श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ घोडा हवेत उडू शकेल….मूळ कथा – जाॅर्ज बर्नार्ड शाॅ…अनुवाद अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
घोडा हवेत उडूही शकेल…..
एका गुन्हेगाराला देहदंडाची शिक्षा होते. सैनिक त्याला वधस्तंभाकडे घेऊन जात असतात. प्रथेप्रमाणे त्याला अखेरची इच्छा विचारण्यात येते. कैदी म्हणतो “ मला राजाशी बोलायचं आहे.”
कैदी राजाला म्हणतो, “ मी मरणार याचं दुःख मला आहे, पण मरण टाळता येणार नाही हे मला समजतं. माझं दुःख हे की माझ्याबरोबर माझी कला संपून जाईल.”
“ कोणती कला? “ राजा विचारतो.
“ मला घोडा हवेत उडवता येतो,” कैदी अभिमानाने उत्तरतो, “ ही कला कोणाला शिकवता आली तर मी सुखाने मरेन.”
“ मला शिकवशील? “ राजा विचारतो.
कैदी आनंदाने ‘ हो, नक्की शिकवेन ‘ असे म्हणतो.
“ किती दिवस लागतील?”
“ एक वर्ष लागेल, “ कैदी म्हणतो.
राजा त्याचा देहदंड रद्द करतो. कैदी कारागृहात येतो. इतर कैदी अचंबित होतात. हकीकत ऐकल्यावर त्याला विचारतात, “ तुला खरंच घोडा हवेत उडवता येतो?”
“ नाही,” कैदी प्रामाणिकपणे सांगतो.
“ मग तू राजाला का थाप मारलीस?”
“ एक वर्षात काहीही होऊ शकतं. राजा मरू शकतो, मी मरू शकतो, शेजारचा राजा आक्रमण करू शकतो, राजाचा वा राणीचा वा त्यांच्या मुलाचा वाढदिवस म्हणून कैद्यांना मुक्त केलं जाऊ शकतं, काहीही … “ कैदी उत्तर देतो.
“ गाढवा, पण हे काहीच घडलं नाही तर?” सोबती विचारतात.
“ मग… कुणी सांगावं… घोडा हवेत उडूही शकेल,” कैदी उत्तरतो.
—– कैद्याला हसू नका. हेच सांगत, आश्वासन देत राजकारणी लोक पाच पाच वर्षं राज्य करतात. पुढच्या निवडणुकीत निवडून द्या, घोडा नक्की उडू लागेल असंच सांगत असतात. त्यांनी घोडा लावला तरीही मतदारांना वाटतं आहे त्या घोड्याला पर्याय नाही, तोच लवकरच उडू लागेल.
सहज माहिती म्हणून…..
….. ही मूळ गोष्ट जॉर्ज बर्नाड शॉ यांची आहे. ‘ सरकार कसं काम करतं ?‘ — या प्रश्नाला त्यांनी दिलेलं हे उत्तर अतिशय संक्षिप्त पण समर्पक आहे…
लेखक :अज्ञात
संग्राहक :श्री. अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
kelkaramol.blogspot.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈