मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पत्र… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ पत्र… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

 नका येऊ पुसाया हाल माझे 

सुखांनो, एवढे ऐकाल माझे.. ?

*

खरा ना आजचा ‘त्यांचा’ जिव्हाळा

हसू त्यांनीच केले काल माझे 

*

मला स्वाधीन केले वादळांच्या 

(म्हणे की, वागणे बेताल माझे)

*

कितीही द्या, कटोरा हा रिकामा

जिणे आजन्म हे कंगाल माझे 

*

दगे या माणसांचे, या ऋतूंचे 

सुकावे रे कसे हे गाल माझे

*

जगाचे… जीवनाचे रंग खोटे

अरे! त्यानेच डोळे लाल माझे

*

नको ते बंगले बंदिस्त त्यांचे

खुल्या दुःखा-सुखांचे पाल माझे

*

शरीराचे तुम्ही सोसाल ओझे

कसे अश्रू तुम्ही पेलाल माझे?

*

जणू मी वादळीवाऱ्याप्रमाणे 

कुठूनी पाय रे खेचाल माझे 

*

भिजावे घाम.. अश्रूंनी पुन्हा मी

असे हंगाम सालोसाल माझे 

*

तुझी गे भेट झाली.. प्रीत लाभे

बने आयुष्य मालामाल माझे 

*

कशी सांगू कुणा माझी खुशाली

कधी डोळे तुम्ही वाचाल माझे?

*

‘तुझा आधार वाटे जीवनाला… ‘

निनावी पत्र हे टाकाल माझे.. ?

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निरागस कवितेला जपताना… ☆ सुश्री मानसी चिटणीस ☆

सुश्री मानसी विजय चिटणीस

? कवितेचा उत्सव ?

☆ “निरागस कवितेला जपताना…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस

कविता मनात जन्मावी लागते म्हणे

पण तिच्या काळ्याभोर निरागस डोळ्यांत 

साक्षात कविताच जगताना पाहिलय मी

वर्गातल्या रुक्ष खिडक्यांशीही तिची गट्टी जमलीय

त्या खिडकीतलं इवलंस्स आभाळही तिच्या डोळ्यांत लपतं

फ्राॅकच्या खिशात असतात

चाॅकलेटचे चंदेरी कागद, बांगड्यांच्या काचा, कसल्यातरी बिया, आणि बरीचशी स्वप्नं

आणि हो.. माझ्यासाठी 

आठवणीने आणलेलं फुल ही असतं कधीमधी

मागून येवून माझे डोळे झाकताना

तिचे चिमुकले स्पर्श आभाळ होतात

अन् गळ्यात पडून खाऊसाठी हट्ट करताना

गालांवर चंद्र उतरतात

तिच्या अबोल गाण्यांच्या ओळी

मला शांत संध्याकाळी सापडतात

कुशीत घेऊन थोपटताना

कधी नकळत

तिचा मायस हात फिरतो माझ्या डोक्यावर

धुक्याचे लोट वाहू लागतात 

माझ्या पोरक्या डोळ्यांतून तेव्हा

कविता मनात जन्मतात 

कुशीत झोपलेल्या निरागस कवितेला जपताना…

© सुश्री मानसी विजय चिटणीस

केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “विसर्जन…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “विसर्जन…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आज बाप्पा तुझे विसर्जन 

डोळ्यात पाणीच आले टचकन 

१० दिवस कसे संपले ना झर्रर्रकन 

अन तुझ्या शिकवणींचा विचार 

डोळ्यांपुढे आला सर्रर्रकन….

 

खरंच बाप्पा तुझे येऊन जाणे परंपराच नाही 

तर आयुष्याची किती मोठी शिकवण आहे ना…

 

बाप्पा, येणार तो जाणारच हाच तर पाठ तू देतोस ना?

जगामध्ये तुम्हीपण पाहुणेच आहात हेच नकळत सांगतोस ना?

 

दीड तीन पाच सहा सात… अनंतचतुर्दशी पर्यंत तुझे येथील वास्तव्य…

तसेच कोणाचे किती वास्तव्य आहे हे काळावर अवलंबून आहे 

हेच खरमरीत सत्य तुला दाखवायचे आहे का रे?

 

गेल्यानंतरही आठवण रूपे मागे उरावे 

त्यासाठीच सगळ्यांच्या संकटात धावून जातोस ना?

लोकांचे दुःख हरण करून त्यांना सुख देतोस ना?

ज्यांना कोणी नाही त्यांचा आधार होतोस ना?

अजून कितीतरी आदर्श तू जनमानसांपुढे ठेवतोस ना?

 

आणि बाप्पा जाताना तुला हसत हसत नाचत निरोप देतात ना? 

 

मग विसर्जनचा खरा अर्थ आपला आत्माही सगळी विधायक कार्यें करून अनंतात समर्पित करावा असेच सुचवायचे आहे का?

– – हसत यावे, हसतच जावे, कीर्ती रूपाने मागे उरावे – एवढे भरदार कार्य करावे – सगळ्यांनी पुन्हा बोलवावे 

 

बाप्पा या शिकवणींचा विसर नको पडू देऊ 

एवढाच साधा भाव तुला अर्पण 

पुनरागमनायच म्हणत करीतो तुझे विसर्जन…

बाप्पा मोरया रे 

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मखर रिकामं झालं !!…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “मखर रिकामं झालं !!…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

आता कुठं आरत्यांचा क्रम नक्की व्हायला लागला होता… 🙏

आता कुठं ओवाळू आरत्या नंतर चंद्रभागे मधे सोडोनीया देती जमायला लागलं होतं.. 🙏

आता कुठं आरतीच्या वेळेत घरी पोचायची सवय लागत होती.. 🙏

एरव्ही स्वयंपाकघर न सोडणाऱ्या घरच्या बायका आरतीच्या निमित्तानं लवकर आवरून बाहेर यायला लागल्या होत्या… 🙏

रिमोट साठी भांडणाऱ्या आमचं टिव्ही बंद करून, तुझ्या समोर बसण्यावर एकमत व्हायला लागलं होतं… 🙏

भाजीच्या पेंढीला न लागणारे हात दूर्वा निवडायला शिकत होते… 🙏

साधं दूध आणायला रखडणारे पाय प्रसादाला काय आणू म्हणत धावायला लागले होते.. आणि एवढ्यात 

…. एवढ्यात हा दिवस आणलास पण? 🙏

काल तर आलास आणि आज निघालास पण?

 

कठोरपणाने सृष्टीचे नियम 

शिकवणारा तू आदिगुरू ! 🙏

जिथं सृजन आहे तिथं 

विसर्जन अपरिहार्य..

असते असं म्हणत 

निघालास देखील, , , ,..

 

पण गजानना जाताना एवढं कर.. 🙏

 

फक्त तुझ्याच नाही तर कुणाही अतिथीच्या येण्यानं सुखावणारं आणि विरहानं

कातर होणारं

साधं सरळ मन दे‌. 🙏

 

भाजी भाकरी असो वा 

पुरणपोळी सारख्याच आनंदाने 

खाण्याची स्थीर बुद्धी दे !! 🙏

 

प्रत्येकाच घर आणि ताट 

भरलेलं असू दे. 🙏

 

आणि त्या भरल्या ताटातलं 

पोटात जाण्याची सहजता दे. 🙏

 

लोकांचं दुःख कळण्याची 

संवेदना दे !! 🙏

 

अडचणीला धावून जाणारे 

तुझे पाय दे !! 🙏

 

अपराध क्षमा करून पोटात घेणारे 

तुझे लंबोदर दे !! 🙏

 

सूक्ष्मदृष्टीने पाहणारे 

बारीक डोळे दे !! 🙏

 

सार स्विकारून फोल नाकारणारे 

सुपासारखे कान दे !! 🙏

 

भलंबुरं लांबूनच 

ओळखणारी सोंड दे !! 🙏

 

शत्रूला न मारता त्याला आपला 

दास करणारा पराक्रम दे !! 🙏

 

सगळ्यात महत्त्वाचं, सर्वांचं 

मंगल करणारी बुद्धी दे !! 🙏

 

बहुत काय मागू गणेशा? 💐

 

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : मोहन निमोणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘तीच अनंत चतुर्दशी…’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘तीच अनंत चतुर्दशी…’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

ज्याक्षणी या शरीरात अडकणं संपेल

तो क्षणच अनंत – चतुर्दशी !

*

जेंव्हा अहम् आणि त्वम् एकजीव

होतील तीच अनंत – चतुर्दशी !

*

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण 

बाप्पासारखा काही दिवसांचा

कोणी दीड, कोणी पाच

तर कोणी दहा दिवसांचा…

*

थोडा वेळ आहोत इथे

तर थोडं जगून घेऊया

बाप्पा सारखे थोडे 

लाडू मोदक खाऊन घेऊया…

*

इथे सर्वच आहेत भक्त आणि 

सगळ्यांमध्ये आहे बाप्पा

थोडा वेळ घालवू सोबत

आणि मारु थोड्या गप्पा…

*

मनामनातले भेद मिटतील

मिटतील सारे वाद 

एक होईल माणुस

आणि साधेल सुसंवाद…

*

जातील निघून सारेच

कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला

ना चुकेल हा फेरा

जन्माला आलेल्या कोणाला…

*

बाप्पासारखं नाचत यायचे 

आणि लळा लावून जायचे

दहा दिवसांचे पाहुणे आपण 

असे समजून जगायचे…

*

किंमत तुमची असेलही 

तुमच्या प्रियजनांना लाख

आठवणी ठेवतील जवळ 

अन् विसर्जित करतील तुमची राख…

*

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण 

दीड दिवस अन् दहा दिवसाचा

हे जगणे म्हणजे एक उत्सव 

हा काळ दोन घडीच्या सहवासाचा…

कवी : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कृष्ण… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ कृष्ण… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

अंत:करणातील 

कृष्ण जन्मू दे

चेतना जागरूकता रुपात

नकारात्मक अंधार 

नाहीसा होऊ दे…

 

मी, माझा, हा अहंभाव

साखळी रुपात 

जखडून ठेवला आहे 

त्या साखळ्या तुटू दे…

 

व्यष्टीची कवाडे

अलवार उघडून 

रस्ता समष्टीचा

मोकळा होवू दे…

 

निर्मोही होवून 

अलिप्तपणे जगावे

शिकवून जातो कृष्ण 

स्वतः ला तटस्थ राहू दे..

 

कृष्ण म्हणजे प्रेम

कृष्ण जीवन बासुरी

कृष्ण म्हणजे वैराग्यही

असा कृष्ण अंतरी जन्मू दे…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझी खिल्लारी बैलांची जोडी… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ माझी खिल्लारी बैलांची जोडी ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

माझी खिल्लारी बैलाची जोडी 

मोत्या पोवळ्या नावं त्यांची 

रुबाबदार जोडी सर्वांना आवडी 

मेहनतिने काळजी घेतात शेताची 

*

शेतकऱ्यांना आधार बैलांचा 

कामात उरक असे शेतीचा 

लक्ष्मी ही शेतकऱ्यांची…

शोभा वाटे अंगणाची…

*

वर्षाचा सण हा बैलपोळा 

शेतकरी आनंदाने साजरा 

करतो आवडीने सोहळा 

झुल अंगावरी हाती कासरा…

*

नवरदेव रंगतो विविध रंगानी 

गळ्यात सुंदर घुंगर माळा…

शिंग शोभतात लोंबणाऱ्या गोंड्यानी 

मिरवणूकित उडवतात धुराळा…

*

जेवण आज त्यांना पुरणपोळीचे 

मुटकुळे बाजरीच्या पिठाचे…

ओवाळते सुवासिन जोडीला 

वर्ष सरते कष्टात शेतकऱ्याचे… 

 – दत्तकन्या

© सौ. वृंदा गंभीर

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आगमन-! निसर्गाचे- गणेशाचे.. ! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  कवितेचा उत्सव  ?

आगमन-! निसर्गाचे- गणेशाचे.. ! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

 सरत्या श्रावणाने,

   पावसाला सोडलं !

  रंगीबेरंगी इंद्रधनुष्य,

   आभाळात अवतरलं!… १

*

 निरागस प्राजक्ताने,

  सडा अंथरला !

प्राजक्ती देठांचा,

    रंग उधळला !…. २

*

 कर्दळीच्या रोपांवर,

  शेंदरी सौंदर्य दाटले!

 अन् जास्वंदीने आपले,

    नवरंग दाखवले !…. ३

*

  गौरीच्या पूजेसाठी,

    रानोमाळ फुले तेरडा!

 शंकराच्या पिंडीवर,

    डुलला सुगंधी केवडा !… ४

*

 निशिगंधाचे हजेरी,

   कुठे ना चुकली !

 गौरी गणेश स्वागतास,

   सारी फुले सजली!… ५

*

 फुलांच्या दरवळाने,

   गौरी गणेश प्रसन्न झाले!

  सुगंध अन तेज घेऊन,

    महिरपीत सजले !…. ६

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ऊन पावसात नहाते… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ ऊन पावसात नहाते… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

 ऊन पावसात नहाते

माळ मोत्यांची गुंफते

गर्द कोवळ्या वेलींना

जणू चांदणे झुलते || 

*

हिरव्या हिरव्या रानावरी

जणू लखलख चांदणे

लांबसडक गवतावरी

थेंबा थेंबाचे झुलणे ||

*

 ऊन पावसात नहाते

रान सोनपिवळं होते

हिरव्या रानाला जणू

चांदण चाहूल लागते ||

*

 ऊन पावसात नहाते

सरीमागून वेडावते

रंग पोपटी रानभर

झालर रेशमी लागते ||

*

ऊन पावसात नहाते

गंध स्मृतींचा उधळते

श्रावणातल्या झुल्यासवे

मना आठवांचे हिंदोळे ||

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ येता श्रावण… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ येता श्रावण… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

येता श्रावण, पाऊस आला, थेंबातुनी प्रगटला

रिमझिम सरींना, घेऊनी आला, हर्ष मनी दाटला |

*

ऊन कोवळे, क्षणात धारा, लपंडाव चालला

पाहता-पाहता, बालचमुही, मंत्रमुग्ध जाहला |

*

अवनीनेही हिरवा शालु, अंगभरी ल्यायला

डोंगररानी, तरुवेलींवर, पाचू ही प्रगटला |

*

लोभस, सुंदर, फुले ऊमलता, साजे तरु खुलला

गंधरुपाने मोहित करण्या नजराणा उमटला |

*

इंद्रधनुचा मोहक पट तो, आकाशी पातला

बालचमुंसह सर्वांसाठी, आनंददायी ठरला |

*

सणवारांना घेऊनी आला, हिरवाईने सजला

गोफ गुंफण्या, खेळायाला, महिला वर्गही नटला ||

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

हैदराबाद.

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares