सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ संधीकाल… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

माॅर्निग वाॅकला बाहेर पडले की ट्रॅकवर विविध वयाची, विविध तऱ्हेची माणसं भेटतात.तसाच तिथला निसर्ग ही वेळ काळानुसार बदलता दिसतो. 

अत्ता अत्ता पर्यंत हिरवेगार दिसणारे वृक्ष शिशिराच्या पानगळतीमुळे कसे उघडे बोडके दिसू लागले ते लक्षातच येत नाही. गुलमोहराची लांब लांब छोट्या छोट्या पर्णिका असलेली पाने चवऱ्या ढाळत असतात तर त्यावरील वाळलेल्या शेंगा तुटून खाली पडत असतात.त्यांच्यावर पाय पडला की कट्कन मोडतील इतक्या वाळक्या असतात. जणू निसर्ग कसा वाळत,सुकत चाललाय याची जाणीव करून देत असतात.

आंबा,फणस,वड यासारखी छाया आणि फळे देणारी झाडे जवळपास दिसत नाहीत,पण गुलमोहर,कॅकेशिया सारखी रंगीबेरंगी केशरी,जांभळी, गुलाबी रंगांची फुले असणारी झाडे मात्र रस्तोरस्ती दिसतात ! गंध नसला तरी त्यांची रंगांची विविधता डोळ्यांना सुखवते.थंडीची ऊब गेली रे गेली की सकाळच्या वेळी सूर्याचे आगमन प्रसन्न वाटते.इथल्या झाडांवर भारद्वाज आणि कोकिळा आपले अस्तित्व दाखवू लागतात.राखाडी रंगाच्या चिवचिव चिमण्या अंगणात दाणे टिपताना दिसत नाहीत पण चिमणीसारखाच एक छोटा पक्षी सगळीकडे झाडांवर दिसतो..

होळी जसजशी जवळ येते तसा निसर्गातील बदल अगदी स्पष्ट दिसायला लागतो. वाळकी झाडे, फांद्या होळीच्या ज्वाळेत टाकून सगळं वाईट नष्ट करून नवीन जगण्याला सुरूवात करावी त्याचेच हे प्रतीक म्हणजे निसर्गातील झाडेझुडपे असतात.

आता पंधरा दिवसांतच चैत्र येईल.चैत्राची सुरुवात म्हणजे सृजनाची चाहुल ! मग सुरू होईल खरा वसंतोत्सव ! रंगपंचमीला विविध रंग आणि पाणी उडवून उन्हाळ्याचे स्वागत केले जाते.सूर्याच्या वाढत्या झळांपासून संरक्षणासाठी निसर्ग आपल्याला छान फळे पुरवतो. कोकम, कैरी यांचे पन्हे शीतल असते तर कलिंगड, खरबूज सारखी फळे थंडावा देतात.आपली संस्कृती निसर्गाशी जोडलेली आहे हे तर माहिती आहे आपल्याला ! चैत्रामध्ये चैत्र गौरीची पूजा करून आपण तिचा उत्सव साजरा करतो. घराघरातून पन्हं, कैरीची डाळ करून हळदीकुंकू केले जाते.देवीला झोपाळ्यावर बसून झुलवले जाते.देवीची आरास करायची, गुलाब पाण्याचे सिंचन करायचे, वाळा, मोगरा घालून माठातील पाणी सुगंधित ठेवायचे … किती किती तऱ्हांनी आपण चैत्र वैशाखाचा वणवा सौम्य करण्याचा प्रयत्न करतो.

फाल्गुन पौर्णिमा झाली की पुढचे पंधरा दिवस म्हणजे संधीकाल वाटतो मला! उन्हाळ्याची सुरुवात आणि थंडीचा शेवट! सकाळचा गारवा अजून सुखद वाटतो.पहिल्यातून अजून मन बाहेर पडत असते, तर दुसऱ्यामध्ये अजून पदार्पण व्हायचं असतं! असा हा संधीकाल! मन आणि शरीर थोडे अस्थिर होणारच! नवीन वातावरणाला अनुकूल होण्यासाठी शरीरही थोडे कुरकुरत असतेच!

असा हा संधीकाल आयुष्यातही खूपदा डोकावतो. शाळा संपवून पुढील शिक्षणात पदार्पण करताना, शिक्षण संपवून नोकरी, उद्योगात प्रवेश करताना, गृहस्थाश्रम स्वीकारताना आणि नंतर संसारातून मुक्तता घेऊन ज्येष्ठत्त्व स्वीकारताना ! प्रत्येक स्थित्यंतराच्यावेळी थोडेतरी पाऊल अडखळतेच! मन ठेचकाळतं, पुढच्या आशा खुणावत असतात, मन मागेच रेंगाळत असते. असाही एक संधीकाल असतो. जो माणसाला सुखदुःखाच्या उंबरठ्यावर ठेवतो.त्यामुळे वाटते,संधीकाल म्हणजे हुरहूर लावणारा काळ! जो प्रत्येक क्षणाला लंबकासारखा हेलकावे असतो.कधी भूतकाळात तर कधी भविष्यात! वर्तमानाच्या उंबरठ्यावर क्षणभरच टेकतो तो, दोन्हीची सांगड घालीत!

निसर्ग हा नेहमी आशावादी असतो.पडलेल्या बी तून नवीन निर्माण करणारा! झाडाच्या वठत चाललेल्या खोडातही कुठूनतरी कोंब निर्माण करणारा! काही काळ तो सुप्तावस्थेत असेलही पण अनुकूल परिस्थिती येताच तरारून वर येणारा! निसर्गाचा चमत्कार वसंत ऋतूतील पालवीत दिसतो,गुलमोहराच्या केशरी फुलांत दिसतो, तर मोगरीच्या छोट्या कळीत दिसतो.

असा हा संधीकाल मी अनुभवते आहे.-निसर्गात आणि मनात! निसर्ग चिरंतन आहे.तो बदलत्या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे.त्याच्यापुढे आपण  तर नगण्य आहोत.छोट्या आयुष्यातले छोटे छोटे बदल स्वीकारताना सुध्दा संधीकालात अडकून पडणारे! पुढे पाऊल टाकू की नको या संभ्रमात असणारे! शेवटी प्रेरणा देणारा तोच आहे, त्यामुळे प्रत्येक संक्रमणात तोच आपल्याला अलगद नेतो.

या संधीकालातून पुढे नेणारा .. आपल्या प्रत्येक पावलावर आशेचा किरण दाखवणाऱ्या नियंत्याला नमन करून सकाळचे प्रत्येक पाऊल मला अधिक ऊर्जा देऊ दे अशी प्रार्थना करत मी सकाळची फेरी संपवते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments