सुश्री मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “सांज-सकाळ…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
चालला तो चालला.. रवी गगन सोडुनी चालला
त्याला निरोप नि द्यायला.. या थांबल्या जणू सावल्या
*
जाणार तो तरीही इथे ती खंत कोणा ना मुळी
संताप करी त्या लाल परि.. तो राग आपुल्या मनी गिळी…
*
सततचि तो तप्त त्याला सारखे मी किती पुसावे
म्हणतची ती पत्नी अवनी अन् मनोमनी शांतवे…
*
दिनभरी त्याचीच सेवा करूनी अवनी श्रांतली
आत्ताच सुटका काहीशी म्हणुनी जराशी विसावली…
*
घाबरे आपुल्या पित्याला.. म्हणुनी दडुनी बैसला
तो पुत्र-चंद्रही येऊनी मातेस आता भेटला…
*
ती भेट बघुनी रजनीही गेली मनी आनंदुनी
आनंद उधळे चहुकडे.. त्या चांदण्यांना घेऊनी…
*
मग फिरुनी का दचके धरा.. चाहूल फिरुनी लागली
लेवूनी फिरुनी गाली लाली.. स्वागताला सज्ज झाली…
☆
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈