सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – ४” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

आज सोनमर्ग स्थलदर्शन होते. श्रीनगरहून सकाळी लवकरच निघालो. तिथून सोनमर्ग पर्यंतचे अंतर ८६ किलोमीटर होते. पण संपूर्ण रस्ता घाटाचा, वळणावळणाचा आणि तुलनेने बराच लहान होता. त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. सावकाश जावे लागत होते. या रस्त्यावर मिलिटरीच्या वाहनांची खूपच वर्दळ होती. त्यांची वाहने आली की इतरांना सरळ बाजूला थांबावे लागत होते. एकेका कॉनव्हाॅय म्हणजे ताफ्यात शेकडोनी वाहने असतात. पण अतिशय शिस्तबद्ध रीतीने जातात. एवढ्या प्रतिकूल वातावरणातले त्यांचे हे झोकून देऊन काम करणे पाहून त्यांचे खूपच कौतुक आणि अभिमान वाटला. आमच्या सॅल्युटला ते पण कडक  सॅल्युटने उत्तर देत होते.

सोनमर्गला जायला जवळजवळ चार-पाच तास लागले. पण प्रवासात वेळ कसा गेला कळलेच नाही. सर्वांच्या गप्पा, गाण्याच्या भेंड्या सुरू होत्याच. पण बाजूचा निसर्ग कितीही पाहिला तरी समाधान होत नव्हते.

एका बाजूला उंच पहाड आणि दुसऱ्या बाजूला दरी होती. दरीच्या पलीकडे बर्फाच्छादित उंच पर्वत, मध्येच हिरवीगार कुरणे, मधे मधे स्वच्छ सुंदर सरोवरेही दिसत होती. जिकडे बघावे तिथले दृश्य म्हणजे एक एक चितारलेला कॅनव्हासच वाटत होता. सोनमर्ग इथल्या निसर्ग संपदेसाठी प्रसिद्ध आहे. सोनमर्ग म्हणजे ‘सोन्याची कुरणे’. इथे हिरवळीची मैदानी कुरणे मोठ्या प्रमाणावर आहेत. बर्फाच्या टोप्या घातलेली पर्वत शिखरे आणि हिरवीगार कुरणे ही सोनमर्गची वैशिष्ट्ये आहेत. सोनमर्गला ‘सरोवरांची नगरी’ पण म्हणतात. इथे लहान मोठी असंख्य सरोवरे आहेत. त्यातले ‘विशनसर’ सरोवर तर खूप प्रेक्षणीय आहे. नितळ निळेशार पाणी, सभोवती हिरवीगार कुरणे यामुळे अतिशय सुंदर दिसणारे हे मोठे सरोवर सर्वांना आकर्षित करते. वसंत ऋतूत तर इथे रंगीबेरंगी फुलांनी जागोजागी चादर पसरलेली असते.

असा आजूबाजूचा निसर्ग पहात, प्रवासाचा आनंद घेत आम्ही सोनमर्गला पोहोचलो. इथे ‘बबलू’ या मराठी रेस्टॉरंटमधे  आम्हाला चक्क पिठलं भाकरीचे महाराष्ट्रीयन जेवण मिळाले.

इथून वेगवेगळ्या चार पाच पॉईंटना छोट्या वाहनाने जाता येते. आम्ही तिथल्याच मोठ्या पठारावरून थोड्या अंतरावरील शिखरावर चढून गेलो. तिथून थाजीवास ग्लेशियर दिसते. ते संपूर्ण दृश्य अप्रतिम दिसत होते. त्याच्या समोरच्या उंच शिखरावर बर्फाने घातलेली टोपी म्हणजे जणू हिऱ्याचा मुकुट शोभून दिसत होता. सूर्योदयाच्या वेळी पहिल्या सूर्यकिरणात हा बर्फ पिवळा दिसतो तेव्हा जणू सोन्याचा मुकुट वाटतो. पण तो नजारा आम्हाला त्यावेळी बघणे शक्य नव्हते.

शुभ्र हिमाच्या शिखरावरती

 सहस्त्ररश्मी तळपला

 सुवर्णवर्खी शाल ओढूनी

 सुवर्णहिम झळकला ||

बाजूच्या उतारावर मेंढ्या चरत होत्या. एखाद्या सुंदर चित्रावरच आपण उभे असल्याचा भास होत होता. सर्वांनी मनसोक्त फोटो काढले. हाच निसर्ग संध्याकाळी वेगळाच दिसत होता. तो अनुभवत आम्ही परत निघालो.

एकूणच सोनमर्ग इथल्या निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. त्यामुळेच ते ट्रेकर्सचे सुद्धा आवडते ठिकाण आहे. ट्रेकिंग साठी इथे असंख्य ठिकाणे आहेत. इथले ट्रेकिंग, रिव्हर राफ्टींग प्रसिद्ध आहे. इथेच अमरनाथ यात्रेचा बेस कॅम्प पण आहे.

सोनमर्गच्या असंख्य नितळ पाण्याची सरोवरे, हिरवीगार कुरणे, रंगीत फुलांचे गालिचे, दऱ्या, बर्फाच्छादित डोंगर अशा नयनरम्य निसर्ग सौंदर्याने सर्वांनाच भुरळ घातली होती. त्याच्या मधूनच जाणाऱ्या नागमोडी घाटाने आम्ही परत आलो.

श्रीनगर, गुलमर्ग, पहेलगाम, सोनमर्ग अशा काश्मिरच्या प्रसिद्ध ठिकाणांच्या दर्शनाने मन भरून आणि भारूनही गेले. खरोखरीच हे नंदनवन भारताचे भूषण आहे. आधुनिकीकरणासाठी इथल्या निसर्गाला कसलीही हानी पोहोचवलेली नाही. म्हणूनच हे अनाघ्रात सौंदर्य आहे तसेच  बावनकशी राहिलेले आहे. हे सर्व पाहून मन तृप्त समाधानाने भरले होते. आमची ही नंदनवनाची सफर आता खरोखरच आनंदाचा ठेवा बनवून राहील.

 – समाप्त –

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments