सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

🌸 विविधा  🌸

☆ खेळताना रंग बाई होळीचा…सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

(होळी – अध्यात्मिक सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून या विषयीचा लेख.)

ऋतू वसंत आलेला

मास फाल्गुन सजला

रंग रंगीला गुलाल

माझ्या मनात रुजला

फाल्गुन म्हणजे गुलाल, गुलाल म्हणजे ऐश्वर्याचे, प्रेमाचे व त्यागाचे प्रतीक. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी, फाल्गुन वद्य प्रतिपदेला धुलीवंदन व फाल्गुन वद्य पंचमीला रंगपंचमी असे म्हणतात. असा पाच दिवस चालणारा हा सण वर्षभर झालेल्या कामाचा ताण नाहीसा करून नूतन वर्षाचे स्वागत करण्यास उत्साह निर्माण करून देण्याचे काम करतो. या सणाला महाराष्ट्रात “शिमगा” व “होळी” तर उत्तर प्रदेशात “होरी” असे म्हणतात. ओरिसात भगवान श्रीकृष्णाला पाळण्यात घालून झोका देतात. फाल्गुन शुद्ध १३ ते १५ अशा तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाला ते “दोलोत्सव” म्हणतात. बंगाल प्रांतात “दोलायात्रा” तर दक्षिणेत “कामदहन” या नावाने संपन्न होणाऱ्या फाल्गुन पौर्णिमेला काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत.

अध्यात्मिक दृष्टीकोन

या घटनांमुळे होळीला अध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले.

१) भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपुने बहीण होलीकेला आमंत्रित केले. मी तुला जाळणार नाही असा अग्नीने होलीकेला वर दिला होता. हिरण्यकश्यपुने प्रल्हादाला होलीकेसह चितेवर बसवून ती पेटवली त्यात होलिका भस्म झाली कारण तिने मिळालेल्या वराचा दुरुपयोग केला होता. प्रल्हाद सुरक्षित राहिला त्यामुळे लोकांना आनंद झाला त्याची स्मृती म्हणून लोक होळी पेटवतात.

२) रामाच्या राज्यात ढुंढा नावाची राक्षसीण होती “जर तू निष्पाप लोकांचा छळ केलास व ते तुला निंद्यवचने बोलली तर तुझी शक्ती क्षीण होईल”. असे ब्रह्मदेवांनी सांगितले. ढुंढा राक्षसीण लहान मुलांना पळवून ठार मारत असे तेव्हा लोकांनी तिला पळवून लावण्यासाठी होळी पेटवली व तिच्याभोवती दोन्ही हाताने बोंब ठोकून अपशब्द वापरले ढुंढा राक्षसीण पळून गेली. त्या आनंदा प्रित्यर्थ पेटविलेल्या होळीत पाणी ओतून लोकांनी ती राख एकमेकांच्या अंगावर शिंपडून फाल्गुन वद्य प्रतिपदेला धुळवड साजरी केली.

३) कंसाज्ञेने आलेल्या पुतना राक्षसीचे स्तनपान करून श्रीकृष्णाने तिचा वध केला तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. आपला लाडका कृष्ण सुखरूप राहिल्याचा आनंद गोकुळातील लोकांनी पुतनेला जाळून, होळी पेटवून व्यक्त केला.

४) त्रिपुरा सुराचा मुलगा तारकासुर लोकांचा छळ करू लागला भगवान शंकराला होणाऱ्या मुलाच्या हातून तुझा नाश होईल असे ब्रह्मदेव तारकासुराला म्हणाले तेव्हा शंकर ध्यानमन अवस्थेत होते त्यांचा ध्यानभंग करण्यासाठी मदनांनी सोडलेल्या मदनबाणामुळे शंकरांनी मदनाला भस्म केले तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता.

५) या दिवसाला महत्त्व आहे कारण श्रीराम आणि सुग्रीवाची भेट याच फाल्गुन पौर्णिमेला झाली.

६) होळीमध्ये रंग खेळताना भांगेची सेवन केले जाते त्यामागे एक अध्यात्मिक कथा आहे समुद्रमंथनाच्या वेळी शंकरांनी जेव्हा विष प्राशन केले. तेव्हा त्यांच्या अंगाची लाही लाही होत असताना त्यांनी भांग पिली भांग ही वनस्पती थंड असल्यामुळे त्यांचा दाह कमी झाला म्हणून वाढत असलेल्या उष्ण दिवसांमध्ये होळी हा सण येतो आणि उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी या उत्सवात खास करून भांग पिली जाते.

सांस्कृतिक दृष्टीकोन

आपली भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे. बाराही महिन्यामध्ये होणारे सणवार याला सांस्कृतिक महत्त्व आहे. निसर्गातील सर्व चांगल्या गोष्टींना आत्मसात करून त्याचे संगोपन व संवर्धन करायला लावणारी आपली श्रेष्ठ संस्कृती आहे.

पूर्वीच्या काळी चुलीवर स्वयंपाक करावा लागे. दुसरे कुठलेच ईंधनाचे साधन नव्हते घरोघरी गाई गुरे असत. त्यामुळे दही दूध घरोघरी असावयाचे तसेच गाई गुरांच्या शेणापासून गोवऱ्या लावल्या जायच्या. त्या उन्हाळ्यात वाळवून त्याचा साठा करण्यासाठी एक शेणाचा ‘उडवा’ रचला जायचा(उडवा म्हणजे मधे गोवऱ्या गोल रचून गोलाकार त्याला शेणामातीने लिंपले जाई व पावसात भिजू नये म्हणून पूर्ण बंद केले जाई.अगदी एखाद्या छोट्याशा डेरेदार झोपडी सारखे ते दिसत असे त्याला गोवऱ्या काढण्यासाठी पुढच्या बाजूने एक माणूस आत जाईल असे तोंड ठेवले जाई.त्याला उडवा म्हणत.)अजूनही ग्रामीण भागात हे पहायला मिळते.त्यामध्ये त्या गोवऱ्या सुरक्षित ठेवल्या जायच्या. पावसाळा सुरू झाला की लाकूड मिळत नसे किंवा सर्व ओले असे त्यामुळे या गोवऱ्यांचा स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापर केला जायचा. त्याची तयार होणारी राख तिचा वापर भांडे घासण्यासाठी व्हायचा, किती ठिकाणी तर दात घासण्यासाठी देखील या राखुंडीचा वापर व्हायचा. झाडाच्या आळ्यामध्ये ही राख घातली जायची आणि त्यामध्ये नवीन बिया लावल्या जायच्या जेणेकरून नवीन रोपे लवकर तयार होतील हा उद्देश त्यामध्ये असायचा. होळीसाठी खास मुले घरोघरी जाऊन “होळीच्या गोवऱ्या पाच पाच गोवऱ्या नाही दिल्या तर…..”असे म्हणून बोंब मारतात. या जमवलेल्या गोवऱ्या पानगळ झालेली सारी पाने गोळा करून त्याची होळी पेटवली जाते. दुसऱ्या दिवशी याच होळीच्या राखेची धुळवड खेळली जाते ती राख एकमेकांच्या अंगाला फासली जाते.अजूनही होळीच्या राखे मध्ये. भोपळ्याचे वेल लावले जातात, कारल्याचे वेल लावले जातात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. पूर्वी कुठेही कधीही पुरणपोळी मिळायची नाही ती केवळ काही खास सणांना केली जायची त्यातलाच एक सण म्हणजे होळी. “होळी रे होळी पुरणाची पोळी”असे खास म्हटले जाते. पुरणपोळी खाण्यासाठी सर्वजण आतुरतेने होळीची वाट पाहायचे.

वैज्ञानिक दृष्टिकोन

आगीपासून जीव अर्थहानी होऊ नये म्हणून या दिवशी आमचे पूर्वज अग्नीची प्रार्थना करत अशा अनेक घटनांची स्मृती म्हणून हा उत्सव संपूर्ण भारतात संपन्न करतात होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तो नैवेद्य होळीत टाकून नारळ अर्पण करतात व होळीत दूध टाकून तिचे विसर्जन करतात दुसऱ्या दिवशी होळीच्या रक्षेला वंदन करून ती कपाळावर लावतात म्हणून या सणाला धुलिवंदन किंवा धुळवड असे म्हणतात फाल्गुन वद्य पंचमीला भगवान श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व स्त्री-पुरुषांना एकत्र करून रंगपंचमीचा उत्सव संपन्न केला होता जीवन अनेक रंगांनी नटलेले आहे ते आत्मविश्वासहीन नसावे ते सप्तरंगाने संगीताने व परस्परांतील प्रेम संबंधाने फुलले पाहिजे हा संदेश देण्यासाठी रंगपंचमी संपन्न केली जाते या मासातील पौर्णिमा व अमावस्या या तिथी १४ मन्वादी म्हणजे मन्वंतराच्या प्रारंभ तिथी आहेत दक्षिण हिंदुस्थानातील बहुसंख्य उत्सव या महिन्यात संपन्न केले जातात या पौर्णिमेला अशोक पौर्णिमा व्रत करतात या व्रतात पृथ्वी चंद्र व केशव यांची पूजा करतात गावातील तरुणांनी एकत्र जमून गाव स्वच्छ करून सर्व कचरा गोळा करावा व त्याची होळी करावी परंतु लाकडांची होळी करू नये म्हणजे वृक्षहानी न होता गाव प्रदूषण व रोगमुक्त होईल अशी प्रथा आहे.होळी किंवा रंगपंचमीला अंगावर थंडगार पाण्याचे रंग उडवले जातात यातून ऋतूबदलाचा सुंदर संदेश दिला आहे तो म्हणजे आता थंडी संपली आहे उष्णतेच्या काहिलीत गरम पाणी हे आरोग्यास अपायकारक असते म्हणून होळी नंतर थंड पाण्याने स्नान करावे.आपले पूर्वज खूप श्रेष्ठ होते प्रत्येक ऋतुमानानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी सणवार निर्माण केले व त्यानुसार आपण वर्तन केल्यावर आपल्याला वैज्ञानिक दृष्टीने प्रत्येक ऋतूचा आनंद घेता येऊ शकतो.

होळी जेव्हा रचली जाते तेव्हा त्याच्या मध्य भागात एरंडाच्या झाडाची मोठी फांदी ठेवली जाते. केवढा मोठा शास्त्रीय विचार आहे पहा याच्यामागे. एक कथा मी ऐकलेली येथे सांगावीशी वाटते. आफ्रिकेतील जंगलामध्ये काही लोक झाडे तोडून तेथे घर उभारण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या दिवशी तेथे लाकडाचे खांब उभे करतात, दुसऱ्या दिवशी येतात तर सगळे खांब अस्ताव्यस्त पडलेले असतात ते पुन्हा उभे करतात पुन्हा दुसऱ्या दिवशी अस्ताव्यस्त केलेले असते. पुन्हा उभे करतात आणि रात्री डबा धरून बसतात तर वानरांची एक टोळी येते आणि सर्व अस्ताव्यस्त करत असते तिसऱ्या दिवशी रात्री ते लोक तिथे खिरीचे भांडे ठेवतात आणि त्यामध्ये विष घालतात ठरल्याप्रमाणे वानरांची टोळी येते आणि त्या खिरीच्या भांड्या भोवती येऊन थांबते. त्यांच्यापैकी सर्वात वयस्क वानर येऊन त्या खिरीचा वास घेते व नंतर जंगलात जाऊन एरंडाचे लाकूड आणून खिरीच्या भांड्यामधून फिरवते आणि मग ती खिर ते सर्व वानरं खातात आणि त्या खिरीतील विष नष्ट झालेले असते आपल्याकडे होळीमध्ये ही एरंडाची फांदी ठेवण्याचे कारण म्हणजे होळी जेव्हा पेटवली जाते तेव्हा त्यामध्ये वेगवेगळे टाकाऊ पदार्थ वापरलेले असतात व नंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण त्याची धुळवड आपल्या अंगाला फासतात त्यामुळे त्याचा काहीही अपाय होऊ नये व त्यात एखादे विषारी द्रव्य असेल तर ते नष्ट व्हावे म्हणून एरंडाच्या झाडाची फांदी होळीमध्ये ठेवली जाते जेणेकरून त्याची राख त्या सर्व धूळवडीमध्ये मिसळली जाईल व कोणाला काही अपाय होणार नाही किती मोठा शास्त्रीय दृष्टिकोन यामागे आहे पहा.

समाजात जसे चांगले लोक असतात तसेच वाईट प्रवृत्तीचे देखील लोक असतात. मानवी मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल जर वाईट भावना असतील तर तो त्या कोणासमोर बोलून दाखवू शकत नाही आणि मग ती प्रवृत्ती मनामध्ये कुठेतरी घर करून राहते ते वाईट विचार मनातले बाहेर पडावेत म्हणूनही होळीची निर्मिती झाली असावी होळी समोर सर्वजण काहीही वाईट शिवीगाळ करू शकतात, बोंबाबोंब करू शकतात जेणेकरून मनातील अपप्रवृत्ती नष्ट होऊन मन स्वच्छ आणि निर्मळ होईल. एकूण काय माणसाला मन मोकळे करण्यासाठी या होळीची निर्मिती झाली असावी.

होलीकोत्सवा मागची ही मानसशास्त्रीय बैठक आहे हुताशनी हे तिचे नाव अर्थपूर्ण आहे हुत म्हणजे हवन केलेले आणि अर्पण केलेले आणि अशनी म्हणजे खाऊन टाकणारी आपल्या दुर्भावना होळीत अर्पण केल्या तर ती त्या खाऊन टाकते असा भाव. फाल्गुन पौर्णिमा वर्षाची शेवटची पौर्णिमा यानंतर जी पौर्णिमा येते ती नव्या वर्षातील पौर्णिमा म्हणून या वर्षातील शेवटच्या पौर्णिमेला मनातील दुष्ट भावना ओकून होळीमध्ये टाकाव्यात हाच या उत्सवा मागचा मूळ हेतू असावा.

आयुर्वेदात सांगितले आहे जिथे जिथे डाळी शिजवून वापरल्या जातात तिथे साजूक तूप नाजूकपणे वापरायचे नाही म्हणजे सढळ हस्ते पोळीवर घ्यावे म्हणजे डाळीने वाढणारे पित्त कमी होते पण तुपाने कोलेस्ट्रॉल वाढेल याचे काय? त्यासाठी आपण करतो कटाची आमटी या आमटीतील काळा मसाला, कढीपत्ता, तमालपत्र इत्यादी कोलेस्ट्रॉल कमी करते.आहे की नाही वैज्ञानिक दृष्टिकोन.

आहे होळी

खा पुरणपोळी

वाटी तुपाची

आमटी कटाची

नका करू काळजी

आरोग्याची

फक्त पूर्वजांचे ऐकावे सारे

जीवनात येईल सुखाचे वारे

असीम प्रेमाचे महत्त्व श्रीकृष्णाने वृंदावनात राधिकेसोबत रास करून होळी खेळली आणि सर्व जगाला पटवून दिले. जगात प्रेम ही भावना नसेल तर माणूस सुखाने आयुष्य जगू शकणार नाही त्याच्या आयुष्यात कुठेतरी प्रेमाचा ओलावा हा असलाच पाहिजे हा गोड संदेश श्रीकृष्णांनी गुलाल उधळून,रास खेळून साऱ्या जगाला करून दिला.

 © सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
2 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments