सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? वाचताना वेचलेले ?

☆ राम राम माझ्या लाडक्या भाच्च्यांनो ! – ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

धर्माची आवश्यकता समाजाला का असते, हे सांगणारी घटना तुम्हा भावंडांना, तुमच्या मित्रांना योग्य वयात अनुभवायला मिळाली. 

माणूस उत्सवप्रिय प्राणी आहे, हे आपल्या पूर्वजांनी चांगलं जाणलं. आणि त्या उत्सवाला धांगडधिंग्याचं स्वरूप न येऊ देता कलागुणांच्या, सद्गुणांच्या उत्कर्षाचं स्वरूप यावं यासाठी पायंडे घालून दिले. नियम केले. श्रद्धेची चौकट घालून दिली. 

तुम्ही आत्ता पाहिलंच असेल.. पुण्याहून १५००+ किमीवर आणि बेंगळुरूहून १९०० किमीवर असलेल्या श्रीराममंदिराच्या निमित्ताने तुमच्या सोसायटीत कितीतरी कार्यक्रम झाले. इतके लोक एकत्र आले. कुठेही खाण्यापिण्यावर भर नव्हता. पिण्याचा तर प्रश्नच नव्हता. खाण्यासाठी कुणीही कुठेही एखादा प्राणी, पक्षी, अगदी त्याचं अंडंसुद्धा मारलं नाही. नेहमीच्या कार्यक्रमांमधे येणाऱ्यांना खूश करणे हा एक मुख्य हेतू असतो. इथे तसं काही नव्हतं. जो तो त्याला करावंसं वाटतंय, म्हणून सहभागी होत होता. त्याचे काहीही लाड होणार नाहीत, हे पक्कं माहित असूनसुद्धा. विचार करून पहा आपल्या मनाशी.. आत्तापर्यंत झालेले कार्यक्रम आणि हा कार्यक्रम यात काय काय फरक होता ते. 

कितीतरी जणांनी आपल्यातल्या कला जोपासल्या. सुंदर रांगोळ्या, दीपोत्सव, काव्य, गायन, वादन, नृत्य, जी जी म्हणून कला श्रीरामचरणी अर्पण करता येईल ती जे कलाकार आहेत त्यांनी केली. कल्पकता वाढीला लागली. आणि प्रत्येकाने ती “इदं न मम (हे माझं नाही), श्रीरामाय स्वाहा (श्रीरामाला अर्पण)” अशा भावनेनं सादर केली. किती लाईक्स, किती कौतुक हे विषय मागे पडले. करण्यातला आनंदच सुखावणारा ठरला. जाणवलं का तुम्हाला ते? 

जे कलांचा आस्वाद घेत होते तेही अती चिकित्सकपणा, कुचकटपणा करत नव्हते.. सगळ्यांना सगळ्यांचं कौतुक.. ही किती गोड गोष्ट होती ना?

याचं कारण म्हणजे या सगळ्याच्या केंद्रस्थानी मर्यादापुरुषोत्तम श्रीराम होता. त्याच्या चरित्रातच एवढी प्रेरणा आहे की ७००० वर्षांनीही लोकांना चांगलं जगण्याची तो प्रेरणा देतोय. म्हणूनच तो जरी हाडामांसाचा एक माणूस असला तरी एक राजा म्हणून विष्णूचा अवतार मानला गेला, आणि देवत्व पावला. इतका चांगला माणूस म्हणजे देवाचाच अवतार, अशी लोकांची भावना आजही आहे. मुळातच हिंदू धर्म प्रत्येक सजीव गोष्टीत, ज्यांच्यात चैतन्य (energy) आहे त्या सर्वांमध्ये असलेलं ते चैतन्य म्हणजे दैवी (divine) शक्ती मानतो. जे चांगले असतात, त्यांच्यात ती शक्ती अधिक. म्हणून आपण आज आहोत त्यापेक्षा अधिक चांगले होण्यावर हिंदू धर्माचा भर आहे. आपल्यातला सर्वोत्तम कोण? तर हा मर्यादापुरुषोत्तम श्रीराम ! 

या उत्सवाआधी कित्येक जणांना ही काळजी होती की उत्साह उन्माद व्हायला नको.. हिंदूंनी अल्पसंख्यांकांना त्रास द्यायला नको. मी तरी अशा काही घटना ऐकल्या नाहीत. कारण उत्सव साजरा करणाऱ्या हिंदूंना त्रास द्यायला कुणी आलंही नाही. ही देखील एक खूप मोठी जमेची बाजू. यात जास्त सांगत बसत नाही कारण आता पुढच्या २-५ वर्षात तुम्ही सुजाण नागरिक बनाल, मतदान करायला पात्र ठराल. हा अभ्यास तुमचा तुम्ही केलेला बरा. तुम्हाला पडणारे प्रश्न बऱ्याच लोकांना विचारा. आणि तुमची मतं तुम्ही ठरवा. 

पण सर्वधर्मसमभाव हा हिंदूंचा सहजगुण आहे. या जगाला चालवणारी काही एक शक्ती आहे, आणि ती शक्ती वेगवेगळ्या रूपात प्रकट होऊ शकते. ज्याची त्याची त्या शक्तीच्या रूपाची कल्पना वेगळी असू शकते. अट एकच, त्या श्रद्धेनं माणूस सज्जन बनला पाहिजे. सुदृढ बनला पाहिजे. तसं असेल तर त्या माणसाच्या श्रद्धेचा आपण सन्मानच केला पाहिजे, हे हिंदूंच्या नसानसात आहे. तुमच्या आधीच्या पिढ्यांमध्येही हे आहे, आणि तुमच्यातही आहे. उद्या जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुमच्या पुढच्या पिढ्यांनाही हेच सांगाल. हीच आपली संस्कृती.

हे नेहमी लक्षात ठेवा.. आपण सज्जन तर असलेच पाहिजे. पण समर्थही असलं पाहिजे. त्यासाठीचा आदर्श म्हणजे प्रभू श्रीराम ! त्याचं चरित्र नक्की अभ्यासा !

पटलं तर तुमच्या मुलांना नक्की वाचायला द्या नाहीतर सोडून द्या

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments