☆ जीवनरंग ☆ विज्ञान कथा – बलिदान – भाग – 1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆
बरोबर दहा वर्षापूर्वी याच बागेत मी निलेश बरोबर गप्पा मारत होतो. त्याचं आपल्या बागेवर खूप प्रेम होतं. पहिल्यापासूनच झाडाझुडपात राहणार त्याचं संवेदनशील मन होतं. म्हणूनच मेडिकलला ऍडमिशन मिळत असूनही तो गेला नाही. त्याच्या आवडत्या ”बॉटनी” तच त्यानं BSc आणि M Sc सुद्धा केलं. मला स्वतःला त्याच्या मैत्रीमुळे, त्याचा सहवास मला आवडायचा आणि त्याहीपेक्षा काढलेल्या नोट्स तो मला अभ्यासाला द्यायचा म्हणून मी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून M.Sc केलं. नंतर मला एका कोर्सला बेंगलोर ला ऍडमिशन मिळाली आणि नोकरीसाठी म्हणून मी दहा वर्ष तिकडेच होतो. त्यामुळे तिथे निलेश च्या आयुष्याची झालेली उलथापालथ मला समजू शकली नाही. त्याच्या आणि चंदाच्या !
होय चंदा ! सी. चंदा. साउथ इंडियन. मुद्दाम एम एस सी साठी इकडे आली आणि इकडची होऊन गेली. निलेश सारखं तिचंही बॉटनी वर फार प्रेम होतं. दोघांचंही एकच स्पेशलायझेशन. त्यामुळे त्यांची मैत्री व्हायला वेळ लागला नाही. निलेश सदैव आपल्या विषयाच्या विचारांच्या तंद्रीतच असायचा. त्याच्या मेंदूत इतके सारखे सारखे नवनवीन विचार प्रश्न येत असत की बरेचदा त्याला वर्तमानकाळाची शुद्ध नसायची. यामुळे युनिव्हर्सिटीत तो विक्षिप्त म्हणूनच प्रसिद्ध होता. पण त्याच्या हुशारीवर, विक्षिप्तपणा वर चंदाचा जीव जडला आणि निलेश च्या मनात नसतानाही तिने आपला आयुष्याचा जोडीदार त्याला निवडले. संसार -लग्न -दोन वेळचं जेवण. घर असल्या मध्ये निलेशच मन रमणारच नव्हतं. त्याला फार मोठे संशोधक व्हायचे होते. आपल्या डोक्यातले विचार प्रत्यक्ष सिद्ध करायचे होते. त्यामुळे तो चंदाला दाद देत नव्हता.
एकेदिवशी होस्टेलवर रूमवर आम्ही दोघेही वाचत बसलो होतो. पण रोजच्या सारखे निलेश चे वाचनाकडे लक्ष दिसत नव्हते. तेवढ्यात त्यानेच मला हाक मारली, “अरे, प्लीज माझ्यासाठी दहा-पंधरा मिनिटे देतोस? मला फार महत्त्वाचे बोलायचे आहे तुझ्याशी.”
“हो, मी एका पायावर तयार आहे. काय रे निलेश? माझ्याशी गप्पा मारायला तुला विचारायची काय गरज? बोल बोल. काय चंदाचा विचार करतोस की काय ” मी उगाचच त्याला विचारले.
“अगदी बरोबर. चंदा चाच विचार करतोय मी. अरे, ही हट्टी मुलगी माझा पिच्छा सोडत नाहीये. आपली परीक्षा झाली की रिझल्ट लागेपर्यंत आपण होस्टेलवर या रूमवर राहू शकणार नाही. मी आमच्या गावातल्या बागेतच छोटी लॅब टाकून संशोधन सुरू करायचं म्हणतोय आणि त्यासाठी चंदाची मदत घ्यावी असे मी ठरवतोय. केवळ तेवढ्यासाठी तिच्या प्रेमाला होकार देणार आहे. लवकर लग्न करून मी तिला एक मोठी अट घालणार आहे. ऐकतोयस ना? लग्न झाल्यावर तिनं फक्त माझ्या बरोबर राहायचं. बाकी कोणाशीही बोलायचे नाही, भेटायचे नाही, अगदी तुला सुद्धा किंवा तिच्या स्वतःच्या आई-वडिलांना सुद्धा.”
“अरे पण का? ही कसली अट ?”मी एकदम न रहावून विचारले,”ती तयार होईल असली विचित्र अट मान्य करायला?”
“निश्चित होईल. “निलेश शांतपणे म्हणाला, ”ती तशी तयार नसेल तर मी तिच्या प्रेमाचा स्वीकारच करणार नाही ना.. जाऊदे. कुठे जायचे तिथं. करू दे कोणाशी लग्न. माझे काहीच बिघडणार नाही.”
अशी चिऊताई ला साद घालत जागे करणारी कविता, जीवनाचे सगळे टप्पे अनुभवत, नवरसांचे प्याले रसिकांना बहाल करत, विविध छंदांच्या आणि विविध वृत्तांच्या अलंकारानी कवितेला सालंकृत पेश करणारे कुसुमाग्रज..
त्याच वेळी …
“ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण!
बेताल नाचवी, सूत्रधार हा कोण?
मातीतच अंती त्याचेही निर्वाण?
स्वामित्व जगाचे अखेर अमुच्या हाती
मातीवर चढणे एक नवा थर अंती……”
असे सांगत माती हेच शाश्वत सत्य आहे, हे पटवून देणारी कविता लिहिणारे कुसुमाग्रज
अलौकिक प्रज्ञा, ईश्वरदत्त प्रतिभा, आणि चराचरातल्या प्रत्येक भौतिक आणि अभौतिकतेला स्पर्श करणारं तत्वज्ञान यांचं दैवी रसायन म्हणजे कुसुमाग्रज
नटसम्राट, ययाति देवयानी, कौंतेय, वीज म्हणाली धरतीला, यासारखी शतकानुशतके अजरामर रहाणारे नाट्यरेखन, सतारीचे बोल, फुलवाली, काही वृद्ध-काही तरूण, छोटे आणि मोठे असे असंख्य कथासंग्रह, रसयात्रा, विशाखा, किनारा, मराठी माती, स्वगत, हिमरेषा 100कविता असे हजारो कवितांनी भरगच्च असे कविता संग्रह. अशा विपुल लेखन संभाराने लगडलेला वृक्ष म्हणजे कुसुमाग्रज
कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचा अमृतस्पर्श झालेल्या काही जगन्मान्य अजरामर ओळी मनात कधी गुंजन करतात, तर कधी धीर देतात,
कणा –
“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन, तुम्ही फक्त लढ म्हणा”
अनामवीरा
“काळोखातुन विजयाचा ये पहाटचा वारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा”
नवलाखतळपती दीप
“नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणु नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ तेव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात”
प्रेम कर भिल्लासारखं
“प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुद्धा
मेघापर्यंत पोचलेलं”
नदी
“माय सांगे थांबू नका
पुढे पुढे चला
थांबत्याला पराजय चालत्याला जय”
समिधाच सख्या या
“समिधाच सख्या या
त्यात कसा ओलावा
कोठुनि फुलापरि वा मकरंद मिळावा
जात्याच रुक्ष त्या एकच त्यां आकांक्षा
तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा”
कोलंबसाचे गीत
“अनंत अमुची ध्येयासक्ती
अनंत अन आशा
किनारा तुला पामराला”
पृथ्वीचे प्रेमगीत
“परी भव्य ते तेज पाहून पुजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे ?
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे”
भाव- भावनांच्या अशा अलौकिक, परतत्वस्पर्शी शब्दांची गुंफण करून दिव्य भव्य दर्शन घडवणारे आणि रसिकांच्या अंतर्मनात चेतनाशक्ती जागवणारे स्फुल्लिंग म्हणजे कुसुमाग्रज
जीर्ण देवळापुढे* ही इतर कवितांच्या मानाने कमी प्रसिद्धी मिळालेली कविता.
“तशीच तडफड करीत राही
तेवत ती ज्योती
उजळ पाय-या करी,
जरी ना मंदिर वा मूर्ती”
अंधःकार दूर करणे आणि उजळत रहाणे हाच ज्योतीचा व तेवणा-या वातीचा धर्म. कुसुमाग्रजांनी हाच धर्म आयुष्य भर जपला. अनासक्त कर्मयोग्याचे कार्य त्यांनी आपल्या मनस्वी लेखनाने केले.
लीनता, वात्सल्य, करूणा यांचं बोलकं रूप म्हणजे कुसुमाग्रज, त्याचबरोबर करारी, ध्येयवेडे, विजिगीषू, क्रांतीचा जयजयकार करणारं दमदार आणि रांगडं रूप म्हणजे ही कुसुमाग्रज.
“शब्द बोलताना शब्दाला धार नको आधार हवा कारण धार असलेले शब्द मन कापतात, आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात.”असे नकळत संस्कार घडवणारे कुसुमाग्रज.
नटसम्राट मध्ये”सरकार, आपली मुलं वाईट नाहीत, वाईट आहे ते म्हातारपण”असं जीवनावर जळजळीत सत्य भाष्य करणारे कुसुमाग्रज.
कवी आणि लेखक म्हणून त्यांची थोरवी शब्दातीत आहे. ते माणसाच्या रूपातले महायात्री होते. ईश्वरदत्त मानवी जन्म घन्य झाला. अशा दिव्य कर्तृत्वापुढे सर्व सन्मान, सर्व गौरव नतमस्तक होऊन हात जोडून उभे राहिले. म्हणूनच मराठी साहित्यातील या चालत्या बोलत्या ज्ञानपीठाकडे “ज्ञानपीठ पुरस्कार”अदबीने शाल श्रीफळ घेऊन आला आणि माय मराठी धन्य धन्य झाली, आणि म्हणाली,
“मराठी मी धन्य धन्य,
धन्य जन्म सारा
अढळपदी अंबरात
कुसुमाग्रज चमकता तारा”
कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा मराठी भाषा दिन म्हणून अभिमानाचा ठरला आहे.
कुसुमाग्रज आणि माय मराठी ला मराठी मनाचा मानाचा मुजरा ll
(कवी कुसुमाग्रजांच्या दोन चारोळयांवर आधारित ललितबंध)
गतकाळाच्या काही कटू काही गोड आठवणींचं स्मरण वारंवार होणं हे स्वाभाविकच आहे. गेला क्षण पुन्हा येत नाही ही गोष्ट शाश्वत असली तरी गोड क्षणांच्या स्मरणाने मन मोहरून जातं हे नक्की !
कटू क्षणांच्या आठवणी पुन्हा एकवार काळीज हेलावून सोडतात, पण त्या क्षणांसोबतच आपण आपल्या अनुभवाची शिदोरी बांधलेली असते, हे आपण विसरत नाही.
प्रत्येकाचं आयुष्य कधी इंद्रधनुष्यासारखं अनेकविध रंगांनी रंगून जातं तर कधी त्याच आयुष्यावर काळया मेघांचं सावट येतं.सुखाला दुःखाची झालर असते आणि दुःखाला सुखाची आस !
‘प्रेझेंट इज प्रेझेंट’ हे स्वीकारत चाललेलं आयुष्य एकाएकी ढवळून निघतं.एखादा दिवस असा उभा ठाकतो की आपण भूतकाळाचा चलत चित्रपटच पाहतो आहोत की काय अशी शंका यायला लागते. स्वतःच स्वतःला चिमटा काढून जागं करावं लागतं. हे खरंच घडतंय का? अशी शंका येत असतानाच….
वास्तव एखाद्या प्रेझेंट सारखं प्रेझेंट मध्ये आलेलं असतं.त्या स्वप्नवत घटनेला स्वीकारायला लागतं. प्रियजनांच्या याच भावनेतून कुसुमाग्रजांना हया दोन चारोळ्या सुचल्या असाव्यात….
सहज जाता जाता मला गवसलेल्या त्यांच्या या दोन चारोळ्या म्हणजे दोन क्षण आहेत असं मला जाणवलं.
पहिली चारोळी….
भेट जाहली पहिली तेव्हा
सांज पेटली होती
रिमझिम वर्षेतून लालसा
लाल दाटली होती.
पहिला क्षण पहिल्या भेटीचा! निरव, सुंदर, शांत अशी सांज ! या सांजवेळी झालेली ही पहिली भेट. ‘दोनो तरफ आग बराबर लगी है!’ असं वर्णन व्हावं असा तो क्षण…त्या क्षणाची आठवण तितकीच धगधगीत!
रिमझिम बरसणाऱ्या वर्षेच्या आगमनानंतर तर त्या दोघांमधील एका अनामिक ओढीने ही भावना अधिकच दाटून आली. कुसुमाग्रजांनी ‘लाल लालसा’ या शब्दद्वयीतून ती व्यक्त केली आहे.केवळ अप्रतिम!!
स्वप्नात रंगलेला क्षण होता तो!
दुसरा क्षण दुसऱ्या चारोळीतला…
काळ लोटला आज भेटता
नदी आटली होती
ओठावर उपचाराची
सभा दाटली होती
हा क्षण होता….पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतरचा, वर्तमानातला, आजचा, आत्ताचा…..
अकस्मात दोघेही एकमेकांसमोर आले पण….
आंतरिक सुखाच्या अपूर्णतेची अस्पष्टशी एकही हाक त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यातून आल्याचा गंध या वातावरणात नव्हता. तेव्हाचा तो भावनांचा आवेग दोघांनाही जाणवला नाही. ‘नदी आटली होती’ या ओळीतून तो उद्धृत झाला आहे.
त्यांची स्मरण भेट त्यांना वास्तवाचं भान देत होती. ‘काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही अशी दोघांचीही अवस्था ! नीरव शांततेत दोघेही निशब्द!!
ओळख असूनही अनोळखी असल्याचा भास होत होता त्यांना !उपचार म्हणून बोलणं इतकंच उरलं होतं. औपचारिक शब्दच दोघांच्या तोंडून येत होते.
वास्तवाचं भान असणारा क्षण होता तो!
माझ्या वाचन प्रवासाच्या सुरम्य वाटेवर स्वप्न आणि वास्तवाचं भान देणाऱ्या या चारोळ्या सांडल्या होत्या.
प्राजक्ता सारख्या त्या मी वेचल्या आणि माझी रिती ओंजळ मी भरुन घेतली. फुलं सांडून रितं होणाऱ्या त्या प्राजक्ताचे मी आभार मानले. तो प्राजक्त म्हणजे अर्थात कवी ‘कुसुमाग्रज’ पुन्हा फुलांनी डवरुन पुन्हा माझी ओंजळ भरायला तयार असणारा असा तो प्राजक्त!….
शिक्षा – एम. ए(शिक्षण शास्त्र), एम. ए. (इतिहास), बी. एड.
प्रकाशन – विविध वर्तमानपत्र वा मासिके यात कविता. ले, सामाजिक विषयावरील पत्रे प्रसिद्ध, काव्यलेखन, काव्यवाचन, निबंध लेखन, यात 100 हुन अधिक बक्षिसे
विविध सामाजिक संस्थामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत.
जागतिक विज्ञान दिन निमित्त लेख
☆ विविधा ☆ विज्ञान शिक्षण: काळाची गरज ☆ प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे ☆
महाराष्ट्रातील बीड जिल्हात शुभम सपकाळचा करणी केल्याच्या संशयावरून खून असो या आंध्रप्रदेश चितूर येथील उच्चविद्याविभूषित आई वडिलांकडून स्वतःच्या दोन मुलीना ठार मारल्याची घटना असो अशा रोज घडणाऱ्या विविध घटना जेव्हा आपण वाचतो या पाहतो तेव्हा मनाला अतिशय वेदना होतात.खरचं आपण 21व्या शतकात आहोत का हा प्रश्न पडतो. माणूस इतका निर्दयी कसा होतो? त्याला पुढील परिणामाची भीती कशी वाटतं नाही? तथ्यहीन गोष्टीवर कसा विश्वास ठेवतो? साधी पायाखाली आलेली मुंगी ही आपण मुद्दामहून मारत नाही. येथे तर जिताजागता जीव मारायला काहीच कसं वाटतं नाही?
अशावेळी आपली प्रगती, सारा झगमगाट, तंत्रज्ञान असून काय उपयोग असं वाटतं. आपण एक लहानगा जीव वाचवू शकत नाही तर काय उपयोग या सगळ्याचा.नरबळी, करनी, भोंदूगिरी, पुंर्जन्म, नवस, भूतबाधा, पैशाचा पाऊस, भानामती असे एक ना अनेक प्रकार आज ही राजरोसपणे सुरु आहेत. अशावेळी एक जागरूक नागरिक म्हणून आपल्या सर्वांना विज्ञानजागृतीच फार मोठं कार्य करावे लागणार आहे. विज्ञान हे काळाची फार मोठी गरज बनले आहे.वैज्ञानिक दृष्टीकोन समाजात निर्माण व्हावा यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे,
डॉ नरेंद्र दाभोळकर म्हणतात आपण विज्ञानाची सृष्टी घेतली पण दृष्टी घेतली नाही.आपण विज्ञान तंत्रज्ञानाने उपलब्ध केलेल्या सर्व सुखसोई घेतल्या त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला पण आपली मानसिकता, विचार करण्याची पद्धत बदलली नाही. आधुनिक तंत्र अविष्कार म्हणून आपण घरी संगणक आणतो, विविध उपकरणे आणतो आणि कुणाची दृष्ट लागू नये म्हणून दाराला लिबू मिरची टांगतो म्हणजेच आपले हे वागणे दुट्टपीपणाचे आहे. भारतीय घटनेच्या भाग 4 अ मध्ये कलम 51 अ नुसार नागरिकांची 10 मूलभूत कर्तव्य दिली आहेत त्यातील प्रत्येक भारतीय नागरिकाने वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासणे हे एक महत्वाचे मूलभूत कर्तव्य आहे. आपल्या येणाऱ्या पिढीला या बाबत आपण सजग केले पाहिजे. लहानपणापासून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन कसा जोपासता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. विज्ञान तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन हा फक्त पाठयपुस्तकाचा भाग न राहता तो आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. आपल्या प्रगतीचा राजमार्ग हा विज्ञानच आहे कारण विज्ञान हे प्रगतीशील आहे नम्र आहे. त्याला व्यक्ती, स्थळ,काळ याचे बंधन नाही त्यामुळे आपणास प्रगतीच्या दिशेने जायचे असल्यास विज्ञानाचा मार्ग हा उपयुक्त व लाभदायक आहे.कोणत्याही अतार्किक, बुद्धीला न पटणाऱ्या सांगिवांगीच्या गोष्टीवर किती विश्वास ठेवायचा याचा विचार आपणास केला पाहिजे. ज्याचा पुरावा आहे ज्याचा अनुभव सर्वांना घेता येतो अशाचा बाबीवर आपल्या बुद्धीला पटत असेलतरच विश्वास ठेवला पाहिजे. विनाकारण बुवाबाबाच्या नादी लागून कर्मवादी बनन्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीवर मेहनतीवर ज्ञानवादी, विज्ञानवादी बनूया.
श्रद्धां आणि अंधश्रद्धा यात एक पूसटशी रेष असते त्यामुळे कधी श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत होईल हे कळत नाही त्यामुळे नेहमी सजग राहून सारासार विचार करून निर्णय घेतले पाहिजेत. समाजात, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नेहरू विज्ञान केंद्र मुंबई, मराठी विज्ञान परिषद मुंबई, विज्ञान आश्रम पाबळ, अगस्त्य फौंडेशन मुंबई , कल्पना चावला विज्ञान केंद्र कराड या शासकीय वा बिगरशासकीय संस्था जोमाने कार्य करीत आहेत. चला तर आपण स्वतः पासून सुरुवात करून विज्ञानाला आपला मित्र, मार्गदर्शक, बनवूया.
कविवर्य कुसुमाग्रज यांची ही अतिशय गाजलेली कविता; जिचे एक जाज्वल्य स्फूर्तीगीत झाले. शिवकालीन इतिहासातील एक घटना शब्दबद्ध करणारी ही नितांत सुंदर अशी कविता आहे. कुसुमाग्रजांना तेजाचे, समर्पणाचे अतिशय आकर्षण आहे.या आकर्षणातून व्यक्त झालेल्या त्यांच्या सर्वच कविता जणू झळाळणाऱ्या शलाकांसारखी स्फूर्ती गीते ठरल्या. त्यातीलच ही अतिशय बलशाली कविता आहे.
कवितेची सुरुवात होते छत्रपती शिवाजीराजांच्या पत्राने.रणात पाठ फिरवून पळालेल्या आपल्या सेनापतींना महाराज उपरोधपूर्ण; पण त्यांच्या पराक्रमाला चेतविणारे पत्र लिहितात. ‘रण सोडून पळून आलात. भर दिवसा रात्र झाली असे वाटले.अरे ‘पळून येणे’ हे काय मराठी शील झाले ? आपली जात विसरलात काय ?’
या पत्रातील प्रत्येक अक्षराने प्रतापरावांच्या वर्मावरच घाव घातला. ते त्वेषाने पेटून उठले. ‘काल रणात पाठ दाखविली. लढवय्या मराठी धर्म विसरलो. पण आज तळहाती शीर घेऊन शत्रू सैन्यावर तुटून पडतो ‘ असे म्हणत सहा सरदारांसह शत्रूवर तुटून पडले. ‘त्यांची भिवई चढणे’ ‘पटबंदाची गाठ तुटणे’ या शब्दातून वीररसाचा आविष्कार झाला आहे.
नाट्यात्मकता, दृश्यात्मकता हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कित्येक शतकांपूर्वीची ही घटना जणू आपण साक्षात अनुभवतो आहोत इतके नाट्य, इतकी वातावरण निर्मिती कविवर्य व्यक्त करतात. ही उत्कटता प्रत्येक कडव्या बरोबर वाढतच जाते.
‘खालून आग, वर आग,आग बाजूंनी’ या ओळींनी तिथल्या घनघोर युद्धाचे चित्र समोर उभे ठाकते आणि त्वेषाने लढता-लढता ‘खग सात जळाले अभिमानी वणव्यात’ ‘दगडावर दिसतील अजुनी तेथल्या टाचा | ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा’
या ओळी त्यांच्या पौरूषाचा आवेग केवढा प्रचंड होता याची साक्ष देतात. राजनिष्ठा, ध्येयनिष्ठा, वचनपूर्ती यासाठी त्यांनी केलेले हे समर्पण आहे. त्यांच्या झुंजार,पराक्रमी बलिदानाची ही गाथा. पण इथे पराभवाने सुद्धा विजयाची उंची गाठली आहे. अतिशय भावनिक,आवेशपूर्ण आणि लयबद्ध अशी ही कविता आहे. पुन्हा पुन्हा वाचावी अशी आहे. कुसुमाग्रजांनी या ऐतिहासिक घटनेचे हे काव्यशिल्प अजरामर केले आहे.
☆ रंगमंच ☆ नाटकावर बोलू काही: आनंद – स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
‘नटसम्राट’ या नाटकाचे लेखक आणि या नाटकासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले वि. वा. शिरवाडकर यांची ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘आनंद’, दूसरा पेशवा, ‘कौंतेय’, विदूषक, अशी आणखीही अनेक उत्तम नाटके आहेत. ही सारी नाटके बघू जाता, त्यांना नाट्यलेखनाचे सम्राटच म्हणायला हवं. ‘आनंद’ हे असंच एक उत्तम नाटक. या नाटकाचा पहिला प्रयोग, नाट्यसंपदा मुंबई या संस्थेद्वारे १८ ऑक्टोबर १९७५ रोजी साहित्य संघ मंदिर मुंबई इथे सायंकाळी ७ वाजता सादर करण्यात आला. पुढे या नाटकाचे किती प्रयोग झाले माहीत नाही. नाटकापेक्षा यावरचा चित्रपट अधीक गाजला पण एखादी कलाकृती किती वाजली-गाजली यावर काही त्या कलाकृतिचे मोल ठरत नाही.
‘आनंद’ नाटकाचे मूळ श्री हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ चित्रपटातलेच आहे. मरण समोर उभे असताना, एक मनुष्य, हसत-खेळत, प्रत्येक परिचितात स्वत:ला गुंतवून घेत, भोवतालच्या जीवनात सुखाच्या लहरी निर्माण करीत आपला अस्तकाल एका बेहोष धुंधीत व्यतीत करतो, ही कल्पना मला अतिशय हृद्य वाटली.’ असं सुरूवातीला, श्री हृषिकेश मुखर्जी यांचे आभार मानताना वि. वा. शिरवाडकर यांनी म्हंटले आहे. ‘कथासूत्र मूळ चित्राचेच असले, तरी त्याला नाट्यरूप देताना मी मला इष्ट वाटले, ते बदल त्यात केले आहेत. त्यामुळे पडद्यावरचेच सारे काही आपण नाटकात पाहात आहोत, असे प्रेक्षकांना अथवा वाचकांना वाटणार नाही, असा मला विश्वास वाटतो,’ असेही त्यांनी पुढे म्हंटले आहे.
‘आनंद’ नाटकात लेखकाने आनंद ही अफलातून व्यक्तिरेखा निर्माण केली आहे. नाटकातील डॉ. संजय सांगतो त्याप्रमाणे तो थोडा कवी आहे. थोडा नट आहे. थोडा विदूषकही आहे. कवी असल्यामुळे तो खूपसा कल्पनेत रमणारा आहे. क्वीकल्पनानेकदा सत्याच्या अधीक जवळ जाते. आनंदचे बोलणेही तसेच आहे.
नाटकाचं थोडक्यात कथानक असं – डॉ. संजय आणि डॉ. उमेश मित्र आहेत. त्यांचा तिसरा मित्र डॉ. शिवराज नागपूरला आहे. तो आपला मित्र आनंद याला त्यांच्याकडे पाठवतो. आनंद हा खरं तर जगन्मित्र. त्याला लिफोसारकोमा इंटेस्टाईन हा दुर्धर आजार आहे. तो संजयकडे येतो. संजय, उमेशचा मित्र बनतो. मेट्रन डिसूझाचा मुलगा जोसेफ बनतो. मुरारीलाल किंवा महम्मदभाईचा, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड बनतो. संजायच्या बायकोचा भाऊ आणि उमेशच्या प्रेयसीचा राजलक्ष्मीचा दीर बनतो. मुरारीलाल्ला तो सरकारी कोट्यातून चित्रपट निर्माण करण्यासाठी कर्ज मिळवून देतो. डॉ. उमेशचं अबोल प्रेम मुखरीत करतो. आनंदची प्रेयसी मधुराणी नाटकात ३-४ वेळा आपल्याला भेटते. ३ वेळा त्याचा आठवणीतून आणि अगदी शेवटी वास्तवात. आनंदला आपल्या आजाराची कल्पना आहे, म्हणूनच त्याने तिला प्रत्यक्षात दूर सारलय पण मानाने ती त्याला बिलगूनच आहे.
आनंदचा स्वत:चा प्रयत्न आपलं दुर्धर आजारपण विसरण्याचा आहे पण त्याच्या जवळीकीच्या माणसांच्या डोळ्यात त्याच्या मृत्यूचा भय तरळताना त्याला दिसतय, त्यामुळे तो कासावीस होतोय. नाटकाची अखेर त्याच्या मृत्यूनेच होते पण त्यापूर्वी नाटकाचा एक भाग म्हणून केलेले स्वागत आणि शेवटी टेपवर म्हंटलेलं तेच स्वागत, अप्रतिम!
आनंद क्वीमानाचा आहे. त्यामुळे नाटकात अनेक सुंदर कवितांचा वापर झालेला आहे. इतकंच नव्हे, तर यातले गद्य संवादही काव्याचा बाज घेऊन येतात. ‘काही बोलायाचे पण बोलणार नाही,’ हे लोकप्रिय गाणं आणि
‘प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं
प्रम म्हणजे जंगल हून जळत राहणं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोचलेलं’
ही प्रसिद्ध आणि रसिकप्रिय कविता यातलीच.
नाटकाचं सूत्रगीत आहे,
माझ्या आनंदलोकात चंद्र मावळत नाही
दर्या अथांग प्रेमाचा कधी वादळत नाही.
माझ्या आनंदलोकात केले वसंताने घर
आंब्या आंब्याच्या फांदीला फुटे कोकिळेचा स्वर
सात रंगांची मैफल वाहे इथे हवेतून
इथे मारणही नाचे मोरपिसारा लेउन
नाटकाची भाषा भर्जरी वैभव मिरणारी, तिचा तलम, मुलायम, कोमल, हळवा पोत, या सार्यावर अत्तरासारखा विनोदाचा शिडकावा आणि मुख्य म्हणजे त्यातून व्यक्त झालेलं आनंदचं तत्वज्ञान, ’ उद्या येणार्या पाहुण्याच्या ( मृत्यूच्या) फिकिरीत माझी जिंदगी आज मी जाळून टाकणार नाही. मी असा जगेन की माझा जगणं क्षणाक्षणाला तुम्हाला जाणवत राहील. आषाढातल्या मुसळधार पावसासारखं…’ किती किती म्हणून या नाटकाची वैशिष्ट्ये सांगावीत!
एखाद्या नाट्यसंस्थेने नव्याने हे नाटक रंगांमंचावर आणायला हवं.वाचकांनी हे नाटक एकदा तरी वाचायला हवं आणि त्याचा सारा ‘आनंद’ आपल्यात सामावून घ्यायला हवा.
☆ रंगमंच ☆ नाट्यउतारा: आनंद – स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर’ ☆
आनंद
(आनंद नाटकातील आनंद आणि डॉ. उमेश म्हणजेच आनंदचा बाबूमोशाय, यांच्यातील एक संवाद)
आनंद: (रुद्ध स्वरात) बाबूमोशाय, कितीदा कितीदा मला आठवण करून देशील- की तुझं आयुष्य आता संपलं आहे. – शेवटाची सुरुवात झाली आहे. बाबूमोशाय, चांदयापासूंच नव्हे, तर माझ्या मरणापासूनही मी दूर आलो होतो. वाटलं होतं, तुम्हा लोकांच्या जीवनाच्या बहरलेल्या ताटव्यातून हिंडताना माझी आयुष्याची लहानशी कणिकाही डोंगरासारखी मोठी होईल. थेंबाला क्षणभर समुद्र झाल्यासारखा वाटेल. पण- नाही- बाबांनो- मरणाला मारता येत नाही. आपल्या मनातून काढलं तर समोरच्या डोळ्यात ते तरंगायला लागतं-तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात मी माझं मरण पाहतो आहे- पण बाबूमोशाय, तू म्हणतोस, ते खरं आहे. मी क्षमा मागतो तुझी – तुम्हा सर्वांची- इथं येऊन तुमच्या आयुष्यात असा धुडगूस घालण्याचा मला काहीही अधिकार नव्हता. – मी चुकलो- मी- मी – उद्या चांदयाला परत जाईन बाबूमोशाय-
उमेश: (उठून त्याचे खांदे धरून ओरडतो ) तू जाऊ शकत नाहीस, आनंद – माझ्या लाडक्या- तू आता कुठंही जाऊ शकत नाहीस- तू मरणार असशील तर इथे – माझ्या घरात – माझ्या बाहुपाशात मरणार आहेस-
आनंद: (हसतो.) भाबी घरात आल्यावर तुझे बाहुपाश मोकळे सापडले पाहिजेत मात्र –
ओ.के. बाबूमोशाय, ती – कविता- मैं टेप शुरू करता हूं.
उमेश: कोणती कविता ?
आनंद: शर्त
उमेश: एका अटीवर
आनंद: कोणत्या?
उमेश: नंतर तूही काही तरी म्हंटलं पाहिजेस. आपले दोघांचे आवाज एकत्र टेप करायचे. कबूल?
आनंद: कबूल. कर सुरुवात (टेप चालू करतो.)
उमेश: (कविता म्हणतो.)
एकच शर्त की
तुटताना धागे
वळोनिया मागे
पाहायचे नाही
वेगळ्या वाटेची
लाभता पायकी
असते नसते
म्हणायचे नाही.
वांझोटया स्वप्नांचा
उबवीत दर्प
काळजात सर्प
पाळायचा नाही
दिवा हातातील
कोणासाठी कधी
काळोखाच्या डोही
फेकायचा नाही.
उमेश: आता तू-
आनंद: पण मी काय म्हणू?
उमेश: काहीही. चल, मी रेकॉर्ड करतो.
आनंद: पण- (हसतो) हं, आठवलं. पण असं नाही- थांब – हं-
(उमेश टेप चालू करतो. आनंद युवराजाचा पवित्रा घेऊन उभा राहतो. तेवढ्यात काही लक्षात येते. तसाच मागे जाऊन एक चादर काढतो, डोक्याला गुंडाळतो आणि फुलदाणीतील फूल हातात घेतो. टेप चालूच असते. नंतर:)
आनंद: (नाटकी स्वरात ) बाबूमोशाय, बाबूमोशाय, – उद्या मी नसेन, पण आज आहे आणि आज इतका आहे अब्बाहुजूर, की उद्या मी असेन की नसेन याची मला चिंता वाटत नाही. उद्या येणार्या पाहुण्याच्या फिकिरीत माझी जिंदगी आज मी जाळून टाकणार नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत जगेन जहापनाह आणि असा जगेन की माझं जगणं तुम्हाला क्षणाक्षणाला जाणवत राहील. आषाढातल्या मुसळधार पावसासारखं. मरणावर मात करण्याचा हाच रास्ता आहे, हुजूर, ते येईपर्यंत जगत राहणं. मी जीवंत आहे तोपर्यंत तुम्हीच काय, जगातली कोणतीही सत्ता मला मारू शकत नाही. हा: हा: हा:!
(आनंद उमेशला मिठी मारतो. दोघेही गळ्यात गळा घालून खळखळून हसतात.)
वि. वा.शिरवाडकर यांच्या आनंद नाटकातील एक उतारा
– स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’
≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी द्वारा एक भावप्रवण कविता “युद्ध और विरोध नित लाते नई बरबादियॅा“। हमारे प्रबुद्ध पाठक गण प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे। )