श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 208
☆ हरला नाही… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
भात्यामधला बाणच त्याच्या सुटला नाही
जखमी झाले कशी जरी तो भिडला नाही
☆
मला न कळले कधी निशाणा धरला त्याने
नेम बरोबर बर्मी बसला चुकला नाही
☆
माहिर होता अशा सोंगट्या टाकायाचा
डाव कुणाला कधीच त्याचा कळला नाही
☆
बऱ्याच वेळा चुका जाहल्या होत्या माझ्या
तरी कधीही माझ्यावरती चिडला नाही
☆
गुन्हास नसते माफी आहे सत्य अबाधित
कधीच थारा अपराधाला दिधला नाही
☆
जुनाट वाटा किती चकाचक झाल्या आता
कधी चुकीच्या वाटेवरती वळला नाही
☆
गुलाम होता राजा झाला तो कष्टाने
काळासोबत युद्ध छेडले हरला नाही
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈