मधु मागशी माझ्या सख्यापरी, जन पळभर म्हणतील हाय हाय, नववधू प्रिया मी बावरते, कशी काळ नागिणी, तिन्ही सांजा सखे मिळाल्या… यासारख्या एकाहून एक सरस भावकवितांचे जन्मदाते राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांचा आज जन्मदिवस. मध्य भारतातील (म.प्र.) ग्वाल्हेर जवळील मुगावली येथे 1873 मध्ये त्यांचा जन्म झाला. अर्वाचीन मराठी कवींपैकी एक महत्त्वाचे कवी. आपल्या आयुष्यात त्यांनी युवराजशिक्षक, दिवाण, पोलीस सुपरिंटेंडंट, सरकारी वकील, न्यायाधीश अशा विविध पदांवर काम केले असले तरी त्यांचा पिंड हा कविमनाचा होता. तो त्यांनी आयुष्यभर जपला. हिंदी आणि उर्दू काव्य, गझल यांचा अभ्यास आणि शास्त्रशुद्ध वैदिक शिक्षण याचा त्यांना मराठी काव्यरचनेत खूप उपयोग झाला. शिवाय टेनिसन, ब्राउनिंग यासारखे पाश्चात्य कवी, जयदेव यांचे संस्कृत काव्य, रवींद्रनाथ टागोर यांचे साहित्य या सर्वांमुळे त्यांची कविता समृद्ध होत गेली. त्यांची कविता ही संदेश देणारी किंवा प्रचारात्मक नव्हे तर ती विशुद्ध आनंद देणारी भावकविता आहे. गेयता लाभलेली त्यांची कविता म्हणूनच गीतात रुपांतरीत झाली आणि मराठी माणसाच्या ओठावर जाऊन बसली. त्यांच्या कवितेतून त्यांच्या तृप्त, समाधानी जीवनाचे दर्शन घडते. सौंदर्यवादी दृष्टीकोनाबरोबरच परमेश्वरावरील श्रद्धा ही त्यांच्या सात्विक काव्य निर्मितीचे मुख्य गमक आहे.
त्यांचा पहिला कविता संग्रह 1920 ला प्रकाशित झाला. नंतर 1935 मध्ये समग्र तांबे कविता प्रसिद्ध झाली. त्यात 225 हून अधिक कवितांचा समावेश आहे. त्यांनी काव्यविषयक गद्य लेखनही विपुल प्रमाणात केले आहे.रविकिरण मंडळातील कवींवर त्यांच्या साहित्याची छाप पडली होती.1926 साली मध्य भारतीय कवी संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच 1932 मध्ये कोल्हापूर येथे साहित्य संमेलनांतर्गत कवी संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1937 साली ग्वाल्हेर संस्थानने त्यांना राजकवी हा सन्मान दिला. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या नावाने अनेक पुरस्कार ठेवले आहेत. तसेच त्यांनाही सन्मानित करण्यात आले आहे. या काव्यभास्कराचे ग्वाल्हेर येथे 1941 मध्ये निधन झाले.
भास्कर रामचंद्र भागवत आणि श्रीधर कृष्ण शनवारे या दोन ज्येष्ठ साहित्यिकांचा आज स्मृतीदिन.
भास्कर रामचंद्र भागवत हे प्रामुख्याने बाल साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध साहित्यिक. त्यांनी अर्थ शास्त्रातील पदवी संपादन केली होती.परंतू त्यांना सुरूवातीपासूनच इंग्रजी साहित्य व विज्ञान अभ्यासाची विशेष आवड होती.तसेच त्यांनी काही काळासाठी पत्रकारिताही केली. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रात मराठी अनुवादक म्हणून काम केले. स्वातंत्र्य चळवळीतीही त्यांचा सहभाग होता. ‘खेळगडी’ या मासिकाचे संपादनही त्यांनी केले होते.
वैतागवनातील वाफाटे हे त्यांचे विनोदी लेखन, फास्टर फेणे या मध्यवर्ती पात्राभोवती गुंफलेले कथानक, साहसकथांचा अनुवाद, किशोरवीन मुलांसाठी अद्भूतरम्य कादंबरी लेखन त्यांनी केले. खजिन्याचा शोध, तुटक्या कानाचे रहस्य, भुताळी जहाज, साखरसोंड्या, जंगलबुकातील दंगल यासारखे अनेक बाल कुमार प्रिय साहित्य त्यांनी लिहिले. 1975च्या बाल कमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. या शिवाय ते नाट्य अभ्यासक व नाट्य समीक्षक ही होते. त्यानी मराठी नाट्यकोशाचे लेखन संपादनही केले. अशा या थोर साहित्यिकाचे निधन 27 /10/2001 ला झाले.
श्रीधर कृष्ण शनवारे हे विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिक.त्यांनी धनवटे महाविद्यालयात 35 वर्षे अध्यापन केले. या संपूर्ण कालावधीत व अक्षरशः शेवटपर्यंत त्यानी लेखन, काव्यलेखन केले.त्यांचे लेखन विविधांगी आहे. नऊ काव्य संग्रह व समीक्षा, अनुवादात्मक सोळा पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.’अतूट’ हे नाटक त्यांनी मूळ बंगाली साहित्यकृताीवरून लिहिले। उन्ह उतरणी, आतून बंद बेट, थांग अथांग, तळे संध्याकाळचे, तीन ओळींची कविता, सखा हे त्यांचे काही काव्यसंग्रह.राक्षसाचे वाडे हे बालसाहित्य, कथाकार वामन चोरघडे समीक्षाग्रंथ, कोलंबसाची इंडिया व पायावर चक्र ही प्रवास वर्णने, थेंब थेंब चिंतन हे चिंतनात्मक अशी समृद्ध साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे.उन्हं उतरणी याला केशवसुत पुरस्कार व थांग अथांग ला कुसुमाग्रज पुरस्कार प्राप्त झाला आहे.तर आतून बंद बेट हा काव्यसंग्रह नागपूर विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी लावण्यात आला होता.
‘जातो माघारा’ हा कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर असतानाच त्यांचे दि 27/10/2013 ला दुःखद निधन झाले.
अशा या ज्येष्ठ साहित्यिकांना ही शब्दवंदना !
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :- विकिपीडिआ साभार.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
रोज गडबडीने ग्राउंडवर फेऱ्या मारून घरी येऊन कामाला लागणारी मी रविवार असल्याने फेऱ्या मारून झाल्यावर ग्राउंडवरच एका बाकावर बसले.इकडं तिकडं बघितलं. ओळखीचं कुणी दिसलं नाही तसं सभोवताली बघू लागले आणि एका झाडाने माझे लक्ष वेधले.
सरळसोट वाढलेले ते सुरुचे झाड होते.त्याच्याकडं बघताना मनात विचार आले.आपल्या विस्ताराचा पसारा न वाढविता, आजूबाजूला न बघणाऱ्या या झाडाने आकाशाकडंच झेप घेतली की,
त्याची ही वृत्ती मला फार आवडली.ना फांद्यांचे अवडंबर ना फुलांचा मायापाश, सोस!स्वतंत्र जगण्याची ओढ असलेलातो वृक्ष मला एखाद्या व्रतस्थासारखा वाटला.
शाळेत मुलांना शिकविलेला सूचीपर्णी वृक्षांचा प्रदेश आठवला. बर्फाळ प्रदेशात आपल्या टोकदार पानांनी अंगावरचे बर्फ झटकणारा तो सुरे आणि आकाशात झेप घेणारा हा सुरु.एकमेकांचे भाऊबंदच दुसऱ्यात न अडकणारे !
त्या सुरूची मी माझ्याशी तुलना करु लागले. आपल्याला गोतावळा गोळा करण्याची हौस !त्यात अडकलेल्या मायापाशात बऱ्याचवेळा आपल्या ध्येयाचाही आपल्याला विसर पडतो. ज्याची गरज नसते त्यात गुंतून पडतो.अहंकार, स्वार्थ जोपासतो.
‘कसला विचार करतेस?’
माझं मन मला म्हणालं, मन नव्हे तो सुरुच माझ्याशी बोलला.तशी मी सावध झाले.
‘जमेल कां आपल्याला सुरुसारखे जगणे?सोडता येईल कां मायापाश?तोडता येतील कां स्वार्थाच्या फांद्या?’
खांद्यावर असलेल्या पर्समधील मोबाईल वाजला.नाईलाजाने हातात घेतला.मुलाचा फोन होता.पटकन उठले.
एखादा दिवस असा उजाडतो की,त्या दिवशीचा प्रत्येक क्षण दडपणाखाली असतो फार उदास निराश,चिंतातुर व्हायला होतं.स्वत:वरचा विश्वास उडून जातो.काहीतरी चूक करतोय् असं वाटत रहातं!
कारण नसताना आयुष्यात फार धोका तर नाही ना पत्करला? त्यापेक्षा एखादं सुरक्षित साचेबंद आयुष्य जगणं बरं… स्वत:बद्दलच्या कल्पना नको.निराळ्यावाटा नकोत. काहीतरी टिकवताना मनाची फसवणुक करतोय् का! कशासाठी? काय मिळवण्यासाठी?..
मोनानं रात्रभर झोपू दिलं नाही.सर्दी ,हलका ताप..
रात्रभर बेचैन होती..सकाळी सकाळी तिला झोप लागली.
पण माझा दिवस उगवला होता.त्यातून शेखरला लवकर जायचं होतं.त्याचा लाईन आउट होता.म्हणजे सबंध दिवस त्याचा साईटवर जाणार.मोनाला आज डे केअर मधे पाठवता येणार नाही. मलाही आज रजा घेणं शक्य नव्हतं.घरुनही काम करता येणार नाही.आमच्या कंपनीच नवीन प्राॅडक्ट लाँच होणार होतं. प्रेझेंटेशन माझंच होतं…
शेखरला विचारलं, “तुला आज गेलच पाहिजे कां?”
“अर्थातच!”त्याचं उत्तर.
मनात येतं,कधीतरी याने त्याच्या मीटींग्ज, अपाॅईन्टमेन्ट्स जुळवून घ्याव्यात की..माझंही रजांचं वेळापत्रक बघावं लागतं.अजुन वर्ष संपायला वेळ आहे.
शेखरची तयारी भराभर करुन दिली.तो गेला.
क्षणभर वाटलं..’मी कमावते..खरं म्हणजे शेखरपेक्षा थोडं जास्तच..मला कंपनीत मान आहे.माझ्या शिक्षणाचं करीअरचं चीज होतंय या सर्वांचं महत्व कोणाला आहे?
शेखर तर नेहमीच म्हणतो, “सोडुन दे नोकरी…”
माझ्या धडपडीचा .स्वत्व टिकवण्याचा संसाराला काहीच उपयोग नाही का?हे जे राहणीमान सांभाळलय त्यात माझ्या कर्तृत्वाचा काहीच वाटा नाही का? ही जाणीव त्याला आहे का? असेलही .पण कबुली नाही. ईगो..
प्रेस्टीज ईश्शु…मला मात्र सारखं अपराधी वाटत..प्रचंड गील्ट येतो कधीकधी….
साराला सवयीनं सगळं माहीत झालंय् .मोनाला घरी ठेवायचं असलं की मी तिला बोलावते.ती करतेही
व्यवस्थित..तरीही धाकधुक .साशंक मन…
आॅफीसमधे जायला निघताना सारा म्हणालीही..
“नका काळजी करा ताई .निवांत जावा..मि हाय ना…”
साराच्या या बोलानं कितीतरी धीर मिळाला.
तसा मोनाचा त्रास नसतोच.खूप शहाणी गुणी आहे ती. पण तिचं शहाणपणच मला हळवं करत.माझ्या मागे तिच्या वाटेला येणारं हे काही तासांचं विलगीकरण…ती दिवसभर मजेत असते.खेळते बागडते कारण ती अजाण आहे…तिच्या भावनांना अजुन आकार नाही आलाय्…
आफीसमधे पोचेपर्यंत विचारांची साखळी तुटली नाही….
भाग २
पपांची मेल आली होती.आजीच्या तब्येती विषयी लिहीलं होतं.रजा मिळाली तर येउन जा एखादा अठवडा..तिलाही बरं वाटेल..वर्ष उलटलं तू आली नाहीस..
आधीचं दडपण या मेलनं आणखी वाढलं. जाॅब नसता तर भुर्रकन् उडुन जाउन आजीला भेटुन आले असते…
ऊगीच मोठे झालो. बंधनं वाढली अन् माया दूर गेली.जवळची माणसं दूर गेली.त्यांचा सहवास मिळत नाही…त्यातून व्हीसाचे प्राॅब्लेम्स.वेळ मिळाल्यावर पपांना सविस्तर मेल लिहायचं ठरवलं..
“माझं छान चाललंय्..मोनाही रुटीनशी अॅड्जस्ट झाली आहे.मला लवकरच वरची पोस्ट मिळेल.मागच्या रविवारीच एका सोशल कँपच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली..इथल्या ईमीग्रन्ट्सच्या बर्याच समस्या आहेत.दिसतं तसं, वाटतं तसं, काहीच नाही…दुरून डोंगर साजरे..”पपा खूश होतील मेल वाचून.
प्रेझेंटेशन छान झालं. खूप अभिनंदन.खूप प्रशंसा.!!
थोडं रिकामपण मिळालं.
पुन्हा मनातला कोवळा कोंब हलकेच उघडला. वाटलं इतका वेळ यांत्रिकपणे काम केलं’जणू मी म्हणजे एकच व्यक्ती नव्हते.दोन वेगळ्या व्यक्ति एकाच ठिकाणी एकत्र आल्यासारख्या होत्या.त्यातली एक निरंतर चिंतातुर. सतत टेन्स्. विचारमग्न. आत्मविश्वास हरवलेली. काय चूक काय बरोबर काहीच न समजु शकणारी..
पण दुसर्या व्यक्तीने त्या व्यक्तीलवर वर्चस्व गाजवलं होतं. ती तेजस्वी होती, निराळी होती. स्वत:ची ओळख टिकवणारी..आत्मनिर्भर….
उठले. पटकन घरचा नंबर फिरवला.काही वेळ रिंग वाजली पण फोन ऊचलला गेला नाही. तोपर्यंत मनात हजार शंका…पण पलिकडुन फोन उचलला गेला आणि मी लगेच म्हणाले, “मी बोलतेय्..”
मोनाच्या रडण्याचा आवाज येत होता.पुन्हा कालवाकालव!!!
“मोना कां रडते?”
“आत्ता झोपेतुन उठली”
“भात खाल्ला?”
“हो”
“औषध दिलंस?”
“हो”
“आणि चाॅकलेट मिल्क?”
“सगळं नाही संपवलं…”
बरं. संध्याकाळी तिला वाॅश दे आणि कम्युनाटी पार्क मधे घेउन जा….”मला जरा उशीर होईल.
जरा टेन्शन दूर झाल्यासारखं वाटलं.पण तगमग होतीच.
कदाचित ही तगमग आयुष्यभर राहील. जणु माझा अतुट घटक असल्यासारखी.खरं म्हणजे शेखर जेव्हां म्हणतो “जाॅब सोड..”तेव्हां वाटतही द्यावा सोडून.लाईफ पीसफुल होईल.पण नाही..स्वत:लाच हरवुन बसल्याची एक भलीमोठी रूखरूख कायम राहून जाईल.म्हणजे कुठलीतरी एक शांती मिळवण्यासाठी दुसरीकडे अशांत रहायचं.साराच विरोधाभास.यातूनच सीझन्ड व्हायचं..
संध्याकाळच्या मीटींगला हजर राहण्याची मुळीच इच्छा नव्हती. वाटलं सांगून द्यावं, “माझी मुलगी आजारी आहे, मला नाही थांबता येणार…”पण सगळीकडे बरोबरी करायची.समान हक्कासाठी भांडायचं.आणि मग अपरिहार्य कारणाचं पांघरुण पसरुन सवलत मागायची हे बरोबर नाही….
(एकाच मंदिरात दोन गणपती असणारं, भारतातील एकमेव “श्री क्षेत्र पद्मालय”:)
देवदेवतांचा पौराणिक वारसा लाभलेले आणि ३१३७ ईसापूर्व महाभारत काळातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले, खान्देशातील श्री क्षेत्र पद्मालय, म्हणजे संपूर्ण भारतातील श्री गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. श्री. क्षेत्र पद्मालय हे डोंगर माथ्यावर वसलेले आहे. एरंडोलहून पद्मालयला जातांना एक छोटा घाटच चढावा लागतो. श्री क्षेत्र पद्मालय, हे श्री गणेशांच्या साडेतीन पीठांपैकी एक पूर्णपीठ म्हणून ओळखले जाते. महाभारतातील भीम-बकासूराचे द्वंद्व, पद्मालय येथेच झाल्याचे सांगतात.
जगात कोणत्याही गणपती मंदिरात गेल्यास, गणपतीची एकच मूर्ती पाहावयास मिळते. मात्र, श्री क्षेत्र पद्मालय येथे, एकाच छत्राखाली, एकाच सिंहासनावर, गणरायाच्या दोन मुर्त्या दृष्टीस पडतात, त्यात एक मूर्ती उजव्या सोंडेची व दुसरी मूर्ती डाव्या सोंडेची आहे. दोन्ही स्वयंभू प्रवाळ गणेश आहेत. ते कसे प्रकट झाले याचे वर्णन श्रीगणेश पुराणातील उपासना खंडातील ७३, ७४, ९० व ९१, या अध्यायांत मिळतो. रिध्दिसिध्दी प्राप्त करुन देणारे हे भारतातील, एकमेव श्री गणेशाचं जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
महाभारतात पांडवांवर, जेव्हा अज्ञातवासात राहण्याचा प्रसंग आला, तेव्हा ते एकचक्रानगरीत राहिले होते. ती एकचक्रानगरी म्हणजेच आजचे एरंडोल. त्या काळी, एकचक्रानगरी भोवताली घनदाट जंगल होते. तेथे बकासूर नावाचा राक्षस रहायचा. त्याची भोजनाची व्यवस्था गावकरी करायचे. त्याला रोज गाडीभर अन्न आणि एकमाणूस खायला लागायचा. पांडव ज्या ब्राम्हणाकडे रहात, त्याची पाळी आल्यावर, त्याच्या ऐवजी भीम जंगलात अन्न घेवून गेला. व त्याने बकासूराचा वध केला. त्या नंतर त्याला तहान लागली. त्या जंगलात, त्याने आपल्या हाताच्या कोपराने जमिनीवर प्रहार केला. तेथे मोठ्ठा खड्डा पडला व त्यातून पाणी निघाले. भीमाने त्या पाण्याने आपली तहान भागवली. तेच भीमकुंड. जे आजही पद्मालयला बघायला मिळते. पूर्वी या कुंडात एका खाटेची दोरी बुडेल, इतके ते खोल होते, असं सांगतात. आता ते गाळाने भरुन गेले आहे. एरंडोलला, पांडवांचा वाडा अजूनही बघायला मिळतो. येथून धरणगावहून पद्मालयला जायला भुयार होते असे सांगितले जाते. धरणगांवी दत्त टेकडीवर या भुयाराचं मुख बघायला मिळते, ज्यातून घोड्यावर बसून प्रवास करता येत होता, असं जुनेजाणते सांगतात. हाच तो पद्मालय आणि धरणगावातला अदृष्य बंध. म्हणून आम्हा धरणगावकरांनाही ते वैभवच वाटते. पूर्वी धरणगाव हे एरंडोल तालुक्यातच होते. आता विभाजन झाल्याने धरणगाव स्वतंत्र तालुका झाला आहे.
पौराणिक कथेनुसार राजराजेश्वर सहस्त्रार्जुन याने केलेल्या जप-उपासनेवर प्रसन्न होवून, येथेच त्याला उजव्या सोंडेच्या स्वरूपाने “श्री” नी दर्शन दिले. तर, शेषनागाला शंकर भगवंतांनी टाकून दिले होते. तेव्हा, श्री शंकरांनी पुन्हा त्याला गळ्यात धारण करावे, यासाठी शेषाने “श्रींची” तपश्चर्या केली. त्याला डाव्या सोंडेच्या स्वरूपात श्रींनी तलावातून दर्शन दिले. अशी आख्यायिका पुराणात आहे. म्हणून या ठिकाणी एकाच मंदिरात श्रींची दोन मनभावन रुपं प्रवाळ स्वरुपात अनुभवता येतात.
मंदिरासमोर असलेल्या विस्तीर्ण तलावात सदैव कमळाची फुले फुलतात. यावरून या क्षेत्राला पद्मालय असे नाव पडले आहे. पद्म म्हणजे कमळ आणि आलय म्हणजे निवास. कमळाचे निवासस्थान म्हणजे पद्मालय. हे संपूर्ण क्षेत्र पूर्वीच्या काळी घनदाट आरण्य होते. वनौषधींनी नटलेले, निसर्ग संपदेने परिपूर्ण आणि जंगली प्राणी, श्वापदांनी समृध्द होते. ज्याच्या खाणाखुणा आजही अनुभवता येतात.
श्री क्षेत्र पद्मालय येथील गणपती मंदिराची रचना ही हेमाडपंथी असून बनारस येथील काशी विश्वेश्वराच्या जुन्या मंदिराची ती प्रतिकृती असल्याचे सांगितले जाते. संत गोविंद महाराजांनी १८२५ मध्ये या देवालयाचा जिर्णोद्धार केला आहे. ते अजानबाहू, सिध्द पुरुष होते. त्यांना श्री गजाननांनीच स्मरणसाधनेत दर्शन देवून, आदेश दिल्याने ते येथे आले. या मंदिराचा शोध घेतला आणि जिर्णोद्धार केला. त्यासाठी त्यांनी भडगाव येथील खाणीतील दगड वापरल्याचा उल्लेख जुन्या दस्तऐवजात मिळतो. देवालयात मूर्ती समोर मोठा सभामंडप असून, प्रवेश करताना साडेचार फुट उंचीचा दगडाचा एक मोठा उंदीर पाहण्यास मिळतो. देवालयासमोर मोठा दगडी घाट बांधला आहे.
या ठिकाणी एक मोठी पंचधातू मिश्रित अशी, सुमारे अकरा मणाची, ४४० किलोची घंटा बांधण्यात आली आहे. ही घंटा १८२६ मध्ये श्री क्षेत्र काशीविश्वेश्वर येथील, ठठेरी बाजारातील देवीदयाळ या कारागिराने बनवली आहे–जिचे त्या काळातील मुल्य ११००/-रु होते. जी वाजवली, तर तिचा आवाज एकचक्रानगरी म्हणजे, आजचे एरंडोल पर्यंत ऐकू येत असे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या उंबऱ्यावर अनलासुराचे शिर आहे. हा अनलासूर मुखातून अग्नीवर्षाव करत असे. त्याने तिन्ही लोकांवर विजय मिळविला होता. त्याचा उपद्रव वाढल्याने, त्याला बालगणेशाने गिळंकृत करुन संपविले. गिळंकृत केल्यावर, गणेशाच्या पोटात जो दाह झाला, तो शमविण्यासाठी श्री गणेशाला, २१ ऋषींनी २१ दूर्वा वाहिल्याची अख्यायिका आहे.
धरणगाव येथून (२२ किमी) जळगाववरुन (३० किमी) व एरंडोल येथून (११ किमी) वर असलेल्या पद्मालय येथे जाण्यासाठी बस सेवा सुरू आहे.
संग्राहक : सुहास सोहोनी
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १४ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ भूतान – सौंदर्याची सुरेल तान – भाग २ ✈️
पुनाखा व्हॅली इथे जाताना दहा हजार फूट उंचीवरील दो_चुला पास (खिंड ) इथे उतरलो. इथले चार्टेन मेमोरियल म्हणजे छोटे गोलाकार १०८ स्तूप सैनिकांचे स्मारक म्हणून उभारलेले आहेत. इथून हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांचे नयनमनोहर दर्शन होते. पुढे घाटातून उतरत जाणारा वळणावळणांचा रस्ता लागला. छोट्या छोट्या घरांचे पुंजके दरीभर विखुरलेले आहेत. पुनाखा ही १६३७ पासून १९३७ पर्यंत म्हणजे अडीचशे वर्षाहून अधिक काळ भूतानची राजधानी होती.फोचू आणि मोचू या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले हे सुरम्य स्थान आहे. इथे मोनेस्ट्री व त्याला जोडून लाकडी बांधणीचा कलाकुसरीने सजलेला देखणा राजवाडा आहे. अजूनही राजघराण्यातील विवाह इथे संपन्न होतात. इथली थांका म्हणजे रेशमी कापडावर धार्मिक रीतिरिवाजांचे चित्रण करणारी चित्रे अजूनही आपले रंग टिकवून आहेत. जपान, कोरिया, बँकॉक अशा अनेक देशातील प्रवासी बुद्ध दर्शनासाठी आले होते. छोटी मुले भिक्षू वेष परिधान करून बौद्ध धर्माचे शिक्षण घेत होती. नद्यांच्या संगमावर कलापूर्ण लाकडी पूल उभारला आहे.
पुनाखाहून पारो व्हॅलीला जाताना वाटेत अनेक ठिकाणी संत्री, लाल सोनेरी सफरचंद आणि याकचे चीज विक्रीला होते. या पारो व्हॅलीमध्ये भाताचे उत्तम पीक येते. जोरदार पावसाला सुरूवात झाली होती. उंचावरील हॉटेलच्या पायऱ्या चढून गेलो. गरम- गरम जेवण मिळाले. सकाळी एका पक्ष्याच्या मधुर आवाजाने जाग आली. हिरवागार कोट आणि बर्फाची हॅट घातलेली पर्वत शिखरे कोवळ्या उन्हात चमकत होती. आवरून पारो एअरपोर्ट पॉईंटवर पोचलो. आम्ही उभे होतो त्या उंच कड्यावरून संपूर्ण एअरपोर्ट दिसत होता. कड्याखाली पारो-चू नदी खळाळत वाहत होती. नदीकाठाला समांतर सिमेंट कॉंक्रिटचा दहा फूट रुंद रस्ता होता. त्याला लागून असलेल्या हिरवळीच्या लांबट पट्ट्यावर एअरपोर्ट ऑफिसच्या दोन लहान इमारती होत्या. त्यांच्या पुढ्यात छोटासा रनवे. पलीकडील हिरव्या लांबट पट्ट्यावर असलेल्या दोन- तीन छोट्या इमारती, त्यांच्यामागच्या डोंगर उतरणीला टेकून उभ्या होत्या.
‘वो देखो, आ गया, आऽऽगया’ ड्रायव्हरने दाखविलेल्या दिशेने आमच्या नजरा वळल्या. उजवीकडील दोन डोंगरांच्या फटीतून प्रखर प्रकाशझोत टाकीत एक विमान एखाद्या पंख पसरलेल्या परीसारखे अवतीर्ण झाले आणि एका मिनिटात डावीकडील दोन डोंगरांच्या फटीत अदृश्य झाले. आश्चर्याने डोळे विस्फारलेले असतानाच, यू टर्न घेऊन ते विमान माघारी आले आणि पारो एअरपोर्टच्या छोट्याशा धावपट्टीवर अलगद टेकले. घरंगळत थोडेसे पुढे जाऊन विसावले. उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून आम्ही वैमानिकाच्या कौशल्याला दाद दिली. चारी बाजूंच्या हिरव्या- निळ्या डोंगररांगांच्या तळाशी विमान उतरले तेव्हा एखाद्या हिरव्या कमळावर पांढरेशुभ्र फुलपाखरू पंखावरील, पोटावरील लाल काळे ठिपके मिरवत डौलदारपणे बसल्यासारखे वाटले.
पारोच्या खोल दरीतील हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आशियातील सर्वात लहान विमानतळ आहे. प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने हा विमानतळ सर्व जगात आव्हानात्मक समजला जातो. एकच छोटा रनवे असलेल्या या विमानतळावर ‘ड्रक एअर’ या भूतानच्या मालकीच्या विमानकंपनीची दिवसभरात फक्त तीन ते चार विमाने बँकॉक, नेपाळ, कलकत्ता, मुंबई इथून येतात. सर्व उड्डाणे दिवसाउजेडीच करण्याचा नियम आहे. एअरपोर्ट ऑफिस दुपारी तीनला बंद होते. या विमानांचे पायलट विशेष प्रशिक्षित असतात. जवळजवळ आठ हजार फूट उंचीवर हा विमानतळ आहे. अठरा हजार फूट उंच पर्वतरांगातून विमान अलगद बाहेर काढून ते डोंगरांच्या तळाशी १९८० मीटर्स एवढ्याच लांबीच्या रनवेवर उतरविणे आणि तिथून उड्डाण करणे हे निःसंशय बुद्धीकौशल्याचं, धाडसाचं काम आहे.जगभरातील फक्त आठ-दहा पायलट्सना इथे विमान चालविण्याचा परवाना आहे. वर्षभरात साधारण तीस हजार प्रवाशांची वाहतूक होते आणि अर्थातच या सेक्टरचे विमान तिकिटही या साऱ्याला साजेसे महाग असते.
एक चित्तथरारक घटना चक्षूर्वैसत्यम अनुभवून आम्ही गाडीत बसण्यासाठी वळलो. विमान उतरत असतानाच रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. तसा तो काल संध्याकाळपासून थांबून थांबून पडतच होता. पावसामुळे बोचरी थंडी वाढली होती. डोळे भरून समोरचे दृश्य मनात, कॅमेऱ्यात साठवून आम्ही गाडीत बसणार तो काय आश्चर्य, लागोपाठ दुसरे विमान आले. त्याचे स्वर्गावतरण होऊन ते हँगरला जाईपर्यंत तिसरे विमानसुद्धा आले. आनंदाश्चर्यात आम्ही बुडून गेलो.