सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २३ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

आज प्रा. डॉ. आशा दस्तगीर आपराद यांचा स्मृतिदिन. ( मृत्यू दि. २३/८/२०१९ ) .  

हिन्दी भाषेच्या प्राध्यापक असणाऱ्या डॉ. दस्तगीर यांची ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या आणि लेखिका अशी ठळक ओळख होती. मुस्लिम समाज आणि त्यातही महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी विपुल लेखन केलेले होते. महिला दक्षता समितीबरोबर त्यांनी केलेले कार्य फार महत्वाचे मानले जाते. त्याचबरोबर विविध सामाजिक चळवळींशीही त्यांचा सक्रिय संबंध होता. 

अत्यंत धाडसाने त्यांनी लिहिलेले त्यांचे आत्मकथन म्हणजे “ भोगले जे दुःख त्याला —” हे त्यांचे आत्मचरित्र, जे खूप गाजले. सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबातील स्त्रियांच्या वाट्याला येणारे आयुष्य त्यांनी यात अतिशय ओघवत्या भाषेत आणि अत्यंत संवेदनशीलतेने आत्मकहाणीच्या रूपात मांडले आहे. या पुस्तकाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. त्यातील काही पुरस्कार असे — 

१) उत्कृष्ट साहित्यकृतीबद्दल देण्यात येणारा “ भैरुरतन दमाणी पुरस्कार. 

२) महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड यांच्यातर्फे पुरस्कार. 

३) “ उत्कृष्ट मराठी वाङ्मय “ म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज्य पुरस्कार. 

या आत्मकहाणीचे “ दर्द जो सहा मैंने —” या नावाने हिंदीतही अनुवाद केला गेला आहे. 

मृत्यूसमयी डॉ. दस्तगीर यांचे वय ६७ वर्षांचे होते. त्यांना आजच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.🙏

☆☆☆☆☆

मराठी लेखक, ग्रंथकार, आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचाही आज स्मृतिदिन. ( २८/१२/१८९७ – २३/८/१९७४ ) . 

डॉ. शंकर पेंडसे यांनी अतिशय कठीण प्रसंगांना तोंड देत, एम.ए. ( संस्कृत आणि मराठी –नागपूर विद्यापीठ ) तसेच पंजाब विद्यापीठाची “ शास्त्री “ ही पदवी मिळवली होती. तसेच “ Master of Oriental Learning “ ही पदवीही मिळवली होती. “ ज्ञानेश्वरांचे तत्वज्ञान “ या विषयावर प्रबंध लिहून पी.एच.डी. मिळवली होती. विशेष म्हणजे त्यांचा हा प्रबंध पुढे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाला. 

त्यांनी चाळीस वर्षे नागपूर येथील हिस्लॉप महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले. लो. टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या तात्विक लेखनाला सुरुवात झाली. प्राचीन मराठी साहित्य, मराठी संतांचे साहित्य, संस्कृत साहित्य, आणि वेदोपनिषदे हे त्यांच्या अभ्यासाचे खास विषय होते. या विषयांवरील त्यांचे ग्रंथ पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील असेच आहेत. १९१९ साली ‘गीतेतील कर्मयोग‘ हा प्रदीर्घ निबंध त्यांनी लिहिला. संत रामदास यांचे चरित्र आणि त्यांचे अतिशय मोलाचे कार्य यांची तपशीलवार माहिती देणारा “राजगुरू रामदास“ हा त्यांचा ग्रंथ १९७४ मध्ये प्रसिद्ध झाला. म्हणजे सतत ५५ वर्षे त्यांनी तात्विक विषयांवर मौलिक लेखन केले. संस्कृत ग्रंथांमधील अत्यंत अवघड प्रकरणे त्यांनी कमालीची सुबोध करून मराठी वाचकांना उपलब्ध करून दिली. “ बृहत भाष्य “ हा त्यांचा ग्रंथ म्हणजे मराठी भाषेचे “ अमर भूषण “ आहे असे मानले जाते. 

संत स्वामी स्वरूपानंद त्यांच्याकडे येणाऱ्या आध्यात्मिक साधकांना मार्गदर्शन करतांना आवर्जून असे सांगत असत की, “ डॉ. सोनोपंत दांडेकर, डॉ. शं. दा. पेंडसे, आणि डॉ. प्र. न. जोशी, या फक्त तीन ग्रंथकारांचे लिखाण वाचा, त्याने चित्ताला स्थिरता आणि विचारांना दृढता येईल “ – हा या तिघांचाही खरोखरच मोठा सन्मान मानायला हवा. 

डॉ. पेंडसे यांच्या सर्वच ग्रंथांमधून त्यांची अफाट विद्वत्ता, प्रचंड व्यासंग, आणि त्याचबरोबर त्यांची रसिकता यांचा प्रत्यय येतो. 

त्यांचे प्रकाशित साहित्य :-

१) महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास 

२) ज्ञानदेव आणि नामदेव 

३) वैदिक वाङ्मयातील भागवत धर्माचा विकास 

४) पौराणिक भागवत धर्म 

५) भागवतोत्तम संत श्री एकनाथ 

६) साक्षात्कारी संत तुकाराम 

७) राजगुरू रामदास 

त्यांनी केलेले बरेच स्फुटलेखनही प्रसिद्ध झालेले होते, जसे की —- ‘ कर्मयोग की कर्मसंन्यास ‘, ‘ टिळकांची धर्मविषयक मते ‘, ‘ शिवकालीन संस्कृती व धर्म ‘, मराठी राजकारणाचा आत्मा ‘, ‘ विद्यापीठे व मातृभाषा ‘. 

अनेक परिसंवाद व चर्चासत्रे यातही त्यांच्या भाषणांचा प्रचंड प्रभाव पडत असे. 

१९५३ साली मोझरी येथे झालेल्या साहित्य-संमेलनाचे, आणि १९५५ साली पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले होते.  

विसाव्या शतकातील ऋषितुल्य साहित्यिक म्हणून गौरविले गेलेले डॉ. शंकर पेंडसे यांना आदरपूर्वक श्रद्धांजली.🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments