मराठी साहित्य – काव्यानंद ☆ शोमॅन… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ शोमॅन… कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे 

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

राज कपूर, हिंदी चित्रपट सृष्टीचा शोमॅन. सगळे कलाविष्कार शो करणारा तो शोमॅन राजकपूर. त्या कलाकाराचे कौतुक करायला कवी निशिकान्त श्रोत्री यांनी वाहिलेल्या अनोख्या काव्यांजलीचे रसग्रहण करायचा मला मोह झाला….

कलाविश्वात आणि मनोरंजन विश्वात चित्रपटसृष्टीचे स्थान खूपच वरचे आहे. उत्तमोत्तम कलाकृती निर्माण करणारे प्रतिभावंत लेखक, पटकथाकार, गीतकार, संगीतकार, अभिनेते, अभिनेत्री यांची मोठी  आहे मांदीयाळी आहे. राज कपूर हे यातलेच एक लोकप्रिय नाव.  ‘राजकपूर’ ही डॉ. निशिकांत श्रोत्री यांची  एक आगळी वेगळी कविता आहे. राजकपूर म्हणजे एक यशस्वी अभिनेता, निर्माता, आणि दिग्दर्शक. त्याच्या अनेक सिनेमांनी यशाचे वेगवेगळे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. यातीलच अतिशय गाजलेले तीन यशस्वी चित्रपट म्हणजे आवारा,  श्री ४२०, जागते रहो. याच तीन चित्रपटांच्या कथानकावर आधारित,   एकदम वेगळेच हटके काव्यसूत्र असलेली ही एक वैशिष्ट्यपूर्ण कविता आहे.

☆ राजकपूर … कवी — डॉ.  निशिकान्त श्रोत्री ☆

कलेसी बहार आणी तो दुजा तर नाही कोणी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी  ||ध्रु||

तहान वात्सल्याची जीवा प्रेमाची मायेची

वाट जीवना संस्काराची ना केवळ नात्याची

द्याया संदेश हंसवूनी येई आवारा घेउनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी    ||१||

देश ग्रासला बेकारीने शिकलेला भरडला

धनाढ्य लुच्चे लोभी फसवित दीनांना दुबळ्यांना

दावूनिया चारसोबीसी केले सकल जनांना ज्ञानी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी  ||२||

मुखड्यामागे पाप धनाच्या तहानल्या ना पाणी

काळा पैसा खोट्या नोटा कोण गुन्ह्याचा धनी

करुनि सर्वांना सावध जागते रहो सांगूनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी  ||३||

©️ डॉ. निशिकांत श्रोत्री

मो. ९८९०११७७५४

☆ शोमॅन…राजकपूर — कवी — डॉ.  निशिकान्त श्रोत्री ☆ रसग्रहण – सौ. ज्योत्स्ना तानवडे

कलेसी बहार आणी तो दुजा तर नाही कोणी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी ||ध्रु||

चित्रपटात अभिनय, दिग्दर्शन, कथानक, संगीत, नृत्य अशा अनेक कलांचा संगम असतो. या सर्वच आघाड्यांवर राज कपूरनी वेगवेगळे यशस्वी प्रयोग केले आणि त्या जास्तीतजास्त लोकप्रिय बनवल्या. त्याच्या गाणी आणि संगीतांने बहार उडवून दिली. राज कपूर यातला एक चांगला जाणकार होता. मूळामध्ये तो एक अस्सल हिंदुस्तानी कलाकार होता. एक यशस्वी चित्रपट कसा बनवायचा यात तो माहीर होता. म्हणून तो ‘या सम हा !’ अशा पदापर्यंत पोहोचला होता.

तहान वात्सल्याची जीवा प्रेमाची मायेची

वाट जीवना संस्काराची ना केवळ नात्याची

द्याया संदेश हंसवूनी येई आवारा घेउनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्तानी ||१||

प्रत्येक जीवाला आयुष्यात वात्सल्याची ओढ असते. तितकीच प्रेमाची, मायेची पण आस असते. यासाठी फक्त नातीच गरजेची नसतात तर त्या बरोबरीने चांगले संस्कारही होणे खूप गरजेचे असते. हाच संदेश विनोदी ढंगाने हसवत हसवत  ‘आवारा’ हा सिनेमा देतो. ही गोष्ट कवीने अतिशय साध्या सोप्या शब्दात सांगितली आहे. माणूस प्रेम, वात्सल्य, माया मिळाली की शांत, संयमी, विवेकी बनतो. या उलट यापासून वंचित असणारे जीव भडक स्वभावाचे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे बनतात. प्रेम, जिव्हाळाच त्यांना पुन्हा सन्मार्गावर आणतो. हेच रंजक पद्धतीने हा सिनेमा सांगतो. प्रेक्षकांची अचूक नस ओळखून अतिशय मनोरंजक पद्धतीने कथानक फुलवत नेलेले आहे. अर्थपूर्ण गाणी आणि श्रवणीय संगीताने चित्रपट खूप लोकप्रिय झाला.

देश ग्रासला बेकारीने शिकलेला भरडला

धनाढ्य लुच्चे लोभी फसवित दीनांना दुबळ्यांना

दावूनिया चारसोबीसी केले सकल जनांना ज्ञानी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्तानी ||२||

राज कपूरचा दुसरा लोकप्रिय चित्रपट म्हणजे श्री ४२०. त्याचीच ही कथा. देशामध्ये बेकारी वाढल्यामुळे त्यात शिकलेले लोकही भरडले जातात. अशावेळी धन दांडगे लोभापायी त्यांची फसवणूक करतात. दीनदुबळ्यांची परिस्थिती आणखीनच हलाखीची बनते. ही सर्व परिस्थिती कवीने पहिल्या दोन ओळींमध्ये नेमक्या शब्दात वर्णन केलेली आहे. हे पाहून नायक  धनाढ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतो. अगदी चारसोबीसी करून गरिबांना न्याय मिळवून देतो आणि तो श्री चारसोबीस ठरतो. कारण तो सर्व सामान्यांसाठी लढणारा एक सर्वसामान्य नायक असतो.

मुखड्यामागे पाप धनाच्या तहानल्या ना पाणी

काळा पैसा खोट्या नोटा कोण गुन्ह्याचा धनी

करुनि सर्वांना सावध जागते रहो सांगूनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्तानी ||३||

धनाढ्यांच्या मुखड्यामागे पाप दडलेले असते त्यामुळे गरजवंत कायम वंचितच रहातात. पण हा काळा पैसा, ही बनवेगिरी या मागचा खरा गुन्हेगार कोण ते कळतच नाही. या खोट्या मुखवट्यां मागचे खरे चेहरे आणि बंद दाराच्या आत चालणारे भ्रष्ट उद्योग बघून नायक सर्व सामान्यांना त्याची जाणीव करून देतो आणि जागते रहो अशी साद घालतो. राज कपूरच्या ‘ जागते रहो ‘ चित्रपटाची ही कहाणी. कवीने अतिशय मोजक्या पण अचूक शब्दात ती सांगितली आहे.

सर्व सामान्यांची दीनदुबळी दुनिया त्याच वेळी धनाढ्य, ढोंगी, अत्याचारी लोकांचे अन्यायी जग आणि या अन्यायाविरुद्ध झगडणारा सामान्यातलाच एक नायक हे या तीनही चित्रपटातले सूत्र आहे. केवळ चार ओळींमध्ये ते नेमके कथानक सांगणे हे कवीचे खास कसब आहे. कसलेही बोजड शब्द, अलंकारिक भाषा न वापरता साध्या सरळ शब्दात सहजपणे पण परिणामकारक पद्धतीने ते सांगितले आहे. एक लयबद्ध अशी ही कविता राज कपूरच्या चित्रपट कारकीर्दीतील या तीन महत्त्वाच्या सिनेमांची उत्तम दखल घेणारी आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आईलाही द्यावं कधी माहेरपण… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ आईलाही द्यावं कधी माहेरपण… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

कबूल आहे तिचंच असतं घर

पण आईलाही द्यावं कधी माहेरपण ..

 

उठू दे तिला कधी सर्वात शेवटी

पाण्याची वेळ असो वा बाईची सुट्टी 

नको तिला छोट्या छोट्या गोष्टींचं दडपण

आईलाही द्यावं कधी माहेरपण

 

कर म्हणावं आज तुझ्या आवडीची भाजी

फार नाही, पुरेल तिला मदत जराशी

लक्षात ठेवून तिची आवड आणि नावड पण

आईलाही द्यावं कधी माहेरपण

 

द्यावा कधी चहा तिला सकाळी उठून

सांगावं मनातलं काही जवळ बसून

ऐकावं तिचंही होऊन मोठं आपण

आईलाही द्यावं कधी माहेरपण

 

आई राहून सासरी लेकीला माहेर देते

पण लेकीच्या हे लक्ष्यात कधी येते?

जेव्हा ओसरतात तिचेही नवलाईचे क्षण

मग आईला कुठलं माहेरपण?

 

तिला ओळखणारं तिचंच अंगण

समजूतदारपणावर विश्वासलेलं मोकळेपण

शरीर मनाला विसाव्याचे क्षण

आईलाही हवं असेल का माहेरपण?

 

आईलाही हवा असेल कधी विसावा

वाटेल, समजुतीचा हात तिच्या हाती असावा

ज्या हातांना तिनेच लावलंय वळण

आईलाही द्यावं कधी माहेरपण…… 

 

 देवाने एका ‘आई’ ला प्रश्न विचारला.

… .’ तुमच्या आयुष्यातून सर्व सुख: काढून घेतले…आणि विचारलं दुसरं काही मागा….  तर तुम्ही काय मागणार..?? ‘ 

….त्या आई ने खूप सुंदर उत्तर दिले..;..

” माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने लिहण्याचा आधिकार मागणार …. कारण, त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख काहीच नाही. “ 

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फक्त भेट…” ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

🌺 “फक्त भेट…” 🌺 प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  

पार्टी नकोय मित्रा तुझी 

येवून फक्त भेटत जा 

काय चाललंय मनात तुझ्या 

भेटून फक्त बोलत जा 

मोकळं सोड स्वतःला जरा 

कधीतरी मोकळं होत जा 

हलकं वाटेल तुझंच तुला 

मन रिकामं करत जा 

जुन्या आठवणी गप्पागोष्टी 

आमच्यात सुद्धा रमत जा 

आलेच कधी वाईट विचार 

बिनधास्त फोन करत जा 

काय आहे आयुष्य अजून 

निदान मनातले वाटत जा 

पहा किती फरक पडतो 

आनंद तेव्हढा लुटत जा 

पन्नाशीला आलोय आपण 

संपर्कात तेव्हढं रहात जा 

काय हवं काय नको तुला 

कुणाला तरी सांगत जा 

मित्र असतात कशासाठी 

मैत्री तेव्हढीच जपत जा 

आम्ही फक्त मस्त जगतो 

तसाच मस्त जगत जा 

पैसा नाही लागत त्याला 

मनातले मात्र सांगत जा 

पार्टी नकोय मित्रा तुझी 

येवून फक्त भेटत जा …… 

           येवून फक्त भेटत जा …… 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भलरी गीत… ☆ सौ.मंजुषा आफळे

सौ.मंजुषा आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ भलरी गीत… ☆ सौ. मंजुषा आफळे ☆

भलरी दादा भलरी

भलरी दादा भलरी

 

आल्या रिमझिम सरी

पेरणीला या लई भारी

खाचरात भरे पाणी

गाऊ या पाऊस गाणी

 

मनाला येई तरतरी

सपान आलं सामोरी

चिखलात माझी राणी

करते भात लावणी

 

मायेत भिजल्या पोरी

चमकती चंद्रकोरी

आनंदात ही धरणी

पहा देवाची करणी

 

दिवस आज भाग्याचा

गंध श्रावणसरींचा

रोपे खोचून भाताची

पूजा करूया लक्ष्मीची

 

प्रसन्न ती होईल गं

भरभरून  देई गं

घास खाऊ या सुखाचा

भ्रतार माझ्या प्रितीचा

 

भलरी दादा भलरी

भलरी दादा भलरी.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ओढ पावसाची… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ ओढ पावसाची… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आतुरले मन माझे,

    घनाने बरसावे !

तुझ्या जलधारात,

   मी चिंब चिंब भिजावे!

 

किती ओढ घेई तू,

  तृषार्त मी, तृषार्त मी!

एक एक थेंबासाठी,

  मनी झुरत आहे मी!

 

 तुझ्या मनाची मर्जी,

   सत्त्व पाहते सर्वांचे !

 आभाळाकडे डोळे लावून

    सुकले गं डोळे त्यांचे!

 

  हिरवाई बहराचे दिवस,

    असे दिसती सुकलेले !

 एकेक दिवस जाई ,

    मन माझे मिटलेले !

 

 लवकर ये सत्वरी,

   वाट पाही भूवरी!

शांतव तू जीवाला,

   हीच ओढ अंतरी !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – दोन पेले… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– दोन पेले… – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुगंधाने भरले असे दोन पेले

 आकर्षक  रंग तया लाभलेले

 नासिके समीप प्याल्यास नेता

  दरवळात  गात्र प्रफुल्लित झाले …… 

   मोहकवर्णासवे  दो चषकांना

   ओठाशी घ्याया मन राहवेना

   तबक पाचुचे सौंदर्यात वाढ

   निसर्गापुढे झुकतात माना …… 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ढग उतार… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ ढग उतार… ☆ श्रीशैल चौगुले ☆

पुर्वेकडचे ढग आता

पश्चिमेस धावू  लागले

वार्यासंगेच धुंद मन

आठवात गाऊ लागले.

 

मनावरचा ताबा थोडा

अल्लड झाला थकलेला

पावसासम डोळे आता

नजर शुन्यी रोखलेला.

 

आधार तुटे वादळात

अनावर भाव बेभान

यत्न करुन असमर्थ

हात तोकडे थेंब प्राण.

 

वाटले होते अजिंक्यच

आयुष्य स्वप्न मुक्त सारे

कोसळले ऋतूत प्रेम

काळीज भिजले,पिसारे.

 

सरतच गेले किनारे

झरत गेली दुःख दरी

पावसाळा कधी सुखाचा

सांजवेळी भरे अंतरी.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 164 – श्रावण सरी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 164 – श्रावण सरी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

ठुमकत मुरडत

आल्या श्रावणाच्या सरी।

पोरीबाळी  थिरकती

रिमझिम तालावरी।।

 

ओथंबती जलदही

कधी उन्हे डोकवली।

मोहवितो निलकंठ

नृत्यासवे केकावली।।

 

अवखळ नद्या नाले

ऊन्मादात खळाळती।

शीळ घाली रान वारा

गीत पाखरे ही  गाती।।

 

नववधुपरी धरा

शालू हिरवा नेसली।

ठेवा जपुनी सौख्याचा

सृजनाचं लेणं ल्याली।।

 

सृजनाच्या सोहळ्यात

ओटी धरेची भरली

सप्तरंगी तोरणाने

चैतन्यात सृष्टी न्हाली।।

 

सुखावला कृषिवल

सणवार मांदियाळी।

अनुबंघ जपणारी

प्रथा श्रावणी आगळी।।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निवृत्त होत नाही… ☆ श्री विठ्ठल बाबुराव घाडी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ निवृत्त होत नाही… ☆ श्री विठ्ठल बाबुराव घाडी ☆

निवृत्त तो झाला निवृत्तीला ती आली

मंडळी रोजच्या व्यापातून मुक्त झाली..

 

सागर म्हणाला मी ही निवृत्त होतो

जळून एकदाच ढगात जाऊन बसतो..

 

ढगाने ही निवृत्ती जाहीर केली

थेंबा थेंबासाठी सृष्टी हवालदिल झाली..

 

खूप भिजले कधी तापून लाल झाले

निवृत्त होते आता खूप काही मी दिले..

 

पेरले कितीक तरी उगवणार नाय

तिच्याशिवाय सांगा कुणी जगेल काय..

 

वारा म्हणतोय धावून थकलोय आता

निवृत्तीत निवांत होतो वाहता वाहता..

 

श्वास अडकेल जगाचा निवृत्त मात्र होवू नका तुम्ही

निसर्ग रक्षण करू हा शब्द विश्वप्रार्थनेत देतो आम्ही..

 

शुभ प्रभाती येणारा निवृत्त होत नाही..

शुभेच्छांसाठी शब्द यायचा थांबत नाही..

 

✍🏻साधे शब्द

© श्री विठ्ठल बाबुराव घाडी

चारकोप, मुंबई 

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “जुने – नवे…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “जुने – नवे….” ☆ श्री सुनील देशपांडे

जुने मरूद्या सांगा आधी तुम्हापाशी काय नवे ?

आम्हा सांगा नव्यामधूनी काय वाटते हवे हवे ?

युगे युगे ते सूर सात, आठवा सापडला का आठवा !

जुन्यास घालून  नवे आंगडे होतिल का ते सूर नवे ?

तीच अक्षरे शब्द तेच अन् नवी बाटली दाखवता ?

जीवन आमुचे खर्चून आम्हा सापडले ना काही नवे.

ध्यास नव्याचा खरेच सुंदर, जीवन त्याच्यामधे सरे.

नवे खरोखर सापडले तर सा-यांना ते हवे हवे.

म्हणून म्हणतो ध्यास नव्यांचे पिढ्यापिढ्यांना हवे.

परंतु मागिल संचित पाहुन प्रयत्न व्हावे नवे नवे.

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares