मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – ‘हॅंडल वुईथ केअर…’ – भाग – 3 ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ कथा – ‘हॅंडल वुईथ केअर…’ – भाग – 3 ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र – आज मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलंच आहे की.दहा किलोच्या साखरेच्या जड पिशव्या तुम्ही का वहायच्या?तेही या वयात?वहिनी नोकरीसाठी रोज मिरजेला जा-ये करते.गॅरेजच्या कामासाठी  दादाचंही मिरजेला जाणं येणं असतंच ना?एक दिवसाआड का होईना त्याचा मोटारसायकलवरुन

एखादातरी हेलपाटा होतोच. मग ही कामं त्या दोघांनी का नाही करायची? मी आज वहिनीशी स्पष्टपणे बोलणारच आहे ह्या विषयावर..”

“ए..वेडी आहेस का तू?तू..तू तिला यातलं कांहीही बोलायचं नाहीss”

“का नाही बोलायचं ?दादाशी तरी मी बोलणारच.त्याला चांगली खडसावून विचारणार.”)

“सावू..,हे बघ,तू रागाच्या भरात कांही बोलशील आणि दूधात मिठाचा खडा पडावा तसं सगळंच नासून जाईल.ऐक माझं.तू लक्ष घालावंस असं खरंच कांही नाहीय..”

हे खरं की खोटं तिला समजेचना.ती अगदी हळवी होऊन गेली.आण्णांच्या काळजीने तिचे डोळे भरून आले.

“सावू, काय झालं?” ती त्यांना बिलगली आणि हमसाहमशी रडत राहिली. ते पाहून आण्णा विचारात पडले.तिला हलक्या हाताने थोपटत राहिले. आपल्या या हळव्या मुलीचा त्यांना आधार वाटला आणि तिची काळजीही..

“सावू, हे बघ,शांत हो. मी जे सांगतो ते नीट ऐक. तुझ्या वहिनीने घरी कामासाठी दोन बायका ठेवलेल्या आहेत.त्यांच्या मदतीने सगळी घरकामं तीच करते.सगळं आणणं-सवरणं, बाजारहाट दादा बघतो.’तुम्ही आज अमुक एक काम करा’ असं त्या दोघांपैकी कुणीच मला आज पर्यंत कधीच सांगितलेलं नाही. अंगणातला केर काढायला मी पहिल्यांदा हातात झाडू घेतला तेव्हा तुझ्या वहिनीनेच तो माझ्याकडून काढून घेतला होता. रात्री त्या दोघांना सगळं आवरून झोपायला खूप उशीर व्हायचा. तरी मी केर काढू नये म्हणून दोघांपैकी कोणीतरी लवकर उठून ते काम करू लागला.अखेर एके दिवशी त्या दोघांना समोर बसवून मी माझ्या पद्धतीने त्यांना समजावून सांगितलं आणि फक्त ते तेवढंच काम माझ्याकडे घेतलं. मी तेवढंच काम प्रयत्नपूर्वक करू शकतो म्हणून मी ते करतो”

“आणि त्या साखरेच्या दहा किलो ओझ्याचं काय?”

“ती शुगरमिलच्या शेअर्सवरची साखर होती. शेवटची तारीख जवळ येत होती आणि दोन तीनदा प्रयत्न करूनही दादाच्या वेळा जमत नव्हत्या. एकदा मी त्यांना ‘हवं तर मी आणतो’असं म्हटलं तर तोच ‘साखर फुकट जाऊ दे पण तुम्ही जायचं नाही’असंच म्हणाला होता.आज शेवटची तारीख होती. मी मोकळा होतो म्हणून त्यांना न सांगता मीच आपण होऊन गेलो होतो.मी जायला नको होतं हे त्या  पिशव्या प्रथम उचलल्या तेव्हा समजलं..”

सविता विचारात पडली. हे सगळं असंच असेल?आण्णा खूप सोशिक आहेत हे ती विसरू शकत नव्हती.ते त्या दोघांना पाठीशी घालत नसतील कशावरून? सविताच्या हळव्या मनात रुतून बसलेला हा प्रश्न आण्णांच्या गावीच नव्हता.

“सावू, तुला सांगू?तुझ्या आईचं आजारपण म्हणजे कसोटीच होती एक.माझी आणि दादाची नसेल एवढी तुझ्या वहिनीची.पण ती त्या कसोटीला पूर्णपणे उतरलीय.सगळी रजा आधीच संपल्यानंतर ती दोन महिने बिनपगारी रजा घेऊन घरी थांबली होती.मी तुझ्या वहिनीला खूपदा सुचवलं होतं ‘आपण सावूला बोलून घेऊ. थोडे दिवस ती रजा घेईल’असं.पण तुझी वहिनी ‘इतक्यात नको’ म्हणाली होती. ‘सविताताई आपल्या हुकमाचा एक्का आहेत. तो आत्ताच कशाला वापरायचा? होईल तितके दिवस मी मॅनेज करते. अगदी अडेल तेव्हा त्या आहेतच’ असं ती म्हणायची.याच बाबतीत नाही सावू,तिने एरवीही स्वतःपुरता विचार कधीच केलेला नाही. तुला सांगू? अशी एखादी वेळ येते ना तेव्हाच माणसाची खरी परीक्षा होत असते.त्या सगळ्याकडे पहाणारी आपली नजर मात्र स्वच्छ हवी.”

सविताला हे पटत होतं पण स्वीकारता येत नव्हतं.  “माझ्यावरील प्रेमापोटी सावू,आज तू त्या दोघांवर मात्र तुझ्याही नकळत अन्याय करत होतीस. म्हणून तुला हे सगळे सांगावं लागलं.जसा मी तसेच सावू ते दोघेही तुझेच आहेत. आजवर तुझी आई सोडली तर मनातली एक गोष्ट मी बाकी कुणाजवळ कधीच बोललो नाहीय. आज तुला मात्र ते सांगणं गरजेचं वाटतंय.”

“कोणती गोष्ट आण्णा?”

“तुझा विश्वास नाही बसणार सावू,पण तुझ्या वहिनीच्या हातचा स्वैपाक मला कधीच आवडायचा नाही.तुझ्या आईच्या हातच्या चवीनं मला लाडावून ठेवलं होतं.तुझ्या वहिनीनं स्वैपाक केला असेल,तेव्हा ती आसपास नसताना ,तुझी आई न बोलता माझ्या आवडीचं कांहीबाही रांधून मला खाऊ घालायची.आज ती नाहीय.पण कसं कुणास ठाऊक,आता मात्र तुझ्या वहिनीनं केलेल्या स्वैपाकाची चव मला वेगळी पण चांगली वाटते.पूर्वीची गोष्ट वेगळी होती.हीसुध्दा सगळं मनापासून आणि प्रेमाने करते हे जाणवल्यानंतरची आजची गोष्ट वेगळी आहे.फरक आपल्या दृष्टिकोनात असतो सावू. खरं सांगायचं तर सगळी माणसं आपलीच असतात.आपण त्यांच्याकडे त्याच आपुलकीने पाहिलं तर खऱ्या अर्थाने ती आपली होऊन जातात. नाहीतर मग नातेबंध तुटायला वेळ नाही लागत.एक सांगतो ते कायम लक्षात ठेव.नाती जवळची लांबची कशीही असोत, ती नाजूक असतात. त्यांना ‘हॅंडल वुईथ केअर’ हे लेबल मनोमन लावूनच टाकायचं. तरच ती हलक्या हाताने जपता येतात.नात्यांचं खरं महत्व तुझी आई गेली तेव्हा मला समजलं. सावू.एकटा, केविलवाणा होऊन गेलो होतो गं मी.पण तुझ्या दादा-वहिनीने मला समजून घेतलं. सांभाळलं. म्हणूनच त्या दुःखातून इतक्या लवकर मी स्वतःला सावरु शकलो.

त्या दोघांवर अचानक टाॅर्चचा प्रकाशझोत पडला आणि दोघेही दचकले.

“गप्पा संपल्या की नाही अजून ?”दादाने हसत विचारलं.दादा वहिनी दोघंही त्यांना न्यायला आले होते. तोवर भोवताली  इतकं अंधारून आल्याचं त्याना समजलंच नव्हतं. सविताचं मन तर कितीतरी दिवस अंधारातच बुडून गेलं होतं.पण आण्णांच्या बोलण्यामुळे तो अंधार मात्र आता विरून गेला होता.सगळं कसं लख्ख दिसू लागलं होतं. सविता तटकन्  उठली. पुढे झेपावली. वहिनीच्या गळ्यात पडून बांध फुटल्यासारखं रडत राहिली.ती असं का करतेय दोघांनाही समजत नव्हतं.

“आण्णा, काय झालंय हिला असं अचानक?” दादानं विचारलं.

तिला काय झालंय ते फक्त आण्णांनाच माहीत होतं.पण ते सगळं त्यांनी गिळून टाकलं. स्वतःशीच हसले.

“काही नाही रे.तिला तिच्या आईची आठवण झाली असेल.  म्हणून हिला बिलगलीय.”

आण्णा बोलले ते अनेकार्थांनी खरं होतं. निदान आज, या क्षणापुरती तरी वहिनी तिची आईच झाली होती जशी काही. सविता हा क्षण मनात अतिशय हळुवारपणे जपून ठेवणार होती…!!

– पूर्णविराम –

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – ‘हॅंडल वुईथ केअर…’ – भाग – 2 ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ कथा – ‘हॅंडल वुईथ केअर…’ – भाग – 2 ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र – “सावू.. तू?.. तू इथे कशी?” कपाळावरचा घाम रुमालाने टिपत त्यांनी विचारलं. त्यांच्या थकून गेलेला निस्तेज चेहरा क्षणात उजळला.)

“मुद्दाम तुम्हाला भेटायलाच आलेय.”

” हो..पण असं अचानक?”

” तुम्हाला भेटावं असं तीव्रतेने वाटलं, आले. कसे आहात तुम्ही?”

“कसा वाटतोय?”

“खरं सांगू? तुम्ही खूप थकलायत आण्णा”. तिचा आवाज भरून आला. तेवढ्यात समोरून बस येताना दिसली न् मग सविता काही बोललीच नाही. बसमधे सगळेच गावचे. ओळखीचे. सगळ्यांसमोर मोकळेपणाने बोलणं तिला प्रशस्त वाटेना.बसमधून उतरल्यानंतर मात्र ती घुटमळत उभी राहिली.)

“आण्णा,आपण…आपण लगेच घरी नको जायला.”

“का गं?”

“वाटेत शाळेजवळच्या देवळात थोडावेळ बसू.मग घरी जाऊ. मला तुमच्याशी  थोडं बोलायचंय.”

“अगं बोल ना.घरी जाता जाता बोल. घरी गेल्यानंतर निवांत बोल.”

“नाही…नको”

“लांबचा प्रवास करून आलीयस.ऐक माझं.आधी घरी चल.हात पाय धू. विश्रांती घे.मग बोल.घाई काय आहे एवढी?”

सविताला पुढे कांही बोलताच येईना.

तिला असं अचानक दारात पाहून तिच्या वहिनीलाही आश्चर्य वाटलं.

“सविताताई ,हे काय? असं अचानक?” बोलता बोलता तिच्या हातातली बॅग घ्यायला वहिनी पुढे झाली आणि बॅगेऐवजी सविताच्या हातातल्या त्या दोन जड पिशव्या पाहून चपापली.तिच्या कपाळावर उमटलेली सूक्ष्मशी आठी आणि आण्णांकडे पहातानाची तिच्या नजरेतली नाराजी सविताच्या नजरेतून सुटली नाही. सविताने त्या दोन जड पिशव्या तिच्या पुढे केल्या.मग मात्र वहिनीने त्या हसतमुखाने घेतल्या.

“आधी कळवलं असतंत तर मोटारसायकल घेऊन हे आले असते ना हो मिरजस्टॅंडवर तुम्हाला घ्यायला ” तिच्या बोलण्यात सहजपणा होता पण  सविताला तो सहजपणे स्वीकारता येईना.

” मुद्दामच नाही कळवलं. अचानक रजा मिळाली.आले. आण्णांना भेटावसं वाटलं म्हणून रजा घेतलीय” वहिनीकडे रोखून पहात ती म्हणाली .चहापाणी आवरलं तसं ती उठली .

“वहिनी, थोडं देवळापर्यंत जाऊन पाय मोकळे करून येते.”

” बरं या”.    

“चला आण्णा..”                                                                                                                                                                             

“आण्णा..?..ते कशाला..?”  वहिनी आश्चर्याने म्हणाली.

” का बरं?त्यांना का नाही न्यायचं?” सविताने चिडून विचारलं.तिच्या आवाजातला तारस्वर वहिनीला अनोळखीच होता. ती चपापली.कानकोंडी झाल्यासारखी चुळबुळत राहिली.    

“तसं नाही सविताताई..”

“मग कसं?”आता गप्प बसायचं नाही हे सविताने ठरवूनच टाकलं होतं.पण वहिनी वरमली.

” तुम्ही जा त्याना घेऊन,पण अंधार व्हायच्या आत परत या “

सविता रागाने तिच्याकडे पहात राहिली.फट् म्हणताच ब्रह्महत्या होणार पण त्याला आता तिचा नाईलाज होता.

“आण्णांना हल्ली डोळ्यांना कमी दिसतं.मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचंय.म्हणून म्हटलं.फार अंधार करू नका.”

“आण्णाs?”त्यांच्याकडे पहात सविताने आश्चर्याने विचारले. ते मानेनेच ‘हो’ म्हणाले.  आणि खाली मान घालून त्यांनी चप्पल पायात सरकवली. ते पाहून वहिनी क्षणभर घुटमळली. मग न बोलता आत निघून गेली.

देऊळ येईपर्यंत आण्णा गप्पच होते आणि सविताही.

“मला आधी का कळवलं नाहीत?आॅपरेशनचं?”

“त्याचं काय अगं? अजून कधी करायचं तेही ठरलं नाहीय.डॉक्टर करा म्हणाले की लगेच करायचं. आणि हल्ली मोतीबिंदूचं ऑपरेशन पूर्वीसारखं अवघड नसतं अगं.तू उगाच काळजी करतेस.”

” आण्णा, तुम्ही रोज घरी काय काय कामं करता?” तिने मुद्द्यालाच हात घातला.

“मी..मी काम असं नाही गं…”

” काहीच करत नाही?”        

“तसं म्हणजे… करतो आपलं मला जमेल ते..जमेल तसं..”

“कां?”तिने तीव्र शब्दात विचारलं.

“कां म्हणजे? बसून काय करायचं?” त्यांच्या घशात आवंढाच आला एकदम.ते गप्प बसले.

“तुम्हाला घरकामाची सवयही नाही न् आवडही नाही हे ठाऊक आहे मला.वहिनीला जमत नसेल तर चार बायका ठेव म्हणावं कामाला.तिने तुम्हाला कामं का लावायची?”

“तुला..सारंग बोललेत का हे सगळं?”

“त्याने कशाला सांगायला हवं?आज मीही स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलंच आहे की.दहा किलोच्या साखरेच्या जड पिशव्या तुम्ही का वहायच्या?तेही या वयात?वहिनी नोकरीसाठी रोज मिरजेला जा-ये करते.गॅरेजच्या कामासाठी दादाही मिरजेला जात असतोच ना?एक दिवसाआड का होईना दादाचा मोटारसायकलवरून एखादातरी हेलपाटा असतोच की. मग ही कामं त्या दोघांनी का नाही करायची? मी आज वहिनीशी स्पष्टपणे बोलणारच आहे ह्या विषयावर..”

“ए..वेडी आहेस का तू?तू..तू तिला यातलं कांहीही बोलायचं नाहीss”

“का नाही बोलायचं ?दादाशी तरी मी बोलणारच.त्याला चांगली खडसावून विचारणार”

क्रमश:… 

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – ‘हॅंडल वुईथ केअर…’ – भाग – 1 ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ कथा – ‘हॅंडल वुईथ केअर…’ – भाग – 1 ☆ श्री अरविंद लिमये

नात्यांमधल्या रेशीमगाठींची गोष्ट…

रजेचं अचानक जमून आलं आणि सविता लगोलग निघाली. नेहमीसारखं रिझर्वेशन वगैरे करायला उसंतच नव्हती.

“जपून जा. काळजी घे.उगीच त्रागा करू नको. मन शांत ठेव. सगळं ठीक होईल” निघतानाचे सारंगचे हे शब्द आणि आधार आठवून सविताला आत्ताही भरुन आलं. सविता आज पुणे-मिरज बसमधे चढली ती ही अस्वस्थता सोबत घेऊनच.समक्ष जाऊन आण्णांना भेटल्याशिवाय ही अस्वस्थता कमी होणारच नव्हती. आण्णा म्हणजे तिचे वडील. तिचं माहेर मिरज तालुक्यातल्या एका बर्‍यापैकी समृद्ध खेड्यातलं. मिरजस्टँडला उतरून सिटी बसने पुन्हा तासाभराचा प्रवास करावा लागे.एरवी ती माहेरी जायची ते कांही फक्त आई आणि आण्णांच्या ओढीनेच नव्हतं. तिच्या एकुलत्या एका भावाच्या संसारात तिलाही मानाचं स्थान होतंच की.पण आजची गोष्ट वेगळी होती.ती निघाली होती ते तशीच वेळ आली तर आण्णांना कायमचं पुण्याला घेऊन यायचं हे मनाशी ठरवूनच.सारंगचाही या तिच्या निर्णयाला विरोध नव्हता.    

‘एखाद्या माणसाच्या असं जाण्यानं, नसण्यानं, त्याच्या असतानाचे संदर्भ इतक्या चटकन् बदलू शकतात?’ तिला प्रश्न पडला. आई अचानक गेली तेव्हापासूनच ह्या सगळ्याची सुरुवात झाली होती.आज माहेरी जाताना सविता म्हणूनच अस्वस्थ होती. आण्णांच्याबद्दल तर सविता थोडी जास्तच हळवी होती. त्याला कारणही तसंच होतं. आण्णांमुळेच माहेरी शिक्षणाचे संस्कार रुजले होते.आर्थिक परिस्थिती बेतासबात असूनही शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी मुलगा आणि मुलगी असा भेद कधीच केला नव्हता.म्हणून तर सवितासारखी खेड्यातली एक मुलगी इंजिनिअर होऊ शकली होती आणि पुण्यात एका आय टी कंपनीत बाळसेदार पगार घेत आपल्या करिअरला आकार देत होती.आण्णा गावातल्याच एका शाळेतून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले होते.घरी पैशाचा ओघ जेमतेमच असे.तरी स्वतः काटकसरीत राहून आईआण्णांनी सविता आणि तिचा दादा दोघांनाही इंजिनियर केलं होतं. आण्णांच्या संस्कारांचा फायदा त्यांच्या सुनेलाही मिळाला होताच. सविताचा भाऊ ऑटोमोबाईल इंजिनिअर झाला आणि त्याची स्वतःची आवड म्हणून तिथे गावातच त्यांने गॅरेज सुरू केले होते. तो कष्टाळू होता आणि महत्त्वाकांक्षीही.त्यामुळेच त्याच्या लग्नाचं पहायला सुरुवात केली तेव्हा त्याला खूप चांगल्या मुली सांगून आल्या होत्या.पण त्या खेड्यात रहायची त्यांची तयारी नसायची.मग गावातल्याच एका ओळखीच्या कुटुंबातली अनुरूप मुलगी त्याने पसंत केली.ती लग्नाआधी बीएससी झाली होती. हुशार होती. आण्णांनीच तिला बी.एड् करायला प्रवृत्त केलं. लगेच मिरजेच्या एका शाळेत जॉबही मिळाला.असं सगळं कसं छान, सुरळीत होतं. परवापरवापर्यंत तरी तसं वाटलं होतं,पण आई अचानक गेली …आणि ..? 

वहिनीला नवीन नोकरी लागली होती तेव्हा मिरजेला रोज जाऊन येऊन करता करताच ती मेटाकुटीला येई. पण तेव्हा घरचं सगळं बघायला सविताची आई होती.ती होती तोपर्यंत घरात कसले प्रश्नच नव्हते जसे कांही. तेव्हा घरात भांड्याला भांडं लागलं असेलही कदाचित पण त्यांचे आवाज सवितापर्यंत कधीच पोचले नव्हते.

आई गेली.तिचं दिवसकार्य सगळं आवरलं  तेव्हाच बदल म्हणून सविता-सारंगने आण्णांना ‘थोडे दिवस बदल म्हणून पुण्याला चला ‘ असा आग्रह केला होता. पण ते ‘पुन्हा पुढे बघू ‘ म्हणाले न् ते तसंच राहीलं.      

आई गेल्यानंतर पुढे दोनतीन महिन्यांनीच दिवाळी होती.चार दिवस आधी फराळाचे डबे देऊन सविताने सारंगला आपल्या माहेरी पाठवलं होतं. सारंग तिथे गेला म्हणून आपल्याला सगळं समजलं तरी असंच तिला वाटत राहिलं. कारण तिकडून सारंग परत आला ते हेच सगळं सांगत. तो रात्रीचा प्रवास करून सकाळी तिकडे पोहोचला तेव्हा आण्णा अंगण झाडून झाल्यावर  व्हरांड्यातला केर काढू लागले होते.सारंगला अचानक समोर पाहून ते थोडे कावरेबावरे झाल्यासारखे वाटले.  थोडे थकल्यासारखेही.पण मग काहीच न घडल्यासारखं हसून त्यांनी सारंगचं स्वागत केलं होतं.  हे ऐकलं तेव्हा सविताला धक्काच बसला .आण्णा आणि घरकाम? शक्य तरी आहे का हे? निवृत्तीनंतर ते बागेत काम करायचे.त्यांना वाचनाची आवड होती. वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच नव्हता. असं असताना ते न आवडणारी,न येणारी कामं या वयात आपण होऊन करणं शक्य तरी आहे का?हे सगळं वहिनीचंच कारस्थान असणार हे उघड होतं.तिचं जाऊ दे पण दादा? त्याला कळायला नको?सविता पूर्वकल्पना न देता यावेळी माहेरी निघाली होती ते यासाठीच. आण्णांशीच नव्हे,दादावहिनीशीही या विषयावर बोलायचं आणि तशीच वेळ आली तर आण्णांना कायमचं पुण्याला घेऊन यायचं हे तिने ठरवूनच टाकलं होतं. मिरजेला उतरताच सिटी बसस्टाॅपवर ती येऊन थांबली आणि तिला अचानक आण्णाच समोरून येताना दिसले.हातात दोन जड पिशव्या घेऊन ते पायी चालत बस स्टॉपकडेच येत होते. त्याना त्याअवस्थेत पाहून सविताला भरूनच आलं एकदम. ती कासावीस झाली.तशीच पुढे झेपावली.

“आण्णा त्या पिशव्या द्या इकडे.मी घेते.” पाच पाच  किलो साखरेच्या त्या दोन जड पिशव्या होत्या.सविताच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली.

“सावू…तू..तू इथे कशी?” कपाळावरचा घाम रुमालाने  टिपत त्यांनी विचारले.त्यांचा थकून गेलेला निस्तेज चेहरा क्षणांत उजळला.

” मुद्दाम तुम्हाला भेटायलाच आलेय.”

“पण असं अचानक?”

“हो.भेटावं असं तीव्रतेने वाटलं,आले.कसे आहात तुम्ही?”

“कसा वाटतोय?”

“खरं सांगू? तुम्ही..खूप थकलायत आण्णा.” तिचा आवाज भरून आला.  

तेवढ्यात समोरून बस येताना दिसली न् मग सविता कांही बोललीच नाही. बसमधे सगळेच गावचे.ओळखीचे. सगळ्यांसमोर मोकळेपणाने बोलणे तिला प्रशस्त वाटेना.बस मधून उतरल्यानंतर मात्र ती घुटमळत उभी राहिली.

क्रमश:… 

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ Hospitalisation – एक असेही जुगाड… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ Hospitalisation – एक असेही जुगाड… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

“पारस, मारू एक काम कर ने, ” जुलै महिना चालू होता आणि अहमदाबाद येथील सान्नीध्य हॉस्पिटलच्या डॉ पारस यांना त्यांच्या एका डॉक्टर मित्राचा – जिग्नेशचा फोन आला होता.

“माझे दोन NRI पेशंट आहेत, ते ऑक्टोबर महिन्यात भारतात आहेत आणि त्यांना फुल बॉडी चेकप करायचे आहे. त्यांना एक दिवसासाठी admit करून घे, त्यांच्या रिकाम्या पोटीच्या fastingवाल्या टेस्टस् तू सकाळी करून घे, दुपारी १२ – १ पर्यंत ते रूममध्ये असतील, तोपर्यंत जेवणानंतरच्या टेस्टस् उरकून घे. ते झालं की मग दिवसभर त्यांना काय आपल्या शहरात फिरायचं असेल, त्यांची कामं करायची असतील ती ते करून घेतील, संध्याकाळी – रात्री आले, विश्रांती घेतली की दुसऱ्या दिवशी सकाळी तपासण्यांचे निकाल घेऊन ते डिस्चार्ज घेतील. हो जाएगा ये ?”

यात नाकारण्यासारखं काहीच नव्हतं, रूम्स उपलब्ध होत्या. मित्राने डॉ पारस यांना त्या दोघांचे फोन नंबर पाठवले, पारस यांनी त्या नंबरवर चाचण्यांची नावे, त्यांचे दर, आधी किती वेळ काही खायचं नाही, हॉस्पिटलमधील वेगवेगळ्या रूमचे दर वगैरे सर्व माहिती पाठवली.

पेशंटकडून त्यांची नावं, कोणत्या तारखेला टेस्ट करायच्या, कोणत्या टेस्ट करायच्या, कोणती रूम हवी ही सर्व माहिती व त्यानुसारचे पूर्ण पेमेंट आले, हॉस्पिटल रूम बुक झाली, पेशंटना आणण्यासाठी विमानतळावर अँब्युलन्स पाठवण्याची नोंद झाली, हे सर्व पारस यांनी मित्राला कळवलं आणि पारस यांच्या दृष्टीने तो विषय संपला.

पुढच्या आठवड्याभरात प्रत्यक्ष पेशंटकडून वा डॉक्टर मित्रांमार्फत अशा आणखी दोन तीन admission बद्दलच्या पृच्छा आल्या आणि नंतरही येतच गेल्या. सर्वच चौकशा ऑक्टोबर महिन्यासाठीच्या होत्या, आणि नोंदी नीट तपासल्यावर कळलं की या सर्व चौकशा १५ ऑक्टोबरला admit होण्यासाठीच होत्या.

काही NRI होते तर काही भारतातूनच वेगवेगळ्या गावांतून शहरांतून येणारे पेशंटस् होते. बघता बघता त्या तारखेच्या हॉस्पिटलच्या सर्व रूम बुक झाल्या.

रविवार असल्याने लोकांना सोयीचे असेल असं आधी डॉ. पारस यांना वाटलं, पण देशविदेशातून अनेकांना, तब्बल दोन महिन्यांनंतरच्या एकाच ठराविक दिवशी आपल्या आरोग्याची चिंता का वाटणार आहे हा प्रश्न डॉक्टरांच्या आकलन शक्तीपलीकडचा होता. त्यांच्या डोक्याला या प्रश्नाचा चांगलाच भुंगा लागला. न राहवून, दोन दिवसांनी जेव्हा डॉ. जिग्नेशची त्यांची भेट झाली, तेव्हा त्यांनी हा प्रश्न विचारलाच,

“ए जिग्नेस, आ पंदरमा अक्तूबरनी आ सू वात छे ? दूनियाभरसे आकर उसी दिन लोग admit हो रहे हैं ? मेरा तो उस दिन हॉस्पिटल फुल हो गया है. “

जिग्नेश पारसच्या निरागसतेवर गडगडाटी हसला, म्हणाला, ” पारस, कभी तो मेडिकल जर्नलके अलावाभी कुछ पढा करो. अरे इथे राहूनही तुला जर १५ ऑक्टोबर २०२३ चे दिनमहात्म्य माहीत नसेल तर कसं व्हायचं ?”

पारस, आधी होता त्यापेक्षा जास्त, बुचकळ्यात पडला.

“अक्तुबरसे क्रिकेट वर्ल्ड कप शुरू हो रहा है, पारस, और पंदरा तारीख को अपने शहरमें भारत पाकिस्तान का डे नाईट मॅच है. सारे हॉटेल्स, जो मन मे आए वो रेट्स बता रहे हैं, जो रूम पाच दस हजारका है, उसके लिये पचास हजार – लाख रुपये बोल रहे हैं और लोग उतने पैसे दे भी रहे हैं. “

या सगळ्या प्रकारात कोण्या एका अनामिक सुपीक डोक्यात, या अशा जुगाडाच्या आयडियेची, स्वार्थ आणि परमार्थ एकत्र साधणारी ही कल्पना आली…..

… दुपारी २:३० ते रात्री जवळजवळ १२ पर्यंत सामना असणार. त्यामुळे सकाळच्या वेळात आरोग्याच्या चाचण्या करून घ्यायच्या, झोपण्यापुरते हॉस्पिटलमध्ये यायचं आणि दुसऱ्या दिवशी परत जायचं, तेही हॉटेलच्या दरांपेक्षा अगदीच माफक दरात – जेमतेम दहा हजारांत. मॅच बघणंही होईल आणि हेल्थ चेकअपही……. जिग्नेश सांगत होता, आणि पारस तोंडाचा आ वासून ऐकत होता.

विमानतळावर लोकांना receive करण्यासाठी तऱ्हेतऱ्हेच्या गाड्या येतात, मात्र १५ ऑक्टोबरला अँब्युलन्सने विमानतळ सोडणारे प्रवासी खूपच जास्त असतील असा विचार त्यांच्या मनात आला, आणि ते खुदकन हसले.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘प्रश्नचिन्ह…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ ‘प्रश्नचिन्ह…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

शैलाताईंच्या डोळ्यांना धार लागली होती. विचार करकरून डोकं भणभणून गेलं होतं. त्यांची नजर वारंवार ईशाकडे जात होती. ईशा त्यांची नात आपल्या कॉटवर शांत झोपली होती. तिच्या निष्पाप चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. मान एका बाजूला कलली होती आणि तोंडातून लाळ गळत होती. एरवी वारंवार तिचं तोंड स्वच्छ करणाऱ्या शैलाताई आज मात्र स्तब्ध बसून होत्या. आपल्या नशिबात अजून काय काय  वाढून ठेवलंय कोण जाणे!

रामराव आणि शैलाताईंना तीन मुलगे. संजीव, संकेत आणि सलील. तिन्ही मुलांची लग्न होऊन त्यांनी स्वतंत्र संसार थाटले होते. संजीव मुंबईत, संकेत सांगलीत आणि सलील दुबईत. रामरावांच्या निधनानंतर संजीव आईला आपल्या घरी घेऊन आला होता. संजीवची बायको सानिकाशी त्यांचं छान जमायचं. इतर दोघी सुनांशीही भांडण नव्हतं, पण जवळीकही नव्हती तेवढी! नाशिकचं घर त्यांनी बंदच ठेवलं होतं.

ईशाच्या जन्मानंतर खरं तर घर किती आनंदात होतं. पण  लवकरच ती गतीमंद असल्याचं निदान झालं आणि तिचं संगोपन हेच एक आव्हान म्हणून उभं ठाकलं. त्याच सुमारास संजीवला एका मल्टिनॅशनल कंपनीत ऑफर आली आणि चांगलं  भारी पॅकेज मिळालं. त्यामुळे मग ईशाकडे लक्ष देण्यासाठी, सानिकानं आपला जॉब सोडला. शैलाताईंची मदत होतीच.

आणि गेल्याच वर्षी कंपनीच्या कामानिमित्त उत्तराखंडला जायला निघालेल्या संजीवचं विमान कोसळलं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. शैलाताई आणि सानिका या आघाताने कोलमडून गेल्या. कंपनीकडून आर्थिक मदत मिळाली पण सानिकाला काहीतरी धडपड करणं भागच होतं, घर चालवण्यासाठी!  शैलाताई एकट्या ईशाला कश्या सांभाळणार? हेही एक प्रश्नचिन्ह होतंच!

या संकटांचा मुकाबला करायच्या प्रयत्नात असतानाच  कोविडमुळे लॉ कडाऊन सुरू झाला. सानिकाच्या नोकरीच्या प्रयत्नांना त्यामुळे खीळ बसली. औषधं, दूध, भाजीपाला आणण्यासाठी,  अधून-मधून तरी सानिकाला घराबाहेर पडावं लागतंच होतं. सहा महिने कसेबसे गेले आणि तिलाही कोविडनी गाठलं आणि आठवड्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या सानिकाचा मृतदेहही घरी आणता आला नाही. संकटाच्या या मालिकेमुळे शैलाताई  दुःखानं पिचून गेल्या होत्या. 

कोविडमुळे एकमेकांकडे जाणंही बंद होतं. शेजारी – पाजारीदेखील दुरावले होते. माणुसकीच्या नात्याने कोणी-ना-कोणी जमेल तशी मदत करत होते. पण त्यांनाही मर्यादा होतीच. मुलं-सुना, नातेवाईक फोनवरून संपर्क साधत होते, पण रोजचा गाडा तर शैलाताईंनाच हाकायचा होता.ईशाला आता एखाद्या गतीमंद मुलांसाठीच्या संस्थेत दाखल करावं, असं त्यांच्या दोन्ही मुलांनी आडून आडून सुचवलं होतं. पण आपल्या या दुर्दैवी नातीला असं एकटं कुठेतरी ठेवायला, शैलाताईंचं मन तयार होत नव्हतं. शिवाय कोविडमुळे तेही सोपं नव्हतंच! एक-एक दिवस त्या कसाबसा ढकलत होत्या. 

आता आणखी सहा महिन्यांनंतर बाहेरची परिस्थिती हळूहळू निवळायला लागली होती. दुकानं, दळणवळण काही प्रमाणात सुरू झालं होतं. लोक  मास्क लावून घराबाहेर पडायला लागले होते. सर्व निर्बंध काही प्रमाणात शिथिल होऊ लागले.

अश्याच एका दुपारी त्यांच्या फ्लॅटची बेल वाजली. दाराची साखळी अडकवून त्या बाहेर डोकावल्या तर बाहेरच्या माणसानं आपलं ओळखपत्र दाखवलं. तो संजीवच्या कंपनीतून आला होता. त्याच्यामागे एक गोरटेला, मध्यम उंचीचा माणूसही होता. तो परदेशी वाटत होता.

एवढ्यात शेजारचे शिंदेकाका पण घरातून बाहेर आले. त्यांनी मग त्या दोघांची चौकशी केली आणि शैलाताईंना दार उघडायला हरकत नाही असं सांगितलं. घरात येताच तो परदेशी वाटणारा माणूस, शैलाताईंच्या पायावर लोळण घेऊन ओक्साबोक्शी रडायला लागला. त्या तर या प्रकाराने भांबावून गेल्या. तो काहीतरी बोलत होता पण त्यांना त्याची भाषा समजेना.मग संजीवच्या कंपनीतल्या माणसाने सगळा उलगडा केला.

हा परदेशी माणूस अकिरो.. जपानी होता. संजीवबरोबर तो कंपनीत कामाला होता. दोघांची पोस्टही सारखीच होती. उत्तराखंडला मिटिंगला खरंतर  अकिरोच जाणार होता. पण त्याची आई अत्यवस्थ असल्याचा फोन आल्यामुळे, तो अचानक सुट्टी घेऊन तातडीने जपानला गेला. त्याच्याऐवजी संजीव मिटिंगला गेला पण वाटेतच तो अपघात झाला. लॉकडाऊनमुळे अकिरो जपानमध्येच अडकून पडला. पण संजीवच्या मृत्यूला आपणच कारणीभूत झालो, अशी अपराधी भावना त्याला छळू लागली. पहिली संधी मिळताच तो भारतात आला आणि आज संजीवच्या घरी आला होता.

शैलाताईंना तर काय बोलावं तेच कळत नव्हतं. शिंदेकाकांनी त्या दोघांना शैलाताईंच्या सद्यस्थितीची कल्पना दिली. अकिरो खूपच भावुक झाला होता. आपल्या हावभावांद्वारे तो जणू शैलाताईंची माफी मागत होता. ईशाकडे बघून त्याचे डोळे सतत पाझरत होते. परत भेटायला येण्याचं आश्वासन देऊन ते दोघे निघून गेले.

आणि आज सकाळी ते दोघे परत आले. त्याने आणलेल्या प्रस्तावावर काय निर्णय घ्यावा या दुविधेत शैलाताई सापडल्या होत्या. अकिरोने ईशाला दत्तक घेण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याने व्हिडिओ कॉल करून आपलं घर आणि बायको व मुलगा यांची ओळख शैलाताईंना करून दिली. तो ईशाला जपानला आपल्या घरी घेऊन जाणार होता. त्यांच्या देशात अशा दिव्यांग, गतीमंद मुलांसाठी खूपच सुविधा उपलब्ध होत्या. आपल्याकडून नकळत का होईना पण जो अपराध घडला, त्याचं प्रायश्चित्त घेण्याची संधी मिळावी, अशी त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची विनंती आहे, हेच तो शैलाताईंचे पाय धरून सांगत होता.

एकीकडे ईशाचं सुरक्षित भवितव्य तर दुसरीकडे तिची आपल्यापासून कायमची ताटातूट, यात कशाची निवड करावी याचं उत्तर शोधण्याचा त्या प्रयत्न करत होत्या. 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाचवा कोपरा… भाग – 2 ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? जीवनरंग ?

☆ पाचवा कोपरा… भाग – 2 ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

(मित्रांशी गप्पा मारून , नेट वरून श्रद्धा ताईंनी “मित्र परिवार” वृद्धाश्रम निवडला. आणि एक दिवस निश्चयाचा उजाडला.) इथून पुढे — 

रात्रीच त्यांनी बॅग भरून ठेवली . दोन साड्या , दोनतीन मोजके ड्रेसेस आणि काही डायऱ्या , पुस्तकं , पेन बॅगेत टाकलं . बँकेचं पासबुक, चेकबुक , ए.टी.एम. कार्ड , आधार कार्ड , पॅनकार्ड , पासपोर्ट एका पाऊच मधे घातलं . ब्रश ,पेस्ट ,पावडर , टिकलीचं पाकीट , कंगवा घेतला. बॅग हॉलमधे ठेवली. 

त्यांना मिळालेल्या एका छोट्या कपाटातील सामान वेगळ्या सुटकेस मधे भरून ठेवले . कपाट रिकामं केलं .

सर्वांचा सकाळचा नाश्ता , डबे तयार करून ठेवले. देवाची पूजा केली . 

तोवर सकाळी तिघंही उठले . “आई ही बॅग ? कुठे निघालीस ?” असं मुलाने विचारलं . श्रध्दाताईने “मित्र परिवारचा” पत्ता सांगितला . म्हणाल्या , ” अरे वाईट वाटून घेऊ नका. सोहमला खोली हवीय. ती मी रिकामी केलीय. माझे अनेक मित्र मैत्रिणी आहेत परिवारात . स्वतंत्र खोली आहे तिथं. माझं छान निभेल तिथे. आणि याच शहरात आहे की मी. ही सोय आहे रे तात्पुरती .” 

मुलगा दुखावला , पण सूनबाईला मात्र मनातून आनंद झाला होता. विना औषधीने खोकला गेला होता. सोहम आता मोठा असल्याने तो शाळेतून आल्यावर फ्लॅटचा दरवाजा उघडून आत येऊ शकत होता. सोहम लहान असतानाचे तिचे गरजेचे दिवस संपले होते.

लगेच ताईंनी कॅब बुक केली. कुणाचेच चेहरे न वाचता त्या लिफ्टने खाली आल्या.

मित्र परिवारात त्यांचं छान स्वागत झालं . दोन तीन दिवसातच त्या तिथे रुळल्या . नवीन तंत्रज्ञानाशी त्यांनी नोकरीत असतानाच जुळवून घेतलं होतंच . इथे आणखी टेक्नोसॅव्ही मित्र मिळाले. सोशल मिडियावर त्या ॲक्टिव्ह झाल्या. पेन्शन होतीच. तब्येतीची कुरकुर नव्हती. आता त्यांनी खरंखुरं आयुष्य जगायला सुरुवात केली होती. 

इथे आल्यानंतर काही दिवसांतच एका पूर्वी लिहिलेल्या कादंबरीचं त्यांनी पुनर्लेखन केलं . रीतसर त्याचं पुस्तक झालं , ” पाचवा कोपरा ” .तीनच महिन्यात त्यांना तब्बल तीस लाखांची कमाई त्यांच्या पुस्तकाने करून दिली होती.

सकाळी त्यांनी ते चेक्स पेन्शन अकौंटला न टाकता मुलासोबतच्या अकौंटला टाकले. त्यांच्याच बँकेचे चेक्स असल्याने ते लवकरच जमा झाले . लंच ब्रेकमधे अचानक तीस लाखांचा क्रेडिट मॅसेज बघून मुलाचे डोळेच विस्फारले. त्याला कळेना हे कुठले पैसे? कारण एवढी मोठी रक्कम गोंधळात टाकणारी होती.

ऑफिसमधे सांगून त्याने सरळ बँक गाठली. तेव्हा त्याला एवढंच कळलं , की कुठल्या तरी प्रकाशन संस्थेचे ते चेक्स आहेत. पण आईकडे कसे? याचं उत्तर त्याला लगेच मिळालं नाही. तो घरी आला, पण पैशाबद्दल तो कुणाशी काहीच बोलला नाही .

कविता , कथा , कादंबरी , वैचारिक असं लेखन ताई करीतच राह्यल्या . आजवर मनात साठलेलं आता अक्षर रूप घेत होतं. पुस्तकं प्रकाशित होत होती.

काही काळातच ताईंच्या अकौंटने एक कोटीची रक्कम पार केली . 

मुलाला बँकेचे क्रेडिट मेसेजेस येतच होते.

साहित्याच्या बागेतलं असं कोणतंच फूल नव्हतं , की ते ताईंजवळ नव्हतं . सर्व साहित्य प्रकारांवर त्यांचं प्रभुत्व होतं. सर्वत्र संचार होता ताईंचा.

आताशा रोजच वृत्तपत्र , टी व्ही वर ताई असायच्या. आणि मुलाला सर्व उलगडा होऊ लागला . मात्र आईला भेटायला जाण्याची हिंमत त्याच्यात नव्हती.

आवडत्या छंदात रमल्याने ताईंची तब्येतही आता छान होती. पैसा, आणि प्रसिद्धी चारही बाजुंनी येत होती. आताशा त्यांना कार्यक्रमांना “हो ” म्हणणं कठीण होई इतके कार्यक्रम येऊ लागले. प्रसिद्धीच्या वलयानं ताई आणखीच तेजस्वी झाल्या होत्या.

मुलाला सुनेला त्यांची चूक कळली होती. पण ते बोलू शकत नव्हते. 

अशातच एक दिवस त्यांचे मुलाला पत्र आले . त्यांनी लिहिले होते ,” बाळ, सूनबाई आणि सोहम् ला धन्यवाद द्यायचेत मला. तुझ्या घरातून बाहेर पडल्यावरच मी स्वतः ला ओळखू शकले . तेही या वृद्धाश्रमात . आता मी खरी जगतेय. केवळ अन्न , वस्त्र , निवारा म्हणजे जगणं नव्हे . कला आणि साहित्याच्या क्षेत्रातल्या वावराने मला “मी ” कळले . माझ्यातली ऊर्जा मला जिवंत ठेवू शकली . तुम्हाला हवा तेवढा पैसा तुम्ही वापरून आता फोर बीएचके असं मोठं घर घेऊ शकता . कारण आपलं अकौंट जॉईन्ट आहे. आयदर ऑर सर्व्हायवर ऑपरेशन आहे. तू कितीही पैसे काढू शकतोस. तसेही शेवटी ते तुझेच आहेत. मला आता घराची गरज नाही . इथे मला ते मिळालंय . आणि महत्वाचं म्हणजे सम वैचारिक मित्र परिवार मिळाला . फक्त एक काम करशील माझं . काही आठवणीतले गरम कपडे आणि दुर्मिळ अशा आवश्यक पुस्तकांची एक बॅग तुझ्या घरीच आहे. शक्य असेल तर इथे आणून दे. तेवढीच भेट होईल आपली. बाळा , घराचा थकलेला *पाचवा कोपराही कधी कधी खूप उपयोगी ठरतो , हे लक्षात ठेव. सर्वांना आशीर्वाद ! थांबते. “

मराठी शब्दांची आणि वृद्धाश्रमाची ताकद आता बाळला आणि सुनबाईला कळली होती.

वृद्धाश्रम या शब्दाकडे कणव म्हणून बघितलं तर दया येते . संधी म्हणून बघितलं तर उत्तम तऱ्हेनं जगता येतं हे श्रद्धाताईंनी सिद्ध करून दाखवलं होतं. 

सकाळी वृद्धाश्रमाच्या अंगणात ताई मित्रांसोबत चहा घेत बसल्या होत्या. तेवढ्यात दाराशी रिक्षा थांबली . रिक्षातून सुप्रसिद्ध कवयित्री विजया ब्रह्मे उतरत होत्या . आणखी एक पाचवा कोपरा स्वतःला सिद्ध करणार होता.

– समाप्त – 

© प्रा.सुनंदा पाटील

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाचवा कोपरा… भाग – 1 ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? जीवनरंग ?

☆ पाचवा कोपरा… भाग – 1 ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

“श्रद्धा देसाई इथेच राहतात ना? “

बाहेरून आवाज आला तसे , “मित्र परिवार ” चे मॅनेजर सुशांत देशपांडे समोर आले. दारात अनोळखी दोन पुरूष आणि एक स्त्री उभे होते .

” आत या. इथेच राहतात मॅडम . काही काम होतं का?” देशपांडेंनी विचारलं .

 “भेटायचं होतं मॅडमना”, असं म्हणून ते तिघंही व्हिजिटर्स हॉलमधे बसले. गोपाळ मदतनीस आत निरोप घेऊन गेला . श्रद्धाताई लिहीत बसल्या होत्या . बाहेर आपल्याला भेटायला कोण आलं असेल हा विचार करतच त्या फ्रेश झाल्या. स्वच्छ पांढरी सलवार आणि आकाशी कुर्ता घातला . पांढरी ओढणी नीट घेतली . कापलेल्या केसावरून हात फिरवून नीट बसवले . वापरातला चष्मा काढून सोनेरी फ्रेमचा चष्मा घातला . मोबाईल घेतला .. चप्पल घालून त्या बाहेर आल्या. श्रद्धा ताईंना बघून भेटायला आलेले तिघेही उठून उभे राहिले. नमस्कार झाले . आलेल्या स्त्रीने प्रथम श्रद्धाताईचे हात हातात घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. म्हणाली , ” मी वैशाली . वैशाली राजे . “मॅडम तुमचं पाचवा कोपरा हे पुस्तक बेस्ट सेलर ठरलंय . हार्दिक अभिनंदन ” .

“प्रकाशनपूर्व पूर्ण आवृत्ती संपली पुस्तकाची . आता दुसरी काढतोय . ” मी रमाकांत जाधव  , मुख्य प्रकाशक . अभिनंदन मॅडम .” त्यांनी अभिनंदन करतच स्वतःची ओळख करून दिली.

जाधव साहेबांनी श्रध्दाताईंचे पुन्हा अभिनंदन करून त्यांना एक पाकिट दिलं . पाकिटात तीन चेक्स बघून श्रद्धाताईंना आश्चर्याचा धक्का बसला. पाच पाच लाखांचे दोन आणि दहा लाखांचा एक चेक होता .

त्यांचा गोंधळलेला चेहरा बघून जाधव साहेब हसले . म्हणाले , ” मॅडम आपलं  पुस्तक हिंदी , आणि इंग्लिश भाषेत अनुवादित होणार आहे. . प्रत्येकी पाच लाखांचा तो अॅडव्हान्स आहे. आणि आधीच्या मूळ मराठी पुस्तकाचे दहा लाख आहेत.

“दुसरी आवृत्ती वीस हजारांची काढावी म्हणतोय . त्यासाठी आपली परवानगी हवी होती. तेच पेपर्स मी आणलेत. ” एवढं बोलणं करून त्यांनी मॅनेजरकडे बघितलं . ती तिसरी व्यक्ती मॅनेजर देशमुख होते. त्यांनी श्रद्धाताईंना काही बाबी समजावून सांगितल्या . सह्या झाल्या. आणि दुसऱ्या आवृत्तीचा ॲडव्हान्स म्हणून जाधवांनी दहा लाखांचा आणखी एक चेक त्यांना दिला.

” श्रद्धाताई , “पाचवा कोपरा ” आणखी किती भाषांमधे येईल ठावूक नाही. मराठीच्या किती आवृत्या निघतील हेही माहीत नाही. फक्त तुमचं पेन शाबूत ठेवा . सही साठी . ” असं हसत म्हणून , पुन्हा भेटू म्हणत चहापाणी घेऊन मंडळी निघून गेली. 

संध्याकाळी जेवणापूर्वी सर्व “मित्र परिवाराने” श्रद्धा ताईंचे अभिनंदन केले. जवळच्या मित्रांनी “आता पार्टी हवी” म्हणून आग्रह केला.

सारं काही स्वप्नवत् होतं . काही वेळ अगदी जवळची मैत्रीण म्हणून त्या वसुधा पंडीतशी बोलत बसल्या . त्या झोपायला गेल्या तरी , श्रद्धाला झोप नव्हती . दुःखात झोप येत नाही , तशीच अत्यानंदानेही माणसाला झोप येत नाही . ताईंचे हेच झाले होते. 

त्यांची स्वतंत्र खोली होती. त्या आपल्या लेखनाच्या टेबलवर बसल्या . काही संदर्भ ग्रंथ , कागद आणि पेन एवढंच त्यांचं भांडवल होतं. . एक फोटो अल्बम होता . तो जुना फोटो अल्बम ताई चाळू लागल्या. तशा अनेक आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर तरळल्या.

वयाच्या तिशीत पतीचं निधन झालं होतं . नंतर पाच वर्षाच्या बाळाला त्यांनी एकटीनं  मोठं केलं होतं . स्वतःचं घर केलं होतं . नोकरी , घर , सासर माहेर सांभाळून बाळाला नुसतंच मोठं केलं नाही तर सक्षम बनवलं होतं . आई आणि बाबा होऊन.

यथावकाश शिक्षण , नोकरी करत बाळचं लग्न झालं . सुरवातीचे काही महिने बरे गेले. तेव्हा त्याही नोकरीत होत्या . श्रद्धा ताईंच्या निवृत्तीनंतर सुनेची वाघनखं बाहेर पडली होती. ती दोघंही नोकरीची असल्याने नातू आणि घर ही जबाबदारी ताईंवर आली . बाळाची केअर टेकर , पोळीवाली बाई बंद झाली. वाढत्या वयानंतर नोकरीतून माणूस निवृत्त होतो . पण बाईला संसारातून निवृत्त होताच येत नाही . उलट जबबाबदाऱ्या वाढतच जातात. तरीही त्या सांभाळून , श्रध्दाताई वेळात वेळ काढून आपला लेखनाचा छंद जपत होत्या. नेमकं तेच सुनेला खटकत होतं . लॅपटॉप वर , मोबाईलवर ती त्यांना लिहिण्याची कामच करू देत नसे. ” जागरण करू नका, आराम करा “अशी उसनी काळजी दाखवत त्यांचा छंद तिने जवळ जवळ बंदच केला होता. बाहेरचे सर्व कार्यक्रम बंद झाले होते ते एकटं जायचं नाही या कारणास्तव . वरून , या लेखनातून काय पैसा मिळणार आहे का? वाचतं कोण ही मराठी पुस्तकं आजकाल ? हे बोलणं असायचंच . तिला स्वतःची नोकरी म्हणजे भव्य दिव्य काहीतरी वाटत असे. कला ,गुण यांचा तिच्याशी काहीही संबंध नव्हता.

स्वतः जवळचा पैसा घालून मुलाला ताईंनी दोन बेडरूमचा फ्लॅट घ्यायला मदत केली होती. बारा तेरा वर्ष कशी बशी निघाली . आता नातू मोठा झाला होता. त्याला स्वतंत्र खोली हवीह होती. 

घरी मित्र आलेत , तर त्यांना कुठे बसवायचं यावरून सातवीत असलेल्या नातवाने एक दिवस म्हटलंच , ” मला आजीची खोली हवी . स्वतंत्र .”  

बाबांनी “नाही” म्हणताच तो चिडला . म्हणाला “तीन बेडरुमचा फ्लॅट  का नाही घेतलात? “

” अरे बाळा , आमची ऐपत नव्हती , आणि आजीकडेपण पैसा नव्हता . विचार तुझ्या आजीला . ” असं बोलायला सूनबाई चुकली नाही. सून बोलल्यानंतरही मुलगा गप्पच होता.

घर आणि नातवाची स्वतंत्र खोली यावरून घरात वारंवार खटके उडू लागले होते. नातू आजी सोबत खोली शेअर करायला तयारच नव्हता. 

एक दिवस कहरच झाला . सुनेनी सरळ फर्मान सोडलं की सोहम दुसऱ्या बेडरूममधे झोपेल. आईंनी हॉलमधे सोफ्यावर झोपावं .

दोन चार दिवस खूप विचार केला . चौकशा झाल्या . मुलगा ,सून ऑफिसला जात होते .

मित्रांशी गप्पा मारून , नेट वरून श्रद्धा ताईंनी “मित्र परिवार ” वृद्धाश्रम निवडला. आणि एक दिवस निश्चयाचा उजाडला .

– क्रमशः भाग पहिला. 

© प्रा.सुनंदा पाटील

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘पेसी अंकल…’ – भाग – २ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ ‘पेसी अंकल…’ – भाग – २ ☆ श्री सुनील काळे 

(ही कल्पना मी ताबडतोब मान्य केली कारण मला कमर्शियल आर्टच्या शिक्षणासाठी व पुण्यामध्ये वसतिगृहात राहण्यासाठी खर्च येत असे.) इथून पुढे —

पेसी अंकल हे पाचगणी येथील प्रसिद्ध व्यक्तिमत्व असले ,त्यांचा प्रचंड मोठा आठ एकर परिसरातील मेडस्टोन हा वंशपरंपरागत पारंपारिक बंगला असला तरी स्वभावाने मात्र ते अतिशय कंजूष होते .

त्यांच्याकडे खूप आर्थिक संपन्नता असली तरीही कित्येक वर्ष जुनी असलेली फियाट गाडी ते वापरत असत. त्यांना आलेले एकही पत्र ते कधीही फेकून देत नसत.  उलट या पत्र आलेल्या पाकिटाचा भाग असेल तो पूर्णपणे उघडून त्याच्या पाठीमागे ते पत्र लिहित आणि त्याचा उपयोग करत. (आजही त्यातील काही पत्र माझ्याकडे आहेत. ) त्यांच्याकडे येणारे सर्व कामगार अतिशय कमी पगारामध्ये काम करत असत.  त्यांच्या कंजूषपणाचे अनेक किस्से हे कामगार मला सांगत असत .

पेसी अंकल यांना एकूण तीन मुले व एक मुलगी होती.त्यांची तिन्ही मुले उच्च शिक्षण घेऊन इंग्लंडमध्ये स्थायिक झालेली होती. त्यांचे दहा-बारा एकरामध्ये प्रचंड मोठी आलिशान राजवाड्यासारखी घरे होती. पेसी अंकल पावसाळ्यामध्ये कधीकधी तीन-चार महिन्यांसाठी इंग्लंडला जात असत. तेथे वर्तमानपत्र वाचण्यासाठी दोन युरो (2×80=160 रुपये ) लागतात म्हणून ते वर्तमानपत्र अजिबात वाचत नसत.  तिकडची एकही वस्तू घेत नसत. तिकडचे राहणीमान हे भारतापेक्षा खूप महाग आहे हे त्यांच्या मनाने खूप गांभीर्याने घेतलं होते. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही मुलाबरोबर त्यांचे पटत नसे. शेवटी मी आपला पाचगणीतच बरा आहे आणि शेवटी मी पाचगणीतच मरेन असा निर्वाणीचा इशारा त्यांनी सर्व मुलांना, नातवंडाना दिला होता आणि तो इशारा त्यांनी शेवटपर्यंत पूर्ण केला .

पेसी अंकलने मला पाचगणी आर्ट गॅलरी व पांचगणी क्लब याठिकाणी प्रदर्शन करण्यासाठी खूप मदत केली ,त्याचप्रमाणे वेळोवेळी माझी चित्रकला विकत घेऊन माझ्या शिक्षणासाठी खूप मदत केली. त्यांची काही चित्रकलेची पुस्तके मला दिली. इंग्लडचे विन्सर अँड  न्यूटनचे महागडे रंग चित्रांच्या बदल्यात मला दिले. एकदा राज्यपाल पी.सी अलेक्झांडर, महात्मा गांधी यांनी लावलेल्या गुलमोहराच्या झाडाचे मी काढलेले चित्र घेण्यासाठी विरजींच्या बंगल्यावर आले, त्यावेळी पेसी अंकलचा आनंद गगनात मावत नव्हता.

मात्र एकदा माझे शिक्षण पूर्ण झाले, आणि  त्यावेळी मी पाचगणीला कायमचा राहण्यासाठी आलो होतो. असाच एके दिवशी मला पेसी अंकलचा निरोप आला. त्यांच्याकडे कोणीतरी जर्मनीमधून खास पर्यटक आलेले होते आणि त्यांना मेडस्टोन बंगल्याच्या पाठीमागचे कृष्णा व्हॅलीचे एक जलरंगातील चित्र हवे होते .मी माझे सर्व चित्रकलेचे साहित्य घेऊन बंगल्याच्या पाठीमागे छानपैकी चित्र रंगवत बसलो होतो. चित्र रंगवत असतानाच माझा छान मूड लागल्यामुळे मी आणखी काही चित्र रंगविण्यास सुरुवात केली. 

पेसी विरजींच्या मेडस्टोन बंगल्याच्या पाठीमागे एक खूप मोठी स्टोअर रूम होती . ती नेहमी उघडीच असे. दुपारच्यावेळी मला एक खुर्ची, व छोटे टेबल चित्र ठेवण्यासाठी पाहिजे होते म्हणून मी त्या स्टोअररूममध्ये गेलो .तेथे सहजपणे माझी नजर एक चित्रकलेची फाईल कोपऱ्यात होती तेथे गेली. मी ती फाईल सहज उघडली तर त्यामध्ये माझी शिकत असताना काढलेली निसर्ग चित्रे होती. ही सर्व चित्रे वेगवेगळ्या पर्यटकांना विकलेली आहेत असे मला पेसी अंकल यांनी सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र ही चित्रे पेसी अंकल यांनीच विकत घेतलेली आहेत हे मला समजत होते. व वेळोवेळी त्यांनी त्याचे पैसेही दिले होते. म्हणून पुढच्या क्षणी रागानेच मी ती फाईल घेऊन पेसी अंकल यांच्या ऑफिसमध्ये गेलो. 

अंकल त्यावेळी निवांतपणे पेपर वाचत होते .मी त्यांना विचारले की “ तुम्ही तर माझी चित्रे पर्यटकांना विकली आहेत असे सांगितले, पण चित्रे तर इथेच आहेत.  पण तुम्ही मला पैसे तर सगळे दिले. जर चित्रे विकली नव्हती तर तसं सांगायचे होते मला. असे का केले तुम्ही ? “

… त्यावेळी पेसी अंकल त्यांच्या खुर्चीतून उठले आणि मला त्यांनी कडकडून मिठी मारली आणि म्हणाले … ” सॉरी दिकरा ,तू त्या वेळेस शिकायला आर्ट कॉलेजमंदी पुण्यात होता … आणि तुला पैशांची गरज होती, मी तुला मदत म्हणून पैसे दिले असते तर ते तू घेतले नसते याची मला पूर्ण खात्री होती. पण तुला मदत करणे फार गरजेचं होते. म्हणून मी ही सगळी चित्रे वेळोवेळी पर्यटकांनी विकत घेतलेली आहेत असे मुद्दाम खोटेच सांगितले. आय ॲम रियली सॉरी फॉर दॅट… पण चांगल्या कामासाठी खोटा बोलले तर चालते, हे मला माहित आहे.” 

पेसीअंकल यांचं हे उत्तर ऐकून माझ्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले . कोण ? कुठला मी ? पण माझे शिक्षण पूर्ण व्हावे, मला पैशांची कमतरता जाणवू नये, म्हणून स्वतः पैसे पाठवून गेली चार वर्ष ते मला मदत करत होते. आणि ज्यांनी मला जन्म दिला, ते आणि इतर नातलग म्हणवणाऱ्या मंडळीनी माझी कधीही साधी विचारपूसही केली नाही . नात्यातला हा विरोधाभास कायम लक्षात राहिला.

मला अनेक वेळा हा प्रश्न विचारला जातो की “ पूर्ण चित्रकलेवर तुमचं जीवन कसं जगलं जातं ? कसं भागलं जाते ?” … 

… आज मला अभिमानाने सांगावेसे वाटते ही कला जिवंत ठेवण्यासाठी अशी पेसी अंकलसारखी माणसे आहेत, ज्यांना कला आणि कलाकार यांच्याविषयी आस्था, आपुलकी, प्रेम व मनापासून मदत करण्याची इच्छाशक्ती आहे, आणि म्हणूनच कलाकार व त्याची कला जिवंत राहू शकते.

१९९५ साली ‘ माझे प्रदर्शन मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये होणार आहे, त्या ठिकाणी उदघाटनासाठी सांस्कृतिक मंत्री येणार ‘  याचा माझ्यापेक्षा पेसी अंकल यांनाच  फार आनंद झाला होता. त्या प्रदर्शनासाठी अंकल आपली तब्येत बरोबर नसतानाही मोठ्या उत्साहाने जहांगीर आर्ट गॅलरीला आले होते. त्या प्रदर्शनांमध्ये व्यावसायिक यश मिळाल्यामुळे त्यांना खूपच आनंद झालेला दिसत होता. आपल्या गावाकडचा एक मुलगा जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन करतो याचे त्यांना फार कौतुक वाटत होते आणि ते सगळ्या लोकांसमोर बोलून दाखवत होते .पाचगणीत कायमस्वरूपी आर्ट गॅलरी करावी अशी त्यांची फार इच्छा होती. आणि मी सुरुही केली, पण कायमस्वरूपी टिकवू शकलो नाही याची खंतही कायम माझ्या मनात राहिली.

पुढे म्हातारपण आल्यामुळे पेसी अंकल पूर्णपणे थकले होते. हळूहळू डायबेटिस व इतर रोगांनी त्यांना पूर्णपणे घेरले आणि त्यातच त्यांचा अंत झाला .त्यांची पूर्ण प्रॉपर्टी आणि संपत्ती त्यांच्या बहिणीची मुलगी गीता चोक्सी हिने ताब्यात घेतली आणि हळूहळू त्यांचे सर्व सामान , फर्निचर, सर्व वस्तू विकून टाकल्या व अंतिमतः ती जागा व बंगला शेजारच्या बाथा स्कूलला मोठया किमतीमध्ये विकून टाकली… आणि माझा, पेसी अंकल व मेडस्टोन बंगल्याबरोबरचा संबंध कायमचा संपवला…

मी मात्र पेसी अंकलची इच्छा माझ्या ‘निसर्ग ‘ स्टुडीओ व बंगल्याची निर्मिती करून माझी बकेट लिस्ट पूर्ण केली आहे… आजही कोणीतरी सहज बोलता बोलता म्हणून जातात की हा तर पारशी माणसाचा बंगला वाटतो, त्यावेळी नकळतपणे माझे डोळे पाणवतात व वाटते पेसी अंकलला हे माझे घर नक्की आवडले असते व मोठयाने टाळ्या वाजवून ते परत परत म्हणाले असते …

” वेल डन माय बॉय, 

” वेल डन माय बॉय .. अॅटलास्ट यु कंम्लीटेड  युअर बकेट लिस्ट . यु डीड इट…” 

आजही मी ज्यावेळी शांतपणे विचार करतो त्यावेळी मला जाणवते की अशी पेसी अंकलसारखी माणसे माझ्या आयुष्यात आली नसती तर हा माझा चित्रकलेचा काटया -कुट्यातला, सदैव अडचणीतला प्रवास फार पूर्वीच संपुष्टात आला असता.

एखादे चांगलं चित्र झाले आणि मी शांतपणे ते चित्र पहात बसलो की आजही मला टाळ्यांचा आवाज येतो… आणि मोठ्या प्रेमाने कौतुकाचे शब्द ऐकू येतात 

” वेल डन माय बॉय, 

” वेल डन माय बॉय ” 

आणि मी मनातच नतमस्तक होऊन माझ्या ” निसर्ग ” बंगल्याच्या गझीबोमध्ये बसलेला असताना पेसी अंकलच्या ” मेडस्टोन ” बंगल्याच्या परिसराच्या  आठवणीत मनसोक्तपणे रमून जातो …

– समाप्त –

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वारी….सौ.आरती शुक्ल ☆ प्रस्तुती – सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ वारी….सौ.आरती शुक्ल ☆ प्रस्तुती – सौ.प्रभा हर्षे

आषाढी एकादशीसाठी वारीची लगबग सुरू झाली की मला हमखास आठवतात ते डॉक्टर गोडबोले. मध्यंतरी काही वर्ष माझी बदली पुण्यात झाली होती. तेव्हा त्यांच्याशी माझी ओळख झाली होती. डॉक्टर गोडबोले हे पुण्यातील एक प्रथितयश डॉक्टर. कर्वे रोडला त्यांचं हॉस्पिटल होतं. आणि डेक्कनला बंगला. प्रॅक्टिस जोरात चालली होती. आमची ओळख गेल्या चार वर्षातलीच. या भागात राहायला आल्यावर सकाळी फिरायला जाताना आमची ओळख झाली. दोघांना फोटोग्राफीची आवड असल्यामुळे मैत्री जुळायला वेळ लागला नाही. माणूस एकदम उमदा.  एवढा यशस्वी डॉक्टर असूनही अहंकाराचा स्पर्श नाही. एकदम डाऊन टू अर्थ म्हणतात तसा. त्यामुळे त्यांच्याबद्दल मनात एक वेगळाच आदर निर्माण झाला. 

एकदा आईला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. त्यावेळी या माणसाला अजून जवळून पाहता आलं. हसत खेळत, मिश्किल टिप्पण्या करत, आलेल्या पेशंटचा अर्धा आजार पळवून लावत ते. हॉस्पिटल मध्ये दोन बेड राखीव ठेवले होते. अगदी गरीब रुग्णांसाठी. उगीच महागड्या चाचण्या नाही. अव्वाच्या सव्वा बिलं नाहीत. सगळ्या रुग्णांशी सारख्याच आपलेपणाने वागणारे डॉक्टर बघताना त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला. 

वर्षभर काम करणारे डॉक्टर आषाढीच्या वारीसाठी आवर्जून सुट्टी घेत. हॉस्पिटलची जबाबदारी दुसऱ्या डॉक्टर मित्रावर सोपवून ते आपली गाडी, दोन सहाय्यक आणि औषधांचा साठा घेऊन वारीच्या मार्गावर निघत. जिथे जिथे वारीचा मुक्काम आहे तिथे जाऊन थांबत. गरजूंवर मोफत उपचार करत. शेवटच्या मुक्कामावरून शेवटचा वारकरी निघाला की पंढरीच्या दिशेने हात जोडून ते परतीच्या प्रवासाला लागत. या दिवसात ते वारकऱ्यांबरोबर राहत. त्यांच्यात बसून जेवण करत. गप्पा मारत. हे सगळं मला त्यांच्या मदतनिसाने सांगितलं. म्हणून यावेळी मी डॉक्टरांबरोबर वारीला जायचं ठरवलं. फोटोग्राफीसाठी येऊ का असं विचारल्यावर त्यांनी चला की म्हणून परवानगी दिली. 

माऊलींच्या पालख्या पुण्यातून बाहेर पडल्यावर आम्हीही गाडीतून निघालो. गप्पांच्या ओघात मी म्हणालो, 

“डॉक्टर तुमचं खरंच कौतुक आहे. इतक्या निस्वार्थ बुद्धीने लोकांची सेवा करायची, तेही स्वतःचे सगळे उद्योग सांभाळून हे सोप्पं नाही. परत या कानाची त्या कानाला खबर नाही. खरंच ग्रेट आहात तुम्ही !” डॉक्टर हसले. म्हणाले, ” यामागे काही कारण आहे. तुला इच्छा असेल तर ऐकवतो.” मी म्हणालो, ” सांगा ना डॉक्टर. मला खूप उत्सुकता आहे.” 

डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली. ” दहा वर्षांपूर्वी मी असा नव्हतो. प्रॅक्टिस चांगली चालली होती. भरपूर पैसा कमवत होतो. फार्म हाऊस, फ्लॅट अशा गोष्टींमध्ये गुंतवत होतो. हॉटेलिंग,  परदेश वाऱ्या, मोठ्या गाड्या अशा तथाकथित स्टेटस सिम्बॉलच्या मागे धावत होतो. फोटो काढायचे. त्यांचं प्रदर्शन भरवायचं, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मिळालेली बक्षिसं मिरवायची. आणि आनंद साजरा करायला पार्ट्या करायच्या .. हे आयुष्य होतं माझं. अशातच डोक्यात आलं वारीच्या मार्गावर फोटो काढावेत.  माझा महागडा कॅमेरा घेऊन मी गाडी घेऊन निघालो. रस्त्यात अनवाणी चालणारे, पावसात भिजणारे, मुक्कामाच्या ठिकाणी गप्पा मारत जेवत बसलेले वारकरी, असे वेगवेगळे फोटो काढत होतो. ते वारकरी माझ्याशी गप्पा मारायला बघायचे. मला त्यांच्यात जेवायला बोलवायचे. भजनाला बोलवायचे. पण त्या गरीब फाटक्या माणसांमध्ये मिसळणे माझ्या स्टेटसला शोभणारे नव्हते. मी त्यातल्या त्यात एखादं चांगलं हॉटेल बघून जेवायचो. झोपायचो.” 

“अशाच एका मुक्कामी मला आबा पाटील भेटले. सगळ्या वारकऱ्यांसोबत जेवत, गप्पा मारत, अभंग म्हणत त्यांच्या बरोबरीने पडतील ती कामं करत होते. मी फोटो काढत असताना ते माझ्याजवळ आले. स्वतःचं नाव सांगून मला जेवायचा आग्रह करू लागले. मी झिडकारून लावल्यावरही न रागावता माझ्याशी बोलत राहिले. पण मी फार प्रतिसाद दिला नाही. नंतरही अधून मधून ते भेटत राहिले मला. शेवटच्या वाखरी गावाच्या अलीकडे पोचेपर्यंत धुंवाधार पाऊस सुरू झाला. आणि गावाजवळ माझी गाडी बंद पडली. मी पावसात उभा राहून काही करता येतंय का ते बघितलं. पण गाडी काही सुरू झाली नाही. मी मात्र चिंब भिजलो होतो. शेवटी कॅमेरा गाडीत ठेऊन गाडी लॉक केली आणि धावत गावाकडे निघालो. गावातल्या एका देवळात जाऊन थांबलो. कपडे पूर्ण भिजलेले आणि बॅग गाडीत. त्यामुळे तसाच ओलेता बसून राहिलो आणि व्हायचं तेच झालं. थंडी वाजून ताप भरला.  गावाकडे यायच्या नादात कपडे औषधं सगळंच गाडीत राहिलं. तसाच कुडकुडत बसलो होतो. तेवढयात आबा पाटील देवळात शिरले. माझी अवस्था बघून माझ्याजवळ आले. म्हणाले कपडे तरी बदलून घ्या. म्हटलं गाडीत आहेत. तर म्हणाले चावी द्या घेऊन येतो. पण विचार केला कोण कुठला अडाणी माणूस हा !  याला गाडीची चावी कशी देऊ ? त्यांना माझे विचार कळले असावेत. त्यांनी त्यांच्या गाठोड्यातला सदरा आणि धोतर काढून दिलं. म्हणाले हे घाला. ओले बसू नका. मी नाईलाजाने कपडे बदलले. त्यांनी त्यांच्याकडची तापाची गोळी दिली. मी जेवलो का याची चौकशी केली. मी काही खाल्लं नाही म्हटल्यावर त्यांनी त्यांच्याकडच्या शिध्यामधून थोडा तांदूळ काढला. मागच्या बाजूला आडोसा बघून बाकीच्यांनी चूल पेटवली होती. त्यातच विनंती करून थोडी पेज बनवली आणि मला आणून दिली. खाऊन गोळी घेतल्यावर मला थोडं बरं वाटलं. पाटील बाजूलाच बसून राहिले होते.” 

“आता मला त्यांच्याशी बोलायची इच्छा झाली. कुठे राहता काय करता वगैरे विचारून झाल्यावर म्हणालो ‘किती वर्ष वारी करताय? ‘ तर म्हणाले ‘आई बापाच्या कडेवर बसायचो तेव्हापासून.’  एक वर्षही वारी चुकवली नव्हती त्यांनी. माझ्या आत्तापर्यंतच्या वागण्याची मलाच लाज वाटायला लागली होती. त्यांची क्षमा मागून त्यांना म्हणालो, “ मी तुमच्याशी नीट बोललोही नाही आणि तरी तुम्ही न रागावता माझ्यासाठी एवढं केलंत.” ते हसले आणि म्हणाले, “आज साठ पासष्ट वर्ष वारी करतो आहे. अशा कारणांवरून रागावलो तर ही सगळी वर्ष फुकट गेली म्हणायची. वारीला यायचं ते नुसतं पांडुरंगाला भेटायला नाही. ते तर कधीही येऊ शकतो. इथे माणसांमध्ये मिसळताना त्यांच्यातला देव दिसतो. माणसं कळायला लागतात. आपण कुठे आहोत तेही समजतं. एकमेकांशी गप्पा करताना लोकांची दुःखं कळतात. मिळून मिसळून एकमेकाच्या मदतीने काम करायची सवय लागते. दुसऱ्याला सांभाळून कसं घ्यायचं हे कळतं. वारी म्हणजे माणुसकीची शाळा असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहंकार गळून जातो. मी कोणीतरी मोठा आहे, खास आहे ही भावना मनात रहात नाही. आणि माऊलीच्या दर्शनाला जाण्यापूर्वी हाच अहंकार सोडून जायचं असतं ना ! इथे सगळे एकमेकांना देवा किंवा माऊली हाक मारतात. दुसऱ्या जीवामधल्या देवत्वाची जाणीव सतत मनात जागी रहाते. आणि मग आपोआपच नम्रपणा येतो अंगात.” 

त्यांचं हे बोलणं ऐकून मी खजील झालो होतो. आता परत ताप चढायला लागला होता. घरी जाणं गरजेचं होतं. पण गाडी चालवायची ताकद माझ्यात नव्हती. आबांनी खिशातून मोबाईल काढून एक फोन केला. मग मला म्हणाले, ‘ रात्रीपर्यंत व्यवस्था होईल घरी जायची.’  मी आश्चर्याने त्यांच्या तोंडाकडे बघतोय हे बघून ते म्हणाले, “ माझा मुलगा येतोय गाडी घेऊन.”  मी म्हणालो, “तुमच्याकडे गाडी आहे ?” ते हसायला लागले. म्हणाले, “ तीन आहेत. भली मोठी शेती आहे. फळबागा आहेत. एक मुलगा आणि सून डॉक्टर आहेत. गावातच  प्रॅक्टीस करतात. दुसऱ्या मुलाने शेतीचा अभ्यास केला आणि आता शेतात नवेनवे प्रयोग करतो. तो आल्यापासून पिकं जोमदार येतात. फळं पण बाहेरच्या देशात पाठवतो तो ”. माझं तोंड अजूनच वासलं. ‘ एवढं सगळं असूनही तुम्ही या लोकांबरोबर राहता खाता?’ ..  ते म्हणाले, “अहो माझ्यासारखे कितीतरी असतील या वारीत. स्वतःचं मूळ विसरायचं नसेल तर माणसानं वारीला नक्की यावं ”. 

रात्री गाडी आली. मी निघालो तसे तेही माझ्याबरोबर गाडीत बसले. मी म्हणालो, “अहो उद्या तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे पांडुरंगाचं. तुम्ही कशाला येता. वारी अर्धवट राहील तुमची. पांडुरंग रागवेल.” तसे खोखो हसत म्हणाले, “अहो देव आहे तो. रागवायला तो काय माणूस आहे तुमच्या माझ्यासारखा? मुलगा गाडी चालवेल. तुम्हाला काही लागलं तर कोण बघेल? म्हणून येतो. आणि दर्शनाचं म्हणाल तर तुम्हाला अडचणीत एकटं सोडून घेतलेलं दर्शन मला आणि माझ्या पांडुरंगालाही आवडायचं नाही. तुम्ही निर्धास्त रहा.” 

मला पुण्याला सोडून माझा फोन नंबर घेऊन ते बाप लेक लगेच घरी निघाले. आग्रह करूनही थांबले नाहीत . दोन दिवसांनी त्यांचा फोन आला. माझ्या तब्येतीची चौकशी करून म्हणाले, “ तुम्हाला आनंदाची बातमी द्यायला फोन केला. मुलाच्या नव्या शेतात विहीर खोदताना पांडुरंगाची मूर्ती मिळाली. आषाढीलाच. तुम्हाला टोचणी राहील मला दर्शन घेता आलं नाही याची म्हणून सांगायला फोन केला.” मी स्तब्ध झालो. त्या एका वारीनी माझं आयुष्य, माझी मतं संपूर्ण बदलून टाकली. माझ्या विचारांची मलाच लाज वाटायला लागली. तेव्हापासून मी बदललो. आणि दरवर्षी वारीत जाऊन त्या सगळ्या भक्तांमध्ये मिसळायला लागलो. जेवढी जमेल तेवढी लोकांची सेवा करायला सुरुवात केली.” 

… डॉक्टरांची गोष्ट ऐकून मीही भारावलो. नकळत पांडुरंगाला हात जोडले. बाजूने जाणाऱ्या वारकऱ्यांचा टाळ चिपळ्याच्या तालातला जयघोष कानावर पडला.  विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल !

लेखिका : सौ आरती शुक्ल

प्रस्तुती : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘शिक्षक सेवक…’- भाग ४ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ ‘शिक्षक सेवक…’- भाग  ४ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(मागील भागात आपण पाहिले –‘तुम्हाला मुलांना समुद्रावर मोकळ सोडायला कोणी सांगितल होत? आता काय जबाब देणार पालकांना? आता तेथल्या पोलिसांना तक्रार द्या. दुसरा काही उपाय दिसत नाही मला.’ अस म्हणून जोंधळेंनी खाड्कन फोन आपटला. आता इथून पुढे)

पाटणकर घाबरले. चव्हाण मॅडम थरथरु लागल्या. कोण मुल आलेली नाहीत याची चौकशी करताना संस्थेच्या सदस्या साळगांवकर मॅडम यांची कन्या आलेली नव्हती. पाच वाजले तरी मुलं आली नाहीत. शेवटी पाटणकरांनी कळंगुट पोलिस स्टेशनला तक्रार दिली. दोघांची नावे आणि फोटो दिले. इन्स्पेटर ने जवळपास कुठल्या बिचवर सतरा-अठरा वर्षाची मुलं समुद्रात बुडाली होती काय ? याची चौकशी केली. सुदैवाने त्या दिवशी संपूर्ण गोव्यात कसलीही  दुर्घटना झाली नव्हती. मग इन्सपेटरनी कळंगुट च्या आसपास सर्व हॉटेल्स, बीअर बार, लॉजेस मध्ये फोटो पाठवून चौकशी करण्याची ऑर्डर दिली. यावेळेपर्यंत गाडीत बसलेल्या मुलांनी आपापल्या घरी ही बातमी कळविली होती. त्यामुळे गावात सगळीकडे ही बातमी पसरली. पाटणकरांना आणि चव्हाण मॅडमना फोनवर सतत फोन येत होते. पण त्यांनी ते न घेण्याचे ठरविले.

पंधरा मिनीटांनी एका बार वाल्याचा मेसेज आला. सव्वा तीन वाजता एक मुलगा आणि एक मुली आपल्या बार मध्ये बीअर पीत बसली होती. मग ते टॅसीच्या शोधात रस्त्यावर फिरत होते. ताबडतोब शहरातील सर्व टॅसीवाल्यांची चौकशी झाली. रात्री आठ वाजता निरोप आला. एका टॅसीवाल्याने दोघांना कर्नाटक सीमेपर्यंत सोडल होत. तेथील आजूबाजूच्या लॉजवर चौकशी केली गेली आणि रात्री नऊ वाजता एका लॉज मध्ये हा मुलगा आणि मुली सापडली.

गावात जोरदार चर्चा सुरु झाल्या. त्यात साळगांवकर बाईंची मुलगी असल्याने जास्त खमंग चर्चा. एव्हाना गावातून दहा-बारा गाड्या माणसे भरुन कळंगुट पोलिस स्टेशन कडे आल्या होत्या. साळंगावकर बाई आणि तिचा नवरा पोलिस स्टेशनमध्ये आले आणि ते पाटणकरांना शिव्या घालू लागले. रात्री अकरा वाजता पोलिसांनी त्या मुलांना कळंगुट पोलिस स्टेशनवर आले. कळंगुटच्या आमदाराच्या मदतीने सर्व प्रकरण मिटवले आणि पालकांनी मुल आपल्या ताब्यात घेतली आणि रात्री बारा वाजता सहलीसाठी बाहेर पडलेली मुलं, पाटणकर सर, चव्हाण मॅडम आणि गावाकडून आलेल्या गाड्या गावाकडे निघाल्या. पाठीमागुन साळगांवकर मॅडम, साळगांवकर आणि त्यांच्या वाडीतील अनेकजण येत होते. साळगांवकर आणि साळगांवकर मॅडम दात ओठ खात होते. अख्या गावात तोंड दाखवायला जागा नव्हती आणि हे सर्व त्या पाटकरांमुळे. साळगांवकर बाई बडबडू लागल्या. तरी मी चेअरमनांना सांगत होते. ‘त्या मुर्ख माणसाला शाळेत घेऊ नका. पण चेअरमन म्हणाले सहा हजारात या गावात कोण येणार?’

साळगांवकर, शिव्या घालत बोलू लागला. त्या चेअरमनला मग बघतो. आधी या पाटणकराला बघतो. एकतर मुलांना बीचवर एक तास सोडला आणि मग पोलिस तक्रार करतो. केवढी बेअब्रु झाली माझी. नाही या पाटणकरला ठार मारला तर नावाचा साळगांवकर नाही.

‘अहो,त्याला ठार मारु नका हा. तुरुंगात जाल. मोडून ठेवा फत. आधीच या कार्टीची मला काळजी लागली. त्या पोराबरोबर पळून जात होती. आता हीची शाळा बंद. मुंबईला ताईकडे पाठविते हिला आणि लग्न करुन देते.’

मिराशींच्या घरात पण जोरात चर्चा सुरु होती. मिराशी बायकोला सांगत होते.

‘त्या साळगांवकराचा पॉर लय चालू आसा. तेच्या बापाशीक मी सांगलेलय ह्या कोणाकोणाबरोबर फिरत असता. तेचा लवकर लगीन लावन टाक पण झाला ता बरा झाला. साळगांवकरनीचो तोरो जरा कमी होतोलो. नाहीतरी चेअरमनांच्या संगतीत हीका वाटा होता सगळी शाळा आपल्या खिशात.’

एवढ्यात भयभीत झालेली पाटणकरांची बायकोवनिता आपल्या मुलाला कमरेवर मारुन आली. मिराशींना म्हणाली. ‘भावोजी, शाळेकडे माणसा जमली आसत. पाटणकरांका मोडून ठेवतलव असा बडबडतत. माका भीती वाटता. ’

‘वहिनी घाबरु नकात . मी कसा काय ता बघतयं. मी पण शाळेकडे जातय.’ अस म्हणून मिराशी आपल्या स्कूटरवर बसून शाळेकडे गेले. घाबरलेल्या वनिताने आपल्या भावाला कनेडीत फोन केला आणि त्याला ही बातमी सांगितली आणि साळगांवकरच्या वाडीतले लोक पाटणकरांना मारण्याची भाषा बोलत आहेत अशी बातमी दिली. भाऊ म्हणाला, वनिता घाबरू नकोस. मी दहा मिनिटात गाडी घेऊन निघतय.

रात्रौ अडीच वाजता सहलीची बस शाळेकडे पोहोचली. मुलांचे पालक शाळेकडे उभे होतेच. मुल पटापट उतरली आणि आपल्या पालकांकडे गेली. पाटणकर, चव्हाण बाई उतरले. बस पाठोपाठ साळगांवकरांची गाडी आली. दारु पिऊन टाईट झालेल्या साळगावकराने कमरेचा पट्टा काढला आणि तो पाटणकरांना बडवू लागला. सर्व पालक पाटणकर पट्टयाचा मार कसा खातात याची मजा घेत होते. एवढ्यात मिराशी पुढे आले आणि साळगावकरांनी उगारलेला पट्टा त्यांनी हवेतच हातात पकडला आणि खेचून घेतला. मिराशी ओरडून म्हणाला, ‘हरामखोर साळगांवकरा, या गरीब मास्तराक मारतस? तुझ्या पोरीन शेण खाल्ल्यान आणि त्या मास्तराक जबाबदार धरतस?’

‘मग? त्याने मुलांना बीचवर का सोडल? आणि मग पोलिस तक्रार का केली?’

‘अरे, मुलं सहलीला गेली होती ना? मनासारखं फिरु दे त्यांना म्हणून सोडली. बाकीची वीस मुलं वेळेत गाडीत आली. तुझा चेडू आणि तो फर्नाडिसाचो झील तेवढे पळाले ह्या दोघांका मी देवळाच्या पाठीमागे कितीवेळा बघलय. तुका सांगलेलय ह्या चडवार लक्ष ठेव. आता पाटणकरांवर हात उचलशीत तर मुळासकट उपटून टाकीन लक्षात ठेव.’

साळगांवकर जळफळत होता. पाटणकरांना आई-बहिणीवरुन शिव्या देत होता. एवढ्यात कनेडीहून पाटणकरांचा मेहूणा दोन गाड्या भरुन माणसे घेऊन आला. पटापट दरवाजे उघडले गेले आणि हातात दांडे घेतलेले दहा जण बाहेर आलेत. पाटणकरांच्या मेहुण्याने हातात सुरा घेतला आणि पट्टा हातात घेतलेल्या साळगांवकराच्या मानेवर लावला.

‘वा रे मुडद्या, या गरीब शिक्षकावर हात टाकतस? कित्या तो शिक्षण सेवक आसा म्हणून? पैशानं गरीब आसा म्हणून? भानगडी केल्यान तुझ्या चेडवान आणि या पट्टयान मारतस या मास्तरास. थांब तुझो कोथळो बाहेर काढतय.’

पाटणकरांच्या मेहुण्याने सुरा पोटावर लावताच साळगांवकर रडू लागला. हातापाया पडू लागला. साळगांवकरांची मित्रमंडळी एवढी सगळी  दांडे हातात घेतलेली माणसे बघून पळू लागली. मिराशी पुढे झाले आणि त्यांनी मेहुण्याला थांबविले. ‘रक्तपात करु नको बाबा. पोलिस मागे लागतले. एकवेळ सोड तेका.’

मेहुण्याने सुरा बाजूला केल्या आणि साळगांवकरांच्या दोन थोबाडीत दिल्या. बरोबरीच्या साथीदारानी दांड्यानी त्याच्या पाठीवर मारले. साळगांवकर गुरासारखा ओरडू लागला. मिराशीनी दोघांना दूर केले. मग मेव्हण्याने साळगांवकरांच्या मानेला धरले आणि उचलून पाटणकरांच्या पायावर घातले. पाया पड तेंच्या. अरे डबल ग्रॅज्युएट माणूस आसा तो. शिक्षण सेवक झालो म्हणून तुमका तेंची किंमत नाय. साळगावकर लंगडत लंगडत बाजूला झाला. मग मेहुणा पाटणकरांकडे वळला. पाटणकरांची पाठ, मान, दंड रक्ताने माखले होते.

‘चला भावोजी, तुमका डॉटरकडे नेऊन मलमपट्टी करुक होयी आणि आजपासून ह्या गाव आणि ही शिक्षण सेवकाची नोकरी सोडायची. तुम्ही कितीही हुशार असलात कितीही शिक्षण घेतलात तरी तुम्ही शिक्षण सेवक झालात की तुमची किंमत शून्य. ही असली नोकरी करण्यापेक्षा मी तुमका धंदो काढून देतय.’

मेहुण्याने पाटणकरांना गाडीत घेतले. वाटेत बहिणीच्या घरी जाऊन घरातील सर्व सामान आणि बहिणीला आणि तिच्या मुलाला घेऊन कणकवली गाठली.

पंधरा दिवसांनी कणकवलीत ‘पाटणकर हेअर कटींग सलून एसी’ सुरु झाला. पाटणकरांच्या मेहुण्याने आपला अनुभवी कारागिर सोबत दिला. हळूहळू पाटणकरांनी सर्व शिकून घेतले. दोन महिन्यांनी ते सलून मध्ये व्यवस्थित काम करु लागले. पाटणकर हेअर कटींग सलूनला लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला. एका वर्षात दुसरे सलून कणकवली स्टेशनजवळ काढले.

आता पाटणकर मजेत आहेत. व्यवसायात चांगले पैसे मिळवत आहे. बायको -मुलगा खूष आहेत. तरीपण पाटणकरांच्या झोपेत आर्किमिडीज, न्यूटन येतो. स्पेट्रम थिअरी येते. सरफेस टेंशन येते आणि मग अजून आपण शिक्षण सेवक असल्याचे त्यांच्या स्वप्नात येते आणि ते घाबरतात. मग जाग आल्यावर आपण पाटणकर हेअर कटींग सलून चे मालक असल्याचे तेंच्या लक्षात येते आणि ते कुशीवर वळतात आणि ते गाढ झोपी जातात.

 – समाप्त – 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print