सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – शुभ्र फुलांची ज्वाला – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

(१० फेब्रुवारी… थोर विदुषी दुर्गाबाई भागवत यांचा जन्मदिन… त्यानिमित्ताने त्यांच्या सहवासातील प्रसन्न आठवणी…)

ज्वालामुखीचा उद्रेक आणि बर्फासारखं शीतल व्यक्तिमत्व,तुम्ही कधी एकत्र पाहिलंय का? होय,मी केवळ पाहिलंच नाही, तर त्यातला प्रेमळ, खळखळ वाहणारा, नितळ, शुभ्र झराही अनुभवलाय. हिमालयाची उंची गाठलेलं हे व्यक्तिमत्व कोण बरं असेल? वयानं माझी आजी शोभेल,असं आमचं नातं जुळलं आणि हळूहळू आम्ही मैत्रिणीच बनून गेलो, हे माझं अहोभाग्य! ही मैत्रीण, अर्वाचीन काळातली गार्गी,मैत्रेयी-म्हणजे थोर साहित्य विदुषी दुर्गाबाई भागवत !

केवळ साहित्य विदुषीच नव्हे,तर दुर्गाबाई म्हणजे अखंड ज्ञानयज्ञ! स्वातंत्र्यसेनानी पासून ते स्वयंपाक, विणकाम, भरतकामापर्यंत कुठल्याही क्षेत्रात दुर्गाबाई अग्रेसर! अंगकाठी किरकोळ, क्षीण जरी असली तरी वयाच्या नव्वदीतही बाईंची कुशाग्रबुद्धी, तोंडात बोटच घालायला लावे. शरीर पेलवत नसतानाही,”आत्ता मी तुम्हाला व्यायाम करून दाखवू का?” म्हणून झटकन् उठायचा प्रयत्न करणाऱ्या दुर्गाबाई पाहिल्या, की त्यांच्या मनाचा अवखळपणा, उत्साह,अगदी लहान मुलासारखा अखेरपर्यंत टिकून होता, हे जाणवतं.

दुर्गाबाईंची ओळख झाल्यावर, त्यांची बरीच पुस्तकं वाचली. सध्या दुर्गाबाईंचं ‘दुपानी’ हे पुस्तक ५व्यांदा वाचतेय.परत परत वाचूनही कंटाळा येत नाही. कारण वाचताना, त्या प्रत्यक्ष समोर बसून बोलताहेत असंच वाटतं. मला त्यांचं लेखन ‘प्रांजळ’ तरीही सडेतोड, थेट मुद्द्याला हात घालणारं (आणि अंत:करणालाही) म्हणूनच चिंतनीय व विचार करायला प्रवृत्त करणारं वाटतं. दुर्गाबाई म्हणजे पी.एच.डी करण्यासारखाच विषय ! डॉ.मीना वैशंपायन, प्रतिभा रानडे यांसारख्या नामवंत  लेखिकांनाही त्यांच्यावर पुस्तक लिहावंसं वाटणं आणि लिहूनही बरंच काही सांगायचं उरलंय असं वाटणं, यातच सारं आलं.नव्वदीतही त्या अर्धमागधी भाषेतील ‘विशुद्धीमग्ग’चा वजनाला न पेलवणारा ग्रंथ मराठीत अनुवादित करत होत्या. त्यांचा नवनव्या गोष्टी करण्याचा, शिकण्याचा ध्यास पाहून आश्चर्य वाटतं.

बाईंचा ९० वा वाढदिवस त्यांच्या सुनबाई चारुताईंनी घरीच पण थाटात साजरा केला. त्यावेळी पत्रकार, टी.व्ही चॅनेल मंडळी जमली होती. अचानक बाईंनी मला, त्यांना आवडणारा संत एकनाथांचा अभंग गायला सांगितला. मी मनोभावे गायले. गाणे झाल्यावर बाईंनी कौतुकाने पाठ थोपटून माझा हात हाती घेतला, व थंडगार हात पाहून, उत्स्फूर्तपणे म्हणाल्या, “Cold from outside, Warm from inside…!”

समाजात श्रेष्ठ वा थोर व्यक्ती कोण, याची व्याख्या करायची तर, सहज सोपी व्याख्या म्हणजे, जी व्यक्ती आपल्या सद् गुणांमुळे, आजूबाजूच्या व समाजातल्या इतरांनाही घडवते; ती व्यक्ती थोर! माझ्या जडणघडणीत मला आदरणीय कुसुमाग्रज,इंदिरा संत,आणि दुर्गाबाई भागवत म्हणजे ‘ब्रह्मा,विष्णू,महेश’च वाटतात. तात्यासाहेबांनी (कुसुमाग्रज) प्रेमळ आज्ञा केल्याने, इंदिराबाईंच्या, शंकर रामाणींच्या व त्यांच्या स्वतःच्या कवितांच्या,’रंग बावरा श्रावण’ व ‘घर नाचले नाचले’ ह्या कॅसेट्स तयार झाल्या. प्रत्येक कवीचं व्यक्तिमत्व अभ्यासण्याच्या निमित्तानं, कविता व इतर साहित्याचंही भरपूर वाचन केलं गेलं. इंदिरा संतांनी तर मला अक्षरशः कवितेचं वेडच लावलं. या दिग्गजांच्या कविता गाता गाता एके दिवशी नवलच घडलं… शाकंभरी पौर्णिमेच्या पहाटे,दुर्गाबाईंना त्यांच्या वडिलांनी (स्मृतिदिनी) त्यांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. दुर्गाबाईंनी पहाटे चंद्रबिंब ‘अस्त’ होताना पाहून त्यांना स्फुरण आलं, ते असं –

|| देहोपनिषद ||

आयुष्याची झाली रात, मनी पेटे अंतर्ज्योत ||१||

भय गेले मरणाचे,कोंब फुटले सुखाचे ||२||

अवयवांचे बळ गेले,काय कुणाचे अडले ||३||

फुटले जीवनाला डोळे, सुखवेड त्यात लोळे ||४||

मरणा तुझ्या स्वागतास, आत्मा माझा आहे सज्ज ||५||

पायघडी देहाची ही, घालूनी मी पाही वाट ||६||

सुखवेडी मी जाहले, ‘देहोपनिषद’ सिद्ध झाले ||७||

आणि नेमकं त्याच दिवशी मी, दुर्गाबाईंना इतर नव्या कविता म्हणून दाखवायला गेल्यावेळी, त्यांनी त्यांची, ही ‘एकमेव’ कविता माझ्या ओंजळीत दिली, व म्हणाल्या; “यापूर्वीच्या मी केलेल्या कविता मला नावडल्याने, मी त्या फाडून, जाळल्या. परंतु या देहोपनिषदाला तू सुंदर चाल लावून, उद्या दूरदर्शनवरील माझ्या मुलाखतीत गावंस, अशी माझी इच्छा आहे.” ‘देहोपनिषद’ हे अभंगाचं नाव वाचूनच, माझे धाबे दणाणले! मरणाला असे ठणकावून सांगणारी बाईच पाहिली नाही मी! कविताही चालीत बांधायला प्रथमदर्शनी कठीण वाटली. परंतु दुर्गाबाईंची आज्ञा – नाही म्हणायची माझी प्राज्ञाच नव्हती. मी त्याक्षणी तरी हो म्हटलं व घरी पोहोचेपर्यंत संगीत दिग्दर्शनाची माझ्या ‘मनी अंतर्ज्योत’ पेटली! शब्दाशब्दाला न्याय देणारी,सुसंगत वाटेल अशीच चाल परमेश्वराने सुचवली…

दुर्गाबाईंनी माझ्या या पहिल्या पाऊलाचं, दुसऱ्याच दिवशी  दूरदर्शनवर “आता ‘नारददुहिता’ सुंदर गाणार आहे” म्हणून मोठ्या मनानं कौतुक केलं. बाळाचं पहिलं पाऊल पडलं आणि आत्मविश्वास आला की, त्याला जसे कुठे धावू आणि किती धावू असे पाय फुटतात, तशी मी – इंदिराबाई, कुसुमाग्रज, शंकर रामाणी, अटलजी, व्ही.पी.सिंग यांच्या, तसंच दुर्गाबाईंनी निवडलेले संत नामदेव, एकनाथांचे अभंग व इतर नवोदितांच्याही साठ एक कवितांना धडाध्धड चाली लावत गेले. अर्थात, प्रत्येक शब्दाला स्वरांनी न्याय दिला पाहिजे या निकषावर ! माझ्या लेखी, शब्दांमुळे सुरांना आणि सुरांमुळे शब्दांना अर्थ आला. केवढी भव्य नि सुंदर दृष्टी दिली दुर्गाबाईंनी मला ! या तिघांनीही मला कुबेराचं एक दालनच मोकळं करून दिलं, गर्भश्रीमंत केलं! हा खजिना, केवळ पुस्तकात न राहता, रसिकांसमोर सादर करण्याचं, कॅसेटद्वारे घराघरात पोहोचवण्याचं काम, नाशिकच्या भालचंद्र दातारांनी केल्यानं, दुर्गाबाईंनी त्यांचं खास अभिनंदनही केलं. तसंच माझी या परिवारातर्फे निघालेली पहिली ध्वनिफीत – ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ चे प्रकाशनही दुर्गाबाईंच्या शुभहस्ते झालं. त्यावेळी बाई सुंदर बोलल्या आणि गंमत म्हणजे, खच्च भरलेल्या सभागृहासमोर राग केदारची बंदिश गायल्यादेखील!

एकदा त्या आणि डॉ.कमलाताई सोहोनी (त्यांच्या भगिनी आणि भारतातील पहिली महिला शास्त्रज्ञ) जपानी चित्रपट पाहात होत्या. त्यातील स्वेटर विणणाऱ्या नायिकेने त्यांचे लक्ष वेधले. ती वेगळ्या पद्धतीने टाके विणत होती. तसे विणल्यास एका व्यक्तीचा, एका दिवसात स्वेटर पटापट विणून तयार होतो, असे त्यांनी बारकाईने पाहून, स्वतः प्रत्यक्ष विणून एका दिवसात एक स्वेटर तयार केला. बाईंची इतकी विलक्षण वेधक नजर ! कमलाताईंच्या निधनानंतर बाईंनी त्यांच्या ‘सपाता’ देखील पुजल्या. असं राम-भरतासारखं अलौकिक प्रेम!

कधीकधी दुर्गाबाई आणि इंदिरा संतांचं नातं पाहिलं, की मला पंडिता रमाबाई आणि डॉ.आनंदी जोशी आठवतात.दोघी मनस्वी,विद्वान,प्रखर स्वाभिमानी असूनही, एकमेकींबद्दल प्रचंड आदर,प्रेम बाळगणाऱ्या. दोघींनाही एकमेकींना भेटण्याविषयीची प्रचंड ओढ…समानशीलेषु व्यसनेषु सख्यं… हेच खरं! मी मुंबईहून बेळगावला इंदिराबाईंकडे जाताना व परतताना, दोघींनी एकमेकींना दिलेल्या ‘अनुपम पत्रां’ची पोस्टमन होण्याचं भाग्य मला लाभलं!

बाईंच्या तीन गोष्टी प्रामुख्याने मी कधीच विसरणार नाही, एक म्हणजे ‘रिकामा अर्धघडी राहू नको रे…’ त्यामुळेच, इतक्या विविध विषयात त्या प्रभुत्व मिळवू शकल्या. त्यांच्या हातची वाटाण्याच्या सालीची उसळ सुद्धा इतकी चविष्ट, स्वादिष्ट असे की, एकदा मी त्यांना या विशेष खमंगपणाबद्दल, ‘प्रमाण’ विचारले! त्या म्हणाल्या, “अगं मीही सगळ्यांसारखंच करते, फक्त त्यात थोडा ‘जीव’ ओतते!” तिसरी गोष्ट म्हणजे एकदा त्या मला म्हणाल्या, “ पद्मजा, प्रत्येक दिवस हा आपला ‘वाढदिवस’ म्हणून साजरा करावा.” बाईंच्या या आणि अशा अनेक गोष्टी मी हृदयात कोरल्या आहेत. एरव्ही कमालीच्या प्रेमळ, शांत असलेल्या बाईंनी ‘कराड साहित्य संमेलना’च्या अध्यक्षा असताना, एकटीने मंचावरून ‘ज्वाला’ होऊन, आणीबाणी विरोधात शिताफीने कणखर आवाज उठवला. ही त्यांची ताकद होती!

बाईंना जसं साहित्याचं प्रेम, तसंच निसर्ग आणि तत्वचिंतनाचंही ! तत्वचिंतक थोरोच्या निसर्गप्रेमामुळेच बाईंचं त्याच्यावर प्रेम. याच थोरोवर इंदिरा गांधींनीं एक कविता केली होती. ती अशी…

“Whoever reads Thoreau,

Is struck

By the ethical force,

Of his ideas

And the clarity of his writing

 

Thoreau’s great influence

On Mahatma Gandhi

 

Is well known

His words ring long,

In the mind.

 

Those who live

In the storm of politics

Need the quiet pool within

For sustenance

 

Thoreau lived by such a pool.” – Indira Gandhi.

ही कविता वाचल्यावर दुर्गाबाईंना खूप आवडली व आणीबाणीत त्यांनी सोसलेले पराकोटीचे हाल विसरून, इंदिराजींचे सगळे गुन्हे माफ करून टाकले. केवढं पारदर्शक आणि आभाळाएवढं मन !

© सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments