वाचताना वेचलेले
श्रावणमास… कवी : संदीप मणेरीकर ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆
जरा जरासा अवखळ अवखळ
हवाहवासा मंगल सोज्वळ
लाजरा बुजरा हिरवा साजण
दारी आला श्रावण श्रावण //१//
जरा जरासा हिरवा हिरवा
अंगावरती शालू कोवळा
ठुमकत मुरकत मंगल पावन
दारी आला श्रावण श्रावण //2//
फुलाफुलांनी नटुनी सजुनी
रेशीम धारा भिजुनी किरणी
इंद्रधनूचे बांधून तोरण
दारी आला श्रावण श्रावण //3//
सणवारांचे अवीट भोजन
पावित्र्याचे सुंदर योजन
मांगल्याचे करी आवाहन
दारी आला श्रावण श्रावण //४//
अवखळ नटखट हवाहवासा
चंचल तजेला नवानवासा
अल्लड निरागस पांघरून
दारी आला श्रावण श्रावण //५//
कवी : संदीप मणेरीकर
प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈