मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 124 ☆ प्रश्न बहु, गांभीर्याचा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 124 ? 

प्रश्न बहु, गांभीर्याचा

(स्त्रीच्या मनाची वेदना..)

स्त्रीच्या मनाची वेदना

मौन्य असते ललना

कशा मांडाव्या वेदना

शब्द तिज सापडेना.!!

 

स्त्रीच्या मनाची वेदना

प्रश्न बहु, गांभीर्याचा

जरी आहे महत्वाचा

कुणी बरे मांडायचा.!!

 

स्त्रीच्या मनाची वेदना

हर्ष तिज नसे कधी

पूर्ण आयु, कष्टी दुःखी

साहे तिची, तिचं व्याधी.!!

 

स्त्रीच्या मनाची वेदना

सल सलत राहते

वर अंगरखा छान

आत जखम असते.!!

 

स्त्रीच्या मनाची वेदना

प्रेम तिजला मिळावे

पोट मारून जगते

स्नेह भाष्य असावे.!!

 

स्त्रीच्या मनाची वेदना

राज माझे उक्त केले

शब्द प्रपंच उद्योग

ऐसे हे, लिखाण झाले.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-1 …  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-1…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

(संत श्री ज्ञानदेव महाराजांनी योगीराज चांगदेवांच्या कोर्‍या पत्राला दिलेलं उत्तर म्हणजे चांगदेव पासष्टी. संत ज्ञानदेवांच्या काळचं प्राकृत म्हणजेच मराठी आजच्या संदर्भात, सर्वसामान्य लोकांना कळायला अवघड आहे. म्हणून सुश्री शोभना आगाशे यांनी सध्या प्रचलित असलेल्या मराठीत या चांगदेव पासष्टीचं केलेलं रूपांतर प्रस्तुत करीत आहोत.)

जंव अप्रकट परमेश

विश्वाचा होतसे भास

प्रकट होई तो जेधवा

नुरे विश्व भास तेधवा॥१॥

 

अप्रकट तो जरि भासे

प्रकट परि नच दिसे

दृश्यादृश्य परे

गुणातीत असे बरे॥२॥

 

विशाल जसजसा होत

व्यापतसे तो जगत

भासचि हा परि जाणी

असुनि नसे घे ध्यानी॥३॥

 

रूपे बहु घेई जरी

अरूपातच असे खरी

अलंकार बनले जरी

सुवर्णा ना उणे तरी॥४॥

 

लाटांच्या झिरमिळ्या

सागरास पांघरल्या

भासचि हा जाण केवळ

सकळ असे निव्वळ जळ॥५॥

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रुसले ऋतू… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ रुसले ऋतू… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

उठ मानवा उठ तुझ्यावर रुसून बसला ऋतू

पहा आठवून अशी कोणती केलीस आगळीक तू

 

कळ्या फुलांची मधुर फळांची केली तुजवर वर्षा

दंडित मंडित केलीस सृष्टी काय तुझी ही तृषा

 

इर्षा होती तुझ्या मनासी सृष्टीला या करू गुलाम

गगनाला ही लगाम घालू करतील तारे तुला सलाम

 

का नियतीला दावितोस तू विज्ञानाचा ताठा

तव गर्वाने विराण झाल्या हिरव्या पाऊल वाटा

 

गर्जतील ना मेघ नभातून नृत्य ना करतील मोर वनातून

शेतमळे ना पिकतील आता उतरलास तू सृष्टीच्या मनातून

 

झटपट श्रीमंती सुखसोयी म्हणजे नोहे खरा विकास

हव्यासाच्या पाईच तुझिया वसुंधरा जाहली भकास

 

जे देवाने दिले भरभरून त्याचा नीट करी सांभाळ

विनम्र हो तू नियती पुढती सौख्याचा होईल सुकाळ

 

सगळे काही मानवनिर्मित दे सोडून ही दर्पोक्ती

या गगनातून आनंदाचे मेघ बरसतील तुज वरती

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सावळ्या… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? कवितेचा उत्सव ?

☆ सावळ्या… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

तुझिया मागुनि, येईन त्यागुनि

निरर्थ या तनुला

सावळ्या नेशील का रे मला॥

 

प्रथम भेट तव बालपणीची

खोडी काढिसी गोपगोपींची

चोरी करिसी नवनीताची

विश्व दाविसी तुझ्या मुखातुनि

माय यशोदेला

सावळ्या नेशील का रे मला॥

 

चाहुल येता तारुण्याची

हुरहुर लावी धुन मुरलीची

अमूर्त मूर्ती तव रूपाची

वाटे येशील घन मेघातुनि

भिजवशील मजला

सावळ्या नेशील का रे मला॥

 

ऊन सावली संसाराची

आस नुरे मग तुझ्या भेटीची

कसरत असुनि तारेवरची

लिप्त जिवाला त्यातच करुनि

विसरुनि जाई तुला

सावळ्या नेशील का रे मला॥

 

ओढ लागता पैलतीराची

वेणुरवाची, तव भासाची

अता विनवणी ही शेवटची

वक्षी तुझ्या घे मला कवळुनि

जवळुनि पाहीन तुला

सावळ्या नेशील का रे मला॥

 

क्षण अखेरचे वेळ भेटीची

क्षितिजा नक्षी मोरपिसाची

कारुण्य पाझरे ओळ ढगांची

अनंग तुझिया अंगांगातुनि

वेढशील का मला

सावळ्या नेशील का रे मला॥

 

तुझिया मागुनि, येईन त्यागुनि

निरर्थ या तनुला

सावळ्या नेशील का रे मला॥

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – आनंदाचे फुटती झरे… – ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आनंदाचे फुटती झरे  ? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

खाली वाटा,वरती लाटा

धुक्यातूनी उठती

दूर बोगदा जया अंतरी

अंधाराची वस्ती

जरी एकटा, जाईन चालत

भेदून अंधाराला

दिसेल कैसा प्रकाश त्याला

तमात जो गुरफटला

पार करावी सगळी वळणे

सोडून सारे भले-बुरे

जगणे झाले फत्तर तरीही

आनंदाचे फुटती झरे

© सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गंध… ☆ सौ. नेहा लिंबकर ☆

सौ. नेहा लिंबकर

? कवितेचा उत्सव ?

☆ गंध… ☆ सौ. नेहा लिंबकर ☆

गंध मोगऱ्याचा, चाफ्याचा,  गुलाबाचा 

मंद  मंद त्या वासाचा

 

गंध मृदगंधाचा, पावसाच्या सरींचा

गंधाळलेलया धुंद वार्‍याचा

 

गंध पराक्रमाचा,  वीरांचा

इतिहासाचे क्षण  जपण्याचा

 

गंध कोऱ्या करकरीत पुस्तकांचा

वाचनाने समृद्ध होण्याचा

 

गंध आजीच्या गोधडीचा

उबदार मायेत लपेटण्याचा

 

गंध आईच्या ममत्वाचा

कधीच न संपणाऱ्या मायेचा

 

गंध सप्त सुरांच्या मैफिलीचा

मंत्र मुग्ध श्रवण भक्तीचा

 

गंध उपासनेचा,  पूजेचा

निर्गुणा पर्यंतच्या प्रवासाचा

 

गंध अन्नपूर्णेच्या रसाचा

चवी चवीने  तृप्त होण्याचा

 

गंध  हाकेच्या  मैत्रीचा

मनमोकळ्या गप्पांचा अन् खळखळून हसण्याचा

 

गंध  हिरव्या मायभूचा अन् देशाचा

अभिमानाने मान उंचावण्याचा

 

गंध  सर्व आप्त परिवाराचा

नात्यांचा भावबंध बहरण्याचा

 

रंगुनीया गंधात  साऱ्या

गंधमय जीवन जगण्याचा…

 

© सौ.  नेहा लिंबकर

पुणे 

मो – 9422305178

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 146 – कहाणी माई बाबांची ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 146 – कहाणी माई बाबांची ☆

पाहून दुःखीतांची व्यथा  

कळवळले बाबांचे मन।

माईनेही दिली साथ

सोडून सारे मोह बंधन।

नाही किळस वाटली भळभळत्या जखमांची।

 

फाटक्या कपड्यांची,

नि झडलेल्या बोटांची ।

सुसंस्कृतांनी बहिष्कृत

केलेल्या कुष्ठरोग्यांची ।

 

असाह्य पिडीत जीवांची

जाणून गाथा या जीवांची।

धुतल्या जखमा आणि

केली त्यांनी मलमपट्टी ।

 

घातली पाखरं मायेची 

केली वेदनांशी गट्टी ।

अंधारी बुडलेल्या जीवांना

दिली उमेद जगण्याची ।

 

पाहून अधम दुराचार

लाहीलाही झाली मनाची।

हजारोने जमली जणू

फौजच ही दुखीतांची

 

रक्ताच्या नात्यांने नाकारले

तीच गत समाजाची ।

कुत्र्याची नसावी अशी

तडफड पाहून जीवांची।

दुःखी झाली माई बाबा ऐकून कहानी कर्माची ।

 

पोटच्या मुलांनाही लाजावे

अशी सेवा केली सर्वांची ।

जोडली मने सरकारनेही

दिली साथ मदतीची ।

 

स्वप्नातीत भाग्य लाभले।

नि उमेद आली जगण्याची।

आनन्द वन उभारले।

माणसं मिळाली हक्काची ।

 

अंधारच धुसर झाला नि

प्रभात झाली जीवनाची ।

देवही करी हेवा अशीच

करणी माई आणि बाबांची ।

 

आम्हालाच किळस येते

तुमच्या कजट विचारांची।

तुमच्या कुजट विचारांची।

तुमच्या कुजट विचारांची ।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गुढीपाडवा… कवयित्री : सुश्री विपाशा रवींद्र ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ गुढीपाडवा… – कवयित्री : सुश्री विपाशा रवींद्र ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

अर्वाचिन संपदेला हिंदु संस्कृतीच जपती !

हिंदुकुशाते हिंदुसागरी वर्धिली हिंदु संस्कृती ! १-

 

आसेतु हिमाचल भ्रमण साधु संतांनी केले !

समृध्दी निर्मितीकरितां हजारो वर्ष ते झटले ! २-

 

हीनं दुष्यति इति हिंदु ! ऋग्वेदचि ठरे आपद्धर्म !

हीन त्यागतो !शत्रूस नमवितो तोच खरा हिंदु धर्म ! ३-

 

एक पत्नी एक वचनी कौसल्येचा राजा राम !

पितृवचन पालन करण्या वनवासी जाला राम ! ४-

 

चौदा वर्षे दंडकारण्ये ऋषिमुनींना अभय देई राम !

जनकल्याणास्तव खलनिर्दालन करितो राम ! ५-

 

राजधर्म पालन करणे प्रथमकर्तव्य रामाकरता !

पतिव्रता सीता करिते अग्निदिव्य रामाकरता ! ६-

 

रामासंगे सीता येतां धन्य जाले अयोध्याजन !

गुढ्या तोरणे उंच उभारतां जणु भासले आनंदवन ! ७-

 

कळक दावितो साधेपणा कलश तो समृध्दी वैभव !

काठपदरी घरपण बत्तासे कडुनिंब दावि आगळा भाव ! ८-

 

नरेंद्र लढतो सकल जनकल्याणार्थ !

नेणिवेने जाणिला जपला हाच असे परमार्थ ! ९-

 

अयोध्या मंदिर काशी विश्वेश्वर मुक्ती करती !

जाणवली दिव्यत्वाची येथ प्रचिती ! १०-

 

आठवे विनायकी विचार ! शस्रसिध्द राष्ट्रनिर्माण !

नरेंद्र दावितो सिध्दचि करितो साधुनि जनकल्याण ! ११-

 

तत्व स्वत्व नि स्वधर्म रक्षिण्या लढा देऊ या एकदिलाने !

उभवू या पुन्हा गुढ्यातोरणे ! जरिपटका तो सन्मानाने !

       …… जरिपटका तो सन्मानाने ! १२— 

 

कवयित्री : सुश्री विपाशा रवींद्र

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माझ्या दूर गेलेल्या प्रिय चिमणीसाठी…  – लेखिका : सुश्री योगिनी पाळंदे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ माझ्या दूर गेलेल्या प्रिय चिमणीसाठी…  – लेखिका : सुश्री योगिनी पाळंदे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

(20 मार्च…जागतिक चिमणी दीन — दिन नव्हे दीनच—) 

माझी आवडती, कष्टकरी चिमणी बघता बघता निर्घर झाली, दिसेनाशी झाली— वळचणी रिकाम्या करून,अदृश्य झाली —  मोबाईल टॉवरवाल्यांसाठी आता फक्त अस्थमॅटीक कबुतरं उरली…….

माझ्या दूर गेलेल्या प्रिय चिमणीसाठी —- 

टुण टुणी चिमणी

टुण टुणी चिमणी

कुळ कुळ करडी

मणी मणी डोळ्यांनी

लुक लुक बघुनी

वण वण फिरुनी

कण कण वेचूनी

इलु इलु चोचीनी

टिप टिप टिपुनी 

काडी काडी जोडुनी

खपू खपू लागुनी 

मऊ खोपा बांधुनी

घर घर सजुनी

लुसलुशी पिल्लांना 

मऊ किडा भरवी

टुण टुणी चिमणी

टुण टुणी चिमणी

रोज रोज दिसली

चिव चिव ऐकली

दाणे दाणे टाकुनी

घरी दारी नाचली 

आणि काही वर्षांनी …

टॉवरल्या अंबरी

धूर धूर गगनी

रण रण पेटूनी 

उष्ण उष्ण वाफुनी

जीर्ण जीर्ण झाडूली 

शीर्ण शीर्ण पानुली

शीण शीण होऊनी

पळ पळ पळाली

दम दम दमली

झीज झीज झिजली

थक थक थकली

रित्या रित्या घरटी

तिळ तिळ रडली

पुन्हा घर शोधूनी

लांब लांब उडाली

सुन्न झाली बेघरी

नाही आली माघारी

टुण टुणी चिमणी

गुणी गुणी चिमणी

शोध शोध शोधली

पुन्हा नाहीं दिसली

सुन्यासुन्या वळचणी 

सुकलेल्या आठवणी …

 

लेखिका : सुश्री योगिनी पाळंदे

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एका आईचं मनोगत… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

? कवितेचा उत्सव ?

☆ एका आईचं मनोगत… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक ☆ 

(श्रीराम यांच्यासह रामायणातील काही पात्रांवर सगळीकडे वेगवेगळ्या पध्दतीचं लिखाण होत आहे. अनेकजण विविध पोस्ट, व्हिडिओ पाठवतात.रामायणातील एक पात्र- माता कैकेयी. तिचं मनोगत एका कवितेतून मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. – सतीश शिरसाठ) 

राज्याभिषेकाचा डाव मोडून,

श्रीरामांनी वनाचा रस्ता धरला

तेव्हा ;

लोकप्रेम आणि लोकक्षोभाच्या वणव्यात

मी होरपळले होते.

महाराजांची  तडफड पाहून

मी कळवळले होते.

पण क्षणभरच !

 

आठवले होते,

एका घनघोर युध्दात

महाराजांची मी

ढाल झाले होते.

रामलक्ष्मणांच्या बाळलिलांनी

मी सुखावत  होते.

आकाशातले तारे वेचून

त्यांना खेळायला मी देत होते.

उर्मिला आणि सीतेला

मी माहेर आणून दिले होते.

 

कसं सांगू ?

वासरासाठी गायही शिंगं उगारते;

आईपण जगताना,

राजधर्म मी विसरले होते.

 

श्रीरामाच्या वनगमनानं

नियतीनं मला खलनायिका केलं .

रामप्रासादात कुणाच्याही

डोळ्याला डोळा

मी भिडवू शकले नाही,

अगदी मंथरेच्याही !

तरीही,

नव्हता खेद त्याचा मला.

 

तू आलास,

तुझ्या बंधुप्रेमाच्या  तेजाने-

दिपून गेले मी;

बाळा,

गुन्हेगार मी आयोध्येची,

महाराजांची आणि

इतिहासाची;

पण हे भविष्या,

तू तरी मला समजून घेशील का ?

 

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares