प्रा. सुनंदा पाटील

? जीवनरंग ?

☆ पाचवा कोपरा… भाग – 1 ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

“श्रद्धा देसाई इथेच राहतात ना? “

बाहेरून आवाज आला तसे , “मित्र परिवार ” चे मॅनेजर सुशांत देशपांडे समोर आले. दारात अनोळखी दोन पुरूष आणि एक स्त्री उभे होते .

” आत या. इथेच राहतात मॅडम . काही काम होतं का?” देशपांडेंनी विचारलं .

 “भेटायचं होतं मॅडमना”, असं म्हणून ते तिघंही व्हिजिटर्स हॉलमधे बसले. गोपाळ मदतनीस आत निरोप घेऊन गेला . श्रद्धाताई लिहीत बसल्या होत्या . बाहेर आपल्याला भेटायला कोण आलं असेल हा विचार करतच त्या फ्रेश झाल्या. स्वच्छ पांढरी सलवार आणि आकाशी कुर्ता घातला . पांढरी ओढणी नीट घेतली . कापलेल्या केसावरून हात फिरवून नीट बसवले . वापरातला चष्मा काढून सोनेरी फ्रेमचा चष्मा घातला . मोबाईल घेतला .. चप्पल घालून त्या बाहेर आल्या. श्रद्धा ताईंना बघून भेटायला आलेले तिघेही उठून उभे राहिले. नमस्कार झाले . आलेल्या स्त्रीने प्रथम श्रद्धाताईचे हात हातात घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. म्हणाली , ” मी वैशाली . वैशाली राजे . “मॅडम तुमचं पाचवा कोपरा हे पुस्तक बेस्ट सेलर ठरलंय . हार्दिक अभिनंदन ” .

“प्रकाशनपूर्व पूर्ण आवृत्ती संपली पुस्तकाची . आता दुसरी काढतोय . ” मी रमाकांत जाधव  , मुख्य प्रकाशक . अभिनंदन मॅडम .” त्यांनी अभिनंदन करतच स्वतःची ओळख करून दिली.

जाधव साहेबांनी श्रध्दाताईंचे पुन्हा अभिनंदन करून त्यांना एक पाकिट दिलं . पाकिटात तीन चेक्स बघून श्रद्धाताईंना आश्चर्याचा धक्का बसला. पाच पाच लाखांचे दोन आणि दहा लाखांचा एक चेक होता .

त्यांचा गोंधळलेला चेहरा बघून जाधव साहेब हसले . म्हणाले , ” मॅडम आपलं  पुस्तक हिंदी , आणि इंग्लिश भाषेत अनुवादित होणार आहे. . प्रत्येकी पाच लाखांचा तो अॅडव्हान्स आहे. आणि आधीच्या मूळ मराठी पुस्तकाचे दहा लाख आहेत.

“दुसरी आवृत्ती वीस हजारांची काढावी म्हणतोय . त्यासाठी आपली परवानगी हवी होती. तेच पेपर्स मी आणलेत. ” एवढं बोलणं करून त्यांनी मॅनेजरकडे बघितलं . ती तिसरी व्यक्ती मॅनेजर देशमुख होते. त्यांनी श्रद्धाताईंना काही बाबी समजावून सांगितल्या . सह्या झाल्या. आणि दुसऱ्या आवृत्तीचा ॲडव्हान्स म्हणून जाधवांनी दहा लाखांचा आणखी एक चेक त्यांना दिला.

” श्रद्धाताई , “पाचवा कोपरा ” आणखी किती भाषांमधे येईल ठावूक नाही. मराठीच्या किती आवृत्या निघतील हेही माहीत नाही. फक्त तुमचं पेन शाबूत ठेवा . सही साठी . ” असं हसत म्हणून , पुन्हा भेटू म्हणत चहापाणी घेऊन मंडळी निघून गेली. 

संध्याकाळी जेवणापूर्वी सर्व “मित्र परिवाराने” श्रद्धा ताईंचे अभिनंदन केले. जवळच्या मित्रांनी “आता पार्टी हवी” म्हणून आग्रह केला.

सारं काही स्वप्नवत् होतं . काही वेळ अगदी जवळची मैत्रीण म्हणून त्या वसुधा पंडीतशी बोलत बसल्या . त्या झोपायला गेल्या तरी , श्रद्धाला झोप नव्हती . दुःखात झोप येत नाही , तशीच अत्यानंदानेही माणसाला झोप येत नाही . ताईंचे हेच झाले होते. 

त्यांची स्वतंत्र खोली होती. त्या आपल्या लेखनाच्या टेबलवर बसल्या . काही संदर्भ ग्रंथ , कागद आणि पेन एवढंच त्यांचं भांडवल होतं. . एक फोटो अल्बम होता . तो जुना फोटो अल्बम ताई चाळू लागल्या. तशा अनेक आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर तरळल्या.

वयाच्या तिशीत पतीचं निधन झालं होतं . नंतर पाच वर्षाच्या बाळाला त्यांनी एकटीनं  मोठं केलं होतं . स्वतःचं घर केलं होतं . नोकरी , घर , सासर माहेर सांभाळून बाळाला नुसतंच मोठं केलं नाही तर सक्षम बनवलं होतं . आई आणि बाबा होऊन.

यथावकाश शिक्षण , नोकरी करत बाळचं लग्न झालं . सुरवातीचे काही महिने बरे गेले. तेव्हा त्याही नोकरीत होत्या . श्रद्धा ताईंच्या निवृत्तीनंतर सुनेची वाघनखं बाहेर पडली होती. ती दोघंही नोकरीची असल्याने नातू आणि घर ही जबाबदारी ताईंवर आली . बाळाची केअर टेकर , पोळीवाली बाई बंद झाली. वाढत्या वयानंतर नोकरीतून माणूस निवृत्त होतो . पण बाईला संसारातून निवृत्त होताच येत नाही . उलट जबबाबदाऱ्या वाढतच जातात. तरीही त्या सांभाळून , श्रध्दाताई वेळात वेळ काढून आपला लेखनाचा छंद जपत होत्या. नेमकं तेच सुनेला खटकत होतं . लॅपटॉप वर , मोबाईलवर ती त्यांना लिहिण्याची कामच करू देत नसे. ” जागरण करू नका, आराम करा “अशी उसनी काळजी दाखवत त्यांचा छंद तिने जवळ जवळ बंदच केला होता. बाहेरचे सर्व कार्यक्रम बंद झाले होते ते एकटं जायचं नाही या कारणास्तव . वरून , या लेखनातून काय पैसा मिळणार आहे का? वाचतं कोण ही मराठी पुस्तकं आजकाल ? हे बोलणं असायचंच . तिला स्वतःची नोकरी म्हणजे भव्य दिव्य काहीतरी वाटत असे. कला ,गुण यांचा तिच्याशी काहीही संबंध नव्हता.

स्वतः जवळचा पैसा घालून मुलाला ताईंनी दोन बेडरूमचा फ्लॅट घ्यायला मदत केली होती. बारा तेरा वर्ष कशी बशी निघाली . आता नातू मोठा झाला होता. त्याला स्वतंत्र खोली हवीह होती. 

घरी मित्र आलेत , तर त्यांना कुठे बसवायचं यावरून सातवीत असलेल्या नातवाने एक दिवस म्हटलंच , ” मला आजीची खोली हवी . स्वतंत्र .”  

बाबांनी “नाही” म्हणताच तो चिडला . म्हणाला “तीन बेडरुमचा फ्लॅट  का नाही घेतलात? “

” अरे बाळा , आमची ऐपत नव्हती , आणि आजीकडेपण पैसा नव्हता . विचार तुझ्या आजीला . ” असं बोलायला सूनबाई चुकली नाही. सून बोलल्यानंतरही मुलगा गप्पच होता.

घर आणि नातवाची स्वतंत्र खोली यावरून घरात वारंवार खटके उडू लागले होते. नातू आजी सोबत खोली शेअर करायला तयारच नव्हता. 

एक दिवस कहरच झाला . सुनेनी सरळ फर्मान सोडलं की सोहम दुसऱ्या बेडरूममधे झोपेल. आईंनी हॉलमधे सोफ्यावर झोपावं .

दोन चार दिवस खूप विचार केला . चौकशा झाल्या . मुलगा ,सून ऑफिसला जात होते .

मित्रांशी गप्पा मारून , नेट वरून श्रद्धा ताईंनी “मित्र परिवार ” वृद्धाश्रम निवडला. आणि एक दिवस निश्चयाचा उजाडला .

– क्रमशः भाग पहिला. 

© प्रा.सुनंदा पाटील

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments