मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझी माय मराठी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

☆ माझी माय मराठी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆

माझी माय मराठी

माझी माय मराठी

अभिमाने येते ओठी।।ध्रु।।

 

कवितेसह हर्षे येते

भारुड,गवळण गाते

पोवाड्यातुनी ही रमते

ओव्यांमधुनी ती खुलते।।१।।

 

विश्वात कथेच्या फुलते

वास्तवास न्यायही देते

शब्दालंकारे सजते

आविष्कारातुनी नटते।।२।।

 

कादंबरी कधी बनते

अन शब्दांसह डोलते

भेदक,वेधक ती ठरते

सकलां काबिज करते।।३।।

 

सारस्वतांसी जी स्फुरते

नाट्यातुनी  ही प्रगटते

नवरसातुनी  दर्शविते

विश्वाला स्पर्शही करते।।४।।

 

माझी माय मराठी

अभिमाने येते ओठी।।

 

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भक्तीची ओल… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ भक्तीची ओल… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

भक्तीची ओल

    मनीचे घुंगरू बोलले

    हळुवार!

   पैंजणाचा नाद झाला

   अनाहत!

  शब्द रुतले खोलवर

  विठ्ठल विठ्ठल !

 सुगंधी नाद पसरला

 देहांतरी !

 मन पाखरू झाले

 सैरभैर !

मनाचा गाभारा गेला

ओलावून !

भक्तीची ती ओल

अंतर्यामी !

      

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – चक्षू – ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆

सुश्री उषा जनार्दन ढगे

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – चक्षू –  ? ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे 

चर्येवर ते अतीभाव दाविती

मुकेपणातही बोलून जाती

हर्षानंदात सहज चमकती

आर्ततेत अश्रूथेंब ढाळिती..

सोह्रद सोबतीत मिश्कील हसती

स्नेहात सुकर सौमनस्य भासती

स्थिरावूनी मुखास अलंकृत करिती

मुद्रेवरची सौंदर आभूषणे ठरती..

अचंबीत होती भृकुटी उंचाविती

उद्वेग क्रोधात लालिमा सांडती

तिरळेपणात कुणी चक्रावती

न वदताही सापेक्ष अर्थ दुणाविती..

स्वप्नरंजनात हरपूनी लपलपती

निद्राझोतांत अलगद मिटूनी जाती

कुणी मयूराक्षी हरिणाक्षी म्हणविती

मनोहारित दिलखेचक ललना ठरती..

विद्वत्तेची दार्शनिक तेजोमय दिप्ती

उद्दाम दिमाखात तोराही मिरविती

नेत्र डोळे त्यां चर्मचक्षूही म्हणती

अंतरातले ते मर्मगवाक्ष खोलती…!

चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सोंगट्या… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सोंगट्या… ☆ सौ राधिका भांडारकर

आखले एक रिंगण

त्यातच तिचे अंगण

जन्माने दिले आंदण

बोचरे काटेरी कुंपण

सातच्या आत घरात

पाऊल हवे ऊंबरठ्यात

गरीब बिचार्‍या चिमणीला

सगळे टपले छळण्याला

शाळेत कविता पाठ केली

तेव्हांपासून मनात रुजवली

रांधा वाढा ऊष्टी काढा

सुरवातीपासून गिरवला पाढा

म्हणे तिची प्रगती झाली

चौकट मोडून बाहेर आली

कुठे गवसले मोकळे आभाळ

कधी येणार सुंदर सकाळ

ओलांडल्या मर्यादेच्या रेघोट्या

पण अडीच घरात फिरतात सोंगट्या

अजुनही चेकमेट झालीच नाही

लक्ष्मणाने  रेषा पुसलीच  नाही..

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 100 – उपेक्षा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 100 – उपेक्षा ☆

नका करू हो उपेक्षा

अशी गरीब जीवाची ।

मला सुद्धा मिळेल का

संधी शाळा शिकण्याची।

 

आहे कुरूप थोडीशी

असे मलीन कपडे ।

बुट टाय स्कूलबॅग

मला मुळीच न घडे।

 

वाढलेल्या झिपऱ्यांना

सदा वाण ती तेलाची

कशी लावावी संगत

वही आणि त्या पेनची।

 

रस्तोरस्ती गल्लोगल्ली

आम्ही भंगार वेचतो।

रस्त्यावर उकंड्यात

मीठ-मिरची शोधतो।

 

दिस रात राबूनिया

माय पुरती थकते।

रिती गाडगी-मडकी

तिची भूकच मरते।

 

तान्हा रडून घायाळ

ओढ दधुाच्या घोटाची।

फोल ठरती संस्कार

गार भरण्या पोटाची।

 

सारं पाहून बा माझा

पुरा अगतिक झाला

ऐन उमेदीत असा

आज मुकला जिवाला

 

जरी नसेल आधार

थोडं असंच शिके न ।

नको काही दसरे हो

थाप हवी कौतुकान।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चैतन्यदीप… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ चैतन्यदीप… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त :अनलज्वाला)

(मात्रा :८+८+८)

दिधले किती कुणाला,झोळीत काय आले

किर्दीत बंद आता, सारे हिशेब झाले !

 

सोवळा कोण कैसा ,रानात पारध्यांच्या

रक्तात माखलेले ,माझेच दोन भाले !…

 

वाजली गुहेत नित्य, माझीच शोकवीणा

आकांत त्या दिशांचे,श्रवणी कधी न आले !

 

मृग वर्षला झडीने ,आपापल्या परीने…….

भूमी न चिंब भिजली, लज्जेस दान आले !

 

दाटून खूप आले ,पण वर्षलेच नाही

आभाळ प्रार्थनेचे, वंध्याच रे निघाले !

 

गज तोडण्यात सारे, आयुष्य बाद झाले…….

तुटण्यास पिंजरा पण, झडण्यास पंख आले !

 

उदयास्त थांबलेले ,अंधार गोठलेला……

क्षण कोवळे नि हळवे, चैतन्यदीप झाले !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ #122 – विजय साहित्य – जीवनवेणू ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 122 – विजय साहित्य ?

☆ जीवनवेणू  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(दशाक्षरी रचना)

सप्तसुरांची, अवीट गोडी

या जीवनाच्या, सुरावटीला

जगणे आहे ,मंजुळ पावा

सुखदुःखाच्या, सजावटीला….! १

 

नको फुकाचे, मानपान ते

माणूस होतो, माणूस राहू

हात देऊया, संकट काळी

ईश्वर भक्ती, जनांत पाहू….! २

 

वाचू माणूस,जाणू माणूस

वृद्धाश्रम तो , दूर ठेऊया

जीवन यात्रा, माय पित्यांची

सवे आपुल्या, सुखे नेऊया…! ३

 

गुरू जनांची, ज्ञान शिदोरी

पाया भरणी, विचारधारा

प्रलोभनांचे , नको दागिने

व्यसनी संगा, नकोच थारा…! ४

 

जबाबदारी, अन् कर्तव्ये

डावे उजवे, हात आपुले

न्याय नितिचे, विचार सोपे

ध्येयवादी ही,टाक पाऊले…! ५

 

काय सांगते, जीवन वेणू

मनी वाहू दे, प्रेमळ वारा

सात सुरांची,सुरेल वाणी

अनुभूतींची, जीवनधारा….! ६

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #107 – मोबाइल☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 107 – मोबाइल 

मराठी कविता ‘मोबाईल’ प्रत्येकाने एकदा तरी ऐकावी अशी कविता…. 

यूट्यूब लिंक वर क्लिक करा  👉 मोबाइल  

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वगत… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वगत… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆ 

नको रोखू माझ्या,

आवेगाची गती.

संयमाच्या भिंती,

कोसळती.

कोसळती धारा,

आकाश  फाटले.

मनात दाटले,

कृष्णमेघ.

कृष्णमेघांनीही,

पालटले रंग.

झाले अंगअंग,

पावसाचे.

पावसाचे कसे,

करावे स्वागत ?

होता शब्दरुप,

माझेच स्वगत.

माझे हे स्वगत,

जसा हो प्रपात.

संदेह निर्वाण,

स्वाभाविक.

स्वाभाविक झाले,

नीरव प्रवाह.

वेगळाले रंग,

एक झाले.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आताच्या पिढीच्या आईचे तिच्या बाळासाठीचे गाणे… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ आताच्या पिढीच्या आईचे तिच्या बाळासाठीचे गाणे… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

मी मराठी, मी मराठी !

“आताच्या पिढीच्या आईचे तिच्या बाळासाठीचे गाणे”

 

लिसन माझ्या सोन्या बाळा

केव्हाच झाली मॉर्निंग

वेक अप फ्रॉम द बेड आता

शेवटची ही वॉर्निंग

 

छानपैकी ब्रश कर

चमकव तुझे टीथ

स्मॉल थिंग समजू नकोस

त्यातच तुझं हित

 

हॉट हॉट मिल्क केलंय

घालून बोर्नव्हीटा

या ड्रिंकने सहज फोडशील

हाताने तू विटा

 

वन ग्लास ट्वाईस घेताच

व्हीटामीन्स मिळतील मेनी

थोड्याच दिवसात तुही

होशील महेंद्रसिंग धोनी

 

मॅथ्सवाल्या टीचरला त्या

विचार सगळ्या क्वेरी

पाठ कर लंच ब्रेकला

मराठी लॅंग्वेज स्टोरी

 

स्कूल फिनिश करून इव्हला

होम झटपट गाठ

येता येता बसमध्येच

फ्रेझेस होऊं दे पाठ

 

ग्रॅंडपाच्या बर्थ डेची

आहे नाईट ला पार्टी

असल्या एनव्हायर्नमेंट मध्ये

ग्रो होतात कार्टी !

 

मराठी च्या स्पीकिंगचेही

लावू तुला कोर्स,

शोधलं खूप टाईम्स मध्ये

पण सापडला नाही सोर्स !!

 

कवी…अनामिक

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares