मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मधमाशा : शत्रू की मित्र ?– लेखक – श्री विक्रांत भिसे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ मधमाशा : शत्रू की मित्र ?– लेखक – श्री विक्रांत भिसे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

एकदा आमच्या स्टुडिओत दोन चार दिवस सतत मधमाश्यांचा वावर चाललेला. आम्हाला कळेना. त्यांनी पोळं बनवायलाही सुरुवात केलेली.. सुरुवातीला अगदी २०-२५ माश्याच आहेत पाहून आम्ही थोडासा धूर केला आणि त्यांना हाकलवून लावलं. दोन दिवसांनी अचानक पुन्हा त्यांचा वावर सुरु झाला. आम्ही बेचेन झालो. यावेळेस त्या हॉलच्या खिडकीतून स्टुडिओच्या दिशेनं जात होत्या. .. आम्ही पुन्हा धूर केला आणि त्यांचा माग घेतला . ती मधमाश्यांची लाख दीडलाखांची फौज स्टुडिओबाहेर २ फुटांचं  पोळं बांधण्याचं काम शांतपणे करत होती . आम्हाला धस्स झालं–आता  काय? घाबरून/ वैतागून, आता त्यांची विल्हेवाट लावायची म्हणून पेस्ट कंट्रोलवाल्याना फोन केला. त्यांनी २००० रुपये सांगितले, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येतो असे सांगून फोन ठेवून दिला.

हे सगळं करत असताना मनात आलं की त्यांना आपण वाचवू शकतो का आणि कसे ? म्हणजे कोणी संवर्धन करणारे असेल का?

माझा माश्यांवर रिसर्च चालूच होता ज्यात त्यांच्याबद्दल फक्त आणि फक्त चांगल्याच गोष्टी लिहिल्या होत्या. जगाच्या पाठीवरून मधमाश्या नाहीशा झाल्या तर माणूस जेमतेम ४ वर्षेच जगू शकेल असे आल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटले आहे. हे वाचून आम्ही खाडकन जागे झालो आणि चार दिवसापूर्वीचा  किस्सा आठवला.

आम्ही आमचा मित्र अभिनव काफरेकडे गेलो असता त्यांच्या सोसायटीमध्ये असंच कोणीतरी पेस्ट कंट्रोल करून लाखभर माश्या मारून टाकल्या होत्या. इथे भरदिवसा माणसं मारली जातायत, माशांचं काय. लाखो जीव तडफडत मरत होते. आणि आम्ही काहीच करू शकलो नाही. मेलेल्या  लाखो माश्यांचा खच पडलेला पाहून अतिशय वाईट वाटले. बहुतेक तो प्रसंग आठवून आम्हाला त्यांचं  संवर्धन करण्याचं डोक्यात आलं असणार.

माझा रिसर्च सुरु असताना मला “ बी किपर “अमित गोडसे, हा आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून पूर्णवेळ मधमाश्या संवर्धनाच्या कामात स्वत:ला झोकून दिलेला तरुण समोर आला. मध काढण्याची, मधमाश्यांना पळवून लावण्यापेक्षा कमी संहारक आणि अधिक शाश्वत पद्धती असू शकते अशी त्याची खात्री होती. त्याच अनुषंगाने त्याने पुण्यातील मधमाशी पालन आणि संवर्धन केंद्र, तसेच खादी ग्रामोद्योगतर्फे महाबळेश्वर येथे चालवल्या जाणाऱ्या केंद्रात रीतसर प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत पुण्यात मधमाशी संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे.

त्याला फोन केला. शांतपणे त्याने आवश्यक माहिती जाणून घेतली. यासाठी ४०००/- रुपये घेईन असे सांगितले. जीव घेण्याचे २०००/- आणि जीव वाचवण्याचे ४०००/-???– पण आताशा जगात जीव वाचवण्यापेक्षा जीव घेणं जास्त स्वस्त झालंय. तसं हे कामसुद्धा जोखमीचं होतं. त्यात तो पुण्याहून मुंबईला येणार होता. शेवटी त्यानेच पैसे कमी केले– ३०००/- रुपये सांगितले आणि उद्या १२ वाजेपर्यंत येतो म्हणाला.  त्याला पैशांपेक्षा माशांचा जीव महत्वाचा वाटला असणार, नक्कीच ! पैसे गेले तरी चालतील पण आपण त्यांना वाचवायचं, असा आम्हीही निर्णय घेतला. तो सांगितल्याप्रमाणे बरोबर १२ वाजता स्टुडिओवर आला. आमची थोडी चर्चा झाली. त्याच्या विलक्षण कामाबद्दल जाणून घ्यायला आम्ही दोघेही उत्सुक होतो.

अंगावर कोणत्याही प्रकारचं आवरण न घालता फक्त चेहऱ्यावर मास्क आणि टोपी घालून तो बाल्कनीत उतरला. पहिल्यांदा त्याने केवळ धुराच्या साहाय्याने त्यांना दूर करत, हलक्या हाताने त्यांना गोंजारत तो थेट पोळ्यापर्यंत पोहचला. नुकतंच बनत असलेलं पोळं त्याने करवतीने कापलं. नंतर त्या जागेवर जेल लावून त्याने ती जागा काही महिन्यांसाठी सुरक्षित केली. आता तिथे पुन्हा माश्या येणार नाहीत, १० किलोमीटरच्याबाहेर त्या नवीन जागा शोधतील आणि तिथे पोळं बांधायला सुरुवात करतील असं आम्हाला सांगितलं . हे सगळं तो एवढ्या साध्यासोप्या पद्धतीने हाताळत होता की आम्ही त्याच्याबरोबर तिथेच असूनही एकही माशी आम्हाला चावली नाही. त्यांनाही  कोणत्याही प्रकारचा धक्का बसला नाही आणि लाख दीड लाख माश्यांचे जीव वाचले. मधमाशांबद्दलची एवढी भीती आपल्या मनात लहानपणापासून बिंबवलेली असते की त्यांना पाहून पहिल्यांदा त्यांना मारण्याचाच  विचार आपल्या डोक्यात येतो. पण त्यांना वाचवण्याचं हे काम इतकं शांतपणे होत असलेलं पाहून मी त्याला विचारलं,

” त्यांनी आपल्यावर हल्ला का नाही केला? कारण बहुतांशवेळा आपण त्यांच्या कामात अडथळा आणला तर ते आपल्यावर हल्ला करतात हे पाहून आणि वाचून माहित होतं “. तो म्हणाला… “ आपण त्यांना त्रास द्यायच्या उद्देशाने काही करत नव्हतो आणि हे त्यांना कळतं . दुसरं म्हणजे आपण त्यांना अलगद  /शास्त्रोक्त पद्धतीने हाताळलं– हेच जर आपण त्यांच्यावर जबरदस्ती किंवा वार केला असता तर त्यांनी आपल्याला फोडून काढलं असतं एवढं नक्की !” हे सार इतकं विलक्षण होतं की आम्ही भारावून गेलो.

जीव घेणं जरी स्वस्त असलं तरी जीवनदान देण्याचा सुखद अनुभव त्या पैशांपेक्षा मोलाचा वाटला. आपल्याबरोबर निसर्ग वेगवेगळे प्रसंग घडवून आणतो. पण आपण त्याला  कसा प्रतिसाद देतो, त्याचा स्वीकार करतो की प्रतिकार, हे आपल्या हातात असतं .

हे लिहिण्याचा उद्देश एवढाच की अमित गोडसे नावाच्या या अवलियाला आणि त्याच्या मधमाश्यासंवर्धनाच्या कामाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून, अशा लाखो/ करोडो मधमाश्यांचे प्राण वाचावे, संवर्धन व्हावे  व असे अमित गोडसे प्रत्येक शहरात लाखोंच्या संख्येत तयार व्हावेत.

मित यांचे हे काम जास्तीत जास्त शेअर करा आणि मधमाश्यांचं संवर्धन करा.

त्यांना संपर्क करण्यासाठी — Whatsapp – 8308300008 https://www.beebasket.in

लेखक : श्री विक्रांत भिसे 

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ओंकारची शेळी— ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ ओंकारची शेळी— ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

सुशीला माझी  पेशंट. सारखे येऊन येऊन ह्या बायका माझ्या मैत्रिणी पण झाल्या. मी त्यांना घरचीच एक वाटत असे.

त्यांच्या घरच्या छोट्या मोठ्या समारंभाला मला आवर्जून बोलावत असत. मग लग्नाच्या बांगड्या भरणे असो किंवा हळदीकुंकू असो. मीही त्यांच्या कडे जाणे कधीही टाळले नाही.

सुशीला  फार नीट नेटका संसार करणारी होती. नशिबाने नवऱ्याची साथ चांगली मिळाली होती तिला. गरीबीत का होईना अगदी छान टुकीत संसार चालला होता सुशिलाचा.

सुशिलाचा मुलगा ओंकार गुणी मुलगा होता. शाळेत नेहमी चांगले असत मार्क. एकच मुलगा होता सुशिलाचा पण भलते लाड करुन बिघडवून नाही ठेवला तिने. एक दिवस म्हणाली “ डॉक्टरबाई ओंकार म्हणतोय आपण गाय किंवा म्हैस पाळूया. आहे की जागा आपल्या घरासमोर. मी सगळे करीन त्याचे. मला लै हौस आहे. अहो पण चेष्टा का आहे गाय विकत घेणे– कुठून आणू मी ते हजारो रुपये ? पुन्हा त्याचे वैरण चारा—अशक्य गोष्ट आहे बघा . हा कसला हट्ट . पुन्हा गोठा बांधा– तो एक खर्च होईलच. रोज रोज चाललंय बघा.  कुठून घेतलंय खूळ डोक्यात देव जाणे. 

जनावर पाळणे चेष्टा नाही हो . घरचा सदस्यच असतो तो. ती धार कोण काढणार, दूध कोण विकणार —याला काही समजत नाही . पोराटकी नुसती. “ 

सुशीला खरोखरच वैतागली होती. तिचे अगदी बरोबर होते. आधीच लोकांची कामे करून पिचून निघत होती,

त्यात हा व्याप कोण घेणार अंगावर.  मीही विचारात पडले. एकीकडे कौतुक पण वाटले ओंकारचे. 

आमची मुले या वयात आणखी चांगला मोबाईल हवा– नवे गेम्स हवेत म्हणून हट्ट करतात . पण हा मुलगा गाय म्हैस पाळू म्हणतोय— मलाही हा प्रश्न कसा सोडवावा समजेना. अर्थात हा प्रश्न माझा नव्हता. 

पण आमचे घरातले लोक म्हणतातच –` आपल्या बाईंना सवयच आहे लोकांचे प्रॉब्लेम आपलेच समजून डोके शिणवून घ्यायची.` 

पण मी हे सगळे विसरूनही गेले . आणि माझ्या हजार व्यापात बुडूनही गेले. मुलीच्या परीक्षा, ऍडमिशन्स , 

हॉस्पिटलचे व्याप— एक का व्याप होता मागे माझ्या.

मग एक दिवशी सुशीला परत दवाखान्यात भेटायला आली . म्हणाली “ बाई, दवाखाना झाला की याल का घरी ?ओंकार बोलावतोय तुम्हाला. “

बाहेर ओंकार उभा होता. संकोचाने म्हणाला , “ ताई या ना, गम्मत आहे एक.” 

दवाखाना बंद केल्यावर मी उत्सुकतेने गेले सुशीलाच्या घरी. मोठे टापटिपीचे घर. स्वच्छ ठेवलेला ओटा, 3 खोल्या  अगदी  छान ठेवलेल्या– मला छानसे सरबत दिले, लाडू दिला.

“ अरे ओंकार,ती गम्मत दाखवणार आहेस नं मला ? 

“ बाई, चला मागे अंगणात.” 

मला त्याने अंगणात नेले. तिथे एक पांढरी शुभ्र शेळी बांधलेली. आणि तिची सशासारखी दोन करडे.

मला इतकी मजा वाटली—

सुशीला म्हणाली, “ बाई,गाय म्हैसवरून शेवटी शेळीवर झाली बघा तडजोड. आमच्या पलीकडच्या चाळीत शेळी व्यायली. तिला दोन पिल्ले झाली. मैत्रीण म्हणाली, ` ही  शेळी जा घेऊन तुझ्या ओंकारला. फार हट्ट करतोय ना. 

बघ, सोपी असते  ग शेळी पाळायला. वर दूध देईल, तिची पिल्ले विकता येतील ते वेगळेच उत्पन्न. बघ बाई हवी का.

एक नर आहे, एक मादी. मादी ने ओंकारसाठी – मावशीकडून भेट.

याचे पैसे नको देऊस मला.

घरी येऊन ओंकारला विचारले, तर तो लगेच गेला बघायला . ही शेळी इतकी आवडली त्याला. बारके पिल्ल्लूच की होते हो ते. मी म्हटले, “ ओंकार,हिची सगळी काळजी तू घ्यायची .तरच हो म्हण. आम्ही कोणीही हिचे काहीही करणार नाही बघ. पुन्हा अभ्यासात मागे पडलास तर देऊन टाकणार मी लगेच मावशीला. चालेल का ”

“ ओंकारने त्या पिल्लाला पोटाशी धरले आणि घेऊनच आला बघा. काय लागतंय हो शेळी सांभाळायला. बिचारी काही पण खाती. अहो, वर्षभरात केवढी मोठी झाली सुद्धा. ओंकार टेकडीवर  तिला चरायला सोडतो आणि स्वतः अभ्यास करत बसतो. आता बघा,हिला दोन पिल्ले पण झाली . आहे का नाही आक्रीत ? “ 

सुशीला हसायला लागली. “ हा आणि उद्योग केव्हा केला म्हणायचा.”–आम्ही सगळेच हसलो.

ओंकार म्हणाला, “ दोन्ही पण बोकडच झाले. आता मी ते विकून टाकीन. मस्त किंमत येते बोकडांना. “

ओंकारची आजी पण बाहेर आली . म्हणाली, “ अहो, माझा पण मस्त वेळ जातो या यमनी पायी. यमनी नाव आमच्या शेळीबाईचे. गुणी हो बिचारी. अहो रोज अर्धा लिटर दूध पण देती सकाळ संध्याकाळ. आम्हाला आता बाहेरून दूध नाही घ्यावे लागत. पुन्हा उरलेला भाजीपाला असं काहीही खाते बिचारी. मस्त केले ओंकारने शेळी आणली. बाई, वाईच चहा घेता का शेळीच्या दुधाचा.” 

“ नको,नको,,” मी घाईघाईने म्हटले. मला काही शेळीच्या दुधाचा चहा प्यायचे धैर्य झाले नाही. सगळे हसायला लागले.

ओंकार म्हणाला, “ माझे सगळे मित्र रोज येतात यमनीशी खेळायला. आणि हे दोन बोकड आहेत ना – चंगू मंगू मी दिसलो की उड्या मारतात, खूप खेळतात. आमच्या गुरुजींनी आमचा सगळा वर्ग आणला होता, माझी यमनी आणि पिल्ले दाखवायला. म्हणाले की आपण ओंकारचे कौतुक करू या. किती छान सांभाळ करतोय तो या मुक्या जनावरांचा. “ 

सुशीला म्हणाली, “ अहो बाई आमच्या पलीकडे दोन जुळी मुले झाली . अगदी बारकी बघा वजनाने. जगतात का मरतात अशी स्थिती. डॉक्टर म्हणाले,यांना फक्त शेळीचे दूध पचेल , बाकी कोणतेच नाही. आमच्या ओंकारने, रोज न चुकता दोन महिने स्वतः दूध पोचवले त्यांच्या घरी. आणि ती दोन्ही मुले अगदी छान गुटगुटीत झाली बघा. त्या आईवडिलांनी तर आमचे पायच धरले बघा. “ 

“ माझा शाळेत, 15 ऑगस्टला सत्कार केला,आणि छोटेसे बक्षीस पण दिले हेड सरांनी.” ओंकार अभिमानाने सांगत होता. मलाही अतिशय कौतुक वाटले या सगळ्यांचेच.

सुशीला मला पोचवायला बाहेर आली. म्हणाली, “ बाई आमच्यात एक म्हण आहे—मोठी, खूप खाणारी, जास्त  दूध देणारी, मोठ्या पोटाची म्हैस पाळण्यापेक्षा छोट्या पोटाची म्हैस पाळावी। बेताचे खाणारी,  परवडेल अशी बेतशीर. तिचा खर्चही कमी, देखभाल पण कमीच.” 

किती खरे बोलली सुशीला —-

ही छोटी माणसे आपल्याला जगण्याचे केवढे मोठे तत्वज्ञान अगदी सहज सांगून जातात ना. —-

©️ डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आषाढस्य प्रथम दिवसे ! ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

? विविधा ?

आषाढस्य प्रथम दिवसे ! ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

अगदी परवा, परवापर्यन्त, आमच्या बंगलीच्या टेरेसवरुन, हाताच्या अंतरावर ही आमच्या आवारातील, विविध झाडांच्या, हिरव्या रंगाच्या विविध छटा दर्शविणारी हिरवाई मला दिसत होती.

बांबूच्या झाडाच्या त्या फांद्यांना स्पर्श करावे, म्हटले तरी, अगदी पाय उंचावून उभे राहून देखील, त्या फांद्या मला स्पर्श करू देत नव्हत्या, वाऱ्याच्या हलक्याश्या झोताने, जवळ येऊन, वाकुल्या दाखवीत त्या पुन्हा दूर पळून जात होत्या. कितीतरी कधीही न बघितलेले, रंगबिरंगी पक्षी , मधूरगुज करीत होते. ते देखील, ह्या खोडीचा आनंद लुटत असावेत. नव्हे, नव्हे ते आनंदित होत होतेच.

पण आज….आज मी पाठमोरा उभा असताना, त्या बांबूच्या एका फांदीची धारदार, इवलीशी, लवलवती पाती वाऱ्याच्या हलक्याशा गार झोताने आपणहून जवळ येऊन, मस्त मस्त, डोलत डोलत, माझ्या मानेला,पाठीला अन् खांद्याला करवती सारखा क्षणिक, खरखरीत स्पर्श करून पट्कन माघारी जात होती.

अशी माझी खोडी काढून ती पाने माझे लक्ष वेधू इच्छीत होती कां?

बांबूची ती तरारणारी, थरथरणारी, धारदार पाती, अंगाला, थरथरत, थरथरत बोचरा स्पर्श करून काही सुचवू इच्छीत होती कां?

त्या बरोबरच, जांभुळाची ती गर्द हिरवी, आकाराने लहान चमकदार, लकाकणारी दाट पाने, मला आज शांत, संयमी, धीरोदात्त अशीच भासत होती.

त्यातच, दोन्ही झाडांच्या फांद्यात, तो गुंतून, तजेलदार पानापानांतून, फुलणारा टप्पोरा पांढरा शुभ्र चाफा, सर्वांच्या अध्ये मध्ये, फांद्या फांद्यांच्या गर्दीत, गुंतत अन् गुंफत आपला हर्षोल्लास अभिव्यक्त करीत, आपली सुखद उपस्थिती नोंदवून, आपले अस्तित्त्व दर्शवीत होता. एखाद्या लहान खेळकर, खोडकर, मुलाने , फोटो काढताना जसे मध्ये मध्ये, उड्या मारीत, माझा पण, माझा पण, असा हट्ट करावा अगदी तस्साच..उनाड !

आणि, ….आणि आमच्या आवारातील, ह्या तिघांच्या, बरोबरीने एका कडेला उभा असलेला तो एकाकी शांत, धीरोदात्त, नारळाचा वृक्ष… श्री वृक्ष.! कडेवर अनेक श्री फलांचे ओझे सहजी घेत तो लेकुरवाळा निर्विकार उभा होता. हत्तीच्या कानाच्या, मंद हालचालीप्रमाणे, त्या श्री वृक्षाच्या मोठ्ठाल्ल्या झावळ्या, हळू हळू, डुलत होत्या. अन् तो, तटस्थपणे ध्यानस्थ होऊ पाहणारा, मौन, शांत, तृप्त, अन् पोक्त तपस्वी श्रीवृक्ष ,अध्यात्मिक अनुभूती दाखवीत होता .

अचानकच काही दिवसातच झालेला हा बदल मी उत्सुकतेने न्याहाळीत होतो.

अन् लाजत, मुरडत, चाहूल न जाणवू देत, ती संध्याकाळ आली. पक्षी थव्या थव्याने पश्चिम दिशेला परतीला जाऊ लागले. मावळतीला जाणाऱ्या त्या, तेजोगोलाची सुवर्णमय किरणे, इमारती, इमारतीवर, हिरवाई, हिरवाईवर अंकित होत, होत पसार होवू लागली, त्या बरोबरच पित प्रकाशाने न्यालेली पाने, हळूहळू कडेकडेने स्वर्णांकित होत, उर्ध्व दिशेने वेगाने जाऊ लागली. आवारातील चारही झाडांच्या फांद्या एकमेकांना स्पर्शून, जणू खांद्याला खांदा लावून, लयबद्ध, डोलत डोलत, गात गात एकमेकांच्या भावनांना मम् म्हणत होत्या.

हे एक त्यांचे समूह गानच असावे, नाही ? की ती एक सामूहिक सरगम असेल ? कारण, मी बघितले, सर्वच भवताल आनंदाने डोलत होता. सर्वच परिवेश उल्हासित होत होता. दृष्टी क्षेपातील, सभोवतालची सर्वच हिरवाई जणू पाय स्थिर ठेऊन ,शरीर, मनाने डोलत होती. तन्मयतेने नृत्य करीत होती. मनोमन मी ही न डोलतो तर नवल !
पण मग हा अधिरपणा कां? कशासाठी ? कशाची वार्ता? कुणाच्या स्वागताची तयारी?

पण, दुजोरा दिला…

त्या येणाऱ्या पश्चिमेच्या गार वाऱ्याने, अस्मानातील त्या ढगांच्या हालचालींनी, दूरवर वाजणाऱ्या त्या नगाऱ्याने… वार्ता दिली..

हो ! त्या आषाढाची, नेमेची येणारी पहिली सर झेलण्यासाठी होता तर एवढा खटाटोप ?

ती समर्पिता, तप्त धरित्री ग्रीष्म ऋतुचा एवढा ताप झेलल्यानंतर, एक दिलासा मिळविण्यासाठी, एक दिलासा देण्यासाठी, मृद्गंध प्रसृत करण्यासाठी, ती हिरण्मयी देखील आतुर झालेली आहे. हे त्या हिरवाईच्या स्पर्शा स्पर्शातून, चर्ये,चर्येतून सुचवीत होती.

हो, त्या सरींच्या आगमनाची प्रतीक्षा आहे तर,,!

त्या पहिल्या वहिल्या सरीची सर कशालाच नाही. ती पायाला नुपूर बांधून थुई थूई नाचणारी, पहिली सर! त्यात भिजून नाचणारे ते शैशव ! ती शब्दात व्यक्त न झालेली, पहिल्या वहिल्या कोवळ्या प्रेमाची अनुभूती अन् अभिव्यक्ती !

त्या मृण्मयीचा, तो सर्वत्र दरवळणारा हिरण्मयी मृद्गंध !

त्या सरीची, त्या क्षणाची आतुरतेने सर्व वाट बघत आहेत.

आम्ही देखील…

© श्री मिलिंद रतकंठीवार

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शोध आनंदाचा…भाग – 4 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆

सुश्री शुभदा जोशी

 

? मनमंजुषेतून ?

 ☆ शोध आनंदाचा…भाग – 4 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆ 

शनिवार संध्याकाळ! 

पुण्यातल्या गर्दीतून साठेसाई गावातल्या आमच्या शेतावर गेल्यावर हळूहळू मन निवत जातं. संध्याकाळी परिसरातले बदल टिपत टिपत निवांत चालत होतो.  

अचानक लक्ष गेले अंगांगाने फुललेल्या, बहरलेल्या रानजाईच्या वेलीकडे. वा! कमाल! मंत्रमुग्ध केले तिने… तिच्या सुगंधाने मन मदहोश झाले… ‘ तू… तेव्हा तशी… बहराच्या बाहूंची… ‘ ही ग्रेस यांची कविता आठवली. तो क्षण कॅमेरात टिपून घेण्याचा मोह आवरला नाही… 

हा आनंद! झुळूक… तापल्या भाळावर, थंड वाऱ्याची!

शेतावरच्या आमच्या वॉचमन सखीला मी हे फोटो मोठ्या अप्रूपानं दाखवले. ती सहज म्हणाली,” ती पांढरी फुलं व्हय? ” तिच्यासाठी तो नेहमीचाच सिलसिला होता, उमलणे – कोमेजणे… त्यात काही नवल नव्हते. 

तिच्या आणि माझ्या आनंदाच्या कल्पना किती वेगळ्या आहेत!  सापेक्ष आहे बुवा सगळे!

©  सुश्री शुभदा जोशी  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कडी… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले☆

सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ कडी… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

घराची ही साधी कडी. पण काम चोख. आतला सुरक्षित आणि बाहेर गेलेल्याला घर सुरक्षित आहे याची खात्री देणारी ही कडी, खरं तर घराची देखणी नथच मानावी. ज्या घराला कडीकोयंडाच नाही ते घर सुरक्षित नाही. कडीशिवाय घर पुरं नाही. आजवर कडीकुलपांनीच स्थावर मालमत्ता सुरक्षित ठेवली. भित्र्या माणसांना कडी सुरक्षितता पोहोचवते. विशेषतः एकटी स्त्री घरात एकटी असेल तर ही कडीच तिला….. मै हुँ ना! असं बेलाशक सांगते. कडी नुसती कडी नसते तर आधारासाठी कायम खडी असते. आपली ती सुरक्षिततेची कवच कुंडल असते. अगदी रात्री घरात एकटे असू… आणि दार नुसतंच लोटलेलं असेल तर झोप लागता लागणार नाही. कडी तिचं काम फारच इमाने इतबारे करते.

मनाच्या दरवाज्यालाही अशा कड्या असाव्यात. वेळोवेळी त्या लावता याव्यात. सताड उघड्या घरात कोण कसं शिरेल आणि विध्वंस करुन जाईल याची नुसती कल्पना करा. आपण अस्वस्थ होतो.

मन जर कायम असं सताड उघडं असेल तर…. कोणीही आपल्याला गृहीत धरून कसेही आपल्याशी व्यवहार करु लागतील. त्यांना जर थोपवायचे असेल तर… मनाची कडी मजबूत असावी. कोणालाही कसेही आपल्या मनात…. जीवनात डोकावता येणार नाही. बऱ्याचदा आपण मनाची कडी लावायला विसरतो आणि मग….. अनेक घोळ होतात. कडी ही आपल्या अस्तित्वासाठी आवश्यकच आहे. म्हणजे मग आपण फार कमी वेळा दुःखी होऊ. म्हणजे इतरही ठराविक अंतराने आणि अदबीने आपल्याशी वागतील.

बोलता बोलता कधी कधी आपण बेताल होतो. वाहवत जातो. पश्चाताप होतो. तोंडाला जरा कडी लावायला हवी होती हे सहज विसरून जातो.

नेमकं आणि योग्य वेळी निर्णायक बोलणारी जी माणसं असतात त्यांच्या शब्दाला सभेत… घरात… समाजात भारी किंमत असते. कोणत्या विषयाला कोठे कडी घालायची हे त्यांना पक्के ठाऊक असते.

कधी कधी नको तिथे मनाला कडी घालणारी माणसं… दुसऱ्याला कायम ताटकळत उभे ठेवतात. आपल्यासाठी जीवतोड करणाऱ्यांच्या बाबतीत ही कडी फार क्लेश देणारी ठरते. आयुष्यभर मग नाव घ्यायचं नाही असं मन ठरवून टाकतं. हे कितपत योग्य आहे.

आगरकर आणि टिळक यांनी  एकमेकांसाठी आयुष्याच्या उत्तरार्धात अशाच कड्या घातल्या. एकत्र शाळा चालवणारे.. शाळा शेणाने सारवणारे हे मित्र खूप दुरावले. शेवटच्या क्षणी मात्र न राहून टिळक आगरकरांना भेटायला गेले. डोळे भरुन एकमेकांना पाहिले. पण बोलले नाहीत. टिळक घराबाहेर पडले आणि आत आगरकरांनी जीव सोडला. टिळकांना अतिव दुःख झाले. पण…. काय उपयोग. मित्र कायमचा गेला.

आपणही जरूर कड्या लावा. पण योग्य तिथेच. नको त्या ठिकाणी लावून बसाल तर फार फार काही गमावून बसाल. योग्य ठिकाणी लावाल तर जीवन हलके कराल.

फक्त ती लावायची कुठे आणि कधी यावर जरुर विचार करा. ही विनंती  आहे.

संग्रहिका : सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ ॥ मानस के मोती॥ -॥ मानस में भ्रातृ-प्रेम – भाग – 3 ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

मानस के मोती

☆ ॥ मानस में भ्रातृ-प्रेम – भाग – 3 ॥ – प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’☆

राम के साथ लक्ष्मण वन को गये। चौदह वर्षों तक उनके साथ रह सब कष्ट सहे और बड़े भाई और भाभी की सेवा व रक्षा की। लंका में युद्ध के समय जब लक्ष्मण को मेघनाद ने शक्ति से घायल किया। वे अचेत हो गये तो राम ने उनकी प्राण रक्षा के लिये यत्नकर वैद्यराज सुषेण के कथनानुसार हनुमान जी की योग्यता से हिमालय से संजीवनी बूटी मंगवाई और उन्हें स्वस्थ करने को सबकुछ किया। दुखी राम के इस कथन से उनके हृदय में भाई लक्ष्मण के प्रति गहन प्रेम की झलक स्पष्ट दिखाई देती है जब रुदन करते हुये वे कहते हैं-

सकहु न दुखित देखि मोहि काऊ, बंधु सदा तुम मृदुल सुभाऊ।

मम हित लागि तजेहु पितु माता, सहेहु विपिन हिम आतप वाता॥

सो अनुराग कहां अब भाई, उठहु न सुनि मम बच बिकलाई।

जो जनतेऊँ वन बंधु बिछोहूं, पिता वचन मनतेहू नहिं ओहू॥

सुत बित नारि भवन परिवारा, होंहिं जाहिं जग बारम्बारा।

अस विचार जिय जागहु ताता, मिलई न जगत सहोदर भ्राता॥

जथा पंख बिन खग अतिदीना मनि बिनु फनि करिबर कर हीना।

अस मम जिवन बंधु बिनु तोही, जौ जड़ दैव जिआवै मोही॥

जैहहुँ अवध कौन मुँह लाई, नारि हेतु प्रिय बंधु गंवाई।

इन समस्त प्रसंगों के प्रकाश में सब भाइयों में आपस में कितना प्रेम था स्पष्ट हो जाता है। आज जब संसार में भाईयों में आपस में छोटी-छोटी बातों में मतभेद और रार होती दिखती है तब मानस में भ्रातृप्रेम का प्रस्तुत आदर्श समाज के लिये अनुकरणीय है और भविष्य में भी संसार के लिये मार्गदर्शी रहेगा।

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्गायन – कावळा आणि कोकीळ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

? विविधा ?

☆ निसर्गायन – कावळा आणि कोकीळ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

कोकिळेचा आवाज कोणाला आवडत नाही ? मला संगीतातलं ज्ञान नाही. पण असं म्हणतात की कोकिळा पंचम स्वरात गाते . मग निसर्गातील हा कोकिळास्वर ऐकून संगीतातही पंचम स्वर निर्माण झाला असावा. वसंत ऋतूत आणि पावसाळ्याच्या आरंभी कोकिळेची मधुर तान आपले मन मोहून घेते. मराठी आणि हिंदी चित्रपटात कोकिळेवर कितीतरी गीते आहेत. कितीतरी कविता आहेत. सुवर्ण सुंदरी या चित्रपटात लता मंगेशकर आणि मो. रफी यांनी गायिलेले ‘ कुहू कुहू बोले कोयलिया..’ हे गीत राग यमन, राग बहार, राग जौनपुरी आणि राग सोहनी या रागामंध्ये बद्ध आहे. १९५७ मध्ये आलेल्या सुवर्ण सुंदरी या चित्रपटातले हे गीत आजही ताजे टवटवीत वाटते. 

पण मंडळी, खरंच कोकिळा गाते  ? नाही. खरं म्हणजे गातो तो कोकीळ पक्षी. पण लहानपणापासून आपण कोकिळा गाते असं ऐकत आलो, त्यामुळे आपला तो समज दृढ होऊन बसतो.  तुम्ही कदाचित हेही कधी ऐकलं असेल की कोकिळा हा अत्यंत आळशी पक्षी आहे. तो म्हणजे ती आपली अंडी कधीही स्वतः उबवत नाही. ती आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात ठेवून येते. पण ही एक गमतीदार कथाच आहे. साधारणपणे पावसाळ्याच्या सुरुवातीला कावळे आणि कोकीळ यांचा विणीचा हंगाम सुरु होतो. याच काळात कोकिळा आणि कावळीण सुद्धा अंडी प्रसवतात. कोकीळ आणि कावळे हे तसे एकमेकांचे शत्रू. पण निसर्गाची किमया बघा. कावळीण आपल्या शत्रूच्या पिलांची अंडी तिच्या घरट्यात मोठ्या प्रेमाने उबवते. कसं घडतं हे ? 

कावळे आणि कोकीळ यांचा निवास हा साधारणपणे बागा , उद्याने अशा नागरी वस्तींजवळ असलेल्या ठिकाणी असतो. आमराईमध्ये असतो किंवा तशाच झाडांमध्ये असतो.  जेव्हा कोकीळ पक्षी गाऊ लागतो, तेव्हा कावळ्यांना ते सहन होत नाही. आणि ते गाणाऱ्या कोकीळ पक्ष्याला सगळे मिळून हुसकावून लावतात. कोकिळा मोठी हुशार. या कालावधीत कावळ्यांच्या घरट्यात कोणी नाही असे पाहून ती आपले अंडे तेथे ठेवून देते. आणि कावळिणीला  शंका येऊ नये म्हणून तिची काही अंडी खाली ढकलून देते. कोकीळ पक्ष्याला हुसकावून लावून परत आलेल्या कावळा आणि कावळिणीच्या लक्षात ही गोष्ट येत नाही. आणि ती दोघं मोठ्या प्रेमाने ती अंडी उबवतात. आता ही अंडी उबवताना निसर्ग कशी किमया करतो ते बघा. जे कोकीळ पक्ष्याचे गाणे सुरुवातीला कावळा आणि कावळिणीला नकोसे होते, तेच गाणे आता अंडी उबवताना त्यांना हवेहवेसे वाटते. आणि तो कोकीळ पक्ष्याचा मंजुळ स्वर ऐकत त्यांची अंडी उबवण्याची क्रिया छान रमतगमत पार पडते. 

अंडी उबवताना कावळा आणि कावळीण एकमेकांना सहकार्य करतात. जेव्हा कावळीण अंडी उबवत असेल तेव्हा,  कावळा जवळ बसून अंडी आणि पिलांचे रक्षण करतो. कधी कधी कावळीण चारा आणण्यासाठी किंवा अन्नाच्या शोधात बाहेर जाते, तेव्हा कावळा घरट्यात बसून ती अंडी उबवतो.  अशा रीतीने अंड्यांमधून पिलं बाहेर येईपर्यंत दोघांचं एकमेकांना सहकार्य असते. एकदा पिलं मोठी झाली की कावळा आणि कावळीण ते घरटं सोडून निघून जातात. माणूस जसा शेवटपर्यंत आपल्या घरातच राहतो, तसे पक्षी कायम स्वरूपी आपल्या घरट्यात राहत नाहीत. इतर वेळी झाडांवर, डोंगरांच्या कडेकपारीत त्यांची वस्ती असते. आपण लहानपणी गोष्टीत किंवा गाण्यात ऐकलेलं असतं की सकाळी पक्षी चरण्यासाठी बाहेर पडतात आणि संध्याकाळ झाली की आपल्या घरट्याकडे परत फिरतात. ‘ या चिमण्यांनो परत फिरा रे, तिन्ही सांजा जाहल्या ‘  हे गाणे आपल्याला माहिती आहे. पण हे अर्धसत्य असते. जोपर्यंत पिलं घरट्यात असतात, तोपर्यंत ते घरट्याकडे परततात. नाहीतर त्यांची वस्ती झाडांच्या फांद्यावर, ढोलीत, फांद्यांच्या बेचक्यात असते. 

निसर्गात सर्व घटकांचे एकमेकांना कसे सहकार्य असते, ते पाहण्यासारखे आहे. वास्तविक कावळे आणि कोकीळ हे एकमेकांचे शत्रू असलेले  पक्षी. पण निसर्ग त्यांच्याकडून आपले काम करून घेतो.  कावळीण आणि कोकिळा या दोन्ही मादी पक्षी. दोन्हीही आईच्या भूमिकेत असतात. कोकिळा  जरी अंडी देते आणि ती उबवत नसली, तरी तिला आपल्या पिलांची काळजी असतेच. म्हणूनच ती आपली अंडी कावळिणीच्या घरट्यात गुपचूप ठेवून येते. ती असे का करते ? तिची अंडी स्वतः का उबवत नाही ? तर ही तिची नैसर्गिक प्रेरणा असते. आणि कावळीण सुद्धा आईच. ती सुद्धा मोठ्या प्रेमाने आपल्या घरट्यातील अंडी उबवते. आपल्या अंड्यांमध्ये काही अंडी कोकिळेची आहेत, हे कदाचित तिला लक्षात येत नसावे, पण सगळीच अंडी ती मायेने उबवते. पिलांना भरवते. हे करताना तिच्यामध्ये आपलेपणा अथवा परकेपणा नसतो. म्हणजे पिलांमध्ये ती भेदभाव करीत नाही. 

आपल्याला कोकिळा आवडते. कावळा आणि कावळीण आपले नावडते प्राणी. कोकिळा म्हणजे कोकीळ पक्षी आपल्याला का आवडतो, कारण तो मधुर गातो म्हणून. पण कावळा काय आणि कोकिळा काय हे दोघेही निसर्गाचे घटकच . त्यांची प्रत्येकाची भूमिका निसर्गचक्रात महत्वाची असते. कावळा हा पर्यावरण स्वच्छ ठेवणारा पक्षी.

पण आपण औद्योगिक प्रगती, वाढणारी शहरे, नष्ट होणारी जंगले, पक्ष्यांचा नष्ट होणारा नैसर्गिक निवास इ मुळे आता कावळ्यांची संख्या कमालीची कमी झाली आहे. या निसर्गाच्या सफाई कामगाराला आपण हद्दपार केले आहे. लहान मुलांना गोष्ट सांगताना आपण चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं इ सांगून लहान मुलांच्या मनात या अत्यंत उपयोगी प्राण्याबद्दल आपण अढीच निर्माण करतो, नाही का ?  कावळ्याच्या काळ्या रंगात आणि कोकिळेच्या काळ्या रंगात सुद्धा तेवढेच सौंदर्य आहे, की जेवढे मोर, बगळा आणि इतर पक्ष्यांच्या रंगात आहे हे आपण मुलांना कधी शिकवणार ? पौर्णिमेची रात्र जेवढी सुंदर असते, तेवढीच सुंदर अमावास्येची रात्र सुद्धा असते. तुमच्याकडे सौंदर्य शोधण्याची नजर हवी. आणि ती नजर आपण विकसित करायला हवी. सौंदर्य फक्त गोरेपणा किंवा काळेपणात नसते. ते पाहणाऱ्याच्या नजरेत असते. पण लहानपणापासून चुकीच्या कल्पना मनावर बिंबवल्या जातात. सगळे रंग निसर्गानेच निर्माण केले आहेत. हे जर आपण निसर्गातून शिकणार नसू, तर आपल्या शिक्षणाचा काय उपयोग ? आपण निसर्गाला जेव्हा समजून घेऊ तेव्हा तो केवळ रंगांचे सौंदर्याच आपल्याला शिकवील असं नाही, तर तो विचारांचंही सौंदर्य आपल्याला प्रदान करील. आणि आपल्याला तेच हवं आहे. 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वारीचा अपूर्व सोहळा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

??

☆ वारीचा अपूर्व सोहळा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी

सातारला असताना वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांच्याबरोबर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे काम करायला मिळाले. गुरूजी अनेक धार्मिक कार्यक्रमांचं नेटकं आयोजन करत असत. एकदा त्यांनी आषाढी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना धोतरे , घोंगडी शाली व स्त्रियांना साड्या स्वखर्चाने वाटायचे ठरवले . आम्हालाही वारीचा सोहळा अनुभवायचा होता त्यामुळे आम्ही तीस-चाळीस जण त्यांच्या बरोबर निघालो. सातारला दोशी बंधू यांची पार्ले बिस्कीट कंपनी आहे. त्यांनीही भरपूर बिस्किटांचे बॉक्स वारकऱ्यांना देण्यासाठी पाठवले. सकाळी सातला आम्ही गुरुजींच्या पाठशाळेत जमलो. सगळे जमेपर्यंत  झिम्मा फुगडी गाणी फेर, विठ्ठल नामाचा गजर सुरू झाला आणि वारी चा उत्साह ओसंडून वाहायला लागला. आठ वाजता दोन मोठ्या बसेस निघाल्या. वाटेत भजन भारूड गवळण जप रंगतदार किस्से यात चार तास कसे निघून गेले कळलेच नाही. माळशिरस च्या पठारावर उतरलो. पोटपूजा उरकून घेतली. आता मात्र” भेटी लागी जीवा लागलीसे आस ” अशी पालखीची तळमळ प्रत्येकाला लागली. आणि लांबून टाळ-मृदंगाच्या नादात विठ्ठल नामाचा गजर ऐकायला यायला लागला. अनेक भगव्या पताका फडकू लागल्या.” निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम ” म्हणत नाचत शुभ्र वेषातले वारकरी तल्लीन होऊन स्वयंशिस्तीने पुढे जाताना दिसू लागले. आपले वय विसरून डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन नाचणाऱ्या महिला पाहून जागच्याजागी आम्हीसुद्धा नाचायला लागलो. मागून सुंदर धिप्पाड खिलारी बैल जोडी आपल्या खांद्यावर रथ ओढत आली. संपूर्ण रथ फुलांच्या माळांनी सुशोभित केलेला होता.  पालखीचे दर्शन घेण्यासाठी व पादुकांची पूजा करण्यासाठी झुंबड उडाली. बिस्किटांचे बॉक्स उघडून प्रत्येकाला बिस्किट पुडा देताना खूप आनंद होत होता. गुरुजी व त्यांचे शिष्य गरजू वारकरी हेरून त्यांना कपडे वाटप करत होते. दोन तास कसे गेले कळलेच नाही. विठ्ठल भक्ती ची गंगा अखंड वाहत होती. वारकऱ्यांची रांग संपत नव्हती. अखेर आमच्याकडचे सामान संपले व आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. तो अपूर्व अद्भुत एकमेवाद्वितीय अविस्मरणीय अवर्णनीय अद्वितीय असा सोहळा आजही आठवतो. वारीमध्ये उच्चशिक्षित भाविक सुद्धा होते. कुणीही कसलाही बडेजाव मिरवत नव्हते. मन मंदिरात जपून ठेवलेला हा वारीचा सोहळा आठवला की आजही खूप प्रसन्न वाटते.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ☆ इतिहास बदलणारा उंदीर  — श्री सौरभ वैशंपायन ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ इतिहास बदलणारा उंदीर  — श्री सौरभ वैशंपायन ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे

सर्वसाधारणपणे उंदीर हा पराकोटीची नासाडी करणारा अत्यंत उपद्रवी जीव समजला जातो. शास्त्रीय प्रयोगासाठी ते पांढरे उंदीर वापरताना आपण बघतो, ते वगळता उंदीर हा पाळीव प्राणी म्हणून कोणी वापरताना दिसत नाही. पण काही प्रशिक्षित उंदीर जीवितहानी टाळत आहेत आणि त्याबद्दल त्यांच्यातील एकाला सुवर्ण पदक दिलं गेलं होतं याबद्दल वाचलं आहे का?

आपल्या बोलण्यात सिंहाचा वाटा किंवा खारीचा वाटा हे शब्दप्रयोग येत असतात, पण भविष्यात त्यात उंदराचा वाटा अशी भर पडली तर आश्चर्य वाटायला नको. मात्र हे काय आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात एक चक्कर मारावी लागेल व त्याचा आज होणारा भीषण परिणाम जाणून घ्यावा लागेल.

व्हिएतनाम युद्धाच्या काळात अमेरिकेच्या विरोधात लढणारे शेकडो व्हिएतकाँगी म्हणजे व्हिएतनामचे स्वातंत्र्यसैनिक सीमा ओलांडून कंबोडियातील जंगलात लपून बसायचे. त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी किंवा त्यांना रोखण्यासाठी विमानातून हजारो टन बॉम्ब तर टाकले गेलेच पण सोबत लाखो भू-सुरुंग पेरले गेले. वरून टाकलेल्या बॉम्बपैकी अनेक बॉम्ब चिखलात, शेतात रुतून बसल्याने फुटलेच नाहीत.  ते आजही तसेच जिवंत आहेत. तेच भू-सुरुंगांच्या बाबतीत. अमेरिकेने पेरलेल्या भू-सुरुंगातून आजही मृत्यूचे किंवा अपंगत्वाचे पीक निघते आहे. दरवर्षी शेकडो नागरिक शेतात, जंगलात काम करताना, लहान मुले खेळताना अजाणतेपणी अश्या बॉम्ब/भू-सुरुंगावर वजन पडल्याने प्राणास मुकतात किंवा अपंग होतात. अशाप्रकारे अपंग झालेल्यांचा अधिकृत आकडा तब्बल ६४ हजारांचा आहे. लाखो चौरस किमी.मध्ये लपलेले हे पन्नास लाखांहून अधिक बॉम्ब/भू-सुरुंग शोधून काढणे म्हणजे गवताच्या गंजीत टाचणी शोधण्यागत आहे. शिवाय शोधताना अपघात होतात ते वेगळे. अपघात होऊ न देता काम करणे अत्यंत वेळखाऊ, किचकट आणि खर्चिक काम. कंबोडिया हा देखील शेतीप्रधान देश. एखाद्या शेतात हे भू-सुरुंग न शोधता काम करायला जावं तर जिवाची जोखीम. म्हणजे गेली दशकानुदशके दररोज लाखो कंबोडियन नागरिक जीव मुठीत धरून कामावर जात आहेत. सगळ्याच बाजूने बिचाऱ्यांची कुचंबणा.

अशावेळी मदतीला आला एक उंदीर. तोच उंदीर जो एरवी शेतकऱ्यांचा मोठा शत्रू समजला जातो. त्याचं नाव – “मगावा”. हे त्याला लाडाने दिलेलं नाव. मगावाचा अर्थ “ध्यान केंद्रित असलेला”. तर हा मगावा मूळचा टांझानियातील “आफ्रिकन जायंट पोच्ड रॅट” प्रजातीचा उंदीर. हे उंदीर आकाराने सश्याइतपत मोठे असतात. अत्यंत तीव्र घाणेंद्रिय आणि मातीत कित्येक फूट खोल असलेल्या गोष्टीचा वास घेण्याची आश्चर्यकारक क्षमता असलेला हा मगावा कंबोडियन नागरिकांसाठी जणू देवदूत ठरला. जन्मानंतर पहिले दहा आठवडे त्याची व्यवस्थित वाढ झाल्यावर त्याला भू-सुरुंग बनवायला जी स्फोटकं किंवा मिश्रण वापरले जाते त्याचा गंध ओळखण्यासाठी प्रशिक्षित केलं. मोठमोठ्या लाकडी खोक्यात माती भरून त्यात ती मिश्रणे ठेवून त्याला तितका भाग ओळखण्याचे प्रशिक्षण दिले. बरोबर शोध घेण्याच्या बदल्यात त्याला अत्यंत चविष्ट फळे मिळत.

यासाठी मगावा आणि त्याच्यासारखे अजून काही उंदीर “ऑन फिल्ड” काम करत आहेत. वजनाने हलका असल्याने भू-सुरुंगावर त्याच्या वजनाचा काहीच परिणाम होत नाही. या उंदरांना एक छोटा बॉडी हार्नेस घालून त्यातून एक दोरी पास केली जाते व त्यांना एका सरळ रेषेत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालवलं जातं. मगावा २०० चौरस मीटरचा परिसर अर्ध्यातासात बिनचूक पिंजून काढू शकत असे. हेच काम करायला माणसाला अत्यंत प्रगत माईन-डिटेक्टर्स घेऊनदेखील चार दिवस लागतात. जून २०२१ मध्ये वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या आयुर्मानानुसार मगावा “म्हातारा” झाल्याने या कामातून त्याला निवृत्ती दिली। मात्र तोवर मगावाने १,७७,००० चौरस मीटरहून अधिक परिसर निर्धोक केला. त्याने ७१ भू-सुरुंग आणि डझनावारी इतर प्रकारची जिवंत स्फोटके शोधली होती. इतक्याश्या जीवासाठी हे काम खरोखर प्रचंड आहे. मगावाने एकही चूक न करता जो परिसर निर्धोक केला त्याची खात्री लोकांना पटविण्यासाठी मगावा ज्या भु-सुरुंग शोधणाऱ्या पथकासोबत काम करतो त्यांनी त्या जागी फुटबॉल मॅचेस खेळून दाखवल्या. ते बघून त्या परिसरातील नागरिक निश्चिंत झाले. मगावा हा कंबोडियन लोकांचा लाडका हिरो झाला.

त्याच्या याच कामाचे कौतुक म्हणून लंडनस्थित PDSA या संस्थेने सप्टेंबर २०२० मध्ये सुवर्णपदक देऊन त्याचा सन्मान केलेला आहे. PDSA ही संस्था १९१७ पासून माणसाला आपत्तीतून वाचविणाऱ्या प्राणी-पक्ष्यांचा ३ प्रकारची पदके देऊन सन्मान करते आहे. पैकी युद्धकाळात विशेष कामगिरी करणाऱ्या पशु-पक्ष्यांना डिकीन मेडल दिले जाते. हा पुरस्कार म्हणजे प्राण्यांचा “व्हिक्टोरिया क्रॉस” समजला जातो. याशिवाय शांतताकाळात विशेष काम करणाऱ्या प्राणी-पक्ष्यांना सुवर्ण किंवा रौप्य पदक दिले जाते. आजवर PDSA ने कुत्रे, मांजरी, घोडे आणि कबुतरांचा सन्मान केला होता (यावर मी माझ्या “परिंदे” या ब्लॉग मध्ये मागेच लिहिलं होतं – http://sahajsuchalamhanun.blogspot.com/2015/01/blog-post_21.html ). मगावा  हा असे पदक/पुरस्कार प्राप्त करणारा पहिला उंदीर. PDSA ने प्राण्यांसाठी ब्रिटनमध्ये ४२ दवाखाने उघडले असून तिथे प्राण्यांवर मोफत उपचार होतात.ज्यांना सन्मान प्राप्त झाला आहे त्या प्राण्यांची कृतज्ञता म्हणून खरोखर ते मरेपर्यंत बडदास्त ठेवली जाते. जानेवारी २०२२ मध्ये मगावाने अखेरचा श्वास घेतला तोवर त्याचीही अशीच काळजी घेतली गेली.

तर अशी आहे ही सामान्य लोकांच्या जीवनासोबत एका अर्थी इतिहासही बदलणाऱ्या एका छोट्याश्या “हिरोरॅट” मगावाची छोटीशी तरीही खूप मोठी गोष्ट. 

— श्री सौरभ वैशंपायन

संग्राहिका :- सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नव-यांचे प्रकार… ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ नव-यांचे प्रकार… ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

😳😨नवऱ्यांचे प्रकार:

१) प्रेमळ 😄: ह्या ड्रेसमधे तू काय मस्त दिसतेस !

२) उदार 😎: तुला हवी ती साडी घे.

३) समजुतदार : तु आज खूपच दमलेली दिसतेस, चल आज बाहेर जेवायला जाऊ.

४) हौशी : तुझ्यासाठी मोगऱ्याचा गजरा आणलाय बघ.

५) प्रामाणीक 😒: मित्राने खूप आग्रह केला, पण मी फक्त दोनच पेग घेतले. आणी सिगरेट तर अजिबात  ओढलीच नाही. तुला शब्द दिलाय नां ?

६) एकनिष्ठ 😞 : अगं, ती माझी शाळेतली मैत्रीण. पण स्वभावाने एकदम खडूस, तुझ्यासारखी मनमिळावू नाही.

७) कष्टाळू 😟: ऑफिस मधून येताना भाजी घेऊनच आलो, उगाच तुला परत मंडईत जायचा त्रास नको.

८) आज्ञाधारक 🥺 : मित्र पार्टीला बोलवत होता, पण म्हटलं आधी तुला विचारावं आणी मगच कळवावं.

९) स्वाभिमानी ☹️ : मी काय तुझ्या शब्दाबाहेर आहे कां ?

१०) काटकसरी 😖: मोत्यांचा नेकलेस काय करायचाय? मण्यांची माळ घातलीस तरी चालेल. जातीच्या सुंदरीला काहीही शोभतं.

११) धाडसी 😗: तुझी आई आणखीन किती दिवस राहाणार आहे ?

१२) मितभाषी😇 :  हो !

१३) खंबीर 😆: तु म्हणशील तसं, तू आणी मी काय वेगळे आहोत कां ?

१४) आर्जवी 😘: मी चहा करणारच आहे, तूही घे नां !

वरीलपैकी  कोणत्याही कॅटेगरीत नवरा बसत नसल्यास……

आपलंच नशीब खोटं…

असं मानून गप्प बसावे…!

😷🙊

संग्राहक – सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print