मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ती म्हणाली… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ ती म्हणाली… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

🏵️

नियतीनं हाताचं बोट धरून

जगाच्या या उघड्या मैदानांत आणून सोडलं …

आणि बोट सोडून ती म्हणाली,

   आता तुझं तूच खेळायचं !!

😓 

खेळता खेळता जायचं नाही

खूप दूर दूर —

पाय दुखले तरी करायची

नाही कुरकर —

धावता धावता होणारच की

खूपच दमणूक —

दमणुकीचं दुसरं नांव

असतं करमणुक —

हसता हसता खेळायचं

खेळता खेळता म्हणायचं

खोल खोल आकाशात

मारावा कां सूर —

कावळा पण भुर्रर्रर्र

आणि चिमणी पण भुर्रर्रर्र —॥

🏵️

जीव सारा झोकुन देत

खेळात घेतली उडी —

लपाछपी अन् आट्यापाट्या

पळापळी लंगडी —

प्यादे राजा वजीर घोडा

हत्ती सांगे मंत्र —

खेळांनी या खूप शिकवले

जगण्याचे तंत्र —

खेळ खेळता गाणे गावे

गाता गाता सूर धरावे

सूर तरंगत मनवेगाने

जावे दूर दूर —

कावळा पण भुर्रर्रर्र

आणि चिमणी पण भुर्रर्रर्र — ॥

🏵️

खेळता खेळता हसता फिरता

भेटला सवंगडी —

आयुष्याच्या खेळासाठी

जमून गेली जोडी —

एकमेकांच्या साथीनं कधी

काढली सेंचुरी —

कधी शून्याचा भोपळाही

पडला की पदरी —

एक गोष्ट मात्र खरोखर खरी

बाद होण्याची वेळ कधी आली जरी

रडीचा डाव कधी खेळलो नाही

खोटं अपील कधी केलं नाही

हरलो तरी केली नाही कधी कुरकुर

खोल पाण्यात मारत राहिलो सुरावरती सूर

जिंकलो तेव्हा कंठी आला

आनंदाचा नूर

कावळा पण भुर्रर्रर्र

आणि चिमणी पण भुर्रर्रर्र — ॥

🏵️

दिवस खूप चांगले गेले

पुढचेही जातील —

खेळ अजून बाकी आहेत

संपता संपता उरतील —

बोट सोडुन गेलेल्या नियतिस

आता एकच सांगावं —

आठवणींच्या खेळात आता

रमून जाणं द्यावं —

 

क्रिकेट नको फुटबॉल नको

हजार मीटर्सची शर्यत नको

उडी नको बुडी नको

मॅरॉथॉनचा विचार नको

हसत हसत जगायचं

जुन्या आठवणीत हरवायचं

हा खेळ खेळत रहायचं

खेळता खेळता संपून जायचं —

 

मनमंदिराच्या गर्भी गाभारा तृप्तीचा

आपुलीच व्हावी मूर्ती खेळ हा मुक्तीचा

खेळता खेळता संपायचं

नि संपता संपता म्हणायचं

तृप्तीच्या सरितेला आलासे पूर —

आता —

कावळा पण भुर्रर्रर्र

आणि चिमणी पण भुर्रर्रर्र— ॥

🏵️

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तुझ्याचसाठी कितीदा ☆ ना. घ. देशपांडे ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ तुझ्याचसाठी कितीदा ☆ ना. घ. देशपांडे ☆

(10 मे : स्मृतीदिनानिमित्त)

तुझ्याचसाठी

कितीदा

तुझ्याचसाठी रे !

 

मी दुहेरी

बांधल्या

खूणगाठीरे !

 

मी दुपारी

सोसले

ऊन माथी रे !

 

लाविल्या मी

मंदिरी

सांजवाती रे !

 

कैक आल्या,

संपल्या

चांदराती रे !

 

मी जगाच्या

सोडल्या

रीतभाती रे !

 

– ना.घ.देशपांडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #137 ☆ ठिणगी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 137  ?

☆ ठिणगी ☆

येउनी स्वप्नात माझ्या, रोज ती छळतेच आहे

जखम भरु ती देत नाही, दुःख माझे हेच आहे

 

ऊल झालो शाल झालो, हे तिला कळलेच नाही

ती मला पत्थर म्हणाली, काळजाला ठेच आहे

 

सागराच्या मी किनारी, रोज घरटे बांधणारा

छेडणारी लाट येते, अन् मला भिडतेच आहे

 

आंधळ्या प्रेमास माझ्या, सापडेना मार्ग काही

ती निघाली हात सोडुन, शल्य मज इतकेच आहे

 

कान डोळे बंद करने, हे मला जमलेच नाही

टोमण्यांची धूळ येथे, रोज तर उडतेच आहे

 

ही पुराणातील वांगी, आजही पिकतात येथे

नारदा तू टाक ठिणगी, रान मग जळतेच आहे

 

रोज देहातून पाझर, वाढतो आहे उन्हाळा

भाकरीचे पीठ कायम, त्यात ती मळतेच आहे

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सापडला की गुलाम…अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? विविधा ?

☆ सापडला की गुलाम…अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

मी पेपर उघडला,,!!

त्यात  मीच दिलेली

जाहिरात होती,,😊

 

हरवला आहे .. “आनंद “

पत्ता विसरण्याचा त्याला आहे छंद …😊

 

रंग … दिसेल तो

उंची ..भासेल ती,,😊

 

कपडे सुखाचे

बटण  दुःखाचे,,,!!

 

कुणाला न सांगता घरातून गेला आहे निघून

थकलो आहोत सगळीकडे शोधून,,,!!

 

“आनंदा  ” परत ये,,,

कुणीही तुझ्यावर रागवणार नाही,,

तुझ्यावर  कसलीही सक्ती करणार नाही,,👍

 

घरातले सगळे आसुसून बघताहेत तुझी वाट

दार उघडं ठेवलंय वाढून ठेवलंय आशेचं  ताट,,👍

 

शोधून आणणाऱ्याला दिलं  जाईल इनाम

मग म्हटलं आपणच करावं हे  काम,,😊

 

काय आश्चर्य .. सापडला की गुलाम ..👌😊

 

एका नव्या कोऱ्या पुस्तकाआड,,

एका जुन्या गाण्याच्या अर्थाच्या पल्याड,,👌

 

आठवणींच्या मोरपिसात,,

अगरबत्तीच्या मंद वासात,,👌

 

मोगऱ्याच्या  मखमली स्पर्शात …

अवेळी येणाऱ्या पावसात,,👌

 

त्यानेच मारला पाठीत धप्पा,,

जुन्या मैत्रिणीशी मारताना गप्पा,,😊

 

मी म्हटलं अरे , इथेच होतास ,उगाच दिली  मी जाहिरात

तो म्हणाला वेडे असता तुम्ही माणसं,,😊

 

बाहेर शोधता .. .मी असतो तुमच्याच मनात … !👌💝🎊

 

लेखक – अज्ञात

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तुम्ही सुंदर आहात…हे स्वतःला कळू द्या..!! ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ तुम्ही सुंदर आहात…हे स्वतःला कळू द्या..!! ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

(सर्व महिला वर्गाला समर्पित.)

जेव्हा सगळं घर रडत असतं,

तेव्हा तुम्ही सावरता,

जेव्हा घरभर पसारा होतो,

तेव्हा तुम्ही एकट्याच आवरता,

राहून जातं या सगळ्यात…

स्वतःला भेटणं,

केस विंचरणं, लिपस्टिक लावणं,

आणि पावडर लावून नटणं..!

तुमचं हसणं महत्त्वाचं आहे,

ते असच फुलू द्या,

तुम्ही सुंदर आहात…

हे स्वतःला कळू द्या..!

 

डोळ्याखाली काळे डाग,

चेहऱ्यावरती रिंकल्स,

पांढरे झालेले केस

आणि गालावरती पिंपल्स,

असू द्या हो,

एक धाडसी आई आहात तुम्ही,

साऱ्या जगाशी लढता,

एकावेळी एक नाही,

दहा दहा कामे करता,

या घाईत तुमचा मोर्चा…

स्वतःकडेही वळू द्या,

तुम्ही सुंदर आहात…

हे स्वतःला कळू द्या..!

 

स्ट्रेस आहे कामाचा,

हवं आहे प्रमोशन,

किराणा संपत आलाय,

त्याचं वेगळच टेन्शन,

वाढदिवस, एनिवर्सरी…

सारं लक्षात ठेवता,

अगदीच कॉल नाही…

पण आवर्जून मेसेज करता,

तुमच्या कौतुकानं कूणी…

जळलं तर जळू द्या,

पण तुम्हीं सुंदर आहात..

हे स्वतःला कळू द्या…!

 

वेळेत खा, वेळेत झोपा,

जरा जपा स्वतःला

तुमच्यामुळेच आहे…

घरपण तुमच्या घराला,

नको सतत साऱ्यांची मन जपणं,

“खुप छान असतं…

कधीतरी आपणं आपल असणं”

असा थोडासा “me time”  

तुम्हालाही मिळू द्या…

तुम्ही सुंदर आहात…

हे स्वतःला कळू द्या..!!!

संग्राहिका : सुश्री मंजिरी गोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्द… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ शब्द… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

शब्द

    अंतरीचे धावे स्वभावाबाहेरी

     तेव्हा विचारांची लड

     उलगडत जाते

     शब्द होऊन !

    श्वासातील उष्ण वारा

     घालतो फुंकर

    बनतो शब्द

     नकळत !

    अंतरीची मुग्ध वाचा

      अस्वस्थ होते तेव्हा

      फेसाळतो शब्द

     उत्स्फूर्त !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाखरा, येशील का परतून ? ☆ कवी रेव्हरंड ना.वा.टिळक ☆

टिळक, नारायण वामन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती

? कवितेचा उत्सव ?

☆ पाखरा, येशील का परतून ? ☆ कवी रेव्हरंड ना.वा.टिळक ☆

(09 मे– कवी रेव्हरंड ना.वा.टिळक स्मृतीदिनानिमित्त)

पाखरा,येशील का परतून ?

 

मत्प्रेमाने दिल्या खुणांतुन

    एक तरी अठवून ? पाखरा !

 

हवेसवे मिसळल्या माझिया

    निःश्वासा वळखून ? पाखरा !

 

 वा-यावरचा तरंग चंचल

   जाशिल तू भडकून!पाखरा!

 

थांब,घेउ दे  रूप तुझे हे

    हृदयी पूर्ण भरून ! पाखरा!

 

जन्मवरी मजसवे पहा ही

    तव चंचूची खूण!पाखरा !

 

विसर मला,परि अमर्याद जग

     राही नित्य जपून!पाखरा !

 

ये आता!  घे शेवटचे हे

     अश्रू दोन पिऊन ! पाखरा !

चित्र साभार – टिळक, नारायण वामन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती (marathi.gov.in)

    – कवी रेव्हरंड ना.वा.टिळक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे #80 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 80 ? 

☆ अभंग…   ☆

मोगरा फुलला, विकसित झाला

सहज हासला, मुक्तपणे…०१

 

बोलला मजला, आनंदी असावे

दु:खीत नसावे, जगतांना…०२

 

होणारे होईल, वेळ ही संपेल

काहीच नसेल, शेवटाला…०३

 

जन्म तोच मृत्यू, ठराव जाहला

करार लिहिला, विधात्याने…०४

 

नका करू शोक, आहे तेच योग्य

निर्मळ सुयोग्य, मानून घ्या…०५

 

ऐसा हा मोगरा, मजसी वदला

वाऱ्यासवे दिला, संदेश तो…०७

 

कवी राज म्हणे, सुसंगती करा

निर्भेळ आचरा, दिनचर्या…०८

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 10 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 10 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

१७.

सरतेशेवटी प्रेमाने त्यांच्याशी समर्पण व्हावे

ही एक इच्छा माझ्या मनात आहे 

सारा विलंब,

इतर साऱ्या गोष्टींकडं दुर्लक्ष याचसाठी

 

त्यांच्या नीतिबंधनात आणि कायदेकानू यात

ते मला गुंतवू पाहतात

सरतेशेवटी ‘त्या’च्यात माझं समर्पण व्हावं यासाठी

त्यांच्या प्रेमाची प्रतीक्षा करीत

त्यांची बंधनं मी चुकवीत आहे

 

हे सारे जण मला निष्काळजी म्हणतात,

दोष देतात, नि:संशय हे योग्यच आहे.

 

इथला बाजाराचा दिवस आटोपला आहे

उद्योगी माणसांची कामं संपली आहेत

मला माघारी बोलावण्याचा

 व्यर्थ प्रयत्न करणारे रागावून गेले आहेत.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चैत्र गौरीच्या ओव्या… सुश्री गीता गद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ चैत्र गौरीच्या ओव्या… गीता गद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

द्वितीयेची चंद्रकोर नाजुकशी शोभियली,

माझ्या गं अंगणात माहेरवाशिण ती आली.

 

बांधविला छान झुला, अंगणात सावलीला,

सडा रांगोळी घालून, पानाफूलांनी सजविला.

 

पाय धुवून प्रवेशली, गौर शुभ पावलांनी,

नाजूक पैंजण  जोडवी, कंकणे किणकिणली.

 

झोपाळ्याला पितळ कड्या, लखलख चमकती,

मऊ रेशमी गालिचा, शोभे त्यावर तो किती.

 

गौर बसली थाटात, आजुबाजू फूलं माळा,

वस्त्र नाजुक घातले, मोतियांचे सर गळा.

 

चांदीच्या वाटीत , नैवेद्य नानाविध,

सुगंधित शीतल जल, पन्हे रस सरबत.

 

सुबक करंज्या मोदक लाडू, पक्वान्ने ती किती,

आंबा द्राक्षे कलिंगड, शोभा वाढविती.

 

लेक माहेरासी येते, गौरीच्या गं स्वरूपात,

क्षणभर विसावते, करी मायदेशी हितगुज.

 

सासुरवाशीण माहेरवाशिण, दोन्ही माझ्याच की लेकी,

होई माझे घर गोकुळ, दूध साखर त्यांच्या मुखी.

 

गौरीच्या आगमने, घर गेले आनंदून,

घर नाचते गाते जणु, लहान बालक होऊन.

 

गौर नटली जेवली, विसावून तृप्त झाली,

अक्षय तृतीया करून, परतण्या सज्ज झाली.

 

मनी दाटे हुरहुर, परि  रिवाज पाळण्या

सानंदे करा पाठवणी, निरोप पुढल्या वर्षी येण्या.

 

राहो तुझा आशिर्वाद, नांदो सुख सर्वत्र,

घराघरांत भरून राहो, मंगलमय पावित्र्य.

 

 – सुश्री गीता गद्रे, टिमरनी (म.प्र.)

संग्रहिका – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares