सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ सावली…  ☆ सौ.मंजिरी येडूरकर

निसर्ग हा एक जादुगार आहे. त्याच्या कला त्याच्या लीला अगाध आहेत. फक्त पाहण्याची दृष्टी हवी. रोज उगवणारा सूर्य, त्याची रोज पृथ्वीवर येणारी किरणे! या किरणांच्या मार्गात एखादी वस्तू आली की, किरण थटतात त्यामुळे त्या वस्तूंची सावली पडलेली दिसते. एका साध्या सोप्या शास्त्रीय आधाराने स्पष्ट करण्याजोगी घटना त्यामुळे कधीच त्याचं कुतूहल वाटलं नाही.

पण ह्याच सावलीचं निरीक्षण केलं तर त्यात आश्चर्य  वाटण्याजोगी विविधता आढळते. प्रत्येक वस्तूची सावली निराळया प्रकारची असते. नारळाची सावली पाहिली की आईच्या पायाला घट्ट धरून मिठी मारणा-या बाळाची आठवण होते. असं वाटतं की ही सावली नारळाचे पाय घट्ट पकडते आहे. नारळानं तिला कितीही दूर ढकलंल तरी ती पाय सोडत नाही.

वेलीची सावली पाहिली की वाटतं जणू वेलीनं सावलीला अभयदान दिलं आहे. त्यामुळे हे निरागस बाळ खाली स्वच्छंदपणे नाचतयं बागडतंय. पण त्याचं वेलीपासून फार लांब जायचं धाडस होत नाही. त्यामुळे वेलीच्या आसपास खेळतंय. आंब्याची सावली निवांत पहुडलेली असते. सर्वांना सामावून घेणारी, शांत असते. हिच्या सावलीत शिरलं की इतकं सुरक्षित वाटतं की, आपल्याला आपल्या सावलीचंही भय रहात नाही. चिंचेची सावली कशी भेदरलेली, घाबरलेली आहे असं वाटतं. तिचं अस्तित्व इतकं अस्पष्ट असतं की वाटतं ती पळून जाण्यासाठी मार्ग षोधतेय पण तिला मार्ग सापडत नाहीय. तिला मोठयांदा ओरडावं असं वाटतयं पण आवाज फुटत नाहीय. एखाद्या झुडपाची सावली कशी अस्तित्वच हरवल्यासारखी, असून नसल्यासारखी!

माणसाची सावली मात्र दिवसभरात निरनिराळी रूपं घेऊन येते. सकाळी उगवत्या सूर्याबरोबर नव्या आशा, नवा उत्साह घेऊन येते. त्यावेळी सावली किती तजेलदार दिसते. आपली सोबत करते, दिलासा देते. पण दुपारच्या भयाण शांततेत कुणाची तरी सोबत हवी असं खूप वाटत असतं, त्यावेळी नेमकी गायब होते. आपल्याला एकटं सोडून! संध्याकाळी थकलेल्या निराश झालेल्या मनाला दिलासा द्यायचा सोडून लांब निघून जाते भरकटत, त्या मनासारखीच! आणि उदास करून जाते. काळोख्या रात्री घाबरलेलं मन नकळतच आसपासच्या आवाजांचा, हालचालींचा कानोसा घेत असतं, आणि त्यांना अचूक टिपण्याचा प्रयत्न करत असतं. त्यावेळी ही नको असणारी सावली हळूच येते आणि भिती दाखवून जाते. एकटेपणाची जाणीव कुठेतरी खोल रुतवून जाते.

अशी ही सावली तिचे अनेक आकार, अनेक रूपं. कांही मनाला भावणारी, तर कांही मनाचा थरकाप करणारी! सांगून, पाहून, वर्णन करून न संपणारी!!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments