मराठी साहित्य – विविधा ☆ कालाय तस्मै नमः ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ कालाय तस्मै नमः ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘मग्न’ हा सकारात्मकतेच्या शिडकाव्यांनी बहरून येणारा अर्थपूर्ण शब्द आहे असं म्हटलं तर ते अतिशयोक्तिचं  होणार नाही ‘ याच्याशी मी अगदी परवा परवापर्यंत तरी नक्कीच पूर्णतः सहमत झालो असतो पण आज नाही. कारण नुकतीच घडलेली एक दुर्घटना या समजाला परस्पर छेद देऊन गेलीय आणि म्हणूनच मग्नतेचं ते अकल्पित विद्रूप मला विचार करायला प्रवृत्त करतेय.

लहान मुलं खेळात रममाण होत असतात, वाचनाची आवड असणारे वाचनात गर्क होतात, एखादा आळशी माणूसमुध्दा त्याच्या आवडीचं काम मात्र नेहमीच तन्मयतेने करीत असतो, काहीतरी निमित्त होतं आणि मनात निर्माण येणाऱ्या उलट सुलट विचारांमुळे आपण विचारमग्न होऊन जातो, नामस्मरण करताना साधक तद्रूप होतं असतो, गायक गाताना तसंच श्रोते त्याचं गाणं ऐकताना अगदी तल्लीन होऊन देहभान विसरुन जातात,कोणतेही काम मनापासून करणारे त्यांच्या कामात क्षणार्धात गढून जातात. या प्रत्येकाच्या बाबतीत त्या त्या वेळी वेळेचे भान नसणे, तहानभूक विसरणे हे ओघाने येतेच. इथे वर उल्लेखलेली रममाण, गर्क, तन्मय, विचारमग्न, तद्रूप   तल्लीन, देहभान विसरणे,  वेळेचे भान नसणे, तहानभूक विसरणे गढून जाणे ही सगळी शब्दरूपे म्हणजेच मग्न या शब्दाचीच

विविधरंगी अर्थरुपे आहेत ! निमग्न, तदाकार, धुंद, चूर, एकरूप, गढलेला, मश्गूल, व्यग्र,समाधिस्थ, ही सुध्दा मग्नतेची सख्खी भावंडेच!

मग्न या शब्दात अशी विशुद्ध सकारात्मकताच ठासून भरलेली आहे याबाबत एरवी दुमत असायचं काही कारणच नव्हतं. पण नुकत्याच घडलेल्या एका घटनेने मग्न या शब्दातली सकारात्मकता कांही अंशी का होईना प्रदूषित केलेली आहे असेच मला वाटू लागलेय.

‘गरज ही शोधाची जननी आहे ‘ असं म्हणतात. विज्ञानाच्या मदतीने लावले गेलेले विविध शोध हे गरजेच्या पूर्ततेसाठीच असले तरी त्यांचा वापर गरजेपुरताच करायची गरज मात्र सर्रास दुर्लक्षिलीच जात असते. नित्योपयोगी उपकरणे असोत वा करमणुकीची साधने कुणीच याला अपवाद नाहीत. तत्पर प्रसारासाठी शोधलं गेलेलं मोबाईलतंत्र हे याचे प्रतिनिधिक उदाहरण!

मोबाईलचा अतिरेकी वापर करताना बहुतांशी सर्वांनाच ताळतंत्र राहिलेलं नाही हेच खरे.विशेषत: कानाला इअरपाॅड लावून मोबाईल ऐकण्यात मग्न होत भरधाव वाहने चालवणारे नकळतपणे जसे स्वतःचा जीव पणाला लावत असतात तसेच इतरांचा जीव जायलाही निमित्त ठरत असतात. पण याची जाणीव नसणे हे ठेच लागल्यानंतरही न येणाऱ्या शहाणपणा सारखेच असते.

अशी एखादी दुर्घटना आपल्या परिचितांपैकी कुणाच्यातरी बाबतीत घडते तेव्हाच आपल्याला त्याची झळ तीव्रतेने जाणवते याला मीही अपवाद नव्हतोच. मिरजेला रहाणारे माझे एक भाचेजावई. निवृत्तीनंतरचं कृतार्थ आयुष्य समाधानाने जगणारे. निवृत्तीनंतरही स्वतःची जमीन आवड म्हणून स्वतः कसणारे.ते एक दिवस नेहमीप्रमाणे पहाटे फिरायला म्हणून बाहेर पडले. परतीच्या वाटेवर असताना नुकतेच उजाडलेले.रहदारीही तुरळक.ते रस्त्याच्या कडेने शांतपणे चालत असताना मोबाईलवर बोलण्यात मग्न असणाऱ्या एका मोटारसायकलस्वाराने त्यांना मागून धडक देऊन उडवले.अंगाखाली दडपल्या गेलेल्या डाव्या हाताच्या कोपराच्या हाडाचे फ्रॅक्चर आणि जबरदस्त मुका मार यामुळे ते अडीच-तीन महिने जायबंदी होते.त्यांची विचारपूस करायला त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांची केविलवाणी अस्वस्था पाहून मी अस्वस्थ झालो.’नशीब डाव्या हाताचे कोपर फ्रॅक्चर झालेय,तो उजवा हात असता तर माझं कांही खरं नव्हतं’ हे स्वतःचं दुःख विसरून हसत बोलणाऱ्या त्यांच्या विचारातली सकारात्मकता कौतुकास्पद वाटली खरी तरीही त्या मोटरसायकलस्वाराच्या मोबाईल मग्नतेचं काय? हा प्रश्न निरुत्तर करणाराच राहिला. यासंबंधी कायदे कितीही कडक असले तरी व्यवहारातली त्याची उपयुक्तता फारशी व्यावहारिक नसतेच. अशा घटना टाळण्यासाठी

‘कालाय तस्मै नमः’ म्हणत जे जे होईल ते ते पहात न  रहाता नको त्या गोष्टीतल्या अशा हानिकारक मग्नतेतली नकारात्मकता प्रत्येकानेच वेळीच ओळखायला हवी एवढे खरे.

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गुलाबी हवा… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ गुलाबी हवा… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

डिसेंबरचा महिना होता,सगळीकडे ख्रिसमसची धूम होती. बाजारपेठा आकर्षक वस्तूने सजल्या होत्या. खेळणी, कपडे,खाऊ,केक,ख्रिसमस ट्री,सगळीकडे आनंदी आनंद आणि उत्साह भरलेला होता.पाईन -देवदारच्या गच्च फांद्यात निवांत झोपलेली हवा पहाट होताच चटकन उठली.सगळीकडे अजून अंधार होता. झाडाच्या एका फांदीला शरीराला पिळदार वळण देत लटकून तिनं आळोखे पिळोखे दिले, मग हलकेच झोका घेत फांद्याच्या आधाराने हळुवार  ती जंगलातून बाहेर आली. गुलाबी फुलांचे ताटवे सगळीकडे बहरले होते. ती ताटव्यावर येऊन जरा पहुडली… इतक्यात पाखरांचा किलबिलाट कानावर आला,’आता आळस करून चालणार नाही,आपल्याला निघायलाच हवं ‘ ती स्वतःशीच पुटपुटली. गुलाबी ताटव्यावरून उठताच तिचं लक्ष स्वतःकडे गेलं. तिचा रंग गुलाबी झाला होता ! तिला खूप छान वाटलं. मंद मंद शीळ घालत ती वेळूच्या बेटातून हळुवार निघाली.

निशिगन्ध, शेवंती, जाई -जुई सर्वांना हलकेच स्पर्श करताच सर्व सुगन्ध तिच्या अंगाला लागला. तिला खूप प्रसन्न वाटले.मंद मंद हसत ती पुढे निघाली.  भल्यामोठ्या बागेत एक पांढरी इमारत तिला दिसली. ती कुतूहलाने आत शिरली. भल्या मोठ्या गोल घंटेभोवती तिनं स्वतःला वेढले व हलकेच एक झोका घेतला तसे घंटा किणकिणू लागली.  सर्वत्र दिवे झगमगत होते, फुलांची आरास होती. ती अजून आत गेली.सर्वत्र शांतता होती. समोर क्रुसाला लटकलेली शुभ्र मूर्ती होती.तिने मूर्तीला वळसा घातला अन पुन्हा घंटेजवळ आली. तिचा हलकासा स्पर्श होताच घंटा पुन्हा किणकिणू लागली. ती बाहेर आली.सूर्याची पिवळी,तांबूस सोनेरी किरणे वाट काढत बागेत लपाछपी खेळत होती.  तिनं किरणांत प्रवेश केला. तिचं सर्व अंग गुलाबी -सोनेरी दिसू लागलं.  तिला मज्जा वाटली.बागेतल्या तळ्यापाशी येऊन ती हलकेच विसावली.बदकांचा एक थवा पाण्यात सावकाश पोहत होता.पाण्यावर सोनेरी किरणं तरंगत होती. तिनं पाण्यावर हलकेच फुंकर मारली तसे किरणांनी  पाण्यावर हेलकावे खायला सुरुवात केली. सोनेरी पाण्याचे ते तरंग हेलकावे खातानाचे मनोहारी दृश्य पाहून ती हरखून गेली.मग तिनं हळूच बदकांच्या थव्यावर फुंकर घातली.  त्यांची मऊ पांढरी शुभ्र पिसे वाऱ्याने विस्कटू लागली अन ते हेलकावे खात खात आपोआप पाण्याच्या त्या तरंगावरून पुढे जाऊ लागले. तिला गंमत वाटली.

इतक्यात तिला कुणाच्या तरी रडण्याचा आवाज आला.ती पटकन तिकडे गेली.एक लहान मुलगा थंडीने कुडकुडत होता.ती त्याच्याजवळ गेली तिच्या ऊबदार स्पर्शाने लपेटले, त्या मुलाला बरे वाटले.ती आणखीन पुढं गेली. रस्त्याकडेला बऱ्याच झोपड्या होत्या.तिने एका झोपडीत हळूच डोकावले.फुंकर मारून मारून एक स्त्री चूल पेटवत होती, धुराने झोपडी गच्च झाली होती. तिच्या नाकातोंडात धूर गेला. तिला गुदमरू लागले,ती तशीच थोडावेळ डोळे बंद करून थांबली अन चुलीत जाळ पेटला ! जाळ होताच सर्व धूर बाजूला झाल, त्या स्त्रीला हायसे वाटले,हवा तिथून बाहेर पडली.

भटकत भटकत ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आली. उंच टेकडीवर एक मंदिर दिसले.पायऱ्या चढून ती वर आली अन पायरीवर विसावली अन आतले दृश्य पाहू लागली. देवाच्या प्रसन्न मूर्तीपुढं दिवा तेवत होता,मूर्ती फुलांच्या ताज्या हाराने सजली होती. ताज्या फुलांमुळे ती अजूनच सजीव वाटत होती.उदबत्तीचा सुगंध तिच्या शरीरावरील सुगंधासारखाच होता.एक तरुण जोडपे मूर्तीसमोर हात जोडून उभे होते.प्रार्थना संपताच ते बाहेर आले.बाहेर येताच  तिला जवळ घेऊन तो हळूच काही पुटपुटला अन दूर गेला.तिच्या डोळ्यात अश्रू आले.ती तिच्याजवळ गेली अन गालांवर विसावली तसे तिचे गाल गुलाबी झाले.  मग तो मागे फिरला अन कानात हळूच बोलला,” धीर धर,मी लगेच परत येईन,सीमेवर माझी आता गरज आहे,असा जातो न असा येतो “.तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले तसे हवा खुदकन हसली अन तिथून दूर गेली. 

आता ती रानात गेली अन पिकांतून वाहू लागली.पिके आनंदाने डोलू लागली,पाखरे दाणे टिपू लागली, तीही आनंदाने बागडू लागली, पाखरांची गाणी ऐकून आनंदून गेली, मग फळांच्या झाडांवरून झोके घेत वेगवेगळ्या फळांना स्पर्श करू लागली.आंबट गोड सुवास तिच्या अंगाला लागला.शेतकरी शेतात काम करत होते. ती हळूच जवळ गेली. घामाने निथळलेल्या त्यांच्या शरीराला झुळुकीचा स्पर्श होताच त्यांना हायसे वाटले.

आता ऊन चांगलेच तापले होते. तिचा रंग लाल झाला.आंब्याच्या भल्यामोठ्या झाडाखाली तिनं विश्रांती घेतली.गार गार सावलीत तिला  झोप लागली.

तिला जाग आली तेव्हा सूर्याची किरणे मावळतीला गेली होती. आता तिला घरी परतायला हवं होतं.ती झपाट्याने चालू लागली; त्याच रस्त्याने भरभर ती परतली…. आनंदाने गीत गात, आणि पुन्हा तिच्या घरात जाऊन शांतपणे विसावली.

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दगड… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ दगड… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

शाळेत बाई म्हणाल्या, “आपल्या आवडत्या विषयावर निबंध लिहा.”

एका मुलाने निबंध लिहिला…

विषय – दगड.

‘दगड’ म्हणजे ‘देव’ असतो,

कारण तो आपल्या आजूबाजूला

सगळीकडे असतो..

पाहिलं तर दिसतो..

 

अनोळख्या गल्लीत तो

कुत्र्यापासून आपल्याला वाचवतो…

 

हायवेवर गाव

केव्हा लागणार आहे, ते दाखवतो…

 

घराभोवती कुंपण बनून रक्षण करतो…

 

स्वयंपाकघरात

आईला वाटण करून देतो…

 

मुलांना झाडावरच्या

कैऱ्या, चिंचा पाडून देतो…

 

कधीतरी आपल्याच डोक्यावर बसून भळाभळा रक्त काढतो आणि आपल्याला शत्रूची जाणीव करून देतो…

 

माथेफिरू तरुणांच्या हाती लागला तर, काचा फोडून त्याचा राग शांत करतो…

 

रस्त्यावरच्या मजुराचं

पोट सांभाळण्यासाठी

स्वत:ला फोडून घेतो…

 

शिल्पकाराच्या मनातलं

सौंदर्य साकार करण्यासाठी

छिन्नीचे घाव सहन करतो…

 

शेतकऱ्याला झाडाखाली क्षणभर विसावा देतो…

 

बालपणी तर स्टंप,

ठिकऱ्या, लगोरी अशी

अनेक रूपं घेऊन आपल्याशी खेळतो…

 

सतत आपल्या मदतीला

धावून येतो, ‘देवा’ सारखा…

 

मला सांगा,

‘देव’ सोडून कोणी करेल का

आपल्यासाठी एवढं ?

 

बाई म्हणतात –

“तू ‘दगड’ आहेस.

तुला गणित येत नाही.”

 

आई म्हणते,

“काही हरकत नाही,

तू माझा लाडका ‘दगड’ आहेस.”

 

देवाला तरी कुठे गणित येतं ! नाहीतर त्याने फायदा-तोटा बघितला असता,

तो व्यापारी झाला असता.

 

आई म्हणते,

“दगडाला शेंदुर फासून

त्यात ‘भाव’ ठेवला की,

त्याचा ‘देव’ होतो.”

 

म्हणजे, ‘दगड’ ‘देव’ च असतो.

 

निबंधाला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.

 

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ कागदी होडी… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ कागदी होडी ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

बालपणातला पाण्यात  कागदाची होडी करून सोडणे हा खेळ खेळण्यातला आनंद काही औरच असतो नाही…पूर्वापार हा खेळ चालत आलेला आहे… अरे पाण्यात जाऊ नका भिजायला होईल, सर्दी पडसं होईल असा काळजीपोटी घरच्यांच्या रागवण्याला अक्षतांच्या वाटाण्या लावून हा खेळ खेळण्याची मजा लुटणे हा तर बालकांचा नाद खुळा असतो. बालकांचं कशाला तुम्हा आम्हा मोठ्या माणसांना देखील अजूनही त्यात गंमतच वाटत असतेच की… पाण्याच्या प्रवाहात आपली कागदी बोट अलगदपणे सोडताना किती काळजी घेत असतो, कधी ती पटकन वाहत वाहत पुढे पुढे जाते तर कधी सुरुवातीलाच पाण्यात  आडवी होते भिजते मग काही केल्या ती सरळ होतच नाही ती तशीच पुढे पुढे वाहत जाते.. मन जरा खट्टू होतं..पण चेहऱ्यावर उमलणारा तो आनंद मात्र शब्दातीत असतो… कधी एकट्याने तर कधी मित्र मैत्रिणींच्या सोबत हा खेळ खेळायला जास्त मजा येते… माझी पहिली तुझी दुसरी, त्याची मागेच राहिली तर अजून कुणाची वाटेत अडकली.. नकळतपणे स्पर्धेचं स्वरूप येते.. वेळंचं भान हरपून   खेळात मग्न झालेले मन सगळं विसरायला लावतं.. शाळेची वेळ आणि हा खेळ एकमेकांशी घटट नातं असलेला असतो… अभ्यास नको पण खेळ मात्र हवा अशी  मुलं मुली अगदी बिनधास्तपणे हा खेळ खेळण्यासाठी मागेपुढे पाहत नाही… मग कुणी आई ताई दादा बाबा तिथं येऊन पाठीत धपाटे घालून ओढून नेतात. तेव्हा मात्र मान वेळावून सारखं सारखं पुढे पुढे जाणाऱ्या त्या होडी कडे मन आणि लक्ष खिळलेले असतं.. विरस मनाला होडीचा क्षणैक आनंद पुढे बसणारा  मार नुसता झेलत राहतो.. 

.. खरंतर या खेळातच आपल्या जीवनाचं सारं दडलंय असावं असं मला वाटतं.. प्रवाहात आपली जीवननौका अशीच जात असते… आपण काळजी कितीही घेतली तरी वाटेतल्या प्रवाहात अनेक अडथळे, भोवरे यांना पार करून आपल्याला आपल्या इप्सिताचा किनारा गाठायचा असतो ते ही आनंदाने… हेच तर तो खेळ सुचवत असतो… पण अजाण वयात निखळ आनंदा पुढे हे कळणार कसे… आणि मोठे होते तेव्हा हा आनंदाला विसरणे कधीही शक्य होणार नसते… बालपणीचा काळ सुखाचा आठवतो घडी घडी… पाण्यासंगे पुढे चालली माझीच ती होडी होडी… 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पर्यटन – एक अनुभव…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “पर्यटन – एक अनुभव…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

पर्यटन हा बहुतेकांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. मात्र पर्यटन ह्या विषयाकडे वळतांना प्रत्येक जण वेगवेगळ्या अँगल ने विचार करुन त्याची दिशा ठरवितात. काही व्यक्ती निसर्गसौंदर्याचा विचार करुन तशी स्थळं नि्डतात तर काही द-याख़ो-या,गड किल्ले ह्यामध्ये रमतात. काही देवदर्शनासाठी नवसाला पावणा-या सुप्रसिद्ध देवस्थानांची निवड करतात तर काही आपापल्या गावी असलेल्या कुलदेवतांकडे आपला मोर्चा वळवितात.

पर्यटनाला कुठेही जावं पण जेथे जाऊ तेथली इत्यंभूत माहिती,तिथला इतिहास, हवामान, भौगोलिक परिस्थिती, त्या स्थानाचे वैशिष्ट्य हे सगळं माहितीपूर्ण अभ्यासून घ्यावं.

खेदाची बाब अशी की हल्ली त्या फ़ोटो व सेल्फी ह्यांच्या अतिरेकी आवडीने आपण त्या निसर्गसौंदर्याचे, त्या स्थानाचे महत्त्व ना धड डोळ्याने टिपंत,ना मनावर बिंबवत,ना मेंदूत ठसवतं. आपल्या इंद्रियांना निकामी करुन फक्त तंत्रज्ञानावर अवलंबून असण्याची ही सवय तशी घातकच.

ह्या बाबतीत आम्ही उभयता दोघेही आणि आमचा लेक आधी सगळे डोळ्या़ंनी बघणार, हिंडून सगळं अभ्यासणार, संपूर्ण माहिती गोळा करणार आणि मग जसा वेळ उरेल तसे फोटो काढणार. आजकाल सर्रास एखाद्या स्थळी लोक पोहोचल्या पोहोचल्या आधी सेल्फी व फोटोसेशन नी मग लगेच त्या फोटोंचे सोशलमिडीया वर अपलोडींग. आजकाल सोशलमिडीया वर कुटूंबाचे वा मित्रमैत्रीणींचे फोटो टाकले तरच प्रेम वा मैत्री असं नसतं कारण सोशल मिडीयावरील फेसबुक, व्हाँटसअप हे सगळं आभासी जगं असतं. असो काही स्थळं ही आपण आयुष्यात बघायचीच असं ठरविलेल्या काही स्थळांपैकी एक कन्याकुमारी. अहो,मी आणि व्यंकटेश आम्ही तिघही कन्याकुमारी स्मारकावर पोहोचलो तो क्षण आम्हा तिघांसाठी अविस्मरणीय असा  क्षण होता. त्या स्थळाचे पावित्र्य, शांतता बघून आम्ही तिघही एकमेकांशी न बोलता स्तब्धतेनं ते सगंळ वैभव डोळ्यात साठवायला लागलो. हे सगळं आज आठवायचे कारण म्हणजे आजच्या तारखेला म्हणजे सात जानेवारी ला ह्या स्थानकाचे काम पूर्ण झाले होते.

विवेकानंद स्मारक  हे तामिळनाडूच्या कन्याकुमारी शहरात स्थित एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. 1892 मध्ये स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले. एके दिवशी ते पोहत या प्रचंड खडकावर पोहोचले. या निर्जन स्थळी साधना केल्यानंतर जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी त्यांना मार्गदर्शन लाभले होते. आणि ह्या स्थळाला परमहंस ह्यांच्या शिष्याने अजरामर केले.विवेकानंदांच्या त्या अनुभवाचा संपूर्ण जगाला फायदा झाला, कारण त्यानंतर काही वेळातच ते शिकागो परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले होते. या परिषदेत सहभागी होऊन त्यांनी भारताचे नाव उंचावले होते.

1970 मध्ये स्वामी विवेकानंदांच्या स्मृती प्रित्यर्थ  त्या प्रचंड खडकावर एक भव्य स्मारक  बांधण्यात आले. समुद्राच्या लाटांनी वेढलेल्या या खडकापर्यंत पोहोचणे हाही एक वेगळा अनुभव असतो. खळाळत येऊन त्या खडकवर आदळणा-या महाकाय लाटा बघितल्यावर परत एकदा पंचमहाभूतांचे अस्तित्व मनाला स्पर्शून गेले.

स्मारक इमारतीचा मुख्य दरवाजा अतिशय सुंदर आहे. अजिंठा-एलोरा लेण्यांतील दगडी शिल्पांची प्रकर्षाने आठवण येते. लाल रंगाच्या दगडाने बनवलेल्या या स्मारकाला 70 फूट उंच घुमट आहे.इमारतीच्या आतील बाजूस चार फुटांपेक्षा उंच व्यासपीठावर ज्ञानी,धीरगंभीर  स्वामी विवेकानंद यांची आकर्षक मूर्ती आहे. ही मूर्ती पितळेची असून, तिची उंची साडेआठ फूट आहे. ही मूर्ती इतकी प्रभावी आहे की त्यात स्वामीजींचे व्यक्तिमत्त्व जिवंत असल्याचे दिसते.जमिनीच्या किनार्‍यापासून सुमारे 500 मीटर अंतरावर समुद्रात असलेल्या दोन खडकांपैकी एकावर बांधले गेले आहे. एकनाथ रानडे यांनी विवेकानंद स्मारक मंदिर बांधण्याचे विशेष कार्य केले. एकनाथ रानडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह होते. समुद्रकिनाऱ्या पासून पन्नास फूट उंचीवर बांधलेले हे भव्य आणि प्रचंड दगडी बांधकाम जगाच्या पर्यटन नकाशावर एक महत्त्वाचे आकर्षण ठरले आहे. तेथे विवेकानंद ह्यांच्या वरीले पुस्तके, त्यांच्या स्मरणार्थ तयार केलेल्या दिनदर्शिका, डाय-या ह्यांचे दालन आहे .

स्मारक तयार करण्यासाठी समुद्रकिना-यावर असलेल्या वर्कशॉपमध्ये सुमारे 73 हजार प्रचंड दगडांचे ब्लॉक्स कलाकृतींनी सुसज्ज केले गेले आणि समुद्र मार्गाने खडकापर्यंत नेले गेले. यातील किती दगडी तुकड्यांचे वजन 13 टनांपर्यंत होते. याशिवाय स्मारकाच्या मजल्यासाठी वापरल्या जाणार्‍या दगडी ब्लॉक्सच्या आकृत्या आहेत. या स्मारकाच्या उभारणीसाठी सुमारे 650 कारागिरांनी 2081 दिवस रात्रंदिवस काम केले. या मंदिराच्या दगडी शरीराला आकार देण्यासाठी एकूण 78 लाख मानवी तास खर्ची पडले. 2 सप्टेंबर 1970 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. व्ही. तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भव्य समारंभात गिरी यांनी स्मारकाचे उद्घाटन झाले.

कन्याकुमारी बघून आल्यावर प्रकर्षाने जाणवले खरंच आपला भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तीन धडे… श्री नारायण मूर्ती ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? मनमंजुषेतून ?

तीन धडे… श्री नारायण मूर्ती ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

जेव्हा मी लहान होतो, त्यावेळेस मी खूप स्वार्थी होतो आणि स्वतःसाठी उत्तमोत्तम गोष्टी हिसकावून घेत होतो. हळू हळू सर्वजण माझ्यापासून दूर होत गेले आणि मला एकही मित्र राहिला नाही. 

माझ्या वडिलांनी माझ्या जीवनात मदत व्हावी म्हणून मला तीन गोष्टींची शिकवणूक दिली. 

एके दिवशी माझ्या वडीलांनी दोन वाट्या नूडल्स केले आणि नूडल्सच्या दोन्ही वाट्या टेबलावर ठेवल्या. एका वाटी मधील नूडल्स वर एक अंडे ठेवले होते व दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते. त्यांनी मला सांगितले, “बेटा, तुला कोणती वाटी हवी आहे ती तू  घेऊ शकतो.”

त्यावेळी अंडे मिळणे कठीण होते! आम्हाला केवळ सणासुदीच्या दिवशी किंवा नवीन वर्षाच्या दिवशीच फक्त अंडे खायला मिळत असे. 

म्हणूनच मी ज्या  वाटीत अंडे होते ती वाटी निवडली! आम्ही जेवण करायला सुरुवात केली, तेव्हा मी स्वतःला खूप बुद्धिमान समजून स्वतःला शाबासकी देत अंडे खाण्यास  सुरुवात केली. 

जेव्हा माझ्या वडिलांनी नूडल्स खाणे सुरू केले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यांच्या वाटीत नूडल्सच्या खाली दोन अंडी होती! तेव्हा मला खूपच पश्चात्ताप झाला. मी निर्णय घेण्यास खूप घाई केली म्हणून मी स्वतःला दोषी मानू लागलो. माझे वडील हसले आणि त्यांनी मला सांगितले,  “बाळा, नेहमी लक्षात ठेव जसे दिसते तसे खरेच असते असे नाही. जर तुमची वृत्ती लोकांचा फायदा घेण्याची असेल तर नुकसान तुमचेच आहे. शेवटी तुमची हारच होईल.”

दुसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले : एका वाटीत वर एक अंडे होते आणि दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते. पुन्हा त्यांनी त्या दोन वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या व मला सांगितले, “बाळा, तुला जी वाटी हवी असेल ती घे.”

ह्यावेळी मी जरा हुशारी दाखवली ! मी अंडं नसलेली वाटी निवडली. मला फार आश्चर्य वाटले जेव्हा मी नूडल्सला वर खाली हलवले तेंव्हा त्यात एकही अंडे नव्हते.

पुन्हा माझे वडील हसले आणि मला म्हणाले, “बाळा, तू नेहमी आपल्या आधीच्या अनुभवावर विश्वास ठेवता कामा नये कारण जीवनात खूप अनिश्चितता असते. कधी कधी, वन तुम्हाला धोका देऊ शकते किंवा तुमच्याशी कुणी कपट करू शकतो. अशा अनुभवाने तुम्ही नाराज किंवा दुःखी होता कामा नये, फक्त तो अनुभव एक शिकवणूक म्हणून स्वीकारला गेला पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. या गोष्टी तुम्ही पुस्तके वाचून शिकू शकणार नाही.”

तिसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले, एका  वाटीच्या वर एक अंडे होते आणि दुसऱ्या वाटी वर एकही अंडे नव्हते. त्यांनी दोन्ही वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या आणि मला सांगितले, “ बाळा, तू निवड आता तुला कुठली वाटी हवी आहे? ”

या वेळी मी माझ्या वडिलांना सांगितले की, “आधी तुम्ही घ्या, कारण तुम्ही घरातील प्रमुख व्यक्ती आहात, आणि कुटुंबासाठी तुम्ही खूप योगदान दिले आहे.”

माझ्या वडिलांनी नाही म्हटले नाही व ज्या वाटीवर  एक अंडे ठेवले होते ती वाटी निवडली. जेव्हा मी माझ्या वाटीतील नूडल्स खाण्यास सुरुवात केली तेव्हा मला खात्री होती की माझ्या वाटीत अंडे निघणार नाही. परंतु जेव्हा माझ्या वाटीत दोन अंडी निघाली, तेव्हा मी खूपच आश्चर्यचकित झालो !

माझ्या वडिलांनी  प्रेमपूर्वक माझ्याकडे पाहून हसून मला सांगितले, ” माझ्या बाळा, हे कधीही विसरु नकोस  की तू जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या भल्याचा विचार करतोस, तेव्हा तुमच्याबाबतीत ही नेहमी चांगलेच होते !”

मला माझ्या वडिलांची ही तीन वाक्ये नेहमी आठवतात आणि मी त्यानुसार माझा व्यवहार आणि उद्योग करतो. हे खरेच आहे, की मला माझ्या उद्योगात त्यामुळेच सफलता मिळाली आहे.. 

— श्री नारायण मुर्ती. 

प्रस्तुती : अमोल केळकर..

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ प्राचीन भारतातील सागरी विज्ञान — लेखक : श्री नारायण वाडदेकर ☆ सुश्री शुभा गोखले ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ प्राचीन भारतातील सागरी विज्ञान — लेखक : श्री नारायण वाडदेकर ☆ सुश्री शुभा गोखले  

मोहरीएवढा चिमुकला मानवी गर्भ मातेच्या पोटातील गर्भजलात वाढतो. पण नंतर जमेल तेव्हा पाण्याकडे परतण्याची त्याची ओढ राहतेच. करमणूक म्हणून पोहणे, गरजेपोटी मासे पकडणे, साहसापोटी, व्यापारासाठी नद्या, समुद्रातून घरापासून अधिकाधिक दूर जाणे सुरूच राहते. यातूनच माणूस दर्यावर्दी झाला. भारताला नौकानयनाचा हजारो वर्षांचा इतिहास आहे.

कोची येथे बांधलेली भारताची सर्वात मोठी विमानवाहू नौका, आयएनएस विक्रांतचे लोकार्पण झाले. या आत्मनिर्भरतेची बीजे छत्रपती शिवाजी महाराजांनी, ते केवळ २५ वर्षांचे असताना नौकानयनाचे व्यापारी, आर्थिक, आरमारी महत्त्व ओळखून पेरली. ते नौकाबांधणी आणि बंदरांचा विकास करू लागले. योग्य माणसे पारखून त्यांना जबाबदारी, निधी आणि स्वातंत्र्य देऊन महाराजांनी ब्रिटिश, पोर्तुगीज, सिद्धींवर जरब बसेल, असे जलदुर्ग व नौदल उभारले. समुद्राचे, वाऱ्यांचे, नक्षत्रांचे, सागरी युद्धशास्त्राचे सखोल ज्ञान स्वत: मिळवलेच, शिवाय आपल्या सहकाऱ्यांनाही दिले. शिवकालीन मराठीत नाविक भांडय़ांसाठी (नौकांसाठी) तराफे, होडय़ा, गुराबे, शिबाडे, गलबते, मचवे, असे शब्द आहेत. ते अर्थातच नाविक व्यवहारांमुळेच रुळले आहेत. गुराब या शिडे आणि डोलकाठय़ायुक्त मोठया बोटीची वाहतूक क्षमता ३०० टनांपर्यंत असे. ती सुमारे १५० सैनिक आणि सात-आठ तोफाही वाहून नेई. शिबाड ही एका शिडाची, एका डोलकाठीची नाव युद्धकाळात तोफा बसवून सैनिकी वापरासाठी, तर शांतता काळात मालवाहतुकीस उपयोगी पडत असे. गलबते, मचवे, होडय़ा आकाराने व क्षमतेने लहान, पण शीघ्रगतीने वल्हवण्यायोग्य असत.

सम्राट चंद्रगुप्तांच्या मौर्यकालातील सैन्यात आरमाराला महत्त्व होते. समुद्रावरील चाच्यांचा बंदोबस्त, सागरसीमा सुरक्षित राखणे, समुद्रात उघडणाऱ्या नदीमुखांचे रक्षण, अशी कामे आरमार करत असे. जवळच्या श्रीलंकेपासून ते दूरच्या इजिप्त, सीरियापर्यंतही मौर्यकालीन जहाजांची ये-जा चाले. तमिळनाडूत चोला, चेरा, पांडय़ा ही अतिप्राचीन शिवोपासक राजघराणी साधारण ख्रिस्तनंतर तिसऱ्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत कारभार करत होती. श्रीलंका, आफ्रिका, रोम, ग्रीसपर्यंत त्यांचा मसाल्याचे पदार्थ आणि माणिक-रत्नांचा व्यापार चाले. ख्रिस्तपूर्व ३००० वर्षांपासून सिंधू खोऱ्यातील हिंदी मेसोपोटेमियापर्यंत, तसेच पूर्वेला थायलंडपर्यंत व्यापारउदीम केला जात असे. ४५०० वर्षांपूर्वीची लोथल ही जगातील पहिली गोदी सिंधमधील आहे.

‘जयेम सं युधि स्पृध:’ हे आयएनएस विक्रांतचे ब्रीदवाक्य ऋग्वेदसंहिता प्रथम मंडल सूक्त ८, आणि नौसेनेचे ब्रीदवाक्य ‘शं नो वरुण:’ तैत्तिरीय उपनिषदातील आहे. ४००० वर्षांपूर्वीच्या अथर्ववेदात आणि त्याहीपूर्वीच्या ऋग्वेदात मोती, समुद्रसंपत्ती, शंभर वल्ह्यांच्या जहाजांची वर्णने आहेत. नंतर समुद्रप्रवास वर्ज्य असा संकेत रूढ झाला आणि आपल्या प्रगतीत बराच काळ अडथळा आला.

लेखक : नारायण वाडदेकर, (मराठी विज्ञान परिषद)

संग्रहिका :  शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बस, तुम कभी रुकना मत! ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ बस, तुम कभी रुकना मत! ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

आज आजी उदास आहेत, हे आजोबांच्या लक्षात आलं.”काय झालं ग?” आजोबांनी विचारलं. आजी म्हणाल्या, “अहो, आता थकवा येतो. आधीसारखं राहिलं नाही.आता गडबड,तडतड सहन होत नाही.कुठे जायचं  म्हटलं तर जास्त चालवत नाही.आॕटोमध्ये चढताना त्रास होतो . कधी भाजीत  मीठ टाकायला विसरते,तर कधी जास्त पडतं. कशाकरिता हे एवढं आयुष्य देवाने दिलं आहे, माहीत नाही.”

आजोबा म्हणाले, “देवाचा हिशोब मला माहीत नाही.आणि त्याच्या निर्णयात आपण ढवळाढवळ करू शकत नाही. त्याच्या planning मध्ये  एक क्षणाचाही बदल करणे, आपल्या हातात नाही. जे आपल्या हातात नाही, त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या हातात काय आहे, त्याचा विचार करावा. अग ,वयानुसार हे सर्व होणारच.  आधीचे दिवस आठव ना. किती काम करायचीस! पूर्ण घर तू खूप छान सांभाळलेस. मला कशाची काळजीच नव्हती कधी.आता  वयोमानाप्रमाणे हे सर्व होणारच.  पण त्यातूनच मार्ग काढायचा असतो. आलेला दिवस आनंदात काढणे,आपल्या हातात आहे. जीवनाच्या प्रत्येक फेजमध्ये थोडे शारीरिक बदल होतातच.थोडे आपल्याला करायचे असतात.आपली  lifestyle reorganize करायची ,म्हणजे ,

आयुष्याची घडी, परिस्थिती प्रमाणे बदलायची असते.कळलं का ? “

आजोबा पूढे म्हणाले,

“चल, आज सायंकाळी बाहेर जाऊ  या  आपण.ती छान  नारंगी साडी नेस.  बाहेरच जेवू .  आजोबा संध्याकाळी आजींना घेऊन बाहेर पडले. जवळच असलेल्या  बसस्टाॕप वर जाऊन बसले. दोघे बराच  वेळ तेथेच  गप्पा मारत बसले . आजोबा आजींना म्हणाले,” अगं, पाय दुखत असतील  तर, मांडी घालून बस छान.”नंतर , ‘गणेश भेळ ‘खाऊनच दोघं घरी परतले. अगदी वयाला व तब्येतीला  शोभेसे  outing  होते आज दोघांचे . आजींची उदासी मात्र कुठे पळाली, हे त्यांना कळलेच नाही.अगदी ‘refresh’ झाल्या .

आज आजोबांनी आजीसाहेबांसाठी  on line ‘Mobile stand’ मागवला. मोबाईल पकडून आजींचा खांदा दुखतो ना म्हणून .

आज आजींनी तर आजोबांना सकाळीच  सांगून  टाकलं,” मी आज सायंकाळी स्वयंपाक करणार नाही. काही तरी चमचमीत खायला  घेऊन या”. आजोबांनी आनंदाने समोसे, ढोकळा, खरवस, दोन पुरण पोळ्या आणून आजींची इच्छा पूर्ण केली. ते बघून आजी म्हणाल्याच, “अहो, केवढं आणलंत?” “अग, आज आणि उद्या मिळून संपेल की.” आज आजी-आजोबांची पार्टी छान  झाली.

कोणी तरी खरंच  खूप छान म्हटलं आहे •••

 ” खुशियां बहुत सस्ती हैं इस दुनिया में ,

हम ही ढूंढते फिरते हैं, उसे महँगी दुकानों में”।”

आजोबा बऱ्याच वेळापासून एका बाटलीचे झाकण उघडायचा प्रयत्न करत होते. ते पाहून अजय म्हणाला , “द्या, आजोबा. मी उघडून देतो”. तेव्हा आजोबा म्हणाले, “अरे, नको. मी उघडतो. आता आम्हाला प्रत्येक  कामात वेळ लागतोच . हे natural आहे . पण काही हरकत नाही. जोपर्यंत करू शकतो, तोपर्यंत काम करायचे, हे मी ठरवलं आहे.  रोज फिरायला जाणे, भाजी आणणे, dusting करणे, भाजी  चिरणे, washing machine मधे धुतलेले कपडे वाळत घालणे‌, कपड्यांच्या घड्या घालणे ,अशा बऱ्याच कामांची जबाबदारी मी घेतली आहे. तुझ्या आजीला मदत होते. व माझापण वेळ जातो. Something new and different. I am enjoying it. And I feel good.

तो तुमचा actor आहे ना, अक्षयकुमार? त्याने एका advertisement मध्ये म्हटले आहे,

“बस, तुम कभी  रुकना मत.”

अक्षय कुमारने  म्हटलेले हे वाक्य मला खूप आवडलं.

एक  छोटंसं वाक्य. मोजक्या शब्दात.

पण किती अर्थपूर्ण .जेवढ्यांदा वाचावे, तेवढाच त्याचा अर्थ परत दर परत उघडत जातो .एक छोटासा उपदेश जीवनाला वेगळ्याच दिशेने वाटचाल करायची  स्फुर्ती  देतो. विचारांत परिवर्तन  आणतो .

तो म्हणतो, “कधीही थांबू नका,चालत रहा.

म्हणजेच  ‘active’ रहा.  ‘मनाने आणि शरीराने .’ 

वाहतं पाणी बघताना,  एक वेगळीच उर्जा  निर्माण होते.’ धारा ‘ म्हणजे पुढे पुढे जाणारी, वाहणारी .तेच  जमलेलं  पाणी म्हणजे अनेक रोगांचा उगम. म्हणून    पाण्याला जमू देत नाही आपण.  जमलेल्या पाण्यात मच्छर किडे पडतात .पाण्याला  वास येतो.डेंग्यू पसरतो.

आयुष्याचे पण तसेच आहे. शक्य तेवढं active राहणे ही प्रत्येकाचीच आवश्यकता असते.जसं जमेल ,जे जमेल, जे आवडेल ,जे झेपेल, ते करत रहाणे गरजेचे आहे.

चलती का नाम ही तो  जिंदगी है ।”

आपल्या पिढीने तरूणपणी एकमेकांचे हात हातात घेतले नाहीत /नसतील  .पण वयाच्या या टप्प्यावर, एकमेकांचा हात प्रेमाने, काळजीने, विश्वासाने , हातात घेणे  ही काळाची गरज आहे .

“कुछ लोग हमेशा खुश और संतुष्ट रहते हैं !

इसलिए नहीं की उनके जीवन में  सबकुछ ठीक होता  है!

बल्कि इसलिए की उनकी सोच हर हाल में सकारात्मक होती है”!!!

“ना  थके  कभी  पैर

ना कभी हिम्मत हारी है।

जज्बा  है परिवर्तन का जिंदगी में,

इसलिये सफर जारी  है।”

“प्रत्येक दिवस उत्सव म्हणून साजरा करा.”

“बस , तुम कभी  रुकना मत

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ घर दोघांचे… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

?  विविधा ?

☆ घर दोघांचे… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆ 

‘परस्परांशी नाती असलेला माणसांचा समूह ‘ अशी कुटुंबाची व्याख्या केली जाते.माणसांमधली ही नाती जन्मावरून,विवाहावरून किंवा दत्तक घेण्यावरून निर्माण होतात. कुटुंब ही समाजातील सार्वभौम संस्था असली तरी स्थळकाळसापेक्ष तिच्या स्वरूपात भिन्नता आढळून येते.

कुटुंबाचे प्रकार –

१. आप्तसंबंधावर आधारित कुटुंबप्रकार –

अ.केंद्रकुटुंब: अशा प्रकारची कुटुंबे बहुधा सर्वत्र आढळतात. यात पति, पत्नी आणि त्यांची अविवाहित किंवा दत्तक मुलांचा समावेश होतो.

ब. विस्तारित कुटुंब: यात कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त असते.प्रामुख्याने शेती व्यवसायातील कुटुंबांचा यांत समावेश होतो.

२. विवाह प्रकारावर आधारित-

अ. एक विवाही कुटुंब- एक पुरुष आणि एक स्त्री यांच्या वैवाहिक संबंधांद्वारा अशी कुटुंबे निर्माण होतात. पती आणि  पत्नी जीवंत असेपर्यंत दोघांपैकी कुणा एकाला दुसरा विवाह करता येत नाही.

ब. बहुपती कुटुंब- अनेक पुरुष एका स्त्रीबरोबर विवाह करून कुटुंब निर्माण करतात.

क. बहुपत्नी कुटुंब- यात एक पुरुष अनेक स्त्रियांसोबत विवाह करतात.

३. वंश आणि अधिसत्ता यावर आधारित-

अ. मातृसत्ताक कुटुंब: या प्रकारात कुटुंबात अधिसत्ता ही स्त्रीची असते .शिवाय कुटुंबाचा वंशही स्त्रीच्या नावाने चालला जातो.

ब.पीतृवंशीय कुटुंब: या प्रकारात कुटुंबात अधिसत्ता ही पुरुषाची असते.शिवाय कुटुंबाचा वंशही पुरुषाच्या नावाने चालतो.

४.काबीली कुटुंब: जनजातीमध्ये असलेली ही पध्दत सामाजिक विकासक्रमाच्या आदिम अवस्थेच्या जवळची आहे.

कुटुंब हा समाजशास्त्र आणि  मानसशास्त्राच्या दृष्टीने मूलभूत असा प्राथमिक गट आहे.

कुटुंबाची कार्ये-

१. प्रजनन करणे .

२. पालनपोषण करणे.

३.नव्या पिढीचे वेगवेगळ्या पध्दतींनी सामाजिकरण करणे.

४. व्यक्तीला निस्चित स्थान आणि दर्जा प्राप्त करून देणे.

वरील कार्यांपैकी प्रत्येक कार्य तत्वत:  दुसऱ्या संस्थांकडून होऊ शकते.पण आजवर तरी

कुटुंबाऐवजी दुसरी पर्यायी समाजसंस्था ही कार्ये तेवढया परिणामाने करू शकलेली नाही.

कुटुंबसंस्थेवर मुख्यत: पुढील शक्तींचे वेळोवेळी आघात होतात;

१.आर्थिक- औद्योगिकीकरण व शहरीकरण.

२.वैज्ञानिक यंत्रतंत्रशक्ति.

३.मूल्यात्मक व्यक्तिवाद किंवा समूहवाद.

४.विवाहनीतीत पूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह.

हे बदल मुख्यत: पाश्चात्य समाजात होतात तरी,आपल्या समाजातील कुटुंबावरही त्याचे आघात होत आहेत. कोणत्याही प्रकारच्या कुटुंबात प्रमुख घटक पती आणि पत्नी असतात. त्यांच्या संबंधाला तडा जातो घटस्फोटामुळे.

घटस्फोट: पती आणि पत्नीचे निर्माण झालेले वैध वैवाहिक संबंध कायदेशीररीत्या संपुष्टात येणे म्हणजे घटस्फोट होय. घटस्फोटामुळे तापदायक वैवाहिक संबंधापासून फारकत घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले तरी त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात उदा.

– घटस्फोटित स्त्रीला अनेक कठीण प्रश्नांना तोंड द्यावे लागते.

– ती जर मिळवती किंवा आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण नसेल तर हे प्रश्न अधिक जटील होतात.

– घटस्फोटित स्त्रीचा पुनर्विवाह सहसा होत नाही.

– तिच्याकडे पहाण्याचा समाजाचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित असतो.

-घटस्फोटित स्त्रीला मुले असतील तर तिचा पुनर्विवाह होणे अवघड असतो.

– झालाच तरी तिच्या लग्नापूर्वीच्या मुलांना सावत्रपणाचा जाच सोसावा लागतो,अनेकांच्या स्वभावात काही दोष आढळून येतात, अनेक जण एकाकी आणि पोरकी होतात.

घटस्फोटामुळे असे प्रश्न केवळ स्त्रियांतच दिसतात असे नाही तर पुरुषांमध्येही अनेक समस्या दिसून येतात. अनेक आर्थिक,मानसिक, सामाजिक आणि लैंगिक समस्या निर्माण होतात, घटस्फोटित व्यक्तिविषयी समाजाचा दृष्टिकोन चांगला नसतो.याशिवाय मुलांची कस्टडी आणि मालमत्तेचे प्रश्न निर्माण होतात.

घटस्फोटाची दिसून येणारी कारणे :

-पुरुष किंवा स्त्रीचे विवाहपूर्व संबंध नंतर उघडकीस येणे.

– विवाहानंतर विवाहबाह्य संबंध.

– परस्परांची होणारी भांडणे,उडणारे खटके.

-व्यसने, जुगार.

– भावनिक छळ,अत्याचार.

– दोघांतील पुढीलपैकी फरक ;

– वय, भाषा,चालीरिती, आवडीनिवडी, छंद, खाण्यापिण्याच्या सवयी,भौगोलिक बाबी,उत्पन्नाची साधने,दोघांतील विवाहापूर्वीची अनेक बाबतीतील तफावत इ.

अनेकदा विवाहापूर्वी हवाहवासा होणारा सहवास विवाहानंतर नकोसा वाटतो परस्परांबद्दलच्या प्रेमाची जागा घृणा, तिटकारा घेते.अनेकदा संयुक्त कुटुंबातील मतभेद याला कारणीभूत ठरतात. परस्परांमधील दरी दिवसेंदिवस  वाढतच जाते. एकमेकांतील दोष दिसू लागतात, आपण कसे डावललो जातो,आपल्याला कशी किंमत दिली जात नाही हे ते सतत बोलत जातात. समाजातील आपली प्रतिमा कशी असेल आणि आपले कुटुंब म्हणून ऐक्य याची तमा न बाळगता ते  एकमेकांची उणीदुणी काढण्यातच धन्यता मानतात.

हे नक्कीच चिंतेचे असते.

याला जबाबदार कोण? या प्रश्नावर एकच एक उत्तर देता येणार नाही.कुटुंबनिहाय यात वेगवेगळेपणा असतो.

घटस्फोटाच्या वर दिलेल्या कारणांव्यतिरिक्त पुढील बाबींचाही गांभीर्याने विचार करावा लागेल;

– अनेक ठिकाणी कुणी एकजण याला जबाबदार नसतो.परिस्थिती त्यांना हे करण्याला भाग पाडते

– विवाह टिकवणे हे अनेकदा अशक्य बनते.पण कधी कधी परस्परांना समजून न घेणे किंवा गृहीत धरणे हेही एक कारण असते.

-अनेकदा एक घटक आपला कोणत्यातरी बाबतीतचा हेका  सोडत नाही.आणि ते घटस्फोटाचे कारण बनते.

-कुटुंबात व्यक्तिस्वातंत्र्याला  महत्त्व असलेच पाहिजे.मात्र त्यासोबतच कुटुंबसंस्थेच्या महत्त्वाचीही जाणीव असलीच पाहिजे.

जगात भारताची ओळख ही भक्कम कुटुंबसंस्था असणारी संस्कृती अशी आहे.कुटुंबात कुणा एकावर अन्याय न होताही सर्वांच्या हिताच्या दृष्टीने आणि समाजस्वास्थाच्या साठीही कुटुंबातील पतीपत्नींनी व्यक्तिस्वातंत्र्य,

स्वाभिमान याचा विचार करतानाच परस्परांशी सतत संवाद साधत राहीले पाहिजे.परस्परांविषयी गैरसमज हे आपापसात बोलूनच नाहीसे केले पाहिजे.

पती आणि पत्नी ही संसाराच्या गाडीची दोन चाके असतात असे समजले जाते.ही दोन्ही चाके (सामाजिक दर्जा,व्यक्तिस्वातंत्र्य या अर्थाने) समान आकाराची असलीच पाहीजे.गाडी चालताना या दोहोंत ठराविक अंतर असावे.मात्र या त्यांना सतत  विश्वासाचे वंगण दिले पाहिजे.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वयाची सत्तरी पार करतांना !!… अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ वयाची सत्तरी पार करतांना !!… अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

वयाची सत्तरी पार करतांना !!

एकदा एका पासष्टी ओलांडलेल्या आणि सत्तरीच्या वाटेवर असणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राने विचारले,   “मित्रा, तुझ्यात काय बदललंय असे तुला वाटतंय?” त्यानंतर त्या मित्राने जे उत्तर दिले ते आपल्यातील प्रत्येकाने समजून घेतलं तर प्रत्येकासाठी आपले आयुष्य सुसह्य होईल हे निश्चित ! त्याने जे उत्तर दिले ते असे…

१. आजवर मी माझ्या आईवडिलांवर, भावंडांवर, मुलांवर, बायकोवर, सहकाऱ्यावर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर, मित्रांवर खूप प्रेम केले, त्यांची खूप काळजी घेतली. पण आता मी स्वतःवर प्रेम करायला लागलोय, आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केलीय.*

२. मला याची जाणीव झालीय की, आता मी शारिरीक किंवा मानसिकदृष्ट्या इतका सक्षम राहिलो नाही की कुणीही यावं आणि त्यांनी आपले ओझे माझ्या खांद्यावर टाकावे.*

३. आता मी भाजीवाल्याशी, फळविक्रेत्याशी, फेरीवाल्याशी घासाघीस करायचं सोडून दिलंय. उलट आता मला असं वाटतं की माझ्या काही पैश्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण होणार असेल किंवा त्याची गरीबी दूर होणार असेल तर चांगलेच होईल ना ! *४.आता मी माझ्या जीवन संघर्षाच्या कहाण्या इतरांना सांगण्याचं आणि सल्ले देण्याचं बंद केलंय. कारण एकतर त्या सगळ्यांना सांगून झाल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आता कदाचित कालबाह्य झाल्या आहेत. माझ्या त्या संदर्भांचा आजच्या पिढीला किती उपयोग होईल हे माझे मलाच माहीत नाही.*

५. आता मी कुणाला त्याच्या चुका सांगण्याच्या किंवा काय बरोबर आणि काय चुकीचे हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाही.‌ कारण सगळ्यांना सुधारण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही हे मला कळून चुकलंय. आता मला इतरांच्या परफेक्शनपेक्षा माझी शांतता अधिक महत्वाची वाटते.*

६. आता मी समोरच्याच्या चांगल्या गोष्टीसाठी त्याला निखळ दाद द्यायला आणि त्याचे कौतुक करायला शिकलोय. त्याने समोरच्याला बरे वाटते, तो सुखावून जातो.*

७. आता माझ्या अंगावरच्या कपड्यांची घडी चुरगाळलेली असेल किंवा शर्टावर एखादा डाग पडला असेल तर त्याचा मला खूप फरक पडत नाही. जे लोक मला अंतर्बाह्य ओळखतात त्यांच्यासाठी माझा पेहराव फार महत्वाचा नाही हे मला कळून चुकलंय.*

८. ज्यांना माझी किंमत नाही अशांकडे मी आता दुर्लक्ष करतो. कारण त्यांना माहित नसली तरी मला माझी किंमत चांगली माहिती आहे.*

९. आता माझं वय कुरघोड्या करण्याचं राहिलेलं नाही.*

१०. आता मला माझ्या भावना व्यक्त करायची लाज वाटत नाही. भावना असणं हे जिवंतपणाचे लक्षण आहे. आता हसावंसं वाटलं की हसून घ्यायचं आणि रडावंसं वाटलं की रडून घ्यायचं. भावना लपवण्याच्या नादात उगाच घुसमटत रहायचं नाही.*

११. आपला अहंकार आपल्या नात्याच्या आड येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो. प्रसंगी मला थोडा कमीपणा घ्यायला लागला तरी मी एकवेळ तडजोड करतो, पण स्वतःचा स्वाभिमान सांभाळून ! कारण नाते टिकवण्याची जबाबदारी कुणा एकाची असूच शकत नाही.*

१२. आता मी येणारा प्रत्येक क्षण सर्वार्थाने जगण्याचा प्रयत्न‌ करतो. मला जे करावसं वाटतं ते मी करतो. फक्त एवढंच की, माझ्या स्वछंदी जगण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो. 

१३. मला माहित आहे की, जे मी आजवर जगलोय त्यापेक्षा आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे आज मी ना भूतकाळात जाऊन पश्चात्ताप करत बसत, ना भविष्यकाळात जाऊन चिंता करत बसत… आता निख्खळ आणि निख्खळ जीवनाचा आनंद घ्यायचा आणि जेवढा इतरांना देता येईल तितका द्यायचा…!!*

*आता माझं उर्वरित आयुष्य पैसे मिळवण्यासाठी नसून परोपकारासाठी असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे.*  

*आता लक्षात आले आहे की, संकटात असलेल्या व्यक्तीला मदत नाही केली तर तो तक्रार न करता देवासमोर जावून रडतो. त्याचा तळमळलेल्या आत्म्याचा आवाज कानात ऐकू येत असलेली भावनाही मनात येते.*

खरंच, वर दिलेल्या एका मित्राच्या उत्तरातून आपण काही समजून घेतलं तर आपल्यातील प्रत्येकाला किती छान जीवन जगता येईल ना?

आत्ता  कळले जीवन सुंदर आहे. पण ते सरळमार्गाने जगणाऱ्या व्यक्तीचे आहे.

खूप खूप शुभेच्छा सत्तरीच्या.वाटेवर असणाऱ्या मित्रांना !!

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री अनंत केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares