सुश्री गायत्री हेर्लेकर

☆ जीवन रंग ☆ लग्नगाठी  ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

मनातल्या भावनांवर कसातरी आवर घालत –मनाविरुध्दच ती बेडरुममध्ये आली.हो मनाविरुध्दच, कारण हे लग्नच तिला मनाविरुध्द करावे लागले होते.

खिडकीजवळच्या खुर्चीवर तो— काही तासांपूर्वीच झालेला तिचा नवरा बसला होता. नाही म्हणायला डोळ्यापुढे पुस्तक होते, पण काहीसा अस्वस्थच.

हातातील मोबाईल ठेवायला ती टेबलापाशी गेली–अन् तिचे लक्ष गेले —तिथे असलेल्या एका फोटोवर.

आश्चर्य, चीड, खेद, भिती, असहायता–सगळ्या भावना मनात एकदमच उफाळून आल्या. नकळतच फोटो हातात घेऊन ती जवळजवळ ओरडलीच,

“हा——हा –फोटो इथे कसा?”

पुस्तकांतून बघणारा तो, –जणु काही तिच्या प्रतिक्रियेची वाट पहात होता.

हळुच उठुन तिच्याजवळ जाऊ लागला. ती मात्र , डोळ्यातला राग, ओठांची थरथर, अन् चेहर्‍यावरचा संताप लावुन शकत नव्हती.

पण त्याचा शांत चेहरा,स्निग्ध डोळे,अन् संथ चाल.

तिच्या हातातला फोटो हळुच घेऊन,तेवढ्याच सौम्यपणे म्हणाला,

“हा –हा तुझा—-“

त्याचे वाक्य पुरे न होऊ देताच तिचे काहीशे किंचाळणे, “हो, हो होता तो माझा अन् मी त्याची. खुप खुप प्रेम होते –नाही अजुनही आहे आमचे एकमेकांवर.”

आणि आपण हे काय बोललो — म्हणुन मनात खंतावत, हतबल होऊन, मान खाली घालुन, मटकन खुर्चीत बसली. एवढा वेळ दाबुन ठेवलेले अश्रु मुक्तपणे गालावर ओघळु लागले.

टेबलावर असलेला आणखी फोटो, घेऊन, तिला दाखवत, तिच्याजवळ जात, 

“”बघ, जरा इकडे बघ””

मान वर करुन तिने फोटोतल्या सुंदरशा मुलीकडे बघितले. गोंधळलेल्या, बावरलेल्या नजरेने.

फोटोकडे बघत, त्याचा हळुवार आवाज, “” हा –हा जसा तुझा होता, तशीच ही माझीहोती. अगदी जीवापाड प्रेम करत होतो आम्ही.”

त्याचे डोळे पाणावले.

तिचे साशंक शब्द,””काय? ह्या -ह्या दोघांचे लग्न?”

“हो,–का अन् कसे?आता चर्चा करुन काय ऊपयोग? Marreges are settled in Heaven.  कुणाची लग्नगाठ कुणाशी बांधायची हे नियतीने आधीच ठरवलेले असते.आपण त्यात काही करु शकत नाही,फक्त मान्य करायचे,स्वीकारायचे,अन् मागचे विसरुन पुढे जायचे,””

क्षणभर थांबून, “ही माझी philosophy, पटते का तुला,?

नसेल पटत तरी सक्ती नाही”.

त्याच्याकड  बघत, हळुहळु पुढे येत तिने त्याच्या हातातले दोन्ही फोटो घेऊन टेबलवर पालथे ठेवले.

तिला जवळ घेऊन त्याने तिच्या डोळ्यातले पाणी पुसले.

दोघांच्याही मनातले भावनांचे वादळ __शांत झाले, —एकमेकांच्या आश्वासक , प्रेम स्पर्शाने.

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments