श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ पांथस्थास… ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

चल पांथस्था झाली आता

परतीची वेळ

जोडिलास जो मेळ तयाचा

आवर आता खेळ ॥

 

दिनमणि उगवुन ढळला आता

दिशा पश्चिमेला

रात्र तमाची होण्याआधी

वळवी तव पाउला ॥

 

नेई तुझिया संगे येथिल

स्मृती शुचिर्भूत

राहु द्यावे इथेच येथिल

अमंगलाचे भूत ॥

 

सर्वव्यापी चैतनाचा अतूट

तू अंश

अवनीवरती परी पाहुणा

होउनि आलास ॥

 

नच स्वामी तू धनि वा मालक

इथल्या धूलिकणाचा

पाहुणेर तुज मिळोनि गेले

वाटा तव भाग्याचा ॥

 

मंगल घटिका येइल आता

ठेवाया प्रस्थान

पंचभूती मग विलीन होता

सोन्याचा तो दिन ॥

 

जातांना परि संगे न्यावे

संजीवक ते वित्त

ओवि-अभंगी लपले

जे अन् पसायदानात

 

स्वस्थचित्त हो त्या लोकीही

मनास ठेवुन साक्षी

स्थलकालाच्या अतीत होऊनि

वितळुनि जाय गवाक्षी ॥

 

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments