting मधे ‘mini ‘ संसाराच्या चार पेट्या तयार करायच्या, व वेळ निभावून घ्यायची. “स्वयंपाक ,शाळा, अभ्यास “या तीन गोष्टींना प्राथमिकता द्यायची व नवीन जागी लवकरात लवकर ‘ adjust ‘ व्हायचा प्रयत्न करायचा . आमच्या ‘Comfort’ ची व्याख्या खूप सीमीत होती.
प्रत्येक ‘Posting ‘ मधे दोन तीन पेट्या वाढायच्याच. असं म्हणतात, पेटयांचा टोटल नंबर मोजून आर्मी ऑफिसरची ‘Rank’ व एकंदर किती ‘Postings’ झाल्या ते कळत. आम्ही रिटायर्ड झालो, तेव्हा ‘सत्तर’ पेटया होत्या. म्हणजे नोकरीच्या पस्तीस वर्षाचा आमचा संसार त्या जीवाभावाच्या पेट्यांमधे होता.
तुमचे विचार खूप स्पष्ट असले , तर तुम्ही तुमचे आयुष्य छान प्लान करू शकता. आम्हाला या नोकरीचे प्लस मायनस points माहीत होते. म्हणून आम्ही आधीच ठरवले की व्यवस्थित रहायचे. मग पेटयांचा नंबर वाढणारच. त्या टिपिकल काळया लाकडी पेट्या खूप कामाच्या होत्या. त्यांनी आयुष्यभर खूप इमानदारीने आमची साथ दिली. कधी पलंग, तर कधी पेटी. आवश्यकतेनुसार त्यात सामान ठेवून वेळोवेळी काळया पेटयांची मदत झाली.
आता मुलींच्या शिक्षणाबद्दल सांगायचे झाले तर, माझ्या मुलीने बारावी पास होईपर्यंत बारा शाळांमधून शिक्षण घेतले. म्हणजे साधारण प्रत्येक वर्षी… नवीन शाळा, शिक्षक, मित्र मैत्रिणी बदलायच्या. प्रत्येक नवीन जागी स्वतःला प्रूव्ह करायचे. बरं, हे सर्व वर्ष सुरू होण्यापूर्वीच होईल असे नाही. एकदा तर ‘ half yearly ‘ परीक्षेच्या एक दिवस आधी अॅडमिशन घेतली . दुसऱ्या दिवशीपासून सुरू होणाऱ्या परीक्षेचे सिलेबस व रोल नंबर घेऊन घरी आलो . ‘उधमपूर ‘ ‘जम्मू काश्मीर’ मधील ही नवीन जागा, ती पण पहाडी , शाळेत एडमिशन साठी जाताना एक मुलगी रडली व येताना दुसरी . व त्यात आणखी भर म्हणजे त्यांचे बाबा आमच्याबरोबर नवीन जागी नव्हते . वेळेवर काही कारणाने त्यांना थांबावे लागले. मी मुलींना घेऊन उधमपूरला पोचले होते. मला तो दिवस चांगला आठवतो . त्यादिवशी दोघींनी दहा बारा तास अभ्यास करून दुसऱ्या दिवशीच्या परीक्षेची तयारी केली होती .कारण सिलेबस वेगळा होता.
आर्मीमध्ये नेहमी नवऱ्याबरोबर राहता येईलच, असे नसते, ‘Field posting’ मधे फॅमिलीला बरोबर राहता येत नाही . म्हणून अशा तडजोडी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतोच . यात एकच खंत वाटते की अगदी लहानपणापासूनचे बरोबर शिकलेले मित्र मैत्रिणी माझ्या मुलींना नाहीत .
यातही एक सकारात्मक विचार असा की… प्रत्येक नवीन स्टेशनवर ,नवीन मुलांमध्ये , पहिल्या ‘पाच ‘ मधे तुम्ही आपली पोझिशन मेन्टेन ठेवली, तर आयुष्यात पुढे द्याव्या लागणाऱ्या ‘competitive ‘ परीक्षेची तयारी आपोआपच होत जाते. मुलेही टफ लाईफला सामोरे जायला हळूहळू शिकतात . हे सर्व खूप सोप्प नक्कीच नव्हतं, पण दुसरा पर्यायही नव्हता. बरे असो, याचा प्रभावी परिणाम आता दिसतोय. सर्वांना कुठेही सहज एडजस्ट होता येतंय.
– क्रमशः भाग पहिला.
लेखिका : सुश्री संध्या बेडेकर
प्रस्तुती : सुश्री कालिंदी नवाथे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ केदारनाथ मंदिर – एक न उलगडलेल कोडं… लेखक – श्री विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
केदारनाथ मंदीराचे निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत.
केदारनाथ मंदिर हे साधारण ८ व्या शतकात बांधलं गेलं असावं असे आजचं विज्ञान सांगत. म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीतकमी १२०० वर्षांपासून अस्तित्वात आहे.
केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आज २१ व्या शतकातही आहे. एका बाजूला २२,००० फूट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसऱ्या बाजूला २१,६०० फूट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७०० फुटाचा भरतकुंड. अशा तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या – मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी. – ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत.
ह्या क्षेत्रात फक्त ” मंदाकिनी नदीचं ” राज्य आहे. थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणारं पाणी. अशा प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत एक कलाकृती साकारायची म्हणजे किती खोलवर अभ्यास केला गेला असेल.
“केदारनाथ मंदिर” ज्या ठिकाणी आज उभे आहे तिकडे आजही आपण वाहनाने जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी त्याचं निर्माण कां केल गेलं असावं ? त्याशिवाय १००-२०० नाही, तर तब्बल १००० वर्षापेक्षा जास्ती काळ इतक्या प्रतिकूल परिस्थितीत मंदिर कसं उभं राहीलं असेल ? हा विचार आपण प्रत्येकाने एकदा तरी करावा.
जर पृथ्वीवर हे मंदिर साधारण १० व्या शतकात होतं तर पृथ्वीवरच्या एका छोट्या “Ice Age” कालखंडाला हे मंदिर सामोरं गेलं असेल असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला. साधारण १३०० ते १७०० ह्या काळात प्रचंड हिमवृष्टी पृथ्वीवर झाली होती व हे मंदिर ज्या ठिकाणी आहे तिकडे नक्कीच हे बर्फात पूर्णतः गाडलं गेलं असावं व त्याची शहानिशा करण्यासाठी “वाडिया इंस्टीट्यूट ऑफ जिओलॉजी, डेहराडून” ने केदारनाथ मंदिरांच्या दगडांवर “लिग्नोम्याटीक डेटिंग” ही टेस्ट केली. लिग्नोम्याटीक डेटिंग टेस्ट ही “दगडांच आयुष्य” ओळखण्यासाठी केली जाते. ह्या टेस्टमध्ये असं स्पष्ट दिसून आलं की साधारण १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे मंदिर पूर्णतः बर्फात गाडलं गेलं होतं. तरीसुद्धा कोणतीही इजा मंदिराच्या बांधकामाला झालेली नाही.
सन २०१३ मध्ये केदारनाथकडे ढगफुटीने आलेला प्रलय सगळ्यांनी बघितला असलेच. ह्या काळात इकडे “सरासरी पेक्षा ३७५% जास्त” पाऊस झाला. त्यानंतर आलेल्या प्रलयात तब्बल “५७४८ लोकांचा जीव गेला” (सरकारी आकडे). “४२०० गावाचं नुकसान” झालं. तब्बल १ लाख १० हजार पेक्षा जास्त लोकांना भारतीय वायूसेनेने एअरलिफ्ट केलं. सगळंच्या सगळं वाहून गेलं. पण ह्या प्रचंड अशा प्रलयातसुद्धा केदारनाथ मंदिराच्या पूर्ण रचनेला जरासुद्धा धक्का लागला नाही हे विशेष.
“अर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया” यांच्या मते ह्या प्रलयानंतरसुद्धा मंदिराच्या पूर्ण स्ट्रक्चरच्या ऑडिटमध्ये १०० पैकी ९९ टक्के मंदिर पूर्णतः सुरक्षित आहे. “IIT मद्रास” ने मंदिरावर “NDT टेस्टिंग” करुन बांधकामाला २०१३ च्या प्रलयात किती नुकसान झालं आणि त्याची सद्यस्थिती ह्याचा अभ्यास केला. त्यांनी पण हे मंदिर पूर्णतः सुरक्षित आणि मजबूत असल्याचा निर्वाळा दिला आहे.
दोन वेगळ्या संस्थांनी अतिशय “शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक” पद्धतीने केलेल्या चाचण्यात मंदिर पास नाही
तर “सर्वोत्तम” असल्याचे निर्वाळे आपल्याला काय सांगतात ? तब्बल १२०० वर्षानंतर जिकडे त्या भागातले सगळे वाहून जाते, एकही वास्तू उभी रहात नाही, तिकडे हे मंदिर दिमाखात उभे आहे आणि नुसतं उभं
नाही तर अगदी मजबूत आहे. ह्या पाठीमागे श्रद्धा मानली तरी, ज्या पद्धतीने हे मंदिर बांधले गेले आहे, ज्या जागेची निवड केली गेली आहे, ज्या पद्धतीचे दगड आणि संरचना हे मंदिर उभारताना वापरली गेली आहे, त्यामुळेच हे मंदिर ह्या प्रलयात अगदी दिमाखात उभं राहू शकलं, असं आजच विज्ञान सांगतं आहे.
हे मंदिर उभारताना “उत्तर–दक्षिण” असं बांधलं गेलं आहे. भारतातील जवळपास सगळीच मंदिरे ही “पूर्व–पश्चिम” अशी असताना केदारनाथ “दक्षिणोत्तर” बांधलं गेलं आहे. याबाबत जाणकारांच्या मते जर हे मंदिर “पूर्व-पश्चिम” असं असतं, तर ते आधीच नष्ट झालं असतं. किंवा निदान २०१३ च्या प्रलयात तर नक्कीच नष्ट झालचं असतं. पण ह्याच्या या दिशेमुळे केदारनाथ मंदिर वाचलं आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात जो दगड वापरला गेला आहे तो प्रचंड कठीण आणि टिकाऊ असा आहे. अन् विशेष म्हणजे जो दगड या मंदिराच्या बांधकामासाठी वापरला गेला आहे तो दगड तिकडे उपलब्ध होत नाही. मग फक्त कल्पना करा की ते दगड तिथेपर्यंत वाहून नेलेच कसे असतील ? एवढे मोठे दगड वाहून न्यायला (ट्रान्सपोर्ट करायला) त्याकाळी एवढी साधनंसुद्धा उपलब्ध नव्हती. या दगडाची विशेषता अशी आहे की वातावरणातील फरक, तसेच तब्बल ४०० वर्ष बर्फाखाली राहिल्यावरसुद्धा त्याच्या “प्रोपर्टीजमध्ये” फरक झालेला नाही.
त्यामुळे मंदिर निसर्गाच्या अगदी टोकाच्या कालचक्रात आपली मजबुती टिकवून आहे. मंदिरातील हे मजबूत दगड कोणतही सिमेंट न वापरता “एशलर” पद्धतीने एकमेकात गोवले आहेत. त्यामुळे तपमानातील बदलांचा कोणताही परिणाम दगडाच्या जॉइंटवर न होता मंदिराची मजबुती अभेद्य आहे. २०१३ च्या वेळी एक मोठा दगड आणि विटा घळईमधून मंदिराच्या मागच्या बाजूला अडकल्याने
पाण्याची धार ही विभागली गेली, आणि मंदिराच्या दोन्ही बाजूने पाण्याने सर्व काही आपल्यासोबत वाहून नेलं. पण मंदिर आणि मंदिरात शरण आलेले लोक सुरक्षित राहिले, ज्यांना दुसऱ्या दिवशी भारतीय वायूदलाने एअरलिफ्ट केलं होतं.
श्रद्धेवर विश्वास ठेवावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तब्बल १२०० वर्ष आपली संस्कृती, मजबुती
टिकवून ठेवणारं मंदिर उभारण्यामागे अगदी जागेची निवड करण्यापासून ते त्याची दिशा, त्याचं बांधकामाचं मटेरियल आणि अगदी निसर्गाचा पुरेपूर विचार केला गेला ह्यात शंका नाही. “Titanic जहाज” बुडाल्यावर पाश्चिमात्य देशांना “NDT टेस्टिंग” आणि “तपमान” कसे सगळ्यावर पाणी फिरवू शकते हे समजलं. पण आमच्याकडे तर त्याचा विचार १२०० वर्षापूर्वी केला गेला होता. केदारनाथ त्याचं ज्वलंत उदाहरण नाही का ? काही महिने पावसात, काही महिने बर्फात, तर काही वर्ष बर्फाच्या आतमध्ये राहून सुद्धा ऊन, वारा, पाऊस ह्यांना पुरुन उरत, समुद्रसपाटीपासून ३९६९ फूट वर “८५ फूट उंच, १८७ फूट लांब, ८० फूट रुंद” मंदिर उभारताना त्याला तब्बल “१२ फूटाची जाड भिंत आणि ६ फूटाच्या उंच प्लॅटफोर्मची मजबूती” देताना किती प्रचंड विज्ञान वापरलं असेल ह्याचा विचार जरी केला तरी आपण स्तिमित होतोय.
आज सगळ्या प्रलयानंतर पुन्हा एकदा त्याच भव्यतेने “१२ ज्योतिर्लिंगापैकी सगळ्यात उंचावरचं ” असा मान मिळवणाऱ्या केदारनाथच्या वैज्ञानिकांच्या बांधणीपुढे आपण “नतमस्तक” होतो.
वैदिक हिंदू धर्म-संस्कृती किती प्रगत होती याचे हे एक उदाहरण आहे, त्याकाळी वास्तुशास्त्र, हवामानशास्त्र, अंतराळ शास्त्र, आयुर्वेद शास्त्र, यात आपले ऋषी अर्थात शास्त्रज्ञ यांनी खूप मोठी प्रगती केली होती…….
म्हणूनच मला मी “हिंदू”असल्याचा अभिमान वाटतो.
|| ॐ नमः शिवाय ||
लेखक : श्री विनीत वर्तक
संग्राहक : श्री विनय माधव गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ प्रिय वपु, … लेखक – श्री बिपीन कुलकर्णी ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
वसंत पुरुषोत्तम काळे (व पु काळे)
(25 मार्च 1932 – 26 जून 2001)
प्रिय वपु,
२५ मार्च …. आज तुमचा वाढदिवस. आपल्या समाजात नावाच्या मागे कै. लागले की जयंती म्हणायची पद्धत, पण खरेच तुम्ही गेलात का ? ज्या नियती बद्दल तुम्ही एवढे लिहून ठेवलेत ती नियती अशी का रुसली तुमच्या वर आणि का ? आमच्या पासून केवळ ६८ व्या वर्षी हिरावून घेतले?
६८ हे जाण्याचे वय नक्कीच नाही, पण शेवटी ग.दि.माडगुळकर म्हणून गेले तसेच आहे.. ” पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा” …
आज तुम्ही असतात तर आमच्यासारख्या असंख्य चाहत्यांनी, तुमच्या कुटुंबियांनी नक्कीच तुमचे सहस्त्रचंद्र दर्शन केले असते, पण आता या सगळ्या जर तर च्या गोष्टी. तुम्ही कुठे तरी लिहून ठेवले आहे ना ” परिचयाच्या किंवा नात्यातल्या माणसा पेक्षा, ४ तासाच्या प्रवासात भेटलेली व्यक्ती कधी कधी जवळची वाटू लागते” – वपु तुमचे आणि आमचे नाते तरी यापेक्षा काही वेगळे आहे का हो ? आम्हाला जेव्हा हवे असेल तेव्हा तुमचे कुठलेही पुस्तक उघडतो आणि मनसोक्त भेटतो– मग तुम्ही कधी प्रवासात भेटता, कधी घरीच रात्रीच्या वेळी उशिरा भेटता, कधी गाडीत भेटता तर कधी चक्क ऑफिसमध्ये भेटता. तुम्ही जसे आम्हाला भेटता तसे आम्ही पण तुम्हाला प्रत्येक कथेत भेटतोच ना ? तुम्ही प्रत्येक कथा आम्हाला समोर ठेवूनच लिहित होतात ना… तुम्ही तुमचे मन आमच्या जवळ मोकळे केलेत …. आणि आम्ही आमचे !! हिशोब पूर्ण !!!!
नरक म्हणजे काय ? तुम्ही ‘पार्टनर’ मध्ये किती मस्त एका ओळीत लिहून गेलात — ” नको असलेली व्यक्ती न जाणे म्हणजे नरक” – कसे सुचत होते हो इतकी सोपे लिखाण करायला ?
तसे तुम्ही व्यवसायाने वास्तूविशारद , नोकरी केली मुंबई महानगर पालिकेत आणि नाव कमावले साहित्य विश्वात ! तीनही गोष्टींचा एक दुसऱ्याशी अर्थाअर्थी संबंध नाही, पण वपु तुम्हीच हे करू शकत होतात.
कदाचित महानगरपालिकेतील नोकरीमुळे तुमचा संबंध समाजातील वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी आल्यामुळे नकळत कथेला विषय आणि खाद्य मिळत गेले…पण याचा अर्थ असा नव्हे की महानगर- -पालिकेमुळे तुम्ही साहित्यिक झालात… नसता मुंबई पालिकेतील प्रत्येक कर्मचारी कथालेखक झाला असता…. तुम्ही म्हणाला होतात न
तुमच्या प्रत्येक कथेत आदर्श नवरा किंवा बायको डोकावते , आणि संपूर्ण कथा कायम मध्यमवर्गीय घराभोवती फिरत असते ? काय बरे कारण असावे > —
कदाचित तुम्ही जसे वाढलात त्या वातावरणाचा परिणाम असेल , आणि तुम्हाला सांगतो वपु, त्यामुळेच तुमच्या कथा आमच्या मनाला जास्त भिडल्या. आता हेच बघा न –
“किती दमता तुम्ही ?” या एका वाक्याची भूक प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला असते”…. या वाक्याचे महत्व कळण्याकरिता तुमच्या कथा वाचाव्या लागल्या?
तुम्ही अजून एक कलाकृती करून ठेवलीत , जे पुस्तक तुम्ही वडिलांवर लिहिलेत. त्याला खरेच तोड नाही. ” व पु सांगे वडिलांची कीर्ती “…। याला कारण प्रत्येकालाच वडिलांबद्दल भावना असतात, पण किती लोक समर्थपणे त्या जाहीर करतात ? तसेच साहित्य विश्वात वडील या विषयावर लिहिलेली पुस्तके अभावानेच आढळतात…. केवळ त्या एका गोष्टीमुळे पुस्तकाचे महत्व वाढत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वडील ही एक हळवी किनार असते … असंख्य आठवणी आणि भावना असतात. पण त्या तुम्ही कशा मांडता हे फार महत्वाचे…. तुम्ही तर लेखकच– पण त्याहून जास्त महत्वाचे ते एका लेखकाने एका चित्रकाराचे लिहिलेले चरित्र…
आपल्या सौ. चे ब्रेन ट्युमरचे आजारपण आणि त्याचा दुखद: शेवट , दिवस रात्र मृत्यूची टांगती तलवार….बायको ही सखी असते असे सांगत तुम्ही आम्हाला नवरा बायको या नात्याची PHILOSOPHY शिकाविलीत…. त्याच नात्याकरिता नियती इतकी निष्ठुरपणे का वागली तुमच्याशी ? कदाचित या अनुभवातून आयुष्याचं सार तुम्ही इतक्या सहज पणे सांगून गेलात – ” प्रोब्लेम कोणाला नसतात ? ते सोडवायला कधी वेळ, कधी पैसा तर कधी माणसे लागतात “
अंत्ययात्रेला जाऊन आल्यानंतर अथवा स्मशानातून परत आल्यावर थकवा येण्याचे कारण काय, किंवा मन सैरभैर का होते याचे उत्तर तुम्ही सहज देवून गेलात – “रडणाऱ्या माणसापेक्षा सांत्वन करणाऱ्यावर जास्त ताण पडतो ” – किती अचूक लिहून गेलात हो तुम्ही !
तुमचे लेखन जसे गाजले तसेच तुमचे कथाकथन गाजले. कथाकथनाने अख्या महाराष्ट्राला वेड लावले.
तुम्ही कथाकथन थेट साता समुद्रापार नेलेत …लंडन, अमेरिका , कॅनडा ला कार्यक्रम झाले …अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले — कर्तुत्व तुमचे पण मान आमची उंचावली !
महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, ‘पु.भा.भावे’ पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार, असे अनेक पुरस्कार मिळाले…तुमचे असंख्य चाहते धन्य झाले.
वपु तुमच्या दृष्टीकोनाला खरंच दंडवत ! आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन खरोखरच खूप काही शिकवणारा आहे…. पत्र हे संवादाचे सगळ्यात प्रभावी माध्यम … आणि मुख्य म्हणजे पत्र हे असे माध्यम की ज्यात फक्त दोन लोक संवाद साधतात…. तुम्ही म्हणून गेलाच आहात न की — ” संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात !”—–
— म्हणून हा पत्र प्रपंच ! तुम्ही आमच्यापासून खूप दूर गेलात, पण जिथे असाल तिथे नक्कीच सुखी असाल …तुमची कथा ऐकायला आता साक्षात पु ल , प्र के अत्रे , पु भा भावे, बाळासाहेब ठाकरे, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, यासारखी दिग्गज मंडळी प्रेक्षक म्हणून असतील आणि तुम्ही म्हणत असाल —
—आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचंही तसंच आहे .
लेखक – श्री बिपीन कुलकर्णी
संग्राहिका : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ कुरुक्षेत्र आणि जीवनाचे तत्त्वज्ञान ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆
महाभारतात संजय शेवटी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर पोहोचला.तेच कुरुक्षेत्र, जेथे महाभारतातील निर्णायक युद्ध संपले होते, आपल्याला प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीने ज्याचे वर्णन त्याने धृतराष्ट्राला केले होते. प्रचंड विध्वंस झालेल्या त्या रणभूमीवर त्याला एकदा यावंच लागणार होतं.
‘का झाले हे युद्ध ? हे खरंच अटळ नव्हते का ? एवढा प्रचंड नरसंहार एवढ्या कमी दिवसांत का केला गेला ?
मी जे पाहत होतो, ते खरंच घडलंय का ?’
याची शहानिशा करायला त्याला युद्धभूमीवर येणं भाग होतं.
त्याने चहूदिशांना पहिले, ‘खरंच एवढं मोठं युद्ध झालं? हीच ती रणभूमी ज्यावर रक्तामांसाचा खच पडला होता ? फक्त अठरा दिवसांत भरतखंडातील 80 टक्के पुरुष वंश नामशेष? हीच ती भूमी जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह उभे ठाकले होते?’
“यामागील सत्य तुला कधीच समजणार नाही,” एक वृद्ध कंपित आवाज ऐकू आला. संजयाने वळून पाहिले, तो धुळीच्या लोटातून भगव्या कपड्यातील एक वृद्ध योगी प्रकट झाला!
“मला माहीत आहे, तू इथे का आला आहेस, परंतु हे युद्ध कळण्यासाठी खरं युद्ध कोणाशी असतं ते तुला समजून घ्यावे लागेल!” वृद्ध योगी गूढपणे म्हणाला.
“काय आहे खऱ्या युद्धाचा अर्थ?” संजय तात्काळ विचारता झाला. त्याच्या लक्षात आले की तो एका महान, ज्ञानी माणसाच्या सहवासात आहे.
” महाभारत ही एक अतिभव्य, अभूतपूर्व वस्तुस्थिती असेलही, पण त्यामागे एक तत्वज्ञान आहेच आहे.”
वृद्ध योग्याच्या उद्गारांनी संजय अधिक प्रश्न विचारायला प्रवृत्त झाला.
“महाराज, आपण मला सांगू शकाल का, काय आहे हे तत्वज्ञान?”
“नक्कीच, ऐक तर,”
वृद्ध योग्याने सांगायला सुरुवात केली.
“पाच पांडव म्हणजे आपली पंचेंद्रिये, ‘नयन जे पाहतात, नाक ज्याने वास येतो, जीभ जी चव घेते, कान जे ऐकतात व त्वचा जी स्पर्श जाणते. आणि आता सांग बरं कौरव म्हणजे काय?” वृद्ध योग्याने डोळे किलकिले करत विचारले.
संजयाने मानेने नकार दर्शवला.
“कौरव हे शेकडो विकार व दुर्गुण आहेत जे तुमच्या पंचेंद्रियांवर रोज हल्ला करत असतात, पण तुम्ही त्यांचा प्रतिकार करू शकता. कसा माहीत आहे?”
संजयाने पुन्हा नकारार्थी मान हलवली.
“तेव्हाच, जेव्हा भगवान श्रीकृष्ण तुमचा रथ हाकत असतात!”
वृद्ध योग्याचे डोळे लकाकले आणि संजय या रूपकाने अवाक झाला!
“भगवान श्रीकृष्ण म्हणजे दुसरं कोणी नाही, तर हा आहे तुमचा आतील आवाज, तुमचा आत्मा, तुमचा मार्गदर्शक आणि जर तुम्ही स्वतःला त्याच्या हाती सोपवलं तर तुम्हाला काहीही काळजी करायचे कारण नाही.”
संजय बावचळून गेला; पण त्याने लगेच प्रतिप्रश्न केला, “महाराज, जर कौरव हे दुर्गुण वा विकारांचे प्रतीक आहेत, तर मग द्रोणाचार्य आणि भीष्म हे कौरवांच्या बाजूने का बरं लढत होते?”
वृद्ध योग्याने दुःखी स्वरात सांगितले,
” याचा अर्थ हाच की जसे तुमचे वय वाढते तसा तुमचा वडील माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.
तुमच्यापेक्षा वडील माणसं, जी लहानपणी तुम्हाला परिपूर्ण वाटत असतात ती परिपूर्ण असतीलच असे नाही, ते काही बाबतीत कमकुवत असू शकतात. आणि एक दिवस तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की ती तुमच्या हिताची आहेत का नाहीत.? आणि मग एके दिवशी तुम्हाला लक्षात येते की तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांच्याबरोबर झगडावे लागणार आहे!
मोठं होण्यातला हा सर्वात कठीण व अपरिहार्य भाग आहे आणि म्हणूनच भगवद्गीता अतिशय महत्वाची आहे.”
संजय पूर्णत: लीन झाला, ज्ञानाच्या या पैलूने, पण लगेच हळुवार स्वरात विचारता झाला, “मग कर्णाबद्दल काय?”
“वा!”
वृद्ध योगी उद्गारला, “वा! अप्रतिम प्रश्न, शेवटी राखून ठेवलास तर!”
“कर्ण आहे तुमच्या पंचेद्रियांचाच बांधव, तो आहे आसक्ती, तो तुमचाच एक भाग आहे पण वावरतो मात्र तुमच्या दुर्गुणी विकारांसह. त्याला कळत असतं की आपण चुकतोय, परंतु सबबी सांगत रहातो सर्वकाळ विकारांची सोबत करण्यासाठी..!’
संजयनं सहमतीदर्शक स्मितहास्य करत नजर खाली झुकवली, डोक्यात हजारो विचारांचा कल्लोळ उठला होता.
पुन्हा एकदा वाऱ्याची वावटळ उठली. थोड्या वेळाने स्वतःला सावरत त्याने वर पहिले तर तो वृद्ध योगी अंतर्धान पावला होता, जीवनाचे तत्वज्ञान थोडक्या शब्दांत मांडून…!
संग्रहिका : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈