डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग -४ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(डॉकी, चेरापुंजी आणि बरंच कांही!)

प्रिय वाचकांनो,

कुमनो! (मेघालयच्या खासी या खास भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

आज आपण डॉकी आणि चेरापुंजी येथे अद्भुत प्रवास करणार आहोत. झाली नव्ह तयारी! सोप्पंय! बॅग भरो और निकल पडो! 

डॉकी /उम्न्गोट (Dawki/Umngot) नदीवरील नयनरम्य नौकानयन

आम्ही सैलीच्या सुंदर “साफी होम कॉटेज” (Safi home cottage) चा निरोप घेतला अन पुढील प्रवासाला लागलो. मॉलीन्नोन्गपासून साधारण ३० किलोमीटर दूर डौकी (Dawki) कडे आम्ही निघालो. मुंबई ते गुवाहाटी हा प्रवास विमानातून केल्यानंतरचा मेघालयचा सर्व प्रवास आम्ही कारनेच केला, इथे रेल्वे नाही बरं का मंडळी! हे गाव मेघालयच्या पश्चिम जयन्तिया हिल्स जिल्ह्यात आहे. डॉकी(उम्न्गोट) नदीवर एक कर्षण सेतु (traction bridge) बनलेला आहे. १९३२ मध्ये इंग्रजांनी हा पूल बांधला. या नदीचे पाणी इतके स्वच्छ आहे की कधी कधी आपली नाव हवेत तरंगल्याचाच भास होऊ शकतो. इथले नयनाभिराम दृश्य अन नौकाविहार हेच प्रमुख आकर्षण! हे गाव भारत अन बांगला देशच्या सीमेवर आहे! नदी देखील अशीच विभागली गेली आहे. एकाच नदीवर विहार करणाऱ्या बांगला देशाच्या मोटर बोटी अन भारत देशाच्या नाविकांच्या वल्हवत्या साध्या बोटी! हा दोन्ही देशांना जोडणारा एक सडक मार्गी रस्ता! जातांना दोन्ही देशांच्या चेक पोस्ट दिसतात. डॉकी ही भारताची चेकपोस्ट तर तमाबील ही बांगला देशाची चेकपोस्ट!

मित्रांनो, या नौकाविहाराचे स्वर्गीय सुख काही आगळेच, हृदयात अन नेत्रात सकल संपूर्णरित्या साठवावे असेच,  नाविकाने हळू हळू चालवत नेलेली विलंबित तालासारखी डुलत डुलत सरकणारी नौका, आजूबाजूला नौकेला भिडून नितळाहून नितळ असे संगीतमय झालेले जलतरंग, दोन्ही काठांवर नदीला जणू घट्ट कवेत घेणारे वृक्षवल्लींचे हिरवे बाहुपाश! निर्मल नीर असल्याने त्यांची सावली हिरवीगार तर तिला लगटून निळ्याशार  किंवा मेघाच्छादित गहिऱ्या रंगाची सावली, मध्येच नदीच्या तळाचे वेगवेगळे पाषाण देखील आपली छटा उमटवत होते! थोडक्यात काय तर सिनेमास्कोपिक पॅनोरमा! कुठेही कॅमेरा लावा अन निसर्गाच्या रंगांची क्रीडा टिपून घ्या! मध्येच या सिनेमास्कोप सिनेमाचा इंटर्वल समजा हवं तर, छोटासा रेतीचा किनारा, तिथे देखील मॅगी, चिप्स अन तत्सम पदार्थांची सर्विस द्यायला एक मेघालय सुंदरी हजर होतीच! कोल्ड ड्रिंक कोल्ड ठेवण्याकरता नदीच्या किनारी छोटयाश्या फ्रिज सारखं जुगाड करणारा तिचा नवरा खासच! नदीकिनारी लहान मोठे पर्यटक सुंदर धोंडे (नाही तर काय!) किंवा दगड गोळा करीत सुटले. परतीचा प्रवास नकोसा होत होता. पण “नाविका रे” ला नाही म्हणता म्हणता त्याने नाव किनारी लावलीच.

टाइम प्लीज!!!      

प्रिय वाचकांनो समजा तुम्ही एक घड्याळ मनगटाला लावलय अन एक बघायला सोप्पं घड्याळ तुमच्या स्मार्ट फोनवर असणारच. तुम्ही जे सोपे असेल ते बघणार नाही का! मात्र तुम्ही बांगला देशच्या सीमेच्या आसपास फिरत असाल तर गम्मतच येते, आम्हाला स्थानिकांनी सांगितलं म्हणून, नाही तर वाद तर होणारच. बांगला देशचे (फक्त) घड्याळ आपल्या देशापेक्षा ३० मिनिटे पुढे आहे, अन आपल्या स्मार्ट फोनला (नको तेव्हा) जास्त स्मार्टनेस दाखवायची सवय आहेच! त्यानं त्या देशाचं नेटवर्क पकडलं की स्मार्टफोनचं घड्याळ पुढं, अन मनगटी घड्याळ आपलं इथलं टाइम सांगणार! तेव्हा अशा ठिकाणी (बांगला देशच्या सीमेच्या आसपास) भारताचे सुजाण अन देशभक्त नागरिक या नात्याने आपण मनगटी घड्याळाची मर्जी सांभाळा, अन स्मार्ट फोनला आवरा! आम्ही हा अनुभव बऱ्याच ठिकाणी घेतला. आणखीन गम्मतच (हायेच की) येते, बांगला देशच्या सीमेच्या अन आपल्या अंतराप्रमाणे स्मार्ट घड्याळ किती पुढे जायचे ते ठरवत असते!        

मेघजलसुंदरी चेरापुंजी! (इथल्या जनजातींमध्ये सोहरा हेच नांव प्रसिद्ध!) 

मेघालयाला भेट देतांना नयनरम्य चेरापुंजी हे पर्यटकांचे आकर्षण असणारच अशी याची ख्याती! शिलाँगपासून ५६ किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण म्हणजे अमोप धबधबे, कधी धुक्यात हरवलेले तर कधी ते विरळ झाल्यावर आपल्याला दर्शन देणारे! इथे वर्षभर जलधरांच्या मर्जीप्रमाणे अन त्यांच्या लयीप्रमाणे बरसणाऱ्या जलधारांचे नृत्य सुरूच असते! वृक्षवल्लींच्या हिरवाईच्या रंगात फुलांची बुट्टी, अशा श्रीमंत शाली पांघरलेले पर्वत असे निसर्गरम्य चेरापुंजी (सोहरा)! हे ठिकाण समुद्र सपाटीपासून १४८४ मीटर उंचावर आहे. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या चेरापुंजीने सर्वाधिक पाऊस झेलण्याचे विक्रम वेळोवेळी नोंदवले आहेत, गुगल गुरुजी वेळोवेळी याची माहिती देतच असतात!

आता या गावाच्या नावाबद्दल! १८३० सालच्या दशकात इंग्रजांनी सोहराला त्यांचे प्रादेशिक मुख्यालय बनवले होते, त्यांना यात स्कॉटलंडसारखे चित्र दिसत होते. वर्षा अन धुके यांनी हे छोटे गाव व्यापले होते, म्हणून त्यांनी या गावाला “पूर्वेकडील स्कॉटलंड” अशी उपाधी दिली. मात्र त्यांना याचे नाव उच्चारतांना भारीच त्रास व्हायचा! मग काय सोहराचे चेहरा/चेरा झाले, कोण्या बंगाली नोकरशहांनी त्यात पुंजो (म्हणजे पुंजका) अशी पुस्ती जोडली अन गावाचे नामकरण “चेरापुंजी” असे झाले. चेरापुंजीचा दुसरा अर्थ आहे संत्र्यांचे गाव. खासी लोकांना मात्र अर्थातच हे बदल मंजूर नव्हते, या नावाकरता बरीच आंदोलने झालीत. स्थानिक मंडळी या गावाला सोहराच म्हणतात. आश्चर्य म्हणजे इथे इतका धो धो पाऊस असूनही स्थानिकांना मात्र पेयजलाची ददात जाणवते. मित्रांनो, इथे सुद्धा मातृसत्ताक पद्धत आहे, स्त्रियांना स्वातंत्र्य आहे व त्यांनी विविध क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य हेच खासी स्त्रियांचे सक्षमीकरण होण्याचे मूळ आहे!

आम्ही चेरापुंजी येथे क्लीफ साइड होम स्टे (cliffside home stay) येथे दोन दिवस वास्तव्य केले. या घराच्या मालकीणबाई अंजना! त्यांचे यजमान गेल्यावर त्यांनी स्वबळावर मुलांना मोठे केले. अत्यंत कर्तृत्ववान, तडफदार व आत्मविश्वासाने भरपूर अश्या या अंजनाचे मला फार कौतुक वाटले. त्यांचे घर काँक्रीटचे, घराच्या ग्यालरीतून अन खिडकीतून चेरापुंजीच्या मेघाच्छादित अन धुक्याने कवटाळलेल्या परिसराचे अद्भुत दर्शन बघून डोळे तृप्त झालेत! याशिवाय त्यांनी एका रात्री स्वतः कष्टाने रांधून आणलेले गरम जेवण म्हणजे आमच्यासाठी “खासमखास” पाहुणचारच म्हणा ना! प्रिय अंजना, किती धन्यवाद देऊ तुला! फक्त दोन दिवसांकरता आलेल्या आमच्यासारख्या पर्यटकांसाठी तू दाखवलेला जिव्हाळा न विसरण्याजोगाच!               

मित्रांनो,चेरापुंजीच्या पावसाचा आनंद न्याराच! नेम नसणं हाच त्याचा स्थायी भाव. आम्ही मारे जरासे पावसाचे थेंब झेलून रेनकोट घातला की हा अदृश्य, अन ऊन आहे म्हणून छत्री किंवा रेनकोट न घेता बाहेर पडलो की हा बिनदिक्कत बरसणार| पाव्हण्यांची कशी खासी जिरली असा याचा आविर्भाव! मंडळी, मला वाटते, आपल्या पुणे येथील वेधशाळेतून याने स्पेशल कोर्स केला असावा! आम्ही इथे दोनच दिवस होतो, त्यात आम्ही सेव्हन सिस्टर्स फॉल्स Nohsngithiang Falls/Mawsmai Falls बघितले. सप्तसुरांसम दुग्धधवल धारा पर्वतराजींमधून कोसळत असतांना बघणे म्हणजे दिव्यानुभव! १०३३ फुटांवरून पूर्व खासी पर्वतरांगांतून धो धो वाहणारे हे जलप्रपात भारतातील सर्वाधिक उंचीवरून पडणाऱ्या धबधब्यांपैकी एक! मौसमयी गावापासून १ किलोमीटर दूर असून यांची खळाळणारी मस्ती बघावी पावसाळ्यातच, इतर वेळी हे जरा कोमेजलेले असतात, बरं का! आमचे नशीब थोर म्हणून ही निसर्गशोभा बघायला मिळाली. नाहीतर ऐन यौवनातली सौंदर्यवती “घूंघट की आड़ में” जसा मुखचंद्र लपवते तसे हे जलौघ (निर्झर) घनदाट धुक्याच्या आत लपतात, अन पर्यटक बिचारे निराश होतात. हा धुक्याच्या ओढणीचा लपंडाव आम्ही देखील काही काळ अनुभवला! (यू ट्यूब वरील विडिओ शेअर केलाय)

कॅनरेम धबधबा (The Kynrem Falls) पूर्व खासी पर्वत या जिल्ह्यात, चेरापुंजीहून १२ किलोमीटर अंतरावर आहे. थान्गखरांग पार्कच्या आत असलेला हा धबधबा उंचीत भारतातल्या धबधब्यातल्या ७ व्या क्रमांकावर आहे. हा त्रिस्तरीय जलप्रपात आहे, त्याचं पाणी 305 मीटर (१००१ फूट) उंचीवरून कोसळतं!  

प्रिय वाचकहो पुढील प्रवासात आपण चेरापुंजी आणि मेघालयातील इतर ठिकाणी अद्भुत प्रवास करणार आहोत. चालतंय ना मंडळी!!! 

तर आतापुरते परत एकदा खुबलेई! (Khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

टीप – लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेटवर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो आणि वीडियो (काही अपवाद वगळून)

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
2 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments