सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
श्री सुनील देशपांडे
कवितेचा उत्सव
☆ “प्रेषित…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
☆
प्रेषित निघून जातात कालातीत विचारांचे ठसे ठेवत.
आम्ही मात्र काळाच्या पडद्यावर रक्तलांच्छित ठसे ठेवतो.
*
ते सुळावर चढतात आमच्या कल्याणा साठी.
त्यांच्या विचारांना आम्ही सुळी देतो स्वार्थासाठी.
*
ते आपलाच क्रूस वागवतात खांद्यावर स्वतःच्याच.
आम्ही जबाबदारीचे ओझेही पेलत नाही स्वतःच्याच.
*
मृत्यूनंतरही ते पुन्हा प्रकटतात आमच्या भल्यासाठी.
मारेकरी मात्र सतत जन्म घेतात क्रौर्यासाठी.
*
एकदा क्रूरपणे त्यांना प्रत्यक्ष मारण्यासाठी,
मग अधिक क्रूरपणे विचारांना मारण्यासाठी.
☆
© श्री सुनील देशपांडे
email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सौ. अर्चना गादीकर निकारंगे
कवितेचा उत्सव
☆ ओढ… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆
☆
संध्याकाळच्या वेळेस पक्ष्यांची माळ घरट्याकडे परतत होती,
दूरवर राहिलेल्या घरट्याला कवेत घेऊ पाहत होती.
चुकलेला, राहीलेला असेल मागे कोणी
म्हणाली, ” पुरे आता, फिरा माघारी, नका थांबू आणि,
*
अनुभवलेल्या गोष्टींचे भांडार होते तिच्यापाशी,
भविष्यासाठी असेच शिकणार होते ते प्रत्येक दिवशी.
अंगातला थकवा रात्रीच्या विसाव्याने घालवून,
प्रसन्न मनाने ते उदया परत उडणार होते आनंदून.
*
पण त्यासाठी आज घरी परतणे अनिवार्य होते,
काहींचे कुटुंब येण्याची त्यांच्या वाट पाहत होते,
सांगायचे होते काहींना आज त्यांनी काय पाहीले,
जे घरी राहून न गेलेल्यांचे अनुभवायचे राहीले.
☆
© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 240 – विजय साहित्य
☆ सौभाग्य कंकण..! ☆
(काव्यप्रकार अष्टाक्षरी.)
☆
सौभाग्य कंकण,
संस्कारी बंधन.
हळव्या मनाचे,
सुरेल स्पंदन…! १
*
सौभाग्य भूषण,
पहिले कंगण.
माहेरी सोडले,
वधुने अंगण…!२
*
सौभाग्य वायन ,
हातीचे कंकण.
मनाचे मनात,
संस्कारी रींगण..!३
*
सप्तरंगी चुडा,
हिरव्या मनात .
हिरवी बांगडी,
हिरव्या तनात…!४
*
प्रेमाचे प्रतीक,
लाल नी नारंगी .
जपावा संसार ,
नानाविध अंगी..!५
*
निळाई ज्ञानाची,
पिवळा आनंदी.
सांगतो हिरवा,
रहावे स्वच्छंदी…!६
*
यशाचा केशरी ,
पांढरा पावन .
जांभळ्या रंगात,
आषाढ श्रावण..!७
*
वज्रचुडा हाती ,
स्वप्नांचे कोंदण.
माया ममतेचे,
जाहले गोंदण…!८
*
आयुष्य पतीचे ,
वाढवी कंगण.
जपते बांगडी,
नात्यांचे बंधन…! ९
*
चांदीचे ऐश्वर्य,
सोन्याची समृद्धी.
मोत्यांची बांगडी ,
करी सौख्य वृद्धी..!१०
*
भरल्या करात,
वाजू दे कंकण ,
काचेची बांगडी,
संसारी पैंजण…!११
*
चुडा हा वधूचा,
हाती आलंकृत .
सासर माहेर ,
झाली सालंकृत..!१२
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ सेतू… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
झाडांनाही माहित असतं
सगळीच पानं पिवळी होऊन चालत नाही
उद्या उमलणा-या कळ्यांसाठी
काही पानांना हिरवं रहावच लागतं
माहित असतं त्यांना,
करावाच लागतो संघर्ष
स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी
फांद्यांना आकाशाचे वेध लागले तरी
मुळांना माती सोडून जाता येत नाही
पिकली पानं गळून जातील आपोआप
पालवीही फुटेल,आपोआपच,
तरीही
फुलणं आणि सुकणं
यांना जोडणारा सेतू होऊन
झाड झुंजत राहतं वादळवा-यात,
पिवळ्या पानांना निरोप दे॓ऊन
हिरवी पानं अंगावर मिरवत
प्रत्येक ऋतूचं स्वागत करत !
प्रत्येक ऋतूचं स्वागत करत !
☆
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ श्रीमद्भगवद्गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
संस्कृत श्लोक…
यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च ।
अयथावत्प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी ॥ ३१ ॥
*
विवेक नाही धर्माधर्म कर्तव्य-अकर्तव्याचा
त्या पुरुषाला जाणी धनंजया राजस बुद्धीचा ॥३१॥
*
अधर्मं धर्ममिति या मन्यसे तमसावृता ।
सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी ॥ ३२ ॥
*
अधर्मास जी मती जाणते श्रेष्ठधर्म म्हणोनीया
सर्वार्थासी विपरित मानित तामसी बुद्धी धनंजया ॥३२॥
*
धृत्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः ।
योगोनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी ॥ ३३ ॥
*
ध्यानयोगे धारण करितो मनप्राणगात्रकर्मणा
अव्यभिचारिणी ती होय पार्था सात्विक धारणा ॥३३॥
*
यया तु धर्मकामार्थान्धृत्या धारयतेऽर्जुन ।
प्रसङ्गेन फलाकाङ्क्षी धृतिः सा पार्थ राजसी ॥ ३४ ॥
*
फलाशाऽसक्तीग्रस्त धर्मार्थकाम धारियतो
राजसी धारणाशक्ती पार्था तयास संबोधितो ॥३४॥
*
यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च ।
न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी ॥ ३५ ॥
*
निद्रा भय दुःख शोक मद धारयितो दुष्टमती
धारणाशक्तीसी ऐश्या धनंजया तामसी म्हणती ॥३५॥
*
सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ ।
अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति ॥ ३६ ॥
*
यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम् ।
तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम् ॥ ३७ ॥
*
भरतकुलश्रेष्ठा तुजसी त्रिविध सुखांचे गुह्य सांगतो
ध्यान भजन सेवेसम परिपाठे दुःख विसरुनी रमतो
प्रारंभी गरळासम भासतो तरीही अमृतासम असतो
सुखदायी प्रसाद आत्मबुद्धीचा सात्त्विक खलु असतो ॥३६, ३७॥
*
विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम् ।
परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम् ॥ ३८ ॥
*
सुखे विषयेंद्रियांचे भोगकाळी परमसुखदायी असती
विषसम परिणती तयाची सुख तया राजस म्हणती ॥३८॥
*
यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः ।
निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम् ॥ ३९ ॥
*
भोगकाळी परिणामी मोहविती जी आत्म्याला
निद्राआळसप्रमाद उद्भव तामस सुख म्हणती त्याला ॥३९॥
*
न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु व पुनः ।
सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात्त्रिभिर्गुणैः ॥ ४० ॥
*
इहलोकी अंतरिक्षात देवलोकी वा विश्वात
सृष्टीज त्रिगुणमुक्त कोणी नाही चराचरात ॥४०॥
☆
मराठी भावानुवाद © डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री सुहास सोहोनी
इंद्रधनुष्य
☆ भेट… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
☆
किती प्रगल्भ व्याप्ती आहे ‘भेट’ या शब्दाची !
खरंच, खूपच अर्थपूर्ण.
कोण? कुणाला? कुठे? केव्हा?
कशाला? ‘भेटेल’
आणि
का? ‘भेटणार नाही’
ह्याला ‘प्रारब्ध’ म्हणावं लागेल.
‘भेट’ ह्या शब्द संकल्पनेविषयी थोडंसं काव्यात्मक विवेचन.
‘भेट’ कधी ‘थेट’ असते,
कधी ती ‘गळाभेट’ असते,
कधी ‘Meeting’ असते,
कधी नुसतंच ‘Greeting’ असते.
‘भेट’ कधी ‘वस्तू’ असते प्रेमाखातर दिलेली.
‘भेट’ कधी ‘देणगी’ असते कृतज्ञापूर्वक स्वीकारलेली.
‘भेट’ कधी ‘धमकी’ असते…
‘बाहेर भेट’ म्हणून दटावलेली.
‘भेट’ कधी ‘उपरोधक’ असते…
‘वर भेटू नका’ म्हणून सुनावलेली.
‘भेट’ थोरा-मोठ्यांची असते,
इतिहासाच्या पानात मिरवते.
‘भेट’ दोन बाल-मित्रांची असते…
फार वर्षांनी भेटल्यावर,
पिकल्या केसांचा अंदाज घेत चाचपलेली.
‘भेट’ कधी अवघडलेली,
‘झक’ मारल्यासारखी.
‘भेट’ कधी मनमोकळी,
मनसोक्त मैफिल रंगवलेली.
‘भेट’ कधी गुलदस्त्यातली,
कट-कारस्थान रचण्यासाठी.
‘भेट’ कधी जाहीरपणे,
खुलं आव्हान देण्यासाठी.
‘भेट’ कधी पहिली- वहिली
पुढल्याची ओढ वाढवणारी
‘भेट’ कधी अखेरची ठरते.
मनाला चुटपूट लावून जाते.
‘भेट’ कधी अपुरी भासते,
… बरंच काही राहून गेल्यासारखी.
‘भेट’ कधी कंटाळवाणी,
घड्याळाकडे पाहून ढकलल्यासारखी.
‘भेट’ कधी चुकून घडते,
… पण आयुष्यभर पुरून उरते.
‘भेट’ कधी ‘संधी’ असते,
निसटून पुढे निघून जाते.
‘भेट’ कोवळ्या प्रेमिकांची.
लाजरी-बुजरी नुसतीच नजरानजर.
‘भेट’ घटस्फोटितांचीही असते.
… हक्क सांगण्यासाठी मुलांवर.
‘भेट’ एखादी आठवणीतली असते.
मस्त ‘Nostalgic’ करते.
‘भेट’ नकोशी भूतकाळातली.
….. सर्रकन अंगावर काटा आणते.
‘भेट’…
विधिलिखीत… काळाशी न टाळता येण्याजोगी !
‘भेट’…
कधीतरी आपलीच आपल्याशी.
अंतरातल्या स्वत:शी.
आयुष्याच्या नाजुक वळणापाशी.
…… अचानक झालेली अणि न विसरणारी भेट.
… ‘पुन्हा भेटू*.
☆
कवी : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी
मो ९४०३०९८११०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ आजी आजोबा… ☆ श्री सुजित कदम ☆
☆
आजी आजोबांशी
रोज मनसोक्त बोलू या
दिवसभरातला थोडा वेळ
त्यांच्यासाठी देऊया…!
*
आजी आजोबा म्हणजे
भर उन्हात सावलीचं झाड
कुशीत घेऊन पुरवत असतात
हवे तेवढे आपले लाड…!
*
वाढत जातं वय आणि ..
थकत जातात त्यांचे पाय
तरीसुद्धा नातवा सोबत
चालत असतात हेच पाय
(धावू लागतात हेच पाय)
*
दूर दूरच्या नातवांसाठी..
आतून जिव तुटत असतो
त्यांच्या आठवणीत आसवांचा
तोल सुध्दा सुटत जातो…!
*
गालावरुन ओघळत जातात
आसवांचे काही थेंब..
तरी सुद्धा वाढत असतं
सर्वांबद्दल त्यांच प्रेम…!
*
दिसत जरी कमी असलं तरी
मनातलं त्यांना नक्की कळतं
प्रश्न अवघड असला तरी
इथे उत्तर नक्की मिळतं..!
*
बाहेरचा राग किती वेळा
आपण ह्यांच्यावरतीच काढतो
कारण नसताना किती वेळा
आपण यांच्यावरच चिडतो.
*
तरीसुद्धा शांतपणे ..
ते घेतात सारे ऐकून,
रात्री आपण झोपल्यावर मग
हळूच जातात डोकावून ..!
*
आठवत असतं त्यांना सुद्धा
“त्यांचं असं बालपण”
आपणच मात्र विसरून जातो
“त्यांचं असं म्हातारपण”..!
*
सुरकुतलेला हात त्यांचा
रोज हातामध्ये घेऊ..
त्यांच्या मनातलं थोडं तरी
जाणून आपण घेऊ..!
*
कितीही असलो मोठे तरी
लहान आपण होऊया
उतार वयातलं बालपण त्यांचं
थोडं समजून घेऊया..!
*
आजी आजोबांशी
रोज मनसोक्त बोलू या
दिवसभरातला थोडा वेळ
त्यांच्यासाठी देऊया…!
☆
© श्री सुजित कदम
मो .. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ चिरंतन कविता… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
अगदीच कांही माझ्या,
स्वप्नी असत्य नव्हते.
सत्यात वास्तवाच्याही,
स्वप्न सत्य होते.
वाहणार कालसरिता,
घेउन पोटी सारे.
राहणार चिरंतन कविता,
सांभाळीत दोन किनारे.
महाकवी मी युगांचा,
वेगळेच माझे विश्व.
अव्यक्त अश्वमेधासाठी,
चाैफेर धावती अश्व.
बंदिस्त गणगोतासाठी,
मी शोधीतो नव्याने नाती.
अव्याहत प्रयत्न माझे,
मातीमोल ठरती अंती.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
प्रा. भरत खैरकर
कवितेचा उत्सव
☆ “तू…” ☆ प्रा. भरत खैरकर ☆
☆
वेदनेची कळ अन्
लढण्यातल बळ तू
*
मुलांच रडणं अन्
मोठ्यांच भिडण तू
*
आगीचा जाळ अन्
पाण्याची धार तू
*
मायेचा पाझर अन्
दृष्टातला माजोर तू
*
कुराणातला अल्ला अन्
गीतेतला सल्ला तू
*
अनेकातला एक अन्
एकातला अनेक तू
*
अनादी तू अनंत तू
तूच तू तोच तू
*
हाही तू तोही तू
तूही तू तूही तू
☆
© प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈