श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ रस्त्याचे मनोगत… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

सपाट, सुंदर, नीट-नेटके रूप आमुचे होते

खड्ड्यामध्ये आता राहतो, नाव आमुचे रस्ते ||धृ. ||

तुम्ही तुडवावे, आम्ही सोसावे, ब्र न काढिला कधीही

विस्कळीत, विकलांग जाहलो, केवळ तुमच्या पायी

भरणही नाही, पोषण नाही, बघत राहता नुसते

खड्ड्यामध्ये आता राहतो, नाव आमुचे रस्ते ||१||

खडी पसाभर, सिमेंट चिमूटभर, वरवर भुरभुरता

समजूत काढावयास हलका रोलर फिरविता

आज बुजविले, उद्या उखडले, शासन डोळे मिटते

खड्ड्यामध्ये आता राहतो, नाव आमुचे रस्ते ||२||

रेल्वे स्थानक वा बस डेपो, तुम्हास गाठून देतो

खेड्यामधुनी शहरामध्ये आम्हीच की पोहचवितो

कृतघ्न होऊन कसे विसरला, अपुले अतुट नाते

खड्ड्यामध्ये आता राहतो, नाव आमुचे रस्ते ||३||

धिक्कार असो की प्रकरण अपुले कोर्टामधी जाते

कृध्द होऊनी न्यायदेवता, तुम्हास फटकारिते

फसवी आश्वासने ऐकूनी, मन आक्रंदून उठते

खड्ड्यामध्ये आता राहतो, नाव आमुचे रस्ते ||४||

आमची दुर्दशा, तुम्हास बाधा, जाणून घ्या धोके

अगणित हिसके, कंबर लचके, ढासळती मणके

स्पष्ट बोलतो, राग नसावा, येतो आता नमस्ते

खड्ड्यामध्ये आता राहतो, नाव आमुचे रस्ते ||५||

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments