मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ॥ लकी आजोबा॥ ☆ प्रस्तुती – जुईली अमोल ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ ॥लकी आजोबा॥ ☆ प्रस्तुती – जुईली अमोल ☆

शाळा नाही,

दप्तर नाही

अभ्यास नाही,

परीक्षा नाही

पाढे नाही,

गृहपाठ नाही

आजोबा कसले 

लकी आहेत नाही॥१॥

ऑफीस नाही,

लँपटॉप नाही

रोजचा त्रासदायक 

प्रवास नाही

आई आजी सारखा 

स्वयंपाक नाही

आजोबा कसले 

लकी आहेत नाही॥२॥

सारखा फोन 

नाही तर पेपर

फार तर बँकेत 

एखादी चक्कर

कुठेही जा म्हटलं

की काढतात स्कूटर

आजोबा कसले 

लकी आहेत नाही॥३॥

मित्र जमवतात,

सहली काढतात

देश परदेश 

फिरुन पाहतात

येतांना आम्हांला 

गंमत आणतात

आजोबा कसले 

लकी आहेत नाही॥४॥

नमस्कार केला की 

काहीतरी पुटपुटतात

आपल्याला नेहमीच 

शाबासकी देतात

चष्मा स्वत: हरवतात 

अन् दुसऱ्यांना 

शोधायला लावतात

आजोबा कसले 

लकी आहेत नाही॥५॥

सर्व आजोबांना समर्पित….

संग्राहिका : जुईली अमोल

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माणूस ती… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

माणूस ती..! ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

ना गंगा भागिरथी। ना सौभाग्यवती 

स्वतंत्र, सक्षम व्यक्ती । माणूस ती ।

 

लक्ष्मी ना सरस्वती । ना अन्नपूर्णा, 

सावित्रीची लेक । माणूस ती ।

 

गृहिणी, नोकरीधारी । कुटुंब असेल

वा असेल एकटी । माणूस ती ।

 

शिक्षित,अशिक्षित । गरीब, श्रीमंत 

सशक्त वा दुर्बल । माणूस ती ।

 

दुर्गा,अंबिका । कालिका, चंडिका

देव्हारा नको । माणूस ती ।

 

प्रजननक्षम तरी । नाकारेल आईपण

निष्फळ वा ट्रान्सजेन्डर। माणूस ती !

 

काळी वा गोरी । कुरूप वा सुंदरी

विदुषी वा कर्तृत्ववान । माणूस ती !

 

पूजा नको । दुय्यमत्व नको

समतेची भुकेली । माणूस ती !

 

ना अधिकार कुणा ।  छळण्याचा

गर्भात संपवण्याचा । माणूस ती ।

 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 129 ☆ अष्ट-अक्षरी…ऊन पावसाचा खेळ… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 129 ? 

☆अष्ट-अक्षरी…ऊन पावसाचा खेळ

ऊन पावसाचा खेळ

जाणा जीवनाचा सार

नका करू वळवळ

वेळ बाकी, थोडा फार.!!

 

ऊन पावसाचा खेळ

सुख दुःख रेलचेल

कधी हसावे रडावे

मन असते चंचल.!!

 

ऊन पावसाचा खेळ

उष्ण थंड अनुभव

सर्व असूनी परंतु

राहे सदैव अभाव.!!

 

ऊन पावसाचा खेळ

सुरु आहे लपंडाव

अश्रू येतात डोळ्याला

काय निमित्त शोधावं.!!

 

ऊन पावसाचा खेळ

भासे दुर्धर कठीण

राज अबोल अबोल

तोही स्वीकारी आव्हान.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-5… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-5…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

अविद्ये भासे त्रिधा

संवित्ति परि नासे भेदा

जाणिजे त्रिपुटीचा अभेद

ज्ञानावाचून भासेल भेद

त्रिपुटी जरी का अभेद

कां वागवे तो हा भेद?

वागवे तो,अज्ञानींसाठी

ज्ञाने मावळे दावीआधी ती॥२१॥

 

अविद्ये दृश्याचा अविर्भाव

त्यायोगे द्रष्टत्व होई संभव

दृश्य द्रष्ट्यात अंतर नसता

दृष्टी पांगळी होई पाहता॥२२॥

 

दृश्य असे तेथे द्रष्टत्व

दृश्य नसता कैसे द्रष्टत्व

दृश्य नसता दृष्टीज्ञान

कोणा करी प्रकाशमान॥२३॥

 

दृश्यापाठी दृष्टत्व येई

दोहींच्या योगे दर्शन होई

विचारे दृश्यत्व नाश पावता

द्रष्टा दृष्टी भावाची नष्टता॥२४॥

 

एवं अविद्ये कारणे त्रिपुटी

ज्ञानमार्गे ती मावळे उठाउठी॥२५॥

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “म्यान” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “म्यान” ☆ श्री आशिष मुळे ☆

काळाच्या नवीन लढाईत आता

धार निरर्थक झाली आहे

संपलेल्या आव्हानांना आता

शरण मी गेलो आहे

 

जिंकून जगण्याचा दिवस आता

मावळतीला लागला आहे

जिंकूनही हरण्याची रात्र आता

वीरांच्या नशिबात आहे

 

का लढतोय कोणासाठी लढतोय

याला आता अर्थ नाही

सगळेच पराजित येथे

कोणालाच कुठले सुतक नाही

 

काळाच्या या झुंडी समोर

माझ्यातला मी हतबल आहे

तुटलेली तलवार मी आता

म्यान काळजात केली आहे

 

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव  ☆ “लाटा” ☆ स्वैरअनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “लाटा” ☆ स्वैरअनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

(सद्गुरू श्री जग्गी वासुदेव यांच्या इंग्रजी कवितेचा स्वैरअनुवाद.) 

अलाई अलाई, अलाई अलाई, अलाई अलाई रे … 

लाट जणू लाट .. ही तर लाट आहे रे ….

धावे मन शोध घेत…  आनंदाचा रे …. 

आयुष्य नेमके कसे .. परि ठावे नसे रे ….  

हैय्या हो …. हैय्या हो ……                                                    

                                                       

इच्छा जन्मे मनी जणू इवली मासोळी 

भान तिचे सुटे नि आता केवढी वाढली ….

बघता बघता अन आता ती ‘व्हेल’च झाली… 

मनोमनी आणि क्षणी मोहरूनी गेली …. 

 

व्हेल हाती लागला.. पण हाव संपेना 

अजून एक मासोळी हवी .. हट्ट थांबेना …. 

इच्छांच्या लाटांवर मन स्वैर उसळे … 

आणि नाव आकांक्षांची.. सदा तिथे डुले …. 

 

लाटा उफ़ाळत्या तशी काळजाची धडधड … 

आणखी पुढे जाण्यासाठी.. जीवाची तडफड …. 

समुद्राची ती वरवरची सळसळ… लाटा वरवर रे … 

आणि ‘ मुक्त ‘ मासोळ्या त्या.. खोलखोल फिरती रे …. 

 

इच्छा म्हणजे मनातले रे .. वरवरचे तरंग … 

खोल आत सळसळती …आनंद तरंग …. 

एवढे तरी समजून घे … माणसा मनात रे … 

तुझ्यातच दडलाय परमानंद .. नकळत जाणवेल रे …. 

 

मग सगळ्या लाटा आनंदमयी .. तुलाच उमजेल रे … 

तुझ्यातच दडलाय परमानंद … खात्री पटेल रे …. 

तुझ्यातच दडलाय परमानंद … खात्री पटेल रे ….

हैय्या हो …. हैय्या हो ……..  

 

सद्गुरू श्री जग्गी वासुदेव 

स्वैरअनुवाद: सुश्री मंजुषा सुनीत मुळे.  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ प्रति बिंब स्वत:च्या… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? प्रति बिंब स्वत:च्या… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल

दंड थोपटूनी असे का आज

वृक्ष वृक्षापुढे उभे ठाकले

दंडच त्यांना ठोकला पाहिजे

का माणसासम वागू लागले॥

डोळे उघडून पहावे जरा

हे हात हातात घेत आहेत

डोळेझाक तू करू नकोस रे

तुला छान धडा देत आहेत॥

छत्र तुझ्या घरावरचे डोले

सावली करण्या उन्हेही झेले

छत्र जणू वडिलधार्‍ंयांचे हे

डोई हात फिरवत राहिले॥

कर  निश्चय झाडे लावण्याचा

प्राणवायू प्रमाण जपण्याचा

कर चैतन्याचे फिरती पाठी

घ्यावा मंत्र निरोगी आयुष्याचा॥

प्रति आयुष्याच्या व्हावे कृतज्ञ

सांजेस अंतरंगी डोकवावे

प्रति बिंब स्वत:च्या सत्कर्माचे

त्यात स्वच्छ नी सुंदर दिसावे॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अंतर्नाद…. ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ अंतर्नाद… ☆ श्रीशैल चौगुले ☆

नभ बोलते अक्षराशी

अब्द होती शब्द माझे

ज्ञान ऋतु बरसतो

चिंब होई काव्य माझे.

 

व्यास लेखणीत उतरे

सरस्वती माय ओळी

हळुवार शब्द पीसे

टोकदार भक्ती कळी.

 

मन सृष्टीत भटके

इंद्रधनु रंग रचा

भाव प्रकट सहज

सूर्य-चंद्र दान रुचा.

 

जीवन सफल साद

निर्मळ समुद्र स्पंद

लाटांना पुर्ण विराम

काव्याचा तीर आनंद.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 150 – हा मार्ग संकटांचा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 150 – हा मार्ग संकटांचा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

हा मार्ग संकटांचा, अंधार दाटलेला।

शोधूकसा निवारा, जगी दंभ दाटलेला।धृ।।

हे मोहपाश सारे, अन् बंध भावानांचे।

मी दाखवू कुणाला, आभास वेदनांचे।

प्रेमात ही आताशा, हा स्वार्थ साठलेला।।१।।

लाखोत लागे बोली, व्यापार दो जिवांचा।

हुंड्या पुढे अडावा, घोडा तो भावनांचा ।

आवाज प्रेमिकांचा, नात्यात गोठलेला।।२।।

ही लागता चाहूल, अंकूर बालिकेचा।

सासूच भासते का, अवतार कालिकेचा।

खुडण्यास कळीला, हा बाप पेटलेला।।३।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुंबईतील नोकरदार भगिनींची कथा/व्यथा… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ मुंबईतील नोकरदार भगिनींची कथा/व्यथा… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सात पस्तीस मिळावी म्हणून पाच पस्तीसला उठणा-या बायका……….

 

योगा, वॉक, आरामाची स्वप्नं

वर्षानुवर्षे डोळ्यात राखत

 

निर्दयी अलार्मचा कान पिळून

ताडकन, काटकोनात उठत

 

‘आज पुन्हा उशीरच, ‘ असा

स्वतःला दोष देत

 

स्वयंपाकपाणी झपझप आवरतात

 

तयार होतात – सुसाट पळतात

हा प्लॅटफॉर्म, तो प्लॅटफॉर्म

चढतात – उतरतात

 

सात पस्तीस शिताफीने

गाठणाऱ्या बायका!

 

सात पस्तीस मिळावी म्हणून

पाच पस्तीसला उठणा-या बायका……….

🚃🚋

गर्दी असतेच

पण, मैत्रिणी असतात

काही बसतात,

काही उभ्या राहतात

 

तीन सीटच्या बेंचवर

चौथी सीट तयार करत

ढकलतात, बुकलतात

 

‘झोपच नाही झाली आज, ‘

एकमेकींच्या कानात

वर्षानुवर्षे कुजबुजतात

 

जप, पोथी, मोबाईल, पुस्तक

सवयीने डोकं

कशात तरी खुपसतात

 

गुड मॉर्निंग, गुड डे

वाढदिवस, ॲनिवर्सऱ्या

गोडधोड, फुलंबिलं

देतात, घेतात,

उत्साही राहतात

 

आनंदी आहोत, हे वारंवार

स्वतःलाच समजावणा-या बायका

 

सात पस्तीस मिळावी म्हणून

पाच पस्तीसला उठणा-या बायका……….

 

कुठल्या तरी स्टेशनवर

गर्दी जरा सुटी होते

तेव्हा कुठे

घुसमटलेला पहिला मोकळा श्वास घेतात

 

आईच्या कुशीत शिरावं तसं

जोजवणा-या डब्याच्या

कुशीत शिरतात

 

खरं तर तो एक

छोटासाच तुकडा वेळेचा,

पण,

बिनघोर, बिनधास्त झोपून घेतात

 

एकमेकींच्या खांद्यावर घुसळत डोकं

एकमेकींच्या अंगावर टाकून भार

आपापलं स्टेशन येईपर्यंत

राहिलेली स्वप्नंही पाहून घेतात

 

छोटीशीच नॅप,

इतकुशीच, पण हक्काची झोप

प्रसन्न करते

 

धावत्या स्वप्नांना

आदल्या स्टेशनवर अचूक ब्रेक देते

 

‘चला, उद्या भेटू, ‘म्हणत

प्रसन्नतेला आत्मविश्वासाने गुणत

प्लॅटफॉर्मवर उतरतात

 

काळाचा तो छोटासा टप्पा

सोन्याचा करुन टाकणा-या बायका

 

सात पस्तीस मिळावी म्हणून

पाच पस्तीसला उठणा-या बायका……! 🚃🚋🚶🏻‍♀️🏃🏻‍♀️

संग्राहिका :सुश्री शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares