श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

का गं तुझे डोळे ओले– भाग – 2 ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र- अभ्यासाचं दप्तर तसंच पसरून केदार कॉमिक्स वाचत अंथरुणावर लोळत होता. अजून अंथरुणं गोळा व्हायचीयत हे तिला जाणवलं आणि कमलाबाई अनपेक्षितपणे आल्याचा मनाला स्पर्शू पहाणारा आनंद तिथंच विरून गेला. ‘आज कमलाबाई आल्याच नसत्या तर.. ?’ ) इथून पुढे —

ऑफिस आणि घर दोन्हीकडची कसरत खूप डोईजड व्हायला लागली तेव्हा स्वयंपाकाला बाई लावायचा तिने हट्टच धरला होता. त्याशिवाय केदारचा अभ्यासही नियमितपणे घेणे शक्य होणार नव्हते. हो नाही करता करता नवऱ्याने होकार दिला पण अंथरूणं गोळा करायचं काम निमाच्या यादीत टाकून त्याने अतिशय स्वार्थीपणाने तो ‘बार्गेन’ही जिंकलाच. त्याचा तेव्हाचा हिशोबीपणा लक्षात येऊनसुद्धा निमाला फारसा खुपला नव्हता, .. पण आज.. ?

कमलाबाई स्वैपाकीणबाई होत्या. स्वयंपाक हे एरवी निमाचं काम. त्या आल्या नाहीत तर ते तिनेच करायला हवं. त्या आल्या नाहीत म्हणून हिच्या नवऱ्याच्या किंवा मुलाच्या वेळापत्रकात काही फरक का पडावा? नवऱ्याचं आणि मुलाचं हे असं आत्मकेंद्री वागणं इतक्या खोलवर आजपर्यंत तिला कधी खुपलंच नव्हतं. तिच्या ऑफिसमधे गेले दोन दिवस आॅडिट सुरु होतं. रोजच्यापेक्षा उद्या सकाळी लवकर निघायचंय हे ती आदल्या रात्रीपासून घोकत होती. आजची तिची वेळेची निकड तिच्या नवऱ्याला अर्थातच आधीपासून माहीत होती. केदारसुद्धा रांगत्या बाळाएवढा अजाण नव्हता. तरीही कमलाबाईंच्या अचानक न येण्यामुळं उद्भवलेल्या परिस्थितीत आपसूक पुढं येणं आवश्यक असणारा दोघांच्या मदतीचा हात जागचा हलला नव्हता. नवऱ्याच्या आणि मुलाच्या या स्वार्थीपणाचं दर्शन इतक्या लख्खपणानं असं तिला प्रथमच दुखवून गेलं.. ! आपण या घरात केवळ ‘बाई’ म्हणून गृहीत धरले जातोय या विचाराची तीक्ष्ण बोच तिला खुपू लागली. स्वतःच्या तथाकथित सुखवस्तू, सुसंस्कृत आणि सुरक्षित घरातही तिला उगीचच अगदी एकटं एकटं वाटू लागलं.

कमलाबाई आल्या, अगदी अनपेक्षित आल्या, पण त्यांच्या येण्याने तिला झालेला आनंद उमलण्यापूर्वीच मलूल होऊन गेला. आपल्यापेक्षा याच कितीतरी सुखी!समाधानी! दुसऱ्यांच्या घरी स्वैपाकपाण्याची कामं का असेनात पण स्वाभिमानाने करतायत. स्वाभिमानाने जगतायत. चार महिने होऊन गेले त्या कामाला यायला लागून. पण कधी कामं टाळणं नाही, चुकारपणा नाही, अघळपघळ गप्पा नाहीत, वाढत्या महागाईला शिव्याशाप नाहीत, नवऱ्याबद्दल कसली गाऱ्हाणी नाहीत, मुलासूनेबद्दल कुरबुरी नाहीत, सुखाने ओथंबून गेल्यासारख्या शांत, आनंदी, हसतमुख, समाधानी आहेत.

नाहीतर आपण! ‘नोकरी करणारीच मुलगी हवी ही मुख्य अट पूर्ण करीत होतो म्हणून इथे पसंत पडलो. आपण नाकारावं असं त्यावेळी जाणवणारं नवऱ्याचं काही नव्हतंच. म्हणून मग लग्न झालं. आणि.. आणि पूर्ण वेळेची दुसरी नोकरी असावी तसं हे घरकाम आपल्याला चिकटून बसलं!आपलं घर, आपलं काम म्हणून सगळं हौसेनं करीत राहिलो सुरुवातीला पण

आपलेपणाची ही अशी गुंतवणूक एकतर्फीच वाढत राहिली. आपण थोडे चिडलो, संतापलो, चडफडलो, कातावलो आणि मग हळूहळू निर्ढावलोसुद्धा!! 

पण इतके दिवस निर्ढावलंय असं वाटणारं आपलं मन अजून मेलेलं नाहीये. म्हणूनच तर वाटतंय आपलं शिक्षण, आपली नोकरी, आपला बाळसेदार पगार या सगळ्यापासून मिळणाऱ्या दिखाऊ समाधानापेक्षा कमलाबाईंना मिळणारं समाधान कितीतरी पटीने निखळ आहे!.. ‘

कमलाबाईंची आठवण झाली आणि जेवणाचे डबे घासून घेता घेता तिनं चमकून त्यांच्याकडं पाहिलं तर भाजी चिरता चिरता त्या पदरानं डोळे पुसत होत्या.

“काय झालंय हो? तब्येत बरी नाहीये कां?” निमाने हळुवारपणे विचारलं आणि तिला एकदम त्या सकाळच्या निरोपाची आठवण झाली.

” कमलाबाई, काय झालंय सांगा बरं.. “

” कुठं काय?.. कांही नाही.. खरंच. “

” रडताय तुम्ही.. “

“छे हो.. “.. त्या एवढंसं हसल्या. “आत्ता कांदा चिरत होते ना, तो झोंबलाय डोळ्यांना” त्या स्वतःशीच बोलल्या. निमाला त्यांची मनापासून किंव वाटली.

” आज येणार नव्हतात ना? एक मुलगा निरोप सांगून गेला होता”

” एक मुलगा?” त्यांनी दचकून विचारलं. “काय सांगितलायन निरोप?”

“तुम्ही आज येणार नाही म्हणाला होता”

“असं म्हणाला? कोण तो? कसा होता?”

“कसा म्हणजे? पोरसवदाच होता. चोवीस पंचवीसचा. काळासावळा.. “

“.. आणि कळकटलेल्या तेलकट चेहऱ्याचा.. केस पिंजारलेले होते.. कपडे मळकट होते… आंघोळसुद्धा झालेली नव्हती… डोळ्यांत चिपडं तशीच होती… “

निमा थक्क होऊन ऐकत राहिली.

“वहिनी, अहो तो माझाच मुलगा असणार. केव्हा घराबाहेर पडला आणि निरोप देऊन गेला पत्ताही लागू दिला नाही बघा मला. “

निमा अवाक् होऊन या कमलाबाईंचं निरोगी सुंदर रूप आणि तो कळकट मुलगा यांचं समीकरण ‌जुळवत राहिली.

“कां येणार नाही म्हणाला हो तो? माझ्या तब्येतीचं काही बोलला का?”

“अं.. ?”निमा अडखळली. तिला आता खरं बोलावं की बोलू नये याचा पटकन् निर्णय घेता येईना. पण त्याचवेळी तिला कमलाबाईंच्या हसऱ्या, आनंदी मुखवट्यामागचा खरा चेहरा पहाण्याची विलक्षण ओढ लागून राहिली.

“म्हणाला, घरी भांडणं झालीयत”

त्यांनी चमकून वर पाहिलं.

“असं म्हणाला.. ?” त्यानी विचारलं आणि एकदम हसतच सुटल्या. त्यांचं हसणं खरं की खोटं निमाला चटकन् समजेचना.

स्वतःला सावरण्यासाठी जवळ केलेल्या त्या खोट्या हसण्याच्या एवढ्याशा धक्क्यानेच कमलाबाईंच्या चेहऱ्यावरचा तो मुखवटा तडकून गेला… !

 – क्रमश: भाग दुसरा 

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments