मराठी साहित्य – काव्यानंद ☆ विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?... स्व. वि. दा. सावरकर ☆

पौर्वात्य खंड अवघें जित यत्प्रतापें

दारिद्रय आणि भय कांपति ज्या प्रतापें

नाशासि पारसिक तेहि पलांत गेले

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?

 

तें जिंकी पारसिक, दे जगता दरातें

जें दिग्जयी बल तुझेंहि शिकंदरा, तें

ध्वंसीत रोम तव राजपुरीं रिघालें

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?

 

साम्राज्य विस्तृत अनंत असेंचि साचें

त्याही महाप्रथित रोमपत्तनाचें

हूणें हणोनि घण चूर्णविचूर्ण केलें

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?

 

हा उन्नती अवनतीस समुद्र जातो

भास्वान् रवीहि उदयास्त अखंड घेतो

उत्कर्ष आणि अपकर्ष समान ठेले

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?

 

जे मत्त फारचि बलान्वित गर्ववाही

उद्विग्न- मानस उदासहि जे तयांहीं

हें पाहिजे स्वमनिं संतत चिंतियेलें

विश्वात आजवरि शाश्वत काय झालें?

     कवी – वि दा सावरकर

रसग्रहण

ही कविता ‘वसंततिलका’ या अक्षरगणवृत्ते बांधलेली आहे. एकवीस मात्रा व १४ अक्षरांच्या ओळी असणारे हे वृत्त वीर रस व शौर्य भावनेला पोषक आहे. प्रत्येक ओळीच्या शेवटी दोन गुरू (प्रत्येकी दोन मात्रांची दोन अक्षरे) येत असल्यामुळे कोणताही विचार, वाचक अथवा श्रोत्यांवर ठसविण्यासाठी ही वृत्तरचना उपयुक्त आहे. सावरकरांची ‘माझे मृत्युपत्र’ ही कवितादेखिल याच वृत्तात निबद्ध आहे. जाता जाता सावरकर निर्मित ‘वैनायक’ वृत्ताचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. त्यांनी अंदमानात असतांना रचलेल्या ‘निद्रे’, ‘सायंघंटा’, ‘मूर्ती दुजी ती’, ‘मरणोन्मुख शय्येवर’ यासारख्या कांही कविता तसेच ‘कमला’ व ‘गोमंतक’ (उत्तरार्ध) ही दीर्घ काव्ये त्यांनी स्वनिर्मित ‘वैनायक’ वृत्तांतच रचलेली आहेत. एखाद्याच्या प्रतिभेचा संचार किती विविध प्रांतात असावा! अलौकिक!!

प्रस्तुत कविता सावरकरांनी, पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना, १९०२ साली ‘आर्यन विकली’ साठी रचली. कालांतराने ती ‘काळ’ मध्येही प्रसिद्ध झाली. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं १९ वर्षांचं! खरं तर हे वय, निसर्गात भरून राहिलेल्या सौंदर्याचं वर्णन करणार्‍या कविता किंवा शृंगाररसाने युक्त प्रेमकविता करण्याचं! पण सावरकरांनी मातृभूमीलाच मन वाहिलेलं असल्यामुळे, तिच्या स्वातंत्र्या शिवाय दुसरा कोणताच विचार त्यांच्या मनात येत नसावा. प्रखर बुद्धीमत्ता घेऊन जन्माला आलेल्या या तरूणाने, आपलं तारुण्य स्वातंत्र्य देवतेच्या चरणी अर्पण केलं होतं. अफाट वाचन, चिंतन, मनन यामुळे त्यांच्या या बुद्धीमत्तेला तेज धार आलेली होती. त्यामुळेच कोवळ्या तरूण वयात ते शाश्वत/ अशाश्वत यासारख्या विषयावर भाष्य करू शकतात. ते म्हणतात या विश्वात कोणतीच गोष्ट शाश्वत नाही. मग ती चांगली असो वा वाईट, हवीशी असो वा नकोशी! याच्या पुष्ट्यर्थ ते निरनिराळी उदाहरणे देतात.

आपल्या पराक्रमाने ज्यांनी अवघ्या पौर्वात्य खंडावर राज्य केलं, ज्यांच्या राज्यात सुखशांती व सुबत्ता नांदत असे अशा पारसिक म्हणजेच पारशांचं साम्राज्य सिंकंदराने नष्ट केले. म्हणजेच त्यांना जिंकून, त्यांचं शिरकाण करून तसेच धर्मांतर करायला लावून आपलं मुस्लीम साम्राज्य स्थापन केलं. अशा जगज्जेत्या सिकंदराचं जे सत्ताकेंद्र होतं, त्या ग्रीसवर कालांतराने रोमन लोकांनी कब्जा केला. परंतु पुढे जाऊन हूणांच्या रानटी टोळ्यांनी या अजिंक्य समजल्या जाणाऱ्या रोमन साम्राज्याचे तुकडे तुकडे केले. अशा प्रकारे उन्नती पाठोपाठ अवनती येतेच. जे जे म्हणून निर्माण होते, ते ते कालांतराने नष्ट होतेच. जे उदयाला येते त्याचा अस्त होणार हे ठरलेलेच आहे. हे ठसविण्यासाठी ऐतिहासिक दाखल्यांपाठोपाठ कवी, समुद्राची भरती ओहोटी, सूर्याचा उदयास्त असे निसर्गातले परिचित दाखले देतात आणि विचारतात, या विश्वात काय चिरंतन राहिलं आहे? ही गोष्ट बलवान, गर्विष्ठ, उन्मत्त यांच्याप्रमाणेच उदास, उद्विग्न असणाऱ्यांनी देखिल लक्षात ठेवली पाहिजे. कोणतीच स्थिती वा परिस्थिती, मग ती ऐहिक असो वा भावनिक, कायम रहात नाही. ती बदलतेच.

या कवितेतून सर्व भारतीयांना कवी विश्वास देऊ इच्छित असावेत की, भारतमातेची ही दुःस्थिती बदलणार व स्वातंत्र्याचा सूर्योदय होणार हे निश्चित!

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ह्या वयातले चंद्र (मुखी) अभियान…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “त्या वयातले चंद्र(मुखी) अभियान…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

कसं आहे नं, आकाशातला चंद्र हा…. तो चंद्र असतो…….. पण भूतलावर आपल्याला आवडणारा चंद्र मात्र ती…… असते. त्याला चंद्रमूखी असंही म्हणतो……

भारतान आपल चंद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरवल आणि इतिहास रचला. आणि यामुळेच याच्याही आधीचा आमच्या त्या वयातल्या अनेक (फसलेल्या) चंद्र(मूखी) अभियानांचा इतिहास आठवला. हा इतिहास माझ्यासह अनेकांचा आणि आपला असू शकतो.

 म्हणूनच आमच्या अभियानाचा इतिहास असं म्हटलं. नाहीतर माझा इतिहास म्हटलं असतं.

चंद्रावर यान पाठवण्यासाठी इतर देशांनी जेवढे प्रयत्न केले असतील तितकेच, कदाचित त्यापेक्षा थोडे जास्तच प्रयत्न आम्ही आमच्या चंद्र अभियानासाठी केले असतील.

यात काही जणांच हे अभियान अगदी पहिल्या किंवा कमी प्रयत्नात यशस्वी झाल. काहींच्या अभियानाला (चंद्र) ग्रहण लागल. तर काहींना त्याच चंद्रमूखीच्या मुलांनी मामा…. मामा…. म्हणत त्यांच्या मनापासून केलेल्या अभियानाचा आणि त्यांचा अक्षरशः मामा केला.

भारताने ज्या चंद्रावर यान पाठवल त्याच चंद्रावर इतर देशांनी देखील आपल्या आधी आपल यान पाठवल आहे. काही पाठविण्याच्या तयारीत असतील. पण कोणीही हा चंद्र माझा….. असा हक्क सांगायचा प्रयत्न केला नाही. पण आमच्या या चंद्रमूखी अभियानात मात्र तो चंद्र (मिळाला तर‌‌……. ) माझाच राहिल असा हट्ट होता. कारण त्याच चंद्रासाठी इतरांच्या देखील मोहीम सुरू आहेत याची जाणीवच नाहीतर पक्की खात्री होती. आम्ही सोडून दुसऱ्यांच हे अभियान यशस्वी झाल तर मात्र आमचं ते अभियान तिथेच आणि लगेच थांबवाव लागत होत. एक मात्र होत………..

आकाशातला चंद्र एकच असल्याने आणि अजूनतरी कोणाचा त्यावर हक्क नसल्याने, देशांनी आखलेली चंद्र मोहीम सफल झाली नाही तरी दुसरी, तिसरी, किंवा पुढची प्रत्येक मोहीम ही त्याच चंद्रासाठी असते. आमच मात्र तस नव्हत. मोहीम अपयशी झाली तरीही आमचे पुढच्या मोहिमेसाठी अथक प्रयत्न सुरू असायचेच.. फक्त…….. या मोहिमेसाठी आम्ही चंद्रच बदलत होतो. कारण…. कारण दुसऱ्या चंद्राचे पर्याय होते.

सर सलामत तो पगडी पचास….. याच धर्तीवर “एक चंद्र मिळाला नाही तरी, होऊ नको हताश….. ” असा आशादायी कार्यक्रम होता.

कोणत्याही अभियानासाठी गरज असते ती मदतीची, आणि तिथल्या एकूण परिस्थितीच्या अभ्यासाची. मित्रांकडून मिळणारी मदत कमी नव्हती. तसच या बाबतीत आमचाही अभ्यास काही कमी नव्हता. किंबहुना याच अभ्यासाचा ध्यास होता.

या अभ्यासात आमच्या या चंद्राची भ्रमणवेळ, भ्रमणकालावधी, भ्रमण कक्षा यांची काटेकोर माहिती घेतली जात होती. तसेच त्या चंद्राच्या आजुबाजुला असणारी शक्ती स्थळ, परिणाम करणारे घटक (नातेवाईक, भाऊ, वडील), वातावरण यांचा योग्य तो अभ्यास झालेला असायचा. या त्याच्या भ्रमण काळात त्याच्या भ्रमण कक्षेत आमच यान (मित्राची काही वेळासाठी घेतलेली दुचाकी) साॅफ्ट लॅंडींग करु शकेल का? आणि चंद्राच्या जास्तीत जास्त जवळ जाता येइल का? याचाही अंदाज घेतला जात होता. यात बऱ्याचदा एक तर आमच यान वेळेच्या अगोदरच त्या कक्षेत प्रवेश करायच, आणि साॅफ्ट लॅंडींगच्या सुरक्षित जागेच्या शोधातच योग्य वेळ टळून गेलेली असायची. चंद्र आमच्या कक्षेच्या बाहेर गेलेला असायचा.

काही चंद्रांना याची जाणीव झाली असावी. कारण अचानक त्यांची भ्रमणवेळ, भ्रमण कक्षा, भ्रमण काळ बदलायचा. मग त्यांच्या भ्रमण मार्गाचा शोध घेतांना आमच्या यानातल इंधन (पेट्रोल) किंवा ठरलेली वेळ संपण्याच्या भितीने कक्षा सोडून परत फिराव लागायच.

चंद्राचे पर्याय असलेतरी काही चंद्र मात्र केव्हा, कुठे, आणि कितीवेळ दिसेल हे सांगता येत नव्हत. पण तो दिसलाच तर.. त्याची माहिती मात्र एकमेका साहाय्य करू…… या तत्वावर लगेच मिळत होती. किंवा दिली जात होती. अगदी त्या वेळी मोबाईल नसतांना सुध्दा. यात आपापसात स्पर्धा नव्हती.

अशा या चंद्र मोहिमेसाठी काहीवेळा गरज नसताना बाजारात गेलो. न आवडणाऱ्या कार्यक्रमांना सुध्दा हसत मुखाने हजेरी लावली. पण वेळ वाया गेल्याचच लक्षात आल. कारण नेमकं कोणीतरी मधे असायचं आणि चंद्र झाकला जायचा. आणि संपर्क करण्यात अडचण व्हायची. यासाठी गरज नसतांना लायब्ररी किंवा काॅलेजच्या रीडिंग रुम मध्ये मुक्काम ठोकला. आर्टस्, सायन्स, काॅमर्स अशा सगळ्या विभागातून फिरलो…….

आशी मोहीम काही काळ सुरुच होती. (आता ही मोहीम केव्हा थांबवली हे मात्र विचारु नका. पण ती केव्हाच आणि कायमची थांबली आहे हे खरं आहे. ) त्यातलेच काही चंद्र आता मात्र चंद्रकोर न राहता पौर्णिमेच्या चंद्रासारखे गोल गोल झाले आहेत. एखाद छान शिल्प किंवा चित्र ज्या बारकाईने पहाव तस ज्यांना पूर्वी बघत होतो तेच चंद्र आता पुस्तकाची पानं चाळल्यासारख (दिसले तरच) वर वर चाळले जातात. आता ते डोळ्यांना दिसले नाही तरी फरक पडत नाही. काही तर अमावस्येच्या चंद्रासारखे लुप्त झाले आहेत. पण त्यासाठी कोणतही अभियान नाही.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लेखक येता घरा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

लेखक येता घरा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 घरात कोणी पाहुणे आले की घराला आनंद होतो, घर खुश होतं असं मला वाटते ! घराचे घरपण हे माणसांमुळे असते आणि येणारा पाहुणा जर हवाहवासा वाटणारा असेल तर घर अधिकच आनंदित होतं ! तसं आज झालं !

रोजचा दिवस ” रंग उगवतीचे” सदराने आनंदमय करणारे लेखक श्री. विश्वास देशपांडे सर आणि त्यांच्या पत्नी, सौ श्रद्धा ताई देशपांडे आज आमच्या घरी सकाळच्या ब्रेकफास्टसाठी आले. अर्थातच त्यांच्या येण्याने चैतन्यमय वातावरणात गप्पा सुरू झाल्या. नाश्त्यासाठी इडली, सांबार, चटणी, रव्याचा लाडू असा साधाच मेनू होता. सौ. श्रद्धा वहिनींचा उपवास असल्याने फळे, कॉफी वगैरे होते. पण या सर्वांपेक्षा त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकांबद्दल अधिक उत्सुकता होती. त्यांची नुकतीच प्रकाशित झालेली 

” चांदणे शब्द फुलांचे “, “ अजूनही चांदरात आहे “ आणि “ आनंद निधान “ ही पुस्तके मी घेतली.. आता प्रत्यक्ष वाचेन तेव्हा त्यावर काही लिहिता येईल. त्यांच्या आधीच्या प्रकाशित झालेल्या “ अष्टदीप “ ह्या पुस्तकाची प्रत ही आत्ताच माझ्या हातात आली. त्यातील प्रत्येकाबद्दल माहिती असली तरी सरांच्या दृष्टिकोनातून या सर्व थोर व्यक्तींबद्दल चांगले वाचायला मिळणार आहे याची खात्री आहे.

रंग उगवतीचे सदर सुरू होऊन तीन वर्षे पूर्ण झाली हे पटतच नाही ! अरेच्चा, आत्ताच तर सुरू झालं हे सदर ! हे सदर इतकं नाविन्यपूर्ण असते की रोजचा रंग नवा ! सरांना विषय तरी इतके सुचतात की, ‘ साध्या ही विषयात आशय मोठा किती आढळे !’ याचा प्रत्यय ते लेख वाचताना येतो. सरांचा आणि माझा परिचय गेल्या तीन वर्षातला ! माझ्या ” शिदोरी” या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी त्यांना आमंत्रित केले आणि त्यांनी ते मान्य करून आमच्या कार्यक्रमाला शोभा आणली. अतिशय मृदू स्वभाव, सावकाश शांतपणे बोलणे, चांगली निरीक्षण शक्ती ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. लेखनातील सच्चेपणा, साधी सरळ प्रवाही भाषा, यामुळे वाचकांशी त्यांना ‘या हृदयीचे त्या हृदयी’ असा संवाद साधता येतो. व्यक्तिचित्रण कोणतेही असो, साध्या कामगाराचे असो किंवा मोठ्या व्यक्तीचे, त्यातील बारीक-सारीक तपशीलही त्या लेखात येतात, आणि ते चित्रण मनाला भावते ! वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे, पण वाचकांचे प्रेम, आपुलकी मिळणे हा मोठा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे !

प्रथमतः मी सरांचे ” रामायण महत्त्व आणि व्यक्ती विशेष “ हे पुस्तक वाचले होते. रामायण आपणा सर्वांना परिचित आहेच, परंतु देशपांडे सरांनी ते अभ्यासपूर्ण लेखातून चांगले सादर केले आहे. त्यामुळे रावण असो वा मंदोदरी, प्रत्येक व्यक्ती-रेखा छान, वास्तव अशी लिहिली आहे. अशा या व्यक्तिमत्त्वाविषयी मला आदर आहे. यंदा त्यांना तितीक्षा इंटरनॅशनल चा पुरस्कार मिळाला आहे. या मान्यवर लेखकाचे स्वागत करताना स्वाभाविकच मला खूप आनंद मिळाला. देशपांडे सर आणि सौ. श्रद्धा वहिनींच्या सहवासात घालवलेला हा वेळ संस्मरणीय राहील, त्याची साक्ष हा त्यांच्यासोबत काढलेला फोटो देत आहेच !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “क्रौंचवध” – लेखिका – लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “क्रौंचवध” – लेखिका – लेखिका : सुश्री  शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

काल देगलूरकर सरांच्या घरी एक अप्रतिम पेंटिंग पाहीले, त्यांना प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत ह्यांच्याकडून भेट म्हणून मिळालेले. कालपासून हे पेंटिंग डोक्यातून जात नाहीये. ज्या घटनेतून संस्कृतमधल्या पहिल्या छंदोबद्ध कवितेचा आणि पर्यायाने रामायणासारख्या महाकाव्याचा जन्म झाला, त्या क्रौंचवधाच्या घटनेचे हे चित्र, वासुदेव कामतांसारख्या सिद्धहस्त चित्रकाराच्या कुंचल्यातून उतरलेले.

मूळ कथा अशी आहे की गंगेची उपनदी असलेल्या तमसा नदीच्या तीरावर ऋषी वाल्मिकींचा आश्रम होता. एकदा भल्या पहाटे नित्याची आन्हिके उरकायला ऋषी वाल्मिकी भारद्वाज ह्या आपल्या शिष्यासह तमसातीरी आलेले असताना त्यांना प्रियाराधनात गुंग असलेली क्रौंच म्हणजे सारस पक्ष्यांची जोडी दिसली. हे पक्षी आयुष्यात एकदाच जोडीदार निवडतात आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहतात. त्यांचे प्रियाराधनाचे नृत्यही बघण्यासारखे असते. कितीतरी वेळ नर आणि मादी क्रौंच पक्षी स्वतःभोवती आणि एकमेकांभोवती गिरकी घेत नृत्य करत असतात. असेच नृत्य पहाटेच्या त्या धूसर, निळसर प्रकाशात ऋषी वाल्मिकींनी पाहिले असावे आणि त्या डौलदार, देखण्या नृत्याने ते क्षणभर हरवून गेले असावेत.

पण त्याच क्षणी कुणा व्याधाचा बाण वेगाने आला आणि एका क्रौंच पक्ष्याचा वेध घेऊन गेला. आपल्या जोडीदाराला पाय वर करून तडफडताना बघून मादी क्रौंच पक्षी करूण विलाप करू लागली. ते बघून ऋषी वाल्मिकींचे कवी हृदय द्रवले आणि त्यांच्या तोंडून अवचित शब्द उमटले,

‘मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम: शास्वती समा।

यत्क्रौंचमिथुनादेकमवधी: काममोहितम्।।’

म्हणजे, “हे निषाद, तुला कधीच प्रतिष्ठा लाभणार नाही, कारण तू ह्या काममोहित अश्या क्रौंच पक्ष्यांच्या जोडीची अकारण ताटातूट केली आहेस. ” 

अतीव करुणेतून जन्मलेले हे संस्कृतमधले पहिले काव्य. स्वतःच्याच तोंडून निघालेला तो श्लोक ऐकून ऋषी वाल्मिकी भारद्वाजांना म्हणाले,

‘पादबद्धोक्षरसम: तन्त्रीलयसमन्वित:।

शोकार्तस्य प्रवृत्ते मे श्लोको भवतु नान्यथा।।’

म्हणजे शोकातून जन्मलेला हा श्लोक आहे, ज्याचे चार चरण आहेत, प्रत्येकात समान अक्षरे आहेत आणि एक नैसर्गिक छंदोबद्ध लय आहे.

करुणेतून जन्मलेले हे काव्य ऐकूनच साक्षात ब्रह्मदेवांनी वाल्मिकी मुनींना आदिकवी अशी पदवी दिली आणि त्यांना सांगितले की त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची कथा छंदोबद्ध काव्यातून जगाला सांगावी, जी जोपर्यंत या पृथ्वीतलावर नद्या वाहतील आणि पर्वत उभे असतील तोवर लोकांच्या मनातून नष्ट होणार नाही! 

यावत् स्थास्यन्ति गिरय: लरितश्च महीतले।

तावद्रामायणकथा सोकेषु प्रचरिष्यति॥’

ह्या सुंदर आणि करुण कथेच्या त्या निर्णायक क्षणाचे हे चित्र आहे. पहाटेचा निळसर, धूसर, अस्फुट प्रकाश पसरलेला आहे, पण आभाळ अजून काळवंडलेलेच आहे. तमसेचा प्रवाहही निळसर, तलम, स्वप्नवत आहे. बाण वर्मी लागलेला क्रौंच पक्षी पाय वर करून पाण्यात पडलेला आहे, त्याच्या छातीवर रक्ताचा लालभडक डाग आहे, शेजारी मादी पक्षी चोच उघडून आक्रोश करते आहे. बाण लागल्यामुळे तडफडणाऱ्या पक्ष्याची पिसे वाऱ्यावर उडून गिरकी घेत खाली येत आहेत आणि ह्या विलक्षण करुण पार्श्वभूमीवर शुभ्र वस्त्रधारी तपस्वी ऋषी वाल्मिकी अर्घ्य देता देता थबकले आहेत. त्यांचा चेहरा वेदनेने विदीर्ण झालेला आहे. त्या वेदनेमागे सात्विक संतापही आहे आणि त्या भावनेतून जन्मलेला जगातला पहिला काव्यमय शोक श्लोकरूपात उमटत आहे असे हे चित्र! 

ऋषी वाल्मीकींच्या चेहऱ्यावरची रेषा न रेषा बोलतेय. त्यांचे दुःख त्या पहाटेच्या निळसर आभाळाइतकेच विशाल आणि सर्वसमावेशक आहे. चित्रकार वासुदेव कामत हे त्यांच्या पोर्ट्रेट्ससाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. पोर्ट्रेट किंवा व्यक्तिचित्र काढताना केवळ ’हुबेहूब व्यक्तीसारखेच चित्र काढणे’ हा इतकाच निकष कधीच नसतो.

व्यक्तिचित्र काढताना ते तांत्रिकदृष्ट्या निर्दोष तर असावेच लागते, पण ज्या व्यक्तीचे चित्र ज्या क्षणी काढले गेले, त्या क्षणाची भावस्थिती अचूक टिपणे हे सोपे नसते आणि त्याहीपेक्षा महत्वाचा असतो तो त्या चित्राचा पाहणाऱ्या रसिकाच्या हृदयाला थेट भिडणारा अनुभवही, जो चित्र चांगले की अत्युत्तम हे ठरवतो. क्रौंचवधाच्या ह्या चित्रात हे तिन्ही घटक सुरेख जुळून आलेले आहेत. हे चित्र आणि त्याचा परिणाम दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतो आणि चित्र पाहणा-या माणसाचे मनही ह्या चित्रातल्या अपार करुणेने ओलावल्याशिवाय राहवत नाही.

लेखिका : सुश्री शेफाली वैद्य

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “एक दिवा त्यांच्यासाठी…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “एक दिवा त्यांच्यासाठी…” ☆ सौ राधिका भांडारकर 

एक दिवा त्यांच्यासाठी..

दुरितांचे तिमिर जावो

विश्व स्वधर्म सूर्ये पाहो

जो  जे वांछील तो ते लाहो

प्राणीजात।।

खरोखरच माऊलीने मागितलेलं हे पसायदान किती अर्थपूर्ण आहे!  यातला संदेश वैश्विक आहे. त्रिकालाबाधित  आहे .

आज दिवाळी सारखा प्रकाशाचा सण साजरा करत असताना मनात असंखय विचारांचं जाळं विणलं जातं. दिवाळी म्हणजे उजळलेल्या पणत्या, रंगीत रांगोळ्या, वातावरणातला तम सारणारे कंदील, खमंग —मधुर फराळ, नवी वस्त्रे, गणगोतांच्या भेटी, आणि अनंत हार्दिक शुभेच्छा. आनंद, सुख समाधानाच्या या साऱ्या संकल्पना. पण या पलीकडे जाऊन विचार केला तर असं वाटतं कुठेतरी यात “मी” “ माझ्यातले अडकले पण” आहे फक्त. यात प्रवाहापासून लांब असलेल्या, वंचित, उपेक्षितांच्या जीवनातही आनंदाचा उजेड पडावा यासाठी काही केले जाते का आपल्याकडून ?अनोख्या चैतन्याने आणि मांगल्याने भारणारा हा सण आहे.  पण या चैतन्य उत्सवाच्या तरंगात सर्वव्यापीपणा अनुभवास येतो का? आपण आपल्यातच मशगुल असतो.  आपल्या पलीकडे काय चाललं आहे, इतर जन कोणत्या अवस्थेत आहेत याचा विचार सहसा आपल्या मनाला स्पर्श करत नाही. आपल्या पलीकडल्यांचा विचार करणे हे या निमित्ताने गरजेचे वाटायला नको का?  केवळ आर्थिक विषमतेच्या पातळीवरच नव्हे, तर मानसिक आधाराच्या दृष्टीनेही ते गरजेचे आहे.  आनंद सुख समाधानाचे भाव केवळ आपल्या आपल्यातच अनुभवण्यापेक्षा  विवंचनेत असणाऱ्या, परिस्थितीने गाजलेल्या, वंचित, उपेक्षित कारण परत्वे कुटुंबाने व समाजानेही नाकारलेल्या, टाकलेल्या व्यक्तींच्या जीवनातले काही क्षण या सणाच्या निमित्ताने आपण उजळण्याचा का प्रयत्न करू नये?

माझ्या मनात बालपणापासून जपलेली एक आठवण आहे. खरं म्हणजे आज त्या आठवणीला मी एक संस्कार म्हणेन.  बाळपणीच्या त्या दिवाळ्या स्मरणातून जाणे ही अशक्य बाब आहे.  एका  गल्लीतलं एकमेकांसमोर असलेल्या एक खणी दोन खणी घरांच्या वस्तीतलच  आमचंही घर.  तिथली माणसं ,तिथलं वातावरण ,तिथले खेळ, सण, विशेषता दिवाळीची रोषणाई, पायरीवरच्या मंद पणत्या, ओटीवरच्या रांगोळ्या आणि एकमेकांच्या घरी जाऊन केलेले फराळ हे सतत फुलबाजी सारखे मनात उसळत असतात.  पण या साऱ्या आनंदाच्या उन्मादात एक आकृती मात्र विसरता येत नाही.  वृद्ध, थकलेल्या गात्रांची, काशीबाईच्या घराच्या बाहेरच्या ओसरीवर कधीतरी कुठून तरी आश्रयाला आलेली.  नाव, गाव ,स्थान कशाचीच माहिती नसलेली एक उपेक्षित अनामिका.  पण अभावीतपणे ती या गल्लीची कधी होऊन गेली हे कळलेच नाही.  आणि कुठलाही सण असो सोहळा असो गल्लीतली सगळी माणसं प्रथम तिचा विचार करायचे.  पहिला फराळ तिला पोहोचवला जायचा.  आम्ही गल्लीतली मुलं तिच्या पायरीवर पणत्या लावायचो. रांगोळ्या काढायचो. काशीबाईंनीही  तिला तिचा ओसरीवरचा आश्रय कधीही हलवायला सांगितले नाही.  या ऋणानुबंधाचा अर्थ तेव्हा कळत नव्हता पण त्या सुरकुतलेल्या अनामिकेवरच्या चेहऱ्यावरची आनंदाची लकेर आम्हाला खरा सणाचा आनंद द्यायची. आणि ती लकेर तशीच आजही मनात जपून आहे.

या सणानिमित्ताने भावंडात होणारी वाटणी कशाचीही असू दे ,फराळाची, नव्या कपड्यांची. फटाक्यांची पण त्या सर्वांमधून बाजूला काढलेला एक सहावा हिस्सा असायचा. तो घरातल्या मदतनीसांच्या मुलांचा, रोज रात्री “माई” म्हणून हाक मारणाऱ्या त्या भुकेल्या याचकाचा, जंगलातून डोक्यावर जळणासाठी सालप्याचा भार घेऊन येणाऱ्या आदिवासी कातकरणीचा आणि घटाण्याच्या मागच्या गल्लीत  वस्ती असलेल्या तृतीयपंथी लोकांचाही.  त्यावेळी सहजपणे, विना तक्रार, विना प्रश्न होणाऱ्या या क्रियांचा विचार करताना आता वाटतं, वास्तविक तेव्हा हे उपेक्षित, वंचित, प्रवाहापासून दूर गेलेले कुणीतरी बिच्चारे म्हणून मुद्दाम का आपण करत होतो ? तेव्हा या विषमतेचा भावही नव्हता. तो केवळ एक रुजलेला उपचार होता. पण तरीही नकळत “कुणास्तव कुणीतरी” हा संस्कार मात्र मनावर बिंबवला गेला.  या एका जीवनावश्यक सामाजिक संवादाची गुणवत्ता,आवशक्याता  जाणली गेली हे मात्र निश्चित आणि पुढे वाढत्या वयाबरोबर हे पेरलेले बीज अंकुरित गेलं.

इनरव्हील क्लब ची प्रेसिडेंट या नात्याने आम्ही दिवाळी सणांचे काही उपक्रम राबवत असू. वृद्धाश्रमातील फराळ भेट असे, रिमांड होमच्या मुलांबरोबर तिथेच फराळ बनवण्याचा कार्यक्रम असायचा, तसेच रांगोळ्या फटाके वाजवणे अशी धम्माल त्या मुलांबरोबर करताना खरोखरच एक आत्मिक समाधान अनुभवले.  तांबापुरा वस्तीत घरोघरी जाऊन पणत्यांची रोषणाई केली, फराळ वाटप केले ,कपडे, शाली त्यांना दिल्या आणि हे संवेदनशील मनाने  केले. केवळ पेपरात फोटो येण्यासाठी नक्कीच नव्हे. रोटरी, इनरव्हील तर्फे आजही या सणांचं हे भावनिक बांधिलकीच रूप पाहायला मिळतं. शिवाय समाजात “एक तरी करंजी” सारख्या तरुणांच्या संघटना आहेत, जे स्वतः आदिवासी पाड्यावर जाऊन त्यांच्या समवेत दिवाळी हा सण धुमधडाक्यात साजरा करतात.

अमळनेरला माझ्या सासरी पाडव्याच्या दिवशी घरातले सर्व पुरुष प्रथम धोबीणी कडून दिवा उतरवून घेतात. तिला ओवाळणी देतात. खूप भावुक असतो हा कार्यक्रम. धोबीणी कडून दिवा उतरवून घेणे आजही शुभ मानले जाते. या प्रथा गावांमध्ये आजही टिकून आहेत. विचार केला तर असे वाटते, हर दिन त्योहार असलेल्यांसाठी हे सण नसतातच.  ज्यांच्या घरी रोजची चूल पेटण्याची विवंचना असते त्यांच्यासाठीच या सणांचं महत्त्व असतं आणि म्हणून सण साजरा करताना त्यांची आठवण ठेवून काही करण्यात खरा आनंद असतो

दिवाळीच असं नव्हे तर कुठलाही सण साजरा करताना अगदी सहज आठवण येते ती निराधार, बेघर, रस्त्यावर झोपणाऱ्या असंख्य लोकांची. भविष्याचा अंधकार असणाऱ्या, उघड्या नागड्या उपासमारीत वाढणाऱ्या मुलांची, दुष्काळामुळे हातबल झालेल्या शेतकऱ्याची, जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची, शरीराचा बाजार मांडणार्‍या  लालबत्ती भागातल्या असाहाय्य, पीडित, लाचार स्त्रियांची, कुटुंबाने नाकारलेल्या लोकांची, सीमेवर राष्ट्रासाठी स्व सुखाकडे पाठ फिरवून प्राणपणाने थंडी, वारा, ऊन पावसाची पर्वा न करता सीमेचं रक्षण करणार्‍या सैनिकांची, त्यांच्या कुटुंबीयांची, अनाथ —अपंगांची ,सुधार गृहात डांबलेल्या, विस्कटलेल्या मुलांची. कोण आहे त्यांचं या जगात? त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची कोणाची  जबाबदारी?  या समाज देहाचा तोही एक अवयवच आहे ना मग एक तरी पणती त्यांच्या दारी आपण लावूया. स्नेहाची, अंधार उजळणारी.

एक तरी करंजी त्यांना देऊया.  एक मधुर, भावबंध साधणारी.

एक फुलबाजी त्यांच्यासमवेत लावूया. ज्याने त्यांच्याही चेहऱ्यावर हास्याची कारंजी उसळतील.

नकारात्मक बाबींच्या अंधकारावर प्रकाशाचे असे चांदणे पेरूया. 

आपल्या भोवती असंख्य अप्रिय घटनांचा काळोख पसरलेला असला तरी अवघे विश्व अंधकारमय नाही. सत्याचे, दातृत्वाचे, चांगुलपणाचे, सृजनशीलतेचे असंख्य हात समाजात कार्यरत आहेत.  जे पणती म्हणून सभोवतालचा अंधकार छेडण्याचे कार्य करत आहेत. आपणही अशीच त्यांच्यातली एक मिणमिणती  पणती होऊया.तिथे जाणीवांचा,संवेदनाचा उजेड पेरुया..

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ असेही एक देवीपूजन… भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ असेही एक देवीपूजन… भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

पाचवा दिवा –

ज्या महिलांना भीक मागणं सोडायचं आहे, अशा महिला माझ्याकडे काम मागत आहेत 

मी गाडगे बाबांचा भक्त आहे, गाडगेबाबांचे विचारसरणीला अनुसरून आम्ही अशा सर्व महिलांची एक टीम तयार केली आहे, या टीमला “खराटा पलटण” असं नाव दिलं आहे 

या माध्यमातून या महिन्यात पुण्यातील वेगवेगळे भाग स्वच्छ करवून घेऊन त्यांना पंधरा दिवस पुरेल इतका किराणा दिला आहे ..कपडे दिले आहेत ….याव्यतिरिक्त त्यांच्या इतर गरजा सुद्धा भागवल्या आहेत. ! 

आमच्या या टीमला पुणे महानगरपालिकेने स्वच्छता अभियान चे ब्रँड ॲम्बेसिडर केले आहे, यांच्यासाठी सन्मानाची गोष्ट ! 

या सर्व आज्या आणि मावश्या झोपडपट्टी किंवा पुलाखाली राहतात. 

अशा सर्व आज्यांच्या घरी झोपडपट्टीत जाऊन आम्ही दिवा लावला आहे… म्हणुन मंदिरात यायला आम्हाला वेळच मिळाला नाही देवी…. ! 

यासाठी मी तुझी माफी मागणार नाही….  किंवा तू माफ करावंस अशी अपेक्षा सुद्धा ठेवणार नाही…. 

कारण तू हल्ली मंदिरात राहत नाहीस, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे…. आणि तू जर रोज आम्हाला रोज रस्त्यांवर दर्शन देत आहेस… तर मी कशाला येऊ मंदिरी ??? 

सहावा दिवा – 

ज्यांना विविध प्रकारचे गंभीर आजार होते अशा रुग्णांना, दवाखान्यात ऍडमिट करून उपचार केले. डोळे ऑपरेशन करून चष्मे दिले, दिव्यांग व्यक्तींना काठ्या कुबड्या आणि लागेल ते इतर वैद्यकिय साहित्य दिले. 

आमच्या परीने आम्ही असा नैवेद्य अर्पण केला. 

सातवा दिवा – 

हे नऊ दिवस लोक अनवाणी पायाने रस्त्यावर चालतात….! 

माझ्या भीक मागणाऱ्या समाजाचे लोक वर्षानुवर्षे, अनवाणी पायाने चटके सहन करत जगत आहेत… 

मग यांच्या पदरात अजुन पुण्य का नाही मिळाले ?  याचा विचार करत आम्ही हि प्रथा बदलली…. 

या नवरात्रात ज्यांच्या पायी चप्पल नाही, अशा सर्वांच्या पायी चप्पल घातली… ! 

माते तुला हे आवडलं नसेल, तर माझ्या तोंडात चप्पल मार, पण यांच्या पायी मात्र चप्पल राहू दे, उन्हात खूप पाय भाजतात गं…. !!!

आठवा दिवा –

ज्यांनी आयुष्यभर पोरांच्या अंगावर मायेची चादर पांघरली, परंतु आता जे रस्त्यांवर आहेत, अशा रस्त्यावरील  सर्व आई बापांना, येणारे थंडीचे दिवस लक्षात घेवून गरम शाली आणि इतर कपडे दिले आहेत. 

नववा दिवा – 

अनेक महिलांकडे अनेक प्रकारचे कला कौशल्य असते, या कला कौशल्याचा वापर करून यांना आणखी प्रशिक्षण देऊन, त्यांच्याकडून वस्तू तयार करवून घेऊन आपण त्या विक्री करणार आहोत 

आणि येणारा पैसा हा सर्व त्या महिलांना जाईल, असा विचार करत आहोत. 

अनेक भिक मागणाऱ्या महिलांना यामुळे एकाच वेळी व्यवसाय उपलब्ध होईल आणि त्या त्यांची घरं चालवू शकतील….

यांना प्रशिक्षण देण्यासाठी, एका जागेची सोय करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत…. परंतु आम्हाला अजून कोणतीही जागा मिळालेली नाही. 

कामाचं खूप कौतुक होतं… अवॉर्डस मिळतात … सर्टिफिकेट मिळतात…. 

परंतु अवॉर्ड आणि सर्टिफिकेट ने आपण दुसऱ्याचं पोट नाही भरू शकत बाबा,’ हे माझ्या माईनं (आदरणीय सिंधुताई सपकाळ यांनी) माझ्या कानात खूप पूर्वीच सांगितलं होतं…! 

असो….काहीतरी होईलच…  हा नववा दिवा राखून ठेवलाय, त्या प्रशिक्षणाच्या जागेसाठी …! 

पोराच्या जेवणाचा विचार करते ती आई….परंतु पोराच्या जीवनाचा विचार करतो तो बाप…! 

मला जे दिसते ते माझ्या पोराला सुद्धा दिसावं म्हणून जमिनीवरून कडेवर उचलून घेते ती आई…! 

पण मला जे दिसतंय, त्यापलीकडचं पोराला दिसावं म्हणून, पोराला डोक्यावर उचलून घेतो तो बाप…!!

आपण सर्वजण समाज म्हणून आमची कधी आई झालात तर कधी बाप झालात…. !! 

आमच्यावर प्रेम आणि माया करतांना, तळागाळातल्या समाजाला समरसून मदत करताना, आपण सर्व सीमा ओलांडल्या…! 

आमच्यासाठी हीच विजयादशमी…. हाच दसरा…!

— समाप्त —

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वहातूक… पूर्वीची आणि आजची… लेखक – श्री विद्याधर शेणोलीकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ वहातूक… पूर्वीची आणि आजची… लेखक – श्री विद्याधर शेणोलीकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सहज पुणे शहरातून स्कूटरवर फेरफटका मारला आणि मोकळ्या रस्त्यांवरून जाताना एकदम  ३५-४० वर्षांपूर्वीचा “फील” आला. 

कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, विद्यापीठ रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सिंहगड रस्ता वगैरे रस्त्यांवर दाट झाडी होती. हे रस्ते निवांत होते. अगदी रात्री १०-१०.३० नंतर तर लक्ष्मी रोडही  निवांत असे. चक्क बंद दुकानांच्या पायऱ्यांवर बसून रात्री गप्पागोष्टी करता येत. लक्ष्मी रोडला एक चहाचं दुकान रात्रीही चालू असे. तिथे बहुधा कामावरून परतणारे, थकलेभागलेले कामगार चहा पीत. रात्री उशीरापर्यंत इराणी हॉटेले चालू असत आणि पहाटे लवकर उघडत. रात्रीच्या शो ला सिनेमा बघून येताना गुडलक, रीगल, सनराईझ, पॅराडाईज, लकी, नाझ वगैरे ठिकाणी किंचित विसावून चहा घेण्यात मजा होती. क्वचित् खोबरं लावलेला केक नाहीतर क्रीमरोल, नाहीतर बन-मस्का खाऊन पोटोबा शांत केला जाई. रात्री पुण्यात रस्त्यावरून भरभर जाणारे म्हणजे एकतर सिनेमा पाहून परतणारे किंवा कामावरून घरी परतणारे असत. माझे वडीलही हाय‌ एक्स्प्लोझिवज् फॅक्टरीमध्ये खडकीला नोकरीला होते. सेकंड शिफ्ट संपल्यावर एच. ई.तसेच अम्युनिशन फॅक्टरीमधले कामगार एकमेकांच्या सोबतीने खडकी ते फर्ग्युसन रस्ता असा प्रवास अपरात्री करत. अपरात्री सहकारनगर, अरण्येश्वर, पौड फाटा वगैरे भागात यायला रिक्षावाले नाखूष असत ( ही फॅशन जुनी आहे , आजची नाही…). अपरात्री एकट्यादुकट्याला सायकल मारत जायला भीती वाटायची. त्यात जोशी-अभ्यंकर खून प्रकरण झाल्यावर तर अख्ख्या पुणे शहरातच दहशत पसरली होती. पुढेही  “हाकामारी” वगैरे अफवांमुळे भीती वाटायची. 

पुणं हे सायकलींचं शहर तर होतंच, पण नंतरही अनेक वर्षं बजाज सुपर, कब, एम एटी हीच वाहनं होती. त्यापूर्वी तर लूना, व्हेस्पा आणि लॅंब्रेटा ही वाहनं. मोटारीही मुख्यत्वे एम्बॅसिडर आणि फियाट याच होत्या, क्वचित् प्रीमियर पद्मिनी… बाकी भारी गाड्या फक्त इंग्रजी चित्रपटात पडद्यावरच दिसत. रात्री पुण्यातले बहुतेक रस्ते अजगरासारखे शांत, सुस्त पहुडलेले असायचे आणि दिवसाढवळ्याही दुतर्फा वाहतूक असून रस्ते “मोकळे” वाटायचे. आतासारखी वाहतूक “अंगावर” येत नव्हती. मुख्य  म्हणजे सायलेन्सर काढून ट्रिपल सीट जात, माकडासारख्या आरोळ्या ठोकत जायचं आणि सिग्नलला पच्च् करून तोंडातला गुटख्याचा  तोबरा थुंकायचा…. हा जंगली प्रकार नव्हता. 

तेव्हाची वाहतूक आठवली, की त्या आठवणीनं मन गलबलून येतं…

त्याकाळची वाहतूकही त्याकाळच्या पुण्यासारखीच होती…..

शांत…. सभ्य……सौम्य…..!!!

लेखक :  श्री विद्याधर शेणोलीकर

कोथरूड,  पुणे.

संग्राहक : श्री माधव केळकर. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “दीपावली” लेखक :श्री अप्पा पाध्ये गोळवलकर ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “दीपावली” लेखक :श्री अप्पा पाध्ये गोळवलकर ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

दसरा संपला होता. दीपावली जवळ आली होती. तेवढ्यात एके दिवशी काही तरुण-तरुणींचा NGO छाप कंपू आमच्या महाविद्यालयात  शिरला.

त्यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले; परंतु त्यांच्या एका प्रश्नावर सगळे महाविद्यालयीन विद्यार्थी चूप बसले. त्यांना काहीही उत्तर सुचेना. अवघ्या कॉलेजमध्ये शांतता पसरली!

त्यांनी विचारलं, “जर का दीपावली हा सण भगवान रामचंद्रांच्या १४ वर्षांच्या वनवासानंतर ते अयोध्येला परतण्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, तर मग दीपावलीच्या दिवशी  ‘लक्ष्मी पूजन’ का केलं जातं ? श्रीरामाची पूजा का नाही केली जात?”

या प्रश्नावर कॉलेजमध्ये अचानक शांतता पसरली. कारण त्या काळामध्ये न कुठला सोशल मीडिया उपलब्ध होता, न कुठले स्मार्टफोन्स उपलब्ध होते! कुणालाच या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं! तेवढ्यात, शांततेचा भंग करत आमच्याच विद्यार्थ्यांमधील एक हात या प्रश्नाचं उत्तर द्यायला वर झाला!

त्याला बोलायला सांगितल्यावर त्या विद्यार्थ्यानं उत्तर दिलं, “दीपावली हा सण दोन युगांशी म्हणजेच ‘सत्ययुग’ आणि ‘त्रेतायुग’ यांच्याशी जोडलेला आहे!

सत्ययुगात समुद्र मंथनातून माता लक्ष्मी याच दिवशी प्रकट झाली होती! म्हणून ‘लक्ष्मी पूजन’ केलं जातं!

भगवान श्री रामसुद्धा त्रेता युगात याच दिवशी अयोध्येला परतले होते! त्यावेळी अयोध्यावासियांनी लक्षावधी दीप प्रज्वलित करून आपल्या भगवंताचं स्वागत केलं होतं! म्हणूनच या सणाचं नाव दीपावली असं आहे!

म्हणूनच या पर्वाची दोन  नावे आहेत, ‘लक्ष्मी पूजन’ हे सत्ययुगाशी संबंधित आहे, आणि दुसरं “दीपावली” हे त्रेता युगातील प्रभु श्रीराम आणि दिव्यांची आरास याच्याशी संबंधित आहे!

हे उत्तर मिळाल्यानंतर थोडावेळ पुन्हा सगळीकडे शांतता पसरली, कारण कुणालाच या उत्तराला खोडून काढता येत नव्हतं! अगदी आम्हाला हा प्रश्न विचारणाऱ्या त्या तरुण-तरुणीच्या चमूलादेखील यावर काय बोलावं हे कळेना!

आणि मग आम्हा सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकदमच टाळ्यांचा कडकडाट केला!

एका वृत्तपत्राने माझी मुलाखत देखील घेतली!

त्या काळामध्ये वृत्तपत्रांमध्ये मुलाखत द्यायला मिळणं हेच मोठं अप्रूप होतं!

पुढे कित्येक वर्षानंतर समजलं की तो जो तरुण तरुणींचा कंपू आमच्या कॉलेजमध्ये प्रश्न विचारायला आला होता तो, ज्यांना आजच्या आधुनिक शब्दावलीत  “लिबरर्ल्स” (वामपंथी) म्हटलं जातं,त्यांनी पाठवलेला होता. ही वामपंथियांची चमू प्रत्येक कॉलेजात जाऊन कॉलेज तरुणांच्या डोक्यात ही गोष्ट भरवत असे की “जर दीपावली ही श्रीरामाशी संबंधित आहे तर मग दीपावलीच्या सणात ‘लक्ष्मीपूजना’चं औचित्य काय आहे?” एकूणच ही वामपंथी चमू विद्यार्थ्यांचं ब्रेनवॉश करीत होती !

परंतु आमचं उत्तर मिळाल्यानंतर ती चमू गायबच झाली!

एक आणखीन प्रश्न विचारण्यात आला होता आणि आजही विचारण्यात येऊ शकतो. तो म्हणजे लक्ष्मी आणि श्री गणपती यांचं आपसात काय नातं आहे ? आणि दीपावली मध्ये या दोघांचं पूजन का केलं जातं?

याचं खरं उत्तर पुढीलप्रमाणे :

लक्ष्मी जेव्हा सागरमंथनामध्ये सागरातून वर आली आणि तिनं भगवान विष्णूशी विवाह केला तेव्हा ती सृष्टीच्या धनाची आणि ऐश्वर्याची देवी बनली! तेव्हा माता लक्ष्मीने धन वाटून देण्यासाठी कुबेराला या धनाच्या भांडाराचा व्यवस्थापक म्हणून नेमलं.

कुबेराची वृत्ती कंजूषपणाची होती. तो धन वाटण्यापेक्षा केवळ त्याचं रक्षण तेवढं करू लागला!

इकडे माता लक्ष्मी त्रासून गेली! तिच्या भक्तांना लक्ष्मीचं धन प्राप्त होत नव्हतं. धनाच्या रूपानं त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होत नव्हती!

लक्ष्मीनं आपलं गाऱ्हाणं भगवान श्री विष्णूंसमोर मांडलं! भगवान विष्णु लक्ष्मीला म्हणाले, “तू कुबेराच्या जागी रक्षक म्हणून दुसऱ्या कुणाचीतरी नेमणूक कर!”

लक्ष्मी म्हणाली, “यक्षराज कुबेर माझा परम भक्त आहे! त्याला वाईट वाटेल!”

तेव्हा भगवान विष्णुंनी लक्ष्मीला सांगितलं तू श्री गणपतीच्या दीर्घ आणि विशाल बुद्धीचा त्यासाठी वापर कर!

मग लक्ष्मीनं श्री गणपतीला सांगितलं की “कुबेर धनभांडारातील धनाच्या रक्षणाचं कार्य करील आणि तू धनाच्या भांडारातलं धन भक्तांना वाटून द्यायचं काम करावंस!”

श्री गणपती तर महा बुद्धिमान! तो म्हणाला, “देवी, मी ज्याचं नाव तुला सांगेन त्याच्यावर तू कृपा कर! त्यासाठी तू मला विरोध करायचा नाहीस!”

लक्ष्मीनं गणपतीची ही मागणी मान्य केली!

तेव्हापासून श्री गणेश लोकांच्या भाग्यातील विघ्न / अडचणी यांचं निवारण करण्यासाठी त्यांच्यासाठी धनभंडाराचे दार उघडू लागले! कुबेराकडे केवळ धन-भंडारावर पहारा करण्याचंच काम शिल्लक राहिलं.

गणपतीची उदार बुद्धी बघून, लक्ष्मीनं आपला मानसपुत्र असलेला गणेश याला अशी विनंती केली की ज्या ठिकाणी ती आपला पती श्री विष्णू यांचेसोबत नसेल तेव्हा पुत्रवत असलेला श्री गणेश तिच्या सोबत असेल!

दीपावलीत लक्ष्मीपूजन असतं कार्तिक अमावस्येला! भगवान विष्णू त्या समयी योगनिद्रेत असतात! या दिवसाच्या नंतर अकरा दिवसांनी श्री विष्णू प्रबोधिनी एकादशीला निद्रेतून जागे होतात!

लक्ष्मीला नेमकं याच काळादरम्यान पृथ्वीभ्रमण करण्यासाठी म्हणजेच शरद पौर्णिमा ते दीपावली या काळात यायचं असतं. आणि या काळात श्रीविष्णू सोबत नसल्यानं ती गणेशाला आपल्या सोबत घेऊन येते. म्हणूनच दीपावलीला लक्ष्मी-गणेश यांची पूजा केली जाते!

(पहा कसा विरोधाभास आहे की या देशातला आणि हिंदूंचा सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळी ह्या सणाबद्दल पाठ्यपुस्तकात कुठलीही विस्तृत माहिती आढळून येत नाही आणि जी काही माहिती आहे तीही अत्यंत त्रोटक स्वरूपात आहे!)

व्हाट्स ॲप साभार –

लेखक : श्री.अप्पा पाध्ये गोळवलकर

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ पावसाचे स्वरविश्व ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? क्षण सृजनाचे ?

💦 भाऊबीज 💦 ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

    कुठे गेला अवचित

   भाऊ राया दूरवर…

    राहिली ना भाऊबीज

   असे मनी हुरहुर…|

 

     कसे आता सांगू कुणा

  दुःख मनातले माझ्या…

    विस्कटल्या वाटा साऱ्या

   माहेरच्या तुझ्याविना…|

 

    परतीच्या तुझ्या वाटा

     अशा – कशा हरवल्या….

     आशेच्या साऱ्याच लाटा

      विरुनिया आता गेल्या…|

 

     नको जाऊ विसरून

     बहिण -भावाचे नाते….

      तुझे – माझे बालपण

       अजूनही खुणावते…|

– शुभदा भास्कर कुलकर्णी

माझा पाठचा भाऊ शशिधर माझ्यापेक्षा आठवर्षाने लहान असल्याने त्याला लहानपणी सांभाळून घेणं ही मला माझी जबाबदारी वाटायची. आम्ही मोठे होत गेलो तसा तो माझा मित्र, खेळातला सवंगडी होत गेला. आम्हा दोघांच नात दृढ, घट्ट होत गेलं. माझ्या लग्नानंतर, त्याच्याही लग्नानंतर आमच नातं थोडही सैल झालं नाही. आमची सुख-दु:ख आम्ही वाटून घेतली. आधार दिला. मी त्यावेळी भाऊबीजेला इथे नव्हते. दुसरे दिवशी येणार,असल्याने  सर्व भावंडानी माझ्याकडे नंतर भाऊबीज करायची ठरले. पण… शशीच्या अचानक जाण्याने मनं सुन्न, बधिरस झालं. भाऊबीज राहून गेल्याची हुरहूर आजही आहे. ते माझं दु:ख मी त्यावेळी नकळत कागदावर मोकळ करायचा प्रयत्न केला. अन् थोडं हलकं वाटलं. आज भाऊबीज, माझ्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचल्या असतील का?.. 😢

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणीतला क्षण… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ आठवणीतला क्षण… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

तो फेब्रुवारी महिना होता. बाहेर उन मी मी म्हणत होते. आम्ही गावी चाललो होतो. अन्शीच्या घाटातून गाडी वळणे घेत जात होती. शिशिराचे आगमण झाल्यामुळे पानगळ चालू होती. झाडांची पाने गळून झाडे नुसत्याच फांद्याबरोबर झुलत होती. येरवी गर्दहिरव्या घनदाट झाडीतून न दिसणारी घरे तुरळक दिसत होती. भोवताली गर्द झाडी आणि कुठेतरी ओहळातून शेतीसाठी तयार केलेले वाफे नजरेस पडत होते.  पहावे तिकडे घनदाट जंगल ,उंच डोंगर ,  कुठेतरी उतारावर दिसणारे चार घरांचे खेडे. उदरनिर्वाहासाठी केलेली भातशेतीची छोटी छोटी

वाफाडी .मुख्य रस्त्यावरून आत जंगलात  पायवाट जाताना दिसली की, लक्षात येते तिथे लोकवस्ती असेल. मनात विचार आला इतक्या प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेऊन कसे रहात असतील इथले लोक ?

गायींचे कळप रस्त्याच्या कडेने धुळ हुंगताना दिसत होते. त्यांच्या मागे कुणी राखणदार दिसत नव्हता.घनदाट झाडीतून पाखरांचे विविध आवाज कानावर पडत होते. आमची गाडी घाटातून वर आली तेंव्हा रस्त्याच्या कडेला एक चौदा-पंधरा वर्षाची मुलगी हातात रानफुलांचा हार घेऊन उभी दिसली.आम्ही गाडी थांबवताच तिचा चेहरा आनंदानी खुलला .तीने गाडी जवळ येऊन हातातील हार घेण्यास आम्हाला विनवू लागली. इतक्या रखरख उन्हात ती हार विकण्यास उभी होती. मला तिचे कौतुक वाटले. म्हणावे असे चांगले कपडे अंगावर नव्हतेच. तिच्या कपड्यावरून तिची गरिबी जाणवत होती.

हार पुढे करून ती आम्हाला विनवू लागली,” दहा रूपयाला हाय!घ्या यकच राहिलाया “.

मी तिला विचारले ,” इथे घर तर दिसत नाही. तू कुठे रहातेस?”.

तिने झाडीतून दुर बोट दाखवत एक घर दाखविले आणि स्मितहास्य करत म्हणाली  “तिथं “.

नंतर मी विचारले, “हा हार कुणी गुंफला “.

तीने लगेच सांगितले  ,मी फुलं आणून दिली. आणि आजीनं हार बनवला. मी शाळेत जायाच्या आधी फुलं आणून ठेवती.आजी हार बनवून देती . शाळेतनं आल्यावर रोजच मी हार इकायला इथं उभी रहाती .आईला तेवढीच मदत ह्युती खर्चाला “

ती मोठ्या धैर्याने बोलत होती. ती पुन्हा कविलवाणी होऊन आम्हाला आम्हाला हार घेण्यास विनवू लागली.मी तिला विस रूपये देवून  तिच्या कडून हार घेतला.  लगेच ती दहा रूपये परत करू लागते मी म्हटले  “राहुंदे ठेव तूला”.

पैसे पाहून तिचा चेहरा आनंदात उजळतो. ती खूप आनंदी होते.

आम्ही पुढे निघून गेलो. पण त्या मुलीचा गोड, आनंदी चेहरा कितीतरी वेळ नजरेत रेंगाळत राहिला. लोक रोज हजारानी पैसे कमावतात पण समाधानी नसतात. तो हार विकून विस रूपये मिळताच तिचा चेहरा आनंदानी फुलून गेला.  उन्हातान्हाचे ,घनदाट जंगलातून गेलेल्या रस्त्यावर हार विकून मिळालेल्या दहा-विस रूपयांचे पण केवढे  ते समाधान ! केवढा आनंद! .आपण किती पैसे कमावले तरी आपला हव्यास संपत नाही. त्या निरागस , गरीब ,  कोवळ्या वयातील  मुलीला आपली आजची गरज भागली या कल्पनेनेच किती आनंद झाला.  खरा आनंद हाच असेल का ?आपल्या मुलांना आपण किती  खाऊ   महागाची खेळणी आणून दिले , तरीपण त्यांच्या मागण्या बंद होत नाहीत . वाढत्या वयासोबत त्यांच्या मागण्या सुध्दा वाढत जातात. पण प्रतिकूल परिस्थितीतून मिळालेले दहा-विस रूपये पण किती आनंद देतात हे त्या मूलीकडे पाहून कळले.

आम्ही घरी पोहचेपर्यंत तो  रान फुलांचा हार सुकून गेला . पण त्या मुलीच्या चेहर्‍यावरचा आनंद तसाच ताजाटवटवीत राहून कितीतरी दिवस मनात रेंगाळत

राहीला आणि त्या रानफुलांचा गंध मनाला सुखावत राहिला.

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares