सुश्री नीता कुलकर्णी

??

शहाणपणाचं  वेडेपण ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सायली भेटायला आली.

“नीता मावशी आईबद्दल तुझ्याशी जरा बोलायचं आहे…”

“अगं काय झालं मीनाला?”

“आई सध्या काहीतरी वेगळंच वागते आहे.”

“म्हणजे?”

” अचानकपणे तिच्या आत्ये बहिणीला भेटायला गेली .”

“पण मग त्यात काय झाल?”

“इतके दिवस ती  सहज अशी  कधीच गेली नाही. दारातली रांगोळी सकाळची कधी चुकली नाही …आता पेपर वाचत बसते मग  कधीतरी नऊला काढते …. पूर्वी खरेदीला मला घेऊन जायची. आता आपली आपण जाते… जे मनाला येईल ते घेऊन येते.. मध्ये चतुर्श्रुंगीला जाऊन आली …”

सायली एक एक सांगायला लागली….

“अशी का गं वागत असेल ?”

“तुम्हाला तिचा काही त्रास होतो आहे का ?तिची ती जाते तर जाऊ दे ना…”

“अग पण..असं कसं ..”

” घरात कशी असते?”

“अगदी नॉर्मल नेहमीसारखी..”

” बरं ती जाते तर तुमची काही अडचण होते का?”

“नाही काहीच नाही..”

“ मग झालं तर..”

“अग रविवारी अचानकच देहू आळंदीला गेली मैत्रिणींना घेऊन…….. म्हणाली जेवायचं काय ते तुम्ही तुमचं मॅनेज करा.. केलं आम्ही ते …..”

“अगं मग प्रॉब्लेम काय आहे?”

“अगं नीता मावशी हे सगळं अॅबनॉर्मलच  वाटतंय … मी आनंदशी बोलू का?  काही सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम तर नसेल ना …”

मी जरा स्तब्ध झाले..

म्हटलं “ तुला वाटत असेल तर तू जरूर बोल…”

“हो बोलतेच ..” .. असं म्हणून ती गेली.

मनात आलं…. 

… समाजाच्या घराच्या चौकटीत बाईने अगदी तसंच वागलं पाहिजे .. जरा कुठे वेगळं घडलं ..  मन इकडे तिकडे लावलं तर …कुठे बिघडलं ? ….पण नाही…लगेच ते खटकतं ..

मी मैत्रिणींना हे सांगितलं तर त्यांच्या प्रतिक्रिया ….

“मी पण माझ्या चुलत वहिनीला उद्या भेटायला जाते …खूप दिवस घोकते आहे…”

“मला कॅम्पात जरा एकटीने जाऊन यायचं आहे आता मी जातेच..”

“मला सारसबागेत गणपतीच्या सकाळच्या सातच्या आरतीला जायचं आहे उद्या जाऊन येते…

कितीतरी वर्ष मनात आहे पण असं उठून जावं हे काही कधी सुचलंच नाही बघ …”

एक मैत्रीण  म्हणाली..

 “नीता मला कॅफे कॉफी डे ची ती महागडी कॉफी एकदा प्यायचीच आहे. तुझ्या घराजवळच आहे . उद्या आपण जाऊया  ..कशी असते ती बघूया तरी…”

मैत्रिणी धडाधड सगळं मनातलं बोलायला लागल्या. 

सायलीचा फोन आला .

“आनंदशी बोलले. त्यांनी छान समजावून सांगितलं मला .” ती शांत झाली होती. वाटलं  तिला सांगावं …

“ अग त्यापेक्षा आईचं मन वाचलं असतंस तर…फार काही नसतात  ग बाईच्या अपेक्षा… साध्या साध्या गोष्टी तर आहेत ..करू दे की तिला .. इतके वर्ष तुमची सेवा केली, आता थोडं मनासारखं वागते आहे वागू दे की…” 

तुम्हाला एक  कानमंत्र देते..

वागावं थोडं मनासारखं …. निदान आता तरी …

ही अशीच वागते हे कळलं की ते आपोआप शहाणे होतील…

आता तुम्हाला अजून एक आतली गंमत सांगते बरं का …

मीनाने हे संकल्प मला सांगितले होते…

तिला म्हटलं, “अगं नवीन वर्षाची कशाला वाट बघतेस ? आत्ताच  सुरु कर की..” .

तिने मनासारख वागणं सुरू केलं आणि ही सगळी मज्जा सुरू झाली…..

मला काय म्हणायचं आहे ते आता तुम्हाला समजलच असेल..  फोड करून सांगत नाही… 

सख्यांनो  फार मोठी मागणी नसतेच हो आपल्या मनाची …  

वागा की थोडं मनासारखं…

मग कोणी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत तरीसुद्धा तुमचे दिवस आनंदाचे आणि सुखाचे जातील याची खात्री मी तुम्हाला देते….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments