मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ #125 – विजय साहित्य – आला आला कवी…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 125 – विजय साहित्य ?

☆ आला आला कवी…!  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

 (अतिशयोक्ती अलंकार)

आला आला कवी

वाचू लागला वही

चार तासांनी म्हणे

ही होती फक्त सही….!

 

कविता त्याची नाजूक

खसखशी पेक्षाही छोटी

मुंगी सुद्धा त्यांच्यापुढे

शंभर पट मोठी…!

 

आला आला कवी

किती त्याचे पुरस्कार

रद्दिवाला म्हणे

घेतो हप्त्यात चार..!

 

आला आला कवी

चला म्हणे घरी

दाखवतो तुम्हाला

स्वर्गातली परी…!

 

आला आला कवी

पिळतोय मिशा

शब्दांच्या कोट्यांनी

भरलाय खिसा…!

 

आला आला कवी

खांद्याला झोळी

शब्दांच्या भाकरीत

पुरणाची पोळी…!

 

आला आला कवी

चोरावर मोर

जोरदार घेई टाळ्या

कोल्हाट्याचं पोर…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वप्न पिंपळ… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ स्वप्न पिंपळ… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

पिंपळा !

पानगळीच्या रुपानं 

तुला वरदान लाभलंय 

न पुरी होऊ शकणारी स्वप्नं 

आपोआप गळून पडण्याचं  

आणि —

काही काळानं 

पुनः नव्या असोशीनं 

स्वप्नांचं मातृत्व ल्यायण्याचं 

पण —

या तुझ्या लेकराचं काय.. 

उभ्या आयुष्यात एखादाच बहर  

अखेरचीच पानगळ .. 

त्यामुळे .. 

मी वृद्ध होण्याआधी 

माझी स्वप्नं पूर्ण कर .. 

नाहीतर .. 

नाहीतर इतक्या सगळ्या 

स्वप्नांना पुरुन उरणारं 

वृद्धत्व कुठून आणू मी ——— 

 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राधेला नाही कळला… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ राधेला नाही कळला… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

राधेला नाही कळला

हा मुरलीधर ही नटवा

ती धरते त्याच्या वरती

मनमानी लटका रुसवा

 

सांजेला अवखळ कान्हा

येतोच तिला भेटाया

ती आहे वेडी त्याची

सखयानो तिजला सजवा

 

का राग धरावा कोणी

कोणावर कळले नाही

पण नकळत काही थोड्या

घडतात चुका हे पटवा

 

प्रेमाने प्रेमालाही

समजून जरासे सांगा

आनंद पुन्हा मिळवाया

गमतीने नुसते हसवा

 

घर आहे साधे पण ते

सजवाच कला कुसरीने

सांगावा धाडायाला

वा-याला वार्ता कळवा

 

ठरलेल्या भेटी साठी

आतूर मनाने थांबा

त्याच्या ही वाटे वरती

फुलबाग फुलांची फुलवा

 

जुळतात सुखाचे धागे

मग भाव खुणांचे सारे

स्पर्शाने येतो तेव्हा

अंगावर काटा हळवा

 

भेटीत तुम्हाला कळते

हा स्वर्ग सुखाचा असतो

मग सिंहासन हृदयाचे

सोन्याने पुरते मढवा

 

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #110 – आसरा…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 110 – आसरा…! ☆

इवलासा जिव 

फिरे गवोगाव

आस-याचा ठाव 

घेत असे..

 

पावसाच्या आधी 

बांधायला हवे

घरकुल नवे 

पिल्लांसाठी..

 

पावसात हवे

घर टिकायला

नको वहायला

घरदार..

 

विचाराने मनी

दाटले काहूर

आसवांचा पूर 

आटलेला..

 

पडक्या घराचा 

शोधला आडोसा

घेतला कानोसा

पावसाचा..

 

बांधले घरटे

निर्जन घरात

सुखाची सोबत

होत असे..

 

घरट्यात आता

रोज किलबिल

सारे आलबेल

चाललेले..

 

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 132 ☆ काहूर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 132 ?

☆ काहूर… ☆

माझ्या मनीचे काहूर

कुणा सांगू सईबाई

असे एकाकी हा जीव

जशी अंगणात जाई

 

जशी अंगणात जाई

अंगोपांगी फुलारते

मनी सुगंधाची कळी

अपसूक उमलते

 

अपसूक उमलते

निळे कमळ पाण्यात

गतकाळाचे तरंग

कसे दाटती डोळ्यात

 

कसे दाटती डोळ्यात

जुन्या आठवांचे थवे

भाग्य तेच तेच लाभे

फक्त जन्म नव नवे

 

© प्रभा सोनवणे

१६ मे २०२२

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भोंगे… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

 

? कवितेचा उत्सव ?

☆ भोंगे… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

पाहून रंगबिरंगी भोंगे

मन अशांत झाले माझे

जशी मागणी तसे रंग

दुकानदार हे मज सांगे

 

हिरवा तो मशिदीचा

अजान त्यातून वाजे

केशरी तो मंदिराचा

चाळीसा हनुमान गाजे

 

मी विचारले हळूच मग

हिरव्यातून  चालीसा

अन् भगव्यातून अजान

वाजत नाही काहो दादा

 

म्हणे तो रंगात नसते काही

भोंग्या चे तत्व समजून घेई

प्रामाणिक तो असे ध्वनिला

बदलन्या रंग तो माणूस नाही

 

देऊ तुम्हास कोणता भोंगा

दुकानदार मज विचारे भाऊ

केसरी की हिरवा ते सांगा

की लाल निळा रंगवून देऊ

 

म्हणालो मी दे मज भोंगा

बिन रंगाचा जो कुठेही साजे

ज्यातून फक्त नी फक्त

जन गण मन हेच वाजे

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आपण आपली आई… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे   

परिचय

शिक्षण – BAMS PGDPC

खाजगी वैद्यकीय व्यवसाय व मानसशास्त्रीय समुपदेशक

छंद – वाचन, लिखाण, समतेचा विचार मांडणं, आनंदी जगण्यासाठी करिअर व सहजीवन समुपदेशन

 ? मनमंजुषेतून ?

☆ आपण आपली आई… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

सगळे म्हणत होते तेव्हा

खूप जणांचे फोनही आले..

प्रत्यक्ष भेटून हेच बोलले

मेसेजवर मेसेज मिळाले

आम्ही आई आहोत तुझी

आम्ही आई होऊ तुझी

आई गेली तेव्हा…!

आपल्यालाही खरं वाटू लागतं

आपणही विश्वासून जातो.

प्रत्येक माणसातल्या आईपणावर..!

काही दिवसांनी कळून चुकतं ..

आई माणूस असते पण.. 

माणसं, माणूस होऊ शकतील

पण कुणाची आई होता येईल 

इतकं शक्य आई होणं नसतंच मुळी..!

एवढं अथांग, खोल प्रेम.. 

इतका जिव्हाळा, इतकी काळजी,

इतकं जीवापाड जपणं

सर्वस्व पणाला लावून पिल्लांना वाढवणं

स्वतः  विस्कटली तरी मुलांच जगणं उभं करणं

त्याग समर्पणात आनंदी होणं…!

एखाद्या प्रति कसं शक्य होईल..!

आई ही एकमेवाद्वितीयच..!

केवळ आपली आणि आपलीच..!

या अलौकिक नात्याला पर्याय नसतो..!l

आॕक्सीजनशिवाय गुदमरणं होईल, अगदी तसं..

 

मग ठरवलं—-

 

आपल्यातल्या आईला आपल्यासाठी साद घालायची..!l

आपणच आपली आई व्हायचं..!

स्वतःच्याच केसातून, गालावरुन स्वतः हात फिरवायचा..!

माया माया करत मनातून गोंजारायचं..!

स्वतःच रात्री अंगाई गीत गायचं..!

आपल्याच कुशीत आपण शिरायचं..!

आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलत राहायचं..!

आपणच आपली आई व्हायचं…!—

 

स्वतःवर मनापासून प्रेम करायचं…!

आपणच आपली आई व्हायचं…!

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कधी होता उचंबळ… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ कधी होता उचंबळ… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

कधी होता उचंबळ

आता एक उपचार

कधी होती कृतज्ञता

आता कोरडे आभार!

 

दहा पाहुण्यांचा दंगा

मूठभर एका घरी

ऐसपैस झाले घर

आतिथ्यास हद्दपारी!

 

पडे विसर भुंग्यांना

जातिवंत कुसुमांचा

फुलांभोवती कागदी

गुंजारव आता त्यांचा!

 

गरुडाच्या पंखांतील

गेले आटून उधाण

म्हणे भरारीस आता

कुठे पूर्वीचे गगन!

 

उपनद्या ,प्रवाहांचे

आटलेले सारे पाणी

गंगौघाच्या कंठी आता

खळखळाटाची गाणी!

 

आतड्याला नाही पीळ

काळजाला कळ नाही

झेललेला कोणी येथे

कोणासाठी वार नाही!

 

तिह्राईत गल्ल्या बोळ

आटलेला गावपणा

माझ्या गावी मीच आता

एक नकोसा पाहुणा !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #138 ☆ दूर गेल्या सावल्या ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 138  ?

☆ दूर गेल्या सावल्या  ☆

घेउनी छन्नी हतोडा फक्त खपल्या काढल्या

ये जरा बाहेर म्हटले ईश्वराला आतल्या

 

राम वनवासात होता भोग हे चुकले कुणा

दाखवीतो तोच जखमा त्याच वनवासातल्या

 

ओळखीचे झाड काही ताठ फांद्या त्यातल्या

लागले फांदीस ज्या फळ त्याच होत्या वाकल्या

 

वयपरत्वे होत नाही सहन सूर्याच्या झळा

पाहुनी माझी अवस्था दूर गेल्या सावल्या

 

त्यागताना फूल होई वेदना काट्यासही

आंगठ्याला ठेच आणिक पापण्या ओलावल्या

 

टाकले देऊन सारे आणि झालो मोकळा

कागदावरच्या सह्याही आज मजवर हासल्या

 

चिरतरुण हे क्षितिज कायम आठवांची रात्र ती

तळपणाऱ्या चांदण्यांही उंच होत्या टांगल्या

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिवस आंब्याचे … ! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ दिवस आंब्याचे … ! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(बाणाक्षरी) 

                हे

              दिन

            आंब्याचे,

           वसंत ऋतू,

         कोकिळ कूजन,

        निसर्ग पूजनाचे!

               आनंद

               लहरी

               तरंग

               उमटे

              मनात

          आनंदाचा,

        हा निसर्ग दाता

      मना स्पर्शते कृतज्ञता!

(बाणाक्षरी मध्ये एक विषय घेऊन प्रथम एका शब्दाने सुरूवात करून क्रमाक्रमाने शब्द वाढवत तो विषय बाणाप्रमाणे सरळ रेषेत लिहित जाणे. व शेवट करताना पुन्हा शब्द संख्या वाढवणे. यामुळे कवितेला बाणाप्रमाणे आकार मिळतो..)

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares