मराठी साहित्य – काव्यानंद ☆ मी कृतार्थ जाहले… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ मी कृतार्थ जाहले… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

स्वप्नं, महत्त्वाकांक्षा, ध्येयंं, नव्या वाटा, नवी क्षितिजे यांची आस बाळगणं त्यासाठी झोकून देणं या सर्वांसाठी लागते चिकाटी, जिद्द मनोबल. या दिशेचा मार्ग सरळ, सोपा नसतो. खाचखळग्यांचा, काट्याकुट्यांचा असतो. स्वप्नपूर्तीच्या मागे लागणाऱ्यांना भवतालचे अनेक घटक सतत मागे खेचत असतात, उणीवांवर बोट ठेवून मानसिक खच्चीकरण करत असतात, या सर्वांवर मात करून अंतप्रेरणेने चालत राहणं, ध्येयपूर्तीचा टप्पा गाठणं यासाठी प्रचंड मनोधैर्य लागतं.

A WILL WILL FIND A WAY

किंवा

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे या उक्तीप्रमाणे एक ना एक दिवस यश दारात उभे राहते आणि त्या वेळेचा जो आनंद असतो त्याला सीमा नसते. अनेक घटिकां-पळांच्या तपस्येचं ते फळ असतं आणि त्या क्षणी “आपण हे करू शकलो, हे मिळवू शकलो” ही भावना कृतार्थ करते. जगणं सार्थ झालं असं समाधान लाभतं. याचसाठी केला होता अट्टाहास हा भाव उत्पन्न होतो.

याच अर्थाचे डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांचे मी कृतार्थ जाहले हे सुंदर गीत! या गीताचा आपण आज रसास्वाद घेऊया.

☆ मी कृतार्थ जाहले ☆

स्वप्न माझ्या मनात मूर्त साकारले

यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले ॥ध्रु॥

*

चिमणीला पदरातिल गरुडपंख लाभले

उंच घेऊनी भरारी राज्य नभी थाटले

देवी साम्राज्याची भाग्य मला लाभले

यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले ॥१

*

दुर्गम गिरीशिखराप्रति मार्ग कठीण हो किती

साथ लाभता मना निग्रहा नसे भीती

संकल्परूप माझे या वांच्छनेस लाभले

यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले।२

*

नाही अहंकार कधी दंभ ना स्पर्शले

सेवेतुनि जगताच्या कर्मफला जाणिले

अर्पण जीवन सारे विश्वपदी वोपिले

यशोमन्दिरात आज मी कृतार्थ जाहले।३

कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री (निशिगंध)

हे एक यशोगीत आहे. एक आनंदगीत आहे. साफल्याची भावना व्यक्त करणारे हे सुरेख शब्दातले गीत आहे. पूर्ततेचा आनंद, हर्ष आणि त्यानंतर येणारा कृतार्थतेचा भाव हे गीत वाचताना जाणवतो. एका यशप्राप्त कन्येचे मनोगत या गीतात व्यक्त केलेले आहे.

स्वप्न माझ्या मनात मूर्त साकारले

यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले।ध्रु।

ध्रुवपदात कवितेतल्या आनंदमयी भावना जाणवतात. आनंद कसला तर स्वप्नपूर्तीचा. “अजी मी ब्रह्म पाहिले” सारखाच, त्याच तोडीचा आनंद गीतातल्या या कन्येला झालेला आहे. ती म्हणते,

“आज माझं कित्येक वर्षं मनात बाळगलेलं एक स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आहे आणि या यशाच्या शिखरावर मला कृतार्थ झाल्याचे समाधान लाभत आहे. ”

ध्रुवपदाच्या या ओळीतला यशोमंदिर हा शब्द खूपच लक्षवेधी आहे. यशाचे मंदिर किंवा यशाचे द्वार म्हणजे जणू काही मंदिरच. यशाला दिलेली ही मंदिराची उपमा फारच पवित्र, मंगलमय आणि सूचक वाटते. चांगल्या मार्गाने मिळवलेल्या यशाची ती ग्वाही देते.

चिमणीला पदरातिल गरुड पंख लाभले

उंच घेऊनी भरारी राज्य नभी थाटले

देवी साम्राज्याची भाग्य मला लाभले

यशो मंदिरात आज मी कृतार्थ जाहले. १

इतके दिवस मी लहान होते. पंखात माझ्या ताकद नव्हती. उडण्याचे सामर्थ्य नव्हते. म्हणून ते मिटलेल्या अवस्थेत होते पण माझ्या आयुष्यात एक दिवस असा आला की जणू काही उंच गगनात सहजपणे भरारी मारणाऱ्या गरुडाचे पंखच मला लाभले आणि हे जग मी माझ्या मुठीत बंदिस्त करू शकले. जगाला माझं अस्तित्व मान्य करावंच लागलं. कर ले दुनिया मुट्टी मे हे माझं स्वप्न जणू काही पूर्ण झालं. माझ्याकडे बघणाऱ्यांच्या नजरेत मला आता आदर, अभिमान आणि आश्वासकता दिसत आहे. हेच मला हवं होतं आणि ते मी मिळवलं म्हणून माझा जन्म सार्थ झाला असे आता वाटत आहे. ”

हे संपूर्ण कडवं रूपकात्मक आहे. गरुडपंख लाभले या शब्दरचनेत आत्मविश्वास, आत्मनिर्भरता याचा मनोमन उगम झाल्याचा अर्थ अभिप्रेत आहे. कवीने योजलेल्या या रूपकात्मक शब्दातून जे अशक्य वाटत होते ते शक्य करून दाखवण्याचा अभिमान जाणवतो. “गुलामगिरीच्या शंखला तोडून उच्च स्थानावरचे माझे स्वतःचे असे एक राज्य निर्माण करण्यात मला यश लाभले आहे” हा विश्वास जाणवतो.

देवी साम्राज्याची या शब्दातून तिने रोवलेल्या विजयपताकेचा विलक्षण अभिमान आणि भाग्य ती उपभोगीत आहे हे दिसतं. आजपर्यंत जिला पायाची दासी मानलं जात होतं तिला देवीचं स्थान मिळालं. एका सक्षम सबल रूपात ती नव्याने अवतरली.

दुर्गम गिरीशिखराप्रति मार्ग कठीण हो किती

साथ लाभता मना निग्रहा नसे भीती

संकल्प रूप माझीया वांच्छनेस लाभले

यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले २

“यश तर पदरी आलंच पण मागे वळून पाहताना जाणवत आहे की या यशाचा मार्ग सोपा नव्हता. अवघड होता. सरळ नव्हता! वळणावळणाचा होता. एखाद्या असाध्य डोंगराचे शिखर गाठण्यासारखेच होते ते. अत्यंत साहसाचा हा मार्ग होता पण तरीही अंतर्मनाची कुठेतरी विलक्षण साथ होती, मनात जिद्द होती, चिकाटी होती, एक दुर्दम्य आशावाद आणि निग्रहही होता ज्यामुळे मनात दाटलेल्या भीतीवर मी मात करू शकले, निर्भय बनले. स्वशक्तीचा, स्वसामर्थ्याचा वेध घेऊ शकले आणि त्याच बळावर माझ्या या संकल्पांना, इच्छेला एक निश्चित असा आकार मिळू शकला. खरोखरच आज मी धन्य झाले.”

गिरीशिखराप्रति ही शब्दयोजना इथे अगदी चपखल आहे. कुठलाही डोंगर ओलांडणं हे अत्यंत साहसाचं आणि आव्हानात्मक असतं. उरी बाळगलेली स्वप्नं सत्यात उतरवणं हे येर्‍या गबाळ्याचं कामच नव्हे तर त्यासाठी गिरीशिखरावर पोहोचण्याइतकं सामर्थ्य हवं. . हे अधोरेखित करणारी ही शब्दयोजना वाचकाला नक्कीच भावते. या ओळींमध्ये वीरश्री जाणवते. वीर रसाचा इथे भावाविष्कार झालेला अनुभवास येतो.

गिरीशिखराप्रति मार्ग कठीण हो किती

साथ लाभता मना निग्रह नसे भीती

यात अनुप्रास आणि यमक हे दोन्ही अलंकार अतिशय सुंदरतेने गुंफले आहेत.

नाही अहंकार कधी दंभ मना स्पर्शले

सेवेतूनी जगताच्या कर्मफला जाणिले

अर्पण जीवन सारे विश्वपदी वोपिले

यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले ३

“मला जे हवं होतं ते मिळवताना माझी मानसिकता मात्र संतुलित होती. मी माझ्या मनाचा तोल कधीही ढळू दिला नाही. माझ्या ध्येयमार्गावरून जाताना मी कुणालाही तुच्छ लेखले नाही. मी कुणीतरी इतरांपेक्षा वेगळी आहे असा अहंकार बाळगला नाही. कुठल्याही ढोंगीपणाचा बुरखा पांघरला नाही उलट एका सेवाभावाने मी जगताच्या जीवनातला अज्ञानांधकार दूर करण्याचा प्रयत्न केला. मी- ची ओळख पटवताना मी समाजाच्या जीवनप्रवाहाला कधीही अव्हेरलं नाही. त्यातूनच ठेचकाळत, शिकत, शिकवत, समजावत, पटवत शांततेच्या, अहिंसक मार्गाने मी माझ्या कष्टाचे फळ मिळवले आणि माझे स्वप्न पूर्ण केले. स्वप्नपूर्ती नंतरही माझे पाय सदैव जमिनीवरच ठेवले. यशाने मी हुरळून गेले नाही. भले मी मनस्वी आनंदले असेन पण त्याची नशा किंवा धुंदी मी माझ्या मनावर येऊ दिली नाही. अखेर कोsहं या भावनेने मी एक निमित्तमात्र असे समजून समर्पित भावानेच या यशाकडे, तृप्त मनाने आणि प्रातिनिधिक स्वरूपात पाहते.”

या गीतातला हा शेवटचा चरण अतिशय अर्थपूर्ण आहे, संदेशात्मक आहे. आनंद होणं ही सर्वसाधारण सामान्य भावना आहे. ती एक सहज अशी अभिव्यक्ती आहे पण त्याचा अवास्तव आकार न होऊ देणे हे सामान्यातले असामान्यत्व आहे आणि याच असामान्यत्वाचा पाठपुरावा कवीने या शेवटच्या चरणात जाता जाता सहज केला आहे.

वोपिले हा शब्द ज्ञानेश्वरी ची आठवण करून देतो आणि त्या शब्दातला गोडवा सांभाळून या गीतातल्या ओळीत तो अगदी बेमालूमपणे सहज गुंफलेला जाणवतो.

वोपिले म्हणजे अर्पिले, देऊन टाकले या अर्थाने इथे तो योजला असावा.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन याच अर्थाचा बोध करणाऱ्या या शेवटच्या काव्यपंक्ती आहेत.

विश्वपदी वोपिले हा खूप विस्तारित, उदात्त अर्थांचा शब्दसमूह आहे. “ जिथून मिळालं तिथेच अर्पिलं” हा भाव तिथे आहे. “माझं यश हे आता माझ्यापुरतं मर्यादित नाही तर या यशामुळे जे सामर्थ्य, जी ताकद मला लाभली आहे त्याचा सुयोग्य उपयोग या विश्वासाठीच मी करेन. ” हा व्यापक निर्धार त्यात जाणवतो.

विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो ।

जो जे वांछील तो ते लाहो।।

असा एक अव्यक्त दडलेला अर्थ या गीतात व्यापून राहिलेला आहे.

जे गीत एका सामान्य कन्येच्या यशोनंदाने सुरू होते ते गीत सहजपणे एका विश्वरूपी संदेशात रूपांतरित होते. केवळ १४ ओळीत डॉक्टर श्रोत्रींनी साधलेला हा महान अर्थ वाचकाला एका वेगळ्याच विचारप्रवाहात घेऊन जातो. धन्य तो कवी! धन्य त्याची शब्दलीला!

या संपूर्ण गीताची यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले ही एक टॅगलाईन आहे आणि या टॅगलाईनला, या ओळीला साजेसा प्रत्येक चरणातला तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द …लाभले— वोपिले हे अतिशय लयबद्ध वाटतात. .

यश कोणते, यश कसले याचा स्पष्ट अथवा विशिष्ट असा उल्लेख या गीतात नाही. यश कोणतेही असू शकते. आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय अगदी कोणतेही …. पण या गीतातला एक अंतर्गत भाव जाणवतो तो हा की कुठल्याही स्त्रीचे यश, तिची स्वप्नपूर्ती आणि पुरुषाचे यश– सामाजिक फुटपट्टीने मोजले तर त्यात महत् अंतर असते. पुरुषांपेक्षा एखाद्या स्त्रीला तिच्या स्वप्नपूर्तीसाठी जो संघर्ष करावा लागतो तो अधिक आव्हानात्मक आणि अवघड असतो. कुठेतरी कवीने या स्त्री संघर्षाचा सन्मान आणि दखल घेतल्यामुळे एका स्त्रीच्या भूमिकेतून मला त्याचे मूल्य अधिक वाटते हे निःसंशय …

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चांदणे शिंपित आली… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

चांदणे शिंपित आली… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

चांदणे शिंपित आली जीवनाची ही घडी

उंच गेली आभाळी ती डौलाने फडके गुढी…

*

काय काय नाही केले, काय काय केले हो

कंटकांच्या होत्या राशी फुलझेले कधी हो

चालणे माहित होते.. चाल होती फाकडी…

चांदणे शिंपित आली….

*

चांदणे केले उन्हाचे त्यात केला गारवा

मोती झाले घामाचे नि जग म्हणाले वाह! वा!

कष्टाला येतेच फळ हो.. वेळ जरी ती वाकडी

चांदणे शिंपित आली…

*

चाल ठेवावीच साधी सत्य ठेवावे मुखी

चांदणे होते उन्हाचे दु:खे होती पारखी

शुद्ध गंगा ती मनीची भाषा होती रोकडी

चांदणे शिंपित आली…

*

मार्गावरूनी चाललो ज्या अडथळ्यांची शर्यत

गेलो ओलांडून तरीही टेकड्या नि पर्वत

साथ दैवाची मिळाली मऊमखमली चौघडी

चांदणे शिंपित आली…

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मै त्री! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🤝👨‍❤️‍👨 मै त्री! 👩‍❤️‍💋‍👨🤝 श्री प्रमो वामन वर्तक ⭐ 

रंग नसतो मैत्रीला

तरी असते रंगीत,

सूर जुळता मैत्रीचे

वाजे स्वर्गीय संगीत!

*

चेहरा नसतो मैत्रीला

तरीही असते सुंदर,

तारा जुळता मैत्रीच्या

उघडे हृदयाचे दार!

*

नसतात कधी मैत्रीत

अटी आणिक वचने,

मैत्री जपतांना हवीत

फक्त स्वच्छ दोन मने!

*

घर नसले जरी मैत्रीला

फिकीर ना तिला फार

मैत्री जपता विश्वासाने

करून राहे ह्रदयी घर! 💓

करून राहे ह्रदयी घर! 💓

© श्री प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तुकाराम बीज… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  कवितेचा उत्सव  ?

☆ तुकाराम बीज… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

बीजे च्या दिवशी,

स्मरण तुकयाचे!

दर्शन विठ्ठलाचे,

मनोमनी!

 *

तुकयाची आवली,

भाबडी तिची माया!

अज्ञानाची छाया,

प्रपंचावरी!

 *

तुकयासाठी आले,

सजून विमान!

वैकुंठ गमन,

तुकयाचे!

 *

सदेह वैकुंठी,

जाई संत तुका!

आक्रितच लोका,

दिसले ते!

 *

जनांचे ती गर्दी,

अचंबित झाली!

जाई तुका माऊली,

वैकुंठ वाटे!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जीवो जीवस्य जीवनम्… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ जीवो जीवस्य जीवनम्… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

तडफड झाली बंद क्षणात

चोचीमधला होता घास

पकड एवढी घट्ट आपसूक

जीव जाई गुदमरून श्वास —

*

दोघांचे डोळे जवळजवळ

भक्ष्याचा आनंद एका नेत्री

भयभीत भाव दुज्या डोळी

मरणच या क्षणाची खात्री — 

*

जीवो जीवस्य जीवनम्

इथे तिथे निसर्गात चाले

मान्य असते आपणा परंतु

होतातच ना डोळे ओले! — 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “तूच तू…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “तूच तू…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

(२००९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या माझ्या पत्नीसहस्रनाम या पुस्तकातून)

शक्ती तूच, स्फूर्ती तूच, तूच कीर्तीदायिनी।

तेज तूच, बुद्धी तूच, जीवन सौदामिनी ।।

कर्म तूच, मर्म तूच, तूच मार्गदायीनी।

भीती तूच, शौर्य तूच, तूच धैर्यवर्धिनी।।

*

अमर तूच, मर्त्य तूच, तूच काळ व्यापिणी।

तमसांतिका अन् तू प्रकाशिका, तूच विश्वस्वामिनी।।

ब्रम्ह तूच अन माया, तूच सर्व साक्षिणी।

प्राण तूच, मान तूच, तूच देवी मानिनि।।

*

मुग्धा हि तू, कृद्धा हि तू, तूच रौद्ररागिणी।

दुर्गा अन् काली तूच, असुर संहारिणी।।

काटे अन् फूल तूच, तूच गे सुवासिनी।

वंथनात मुक्त तूच, तूच हृदयवासिनी।।

*

प्रीत तूच, गीत तूच, तूच सौख्य दायिनि ।

शब्द तूच, अर्थ तूच, तूच वाग्विलासिनी ।।

अर्थ, काम, मोक्ष तूच, तूच धर्मचारिणी ।

तूच भाव, तूच देव, तूच पत्नि रूपिणी।।

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बाईपणाचा अभिमान… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ बाईपणाचा अभिमान सुश्री नीलांबरी शिर्के 

बाईपणाचा अभिमान मला

आईपणाचा अभिमान मला

बाई म्हणूनी नीत वापरते

मी

मनदेहावर सृजन शालीन शेला

गौरव कोणी करो ना करो

माझी शक्ति मलाच माहित

सांभाळून मी स्वतः स्वतःला

सांभाळत जाते सर्वांचे हित

सृजनपणाचे लेणे मजला

अभिमानाने मिरवित असते

माती, नदी जलधारातुन

मलाच मी नीत भेटत असते

सन्मान मिळो वा अपमान मिळो

मला माझा अभिमान वाटतो

लेच्यापेच्या नसती महिला

ॠतुचक्राचे चाक आम्ही त्याच अभिमान आम्हाला

 🌹

💐जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा मला, तिला , तुला सर्व महिलांना 💐

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ येड्या हो sssss ‘Hug Day‘ याला म्हणतात! – लेखक : डॉ. धनंजय देशपांडे ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

येड्या हो sssss ‘Hug Day‘ याला म्हणतात! – लेखक : डॉ. धनंजय देशपांडे ☆ सुश्री प्रभा हर्षे  ☆

hug day म्हणजे काय असतं

हे रावणाशी लढाई जिंकून झाल्यावर

हनुमानाला मिठीत घेतलेल्या श्रीरामाला विचारा 

की Hug Day म्हणजे काय?

*

Hug Day म्हणजे काय असतं

हे त्या अफझलखानाच्या थडग्याला जाऊन विचारा 

ते हि सांगेल Hug Day म्हणजे काय असतं!

*

Hug डे म्हणजे काय असतं

हे त्या पोह्याच्या पुरचुंडीला विचारा,

जिने कृष्ण सुदामाची मिठी पाहिलेली 

ती हि सांगेल Hug Day म्हणजे काय असतं

*

Hug Day म्हणजे काय असतं

हे त्या झाडांना विचारून पहा

ज्यांच्या रक्षणासाठी “चिपको” आंदोलन करून

महिलांनी झाडांना मिठी मारलेली पाहिलीय 

ती झाडेही सांगतील की 

Hug Day म्हणजे काय असतं 

*

Hug Day म्हणजे काय असतं

हे त्या रायगडाला विचारा 

ज्याने पश्चाताप झाल्यावर

माघारी आलेल्या शंभुराजांना

मिठीत घेणारे शिवाजी राजे पाहिलेत 

तो रायगडीचा महालही सांगेल 

Hug Day म्हणजे काय असतं 

*

Hug Day म्हणजे काय असतं

हे त्या यज्ञातील उधाणलेल्या ज्वालाना विचारा 

ज्यांनी नेताजी पालकरला पुन्हा आपल्या धर्मांत घेऊन

मिठी मारणारे छत्रपती शिवाजी महाराज पाहिलेत 

त्या ज्वालाही सांगतील 

Hug Day म्हणजे काय असतं 

*

Hug Day म्हणजे काय हे

त्या जेल मधील भिंतींना पण विचारा

जेव्हा मेरा रंग दे बसंती म्हणत

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू 

ह्यांनी एकमेकांना फासावर जाण्याआधी

एकदा घट्ट मिठी मारली असेल

*

Hug Day म्हणजे काय?

हे सीमेवर लढायला जाणाऱ्या त्या जवानांना सुद्धा विचारावं 

जो जाताना आपल्या आईला आलिंगन देऊन जातो.

आणि भारत मातेच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण पणाला लावतो.

*

असा असतो खरा Hug Day.. येड्याहो!

ते शिकूया, तशा मिठीचे संस्कार जपूया 

जय भवानी, जय शिवाजी…

*

लेखक : श्री डॉ. धनंजय देशपांडे (dd)

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कराया साजरा । होलिकेचा सण ।।” – कवी – डॉ. प्रसाद वाळिंबे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “कराया साजरा । होलिकेचा सण ।।” – कवी – डॉ. प्रसाद वाळिंबे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

कराया साजरा । होलिकेचा सण ।

मनाचे स्थान । निवडिले ।।

ऐसे ते स्थान । साधने सरावले ।

भक्तीने शिंपिले । केले सिद्ध ।।

*
त्या स्थानी खळगा । समर्पणाचा केला ।

त्यात उभा ठेला । अहंकार एरंड ।।

रचलीया तेथे । लाकडे वासनांची ।

इंद्रियगोवऱ्याची । रास भली ।।

*
गुरुकृपा तैल । रामनाम घृत ।

अर्पिले तयात । ऐसे केले ।।

रेखिली भोवती । सत्कर्म रांगोळी ।

भावरंगाचे मेळी । शोभिवंत ।।

*
वैराग्य अग्नीसी । तयाते स्थापिले ।

यज्ञरूप आले । झाली कृपा ।। 

दिधली तयाते । विषय पक्वान्नाहुती ।

आणिक पूर्णाहुति । षड्रिपू श्रीफळ ।।

*
झाले सर्व हुत । वैराग्य अग्नीत । 

जाणावया तेथ । नुरले काही ।।

वाळ्या म्हणे जनी । व्हावी ऐसी होळी ।

जेणे मुक्तीची दिवाळी । अखंडित ।। 

कवी – डॉ. प्रसाद वाळिंबे

सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ पुणे 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एकटी…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

 

? कवितेचा उत्सव ?

☆ एकटी…! 

☆ 

आली बघ चिऊताई आज माझ्या परसात

दाणे टिपुनिया नेई पिल्लांसाठी घरट्यात…!

*

पिल्लासाठी घरट्यात सदा तिचे येणे जाणे

घास मायेचा भरवी चोचीतून मोती दाणे…!

*

चोचीतून मोतीदाणे पिल्ले रोज टिपायची

झाली लहानाची मोठी आस आता उडण्याची…!

*

आस आता उडण्याची आकाशात फिरण्याची

झाले गगन ठेंगणे पिल्ले उडाली आकाशी…!

*

पिल्ले उडाली आकाशी नवे जग शोधायला

एकटीच जगे चिऊ घरपण जपायला…!

© श्री सुजित कदम

मो.7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares