सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘साठवणीतल्या आठवणी–’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते आणि प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे फक्त त्याचीच मालमत्ता असु शकते व त्यात कडू गोड आठवणींचा भरगच्च  खजिना असतो. कडू आठवणी मनाच्या तळाशी दाबल्या की मग वर येतो तो सुंदर आनंदी आठवणींचा    साठा. मग त्या आठवणींचा ठेवा दुसऱ्यांना वाटावासा वाटतो. अगदी तसंच झालं आहे माझं.   

महाशिवरात्र आली की वडीलधाऱ्यांच्या आठवणी उफाळून येतात. वडीलधारी काळाच्या पडद्याआड जातात आणि आपण पोरकं होतो. अकाली पोक्तपणा येतो.

प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो ‘तुझ्यापेक्षा मला तुझ्या आठवणीच जवळच्या वाटतात, कारण त्या सतत माझ्याजवळ राहतात.’ अशीच एक माझ्या आई -वडिलांची सुखद आठवण आठवली.

माझे मेव्हणे श्री. दत्तात्रय पंडित, पंजाबच्या गव्हर्नरांचे, श्री काकासाहेब गाडगीळ यांचे  P. A. होते. त्यांच्यामुळे पुणे ते चंदीगड अशा लांबच्या प्रवासाचा योग आला. त्यावेळी सोयीस्कर गाड्या नव्हत्या. प्रवासात दोन-चार दिवस जात असत.

माझे वडील ति. नाना, दत्तोपंत स. माजगावकर कट्टर शिवभक्त होते. रोज सोवळं नेसून त्यांनी केलेल्या पार्थिव पूजेचा सोहळा अवर्णनीय असायचा. दंडाला कपाळाला भस्माचे पट्टे लावून स्पष्ट मंत्रोच्चारांनी केलेल्या मंत्रध्वनीने शंखनिनादाने आमची प्रभात, सुप्रभात व्हायची. रोज महादेवाची सुबक पिंड तयार करून यथासांग पूजा करण्यावर त्यांचा कटाक्ष होता. 

तर काय सांगत होते! आमचा प्रवास सुरू झाला. पळणाऱ्या झाडांमधून सूर्याची सोनेरी किरणे आत आली तर कापराचा सुगंध नाकात शिरला. किलकीले डोळे विस्फारले गेले, कारण धावत्या गाडीत मांडी घालून प्रवासातही नेम न मोडता  नानांची पूजा चालू होती. शिवभक्त मंडळी सरळ मार्गी असतात. वाकडी वाट करून नेम मोडणं त्यांच्या तत्वात बसत नाही.

प्रवासातही आई -नाना पूजेच्या तयारीनिशी आले होते. नानांच्या पुण्यकर्माला आईची साथ होती. त्यावेळी लकडी पुलावर नदीकाठी काळीशार माती भरपूर असायची. आई अवघड लकडी पूल उतरून, नदी काठावरची काळी माती पिशवी भरून, खांद्यावरून आणायची. ती चाळणीने मऊशार चाळायची आणि देवघराच्या फडताळ्यात डब्यात भरून ठेवायची. देवाची तांब्याची उपकरणी लख्ख करण्याचं काम आम्हा मुलींकडे असायचं आणि त्याबद्दल आम्हांला बक्षीस काय मिळायचं माहित आहे? श्रीखंडाची गोळी. पण ती चघळतांना आमची ब्रह्मानंदी टाळी लागायची. आजकालची कॅडबरी पण त्याच्यापुढे नक्कीच फिक्की ठरेल.

तर त्या चंदीगड प्रवासात आईने काळ्या मातीचे बोचकंही बरोबर आठवणीने घेतलं होतं. आणि हो! काळीमाती भिजवायला पुरेसं घरचं पाणी फिरकीच्या तांब्यातून घ्यायला आई विसरली नव्हती. तेव्हा पितळीचे छान कडी असलेले तांबे प्रवासात सगळेजण वापरायचे. थर्मास चा शोध तेव्हां लागला नव्हता आणि प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या तर अस्तित्वातच नव्हत्या.

ति. नानांनी महादेवाची पिंड इतकी सुबक, इतकी सुबक बनवली की, रेल्वेच्या जनरल बोगीतली लोकं महादेवाची पिंड बघायला गोळा झाले. पार्थिव पूजा, मंत्र जागर, उत्तर पूजा पण गाडीतच झाली. सगळ्यांना इतकी अपूर्वाई वाटली. नानांच्या भोवती ही गर्दी झाली.

त्यावेळी रेल्वे डब्याच्या खिडक्यांना गज नव्हते. इतकी गर्दी झाली की एका पंजाबी ‘टीसी’ नें ही बातमी स्टेशन मास्तरला पुरवली. प्लॅटफॉर्मवर नानांची पूजा बघायला हा घोळका झाला.

योगायोग असा की कुणालातरी जवळच असलेलं बेलाचं झाड दिसलं.. गाडी सुटायला अवकाश होता. वयस्करांनी तरुणांना पिटाळलं. पटापट गाडीतून माकडा सारख्या उड्या मारून पोरांनी बेलाची पाने तोडली. भाविकांनी पिंडीवर मनोभावे वाहिली. भाविकांच्या श्रद्धेने छोटीशी पिंड हां हां म्हणता बेलाच्या पानाने झाकली गेली. 

रेल्वे डब्यात आपण चहा नाश्ता करतो ना त्या छोटेखाली टेबलावर ही पूजा झाली होती. गाडीच्या त्या जनरल बोगीला मंदिराचं स्वरूप आलं होतं. असा आमचा एरवी कंटाळवाणा वाटणारा प्रवास मजेशीर झाला. नंतर तर लोक नानांच्याही आणि जोडीने  आईच्या पण पाया पडायला लागले.   आई नाना अवघडले, संकोचले. आम्ही मात्र तोंडावर हात ठेवून हा सोहळा बघतच राह्यलो. खरं सांगु, तेव्हा तर माझे आई-वडिल मला शंकर-पार्वतीच भासले.

तर मंडळी, अशी ही भावभक्तीने भारलेल्या शिवभक्ताची ही आठवण कथा.

शिवशंभो  महादेवा तुला त्रिवार दंडवत. 

माझी सासरेही महा पुण्यवान  शिवभक्त होते. कारण महाशिवरात्रीलाच ते जीवा शिवाच्या भेटीला गेले. अशा या थोर वडीलधाऱ्यांच्या पूर्वपुण्याई मुळेच आपण सुखात आहोत नाही कां?

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments