सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ – कवि श्री.राजा बढे… श्री समीर जावळे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी  ☆

 ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गाण्याच्या जन्माची रंजक गोष्ट काय आहे? महाराष्ट्र गीत कसं जन्माला आलं?

“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे गीत आपण जेव्हा ऐकतो, तेव्हा आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. शाहीर साबळे यांचा पहाडी आवाज. त्यानंतर महाराष्ट्राचं यथार्थ वर्णन करणारे शब्द आणि उत्कृष्ट असं संगीत या सगळ्याचा मिलाफ म्हणजे हा पोवाडा किंवा हे महाराष्ट्र गीत. आजच या गीताविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गर्जा महाराष्ट्र माझा हे गाणं महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ

स्वतंत्र भारताची निर्मिती झाल्यानंतर मराठी भाषिकांचं राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली. या चळवळीत १०७ हुतात्म्यांनी रक्त सांडलं. या हुतात्म्यांनी सांडलेल्या रक्तामुळे आणि चळवळीसाठी उभ्या केलेल्या कष्टामुळे महाराष्ट्राची निर्मिती झाली. साहित्यिक, विचावंत, राजकीय पार्श्वभूमी असलेले नेते अशा सगळ्यांचाच या चळवळीत मोलाचा सहभाग होता. ब्रिटिश काळात राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली गेली होती. मात्र भाषावार प्रांतरचना झाली नव्हती. २८ नोव्हेंबर १९४९ रोजी मुंबईसह महाराष्ट्राचा पहिला ठराव आचार्य अत्रे, डॉ. आर. डी भंडारे यांनी मांडला होता. प्रांतरचनेसाठी नेमलेल्या समितीने मात्र ही मागणी फेटाळली होती.

डिसेंबर १९५३ मध्ये फाजलअली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने एस.एम.जोशी, धनंजय गाडगीळांसह इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. इ.स.१९५५ रोजी आयोगाचा निवाडा जाहीर झाला. पुनर्रचनेबाबत पायाभूत तत्त्व सगळ्यांना सारखी लागू केलेली नव्हती आणि त्यात मोठी विसंगती होती. त्यानंतर या आयोगाविरोधात चळवळ उभी राहिली. या सगळ्या चळवळीनंतर आपल्याला मुंबईसह महाराष्ट्र मिळाला.

१ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणला गेला. त्याच दिवशी महाराष्ट्र राज्याची घोषणा करण्यात आली होती. याच दिवशी ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गाणं सर्वात आधी सादर झालं. राजा बढे यांचे शब्द, शाहीर साबळे यांचा आवाज आणि श्रीनिवास खळे यांचं संगीत असा त्रिवेणी संगम या गाण्यासाठी जुळून आला. हे गाणं सादर झालं. ते लोकांच्या पसंतीस पडलं. त्यानंतर हे गाणं घराघरात पोहोचलं. महाराष्ट्र गीत म्हटलं की जय जय महाराष्ट्र माझा, हाच पोवाडा प्रत्येकाच्या ओठावर आला. मनात घर करून राहिला. आज त्याच गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. १९फेब्रुवारी २०२३ पासून म्हणजे शिवजयंतीपासून हे गीत महाराष्ट्र गीत म्हणून ओळखलं जाईल. 

शाहीर साबळेंचे नातू आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी काय आठवण सांगितली?

‘जय जय महाराष्ट्र माझा’ हा पोवाडा आणि ‘महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान, माझे राष्ट्र महान’ दोन गीतं होती. त्यातलं ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणं लोकांना प्रचंड भावलं. कवी राजा बढे यांनी अवघ्या दीड दिवसात हे गाणं लिहिलं होतं. महाराष्ट्र गीत गाण्याचा प्रस्ताव आला तेव्हा बाबांना (शाहीर साबळे) यांना सुरुवातीला तो मंजूर नव्हता. कारण त्यावेळी त्यांच्या नाटकांचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर सुरू होते. आपल्याऐवजी हे गाणं शाहीर अमर शेख यांनी गावं असं बाबांना वाटत होतं. कारण अण्णाभाऊ साठे, तसंच शाहीर अमर शेख यांचं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठं योगदान होतं. मात्र त्यावेळी जी राजकीय परिस्थिती होती त्यात बाबांना आग्रह करण्यात आला की, हे गाणं तुम्हीच गावं. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांची तालीम करून बाबांनी (शाहीर साबळे यांनी) हे गाणं बसवलं. १ मे १९६० ला हे गाणं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर गायलं होतं. ६३ वर्षांपासून हे गीत मराठी माणसाच्या मनात घर करून राहिलं आहे.

लेखक – श्री समीर जावळे

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments