सौ.वंदना अशोक हुळबत्ते

? कलास्वाद ?

☆ वारली चित्रशैली ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील डहाणू, तालसरी,पालघर,वाडा,जव्हार, शहापूर हा भाग डोंगराळ व दाट जंगलाने व्यापलेला आहे.या परिसरात वारली जमातीचे आदिवासी राहतात.आदिवासीचे जीवन अत्यंत साधे व खडतर आहे.ते अत्यंत धार्मिक व रूढी परंपरा जपणारे  आहेत.

वारली आदिवासी रूढी परंपरा जपणारे आहेत. वैदिक पद्धतीने आचरण करणारे आहेत.वारली ही एक जुनी भारतीय संस्कृती आहे.चित्राच्या माध्यमातून त्यांची भाषा (लिपी) आणि संस्कृती दिसते.विशेषता त्यांनी चित्रीत केलेले लग्न चौक ( देव चौक) या चौकात सर्व देवतांचे दर्शन होते.लग्नाच्या वेळी सुहासिनी हा चौक घराच्या भिंतीवर रेखाटतात.हा चौक अत्यंत महत्त्वाचा असतो. आदिवासी पृथ्वीला धरतरी,पिकांना कणसरी   आणि गाईगुरांना गावतरी म्हणतात.मंगेली भाषा बोलतात. त्यांचे जीवन अत्यंत खडतर ‌ असते.जंगल संपत्ती, भात व नाचणी शेतीवर त्यांचा चरितार्थ चालतो.धार्मिक उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न,सण- समारंभ, यात्रा,उपासना, निसर्ग पूजा अशा कौटुंबिक, सामाजिक विषयांवर चित्रे साकारतात.

घराच्या ( झोपडीच्या) भिंती  जंगलातील तांबड्या मातीने व शेणाने लिंपून ( सारवून) त्यावर चित्रे काढतात. तांदळाचे पीठ, झाडपाला, साल, फळे, फुले, गेरु, चूना, या पासून रंग तयार करतात.बांबूच्या बारीक काटकीच्या एका टोकाला चेचून कुंचला(ब्रश) तयार करतात. वारली चित्रकार स्वछंदी, निसर्गाशी, प्रसंगांशी एकरुप होणारे असतात. चित्र काढताना प्रथम रेखाटन करण्याची पद्धत नाही. कुंचल्यात रंग घेऊन रंगानेच चित्र काढतात.चित्रात त्रिकोण, चौकोन, वर्तृळ, पंचकोन, लयदार रेषा व सरळ रेषा हे आकार पहायला मिळतात. प्राणी, पक्षी, वृक्ष, वेली, ऊन, पाऊस, सूर्य चंद्र , नद्या, नाले, शेती, निसर्ग यांचे यथार्थ दर्शन होते. त्यांच्या चित्रात स्त्री पुरुष समानता दिसून येते. वारली आदिवासी आपल्या झोपड्यांच्या भिंती चित्रा शिवाय ठेवणे अशुभ मानतात.

जीवा सोमा म्हसे यांनी ही कला जगा समोर आणली. या कलेचा प्रसार केला.म्हसे यांना १९७७ साली राष्ट्रपतीच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कारांने संन्मानीत केले.तर महाराष्ट्र शासनाने “आदिवासी सेवक” हा पुरस्कार दिला. त्यांचा वारसा कृष्ण जेण्यापासरी नथू देवू सुतार, कडू, तुंबड्य असे शेकडो चित्रकार जपत आहेत. जागातील मोठं मोठ्या संग्रहालयात वारली चित्रे लावली गेली आहेत.

साडी, बेडसीट, मग, शो पीस, मोठे माॅलस्, आॅफिसेस इथे वारली चित्रकला जावून पोहचली आहे. तिच्या साध्या आकृत्या मनाला मोहून घेतात.या चित्रशैलीचे साधेपणच मोहक आहे. म्हणून आज सर्वत्र ही कला पहायला मिळते.

  

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

सांगली

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments