शिक्षण – B.A. (Hons.) Mum. Uni. अर्थशास्त्रातील पदविका
जन्म – 02/06/1958 – निपाणी
दी सांगली बँकेत1979 पासून- कारकून पदाने सुरू झालेली कारकीर्द. 2011 रोजी सीनियर मॅनेजर पदावरून आय.सी.आय.सी.आय बँकेतून (विलींनकरणा नंतर) निवृत्त. सध्याचे वास्तव्य विश्रामबाग सांगली.
निवृत्ती नंतर लेखन सुरु केले. कथा, ललित लेखन,पहिला चहा (स्फुट लेखन), चित्र कथा सारखे लेखन.विविध लेखन स्पर्धेत सहभाग आणि यशस्वी मानाकांने प्राप्त. दिवाळी अंकातून कथांना प्रसिध्दी. ‘कथारंग’ पहिले पुस्तक प्रसिध्द.
… जे जे पेरतो ते तेच उगवते हा सृष्टीचा नियम आहे ,हे तर तुम्हा आम्हा सर्वांना विदीत आहेच…प्रत्येक भागातली अशी सुफलाम भूमी हि सोन्याची खाण असणारी भूमी वाटतं असते…निसर्गाचे वरदान लाभलेली , नदी, नाले, ओढे ,तळी, बावी ,विहिरी जलाने तुडुंब भर भरून वाहू लागल्या की कृषीवलाच्या चेहऱ्यावर आनंद पसरवते. जे पिकतं ते सोनच असतं…उन्हाळातल्या मशागतीपासून रोहिणीची वाट पाहात मृगाची सरीने भूमी भिजली कि पहिला उगवणारा आशेच्या हिरव्या हिरव्या कोवळ्या कोंबाकडे पाहून कृषिवल त्याची निगराणी करत जातो..श्रावणातल्या हिरवाईने वसुंधरा शालूने सलज्ज नवथर नवयौवना दिसते…आश्विनला ती परिपक्व होते.. हिरवे पणा च्या जागी पिवळेपणाची परिपक्वता येते… जीवन परिपूर्ण झाले या कृतार्थतेने समाधान तिथे विलसत असते.पश्चिमेचा वारा वाहू लागतो आणि त्यावेळी उभ्या असलेल्या शेतातील पिकाचे तुरे डोलू लागतात. जणू काही सृष्टीचे गुणगान गात असताना मग्न झालेले दिसतात… आता लवकरच आपलं या भुमीशी असलेलं नातं संपणार आहे.. ही मोहमाया सोडून जायचे दिवस आले आहेत.. आसक्ती पासून मुक्ती मिळवायची हीच वेळ आलेली असते…
… अन् आपली सर्वांची जिवनानुभवता याहून काही वेगळी असते का? पिकलेपण म्हणजे अगणित कडू गोड अनुभवांची संपन्नता नसते काय? हा अनमोल सोनेरी विचारांचा ठेवा पुढील पिढीला द्यायचा हेच सुचवत नसते काय? पिकलेपणात सोनेपण दडलेलं नसते काय?
(मूळ इंग्रजीतील पोस्टचा प्रकाश भागवत कृत मराठी अनुवाद- वाचनिय आणि चिंतनशील सुद्धा.)
दीक्षांत समारोहात भाषण करतांना प्रमुख वक्ते जे स्वतः एका शिक्षण संस्थेत प्राचार्य पदावर होते, ते म्हणाले, डॉक्टर असणाऱ्या बापाला आपल्या मुलांनाही डॉक्टर व्हावं असं वाटतं, इंजिनीयर बापाला आपल्या मुलांनाही आपल्यासारखंच इंजिनियर व्हावं असं वाटतं, उद्योग धंदा करणाऱ्या बापाला आपल्या मुलांना एखाद्या कंपनीचा सीईओ व्हावं असं वाटतं. तसं शिक्षकी पेशा असणाऱ्या बापालाही आपल्या मुलानं यांच्यापैकीच कांहीतरी एक व्हावं असं वाटत असतं पण शिक्षक व्हावं असं कुणालाही स्वतःहून वाटत नाही.
ही परिस्थिती दुर्दैवी आहे परंतु हीच वास्तविकता देखील आहे.
रात्रीभोजच्या प्रसंगी जेवायला आलेले पाहुणे जेवणाच्या टेबल भोवती बसून आपापसात चर्चा करीत होते. त्यापैकी एक व्यक्ती जो एका कंपनीमध्ये सीईओ होता, त्याला शिक्षण क्षेत्राबद्दल फारशी आस्था नव्हती. हे क्षेत्र समाजोपपोगी नसल्याचं त्याचं मत होतं. तो म्हणाला, “ज्यानं केवळ शिक्षक होणं हाच आपल्या जीवनातला सर्वोत्तम पर्याय आहे असं ठरवलं तो मुलांसमोर काय आदर्श ठेवणार बोडख्याचा?*”
आपला मुद्दा पुढे रेटत तो बाजूलाच बसलेल्या एका शिक्षिकेला बोलला, ” दातार ताई, तुम्ही स्वतः एक शिक्षक आहात, अगदी प्रामाणिकपणे सांगा तुम्ही काय असं महत्वाचं कार्य करता तुम्हाला वाटतं?”
दातार ताई आपल्या प्रामाणिकपणाबद्दल आणि फटकळपणाबद्दल प्रसिद्ध होत्या. त्या म्हणाल्या, मी काय काम करते हे तुम्हाला ऐकायचय ना ऐका तर मग?
त्या एक क्षणभर थांबल्या आणि मग त्यांनी बोलायला सुरुवात केली.
आपण जितके परिश्रम करू शकतो असं मुलांना वाटतं त्यापेक्षा अधिक परिश्रम मी मुलांकडून करवून घेते.
शिक्षिका होऊन मला अतिशय मोलाचा पुरस्कार मिळाला आहे असं मला वाटतं.
मुलांचे आई-बाप स्वतःच्याच मुलांना आय पाॅड, गेम क्यूब किंवा टीव्हीवर सिनेमा दाखविल्याशिवाय पाच मिनिटं देखील एका ठिकाणी बसवून ठेवू शकत नाहीत आणि मी या सर्वच मुलांना वर्गामध्ये ४० मिनिट किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ बसवून ठेवू शकते.
मी काय करते हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना? एक दीर्घ श्वास घेत त्या टेबलभोवती जमलेल्या सर्व पाहुण्यांकडे बघत म्हणाल्या –
मी मुलांचं शैक्षणिक मनोरंजन करते.
मी त्यांना प्रश्न विचारायला लावते.
मी त्यांना माफी मागायला शिकवते आणि माफी का मागायची त्याचं कारणही त्यांना सांगते. संस्कार, संस्कृती, सदाचार आणि नैतिकता शिकवून त्याप्रमाणे वागायला सांगते.
मी त्यांना इतरांबद्दल आदर बाळगायला शिकवते आणि त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल जबाबदारी घ्यायलाही शिकवते.
मी त्यांना सुंदर हस्ताक्षरात लिहायचं कसं हे शिकवते आणि त्यांच्याकडून लिहूनही घेते.
केवळ अभ्यास करवून घेणं हेच काही सर्वस्व नाही, मी त्यांना सतत (पुस्तकं) वाचायला लावते.
मी त्यांच्याकडून प्रत्यक्ष आकडेमोड करवून घेते. मुलांनी, देवानं दिलेल्या त्यांच्या बुद्धिचा वापर करायला हवा माणसानं बनविलेल्या कॅल्क्युलेटरचा नव्हे.
इतर देशातल्या माझ्या विद्यार्थ्यांना, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक ओळख अबाधित राखील, भारताबद्दल त्यांना जे काही जाणून घ्यावयाचे आहे त्याचा अभ्यास त्यांना करायला लावते.
माझ्या सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित वाटेल असा माझा वर्ग असावा हा माझा प्रयत्न असतो.
आणि शेवटचं हे की मी त्यांना हे समजावून सांगते की तुम्हाला देवाकडून जी कांही देणगी मिळाली आहे तिचा जर तुम्ही उपयोग करून घेतलात, खूप परिश्रम केलेत, आणि आपल्या मनाचं ऐकून वागलात तर जीवनात तुम्ही यशस्वी होऊ शकाल.
श्रीमती दातार पुन्हा काही क्षण थांबून म्हणाल्या, पैसा हेच काही सर्वस्व नाही असं मानणार्या मला, जेव्हा लोक मी काय काम करते यावरून माझी समाजातली पत ठरवतात तेव्हा मी माझं डोकं वर करून जगात वावरते आणि अशा लोकांकडे मी ढुंकूनही पाहात नाही कारण ते निर्बुद्ध, अशिक्षित, अज्ञानी, तर्कशुन्य आणि तत्वहीन असतात. मी काय करत असते ते तुम्हाला जाणून घ्यायचंय?
मुलांना शिक्षण देऊन मी त्यांना त्यांनी डॉक्टर, इंजिनियर किंवा सीईओ होण्यासाठी तयार करते. तुम्ही काय करता मिस्टर सीईओ फक्त पैसा मिळवता?
तुम्ही डॉक्टर, इंजिनिअर, सीईओ किंवा यशस्वी उद्योजक होतात पण भावी पिढीला तेच बनण्यासाठी त्यांचा प्राथमिक स्तर किंवा पाया उभारु शकत नाहीत.
आता त्या सीईओ चं ‘थोबाड’ पाहण्यासारखं झालं होतं. तो गप्प बसला. क्षणभरच तिथे शांतता पसरली आणि त्यानंतर प्रत्येक जण आदरानं उभा राहून टाळ्या वाजवू लागला.
अनुवादक: प्रकाश भागवत
प्रस्तुती: सौ.उज्वला केळकर
मो. 9403310170 email-id – kelkar1234@gmail.com
संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
जावईबापूंच्या डोक्याचा ताप कमी करण्यासाठी भटजींनी झंडू बाम बनवला…..!!!!
१५० वर्षांपूर्वीची गोष्ट……
तो इंग्रजी राज्यसत्तेचा काळ होता. गुजरातच्या काठियावाड प्रांतात जामनगर संस्थानमध्ये राजवैद्य होते विठ्ठल भट. आयुर्वेदाचे ते मोठे अभ्यासक होते. त्यांचा हातगुण चांगला होता. त्यांची प्रसिद्धी पंचक्रोशीत पसरलेली होती.
त्यांच्या मुलाचं नाव करुणाशंकर भट. पण त्याला झंडू भटजी म्हणून ओळखायचे. हे झंडू भटजीदेखील आयुर्वेदाचार्य होते. वैद्य विठ्ठल भट यांच्या हाताखाली ते तयार झाले होते. बापसे बेटा सवाई अशी त्यांची ख्याती झाली होती. स्वतःची औषधे तयार करण्यासाठी त्यांना रसशाळा सुरू करायची होती.
जामनगरचे महाराज जामसाहेब हे झंडू भट्जी यांच्या ज्ञानावर प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या संस्थानात रंगमती नदीच्या किनाऱ्यावर थोडीशी जमीन झंडू भटजींना बहाल केली. येथेच १८६४ साली झंडू भट्जींनी आपली आयुर्वेद रसशाळा स्थापन केली—- आणि झंडू ब्रॅण्डचा जन्म झाला. झंडू भटजींची औषधे फक्त जामनगर नाही तर अख्ख्या काठियावाड मध्ये फेमस होती. दूरदूरहून लोक त्यांच्याकडे आपल्या रोगाचे निदान होईल या आशेने येत असत. झंडू भटजींची रसशाळा भारतभर गाजू लागली होती.
या भट कुटुंबाच्या ज्ञानाला आधुनिक रुपात आणायचे श्रेय मात्र त्यांचा नातू जुगतराम वैद्य यांना जाते.
झंडू यांचे नातू जुगतराम वैद्य यांनी केमिस्ट्री व फिजिक्सचे आधुनिक शिक्षण घेतले होते. त्यांनी राजकोटमधील ब्रिटिश प्रोफेसर ली यांच्या लॅबमध्ये काम केलं होतं. आपली पारंपरिक औषधे जर आधुनिक रुपात आणली तर ती जगभरात पोहचवता येतील हे जुगतराम वैद्य यांच्या लक्षात आलं. पण आजोबा झंडू भटजी यासाठी तयार होत नव्हते.
एवढंच काय त्यांच्या कुटुंबातील कोणीही त्यांना साथ देत नव्हतं. फक्त एकजण तयार झाला —- झंडू यांचा जावई प्रभाशंकर पट्टानी.
हे प्रभाशंकर पट्टानी भावनगरच्या राजाचे पंतप्रधान होते. खरंतर त्यांचंदेखील आडनाव भट्ट होतं. सुरवातीला त्यांची परिस्थिती गरिबीची होती. त्याकाळी डॉक्टर व्हायचं म्हणून ते मुंबईला गेले, पण ते जमलं नाही. राजकोटला परत आल्यावर त्यांनी मास्तरकी सुरू केली. झंडू भटजींच्या मुलीशी त्यांचं लग्न झालं होतं, पण सासरकडच्या कोणीतरी त्यांचा डॉक्टर न झाल्यावरून अपमान केला व प्रभाशंकर यांनी पट्टानी हे आडनाव धारण केल.
प्रभाशंकर मुळात हुशार होते. राजकोटमध्ये शिकायला आलेल्या भावनगरचा राजकुमार भावसिंग याला त्यांची खाजगी शिकवणी लावण्यात आली. हा भावसिंग कायम डोकेदुखीने त्रस्त असायचा. त्यामुळे चिडचिड होऊन स्वभाव रागीट बनला होता. त्याच्या प्रकृतीचा पट्टानी यांच्या डोक्याला ताप होऊन बसला होता. त्याला बरे करण्यासाठी प्रभाशंकर यांनी आपल्या सासऱ्यांना सांगून बनवलेलं एक खास बाम आणून दिल.
ते बाम लावल्यावर राजकुमाराची डोकेदुखी पळून गेली.—– तेच ते आजचे सुप्रसिद्ध झंडू बाम.
त्यानंतर भावसिंग यांचा प्रभाशंकर यांच्यावरचा विश्वास वाढला. पुढे ते जेव्हा भावनगरच्या राजेपदी आले तेव्हा या आपल्या गुरूला त्यांनी पंतप्रधान बनवलं. प्रभाशंकर पट्टानी यांनी पुढची तीस चाळीस वर्षे काटेकोरपणे राज्यकारभार चालवला. भारताच्या राजकीय वर्तुळात त्यांचे मोठे वजन होते. महात्मा गांधीजींचेही ते खास मित्र होते.
अस सांगितलं जातं की जेव्हा असहकार आंदोलनावेळी चौरीचौरा प्रकरण घडलं, तेव्हा पट्टानी यांनी ‘ तुमच्या आंदोलनात हिंसा होत आहे ‘ असं सांगून गांधीजींचे कान धरले व त्याचाच परिणाम गांधीजींनी ब्रिटिश सत्तेविरुद्धचं असहकार आंदोलन मागे घेतले.
ज्या जावयाचा झंडू भटजींच्या कुटूंबाने अपमान केला, त्याचीच मदत घ्यायची वेळ त्यांच्या नातवावर आली.
पण मनात कोणताही पूर्वग्रह न बाळगता प्रभाशंकर यांनी जुगतराम वैद्य यांना राजाकडून सर्वतोपरी साहाय्य मिळवून दिले व या दोघांनी मिळून १९१० साली झंडू फार्मसिटीकल कंपनीची स्थापना केली.
अगदी काही काळातच झंडू बाम तुफान फेमस झाले. डोकेदुखीपासून अंगदुखीपर्यंत प्रत्येक गोष्टीवरील रामबाण उपाय म्हणून त्याला पाहिलं गेलं.
पुढच्या ९ वर्षात ही कंपनी शेअर बाजारात देखील आली.
झंडू भटजींनी रसशाळा सुरू केली त्याला जवळपास १५० वर्षे झाली. या कंपनीचा विस्तार शेकडो कोटींचा बनला आहे. आता या कंपनीची मालकी झंडू भटजींच्या कुटुंबाकडे राहिली नाही. पण फक्त भारतातच नाही तर परदेशातही त्यांची उत्पादने पोहचली आहेत.
‘दबंग ‘ मधली मलायका अरोरा देखील ‘ झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए ‘ जेव्हा म्हणते तेव्हा या आयुर्वेदिक औषधीचा सबंध भारतीय समाजावर झालेला परिणाम दिसून येतो.
डॉक्टरच्याआधी मदतीला येणारा, प्रत्येक घरात हमखास दिसणारा झंडू भटजींचा ‘ झंडू बाम ‘ १५० वर्षांचा झाला तरी त्याचा इफेक्ट कमी झाला नाही हे नक्की.
संग्राहिका : आनंदी केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आतून तुटलेली माणसं मनाने अतिशय ठाम होत जातात, प्रॅक्टिकल होत जातात. त्यांचं इमोशनल होणं कालांतराने बंद होत जातं.
आतून तुटलेली माणसं फारशी व्यक्त होत नाहीत. त्या लोकांपुढे तर बिलकुलच नाही, ज्यांच्यामुळे त्यांना सहन करावं लागलं असेल काहीतरी.
२+२=५ कुणी म्हणालं तरी ते “it’s okay” म्हणून निघून जातात.
ती माणसं वाद टाळतात, माणसांशी बोलणं टाळतात. एका पॉइंट नंतर त्यांचा realisation sense झपाट्याने वाढलेला असतो. समोरचा माणूस किती खरं बोलतोय, किती खोटं बोलतेय, फायद्यासाठी बोलतोय की स्वार्थ आहे हे पटकन समजून येतं.
काहीच रिॲक्ट न करता ती माणसं पुढे निघून जातात,आणि यातच खरा शहाणपणा असतो.
थोड्या कालावधीनंतर ही माणसं सेल्फ motivated होऊन जातात. कुणाचा सल्ला नको असतो, कुणाचा interference नको असतो. कारण जेव्हा खऱ्या आधाराची गरज असते तेव्हा ती गोष्ट मिळालेली नसते, म्हणून मग ते सेल्फ dependent होतात.
आतून तुटलेल्या माणसाला वादळाची भीती नसते, संकटांची काळजी नसते. कारण आपण लढू शकतो याची खात्री मनाला पटलेली असते. छोट्या छोट्या गोष्टीमुळे इमोशनल होण्यापासून ते mindset प्रॅक्टिकल होण्यापर्यंतच्या प्रवासाची सुरुवात आतून तुटण्यापासून होते….!
म्हणून……
” कभी कभी दर्द भी अच्छा होता है । “
संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सर्वसाधारणपणे मानवेतर प्राणी नैसर्गिक प्रेरणेनुसारच प्रत्येक कृती करीत असतात. मानवाला बुद्धीची देणगी असल्याने त्याने मात्र बुद्धीचा योग्य उपयोग करून कोणतीही कृती करणे अपेक्षित असते. त्याची प्रत्येक कृती सर्वांगीण विचार करुन,तिची योग्यायोग्यता विचारात घेऊन कशी आणि कां करायची याचे महत्त्व संस्कारच नकळत मनात रुजवत असतात. ही रुजवण संस्कारक्षम वयातच खोलवर होऊ शकते.म्हणूनच लहानपणापासूनच कौटुंबिक पातळीवर पालकांनी आणि शालेयस्तरावर शिक्षकांनी मुलांच्या मनोभूमीवर संस्कार बीजांची पेरणी करणं आवश्यक ठरतं. या संस्कारांची गुणात्मकता संस्कारांइतकीच ते कसे केले जातात यावरही अवलंबून असते. लहान वयात मुलांनी एखाद्या गोष्टीचा हट्ट केला तर त्याला पटकन् होकार किंवा नकार न देणे ही संस्कारांच्या रुजवणीतील पहिली पायरी.कारण या दोन्हीही गोष्टींचा दीर्घकाळ टिकणारा नकारात्मक परिणाम हानिकारक ठरणारा असतो. त्याच्या मागणीप्रमाणे एखादी वस्तू देताना ती कशी वापरायची, कशी सांभाळायची, तिची कशी काळजी घ्यायची हे समजावून सांगणं जसं महत्त्वाचं तसंच ती वस्तू देणं त्याच्या हिताचं नसेल तर ते कां हे त्याला समजेल अशा पध्दतीने त्याला सांगणंही!तसेच ती वस्तू आवश्यक असूनही देता येणे शक्य नसेल तर त्याला त्याची कारणे त्याच्या कलाने समजावून सांगणेही अगत्याचेच.
मुलांना चांगल्या गोष्टींची सवय लावण्यासाठी त्यांना सतत उपदेशाचे डोस पाजत राहिलं तर ते त्याना कडवट औषधासारखेच वाटणार. ‘हे कर’, ‘ते करू नको’ याचा त्यांना आधी नावड मग कंटाळा या क्रमाने अखेर तिरस्कारच वाटू लागेल. ‘हे करायलाच हवं’ असं अट्टाहासाने सांगत राहिल्यास ते तोंडदेखलं तेवढ्यापुरतं करून एरवी ते करणं सातत्याने टाळण्याकडेच बालसुलभ कल रहाणं अपरिहार्यच असतं. म्हणूनच जे मुलांनी करावं अशी आपली अपेक्षा असते ते आपल्या कृतीने त्याला जाणवेल असे सहजपणे आपणही करीत रहाणे महत्त्वाचे ठरते. त्यांना गोडीगुलाबीने एकदा समजून सांगितले तरी आपल्या अनुकरणानेच तसे वागण्यास मुलेही आपसूकच उद्युक्त होतात. म्हणूनच मुलांना खरं बोलावं असं सांगतानाच मोठ्या माणसांनीही खोटं न बोलण्याचं पथ्य आवर्जून पाळायला हवं. लवकर उठणे, दोन्ही जेवणानंतर दात घासणे, जेवताना आनंदी वातावरण ठेवणे, झोपून न वाचणे, मोबाईल व टीव्हीचा अतिरेकी वापर न करणे,पाण्याचा अपव्यय टाळणे, कोणाचाही वावर नसणाऱ्या खोल्यातील लाईटस् वेळोवेळी बंद करणे यासारख्या गोष्टी उपदेशाने नव्हे तर मोठ्या माणसांनी स्वतःच अंगिकारलेल्या पाहूनच मुले सहज सुलभपणे त्या अंगी बाणवण्यास नकळत प्रवृत्त होतात.
संस्कार हे अट्टाहासाने करायचे नसतातच.ते सहजपणेच व्हायला हवेत. एखाद्या चांगल्या गोष्टीचे महत्त्व ती एकदा अंगवळणी पडली की समजतेच. नैसर्गिक उपलब्धीचा काटकसरीने वापर करण्याची सवय,कष्टाने पैसे मिळवता येईपर्यंत ते वाचवण्याची सवय, या गोष्टी स्वतः पैसे मिळवू लागल्यानंतरही बचतीला पूरकच ठरतात. नम्रतेने वागायची सवय कितीही राग आला तरी कुणापुढेही आवाजावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम बनवते, माणुसकीचा संस्कार ‘नाही रे’ वर्गातल्या गरीब मित्राबद्दल तिरस्कार किंवा घृणा निर्माण न करता त्याच्याशी आपुलकीने वागण्यास प्रवृत्त करते.. हे असे संस्कार म्हणजेच कालातीत अशा मूल्यांचे रोपणच.हे मूल्यसंस्कारच घरातील वातावरण निकोप, निरोगी,मनमोकळं ठेवतील.अशा वातावरणातले संस्कार मुलांवर लादले जाणार नाहीत तर ते त्यांच्या मनात आपसूक झिरपत जातील.आणि तेच मुलांच्या शारीरिक आणि मानसिक सक्षमतेला पूरकही ठरतील. परस्परांमधील संवादातून, सहवासातून, स्वानुभवातून योग्य विचार करायला ती मुले स्वतःच प्रवृत्त होतील.
स्वतः खाताना दुसऱ्याला न देता खाणे ही प्रकृती, दुसऱ्याचे हिसकावून घेऊन खाणे ही विकृती, आणि आपल्या घासातला घास काढून तो दुसऱ्याला देणे ही संस्कृती. मुलांवर संस्कारक्षम वयात केलेले संस्कार त्याना विकृतीपासून दूर ठेवत सुसंस्कृत बनवतील ते या अर्थाने!
माणूस जन्मतः द्विपाद प्राणी म्हणूनच जन्माला येतो आणि उचित संस्कारातूनच त्याचा दुसरा जन्म होतो तो ‘सांस्कृतिक जन्म’ या अर्थाने! द्विज म्हणजे ब्राम्हणच नव्हे तर असा दोनदा जन्म घेऊन सुसंस्कारित झालेला कुणीही. प्रत्येक धर्माचेच असे विविध संस्कार असतातच. ते महत्त्वाचे मानले तरीही त्यांना जेव्हा अवास्तव महत्त्व दिले जाते तेव्हा माणूस संस्कारीत न होता संस्कारबध्द होतो आणि त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा संकोचच होतो.
‘जन्मना जायते शूद्र:
संस्कारात् द्विज उच्यतेl’
या श्लोकाचा व्यापक अर्थ घेतला तर संस्कारांचे नेमके महत्त्व त्यातच लपलेले आहे हे लक्षात येईल. सखोल ज्ञान प्राप्त करणारा माणूस ज्ञानी,विद्वान म्हणता येईलही पण तो सुसंस्कारित नसेल तर मात्र फक्त शिक्षितच राहील. खऱ्या अर्थाने सुसंस्कारित असणारा माणूस मात्र ज्ञानी, विद्वान माणसाइतका शिक्षित नसला तरीही सत्प्रवृत्त आणि
सूज्ञ असेल आणि म्हणून तोच खऱ्या अर्थाने दोनदा जन्म घेणारा म्हणून ‘द्विज’ बनून संस्कारात् द्विज उच्यते’ या श्लोकाचा अर्थही पूर्णतः सार्थ करेल!!
☆ टिकलीच्या_निमित्ताने…लेखिका : डॉ शरयू देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
तशी ती मी माझ्या मर्जीनेच लावते किंवा लावत नाही. पण मनात कैक वर्षं तिचं असणं /नसणं घोंगावत होतं.. सध्याच्या चर्चेत त्यालाच वाट करून देण्याचा हा प्रयत्न ….
आई जुन्या मताची. त्यामुळे ‘टिकली न लावणं’ ही पद्धत तिच्या गावीही नव्हती. कुंकू /गंध/ टिकली न लावणं म्हणजे ‘आपल्या संस्कृतीला नाकारणं आणि अमुक एका संस्कृतीला मूक पाठींबा दर्शविणं ‘ असं तिचं साधं सरळ गणित होतं. अर्थात मी लहानपणापासून बंडखोर, त्यामुळे इतर पुढारलेल्या विचारांच्या कुटुंबातील मुलींचं पाहून मीही गंध/ टिकली याला विरोध केला. आई म्हणायची, ” निदान बाहेर जाताना तरी लाव “.. ते थोडंसं पाळलं.
शाळेतल्या शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षिका, मुलींना ज्युदो कराटे शिकवण्यासाठी प्रोत्साहन देत आणि शाळा भरताना कपाळावर गंध /टिकली नसेल तर २५ उठाबशा काढायला लावत. या परस्परविरोधी क्रियांमागची कारणमीमांसा समजून घेण्याची मानसिक कुवत तेव्हा नव्हती. पण टिकलीविषयीचं गूढ निर्माण झालं ते तेव्हापासून.
कॉलेजमधे आल्यावर वयानुसार येणारी परिपक्वता म्हणा किंवा आजूबाजूच्या विश्वाची थोडी अधिक जाण म्हणा, आईची बाजू थोडीथोडी पटायला लागली होती किंवा मुद्दाम विरोध करून तिला दुखवावंसं वाटेना. त्यामुळे जिन्स /western outfits घातले की टिकली नाही,आणि पंजाबी ड्रेसवर मॅचिंग टिकली असा आपला मधला मार्ग निवडला. तरीही टिकली /गंध याभोवतीचं गूढ आकर्षितच करत राहिलं…… ‘ लाव ‘ कुणी म्हंटलं की राग यायचा, पण ती लावल्यावर चेहरा जरा उठावदार, फ्रेश दिसतो हे उघड उघड मान्य करायलाही कठीण जात असे.
सुट्ट्यांमध्ये गावी जात असू. तिथेही घरात आम्हाला मुली म्हणून कुठलीही बंधनं नव्हती. खानपान पेहराव याबाबत बऱ्यापैकी मोकळीक होती. आम्हीदेखील मुद्दाम जेष्ठांच्या समोर त्यांना आवडणार नाही असं काही करत नसू. गावात, इतरत्र बाहेर जाताना मात्र स्लिव्हलेस, बॉयकट असणं आणि टिकली नसणं हा चर्चेचा विषय ठरत असे. Obligatory झाल्या गोष्टी की मग उगाचच त्याविषयी तिटकारा निर्माण होतो. पण वय वाढत गेलं तसतसं मात्र ही जाणीव बोथट होत गेली. गावी गेल्यावर थोड्याशा मर्यादा पाळल्या की बाकी चैन असते हे लक्षात येत गेलं आणि बंडखोरी कमी होत गेली.
कॉलेजला असताना एक मुस्लिम मैत्रीण आमच्या पर्समधल्या टिकल्यांची पाकीटं घेऊन लेडीज रूममध्ये लावून आरशात बघत असे. कदाचित पहाण्याची सवय नसल्यामुळे असेल, पण तरीही साधारणच दिसणारी ती, टिकलीमुळे विशेष दिसत असे. पाच दहा मिनिटं ठेवत असे. त्या ५-१० मिनिटांत इवलीशी टिकली तिचा चेहेराच नव्हे तर मनही उजळून टाकत असे. साधं नेहमीचं टिकलीचं पाकीट कुणासाठी आनंदाचा स्त्रोत असू शकतो हे प्रथमच जाणवलं..
Western Wardrobe असेल तर टिकली नाही लावायची हा पायंडा कायम ठेवला. भारतीय पोषाख परिधान केला की छोटीशी का होईना, पण टिकली आपोआपच लावली जायची…
पुढे पेशा निवडला तोही टिकलीचं महत्त्व वेगळ्या पद्धतीने दाखवून गेला. MA झाल्यावर लगेच हंगामी प्राध्यापिका म्हणून एका कॉलेजमधे जॉब मिळाला. माझे विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठे दिसत. पंजाबी ड्रेसमधल्या, बारीक टिकलीच्या, लहानखुरी असलेल्या मला कुणी प्राध्यापिका समजेना. विशेषतः वर्गातील मागच्या बेंचवरची मुलं टिंगल टवाळी करतायत असं जाणवलं. या व्यवसायात थोडा पोक्तपणा दिसण्यातही हवा हे लक्षात आलं. मग साडी नेसून आणि ठळकपणे दिसून येणारी टिकली लावायला सुरुवात केली तशी आपसूकच विद्यार्थी आदरानं, अदबीनं बोलायला लागले. टवाळखोर पोरांपासून दूर ठेवायला टिकली अशी धावून आली. प्राध्यापक, निवेदिका या सगळ्याच भूमिकांमध्ये टिकलीचं असणं मान देत गेलं. किंबहुना ती लावली नाही तर विनाकारण गैरसमज आणि चर्चा होत रहातील या विचाराने ती लावण्याचीच सवय लागली. संस्कृतीचा संदर्भ बाजूला ठेवला तरी ही टिकली कुठेतरी अनेक विचित्र नजरांपासून वाचवणारी ‘सहेली’ बनत गेली. …
लग्न झाल्यावर अमेरिकेत गेल्यावर, एरवी नाही तरी, महाराष्ट्र मंडळात जाताना आवर्जून टिकली लावून जाणं असे…परदेशात भारतीय संस्कृतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न असा छोट्या टिकलीतूनही केला जाई..
सासुबाई सुरूवातीला एक दोन वेळा टिकलीची आठवण करून देत. पण कदाचित सवयीने त्याही काही बोलेनाशा झाल्या. आजेसासुबाई मात्र एकदा स्पष्ट म्हणाल्या, ” तुला एरवी काय करायचं ते कर हो.. पण माझ्यासमोर अशी बिना कुंकू गंधाची येत जाऊ नकोस ..” हे ऐकताना किंचित राग येतोय की काय असं होतानाच त्या म्हणाल्या, “आमच्या कपाळावर आहे टिकली, पण खरं अर्थ आहे का त्याला?!” ह्या प्रश्नानं मात्र गलबलून आलं. पुन्हा कधीही त्यांच्यासमोर बिना टिकलीची गेले नाही. इतकुशा गोल तुकड्यानं आज्जेसासुबाईंचं मन जिंकलं तेव्हा मात्र अट्टाहास बाजूला सारला..
एरवी सगळे लाड पुरवणारा, सगळ्या बाबतीत मुभा देणारा मोठा भाऊ, आजही, अजूनही, माहेरी गेल्यावर, बाहेर जाताना कपाळावर टिकली नाही अशी आठवण करून देतो, तेव्हा याचा संबंध स्त्रीमुक्तीशी न जोडण्याइतकी परिपक्वता आता आलीये. यात मला फक्त जाणवते ती त्याची धाकटी बहीण म्हणून काळजी आणि चुकूनही आपल्या संस्कृतीशी फारकत न होण्यासाठीची तळमळ.
सासुबाईंनी मला टिकली लावण्याची सक्ती करू नये असं मी त्यांना आडून सुचवत असे. पण सासरे गेल्यावर जेव्हा थोडा वेळ रिकाम्या कपाळाच्या सासुबाई पाहिल्या तेव्हा मात्र धस्स झालं . माझ्या टिकलीमागची त्यांची भूमिका वेगळ्या पद्धतीने समोर आली आणि आता टिकली लावण्याची सक्ती मीच त्यांना करत असते .
टिकली, मंगळसूत्र, साड्या यांना कडाडून विरोध करणारी एक जेष्ठ मैत्रिण, नवऱ्याच्या अकाली निधनानंतर मात्र टिकली लावायला लागली. मध्यंतरी भेटली, ” हल्ली साड्या नेसाव्या वाटतात गं खूप .. किती भारी भारी साड्या आणायचा ‘तो’.. मी मात्र त्याला ‘टिपिकल नवरा’ म्हणून चिडवत होते.. आता त्याची आठवण झाली की नेसते साडी आणि वर मॅचिंग टिकली सुद्धा …तिथून सुद्धा मला डोळा मारत असेल बघ “.. मनात आलं, हिची टिकली अजून वेगळी..
हौसेनं वेगवेगळ्या प्रकारच्या टिकल्या लावणारी एक मैत्रीण, वेगळ्या समाजात हट्टानं प्रेमविवाह करून गेली तेव्हा टिकली नसलेलं तिचं भकास कपाळ पाहून हळहळ वाटली .” आता या कपाळावर कधीही टिकली येणार नाही ” हे तिचं वाक्यं का कोण जाणे खूप खोलवर रूतलं. साधी टिकलीच ती, पण तिच्या नसण्यानं मैत्रिणीचं आयुष्य मात्र पूर्णपणे बदललं.
हैदराबादमध्ये आल्यावर, जॉब करताना जाणवलं की टिकलीचा आणि मॉडर्न असण्याचा काही संबंध नाही. Kafka, Derrida अशा विचारवंतांच्या क्लिष्ट संकल्पना सहज उलगडून दाखवणाऱ्या प्राध्यापिका भलं मोठं कुंकू लावून येत असत. आपण एका विशिष्ट धर्माचे आहोत (किंवा नाही आहोत) हे ठळकपणे दर्शविणं हैदराबादसारख्या ठिकाणी आवश्यक वाटत असावं आणि कदाचित त्याच जाणिवेतून इथल्या लहानथोर सर्व महिला टिकली आवर्जून लावताना दिसतात.
सुषमा स्वराज, स्मृती इराणी, निर्मला सिताराम, सुधा मुर्ती … यांच्या टिकल्या मला तळपत्या तलवारींसारख्या भासतात. बुद्धिमत्ता आणि सौंदर्य यांचा अनवट संगम त्यांच्या कपाळावरच्या टिकलीने अधोरेखित होतो. त्यांचं कर्तृत्वच असं आहे की त्यांच्या कपाळावर धारण होऊन टिकलीचाच मान वाढलाय असं वाटत रहातं…
टिकली अशी वेगवेगळी रूपं, अनेकविध संदर्भ घेऊन समोर येत राहिली. ती माझ्यातली बंडखोरी कमी करत गेली. अर्थात ती लावणं, न लावणं हा सर्वस्वी माझाच निर्णय. आधीही होता, आजही आहे आणि पुढेही राहील. पण आता प्रत्येक वेळी तिच्याभोवती स्त्रीमुक्तीचं वारूळ चढवायला नको वाटतं . घरात ‘टिकली सुद्धा न लावणारी लंकेची पार्वती’ असा अवतार आजही कायम असतो. .सक्ती केली जात असेल तर आवडत्या गोष्टी देखील नावडत्या होतात. लावण्याची असू नये तशी न लावण्याची पण असू नये इतकंच. चाळीशीत आता एक जाणवतंय की उगाच विरोधासाठी विरोध करायची गरज नसते , विनाकारण प्रसिद्धीसाठी टोकाची भूमिका घ्यायची गरज नाही.
बाकी हा लेख लिहीत मी लहानपणापासून पहात असलेला , माझ्या काकूंचा कुंकूविरहित चेहरा सतत समोर होता. भर तारुण्यात ते पुसलं गेलं. घरात कुणीही न लावण्यासाठी बळजबरी केली नव्हती. पण त्या काळच्या प्रथेनुसार काकूंनी स्वतःच ते लावण्याचं नाकारलं…साजशृंगाराची आवड असणाऱ्या माझ्या काकूला हा निर्णय घेताना किती जड गेलं असेल ! ……. जी टिकली ” माझ्या कपाळावर माझ्या मर्जीनेच लागेल ” असा हट्ट करते, त्याच इलुशा टिकलीसाठी एक कपाळ गेली चाळीस वर्षे किती आसुसलेलं, अतृप्त राहिलंय याचा विचार करून मात्र अंगावर काटा येतो…
लेखिका : डॉ शरयू देशपांडे, हैदराबाद
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ब्रेकिंग न्यूज देण्याच्या घाईत, शहानिशा न करता एखाद्या सुप्रसिद्ध व्यक्तीच्या निधनाची बातमी देण्याचा उतावीळपणा करण्याची परंपरा तशी जुनीच आहे. अभिनेते विक्रम गोखले यांच्या मृत्यूच्या बाबतीत गेले काही दिवस विविध माध्यमांनी केलेला उतावीळणा चर्चेचा विषय बनला आहे.
मात्र, असा प्रकार आत्ताच घडतोय असे नाही. घाईगडबडीत कोणतीही चौकशी न करता निधनाची बातमी देण्याची परंपरा जुनीच असल्याचे आढळते. अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या ख्यातनाम वृत्तपत्राने ८ जुलै १९२२ च्या अंकात, मिरजेचे सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर विल्यम वॉनलेस हयात असताना, त्यांच्या निधनाची बातमी अशाच पद्धतीने कोणतीही शहानिशा न करता दिली होती.
या बातमीमुळे त्यावेळी भारतासह अमेरिकेत मोठी खळबळ माजली होती. मात्र डॉक्टर वॉन्लेस हयात असल्याचे समजताच न्यूयॉर्क टाइम्सने १३ जुलै १९२२ रोजी पुन्हा खुलासावजा बातमी प्रसिद्ध केली.– ‘ डॉ. वॉन्लेस अजूनही हयात आहेत ‘ (डॉ. वॉन्लेस स्टील अलाइव्ह)— अशा मथळ्याची खुलासा करणारी बातमी छापण्याची नामुष्की न्यूयॉर्क टाईम्सवर आली. डॉक्टर वॉन्लेस हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धन्वंतरी होते. मूळचे अमेरिकेचे असलेल्या वॉन्लेस यांनी मिरजेमध्ये मिशन इस्पितळ नावाची मोठी संस्था उभी केली. दक्षिण महाराष्ट्रातील राजे राजवाड्यांसह अनेक गोरगरीब लोक त्यावेळी मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत असत. डॉक्टर वॉन्लेस यांनी निरपेक्ष भावनेने केलेल्या रुग्णसेवेमुळे ते देशातच नव्हे तर जगभर वाखाणले गेले. तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांना ‘ कैसर ई हिंद ‘ आणि ‘ सर ‘ या मानाच्या पदव्या बहाल केल्या. पुढे ३ मार्च सन १९३३ रोजी त्यांचा मृत्यू झाला. मात्र तत्पूर्वीच सन १९२२ मध्ये त्यांच्या हयातीतच त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी तत्कालीन न्यूयॉर्क टाइम्स या सुप्रसिद्ध दैनिकात प्रसिद्ध झाली होती .कोणतीही शहानिशा न करता सदर दैनिकाने ही बातमी छापली. मात्र चहूबाजूनी टीका झाल्यानंतर पाच दिवसांनी न्यूयॉर्क टाइम्सने आपली चूक सुधारत डॉक्टर वॉन्लेस हयात असल्याची बातमी खुलासाच्या स्वरूपात छापली होती. पुढे डॉ. वॉन्लेस दहा वर्षे हयात होते.
लेखिका : सुश्री मानसिंगराव कुमठेकर
मो – 9405066065
संग्राहिका – माधुरी परांजपे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ घोडा हवेत उडू शकेल….मूळ कथा – जाॅर्ज बर्नार्ड शाॅ…अनुवाद अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
घोडा हवेत उडूही शकेल…..
एका गुन्हेगाराला देहदंडाची शिक्षा होते. सैनिक त्याला वधस्तंभाकडे घेऊन जात असतात. प्रथेप्रमाणे त्याला अखेरची इच्छा विचारण्यात येते. कैदी म्हणतो “ मला राजाशी बोलायचं आहे.”
कैदी राजाला म्हणतो, “ मी मरणार याचं दुःख मला आहे, पण मरण टाळता येणार नाही हे मला समजतं. माझं दुःख हे की माझ्याबरोबर माझी कला संपून जाईल.”
“ कोणती कला? “ राजा विचारतो.
“ मला घोडा हवेत उडवता येतो,” कैदी अभिमानाने उत्तरतो, “ ही कला कोणाला शिकवता आली तर मी सुखाने मरेन.”
“ मला शिकवशील? “ राजा विचारतो.
कैदी आनंदाने ‘ हो, नक्की शिकवेन ‘ असे म्हणतो.
“ किती दिवस लागतील?”
“ एक वर्ष लागेल, “ कैदी म्हणतो.
राजा त्याचा देहदंड रद्द करतो. कैदी कारागृहात येतो. इतर कैदी अचंबित होतात. हकीकत ऐकल्यावर त्याला विचारतात, “ तुला खरंच घोडा हवेत उडवता येतो?”
“ नाही,” कैदी प्रामाणिकपणे सांगतो.
“ मग तू राजाला का थाप मारलीस?”
“ एक वर्षात काहीही होऊ शकतं. राजा मरू शकतो, मी मरू शकतो, शेजारचा राजा आक्रमण करू शकतो, राजाचा वा राणीचा वा त्यांच्या मुलाचा वाढदिवस म्हणून कैद्यांना मुक्त केलं जाऊ शकतं, काहीही … “ कैदी उत्तर देतो.
“ गाढवा, पण हे काहीच घडलं नाही तर?” सोबती विचारतात.
—– कैद्याला हसू नका. हेच सांगत, आश्वासन देत राजकारणी लोक पाच पाच वर्षं राज्य करतात. पुढच्या निवडणुकीत निवडून द्या, घोडा नक्की उडू लागेल असंच सांगत असतात. त्यांनी घोडा लावला तरीही मतदारांना वाटतं आहे त्या घोड्याला पर्याय नाही, तोच लवकरच उडू लागेल.
सहज माहिती म्हणून…..
….. ही मूळ गोष्ट जॉर्ज बर्नाड शॉ यांची आहे. ‘ सरकार कसं काम करतं ?‘ — या प्रश्नाला त्यांनी दिलेलं हे उत्तर अतिशय संक्षिप्त पण समर्पक आहे…
☆ विचार–पुष्प – भाग – ४४ – ते … पाच आठवडे ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
आलीया भोगासी असावे सादर ! केव्हढा मोठा धक्का? ज्या सर्वधर्म परिषदेत भाग घ्यायला अमेरिकेत आलो ते ध्येय च साध्य होणार नाही? आपल्यासाठी सर्व शिष्यांनी एव्हढी धडपड केली ती सर्व व्यर्थ जाणार? मनातून स्वामीजी नक्कीच खूप अस्वस्थ झाले असतील. आपलीही चूक त्यांच्या लक्षात आली. म्हणजे या विषयीचं अज्ञान जाणवलं. कारण सर्वधर्म परिषद भरवण्याची योजना गेली दोन वर्ष चालू होती. जगातले सर्व प्रमुख धर्म, पंथ,संप्रदाय त्या त्या धर्माच्या विविध संस्था यांच्याशी पत्रव्यवहार चालू होता. त्यामुळे त्या त्या देशासाठी समित्याही स्थापन झाल्या होत्या. एव्हढच काय भारतासाठीही समिति झाली होती. पण याची तिळभरही कल्पना स्वामीजींना आणि त्यांच्या शिष्यांना नव्हती. शिवाय अशी अधिवेशने कशी भरतात,त्याची पद्धत काय असते, हे ही माहिती नव्हते. शिष्यांनाही वाटलं की एकदा अमेरिकेला पोहोचले की पुढचं सगळं आपोआप होईल. या त्रुटी लक्षात आल्या. आणखी एक महत्वाचं कारण होतं, या धर्म परिषदेसाठी केलेल्या भारतीय समितीत परंपरांबरोबर धर्माला विरोध करणारे ब्राह्म समाजाचे आणि सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते होते. की जे स्वामीजींना पण ओळखत होते. त्यांनी महाबोधी समिति आणि जैन समिती च्या प्रतींनिधींना परवानगी दिली होती. भारतातला प्रमुख धर्म हिंदू असला तरी त्याच्या प्रतिनिधित्वाबद्दल विचार केला गेला नव्हता. दुर्दैवच म्हणावं.
परिषदेला अजून वेळ होता तोवर शिकागोतले हे थंडीचे दिवस कसे निघणार?जवळचे पैसे तर भरभर संपत होते. आता सर्वात गरज होती ती पैशांची. थंडीसाठी गरम कपडे घेण्यासाठी शंभर डॉलर्स लागणार होते. स्वामीजी हताश झाले त्यांनी अलसिंगा ना तार केली, ‘सर्व पैसे संपत आलेत उपाशी राहण्याची वेळ आली आहे’. मद्रासला अलसिंगा यांनी भरभर वर्गणी गोळा करून तीनशे रुपये आणि मन्मथनाथ यांनी पाचशे रुपये पाठवले.’ एका दुर्बल क्षणी’ आपण तार केली असे त्यांनी पत्रात म्हटले. पण त्यांचा निर्धार पक्का होता काही झाले तरी मागे हटायचे नाही. परिषदेत भाग घ्यायचाच.
इथली व्यवस्था लागेपर्यंत स्वामीजी वेळ सत्कारणी लावत होते. तिथे जे औद्योगिक प्रदर्शन भरलं होतं ते पहायला रोज जात. ते अवाढव्यच होतं. सातशे एकर जागेवर ते उभं केलं होतं. या कामासाठी दोन वर्ष, सात हजार मजूर काम करत होते. सातशे जखमी झाले, अठरा मृत्यूमुखी पडले. यावरून त्याच्या भव्यतेची कल्पना येते. त्यात वेगवेगळे विभाग होते, रचना सुंदर होती. अडीच कोटीहून अधिक लोकांनी याला भेट दिली होती. यात विज्ञानातील अद्ययावत संशोधन, त्याचा उपयोग, यंत्रे उपकरणे, हे सर्व मांडलं होतं. यातलं मानवाची बुध्दी आणि कर्तृत्व स्वामीजींना आकर्षित करणारं होतं. त्यांना ते आवडलं होतं. ते आठवडाभर रोज बघायला जात.
त्या प्रदर्शनात स्वामीजींना अनेक अनुभव आले. अमेरिकन वृत्तपत्राची नीतीमत्ता कशी याचा अनुभव आला. कपूरथळयाचे महाराज प्रदर्शनात फिरत होते. पहिल्याच दिवशी प्रदर्शनात एक वार्ताहर एका भारतीय माणसाची मुलाखत घेत होता, तो भारतीय लोकांची अवस्था सांगू लागला, दुसर्या दिवशी वृत्तपत्रात ‘ हा महाराज दिसतो तसा नाही ,तो हलक्या जातीचा आहे, हे सर्व राजे ब्रिटीशांचे गुलाम आहेत, ते नैतिकतेने वागत नाहीत असं काही स्वामीजींना उद्देशून सनसनाटी वृत्त दिले, भारतातील एक विद्वान प्रदर्शनास भेट देतो अशी स्तुति करून, ते न बोललेली वाक्ये त्यांच्या तोंडी घातली होती.
त्यांच्या वेषामुळे सर्वांच लक्ष वेधलं जायचं. प्रदर्शन पाहता पाहता एकदा तर मागून कुणीतरी त्यांच्या फेट्याचं टोक ओढलं. स्वामीजींनी मागे वळून इंग्रजीतून आपली नाराजी व्यक्त केली. तसे, सद्गृहस्थ स्वामीजीना इंग्रजी येतं हे ऐकून, वरमून म्हणाले तुम्ही असा पोशाख का करता? कुतूहल म्हणून कुणी विचारलं तर ठीक, पण असा मागून ओढणं हा असभ्यपणाच. प्रदर्शन पाहताना एकदा गर्दीत तर त्यांना मागून ढकललं आणि मुद्दाम धक्का पण मारला गेला होता. असाही अनुभव त्यांना आला. वरच्या वर्गातील सुशिक्षित लोक असे वागतात याचं त्यांना आश्चर्य वाटलं.
बोस्टनला तर आणखीनच वाईट अनुभव. स्वामीजी रस्त्यावरून जात असताना त्यांना आपल्या मागून कुणीतरी येत असल्याचा भास झाला. त्यांनी मागे वळून पाहिले तर, काही मुलांचा आणि मोठ्या माणसांचा जमाव मागून येत असल्याचे दिसले ते पाहून स्वामीजी वेगात चालू लागले, तसे ते ही लोक वेगात आले. क्षणात आपल्या खांद्यावर काहीतरी आदळलं हे कळताच स्वामीजी धावत सुटले आणि अंधार्या गल्लीत नाहीसे झाले. थोड्या वेळाने मागे पहिले तर तो जमाव निघून गेला होता. स्वामीजींनी सुटकेचा निश्वास टाकला. स्वामीजींना लक्षात आली पाश्चात्य देशातली वर्णभेदाची विषमता. समतेचं तत्व पाश्च्यात्यांकडून शिकावं असं भारतात अनेक वर्ष शिकवलं जात होतं. तिथेच हे अनुभव आले. पाश्चात्य संस्कृतीतल्या गुणदोषांची आल्या आल्याच जवळून ओळख होत होती. स्वामीजींवरील हा हल्ला परदेशात झाला होता . इथे प्रकर्षाने आठवण झाली ती नुकत्याच पालघर मध्ये झालेल्या निर्दोष साधूंच्यावरील हल्ल्याची. त्यात त्यांना प्राणास ही मुकावे लागले. जी सर्वसामान्य प्रत्येक माणसाला प्रचंड धक्का देणारी होती. आपल्याच देशात घडलेली ही घटना समता बंधुत्वाबद्दल काय सांगते?
आता विवेकानंदांना आर्थिक अडचण सोडवण महत्वच होतं. बोस्टनला राहील तर स्वस्त पडेल असं कळल्याने ते तिकडे जाण्याचं प्रयत्न करू लागले. स्वामीजी प्रथम जहाजातून व्हंकुव्हरला उतरून शिकागोला जाणार्या कॅनेडियन पॅसिफिक या गाडीत बसले तेंव्हा, स्वामीजिंना भेटलेल्या केट सॅंनबोर्न यांनी पत्ता दिला होता तो बोस्टन जवळचा होता. या पहिल्याच भेटीत ओळख झालेल्या स्वामीजींचं वर्णन करताना त्यांनी म्हटलंय की, “रेल्वेत मी विवेकानंदांना प्रथम पाहिलं, त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्व हा पौरुषाचा एक उत्तुंग आविष्कार होता. त्यांचे इंग्रजी माझ्यापेक्षाही अधिक चांगले होते. प्राचीन आणि अर्वाचीन साहित्याशी त्यांचा परिचय होता. शेक्सपियर किंवा लॉङ्गफेलो किंवा टेनिसन, डार्विन, मूलर, आणि टिंडॉल यांची वचने त्यांच्या मुखातून अगदी सहजपणे बाहेर पडत होती. बायबलमधील उतारे त्यांच्या जिभेवर होते. सारे धर्म आणि संप्रदाय याची त्यांना माहिती होती आणि त्या सर्वांविषयीची त्यांची दृष्टी सहिष्णुतेची होती. त्यांच्या सान्निध्यात असणे हेच एक शिक्षण होते”.असा ठसा त्यांच्या मनात पाहिल्याच भेटीत उमटला होता. ही एक चांगली आनंद देणारी बाब होती.
विवेकानंदांनी केट सॅंनबोर्न यांच्याकडे जाण्याचं ठरवलं आणि शिकागोहून रेल्वेने बोस्टनला आले. विश्रांगृहात थांबून त्यांनी आल्याची तार केली त्याला उत्तर आलं की, ‘आजच्या दुपारच्या गाडीने तडक इकडे या’. तिथून त्यांचे घर चाळीस किलोमीटर वर गूसव्हिल इथे होते. त्या स्वता विवेकानंदांना घ्यायला आल्या आणि त्यांना घरी घेऊन गेल्या. इथूनच सुरू झाला त्यांच्यासाठी अनुकूल घटनांचा काळ.
झेंडू फुले जी त्यादिवशी अगदी १०० रुपये किलो दराने आणली ती दुसऱ्या दिवशी आपण फेकून देणार ,हो न? आपण याचे अनेक उपयोग करू शकतो. नक्की वाचा आणि एखादा तरी उपयोग करून बघा.
१.काल तोरणासाठी आणि पूजेसाठी आणलेले झेंडू दोन दिवसात कचऱ्यात जातील, ही झेंडूची फुलं वाळवली तर रोप तयार करता येतील.
२. झेंडूची फुलं ही कडू वासाची असल्याने चुरडून कुंडीमध्ये टाकली तर कीटकांना परावृत्त करतात.
३. लिंबू ,संत्री सालींपासून जसे बायो एन्झाईम बनवतात तसेच झेंडूच्या फुलांपासून देखील बनवता येते.
ते कीटकनाशक म्हणून वापरता येते.
(फुले ,गूळ आणि पाणी यांचे प्रमाण ३:१:१०)
४. फक्त झेंडूच्या फुलांचे कंपोस्ट देखील करू शकता. अशा प्रकारच्या कंपोस्टमध्ये फुलझाडे लावली तर कीटकनाशक घालायची गरजही कमी भासते.
५. झेंडू फुले वाळवून त्याचा प्राकृतिक रंग देखील बनवतात.
६. तोरणामध्ये लावलेली आंब्याची पाने काढून फेकून न देता ती मिक्सरमधून काढून किंवा बारीक चुरडून पाण्यामध्ये घालून तीन दिवस ठेवावी, आणि असे पाणी डायल्युट करून झाडांवर फवारल्यास मुंग्या कमी होतात.
(ही मलाही नवीन कळलेली गोष्ट आहे. मी पण करून बघणार आहे, तुम्हीही करून बघा आणि रिझल्ट शेअर करा.)
लेखिका : सुश्री स्नेहल गोखले
संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈