मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मी राजा, तू राणी माझी… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ मी राजा, तू राणी माझी… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

(एक वास्तव)

आठवते का? काय आपुले ठरले होते! लग्नानंतर पहिल्या रात्री ?

स्पर्श बावरा वारा होता, साक्षीला अन्,

खिडकीच्या कानात सुगंधी फाया होता रातराणीचा

लाज हरवली होती गगनी ताऱ्यांनीही,

मिठी अनामिक पडली होती, श्वासांनाही… आठवते का?

 

त्या भेटीतच रचले होते, उंच मनोरे, स्वप्न फुलांचे !

म्हणालीस तू, या काळाच्या वटवृक्षावर,

बांधू आपण घरटे सुंदर, असेल ज्याला नक्षत्रांची सुंदर झालर,

इंद्रधनुची कमान त्यावर, गारवेल अन्,

कौलारांवर, वेलींच्या वेलांट्या असतील,

आणि मनोहर, दोन पाडसे गोजिरवाणी, बागडतील मग साऱ्या घरभर,

मीही म्हणालो, “हो गं!” होईल सारे मनासारखे,

आणि सहेतुक, एक जांभई दिली खुणेची,

हसलीस तू, मग मिटले डोळे… आठवते का?

 

हळू लागलो कानी नंतर, सलज्ज वदली तूही मग ते –

चावट कुठले – मी नाही गं अधीरता ती,

आणि हरवली कुशीत माझ्या, रात्र लाजरी… आठवते का?

 

अशाच रात्री आल्या गेल्या, कुठे हरवल्या? कुणांस ठाऊक?

उरल्या केवळ आठवणी त्या – गंध हरवल्या निर्माल्यागत –

उभारले घरकुल आपुले – पण उघड्यावर,

नक्षत्रांची होती झालर, अधांतरावर,

आणि पाडसे गोजिरवाणी – हमरस्त्यांवर,

नित्य उद्याचे स्वप्न पाहिले, ज्या नयनांनी,

त्या नयनांच्या पाणवठ्यावर, व्यथा मनाच्या भरती पाणी,

घट भरतो अन् भविष्यात भटकते, पुन्हा ती, आस दिवाणी,

आणि बरे कां ! त्या आशेच्या साम्राज्याचा

मी राजा, तू राणी माझी ! …..

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #145 ☆ शब्द ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 145 – विजय साहित्य ?

☆ शब्द ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

शब्द  असा

शब्द तसा

सांगू तुला

शब्द कसा?

माणुसकीच्या

ऐक्यासाठी

पसरलेला

एक पसा. .. . !

 

शब्द  अक्षरलेणे

देऊन जातो देणे

ह्रदयापासून

ह्रदयापर्यंत

करीत रहातो

जाणे येणे. . . . !

 

शब्द  आलंकृत

शब्द सालंकृत.

मनाचा आरसा

जाणिवांनी

सर्वश्रृत.. . . . !

 

कधी येतो

साहित्यातून

तर कधी

काळजातून.. . !

 

शस्त्र होतो कधी

कधी श्रावण सर

शब्द म्हणजे

कवितेचे

हळवे ओले

माहेरघर.. . . .!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #129 – काळोख…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 129 – काळोख…! ☆ श्री सुजित कदम ☆

काल पर्यंत

अंधाराला

 घाबरणारी

माझी माय

आज

माझ्या

डोळ्यांच्या आत

मिट्ट काळोखात

जाऊन बसलीय…!

पुन्हा कधीही

उजेडात

न येण्यासाठी…!

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सीमोलंघन… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ सीमोलंघन… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

सीमेवरती लढणा-यांचे स्मरण करूया जरा

ज्यांच्यायोगे सदैव आहे सुरक्षित ही धरा.

 

ओलांडून आपुल्या प्रदेशा

अलंकारूनी नव गणवेशा

पाठ फिरवता पाहत नाहीत पुन्हा आपुल्या घरा

 

कर्तव्याचे करण्या पालन

करण्या शत्रूचे निर्दालन

हासत हासत तळहातावर धरती अपुल्या शीरा

 

सीमोलंघन जगावेगळे

मायेचे ते पाश सोडले

लुटून सोने विजयाचे उजळती अपुला दसरा

 

विजयश्रीचा लावूनी टिळा

भारतभूचा माथा उजळा

तुम्ही सुरक्षित अपुल्या घरटी परतून या माघारा

 

सीमेवरती लढणा-यांचे स्मरण करूया जरा.

सीमेवरती लढणा-यांचे स्मरण करूया जरा.

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 152 ☆ चेतना… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 152 ?

☆ चेतना… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

 कशी सांग आता करू अर्चना

करावी कशी सांग आराधना

 

तुझी मूर्त आहे मनीमानसी

असे प्रीत माझी खरी साधना

 

करू मी कशाला व्रते ,याचना

असे श्वास माझा तुझी प्रार्थना

 

 भवानी तुला काय मागू पुन्हा

तुला माहिती नेमक्या भावना

 

 असे स्वामिनी तू कुळाची सदा

  वसे नित्य देही तुझी चेतना

 

तुझी सेविका मी तुझी बालिका

महामाय,रक्षी अशा बंधना

 

उभा जन्म लाभो तुझी सावली

अखेरीस स्वीकार ही वंदना !!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #158 ☆ खट्याळ वारा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 158 ?

☆ खट्याळ वारा… 

दुसऱ्यासाठी भरून माझं मन येईल का ?

नभासारखं मातीत ते विरून जाईल का ?

 

कधीतरी या देहाच माझ्या झाड होईल का ?

तरूसारखी शीतल छाया देता येईल का ?

 

माझ्यामधला खट्याळ वारा श्वास होईल का ?

हृदयी थोडीशी जागा मज घेता येईल का ?

 

दीन दुबळ्यांची भूक समजून घेईल का ?

जात्यामधली भरड थोडी होता येईल का ?

 

पार करुनी दगड धोंडे जाता येईल का ?

शुद्ध वाहते तशीच माझी नदी होईल का ?

 

कोकिळ गातो तसेच मला गाता येईल का ?

लता, रफीचा आवाज मला होता येईल का ?

 

डबक्यातून बाहेर मला जाता येईल का ?

मिठीत सागरा तुझ्या मला येता येईल का ?

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रोज थोडाथोडा मरतोय – कवयित्री : सुश्री रश्मी  त्रिवेदी – मुक्तानुवाद :श्री सॅबी परेरा ☆ प्रस्तुति – सुश्री दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ रोज थोडाथोडा मरतोय – कवयित्री : सुश्री रश्मी  त्रिवेदी – मुक्तानुवाद :श्री सॅबी परेरा ☆ प्रस्तुति – सुश्री दीप्ती गौतम ☆

मी कधी कधी अंधाऱ्या रात्री

माझ्या अंतरात्म्याच्या नाकासमोर सूत धरतो

आणि खात्री करतो त्याचा श्वासोच्छवास सुरु असल्याची

कारण मला शंका आहे की . .

तो रोज थोडाथोडा मरू लागलाय

 

तारांकित हॉटेलात मी जेवणाचं बिल भरतो

मला दिसतो जवळच उभा असलेला द्वारपाल

त्याचा महिन्याचा पगार या बिलाइतका तरी असेल काय?

कॉलरवर बसलेल्या नाकतोड्यासारखा,

हा विचार मी बोटाच्या टिचकीने झटकतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

मी रस्त्याकडेच्या भाजीवालीकडून भाजी घेतो

तिचा मुलगा छोटू, कांदे निवडून देतो

छोटू शाळेत का जात नसेल?

फुकट घेतलेल्या कढीपत्त्या बरोबर

हा प्रश्नही मी पिशवीतल्या भाजीखाली कोंबतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

डिझायनर कपडे चढवून मी गाडीतून जात असतो

बसल्या बसल्या गुटखा खात असतो

सिग्नलवर मळक्या, फाटक्या वस्त्रातली भिकारीण दिसते

थुकण्यासाठी खाली केलेल्या काचेतून ती हात पुढे करते

खिशात चिल्लर न सापडल्याने मी गाडीची काच वर करतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

मी मुलींसाठी महागडी खेळणी घेऊन येत असतो

खपाटीला गेलेल्या पोटाचा अन मलूल चेहऱ्याचा

एक पोरगा रस्त्यात खेळणी विकताना दिसतो

सद्सदविवेकाच्या टोचणीपायी

एक खेळणे त्याच्याकडूनही घेतले जाते, तरीही ..

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

मोलकरणीच्या ऐवजी एक दिवस तिची शाळकरी मुलगी येते

माझ्या घरच्या कामासाठी तिने शाळा बुडविलेली असते

तिला शाळेत पाठवावं असं क्षणभर माझ्या मनात येते

मग मला उष्ट्या भांड्यांनी भरलेलं सिंक दिसतं

एकदोन दिवसाचा तर मामला आहे, मी मलाच समजावतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

रोज सकाळी एखादी ब्रेकिंग न्यूज येते

अल्पवयीन मुलीवरील बलात्काराची किंवा हत्येची

वाईट वाटते खूप, तरीही मी देवाचे आभार मानतो

कि ती अभागी अत्याचारग्रस्त,

माझी मुलगी नाहीये

आरशामध्ये स्वतःच्या नजरेला नजर द्यायलाही मी घाबरतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

जातीपातीवरून, आरक्षणावरून होणारे झगडे रोजचेच

अधूनमधून होणाऱ्या दंगलींनी मी अस्वस्थ होतो

कुठे नेऊन ठेवलाय देश माझा?

मी उद्वेगाने म्हणतो

सर्व दोष राजकारण्यांवर टाकून, हात झटकून मी मोकळा होतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

प्रदूषित हवा शहराचा गळा घोटत असताना

विकासाचा भार शहराला सोसत नसताना

मी रोज कार घेऊन ऑफिसला जातो

बस, ट्रेन, मेट्रो, कारपूल हे पर्याय असतीलही कदाचित,

एका कारने काय फरक पडतो असा विचार मी करतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

किट्ट काळोख्या रात्री जेव्हा मी

माझ्या अंतरात्म्याच्या नाकासमोर सूत धरतो

त्याचा श्वासोच्छवास सुरु पाहून मलाच आश्चर्य वाटतं

 

मग मी नव्याने, स्वतःच्या हाताने, नवनव्या मार्गाने

त्याला रोज थोडंथोडं मारू लागतो, पुरु लागतो

मूळ इंग्रजी कविता : It dies a little.

कवयित्री : सुश्री रश्मी  त्रिवेदी

मुक्तानुवाद :श्री सॅबी परेरा

संग्राहिका : सुश्री दीप्ती गौतम

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 100 ☆ परोपकार… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 99 ? 

☆ परोपकार… ☆

एक फुलपाखरू मला

स्पर्श करून गेलं

अचानक बिचारं ते

माझ्यावर आदळलं

कसेतरी स्वतःला

सावरत सावरत

उडण्याचा स्व-बळे,

प्रयत्न करू लागलं.

त्याला मी जवळ घेतलं     

स्नेहाने अलगद ओंजळीत भरलं

झाडाच्या फांदीवर

हळूच सोडून दिलं…

त्याला सोडलं जेव्हा, तेव्हा

ओंजळ माझी रंगली

पाहुनी त्या रंगाला मग

कळी माझीच खुलली

हसू मला आलं विचार सुद्धा आला,

ना मागताच मला फुलपाखराने त्याचा रंग विनामूल्य बहाल केला, 

परोपकार कसा असावा याचा निर्भेळ पुरावा मला मिळाला…!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र – भाग 3 (मूळ संस्कृत स्तोत्र व त्याचा मराठी भावानुवाद) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र – भाग 3 (मूळ संस्कृत स्तोत्र व त्याचा मराठी भावानुवाद) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री  ☆

(रचैता : शंकराचार्य  — वृत्त : दुसरी सवाई) 

करमुरलीरव वीजितकूजित लज्जितकोकिल मञ्जुमते

मिलितपुलिन्द मनोहरगुञ्जित रञ्जितशैल निकुञ्जगते ।

निजगणभूत महाशबरीगण सद्गुणसम्भृत केलितले

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१५॥ 

 

मधुर सुरांनि तुझी मुरली  करिते पिकद्विज  लज्जित  कंठा 

मधुर तुझा घुमतो स्वर पर्वतकंदर गात पुलींद पहा

शबर कुळातिल सद्गुणि चारुसवे तव  खेळ कितीक रंगे 

जय जय हे महिषासुरमर्दिनि मोहक पार्वति  सुकुंतले ||१५|| 

कटितटपीत दुकूलविचित्र मयुखतिरस्कृत चन्द्ररुचे

प्रणतसुरासुर मौलिमणिस्फुर दंशुलसन्नख चन्द्ररुचे

जितकनकाचल मौलिमदोर्जित निर्भरकुञ्जर कुम्भकुचे

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१६॥ 

 

झगमगते कटिलाच  पितांबर  चंद्र चंदेरि झळाळि तया 

मुकुटमणीहि  असूरसुरांचे झळाळित पादनखांनि तुझ्या

नगशिखरे गजशीर्ष उरोज तुझे  बघुनी लपुनी बसले 

जय जय हे महिषासुरमर्दिनि मोहक पार्वति  सुकुंतले ||१६|| 

 

विजितसहस्रकरैक सहस्रकरैक सहस्रकरैकनुते

कृतसुरतारक सङ्गरतारक सङ्गरतारक सूनुसुते ।

सुरथसमाधि समानसमाधि समाधिसमाधि सुजातरते ।

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१७॥ 

 

सहस्र करांनि सहस्रअसूरा रणातसहस्रे विजीत जशी

असूर वधीसि ग तारकसूर रिपूसि जिवा प्रसवूनी उमे

सुरथ नृपासि समाधिस  वैश्य प्रसन्न समान ग गिरीसुते  

जय जय हे महिषासुरमर्दिनि मोहक पार्वति  सुकुंतले ||१७|| 

पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योऽनुदिनं सुशिवे

अयि कमले कमलानिलये कमलानिलयः स कथं न भवेत् ।

तव पदमेव परम्पदमित्यनुशीलयतो मम किं न शिवे

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१८॥ 

 

तव करुणापदि पद्मनिवास पवित्र  असूनि उमे कमले

पदकमलांचि करीत सेवा कमला निवास प्राप्त करे

पदकमलांवर  दृष्टि खिळोनि अत्युच्च पदासि सुप्राप्त करे  

जय जय हे महिषासुरमर्दिनि मोहक पार्वति सुकुंतले ||१८|| 

 

कनकलसत्कलसिन्धुजलैरनुषिञ्चति तेगुणरङ्गभुवम्

भजति स किं न शचीकुचकुम्भतटीपरिरम्भसुखानुभवम् ।

तव चरणं शरणं करवाणि नतामरवाणि निवासि शिवम्

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१९॥ 

 

सिंचन करीत सुवर्ण झळाळि जलासि तुझीच  भक्ती भवनी 

शचिकुचकुंभ करीत सुखी जणु इंद्र तसे सुख ही मिळुनी  

तव चरणी शरणागत गौरि महान सुतागिरि देवि  शिवे 

जय जय हे महिषासुरमर्दिनि मोहक पार्वति सुकुंतले ||१९|| 

तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं सकलं ननु कूलयते

किमु पुरुहूतपुरीन्दु मुखी सुमुखीभिरसौ विमुखीक्रियते ।

मम तु मतं शिवनामधने भवती कृपया किमुत क्रियते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥२०॥ 

 

विमल शशीसम शुभ्र वदनानि वधीसि  हसूनि  दुरीत जना

नंदनवनातिल मोहकशा असुनी मज मोहविती न स्त्रिया    

शिवधन प्राप्ति कृपेविण कैसि  कधी न कुणास तशी मिळते

जय जय हे महिषासुरमर्दिनि मोहक पार्वति  सुकुंतले ||२०|| 

अयि मयि दीन दयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे

अयि जगतो जननी कृपयासि यथासि तथानुमितासिरते ।

यदुचितमत्र भवत्युररीकुरुतादुरुतापमपाकुरुते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥२१॥

 

मजसि देई तव आशिष गे जननी नगपुत्रि दयाळु रमे 

कणव असेल नसेल तरीहि  अपाप करीसि ग शैलसुते

उचित तुला गमते करुनी जवळी मजलाचि धरी गिरिजे 

जय जय हे महिषासुरमर्दिनि मोहक पार्वति  सुकुंतले ||२१||

— समाप्त —

भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री 

९८९०११७७५४

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 31 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 31 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

४८.

  पाखरांच्या मंजुळ स्वरांनी

  प्रभातसमयीचा शांत सागर उचंबळला,

  रस्त्याकडे ची फुलं आनंदानं नाचू लागली.

  ढगाढगांच्या पोकळीमधून परमेश्वराची

  दौलत पसरू लागली.

 

 मात्र या साऱ्यांकडे दुर्लक्ष करून

आम्ही आमच्या उद्योगाला लागलो.

आनंदगीतं आम्ही गायली नाहीत की

खेळलो- बागडलो नाही.

बाजारहाट करायला आम्ही गावात गेलो नाही.

 

एकही शब्द आम्ही बोललो नाही,

हसलो नाही की वाटेवर रेंगाळलो नाही.

 

जसजसा समय जाऊ लागला तसतसा

आमच्या चालण्याचा वेग वाढत गेला.

 

सूर्य माथ्यावर आला.

बदकं सावलीत जाऊन गाऊ लागली.

दुपारच्या उन्हात गिरकी खात

पिकली पानं नाचू लागली.

केळीच्या झाडाखाली बसून

मेंढपाळांची पोरं पेंगू लागली,

स्वप्नात हरवून गेली

आणि मी जलाशयाशेजारच्या गवतावर

थकलेली गात्रं पसरली.

 

माझे सोबती उपहासानं मला हसून

ताठ मानेनं न थांबता घाईघाईनं निघून गेले.

विसाव्यासाठी ते विसावले नाहीत.

दूरच्या निळाईत ते दिसेनासे झाले.

त्यांनी किती कुरणं पार केली,

किती टेकड्या पार केल्या,

दूरचे किती मुलूख पादाक्रांत केले!

 

हे शूरवीरांनो, अनिर्बंध पथाच्या प्रवाशांनो,

तुमचा जयजयकार असो!

 

तुमची चेष्टा- मस्करी ऐकून,

त्वेषाने मला उठावेसे वाटले,

पण माझ्यात उभारी नव्हती.

 

अंधूक आनंदाच्या सावलीत

सुखी अवमानाच्या गहराईत मी लुप्त झालो.

सूर्यवलयांकित पोपटी निराशेनं

माझ्यावर पखरण घातली.

 

मी कशासाठी प्रवासास

निघालो होतो कुणास ठाऊक?

विनासायास माझं मन मात्र

छाया आणि संगीत यांना शरण गेलं.

 

आणि शेवटी, जाग आल्यावर मी डोळे उघडले, तेव्हा तू माझ्या बाजूला उभा होतास.

माझी निद्रा तुझ्या स्मितानं

काठोकाठ भरून टाकत होतास.

 

मात्र मला भिती वाटली होती. . .

तुझ्याकडे नेणारा हा प्रवास. . .

किती दीर्घ पल्ल्याचा,

कंटाळवाणा आणि कठीण असेल?

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares