☆ “अंतिम पर्वाच्या स्मितरेषा–…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
आयुष्याचा ७३ वर्षाचा प्रवास संपवून आज ७४ व्या वर्षात पदार्पण करतो आहे. बरंच आयुष्य जगून झालेलं आहे. बाकी आयुष्य फार थोडं उरलेलं आहे याचे जाणीव आहेच. खरं तर या दिवसाला वाढदिवस का म्हणतात हे समजत नाही. आयुष्यातलं एक वर्ष कमी होतं. वाढतो फक्त एक आकडा. जगलेल्या आयुष्याचा. त्या वाढलेल्या आकडेवारीमुळे लोकांना या माणसाने काहीतरी केलं असेल असं वाटत असावं.
तसं पाहायला गेलं तर करण्याच्या इच्छा प्रचंड असतात. साऱ्या इच्छा पूर्ण होतातच असे नाही. अर्थात अपूर्ण इच्छाच जास्त असतात. पण तरीही आयुष्यात समाधान बाळगावं अशा गोष्टी घडल्यास जाताना तरी चेहऱ्यावर स्मितरेषा उमटेल.
बाळ कोल्हटकर यांच्या एका नाटकातील कवितेच्या ओळी आठवतात …..
आयुष्याचा माग मिळेना, गुन्हा कळेना जगदीशा ।
कुठे कधी अस्पष्ट हसावी एखादी तरी स्मितरेषा।।
आयुष्यामध्ये चेहऱ्यावर स्मितरेषा उमटण्यासारख्या घटना तशा कमीच असतात.
एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे।
परंतु आयुष्याच्या शेवटाकडे असताना सिंहावलोकन करताना काही समाधानाच्या स्मितरेषा नक्कीच चेहऱ्यावर असणार आहेत.
मुले कर्तृत्ववान आणि आई-वडिलांची काळजी घेणारी असावीत हा सगळ्यात मोठा कौटुंबिक समाधानाचा ठेवा. त्याची एक स्मितरेषा !
आपल्या देशात अवयवदान आणि देहदान या सर्व महादानाचे प्रमाण वाढते आहे ही एक सामाजिक स्मितरेषा !!
साहित्य विश्वात छोटीशी लुडबुड करून स्वतःच्या मनाचे समाधान करून घेता आले ही मानसिक समाधानाची अजून एक स्मितरेषा!!!
रोटरी मार्फत समाजाच्या उपयोगाचे काही उपक्रम करता आले त्याची एक आंतरराष्ट्रीय सामाजिक स्मितरेषा!!!!
आपल्या देशाचा झेंडा वैज्ञानिकांनी चंद्रावर फडकवला आणि आता मंगळ पदाक्रांत करून शुक्रापासून सूर्यापर्यंत लक्ष्यांचा पाठपुरावा चालू ठेवला आहे ही राष्ट्रीय स्मितरेषा !!!!!
पत्नीची साथ शेवटपर्यंत (कुणाच्या ? ते माहित नाही) असेलच ४६ वर्षांचा सहवास ही आणखी एक स्मितरेषा !!!!!!
काही मित्रमंडळी, काही नातेवाईक, समाजकार्यातील सहकारी या सर्वांच्या आठवणीमध्ये माझी एखादी तरी स्मृती नक्की असेल याचे समाधान ही एक स्मितरेषा !!!!!!!
अशा अनेक स्मितरेषा या जगातून एक्झिट घेताना चेहऱ्यावर असतील आणि ही समाधानाची लकेर घेऊन या जगातून एक्झिट मिळेल हा आनंदाचा भाग.
(आयुष्याचे शेवटचे पर्व हे पुण्यात घालवता येणे हे, पुण्याचे (?) असले तरी त्यामध्ये आयुष्यभर गमावलेले पुण्य खर्ची पडेल काय ? ही सुद्धा भीती आहेच.)
आयुष्याच्या शेवटच्या पर्वात आनंदाचे डोही आनंद तरंग या अवस्थेत असणे हे सगळ्यात मोठे भाग्य माझ्या वाट्याला आले याचे समाधान खूप मोठे आहे.
जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख असलेले पहायला मिळते.
गणपतीच्या अन्य रुपाची कुणी कल्पनाही करू शकत नाही.
मात्र, दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी म्हणजे, मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे. मनुष्याचे मस्तक असलेली ही जगातील एकमेव गणेश मूर्ती असल्याचे मानले जाते. तामिळनाडूमध्ये कुथनूरपासून जवळ तिलतर्पणपुरी इथे हे मंदिर आहे.
आदी विनायक असे या मंदिराचे नाव आहे.
गजमुखी अवतारापूर्वी मानवी रुपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदी गणपती संबोधले जाते. याला “ नरमुख विनायक “ असेही म्हटले जाते.
संग्रहिका : प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
लहानपणी गौरी गणपतीच्या दिवसांत पारिजातकाच्या झाडाखालची पांढरीशुभ्र, शेंदरी देठाची फुलं वेचताना आमची तारांबळ उडत असे. कोणाच्या परडीत, कमी वेळात जास्त फुलं जमतात, ह्याची जणू चढाओढच लागत असे. ‘माझी परडी’, ‘माझी फुलं’ ह्या’ मी’ पणाचा भारी अभिमान वाटे.
एकदा का ही फुलं देवाच्या चरणी अर्पण केली की मात्र ही फुलं, ‘माझी फुलं’ रहात नसून ‘त्याची फुलं’ होऊन जात. निर्माल्य होईपर्यंत ती त्याचीच फुलं बनून रहात. फुलांद्वारे ‘मी पणा’ देखील नकळत देवाला अर्पण होत असे.
खरंच, किती क्षणिक असते, मी पणाचे सुख! कळ्यांची फुलं होताना, ती अंगाखांद्यावर खेळवताना तो पारिजातकही अभिमानाने म्हणत असेल, ‘माझ्या कळ्या’ , ‘माझी फुलं’. पण एकदा का ही फुलं धरतीला अर्पण केली की होतोच की तोसुद्धा मीपणातून मुक्त!
आयुष्य देखील असंच असतं. ह्या क्षणभंगुर आयुष्यात माझं घर, माझे कपडे, माझे दागिने, हे किती काळ आपण मिरवणार असतो? एकदा का आपला नश्वर देह अनंतात विलीन झाला की ह्या माझेपणावर आपला काहीही हक्क उरत नाही. हे सगळं तत्त्वज्ञान माहीत असूनही आयुष्यात माझेपणाच्या मिठीतून केवळ वस्तूंनाच नव्हे, तर व्यक्तिंनादेखील सोडणं जमत नाही.
मुलाचं लग्न झालं, तरी आईला स्वतःला मुलापासून अलिप्त करता येत नाही. ‘तिचं घर’, ‘तिचा मुलगा’, ‘तिचा संसार’ सुनेच्या ताब्यात सोपवणं तिच्या ‘पझेसिव्ह’ स्वभावाला जमत नाही. सुनेचं स्वतःच्या वेळेनुसार उठणं, स्वतःच्या वेळेनुसार घर आवरणं सासूला बघवत नाही. सासूचा जीव स्वतःच्या संसारात गुंतलेला असतो. सासरच्या पद्धतीच नवीन सुनेने अंगीकाराव्यात अशी तिची मनोमन इच्छा असते.
वडील जेव्हा आपल्या व्यवसायात मुलाला सामावून घेतात, तेव्हा त्यांच्या पद्धतीनेच मुलाने व्यवसाय करावा असं त्यांना वाटतं. मुलाला त्याच्या कल्पनाशक्तीप्रमाणे व्यवसायाचा विस्तार करु देण्याइतकं अलिप्त त्यांना होता येत नाही.
आयुष्य जसं जसं पुढे जातं, तसा माणूस त्यात अधिकाधिक गुंतत जातो. गुंतण्यामुळेच कलह निर्माण होतात. सासू सुनेचं पटत नाही, बाप लेकात मतभेद होतात, आई मुलांत वाद होतात. आणि ह्या सर्व संघर्षांचं मूळ कारण असतं, ‘गुंतणं’.
आयुष्यात ‘सोडणं ‘जमलं पाहिजे. केवळ वस्तू अन् व्यक्तीच नव्हे, तर दुःख, भीती, यातना, वाईट आठवणी सुद्धा सोडता आल्या पाहिजेत. फुलं ज्याप्रमाणे परमेश्वर चरणी अर्पण केल्यावर ती त्याची फुलं होतात, त्याप्रमाणे दुःखसुद्धा परमेश्वर चरणी अर्पण करून आपल्याला त्यातून रितं होता आलं पाहिजे.
आयुष्य सुखदुःखाची झोळी आहे. दुःखं गाळता आली पाहिजेत. दुःखांना ‘डिलीट’ करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. लोभ, मोह टाळता यायला हवेत. आशेपासून दूर रहाता आलं, तर निराशेचं दुःख पदरी पडत नाही.
साध्या साध्या गोष्टीतून देखील मोह सुटत नाही. माझ्या फेसबुक पोस्टला ‘लाइक’ केलं पाहिजे. ‘व्हाॅट्स अॅप पोस्टवर कॉमेंट टाकली पाहिजे. माझ्या जवळच्या लोकांनी माझी पोस्ट शेअर केली पाहिजे असा हट्ट, माझ्या कामाचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे हा आग्रह, मी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे अशी इच्छा, अशा सगळ्या अपेक्षांना जेव्हा पूर्णविराम देता येईल, तेव्हा आपल्याला खऱ्या दृष्टीने अलिप्त होता आलं, असा त्याचा अर्थ होईल.
अलिप्त होण्याचा प्रयत्न करुन तरी बघा. मनातील सारं मळभ निघून जाईल. कोसळून मोकळ्या झालेल्या निरभ्र आकाशासारखं मनदेखील स्वच्छ, सुंदर होईल, ज्यात दुःखद आठवणींचे काळे ढगही नसतील किंवा मोहमयी पांढरे ढग देखील नसतील.
रिक्त होण्यातही सुख आहे. आपलं जीवन कोणाच्या तरी उपयोगी पडतंय, ही भावनाच खूप सुखावह आहे. पारिजातकाचं झाड तेच तर सुचवतंय. अगणित फुलांचं दान अर्पित करून, परत नव्याने बहरण्यासाठी सज्ज होतोच की बापडा… अगदी रोज… कोणत्याही पाशात न अडकता… अलिप्तपणेच !
संग्राहक :श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “पितृ पक्ष और पितृ दोष”।)
अभी अभी # 171 ⇒ पितृ पक्ष और पितृ दोष… श्री प्रदीप शर्मा
आत्मा तो खैर अमर है, हम तो जीवात्मा हैं, क्योंकि हमारा शरीर तो नश्वर है, इसे एक रोज मिट्टी में मिलना है। संसार माया है, जगत मिथ्या है, फिर भी हमने देवताओं को दुर्लभ यह मनुष्य जन्म पाया है।
अजीब दुविधा है, फिर भी, जीना इसी का नाम है।
सूक्ष्म जगत में अगर आत्मा और परमात्मा की बात होती है, तो इस स्थूल जगत में दुष्टात्मा और पापात्मा का भी वास होता है। ये कोई प्रेतात्मा नहीं, जीते जागते हाड़ मांस के ही लोग होते हैं, जो संत पुरुषों और सज्जनों का जीना हराम कर देते हैं। कई अवतार हो गए, कितनी बार पापियों और दुष्टों का सफाया हुआ, लेकिन परिणाम वही, दिन भर चले अढ़ाई कोस। इन अवतारों से तो हमारा अवतारी भला, और नतीजा, स्वच्छ भारत अभियान। ।
अच्छाई और बुराई ही सत्ता पक्ष और विपक्ष है।
पितृ पक्ष इन सबसे परे है।
जब हमारे शुद्ध चित्त पर माया का पर्दा पड़ जाता है, तो हम विकारों के अधीन हो जाते हैं। हमारा सरल स्वभाव काम, क्रोध, लोभ, भय और मत्सर के वशीभूत हो जाता है। रोग और बीमारी हमें घेर लेती है, वैसे ही कहां कम थे दुख जमाने में, जिंदगी गुजर गई कमाने में, और कमाया क्या, हर जगह स्वार्थ और पक्षपात। नतीजा पक्षाघात और हृदयाघात। सोचिए, क्या हालत हो गई होगी हमारी आत्मा की, और शुद्ध चित्त की। ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं। इस जीवन से तो मौत ही भली।
तो क्या मरकर आप मुक्त हो जाओगे। अस्मिता, आसक्ति और अहंकार तो मरने के बाद भी किसी का पीछा नहीं छोड़ते। सबसे बदले लेते रहोगे मरने के बाद भी। परिवार वाले अलग परेशान ! बोल गए थे जाने से पहले, सबसे चुन चुन के बदला लूंगा। वाकई बड़े परेशान थे। अच्छा हुआ, मुक्ति पा गए। ।
कितना अच्छा हो, जीव को मुक्तिधाम पहुंचते ही मुक्ति मिल जाए। चित्रगुप्त मुक्ति प्रमाण पत्र जारी कर दे। इनका शरीर शांत हो गया और इनकी आत्मा परमात्मा में विलीन हो गई। प्रमाणित आज की तिथि व वार सहित। लेकिन ऐसा होता कहां है। न जीवन इतना आसान और ना ही मुक्ति इतनी आसान। इसीलिए जो मरने के बाद भी कहीं अटके हुए हैं, भटके हुए हैं, कुछ अतृप्त हैं तो कुछ व्यथित, चिंतित, उनकी आत्मा की शांति के लिए कुछ श्रद्धा सुमन अर्पित कर दिए जाएं तो क्या बुरा है।
इसी जगत में कुछ आत्माएं पवित्र और शुद्ध भी होती हैं। जो संत स्वभाव के होते हैं, जिनका चित्त शुद्ध होता है, अनासक्त कर्म करते हुए अन्य लोगों के लिए भी वे एक आदर्श प्रस्तुत करते हैं। कर भला सो हो भला। सबको अच्छे संस्कारों का पाठ पढ़ाते हुए जब ऐसी पुण्य आत्माएं हमसे बिछड़ती हैं, तो हमारे मन को बड़ा कष्ट होता है।।
उनकी स्मृति कभी मन से जाती ही नहीं। रह रहकर उनकी याद आती है और उनके साथ बिताए स्वर्णिम पल भुलाए नहीं भूलते। जिनका स्मरण मात्र ही मन को पवित्र कर देता है, पितृ पक्ष उनके पुण्य स्मरण का ही तो पल है, जब हम उन्हें अपनी श्रद्धा के पुष्प अर्पित करते हैं। श्रद्धा से बड़ा कोई श्राद्ध नहीं। भाव ही श्रद्धा है और अभाव ही अश्रद्धा।
मनुष्य का सबसे बड़ा धन ऋण मुक्त होना है। सबसे बड़ा ऋण तो हम पर हमारे पितरों का है। अच्छे संस्कारों की जो वसीयत हमें मिली है, उससे ऋण मुक्त इस जीवन में तो नहीं हुआ जा सकता लेकिन उस ओर प्रयास अवश्य किया जा सकता है। उनका श्रद्धापूर्वक आभार और स्मरण। ।
अपने तो खैर अपने ही हैं, इस जगत में कोई पराया नहीं। प्रत्यक्ष और परोक्ष, सभी अपने परायों के कल्याण और मुक्ति की प्रार्थना ही सच्चा पितृ पक्ष है। सर्वे सन्तु निरामया में जीव जन्तु भी शामिल होना चाहिए। श्रद्धा से किया कर्म ही तो कर्म कांड कहलाता है, फिर चाहे वह तर्पण हो अथवा अर्पण ..!!
आज सोनमर्ग स्थलदर्शन होते. श्रीनगरहून सकाळी लवकरच निघालो. तिथून सोनमर्ग पर्यंतचे अंतर ८६ किलोमीटर होते. पण संपूर्ण रस्ता घाटाचा, वळणावळणाचा आणि तुलनेने बराच लहान होता. त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. सावकाश जावे लागत होते. या रस्त्यावर मिलिटरीच्या वाहनांची खूपच वर्दळ होती. त्यांची वाहने आली की इतरांना सरळ बाजूला थांबावे लागत होते. एकेका कॉनव्हाॅय म्हणजे ताफ्यात शेकडोनी वाहने असतात. पण अतिशय शिस्तबद्ध रीतीने जातात. एवढ्या प्रतिकूल वातावरणातले त्यांचे हे झोकून देऊन काम करणे पाहून त्यांचे खूपच कौतुक आणि अभिमान वाटला. आमच्या सॅल्युटला ते पण कडक सॅल्युटने उत्तर देत होते.
सोनमर्गला जायला जवळजवळ चार-पाच तास लागले. पण प्रवासात वेळ कसा गेला कळलेच नाही. सर्वांच्या गप्पा, गाण्याच्या भेंड्या सुरू होत्याच. पण बाजूचा निसर्ग कितीही पाहिला तरी समाधान होत नव्हते.
एका बाजूला उंच पहाड आणि दुसऱ्या बाजूला दरी होती. दरीच्या पलीकडे बर्फाच्छादित उंच पर्वत, मध्येच हिरवीगार कुरणे, मधे मधे स्वच्छ सुंदर सरोवरेही दिसत होती. जिकडे बघावे तिथले दृश्य म्हणजे एक एक चितारलेला कॅनव्हासच वाटत होता. सोनमर्ग इथल्या निसर्ग संपदेसाठी प्रसिद्ध आहे. सोनमर्ग म्हणजे ‘सोन्याची कुरणे’. इथे हिरवळीची मैदानी कुरणे मोठ्या प्रमाणावर आहेत. बर्फाच्या टोप्या घातलेली पर्वत शिखरे आणि हिरवीगार कुरणे ही सोनमर्गची वैशिष्ट्ये आहेत. सोनमर्गला ‘सरोवरांची नगरी’ पण म्हणतात. इथे लहान मोठी असंख्य सरोवरे आहेत. त्यातले ‘विशनसर’ सरोवर तर खूप प्रेक्षणीय आहे. नितळ निळेशार पाणी, सभोवती हिरवीगार कुरणे यामुळे अतिशय सुंदर दिसणारे हे मोठे सरोवर सर्वांना आकर्षित करते. वसंत ऋतूत तर इथे रंगीबेरंगी फुलांनी जागोजागी चादर पसरलेली असते.
असा आजूबाजूचा निसर्ग पहात, प्रवासाचा आनंद घेत आम्ही सोनमर्गला पोहोचलो. इथे ‘बबलू’ या मराठी रेस्टॉरंटमधे आम्हाला चक्क पिठलं भाकरीचे महाराष्ट्रीयन जेवण मिळाले.
इथून वेगवेगळ्या चार पाच पॉईंटना छोट्या वाहनाने जाता येते. आम्ही तिथल्याच मोठ्या पठारावरून थोड्या अंतरावरील शिखरावर चढून गेलो. तिथून थाजीवास ग्लेशियर दिसते. ते संपूर्ण दृश्य अप्रतिम दिसत होते. त्याच्या समोरच्या उंच शिखरावर बर्फाने घातलेली टोपी म्हणजे जणू हिऱ्याचा मुकुट शोभून दिसत होता. सूर्योदयाच्या वेळी पहिल्या सूर्यकिरणात हा बर्फ पिवळा दिसतो तेव्हा जणू सोन्याचा मुकुट वाटतो. पण तो नजारा आम्हाला त्यावेळी बघणे शक्य नव्हते.
शुभ्र हिमाच्या शिखरावरती
सहस्त्ररश्मी तळपला
सुवर्णवर्खी शाल ओढूनी
सुवर्णहिम झळकला ||
बाजूच्या उतारावर मेंढ्या चरत होत्या. एखाद्या सुंदर चित्रावरच आपण उभे असल्याचा भास होत होता. सर्वांनी मनसोक्त फोटो काढले. हाच निसर्ग संध्याकाळी वेगळाच दिसत होता. तो अनुभवत आम्ही परत निघालो.
एकूणच सोनमर्ग इथल्या निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. त्यामुळेच ते ट्रेकर्सचे सुद्धा आवडते ठिकाण आहे. ट्रेकिंग साठी इथे असंख्य ठिकाणे आहेत. इथले ट्रेकिंग, रिव्हर राफ्टींग प्रसिद्ध आहे. इथेच अमरनाथ यात्रेचा बेस कॅम्प पण आहे.
सोनमर्गच्या असंख्य नितळ पाण्याची सरोवरे, हिरवीगार कुरणे, रंगीत फुलांचे गालिचे, दऱ्या, बर्फाच्छादित डोंगर अशा नयनरम्य निसर्ग सौंदर्याने सर्वांनाच भुरळ घातली होती. त्याच्या मधूनच जाणाऱ्या नागमोडी घाटाने आम्ही परत आलो.
श्रीनगर, गुलमर्ग, पहेलगाम, सोनमर्ग अशा काश्मिरच्या प्रसिद्ध ठिकाणांच्या दर्शनाने मन भरून आणि भारूनही गेले. खरोखरीच हे नंदनवन भारताचे भूषण आहे. आधुनिकीकरणासाठी इथल्या निसर्गाला कसलीही हानी पोहोचवलेली नाही. म्हणूनच हे अनाघ्रात सौंदर्य आहे तसेच बावनकशी राहिलेले आहे. हे सर्व पाहून मन तृप्त समाधानाने भरले होते. आमची ही नंदनवनाची सफर आता खरोखरच आनंदाचा ठेवा बनवून राहील.
‘प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते ‘, हा वाक्प्रयोग आपण लहानपणापासून वाचलेला, ऐकलेला आणि बऱ्याच प्रसंगी आपली बाजू मांडतांना उपयोगात आणलेला आहे. पहिल्याच भेटीत किंवा एखाद्या प्रसंगी समोरच्या व्यक्तीने केवळ एखादी कृती करणे, न करणे किंवा एखादे वाक्य बोलणे, न बोलणे यावरून समोरच्याविषयी आपले कायमचे मत न बनविता, काही काळ त्याच्या सहवासात राहून तो ज्या विचाराने चालतो आहे ते विचार, ज्या भावनांचा आदर करतो त्या भावना, त्याच्या व्यथा, वेदना जाणून घेऊन या सर्व जाणीवांच्या संदर्भाने त्याच्या कृती अथवा उक्तीचा अर्थ लावावा, त्याच्याविषयीचे मत तयार करावे, असा या वाक्प्रयोगाचा मतितार्थ आहे.
कोणत्याही नात्यात नाण्याची समोर येणारी बाजू ,ही त्या व्यक्तीने पहिल्याच भेटीत अपेक्षित असलेली केलेली कृती किंवा उक्ती असते, अपेक्षित नसलेली केलेली कृती किंवा उक्ती असते किंवा अपेक्षा असतांनाही न केलेली कृती किंवा उक्ती असते. ही बाजू पूर्णत: त्या व्यक्तीच्या हातात असते. मात्र दुसरी बाजू समजून घेणे, हे त्या व्यक्तीच्या हातात नसून आपल्या हातात असते. आपल्याला अपेक्षित असलेली कृती तिने केली, आपल्याला अपेक्षित असलेली उक्ती, म्हणजे यथास्थिती प्रेमाचे,कौतुकाचे, आधाराचे, उत्साहवर्धक बोल ती बोलली तर तिची दुसरी बाजू आपल्याला उजळ वाटून ती आपल्याला खूप प्रिय होते, थेट काळजात जाऊन बसते. तेच तद् विरुद्ध बोलली, वागली किंवा अपेक्षित असे वागलीच नाही, बोललीच नाही तर तिची दुसरी बाजू काळी वाटून ती व्यक्ती अप्रिय होते. अशा पहिल्याच भेटीतल्या भाळण्याच्या किंवा पहिल्याच भेटीतल्या तिरस्काराच्या धावणाऱ्या भावनेला, ‘नाण्याला दुसरी बाजूही असते’ हा विचार वेग कमी करण्याचे स्पीड ब्रेकरचे काम करतो. भावनेला विचारांची जोड देतो.
काहींचे मन मोठे असते. पण हा मनाचा मोठेपणा योग्यवेळी, योग्य कृतीतून, वाणीतून व्यक्त करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे नसते किंवा ‘मनाचा मोठेपणा’ ही प्रदर्शन करण्याची वस्तू नाही, असाही त्यांचा अंतरीच भाव असतो. तर काहीचे मन अजिबात मोठे नसते, ते कोतेच असते. पण त्यांचे वागण्याचे,बोलण्याचे कौशल्य असे काही असते की आपल्याला ते व्यापक हदयाचे, हितचिंतक वाटू लागतात. अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींसमवेत काही काळ राहून, संवाद साधत राहिलो तरच त्यांची दुसरी बाजू, समोर येते. या व्यक्ती अशा का वागतात? याची उत्तरे समजतात. चांगल्या व्यक्तींना न गमावण्यासाठी आणि चुकीच्या व्यक्तींच्या मोहपाशात न अडकण्यासाठी काही काळ जाऊ देणे आणि दुसरी बाजू समजून घेऊन मग निर्णय घेणे केव्हाही चांगले.
अर्थात अशी दूसरी बाजू समजून घेणे अशाच व्यक्तींच्या बाबतीत घडते, ज्या व्यक्ती आपल्याला जीवनात हव्याशा वाटतात. पहिल्याच भेटीत एखादी व्यक्ती आवडली नाही आणि भविष्यात त्या व्यक्तीची आपल्या आयुष्यात निकड नसेल किंवा अन्य कारणांमुळे ती नको असेल तर त्या व्यक्तीची दुसरी बाजू समजून घेण्याची आवश्यकता राहत नाही. मात्र अशावेळी कुठेही बोलतांना त्या व्यक्तिविषयी नकारात्मक, टिकात्मक बोलणे टाळले पाहिजे. कारण त्या व्यक्तीची दुसरी बाजू आपण पुरती समजून घेतलेली नसते.
दुसऱ्या व्यक्तीची ‘दुसरी बाजू’ समजून न घेता अनेकांजवळ जर तिच्याविषयी आपण नकारात्मक बोललो तर ऐकणाऱ्यांसमोर नकळत आपल्या व्यक्तीमत्वाची नकारात्मक, अंधारलेली बाजू प्रदर्शित होते आणि आपण त्या क्षणी प्रियता गमावतो, आपले मूल्य कमी होते, याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. काही प्रसंगात आपलीही दुसरी बाजू असते, दुसऱ्याचीही दुसरी बाजू असते. सकृतदर्शनी दोन्हीही बाजू खऱ्या असतात. अशावेळी आपली दुसरी बाजू बाजूला सारुन, दुसऱ्याचीच दुसरी बाजू समजून घेणे हे आवश्यक असते. हेच मनाचा मोठेपणा दाखविणारे असल्याने जनमानसात तुमची उंची वाढविणारे असते.
एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ज्यांनी त्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली होती, त्या प्रसिद्ध लेखकांचा नामोल्लेख पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाकडून त्याच्या भाषणात करावयाचा राहून गेला. प्रस्तावना लिहिणाऱ्या लेखकांनी त्यांच्या भाषणात याविषयी जाहिर नाराजी व्यक्त केली. यात दोघांच्याही ‘दुसऱ्या बाजू’सकृतदर्शनी खऱ्या होत्या. ‘अनेक व्यवधानात नजरचुकीने नामोल्लेख राहिला’, ही लेखकाची दुसरी बाजू. तर ‘मी रात्रभर जागुन, अल्पकालावधीत विनंती आली असतांना, प्रस्तावना लिहिली. लेखकाने भाषणात अनेकांचे उल्लेख केले, आभार मानले. आपलाही उल्लेख आवश्यक होता’, ही प्रस्तावनाकार लेखकमहोदयांची दुसरी बाजू .दोन्हाही बाजू सकृतदर्शनी खऱ्या. पण मोठ्या माणसानेच मोठे मन दाखवून छोट्याची दुसरी बाजू समजून घ्यायची असते, या प्रस्थापित मूल्याला त्यांच्या कृतीने धक्का बसला आणि त्यामुळे जनमानसात त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला. उच्च पदावर पोहचलेल्या व्यक्तींवर समाजात वावरताना, व्यक्त होतांना,आपल्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना काय अपेक्षित आहे? ही चाहत्यांची दुसरी बाजू समजून घेऊन कृती होणेही आवश्यक असते.
कोणत्याही नातेसंबंधात आणि त्यातही कौटुंबिक किंवा मैत्रीच्या नातेसंबंधात ‘समोरच्याची बाजू ऐकून घेणे’ याहीपेक्षा ‘ त्या व्यक्तीला समजून घेणे’ अधिक अपेक्षित असते. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी मानवजीवनाची व्याख्या करताना असे म्हटले आहे की, “माणसात देव आणि दानव दोघांचे अस्तित्व आहे. देवाची प्राणप्रतिष्ठा आणि दानवांचा नाश करण्याकरिता होणारा संघर्ष म्हणजेच मानवजीवन आहे.” प्रत्येकाच्या ठिकाणी चांगल्या-वाईट वृत्ती असतात, गुण-दोष असतात. पण त्याची वाटचाल ही जर अधिक चांगले होण्याकडे, देवत्वाकडे असेल तर अशा व्यक्तीला समजून घेणे गरजेचे ठरते. मानवी जीवनाची ही दुसरी बाजू समजून घेतली,म्हणजे स्वीकारली की समोरच्या व्यक्तीला समजून घेणे सोपे जाते. दोषांचे, अवगुणांचे पाढे न वाचता गुण-दोषांची बेरीज वजाबाकी केली जाते.त्यात गुण अधिक असल्याचे दिसले तर ही अधिक गुणांची ‘दुसरी बाजू’ समजून घेऊन दोषांसह त्या व्यक्तीला स्वीकारले जाते. बेरीज- वजाबाकीत दोष अधिक असल्याचे दिसले, तर त्या व्यक्तींचा आपण त्याग करतो किंवा दोष अधिक असूनही त्याग करण्याचे धैर्य नसेल किंवा असलेल्या नाजूक नात्यामुळे त्याग करण्याची मनाची तयारी नसेल, तर आहे त्या गुणांवर समाधानी राहून त्या व्यक्तीशी असलेले नाते आपण कायम ठेवतो. दुसरी बाजू आणि त्याद्वारे दुसऱ्या व्यक्तीला समजून घेण्याची प्रक्रिया, आपल्याला नाते टिकविण्याची असलेली गरज, आपल्या अंगी असलेले धैर्य, मनाची तयारी, समाजाच्या टिकेचे भय अशा अनेक घटकांवर अवलंबून असते. कौटुंबिक नातेसंबंधात दुसरी बाजू समजून घेणे हे बऱ्याचदा आपल्याच सहनशीलतेची परिक्षा असते.
काळाच्या ओघात नात्यांची वीण घट्ट होते. नात्यात आपलेपणा येतो, ओलावा येते. नाते परिपक्व होते. अशा परिपक्व नात्यात समोरच्याची बाजू त्याने न सांगता, न मांडताच ऐकू येते, समजते.ती समजून वागणे घडते. जवळच्या औषधाच्या दुकानात न मिळणारी आयुर्वेदिक औषधे आणायला बाबा मला सांगायचे. ऑफिसमधून निघाल्यावर कामाचा थकवा, ट्रॅफिक या सर्वात बऱ्याचदा लक्षात असूनही मी कंटाळा करायचो. घरी आल्यावर बाबा कधीही ‘औषध का आणले नाही?’ याचा जाब विचारत नसत. दुसऱ्यादिवशी ते फक्त एव्हढेच म्हणायचे ‘आज जमले तर आण.’ दुसऱ्याला जाब विचारून, त्याची दुसरी बाजू ऐकून मग आपले समाधान करून घ्यायचे, अशी लांबची प्रक्रियाच तिथे नव्हती. समोरचा, ‘तसेच योग्य कारण असल्याशिवाय असे वागणार नाही, बोलणार नाही’, हा समंजस भाव व्यापक असला की,दुसरी बाजू न सांगताही समजते आणि समोरच्यालाही, झालीच चूक, तरीही आपली बाजू मांडण्याचे अवघड काम करण्याची आवश्यकता राहत नाही.नाती अधिक आरामदायी, सुखदायी, समृद्ध होतात.
बऱ्याचदा ज्या व्यक्तीशी आपला कधीही प्रत्यक्ष संबंध आलेला नाही आणि आपण केवळ एक नामांकित, मोठी व्यक्ती म्हणून तिला ओळखत असतो अशा व्यक्तीच्या जीवनात जर एखादी घटना घडली तर अशा घटनांबाबत सत्याची एक तिसरी बाजूही असते हेही लक्षात ठेवावे. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या, प्रसिद्ध अभिनेते जर रविंद्र महाजनी यांचा मृत्यू ही याची उदाहरणे देता येतील. त्यांच्या निधनाची आलेली बातमी ही त्या घटनेची पहिली बाजू होती. माध्यमांनी माहिती मिळवून मांडलेली बाजू दूसरी बाजू होती. पण सत्याची तिसरी बाजू गेलेली व्यक्ती आणि त्यांच्या नातलगांनाच माहिती होती. तेव्हा अशा प्रसंगात दुसरी बाजू माहीत झाली तरी तिसरी बाजू ज्ञात नसल्याने दुसऱ्या बाजूच्या आधारे कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे उचित नसते.
असं म्हणतात की, चंद्रावर पोहचल्यावर चांद्र यानाला असे जाणवले की, ‘चंद्र माणसासारखाच आहे. त्यालाही दुसरी, काळी.. अंधारलेली बाजू आहे. पण तो, प्रकाशित बाजूच नेहमी सर्वांसमोर ठेवून आपला प्रभाव पाडत असतो.’ बऱ्याचदा ही दुसरी काळी ,अंधारी बाजू ‘हे असेच असायचे’ याची खूणगाठ बांधून, त्याकडे दुर्लक्ष करून, उजळ बाजूकडे बघत ,आहे ते नाते टिकविण्यासाठी, त्यात आनंद घेण्यासाठीच जाणून घ्यायची असते.
☆ ही विकृती आली कुठून?… लेखिका : डॉ. वृषाली राऊत ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
जेव्हा Netflix चा CEO मानवी झोपेला त्याचा सर्वात मोठा स्पर्धक मानतो यावरूनच मानवी जीवनात झोपेचे महत्व अधोरेखित होते. गेलेल दशक हे माध्यमांच होत, कधीच विचार न केलेल्या प्रकारचं मनोरंजन २४ तास आपल्या सोबत राहू लागलं.
आपल्या मेंदू मध्ये न मावेल एवढी माहिती त्याच्यावर आदळायला सुरवात झाली. ह्या माहितीला process करण्यासाठी मेंदू तयारच नव्हता. Netflix भारतात २०१६ पासून सुरू झाले. भारतात जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने जगातील नामांकित कपन्यांनी भारतीय लोकांसाठी मनोरंजाचे कार्यक्रम बनवायला सुरवात केली जे मानवी मेंदू साठी प्रमाणाबाहेर होत. जस high calories वाल अन्न खाऊन लठ्ठपणा वाढतो तसेच अति प्रमाणात information calories खाऊन मेंदूवर चरबी चढते कारण एवढी माहिती मेंदू पचवू शकत नाही. Binge eating प्रमाणे binge watching ने शरीराची व मनाची वाट लावायला सुरवात केली. भारतीयांनी दिवस व रात्र स्क्रीन वर घालवायला सुरुवात केली. झोपेविना रात्री व झोपाळू दिवस यांना सहन करण्यासाठी म्हणजे तरतरीत राहण्यासाठी कॉफी, चहा, दारू, तंबाखू, सिगरेट, पान मसाला, गुटखा व आणखी असेच पदार्थ खाण्यात वाढले, ही व्यसन व त्यातून येणारे शारिरीक व मानसिक आजार पण वाढले, औद्योगिक राष्ट्र म्हणून प्रगती करणारा आपला देश हळूहळू आजारी देश बनत चालला.
हे सगळे त्रस्त मेंदु अनेक बदमाश लोकांसाठी लवकर पटणारी ग्राहक होती. कुठल्याही औद्योगिक देशातील कामगारांप्रमाणे भारतातील working class पाशी पैसा होता पण सोबतीला कामाचा ताण, कर्जाचे हफ्ते, नात्यातील चढ उतार असे त्रास पण होतेच.
इंटरनेटने ह्या सगळ्या त्रासलेल्या मेंदूना एक सोपा मार्ग दिला जेणेकरून रोजच्या जगण्यातून दोन घटका करमणूक पण होईल, ताण हलका होईल व कुणाला कळणार पण नाही. खोटी ओळख निर्माण करून काहीही केलेलं कुणालाच कळणार नव्हतं मात्र इंटरनेट हेच सगळ्यात मोठं व्यसन ठरलं. Social media, पॉर्न, गेमिंग, ऑनलाइन डेटिंग, ह्या सगळ्यातून मेंदूत आनंदाचं रसायन डोपामाईन निर्माण होतं. जे लोक मनाने कमकुवत असतात ते रसायन परत परत मिळवण्यासाठी या आभासी दुनियेत हरवून आनंद शोधत व्यसनी होतात.
हे सगळं सुरू असताना अनेक हुशार मेंदू इंटरनेट वापरणाऱ्यांच्या वागणुकीवर लक्ष ठेवून होती. जी लोक दुसऱ्यांना त्रास देऊन आनंद मिळवितात, त्यांना त्या कामाचे पैसे मिळाले. अशांसाठी तर cyber bullying, trolling हे आवडते उद्योग ठरले. Social media वर अशी असंख्य तोल गेलेली टाळकी कामाला आहेत, जी द्वेष व दुजाभाव पसरवण्याचे काम आनंदाने करतात कारण असं काम त्यांच्या मनाला आनंद देतं..
ह्या लोकांचे गट आहेत
-पैसे घेऊन खरी ओळख दाखवून करणारे
-खरी ओळख न दाखवता व पैसे न घेता करणारे
-पैसे घेऊन खरी ओळख न दाखवता करणारे
अचानकपणे एवढी राष्ट्रभक्ती कुठून आली ? लोक वेड्यासारखे एकमेकांशी भांडायला का लागलीत ? आमच्या सारखा विचार नाही केला तर तुम्ही आमचे दुष्मन ही भाषा का ऐकू येत आहे? यातील लोकांना वेगळेच मानसिक त्रास आहेत पण त्याच्यावर उपाय न करता लोकांवर इंटरनेट वर येऊन भडास काढणे सुरू आहे. गेल्या काही वर्षात बलात्कार व शारीरिक हिंसा प्रचंड वाढली आहे. भाषा सुद्धा हिंसक आहे, काव्य, सोज्वळपणा, साधेपणा हद्दपार झाला आहे, आयुष्य एक crime thriller असल्यासारखी लोक एकमेकांवर उगीच संशय घेत भांडण ओढवून घेत आहेत, नाती तुटत आहेत.
गेल्या ६ महिन्यातील घटना बघितल्या तर असं जाणवतंय की लोक हिंसा बघून आनंदित होताहेत, किंवा त्यांना त्याचं काहीच वाटत नाही आहे. कोणीही सर्वसाधारण मानसिकता असलेली व्यक्ती दुसऱ्यावर हिंसा ( शारीरिक व मानसिक) सहन करू शकत नाही व बघू पण शकत नाही. पण Netflix, Prime सारख्या लोकांनी हिंसेचं व लैंगिक विकृतीचं supermarket उघडून ठेवलं आहे, त्याच्या सोबतीला बाकीच्या विकृत गोष्टी आहेतच.
हे अनैसर्गिक व अमानवीय वर्तन हे अचानक आलेलं नाही. वेगवेगळे न्युज चॅनेल्स ज्या पद्धतीने ब्रेकिंग न्युज दाखवितात त्या अवैज्ञानिक आहेत. मानवी मेंदू विचार करायला वेळ घेतो. मेंदूतील भावनिक केंद्र ज्याला amygdala म्हणतात ते आपल्या मानवी उत्क्रांतीची देणगी आहे, amygdala हे भीतीवर काम करते व cortex हा मेंदूतील भाग तर्कशुद्ध विचार करतो. Amygdala ला भीती जाणवली (मानसिक किंवा शारीरिक) तर तो शरीराला संदेश देतो की आता स्वतःचे रक्षण करायला हवं, मग त्यानुसार मानवी शरीर एक तर त्या भीती वाटणाऱ्यापासून दूर जातं किंवा भीती वाटणाऱ्याशी दोन हात करायला सज्ज होतं , ह्याला flight/fight असं नाव आहे. शरीर ह्या भय अवस्थेत ताण अनुभवत असते. Breaking news मनात भीतीची भावना सतत जागृत ठेवतात. तार्किक विचार करायला मेंदूला वेळच मिळत नाही कारण 24*7 वेगवेगळी माध्यमं व त्यातून येणारी अखंड माहिती मेंदूत ट्रॅफिक जॅम करते. हे सगळं खूप कठीण आहे पण आपण सगळेच यातून जात आहोत. ह्या सगळ्या गोष्टी माणसातील पशूला जाग करण्याचं काम करतात व तो पशू शांत करणं जवळजवळ अशक्य आहे.
सगळ्यांची डोकी जाणूनबुजून “तापवली” गेली आहेत, तेव्हा सारासार विचार करणं कठीण आहे, पण अशक्य नाही. मेंदूवर किती ताण द्यायचा व किती माहिती वाचायची व तिची शहानिशा करूनच पुढे जायचं हे आपल्या हातात आहे. समोरच्याने कितीही घाण बोललं तरीपण लगेच उत्तर देणे, पोस्ट upload करणे, त्यापेक्षा घाण बोलणे हे अविचारीपणाचं लक्षण आहे.
हे एक मानसिक युद्ध आहे. ह्यात जिंकायचं असेल तर हिंसा, लैगिंक विकृती असलेल्या गोष्टी न बघणे, रोज 7-8 तास झोप घेणे, झेपेल असा व्यायाम व सकारात्मक विचार करणे हे उपाय आहेत.
दुसऱ्याला कसलाही प्रकारचा त्रास देणारा कुणीच खूश व आरोग्यदायी राहूच शकत नाही. तुम्ही पण विकृत मानसिकतेचे आहात का ह्याचा नीट विचार करा व जबाबदारीने वागा.
लेखिका : डॉ वृषाली रामदास राऊत, औद्योगिक मानसशास्त्रज्ञ
आज आम्ही पहेलगामला भेट देणार होतो. अगदी उत्साहात सर्वजण तयार होऊन निघाले. अनंतनाग जिल्ह्यातले हे ठिकाण सृष्टी सौंदर्य आणि उत्साहवर्धक हवेसाठी प्रसिद्ध आहे. इथे वर्षात चार ऋतू व्यवस्थितपणे अनुभवता येतात. सभोवती हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे, आसमंतात उंचचउंच पाईन आणि देवदार वृक्ष, हिरवळीची मैदाने आणि पाण्याचे प्रवाह दिसतात. हे सर्व पहात पहात आमचा प्रवास सुरू होता. रस्त्याच्या जवळून खळाळत वाहणारी लिद्दर नदी, पाण्याचा खळखळ आवाज, हिरवीगार वृक्षराजी यामुळे वातावरण खूप छान होते. जाताना वाटेत प्रसिद्ध अनंतनाग मधून पुढे गेलो. काश्मिरी भाषेत नाग म्हणजे पाण्याचा झरा किंवा प्रवाह. झेलम नदी बेहरीनाग मधून उगम पावते. संगम गावात झेलम नदी आणि लिद्दर नदीचा संगम होतो.
आम्ही पामपूरमधे केशर मळ्याला भेट दिली. इथे ५० स्क्वेअर किलोमीटरच्या टापूत केशर पिकवतात. ऑक्टोबर-नोव्हेंबर हा त्याचा सीझन असतो. त्याबद्दलची अगदी सविस्तर माहिती घेतली. केशर खरेदी बरोबर कावा चहाचा आस्वादही घेतला.
इथून पुढे ‘अवंतीपुर मंदिर अवशेषां’ना भेट दिली. अवंतीपूर राजा अवंतीवर्मांची राजधानी होती. इथे अवंती स्वामी म्हणजे विष्णू आणि अवंतीश्वर म्हणजे शिव अशी दोन दगडी मंदिरे होती. या मंदिरात अतिशय सुंदर कोरीव काम, भव्य मूर्ती होत्या. पण भूकंप आणि भूस्खलनात मंदिराचे अवशेषात रूपांतर झाल्याचे समजले. अजूनही तिथे काही मूर्ती, खांब वगैरे शाबूत आहेत. त्यावरील कोरीव काम अप्रतिम आहे. आता पुन्हा हे मंदिर पुनरुज्जीवीत करण्यासाठी काम सुरू आहे. याच ठिकाणी ऑंधी सिनेमातील ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा नही’ हे गाणे चित्रीत झाल्याचे समजले.
पहेलगाम हे गाव छोटसं पण पर्यटकांचं आवडतं पर्यटनस्थळ आहे. पहेलगाम म्हणजे मेंढपाळांचं गाव. इथून छोट्या वाहनांनी आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे पाहायला गेलो. सुरुवातीला पोहोचलो चंदनवाडीला. प्रसिद्ध अमरनाथ यात्रेचे हे प्रवेशस्थळ आहे. इथल्या पायऱ्या चढून अमरनाथ यात्रा सुरू होते आणि पुढे जाते. प्रत्यक्ष अमरनाथाला नाही पण पहिल्या पायरीला हात टेकून अमरनाथाला मनोभावे नमस्कार केला.
समोर सगळीकडे बर्फचबर्फ होता. इथला बर्फ थोडा कडक घसरडा असल्याने हातात काठ्या घेऊन गमबूट घालून पर्यटक फिरत होते. बर्फात खेळत होते. बर्फाखालून वहाणारा खळाळता पाण्याचा प्रवाह मध्येच उघडा झाल्याने छोटे ग्लेशियर तयार झाले होते. सर्वांचे फोटो सेशन उत्साहात सुरू होते. नजर जाईल तिथवर पसरलेला बर्फ, बर्फाच्छादित झाडे, शिखरे यामुळे निसर्गाची अद्भुत लीला इथेही अनुभवायला मिळत होती.
इथून परत येताना बेताब व्हॅलीला गेलो. या व्हॅलीचे मूळ नाव हजन व्हॅली असे होते. पण इथे हिंदी चित्रपट ‘बेताब’चे शुटिंग झाले आहे आणि त्यानंतर ही व्हॅली ‘बेताब व्हॅली’ म्हणून ओळखली जाऊ लागली. समोर बर्फाच्छादित पर्वतशिखरे, पाईन आणि देवदार वृक्षांची जंगलासारखी दाट झाडी, आभाळाला स्पर्श करू पाहणारी उंच उंच झाडे, दूरवर पसरलेली हिरवीगार कुरणे, जवळच वहाणारा खळाळता जलप्रवाह असे अतिशय विलोभनीय सृष्टी सौंदर्य सभोवार दिसत होते. त्याला कॅमेऱ्यात बंदिस्त करीत तृप्त मनाने परत फिरलो.
वाटेत पुढे क्रिकेट बॅट बनविणाऱ्या फॅक्टरीला भेट दिली. विलोची झाडाच्या लाकडापासून या बॅट्स बनवितात. हे लाकूड थंडी, उन, वारा, पाऊस या कसल्याही परिस्थितीत अजिबात खराब न होता आहे असेच राहते हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. हा उद्योग इथे खूप मोठ्या प्रमाणावर चालतो.
एकूणच आजचे स्थल दर्शन खूप छान झाले होते. मनाला भुरळ घालणारे अप्रतिम निसर्गसौंदर्य, धार्मिक स्थळांचे दर्शन, उदरनिर्वाहासाठी स्थानिकांची चालणारी धावपळ अशा संमिश्र भावनात निसर्ग किमयेला मनोमन नमस्कार करीत उद्याच्या सोनमर्ग भेटीची आस घेऊनच हॉटेलवर परतलो.
शेठचं आयुष्यातलं मोठं स्वप्न पूर्ण झालं. आजोबांनी सुरु केलेला व्यवसाय नंतर वडील, स्वतः शेठ यांनी सचोटीने, मेहनतीने नावारूपाला आणला. पुढच्या पिढीने काळानुरूप बदल करून झळाळी आणली. पिढ्यानपिढ्याची मेहनत फळाला आली. दहा बाय दहाच्या जागेत सुरु केलेलं दुकान सत्तर वर्षानंतर भव्य तीन मजली झालं. शेठ आणि कुटुंबीय प्रचंड आनंदात होते. नवीन वास्तूचे उदघाटन दणक्यात करायचे यावर एकमत झाले, परंतु उदघाटनाला कोणाला बोलवायचं यावर खल सुरु होता. घरातले सगळेच उत्साहाने सहभागी होते.
“ कुठल्या तरी मोठ्या माणसाला बोलवू ”
“ फिल्मस्टार आला तर पब्लिसिटी चांगली मिळेल ”
“ हिरो नको,हिरोईनला बोलवा ”
“ नको,हे लोक लाखात पैसे घेतात. आपल्याला परवडणार नाही ”
“ माणूस फेमस पाहिजे.म्हणजे त्याच्या जोडीने आपल्या दुकानाची हवा होईल.”
“ असल्या पब्लिसिटीची गरज नाही. आपलं काम आणि नावं फार मोठंय ”
“ मग क्रिकेटर?”
“ नको,”
“ कोणालाही बोलवा. फक्त राजकारणी, नेते मंडळी अजिबात नको ”
“ मग राहिलं कोण?? ”
उदघाटनावरून चर्चा रंगली. घरातील लहान मुलांपासून–मोठ्यांपर्यंत सगळे हिरीरीने मत मांडत होते. प्रत्येकजण वेगवेगळे पर्याय सुचवत होता.बराच वेळ होऊनही एकमत झालं नाही. शेठ मात्र शांत होते. निर्णय होत नव्हता म्हणून थोरल्यानं शेठना विचारलं.
” बापुजी,तुमचं मत !!”
“ कोणाला बोलवायचं तो तुमचा अधिकार. उदघाटन दिमाखात करा, पण पाहुण्यांसाठी उगाच फालतू पैसा खर्च करू नये असं माझं मत आहे ”
“ तुम्ही सुद्धा एक नाव सुचवा ”
“ नाही नको.”
“ का?? “
“ मी सुचवलेलं नाव आवडणार नाही ” .. शेठ.
“ आतातर सांगाच ” – सगळयांनी एकदम आग्रह केला.
“ सगळे चेष्टा कराल.त्यापेक्षा राहू दे ”–शेठ.
“ बापुजी, सस्पेन्स वाढवू नका. खात्रीने सांगते ते नाव वेगळं असणार ”
“ त्यामागे नक्कीच काहीतरी विचार असणार. तुम्ही सांगा.”
“ आप्पांच्या हस्ते उद्घाटन करावं ”–असं शेठ बोलल्यावर ते गंमत करताहेत असं वाटून सगळे मोठ्याने हसले.
“ आपला एवढा मोठा कार्यक्रम आणि तुम्ही ….”
“ काहीही काय?? ”
“ तेच ना, खरं नावं सांगा ”
“ मनापासून सांगतोय. गंमत नाही ” –शेठ
“ या नावाला माझा विरोध आहे ”
“ माझा बिनशर्त पाठींबा आहे ” –माई
“ आप्पांच्या हस्ते उद्घाटन, का? कशासाठी? ”
“ कितीही केलं तरी आप्पा आपले नोकर !!”
“ एक मिनिट,मान्य नसेल तर ठीक आहे. पण आप्पांविषयी काही बोलू नका ” – शेठचा आवाज वाढला. एकदम शांतता पसरली.
“ माफ करा. जरा आवाज चढला. पण आप्पांविषयी बरेच गैरसमज आहेत. आम्ही विनाकारण नोकर माणसाला मान देतो असं सगळ्यांनाच वाटतं.”
“ बापुजी,रागावू नका. पण आता विषय निघालाच तर स्पष्टच विचारतो. त्या आप्पांचे एवढे कौतुक?? ”
“ आप्पांविषयी तुम्ही जरा जास्तच भावूक आहात. पण दुकानात केलेल्या कामाचे आपण त्याना पैसे देतो. हा एक व्यवहार आहे. आपल्याकडे असे बरेचजण काम करतात. आप्पा अनेक वर्षापासून काम करतायेत हाच काय तो फरक. पण म्हणून मग ….” – शेठच्या दोन्ही मुलांनी नापसंती व्यक्त केली.
“ आयुष्यात प्रत्येक ठिकाणी व्यवहार पहायचा नसतो. काही माणसं ही व्यवहारापलीकडची असतात. आप्पाविषयी सांगायचे तर माझ्या जन्माच्या आधीपासून ते दुकानात काम करतायेत. दुकान सुरु झाल्यावर सहा महिन्यातच गावाकडून आलेला एक अनाथ, गरीब, गरजू मुलगा कामाला लागला आणि नंतर दुकान हेच त्याचं आयुष्य झालं. एकोणसत्तर वर्ष आणि सहा महिने आप्पा या दुकानात काम करतायेत. डोळे झाकून विश्वास ठेवावा असा माणूस. प्रामाणिकपणाचा मापदंड, दुकानातली खडा न खडा माहिती. आपली चौथी पिढी दुकानात आलीय आणि अजूनही ऐंशी पार केलेले आप्पा दुकानात काम करतात.” – शेठ
“ हे भारी आहे. मला आप्पांना भेटायला आवडेल.” – शेठची नात.
“ लग्नानंतर आप्प्पांची ओळख सासऱ्यांनी घरातला माणूस म्हणून करून दिली. घरात आप्पांना कधीच नोकर म्हणून वागणूक दिली गेली नाही आणि आप्प्पांनीसुद्धा मान मिळाला म्हणून आपली मर्यादा ओलांडली नाही. आजही आपल्यापैकी लहानमोठा कोणी दुकानात गेले कि आप्पा उभे राहतात. हात जोडून नमस्कार करतात. वयाकडे न पाहता मालकांचा मान राखतात.” – माई
“ हे मी बघितलंय ”
“ मी सुद्धा हा अनुभव अनेकदा घेतलाय ”
“ आपलं दुकान म्हणजेच आप्पांचं आयुष्य. गावाकडून आले आणि इथलेच झाले. आजोबांनी एक खोली घेऊन दिली, त्याचे सगळे पैसे सुद्धा आप्पांनी फेडले. स्वतःविषयी कधीच बोलले नाहीत. अनेकदा विचारलं पण तेव्हा हसून उत्तर टाळलं. दुकानावर त्यांचा अतिशय जीव, दुकानाच्या बदलत्या रूपाचे आप्पा हे एकमेव आणि चालता बोलता साक्षीदार आहेत. त्यांच्याइतका योग्य माणूस दुसरा नाहीच म्हणूनच… .” शेठ एकदम बोलायचे थांबले. पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली.
“ माझा आग्रह नाही. तुम्ही निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात.” – शेठ
“ उदघाटन आप्पांच्या हस्ते करायचे हे सर्वांना मान्य ” – माईंनी विचारताच आपसूक सगळ्यांचे हात वरती गेले.
“ आप्पांची ओळख कशी करून द्यायची? ”
“ बाहुबली सिनेमात महिष्मती साम्राज्यासाठी जसे कट्टप्पा तसे आमच्या दुकानासाठी आप्पा !!! ”
… थोडक्यात शेठनी समर्पक ओळख सांगितली तेव्हा सगळ्यांनी जल्लोष केला.
☆ ‘ट्रान्सफॉर्मेशन’ चा श्रीगणेशा… ☆ डॉ. प्राप्ती गुणे ☆
आजकाल जिकडे पाहाल तिकडे सोशल मीडियावर ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओज ची मांदियाळी आहे.
बिफोर अमुक वजन आणि आफ्टर 10 किलो, 20 किलो, 30 किलो कमी झाल्यानंतरचे हे व्हिडिओ आपल्याला प्रेरित केल्यावाचून राहत नाहीत. आपलाही असाच एक ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ बनवावा, ही सुप्त इच्छा नकळत मनात जन्म घेतेय, अनेकांच्या ! आणि मग सुरू होतो या ‘ट्रान्सफॉर्मेशन’ चा प्रवास….
जिमला जायचंच असं पक्कं ठरवलं की मग चौकशी केली जाते. जिममध्ये पहिल्यांदा गेल्यानंतर तिथल्या भिंतीवरचे मोटिवेशनल कोट्स वाचून, उत्साहवर्धक म्युझिक ऐकून, अनेक बॉडी बिल्डर मंडळींना ‘ हिरो ‘ स्टाईलने वजन उचलताना पाहून भारावून जायला होतं. मनातल्या ‘ ट्रान्सफॉर्मेशन ‘ची कल्पना डोळ्यासमोर तरळायला लागते आणि ती प्रत्यक्षात उतरणार, हे अगदी खरं वाटायला लागतं.
जिममध्ये सहा महिन्यांची, वर्षाची फी एकत्रित भरली की ‘ एवढा डिस्काउंट मिळेल ‘ अशी आकर्षक ऑफर बिंबवून सांगितली जाते. आणि आपणही आपल्या विस्फारलेल्या डोळ्यांनी इकडे तिकडे पहात मान डोलावून मोकळे होतो. … चला, पहिलं काम तर झालं ! जिमची फी भरली…
आता एवढे भारी व्यायाम प्रकार करायचे तर त्याला शोभून दिसणारे कपडे नकोत, साजेशे शूज नकोत ?
चला, बाजारात खरेदीला…. हुश्श ! सगळी तयारी परफेक्ट झाली… आता जिमला जायचं फक्त बाकी राहिलं…
… जिमच्या पहिल्या दिवशी शरीराला सवय नसल्याने कमी व्यायाम करायचा असतो. पण काही उत्साही वीरांनी निश्चित टार्गेट एकाच दिवसात निम्म संपवायचं असं जणू मनात ठरवलेलं असतं.. सगळा व्यायाम आटोपला की थोड्या वेळाने अंगाची ओरडाआरडी सुरू होते.. हात जरासे हलवले तरी दुखतात… चालण्यासाठी पाय मुश्किलीने उचलावे लागतात… संपूर्ण शरीर ठणकत असतं… आणि मग…?
… मग, काय ? दुसऱ्या दिवशी जिमला सुट्टी !!!
मला कोणत्याही पद्धतीने व्यायाम, जिम अथवा जिम लावणारे यांच्यावर कोणताही आक्षेप घ्यायचा नाही.
वर सांगितलेलं हे फक्त एक जरासं रंजित पण खरं उदाहरण आहे. अनेकजण नियमितपणे व्यायाम करणारे आहेत, आरोग्याबाबत जागरूक असणारे आहेत व जिमला रेग्युलर जाणारे आहेत…
… पण माझा म्हणायचा मुद्दा एकच ! …
*जे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला बाह्य शरीरात हवंय, ते होण्यासाठी आणि ते करण्याअगोदर आपण आपल्या अंतररुपी मनोधारणेत बदल करणं खूप आवश्यक आहे,.. असं मला वाटतं*.
स्वतःला प्रत्येकाने एक प्रामाणिक प्रश्न विचारला पाहिजे.. ” मला माझ्या शरीराबद्दल किती आदर वाटतो ?”
एकदा मनुष्याने स्वतःच्या आरोग्याचा सन्मान करायला सुरुवात केली की, ह्या बाह्यरूपी ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास सोपा होतो आणि तो पूर्ण व्हायला मदत होते. हे माझे स्वानुभवाचे बोल आहेत.
अनेकदा आपण आपलं निश्चित ध्येय गाठतो, परंतु कमी केलेलं वजन परत वाढतं आणि आपण पुन्हा पूर्वपदाला येऊन पोहोचतो. असं का ? एकदा ध्येय गाठलं की संपलं…पुन्हा खमंग आणि गोडाधोडाचे पदार्थ खाणं सुरू होतं. जिभेचे चोचले आणि पोटाचे लाड पुरवणं सुरू होतं…..
… आणि मग.. मग पुन्हा जैसे थे !
जर आपल्याला आपल्या शरीर आणि आरोग्याबद्दल रिस्पेक्ट असेल तर मात्र सगळं बदलतं…
आता गणपती बाप्पाचं आगमन होतंय. दहा दिवस खाण्यापिण्याची मस्त रेलचेल असेल…
– तर मग मी तीस मिनिटे जरा एक्सट्रा फिरतो..
– घरात मिठाई बनवताना साखरेचे प्रमाण मी कमी करते..
– बाहेरून मिठाई आणताना लक्षात ठेवून मी कमी गोड मिठाई आणतो..
– बाप्पा घरी सुट्टीसाठी आलाय, पण मी माझ्या व्यायामाला अजिबात बुट्टी होऊ देणार नाही..
– बाप्पाला वेगवेगळ्या फळांचा प्रसाद ठेवूयात..
– घरच्या घरी प्रयोगशील बनून, बाप्पाला आरोग्यदायी रेसिपीची नवलाई चाखवूया..
… वगैरे, वगैरे.. असं सगळं निश्चित ठरवता येईल की..
पण हे सगळं फक्त बाप्पा घरी आहे तेवढ्यापुरतंच ठरवून — फक्त ठरवून नाही, तर प्रत्यक्ष आचरणात आणून चालणारच नाही. हे सगळे नियम कायमसाठी पाळले तरच अपेक्षित ते ट्रान्सफॉर्मेशन होईल ना ? मग त्यासाठी काय करायला हवं तर कोणत्याही मोहाला बळी पडताना, एक क्षण थांबून आपण स्वतःलाच विचारावं .. ..
* मला माझ्या शरीराबद्दल आणि त्याच्या आरोग्याबद्दल खरोखरच मनापासून आदर वाटतो की नाही वाटत ? आणि वाटत असेल तर मग ही अमुक एक कृती माझ्या आरोग्यासाठी हितदायक आहे का ? जर ही कृती केल्याने माझ्या आरोग्याचं कोणत्याही प्रकारे नुकसान होणार असेल, तर या क्षणिक मोहाला मी बळी पडणार नाही* ! आणि हा निश्चय मात्र अगदी ठाम हवा बरं का .. “ केल्याने होत आहे रे – पण – आधी केलेची पाहिजे “ हा उपदेश आधी तुमच्या मनावर बिंबवला जायला हवा. आणि तो अगदी काटेकोरपणाने आणि अगदी मनापासून पाळला जायला हवा. मग बघा तुमच्याही नकळत हळूहळू कसे हवे ते बदल व्हायला लागतात.
सुरुवात जर या ‘ आंतरिक ट्रान्सफॉर्मेशन ‘ च्या नियमित सरावाने केलीत ना की तुमच्या ‘ बाह्यरूपी ट्रान्सफॉर्मेशन ‘ चा व्हिडिओ ‘ व्हायरल ‘ झालाच म्हणून समजा..!!!
मग आता लगेच करूयात अशा ट्रान्सफॉर्मेशन चा ‘ श्रीगणेशा ‘ ?