सुश्री विभावरी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘आनंदनिधान’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

पुस्तक  – आनंदनिधान

लेखक – श्री.विश्वास देशपांडे. 

प्रकाशक : सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन. 

पृष्ठ संख्या – १६०

किंमत – २००/

पुस्तकाचे मुखपृष्ठच इतके आकर्षक रंगसंगती व मन प्रसन्न करणारे आहे.निळ्या आकाशात सूर्यमुखी फुले. जणू असे वाटते, पुस्तकरुपी आनंदाकडे आकर्षित होणारे वाचक आहेत. एकूण ३३ लेखांच्या माध्यमातून आनंदाचा वर्षाव केला आहे.

पुस्तक उघडल्यावर प्रथम दिसतात मनोगताचे दोन शब्द…

ते वाचताच जाणवते आतील लेख आपल्याला आनंदा बरोबर खूप काही  देणार आहेत.आणि पुढील लेखांची उत्सुकता अजूनच वाढते.

श्री विश्वास विष्णु देशपांडे

पहिलाच लेख आनंदनिधान …. आपल्या आयुष्यातील आनंदाची ठिकाणे की जी जवळ असतात पण वेळेवर आठवत नाहीत. हे सांगताना सुरुवातीची वाक्येच मनाची पकड घेतात. एखादी खरोखरची सुंदर गोष्ट असते ती कायम स्वरूपी आनंद देणारी असते. त्या गोष्टीजवळ कधीही गेले तरी ती आनंदच देते.

असाच आनंद देणारी काही ठिकाणे पुढील काही लेखातून भेटायला येतात. त्यात  आनंद व ज्ञान मिळणारी पुस्तके,ग्रंथ,निसर्ग,गाणी,चांगले वक्ते त्यांचे कार्य यांचे महत्व वाचायला मिळते. 

काही लेख वैचारिक मंथनातून उतरलेले व आपल्याला विचार करायला लावणारे आहेत हे जाणवते. जसे धन्यवाद हो धन्यवाद यात धन्यवादाचे महत्व आपल्याला विचार करायला लावते. परतफेड मध्ये अपेक्षा ठेवल्यावर काय होते हे सांगितले आहे. पण शेवट एकदम उत्तम व सर्वांनी अंमलात आणावे असे सोपे तत्व सांगून होतो. मी प्रतिज्ञा करतो की…  असे म्हणताना प्रतिज्ञा व तिचे महत्व खरेच आपल्या गळी उतरते. साखळी मानव्याची कल्पक शिक्षक चांगली क्रांती कशी घडवू शकतो याचा पाठच घालून दिला आहे. भिंत बांधताना मनाच्या भिंती दिसतात. तर इकडची स्वारी संबोधन व नाती काळानुसार कशी बदलतात या कडे लक्ष वेधतात.

खाणाऱ्याने खात जावे म्हणता म्हणता खाणे व गाणे यांची छान संगती चाखायला मिळते.व शेवटच्या ओळी अगदी लक्षात राहतात…

“बनवणाऱ्याने बनवत जावे

खाणाऱ्याने खात जावे

खाता खाता एक दिवस

बनवणाऱ्याचे हात घ्यावे.”

जुने जाऊ द्या मरणा लागुनी म्हणत ध्यानाचे फार उत्तम तत्व विषद केले आहे. मुखवटे वास्तवाचे भान देतात. तर काही खुसखुशीत लेख खूपच हसू फुलवतात. असं आहे अशा माणसांच्या हसू आणणाऱ्या क्वचित इतरांना नकोशा वाटणाऱ्या सवयी सुहास्य तुझे मनास मोही म्हणत हसण्याचे फायदे सांगत दिल है छोटासा व  राम का गुणगान करिए पण म्हणतात. आणि  छोट्या विश्वासच्या शाळेची सफर घडवून आणतात. त्यातच लक्षात येते वाचन लेखनाचे बीज कोठे व कसे रोवले गेले. हा प्रवास कृतज्ञता मधून याची देही याची डोळा अनुभवलेला अपघात दाखवतो  आणि  बुद्ध लेण्यातून बुद्ध दर्शनही घडवतो. आपण सर्व जण अजिंठ्याची लेणी बघतो. बरेचदा शाळेच्या सहली बरोबर! पण हा लेख वाचून जर लेणी बघितली तर खऱ्या अर्थाने लेणी समजतात. जशी सुरुवात आनंद निधान ने होते तसेच शेवट म्हणणे योग्य नाही. पण या पुस्तकातील शेवटचा लेख आनंदाची गुढी उभारून नवीन पुस्तकाची सुरुवात करून देतो आणि वाचकांना आनंदी आनंद देऊन जातो.

एकंदरीत सर्वार्थाने भिन्न भावना व विचार एकत्र एकाच पुस्तकात अनुभवू शकतो.यात सर्व लेखात आपल्याला दिसते ती कोणत्याही वयोगटाला समजणारी सहज सुलभ भाषा, सर्वत्र  सकारात्मकता.  त्यातून हलक्या कानपिचक्याही मिळतात. आणि आपल्याला लिखाणासाठी नवीन विषय मिळतात.

लेखात योग्य ठिकाणी गाणी,श्लोक,काव्य याचाही समर्पक वापर दिसतो.

एकंदर आनंद ते आनंद असा आपला छान आनंदी प्रवास वेगवेगळ्या भावना अनुभवून होतो. आणि  आनंदनिधानाशी आपली गाठ लेखक घालून देतात.

अशा आनंदी अनुभवासाठी खूप खूप धन्यवाद व पुढील पुस्तकाची प्रतीक्षा.

(पुस्तकासाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा… श्री.विश्वास देशपांडे….. ९३७३७११७१८ ) 

पुस्तक परीक्षण – सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments