सुश्री शोभना आगाशे
इंद्रधनुष्य
☆ चांगदेव पासष्ठी – भाग-13… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆
मजकरवी गुरूमाऊली निवृत्तीने
न केवळ तुज उपदेशिले प्रेमाने
मजला ही दिधलासे आत्मानंद
स्वानुभवाच्या खाऊचा परमानंद॥६१॥
आता या कारणे आत्मज्ञान मिळता
डोळसपणे आपण परस्परा पाहता
दोघांमधला भेदाभेद न उरला
शाश्वत भेटी आत्मानंद पावला॥६२॥
ज्ञानामृत या पासष्ट ओव्यामधले
ज्याने त्यां दर्पण करुनि चाखिले
निश्चये पावेल शाश्वत आत्मसुख
सोडुनि देता अशाश्वत इंद्रियसुख॥६३॥
दिसते ते नसते, कारण ते नष्टते
नसते ते असते, परि नच दिसते
आत्मस्वरूपा त्या पाहण्या
गुरूपदेश घ्यावा ज्ञान वेचण्या॥६४॥
जाण तू निद्रेपलिकडे जे झोपणे
समजुनि जागृती पलिकडे जागणे
तुर्यावस्थेमध्ये या ओव्या रचणे
घडले गुरूकृपे ज्ञानदेव म्हणे॥६५॥
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
दूरभाष क्र. ९८५०२२८६५८
निवेदन- आज याबरोबरच चांगदेव पासष्टी हे सदर संपत आहे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈