सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ बेघर भाग – 3 – सुश्री सुमति सक्सेना लाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहिलं – `दीदी हे घर आमचं आहे. हे आमच्या पद्धतीने चालू द्यावं. पण असं कुणीच म्हणत नाही. अगदी सूचकतेनेही नाही. सगळे आपल्या भलेपणाची खाती भरताहेत. भलेपणा नं-एक भैया, भलेपणा नं-दोन अंजली, भलेपणा नं-तीन दीप, सगळे… आता भलाईचे कॉलम आणखी भरतील. आता दीपची बायको येईल. मग त्याची मुले माझं रजिस्टर एकदम रिकाम. केवळ उपकारांनी भरलेलं. उपकार नं.एक, नं.दोन, नं.तीन, नं.चार मग… मग… सगळं सगळ्यांसाठी करते, तरीही उपकारांच्या ओझ्याखाली दबलेली आहे.  आता इथून पुढे )

आज-काल असं काय होतय, छोट्या छोट्या गोष्टींबाबतही किंवा काहीच नसताना डोळे वारंवार भरून येतात. वाटतय, पायाखाली आपली जमीनच नाही कुठे. जमीन नाही आणि डोक्यावर आपलं छतही नाही. जसं काही दुसर्‍यांच्या सावलीच्या खाली उभी आहे. अगदी एकटी… पापांची आठवण येते. सुधीर वारंवार डोळ्यापुढे येऊन उभा राहतो. जीवनात दोघांचीही कमतरता टोचते. दोघांशीही वेगवेगळी भांडणे करते. सुधीर तू माझ्याबाबतीत असं का वागलास? इतक्या सहजपणे तू तुझ्या जीवनातून मला वजा कसं करून टाकलंस? पापा तुम्ही माझ्याबाबतीत विचार का केला नाहीत?

जे घडून गेलं, त्यातलं किती तरी पुन्हा पुन्हा आठवतं. त्यावेळी माझ्य लग्नाला काही महिनेच झाले होते. त्या दिवशी देखील मी नेहमीप्रमाणे पापांबद्दल बोलत होते. कुठलंही काम, कुठलाही प्रसंग, कुठलीही समस्या असू दे, मी लगेच माझ्या पापांबद्दल बोलू लागायची. सुधीर हसत हसत म्हणायचा, `असं आहे वसु, की तुला फादर फिक्सेशन’चा आजार आहे. तू त्यांच्याबाबतीत अ‍ॅबसर्ड आहेस.’

`पापाच असे आहेतच’, मी उत्तर द्यायची. 

`सगळे आई-वडील असेच असतात.’ सुधीरनं आडवं पडून उत्तर दिलं. तो खूप वेळ छताकडे बघत तसाच पडून राहिला, जसं काही कसला तरी विचार करतोय. `वसु, आई-वडील तीन प्रकारचे असतात. एक जे आपल्या मुलांना आपल्या क्षमतेपेक्षा खूप कमी देतात. ते आपल्या मुलांचे अपराधी असतात. दुसर्‍या प्रकारचे आई-वडीलआपल्या क्षमतेनुरुप आपल्या मुलांसाठी करतात. जास्त नाही… की कमी नाही. आपल्या मुलांबाबतचं आपलं कर्तव्य ते पार पाडतात. त्यांचं वागणं ठीक असतं. कमीत कमी तक्रार करावी, असं त्यांच्या वागण्यात काही नसतं. बहुतेक लोक असेच असतात. ‘ सुधीर थोडा वेळ गप्प बसला. मग बोलू लागला, तेव्हा त्याचा स्वर भावुक होऊ लागला होता. `तिसर्‍या प्रकारचे लोक असे असतात, की जे आपल्या सामर्थ्यापेक्षा आपल्या मुलांसाठी खूप काही करतात. ते मुलांवर खरोखरच उपकार करत असतात.’ सुधीर थोडा वेळ गप्प बसला, मग म्हणाला, `वसु माझे पेरेंटस या तिसर्‍या कॅटॅगरीतले आहेत. त्यांनी आमच्यावर उपकार केले आहेत. आपल्या ऐपतीपेक्षा, सामर्थ्यापेक्षा खूप काही त्यांनी आमच्यासाठी केलय. मी तुला एवढ्याचसाठी सांगतोय, की कुठल्याही तर्‍हेने मी त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकणार नाही. ‘ सुधीर माझ्याकडे वळला. त्याचा स्वर जसा काही वितळू लागला. थोड्या काळाच्या मौनानंतर सुधीर हसला. नंतर म्हणाला, `अच्छा, वसु, तू तुझ्या पेरेंटसना कोणत्या कॅटॅगरीत घालशील?’

मी दचकलेच. अशा तर्‍हेचा विचार मी कधी केलाच नव्हता. मी संबंधाच्या हिशोब-ठिशोबात  गुंतून गेले.संबंधांना काय खोलीच्या लांबी-रुंदीप्रमाणे मोजता येतं? की खिशातल्या पैशांप्रमाणे वाढवता, कमी करता येतं? तरी पण… तरी पण… आज विचार करते, तेव्हा वाटतं, पापांनी माझ्याबाबतीत खरोखरच न्याय केला होता का?

असं काहीच नाही, की ज्याबद्दल मी काही बोलू शकेन. भैयाबद्दल त्याच्याकडेच काय तक्रार करू? अंजलीला काय सांगू, की मी दुखावली गेलीय. … सगळ्यांकडूनच… या जगातून निघून गेलेल्या पाापांकडूनसुद्धा. एक मीनाक्षीच तेवढी आहे, जिच्यापुढे मी मनातलं सगळं सगळं बोलते. जिच्याशी मी माझं सगळं सुख-दु:ख, माझं एकटेपण वाटून घेते. तीस वर्षापासूनची मैत्री आहे आमची. पण… पण… तीदेखील माझी पीडा, माझी हार समजू शकत नाही. कधी म्हणते, भैया आणि अंजली तुझ्यावर इतकं प्रेम करतात, तुला इतका मान देतात, तर मग तुला इतका कसला त्रास होतोय? कधी म्हणते, `तुला इतकं अवघड वाटत असेल, तर सगळं सहन का करतेस. स्वत:लाच इतकं टॉर्चर का करत राहतेस? … आपलं स्वतंत्र घर कर.’

मी तरी काय करू? मी जशी काही बंदिवान आहे. पिंजर्‍यात अडकले आहे. भैया आणि अंजलीला काय सांगू, की मी घर सोडून जातेय. त्यांचं प्रेम आणि ते देत असलेला मान याच्या बदल्यात मी त्यांच्यावर रुसून कशी राहू?

हळू हळू भैयाचा व्यापार वाढत चालला…. त्या कारणासाठी त्याचं लखनौला येणंही वाढलं. सुरुवाती सुरुवातीला मला खूप छान वाटलं. वाटत राहिलं, मी काही एकटी नाही. एक समृद्ध, परिपूर्ण परिवार माझ्याजवळ आहे. आता किती तरी दिवसापासून भैया महिन्यातले दहा दिवस इथेच राहत होता. त्याच्याबरोबर त्याचा ड्रायव्हर, स्टेनो, आणि चपरासीसुद्धा. कधी कधी अंजली आणि दीप पण यायचे. घरातला प्रत्येक कोपरा भरून गेल्यासारखं होत असे. कधी कधी घर एकदम परकं वाटत असे. वाटत असे, की घरात माझ्यासाठी जागाच उरली नाही. तेवढे दिवस माझं जीवन, माझी खोली आणि कीचन एवढ्यापुरतंच मर्यादित राहत असे. येणार्‍या-जाणार्‍यांसाठी चहा, काॅफी, नाश्ता पाठवता पाठवता थकायला होत असे. तन, मन आणि खरं सांगायचं तर धनानेही माझी स्थिती खालावत चालली होती. सांगायला सगळं घर माझं आहे, पण माझं अस्तित्व माझ्या खोलीपुरतंच उरलं होतं. घराच्या गेटवर भैया आणि त्याच्या नावाची प्लेट आधीपासूनच लागली आहे. आता एक प्लेट दीपच्या नावाचीही लागली. आणि त्याच बरोबर `यश कन्स्लटंट’चा मोठा बोर्ड. बाहेरपासूनच घर परकं वाटू लागलय.

दीप माझ्याकडून गेला, त्याला आता पाच वर्षं होऊन गेली होती. दोन वर्षं एम. बी. ए. केल्यानंतर तो मोठ्या दक्षतेनने भैयाचं काम संभाळत होता. या वर्षात असं काय झालं, की दीप परका वाटू लागला. कदाचित काळाचं अंतर नातेसंबंधालाही धूसर करत चाललय. आता तो येतो, तेव्हा जिव्हाळ्याची ऊबच नाही झिरपत. मला वाटत राहतं, कावळा नाही का, दुसर्‍याचं आपत्य, आपल्या घरट्यात आपल्या छातीखाली धरून त्याला उब देतं, वाढवतं, भ्रमात जगत राहतं, आणि पंखात बळ येताच ते आपल्या घरट्याकडे पोचतं, असं काही बाही दीपच्या बाबतीत वाटू लागलय. वाटू लागलय, दीपचा स्वर औपचारिक होत चाललाय. वाटतंय, जसं काही आपलेपणा दाखवण्यासाठी त्याला प्रयत्न करावा लागतोय. त्या प्रयत्नात तो थकत चाललाय.. मी पण थकत चाललेय. दीप माझ्यासाठी वारंवार महागड्या भेटी आणायचा. पण मला असं का वाटायचं, की तो `थँक्स गिव्हींग’ची काही औपचारिकता पार पाडतोय. कधी कधी मौनातदेखील शब्द आणि स्वर ऐकू येतात, कसे कुणास ठाऊक? मी मनाला वारंवार समजावण्याचा प्रयत्न करते, की दीप आता मोठा झालाय. आपल्या पायावर उभी राहिलेली मुलं अशीच होत जातात. आपला मुलगा असता, तर तोही असाच झाला असता… परक्यासारखा… कदाचित झालाच असता.

युनिव्हर्सिटीतून येऊन मी जरा पडले होते, एवढ्यात दरवाजाशी सतवंती येऊन उभी राहिली. `दीदी, आपल्याला भाभींनी बोलवलय.’

बेघर – क्रमश: भाग ३

मूळ कथा – बेघर – मूळ – मूळ लेखिका – सुश्री सुमति सक्सेना लाल  

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments