मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आला पाऊस पाऊस… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? आला पाऊस पाऊस ?   श्री रवींद्र सोनावणी ☆ 

आला पाऊस पाऊस, सारे भिजले पाण्यात

आणि अंकूरले बीज, ओल्या मातीच्या मनात

सुखे भिजे माळरान, सोडी निःश्वास कातळ

अंबराच्या डोळ्यांतले, भिजे ढगांचे काजळ

आला पावसाळा, झाली सैरभैर वावटळ

माती ग्रीष्मातली पिते, थेंब टपोरे नितळ

टपटपले अमृत, कुठे कोरड्या चोचीत

थेंब मोतीयांचे झाले, पानाफुलांच्या ओठांत

ग्रिष्म भोगल्या माणसा, नको पाणी पाणी करू

आली मृगाची पालखी, झाला घंटानाद सुरू 

ग्रिष्म वनवासी झाला, आता पुरे नऊ मास

आसुसल्या धरणीची, आता उजवेल कूस

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 136 ☆ माझी वटपौर्णिमा… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 136 ?

☆ माझी वटपौर्णिमा… ☆

 कुणीतरी विचारलं सकाळी

चेष्टेने, “तुमचा हा कितवा जन्म”?

माझाही तोच सूर, “सात पूर्ण झाले,

हा आठवा, म्हणूनच,

नो कमिटमेंट “

 

वडाला फे-या मी कधीच घातल्या नाहीत!

लग्नानंतर काही वर्षे,

घरातल्या ज्येष्ठ बायका करतात

म्हणून धरला उपवास,

काही वर्षे कुंडीतल्या फांदीची पूजा !

आणि अचानक आलेली जाग,

नारी समता मंचावर आलेली…

तेव्हा पासून सोडून दिलं,

स्वतःच्या नावापुढे सौ.लावणं !

 श्रावणात सवाष्ण जेऊ घालणं,

आणि “हळदीकुंकू” करणंही !

 

मी नाहीच स्वतःला “स्त्रीवादी”

म्हणवण्या इतकी धीट !

 पण स्त्रीवादी विचारसरणीचा

पगडा मनावर मूलतःच !

माझी आई नेहमीच

धार्मिक कर्मकांड आणि

व्रतवैकल्यात रमलेली !

पण तिची आई–माझी आजी,

सामाजिक कार्याचं व्रत घेतलेली,

उपास तापास न करणारी !

माणूसपण जपणारी-कर्मयोगिनी !

आयुष्यात भेटलेली पहिली आदर्श स्त्री !

 

 त्यानंतर पुस्तकातून भेटल्या,

 “टीन एज”  मधे इरावती कर्वे,

छाया दातार, आणि हो…देवयानी चौबळही!

नंतरच्या काळात विद्याताई,

गौरी देशपांडे,अंबिका सरकार,सानिया

 आणि मेधा पेठेही!

 

जगणं स्पष्ट असावं संदिग्ध नको,

हे मनोमन पटलं !

आणि तळ्यात मळ्यात करत,

जगूनही घेतलं मनःपूत!

 

वटपौर्णिमेलाच कशाला,

नेहमीच म्हणते नव-याला,

“तुमको हमारी उमर लग जाए”

आणि या वानप्रस्थाश्रमात

जाण्याच्या वयात,

व्रत वसा फक्त पर्यावरणवाद्यांचा !

वसुंधरा बचाओ म्हणणा-यांचा,

 

हवा- पाणी -माती

प्रदुषण मुक्त करण्याचा !

झाडे लावण्याचा !

© प्रभा सोनवणे

१४ जून २०२२

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माहेर… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ माहेर… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

(वृत्त – अक्षरछंद – अष्टाक्षरी)

माझ्या माहेराची शान

काय सांगु तुला सये

माहेराचे गाव माझे

जसे आनंदाचे झरे . . . .१

 

वेस ओलांडता कशी

माहेराची ओढ वाढी

नदी खळाळे जोमाने

मन झुळुझुळु वाही . . . . २

 

माझे अंगण घराचे

सडा रांगोळीने खुले

उंबरठ्यावर माय

संस्कारांची वाही फुले . . . . 3

 

देवघर माहेराचे

प्रसन्नता तिथे जागे

माय माझी देवाकडे

सौख्याचेच दान मागे . . . . ४

 

ओंजळीने आई वाहे

देवा पायी जाई जुई

तेव्हा फुलांचा ही गंध

हातामध्ये भरू पाही . . . . ५

 

बापा डोळा येई पाणी

माया डोंगरा एवढी

डोळ्यातल्या आसवांनी

लेकराची दृष्ट काढी . . . . ६

 

सारी लगबग चाले

जेंव्हा लेक दिसे दारी

जसे पुन्हा नवलाई

येई माहेराच्या घरी . . . . ७

 

अशा माहेराची माया

साऱ्या लेकींना लाभावी

माय बापाची लेक ही

सुखी संसारी नांदावी . . . . ८

© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नाती  स्पेशल !! ☆ प्रस्तुति – सुश्री वृषाली मोडक ☆

?वाचताना वेचलेले ?

☆ नाती  स्पेशल !! ☆ प्रस्तुति – सुश्री वृषाली मोडक ☆

(A nice poem on Relationships)

सुख ओरबडण्याच्या शर्यतीत

सामील होऊ नका

आपलं काही चुकतंय का ?

थोडं तपासून तर बघा

 

प्रेम , त्याग , सहनशीलता

ठेवावीच लागेल

आपल्या माणसाशी नातं तोडून

कसं काय भागेल ?

 

कौतुक करणारं असेल तर

मोठं होण्याला अर्थ असतो

लाखोंचं इंटेरियर करून सुद्धा

माणूस का उदास दिसतो ?

 

सुबत्तेच्या विळख्या मधे

खरंच सापडू नका

आपलं काही चुकतंय का ?

थोडं तपासून तर बघा

 

जगाशी मैत्री करतांना

मूळं  का उपटावीत

दूरचे जवळ घेतांना

सख्खे दूर का लोटावीत ?

 

पाणी आणि मृगजळ यातला

फरक लक्षात घ्या

नातं तोडणाऱ्या अहंकाराला

तिलांजली द्या

 

इतरांच्या सुखदुःखात

सामील व्हावच लागेल

तरंच  सोनेरी महाला मध्ये

तुमचं मन लागेल

 

मृत्यू जवळ दिसल्या नंतर

उपयोग काय ‘ नाती ‘ आठवून ?

जन्मभर का जगायचं

प्रेम आणि अश्रू गोठवून

 

आयुष्य फार छोटं आहे

दिवस भुर्रकन उडून जातील

Whats app , Face book वरून

फक्त ” R I P ” चे मॅसेज येतील

 

रक्ताच्याच नात्या मधील

काही डोळ्यात पाणी असेल

तुमच्या लेकरां-बाळा जवळ

काका , आत्या , मावशीच असेल

 

मतभेद जरी असतील काही

बसून , बोलून संपऊन टाका

ताठरपणा सोडून देऊन

बहीण , भावाला मारा ” हाका “

 

Week end ला मॉल मध्ये

Aim less भटकू नका

आपलं काही चुकतंय का ?

थोडं तपासून तर बघा

 

मनाचं रंजन करण्यासाठी

माणूसच लागत असतो

संपत्ती कितीही असली तरी

” गप्पाची भीक ” मागत असतो

 

नशिबाने मिळालेली

प्रेमळ नाती तोडू नका

आपलं काही चुकतंय का ?

थोडं तपासून तर बघा .

 संग्राहिका- वृषाली मोडक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ त्रा ता ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 त्रा ता ! 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

ताप वैशाख वणव्याचा 

साहवेना मजला आता,

बोले येऊन काकुळतीस

काळी भेगाळली माता !

 

जीव सुखला तुजवीण

रुक्ष लाव्हारुपी झळांनी,

अंग अंग पेटून उठले

मागू लागले सतत पाणी !

 

बीज कोवळे पेरणीचे

मज गर्भात आसुसलेले,

कधी होईल जन्म माझा

सारखे विचारू लागले !

 

चार थेंब पडता तुझे

तप्त साऱ्या अंगावरती,

हवा हवासा मृद् गंध

पसरेल साऱ्या आसमंती !

 

नांव सार्थ करण्या माझे

सकलांची धरणी माता,

नाही तुझ्याविना जगात

मज दुसरा कुणी त्राता !

© श्री प्रमोद वामन वर्तक

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नाट्यपद ☆ गो.ब.देवल ☆

?  कवितेचा उत्सव ? 

☆ नाट्यपद ☆ गो.ब.देवल ☆

धन्य आनंददिन पूर्ण मम कामना

मुदित कुलदेवता सफल आराधना

 

लाभ व्हावा जिचा लोभ धरिला महा

प्राप्त मज होय ती युवती मधुरानना.

 

गो.ब.देवल.

नाटक संगीत संशयकल्लोळ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #142 ☆ अत्तर उडून गेले ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 142 ?

☆ अत्तर उडून गेले 

आता नव्या पिढीला मिळणार मोकळेपण

बंधन नसेल आणिक कोणी नसेल राखण

 

बांधीलकी कशाला आकाश स्वैर आहे

स्वीकार कलियुगाला व्यापार मुक्त धोरण

 

उघड्या कुपी मधूनी अत्तर उडून गेले

वेळीच या कुपीचे मी लावले न झाकण

 

नाही सकसपणा हा कोठेच राहिलेला

हे राज्य भेसळीचे मिळणार काय पोषण

 

नाही शुभंकरोती गीता न वाचली मी

संस्कार भावनांचे व्हावे कुठून रोपण

 

बोलू नकोस वेड्या त्यांच्या विरूद्ध काही

नेते करो कितीही अश्लाघ्य रुक्ष भाषण

 

दाणा कसा टिपावा पक्षास ह्या कळेना

हुसकून लावण्याला आहे तयार गोफण

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शोध… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ शोध … ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

सागराला भेटण्याच्या ओढीने

त्याच्या मनाचा तळ शोधत

त्यात आपलं मन गुंतवत

 कित्येक वर्षाच्या तपश्चर्येने

नदी झेपावली

उंच कड्यावरून उड्या मारत

अंतरात काटेसराटे साठवत

विरहाचं अंतर कापत कापत

अखेर ती पोचली

सागर किनाऱ्याजवळ

सागरानं तिला आपल्यात घेतलं

आणि

तिचं नदीपण संपूनच गेलं

आता ती स्वतःला शोधते आहे

आपल्याच उगमाजवळ..!

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनाचे श्लोक (निवडक) ☆ आचार्य प्रल्हाद केशव अत्रे ☆

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

?  कवितेचा उत्सव ? 

☆ मनाचे श्लोक (निवडक) ☆ आचार्य प्रल्हाद केशव अत्रे ☆

मना,नीट पंथे कधीही न जावे

नशापाणी केल्याप्रमाणे चलावे

जरी वाहने मागुनी  कैक येती

कधी ना तरी सोडिजे शांतवृत्ती!

           *      *   *

सदा खाद्यपेयावरी हात मारी

बिले देई सारून मित्रासमोरी

“अरेरे,घरी राहिले आज पैसे-“

खिसे चाचपोनी मना बोल ऐसे !

          *        *   *

इथे पायगाडी तिथे वाद्यपेटी

इथे पुस्तके वा तिथे हाथकाठी

अशी सारखी भीक मागीत जावे,

स्वताचे न काही जगी बाळगावे !

          *      *   *

जिथे चालल्या खाजगी कानगोष्टी

उभी आणि धेंडे जिथे चार मोठी,

मना,कान दे तोंड वासून तेथे,

पहा लागतो काय संबंध कोठे !

          *       *   *

 – आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे #84 ☆ आयुष्याच्या वाटेवर… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 84 ? 

☆ आयुष्याच्या वाटेवर… ☆

आयुष्याच्या वाटेवर, हसून खेळून जगावे

आयुष्याच्या वाटेवर, जीवन गणित पहावे..!!

 

आयुष्याच्या वाटेवर, खाच खळगे असतील

आयुष्याच्या वाटेवर, ठेचा खूप लागतील..!!

 

आयुष्याच्या वाटेवर, मित्र शत्रू बनतील

आयुष्याच्या वाटेवर, साथ सर्व सोडतील..!!

 

आयुष्याच्या वाटेवर, सिंहावलोकन करावे

आयुष्याच्या वाटेवर, वाईट सर्व सोडावे..!!

 

आयुष्याच्या वाटेवर, आपलेच आपण बनावे

आयुष्याच्या वाटेवर, स्वतः स्वतःचे डोळे पुसावे..!!

 

आयुष्याच्या वाटेवर, पुन्हा वळण नसते

आयुष्याच्या वाटेवर, आठवण फक्त उरते..!!

 

आयुष्याच्या वाटेवर, श्रीकृष्ण फक्त स्मरावा

आयुष्याच्या वाटेवर, राज-योग मिळावा..!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares