सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 38 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
५९.
पानांपानांवर नाचणारा हा सोनेरी प्रकाश,
आकाशात तरंगणारे हे ढग,
माझ्या मस्तकाला थंडावा देत जाणारा हा वारा
हा सारा तुझ्या प्रेमाचा स्पर्श आहे.
प्रभात समयीचा हा प्रकाश
माझे डोळे काठोकाठ भरून टाकतो
आणि तुझा संदेश ऱ्हदयात भरून जातो.
माझ्या चेहऱ्यावर तुझा चेहरा
वाकलेला आहे,
तुझे डोळे; माझे डोळे निरखताहेत,
माझं ऱ्हदय तुझ्या चरणांवर वाहिलं आहे.
६०.
अंतहीन जगाच्या समुद्रकिनाऱ्यावर मुलं भेटतात.
त्यांच्या मस्तकावर स्तब्ध अफाट आकाश आहे.
खळखळणारं चंचल पाणी आहे.
अंतहीन जगाच्या समुद्रकिनाऱ्यावर
आरडाओरडा करत पोरं नाचतात.
वाळूची घरं बांधतात,शिंपल्यानं खेळतात.
वाळलेल्या पानांच्या नावा बांधून
हसत हसत खोल समुद्रात सोडतात.
जगाच्या किनाऱ्यावर पोरं खेळतात.
पोहायला,जाळी फेकायला त्यांना येत नाही.
मोती शोधणारे समुद्रात मोत्यासाठी बुडी मारतात.
व्यापारी त्यांच्या गलबतातून सागर सफर करतात.
पोरं शिंपले गोळा करतात, उधळतात.
समुद्रातील धन- दौलत त्यांना नको,
जाळी पसरणं त्यांना माहीत नाही.
सागर खळाळून हसतो, किनारा अंधुकसा हसतो.
पाळण्याच्या लहानग्याला
अंगाई गाणाऱ्या मातेप्रमाणं
लाटा निरर्थक व जीवघेणी कवनं गातात.
सागर मुलांशी खेळतो आणि
किनाऱ्याच्या अस्फुट हास्यात
प्रकाशकिरण चमकतो.
अंतहीन जगाच्या सागरकिनाऱ्यावर
मुलं खेळतात.
पंथहीन आकाशात वादळ घोंगावतं,
मार्गहीन सागरात जहाजं फुटतात, बुडतात.
दूरवर मृत्यूचं थैमान चाललंय.
किनाऱ्यावर पोरांची भव्य सभा भरलीय.
अंतहीन सागरावर पोरं खेळतात.
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈