मराठी साहित्य – काव्यानंद ☆ हाचि नेम आता…संत तुकाराम महाराज ☆ रसग्रहण – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆  हाचि नेम आता…संत तुकाराम महाराज ☆ रसग्रहण – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

काव्यानंद

☆तुकाराम गाथा – अभंग ☆

हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥

घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रम्ह ॥२॥

बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥

रसग्रहण 

मला जाणवलेला व उमगलेला अर्थ…….

मनाचा निर्धार आणि संपूर्ण श्रद्धा यांचा अर्थ प्रकट करणारा हा अभंग आहे.

आता हाच माझा नेम (निश्चय केला, व्रत घेतले  किंवा मी ठरवले ) आहे.गोविंदा जवळ आहे,तिथून माघारी फिरायचे नाही.

संसाराचा मोह धरायचा नाही.

त्या गोविंदाच्या घरात मोठ्या प्रयासाने ( जप,तप,नामस्मरण, सदाचारी वर्तणूक, भूतदया इ.मुळे) आले आहे.व माझ्या वर्तणुकी मुळे पट्टराणी झाले आहे. त्या सावळ्या परब्रह्माला मनापासून वरले आहे.आता तेथून माघारी फिरणे नाही.

त्या बलवान म्हणजे सर्वव्यापी,सर्वांना जीवदान देणारा,चिंता हरणारा व षडरिपूं पासून दूर नेणारा असा जो गोविंद आहे त्याचा सहवास लाभला आहे.म्हणून आता कोणतेही भय,चिंता राहिली नाही.

यात गोविंद हा शब्द अचूक वापरला आहे. गो म्हणजे गायी पण त्याचा अजून एक इंद्रिये असाही अर्थ आहे.गोविंद म्हणजे इंद्रियांचा व्यवहार जाणतो व त्याचे नियमन  ( इंद्रिय विषयी विचारांचे उन्नयन ) करतो.

“घररिघी झाले” या चरणात “बळे” म्हणजे बळजबरीने असा अर्थ नसून बळे म्हणजे जो सर्वशक्तिमान आहे त्याची पट्टराणी असा आहे.

या वर विचार केल्यावर असे लक्षात आले की ते जीव व आत्मा यांच्या संदर्भात बोलत आहेत.जो जीव आजवर द्वैताच्या भावनेने वेगळा रहात होता,तोच जीव आता आत्मस्वरूपाच्या आनंदाने सर्वशक्तिमान परब्रह्माशी एकरूप झाला आहे. व संपूर्ण स्वयंभू झाला आहे.

अशा सर्वसाक्षी सर्वव्यापी गोविंदा पासून दूर जायचे नाही. इतर कोणत्याच मोहपाशात परतायचे नाही.परत षडरिपूंच्या आहारी जायचे नाही.आता कोणतीच भय,चिंता राहीली नाही.असे तुकाराम महाराज म्हणतात.

हा अर्थ व्यक्ती परत्वे भिन्न असू शकतो.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोणत्याही आजारावर औषध नकोच… लेखिका : डॉ..मनीषा सोनवणे ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

??

☆ कोणत्याही आजारावर औषध नकोच... लेखिका : डॉ..मनीषा सोनवणे ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

कोणत्याही आजारावर औषध नकोच…. फक्त योग आसन….विश्वास ठेवा….

सप्रेम नमस्कार….

मी डॉ .मनिषा सोनवणे…! मेडिकल डॉक्टर …. आणि योग शिक्षिकाही ……!!! 

1999 साली डॉक्टर झाले तेव्हा असं वाटलं, की चला आता भराभर सगळे पेशंटस् बरे करण्याची  आपल्याला जादुची छडी मिळाली….मी हवेत होते….

पण दवाखान्यात प्रत्यक्ष पेशंटस् चेक करायला सुरुवात केल्यावर माझे पाय जमीनीवर आले…. 

कित्येक आजारांवर allopathy मध्ये औषधं उपलब्धच नाहीत…. जी औषधे आहेत त्यांचे साईड इफेक्ट्स इतके की भी क नको पण…..! कितीही औषधं दिली तरी तात्पुरतं बरं वाटून पेंशंट पुन्हा काही दिवसांनी दारात हजर…. देणेक-यांसारखा…. 

मी खूप विचार करायचे, यावर काय उपाय करता येईल… ?

मी स्वतः आयुर्वेद पारंगत असल्यामुळे allopathy च्या जोडीला आयुर्वेदिक औषधंही देवू लागले…. 

आता फरक थोडा जास्त होता… पण  चिवट आजार म्हणावे तसे काही पिच्छा सोडत नव्हते… पेशंटस्चा आणि माझाही….!

मग मी योगाचा आधार घेऊ लागले…. प्रत्येक आजारावर योगाचे एक आसन देऊ लागले… आणि काय आश्चर्य…. चिवट आजाराचा प्रत्येक पेशंट पुन्हा तोच आजार घेऊन यायचा बंद झाला की…. ! 

मग मी उलटा प्रयोग चालू केला… आजारांवर औषधी देण्याऐवजी मी फक्त योगाचे आसन सांगू लागले… आणि जवळपास प्रत्येक आजार हळुहळु बरा होऊ लागला… कुठल्याही गोळी औषधांशिवाय…

तशी मी डॉक्टर असूनही योग शास्त्रातली पदवी घेतली आहे, त्यानिमित्ताने या विषयाचा माझा ब-यापैकी अभ्यास झालाय.  शिवाय मुळात डॉक्टर असल्यामुळे योग आणि शरीर शास्त्र यांची मी सांगड घालायला लागले…. 

मी प्रयोग करत गेले, आणि १० वर्षांच्या माझ्या या प्रयोगातून मी माझ्यापुरतं एक टेक्निक डेव्हलप केलंय Disease wise Yoga किंवा आजारांनुसार योगासने …. 

मग मी माझ्या पुण्यातल्या  पाषाणच्या योगा सेंटरमध्ये  केवळ Disease Wise Yoga किंवा आजारांनुसार योगासने घेवू लागले…. एकही औषध न देता…..

… डायबेटीस, हृदयाचे आजार, ब्लड प्रेशर, गुडघेदुखी, कंबरदुखी, सायटिका, फ्रोझन शोल्डर, अती चिंता, तणाव, डिप्रेशन, पी. सी. ओ.डी., महिलांचे इतर आजार यावर एकही गोळी न देता केवळ योगाची ठराविक आसनं घेऊन  हे आजार बरे होतात यावर कुणाचाच विश्वास बसत नाही…. पण हे १०० टक्के खरंय…!!!

 योगासन ट्रीटमेंटपूर्वीचे रिपोर्टस् आणि योगासन ट्रीटमेंटनंतरचे रिपोर्टस् यात जमीन अस्मानाचा फरक असतो…. आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे पेशंटस् च्या चेह-यावर रोगमुक्त झाल्याचं समाधान…. एका डॉक्टरला आणखी काय हवं असतं….? 

आपल्या या प्राचीन योगशास्त्राला अनुसरुन आपण आपली जीवनशैली ठेवली तर, कदाचित कोणत्याही आॕपरेशनची भिती भविष्यात उरणार नाही….!

जुनाट सर्दी, दमा, वजन वाढवणं किंवा कमी करणं, थायराॕइड … हे फक्त योगासनाने शक्य आहे. ? होय आहे….यामागे शास्त्रीय कारणं आहेत…. म्हणून हे आजार फक्त आणि फक्त योग्य पद्धतीने करवून घेतलेल्या  योगाच्या आसनाने बरे होतात….. १०० टक्के नाही… ११० टक्के …!!!

लोकांनी गोळ्या औषधींच्या नादी लागून हजारो रुपये घालवू नये….

गोळ्या औषधी घेऊन स्वतःच्या शरीराला प्रयोगशाळा बनवू नये… 

एक आजार बरा करण्यासाठी इतर १० आजार मागे लावून घेऊ नयेत …. 

याचसाठी हा सर्व लेखन प्रपंच …. !!! 

तेव्हा चला ….  योगासनाने सर्व आजार घालवू आणि तुमच्या सध्याच्या चालू असलेल्या गोळ्या औषधींना करु बाय बाय….कायमचा…..!!! 

लेखिका : डॉ..मनीषा सोनवणे

ग्रामसंस्कृती उद्यान, सोमेश्वर मंदीर समोर, सोमेश्वर वाडी, पुणे  मोब – 8308315494 / 9422017342

प्रस्तुती – डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्य अजिबात कठीण  नसतं… लेखक : श्री विजय बोंगिरवार ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ आयुष्य अजिबात कठीण  नसतं… लेखक : श्री विजय बोंगिरवार ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

कधी नळाला पाणी नसतं…

कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं…

 

कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नसतो . .

कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो . .

 

कधी जागा नसते . .

कधी जागा असून स्पेस नसते . .

कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची ऊब नसते . .

 

कधी डब्यात आवडती भाजी नसते . .

कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते . .

दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते . .

 

कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो . .

कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या -भारावल्यासारखे वाटते . .

 

कधी काही शब्द कानावर पडतात . .

कधी नको ते शब्द कानावर आदळतात . .

कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात . .

 

कधी आपण कसे वागायचे समजत नाही . .

कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही . .

 

कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही . .

कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही . .

 

कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही . .

कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही . .

कधी कोठे रिजिड आणि कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही . .

 

कधी समोरचा आपल्याला अकारण हक्काचा वाटू लागतो. .

कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो . .

 

कधी पैसा असला, की नात्यांच्या मोह होतो आणि नाती असली, की त्यांच्या गरजा पूर्ण करता येत नाहीत, म्हणून जीव हिरमुसतो

. . . यात अजून ४-५ गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून वेगळे आपण काय जगतो ?

 

ताण घेतला तर तणाव . .

आजचे भागले म्हणून आनंद आणि उद्याचं काय म्हणून चिंता आयुष्य कठीण करते.

 

आपण नदी सारखं जगावं . . सतत वहात रहावं

या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावं ….  –

 

लेखक : श्री विजय बोंगिरवार

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ न उमजलेले अश्रू… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ न उमजलेले अश्रू … ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

काळजाला भिडते असे काही तेव्हा शब्दात मांडले जातेच असे नाही… 

मग डोळेच येतात धावून नि भावनेचा ओघ घेतात सामावून.. क्षणभर होते त्यांची कालवाकालव अन आसवांची करतात जमवाजमव.. 

तरारलेले अश्रू पूर्ण डोळे एकेक थेंब ओघळू लागतात..

पाहशील का एकदाच डोळयात माझ्या,दिसतेय का तुला अर्थपूर्ण हळवी भावना असे मुके हुंदके सांगत असतात.. ओथंबलेली डोळ्यातली आसवं पापणीच्या किनाऱ्यावर जलबिंदूची नक्षी काढतात.. 

अन तर्जनी नकळत फिरते तिथे अलगद अलवारपणे टिपून घेते किनाऱ्यावर साचलेले अश्रूबिंदू… 

एखादा उन्मळून वाहिलेला भावनेचा कड गालावरून जेव्हा स्यंदन करत ओघळतो.. 

भर भावुकतेचा वाहून गेला तरी सल त्याचा उरी टोचतच राहतो…

आणि आणि या आवेगाची आठवण जेव्हा जेव्हा त्या क्षणाला येते तेव्हा तेव्हा ही अशीच आसवांची रिमझिम बरसून जाते… 

मन गलबलून येते नि… 

काळजाला भिडते असे काही तेव्हा शब्दात मांडले जातेच असे नाही.

.फक्त डोळेच सांगुन जातात सर्व काही…

समजण्या पलिकडचे जे कदापि उमजतच नाही… 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रूचिरा आणि खवय्ये…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “निसर्ग चक्र…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

गुरुवारी संध्याकाळी अमरावती भागात प्रचंड वादळवारं,पाऊस झाला. सुरू झालेला वादळवारा,गडगडाट ह्यांच्या मा-याने मला उगीचच अस्वस्थ व्हायला झालं.जबराट वा-यानं झाडं,वृक्ष जणू गदगद हलू लागली,काही ठिकाणी ती उन्मळून पण पडायच्या बेतात आली. ह्याबरोबरच असंख्य पक्षी हे त्या झाडांवरील निवारा सोडून दुसरीकडे सैरावैरा आश्रय शोधायला भिरभीरु लागली. जवळच गोशाळा असल्याने तेथील पशूधन देखील हंबरायला लागलं.जवळच्या झोपड्यां मधील लोक पक्क्या इमारतींच्या आश्रयाला आले. तेवढ्यात वीज म्हणजेच इलेक्ट्रिसीटी पण गुल झाली. सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलं .हे सगळं खिडकीतून न्याहाळतांना मनं काळजीनं बेचैन झालं.काही वेळी अपरिचितां वर पण अशी आपत्ती कोसळली तरी आपल्याला काळजी ही आपोआपच वाटायला लागते.ह्यालाच माणुसकीचे बंध म्हणत असावेतं. अशा कातरवेळी एक अनामिक हूरहूर दाटून आली.क्षणभरासाठी का होईना देवावरचा

नशीबावरचा विश्वास डळमळला.पंचभूतांपैकी जल आणि वायू तत्वराशीच्या शक्तीचा पून्हा एकदा प्रत्यय आला. अशा संकटकाळी प्रकर्षाने जाणवतं खरचं सगळं इथल्या इथेच सोडून द्यावं लागतं. क्षणभरासाठी का होईना मोह,माया ह्यांचा विसरपडून आपली धुंदी खाडकन उतरते.

काही तासं गेले. काही तासांपूर्वीचे औदासिन्य, नैराश्य अजून मनावर तसचं होतं.त्यामुळे नेहमीसारखं कामाला लागतांना उत्साही वाटत नव्हतं,मरगळ अजूनही मनावर आपली चादर पसरवूनच होती.पण कामाला न लागता पण भागणार नाही ही सत्यता स्विकारुन कामाला उठले, दार उघडून गँलरीत आले आणि काय आश्चर्य, सभोवतालचे दृश्य बघून आत्मविश्वास परत आला,सुळकन नेहमीसारखी उभारी मनात शिरली.मरगळ, नैराश्य, औदासिन्य तर कुठल्या कुठे धूम पळून गेलं. एका चिमणीने आपलं बांधलेलं घरटं परत डागडुजी केल्यागत ठीक केलं,जणू काही विनातक्रार.

पक्ष्यांनी स्वतःसाठी दुसऱ्या झाडांचा आश्रय शोधला,ते सगळे पक्षी चोचीत बारीकसारीक काडीकचरा जमा करून आणित होते.त्यांनी परत नवीन घरटं बांधायला सुरवात देखील केली होती,त्याच तडफेने त्याच जोमाने.

विशेष म्हणजे दूरवरील त्या झोपड्यांमधील लोक पण स्थानिक लोकांच्या मदतीने डागडुजी करायला लागले ते पण न कंटाळता,न रडता.

खरचं आतापर्यंत बघितल्या पैकी सगळ्यात सुंदर दिवसाची ती सुरवात भासली मला.सगळ्यात प्रसन्न सकाळ ती हीच असं प्रकर्षाने जाणवलं.खरचं त्या परमेश्वराची लीला अगाध आहे.परत लढण्याचं,संकटातून परत जोमाने बाहेर पडून कामाला लागण्याचं बळ तोच आपल्याला पुरवितो ह्याची पक्की खात्री पटली आणि माझ्याही नकळत माझे हात आकाशाकडे बघत आपोआप नतमस्तक होऊन जोडल्या गेलेत.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भीमाचे गर्वहरण… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ भीमाचे गर्वहरण… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

कौरवांच्या नाशानंतर, असे म्हणतात, की एकदा भीमाला आपणच जगात सगळ्यात बलशाली आहोत असा गर्व झाला. मग मारुतराया वृद्ध वानराच्या रुपात आला, ‘ माझी शेपूट हलवून बाजूला कर ‘  म्हणाला आणि भीमाचे गर्वहरण केले.
— —
मी एकदा सोलापूर रस्त्याने संत श्री नारायण महाराजांच्या केडगाव बेटातून चिंचवडला इनोव्हा गाडीतून एकटाच परत येत होतो. संध्याकाळी ६ चा सुमार होता. हायवेला भांडगावच्या सोनाक्षी मंगल कार्यालयातले लग्नकार्य आटोपत आले होते. कार्यालयाच्या दारात “बुढ्ढीके बाल” विकणारा पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांना लिफ्टसाठी हात करत उभा होता.

in न केलेला काळा पिवळा चौकडीचा हाफ शर्ट, पायात साध्याशा चपला, खांद्यावरच्या दांडीला ५-१५ बुढ्ढीके बाल च्या पिशव्या लटकवलेल्या, खांद्याला रिकामीशी शबनम छाप झोळी.

म्हटलं आज याला AC गाडीतून lift द्यावी. हा तरी कधी गाडीत बसणार ? त्याच्यासाठी गाडी थांबवल्याचे त्याला आश्चर्य वाटले. तो गाडीत बसला व माझी बडबड सुरू झाली. त्याचं नाव बबलू आणि तो हडपसरला भाड्याने रहात होता.

“ काय काय विकता ?”

“ बुढ्ढी के बाल, साबणाचे बुडबुडे व साधे मोठे फुगे.”

“ दिवसाला किती बुढ्ढीके बाल विकले जातात ?”

“ तीन एकशे. पाच रुपयाला एक.”

“  ते कसे बनवतात ?”

—  मग बबलूने ती process सांगितली. २ किलो साखरेतून तीनशे पिशव्या बनतात. वगैरे वगैरे.

२ किलो साखर म्हणजे फार तर  १०० रुपये आणि या पिशव्या विकून त्याला १५०० रुपये मिळत होते. म्हणजे १४०० रुपये नफा .. दिवसाला. म्हणजे महिन्याला ??? माझ्या डोक्यात आकडेमोड वेगाने सुरू झाली.

“ आणि बुडबुडे व फुगे कुठेत ?”

“ संपले.”

त्यांच्यातही कमीतकमी १००% नफा होता. बबलूच्या दिवसाच्या  नफ्याचा आकडा माझ्या कल्पेनेपेक्षा खूपच मोठा होत चालला होता.

– “ इथे कसे काय ?”

“ लग्न असलं की विक्री चांगली होते. पुण्यापासून (१०० किलोमीटर दूर असलेल्या) इंदापूरपर्यंतच्या सर्व मंगल कार्यालयांच्या मॅनेजरशी माझे कॉन्ट्रॅक्ट आहे. मी फोननुसार विक्रीला आलो की मॅनेजरला १०० रुपये द्यायचे. .”.. उन्हाने रापलेला, साधासा दिसणारा पण दिवसाकाठी किमान २-३००० रुपये नफा करणारा बबलू सांगत होता.

“ पण इतक्या सर्वांशी कॉंट्रॅक्ट करून काय उपयोग ? तुम्ही तर एकाच ठिकाणी जाऊ शकता.”  माझा चाणाक्ष सवाल.

“ मुलं ठेवली आहेत ना…”  त्याचं शांत उत्तर. “ गावचीच १८-२० मुलं आहेत. २ खोल्या भाड्याने घेतल्या आहेत. मेहुणा मार्केटिंग करून raw  material आणतो. मी सगळ्यांसाठी बुढ्ढीके बाल बनवतो. मुलांना महिना १०-१२,००० पगार देतो ….”

—  मला यातून दोनच आकडे डोळ्यांसमोर नाचत होते. हा माणूस महिना २ लाख रुपये पगार वाटतो. आणि रहाणं, खाणं, पिणं वगळता प्रत्येक मुलामागे महिना ७०-८०,००० रुपयांचा नफा कमावतो. अशी १८-२० मुलं. .. म्हणजे स्वत:सकट महिन्याला याचा निव्वळ नफा लाख्खो  रुपयांच्यावर जातो.— 

“ दिल्लीजवळ ७० किलोमीटरवर मीरतला रहातो. तुमच्यासारख्यांच्या आशिर्वादाने तीन मजली इमारत आहे, ४ गाड्या आहेत ….”. बबलू सांगत होता, मी गाडी चालवत होतो.
—  —

या प्रवासाच्या दुसऱ्या दिवशी मी व बायको म्हात्रे पुलाजवळ dp  road वर एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. शेजारीच एक मंगल कार्यालय होतं. दारात एक मुलगा बुढ्ढीके बाल विकत उभा होता.

मी त्याच्याजवळ गेलो, विचारलं , “कुठे रहातोस ?”

तो म्हणाला : “हडपसरला.”

“ बबलूकडे का ?”

तो चकित. हो म्हणाला.

“ त्याला सांग काल तो ज्या गाडीने आला त्याचा “ड्रायव्हर” भेटला होता.”

 भीमाच्या ताकदीचे पार गर्वहरण झालं होतं——

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ SSLV-D2 प्रक्षेपकाचे सफल प्रक्षेपण ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ SSLV-D2 प्रक्षेपकाचे सफल प्रक्षेपण ☆ श्री राजीव गजानन पुजारी

१० फेब्रुवारी २०२३ रोजी इस्रोने त्याच्या नवीन विकसित केलेल्या SSLV (Small Satellite Launch Vehicle) श्रेणीमधील प्रक्षेपकाचे दुसरे विकासात्मक उड्डाण यशस्वीरित्या पार पाडले. त्याला SSLV-D2 (Small Satellite Launch Vehicle-Development flight 2) असे नाव दिले आहे. सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरीकोटा येथील पहिल्या प्रक्षेपण तळावरून भारतीय वेळेनुसार सकाळी ०९:१८ मिनिटांनी प्रक्षेपक अवकाशात झेपावला. प्रक्षेपकावर तीन उपग्रह अधिभार म्हणून होते. EOS-07, JANUS-1 आणि AzaadiSAT-2. प्रक्षेपणानंतर साडेतेरा मिनिटांनी EOS-07 प्रक्षेपकापासून विलग झाला चौदा मिनिटांनी JANUS-1 वेगळा झाला आणि पंधरा मिनिटांनी AzaadiSAT वेगळा झाला. तीनही उपग्रहांना त्यांच्या निर्धारित कक्षेत म्हणजे ४५० किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत ३७ डिग्री कलासह (inclination) यशस्वीरीत्या प्रस्थापित केले गेले व इस्त्रोने एक मैलाचा टप्पा पार केला.

७ ऑगस्ट २०२२ रोजी SSLV च्या पहिल्या विकासात्मक उड्डाणावेळी प्रक्षेपकाच्या तीनही टप्प्यांनी व्यवस्थित काम करून प्रक्षेपकाला योग्य ती उंची व गती प्राप्त करून दिली,पण संगणक आज्ञावलीतील एका चुकीमुळे उपग्रह ३५६ किलोमीटर x ७६ किलोमीटर या लंबवर्तुळाकार कक्षेत प्रक्षेपित केले गेले. या कक्षेतील ७६ किलोमीटर हे अंतर पृथ्वीपासून एवढे जवळ आहे की वातावरणातील ओढीमुळे दोन्ही उपग्रह पृथ्वीकडे ओढले गेले. ही चूक  दुसऱ्या विकासात्मक उड्डाणात सुधारण्यात आली.  

SSLV हा घन प्रणोदक असणारा तीन टप्प्याचा प्रक्षेपक आहे. हा प्रक्षेपक द्रव प्रणोदनाधारित गती वियुज अनुखंडाद्वारे (velocity trimming midule) उपग्रहाला निर्धारित कक्षेत प्रस्थापित करतो. या प्रक्षेपकाद्वारे दहा किलोग्राम ते पाचशे किलोग्राम पर्यंतच्या लघु, सूक्ष्म व अती सूक्ष्म (mini, micro and nano) उपग्रहांना क्षैतीज कक्षेत (planar orbit) प्रस्थापित केले जाऊ शकते.  अंतरिक्षात गरजेनुसार उपग्रह त्वरित सोडण्याची संधी SSLV कमीत कमी किंमतीत पुरवू शकतो. कार्यवाहीसाठी लागणारा कमीत कमी वेळ, एकाधिक उपग्रहांना सामावून घेण्याची लवचिकता, मागणीनुसार प्रक्षेपणाची व्यवहार्यता, प्रक्षेपणासाठी पायाभूत सुविधांची किमान आवश्यकता यामुळे SSLV हा जगातील एक अग्रेसर प्रक्षेपक ठरणार आहे.

SSLV-D2 हा ३४ मीटर उंचीचा व दोन मीटर व्यासाचा प्रक्षेपक असून उड्डाण समयी त्याचे वजन ११९ टन होते.

EOS-07 हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह इस्त्रोने डिझाईन केलेला, विकसित केलेला आणि उत्पादित केलेला आहे. त्याच्या नवीन प्रयोगांमध्ये मिलिमीटर तरंग आर्द्रता ध्वनीजनक (Millimeter- wave Humidity Sounder) आणि वर्णपट निरीक्षक (spectrum monitoring) पेलोड्सचा समावेश आहे. उड्डाण समय त्याच्या वजन १५६.३ किलोग्रॅम होते त्याची आयुर्मयादा एक वर्ष असून त्याला २७.२१Ah च्या लिथियम आयन बॅटरीद्वारा ऊर्जा पुरवठा केला जातो. या उपग्रहाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. (अ) सूक्ष्म उपग्रह बस (micro satellite bus)¹आणि भविष्यातील कार्यरत उपग्रहांना हव्या असलेल्या नवीन तंत्रज्ञानाशी सुसंगत अधिभाराचा आराखडा व विकास करणे.

(ब)नवीन तंत्रज्ञान सामावून घेणाऱ्या सूक्ष्म उपग्रहांची निर्मिती कमीत कमी वेळात करणे.

JANUS-1 हा १०.२ कि.ग्रॅ.वजनाचा अंटारीस सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आधारित, तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दर्शविणाऱ्या कुशाग्र उपग्रहांच्या (smart satellite) मालिकेतील पहिला उपग्रह आहे. हा घटकीय वाहक (modular bus) प्रकारचा असून ऑनबोर्ड एज कॉम्प्युटिंग² च्या मदतीने मल्टी टेनंट पेलोड्स³,प्रोग्रॅमेबल स्मार्ट EPS⁴, S/X बँड⁵ SDR⁶, सिक्युअर TT&C⁷, SaaS⁸ प्लॅटफॉर्मसह डिजिटल ट्वीनिंग⁹ यांचे प्रात्यक्षिक दाखवितो.

AzaadiSAT-2 या उपग्रहाचे वजन ८.८ कि.ग्रॅ. आहे. या उपग्रह मोहिमेचा उद्देश अव्यवसायी आकाशवाणी संप्रेषण (Amareur radio communication) व LoRa¹⁰ या तंत्रज्ञानांचे प्रात्यक्षिक दाखविणे, अंतराळातील किरणोत्सर्गाच्या (radiation) पातळीचे मोजमाप करणे व विस्तारयोग्य उपग्रहांच्या बांधणीचे प्रात्यक्षिक दाखविणे हा आहे. भारताच्या सर्व राज्यांमधील ७५० विध्यार्थिनींना या उपग्रहावरील आधीभार तयार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले होते. स्पेस किडझ् इंडियाच्या विध्यार्थी संघाने या अधिभारांची जोडणी केली.

टिपा :-

  1. Satellite bus- हा उपग्रहाचा मुख्य भाग आणि संरचनात्मक घटक आहे. यामध्ये पेलोड्स व वैज्ञानिक उपकरणे असतात.
  2. Edge computing- ही एक संगणन क्रिया असून ती वापरकर्त्याजवळ किंवा विदेच्या उगमाजवळ केली जाते. संगणक सेवा वापरकर्त्याजवळ किंवा विदेच्या उगमाजवळ पुरविल्यामुळे वापरकर्त्याला किंवा संस्थेला जलद व विश्वासनीय सेवा मिळते.
  3. Multi-tanent payloads – एकाचवेळी एकाधिक वापरकर्त्यांना वापरता येण्याजोगे अधिभार.
  4. EPS- Encapsulated Post Script. याद्वारे व्हेक्टर ग्राफिक्सचे व्यवस्थापन केले जाते आणि घेतलेल्या प्रतिमांना उच्च विभेदन (high resolution) छपाईसाठी तयार केले जाते.

Vector graphics- कॉम्पुटरला क्रमाने दिलेल्या आज्ञा किंवा गणिती विधानांद्वारा तो रेषा किंवा आकार काढतो.

  1. Band- मायक्रोवेव्ह श्रेणीतील लहरींच्या वारंवारीतेनुसार त्यांचे गट केले आहेत, त्यांना बँड म्हणतात. त्यांनाs, x वगैरे नांवे दिली आहेत.
  2. SDR- Software Defined Radio ही एक रेडिओ दूरसंवाद प्रणाली आहे. जी विविध संकेतांवर (signals) कॉम्प्युटर सॉफ्टवेअरद्वारा प्रक्रिया करते.
  3. TT& C- Telimetry, Tracking and Command म्हणजे उपग्रहाकडून आलेल्या संकेतांची (signals) उकल (decoding) करणे, त्याद्वारे उपग्रहाची स्थिती व त्याचे ठिकाण ठराविणे आणि त्यानुसार उपग्रहाला आज्ञा पाठविणे.
  4. SaaS- Software as a Service यामुळे वापरकर्त्याला इंटरनेटवरील क्लाऊड आधारित ऍप्सशी संपर्क साधता येतो.
  5. Digital twining – एकाद्या भौतिक वस्तू, प्रक्रिया किंवा प्रणालीचे डिजिटल प्रतिरूप. याचा उपयोग प्रतिमानविधान (simulation), एकीकरण (integration), चाचणी (testing), देखरेख (monitoring) व देखभाल (maintenance) यांसाठी केला जातो.
  6. 10. LoRa- Long Range हे एक खाजगी मालकीचे आकाशवाणी दूरसंवाद तंत्र आहे. हे चिर्प स्प्रेड स्पेक्ट्रम (CSS) तंत्रज्ञानापासून घेतलेल्या स्प्रेड स्पेक्ट्रम मोड्युलेशन तंत्रावर आधारित आहे.

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पाण्याची expiry date ? ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ पाण्याची expiry date?  ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

जिथे रोज नळाला पाणी येते, तिथे पाणी रोज शिळे होते आणि रोज ओतून दिले जाते म्हणजे expiry date 1 दिवसाची.

जिथे दिवसाआड पाणी येते, तिथे पाणी दिवसाआड expire होते आणि ओतून दिले जाते

जिथे 8 दिवसांनी पाणी येते तिथे ते  8 दिवसांनी expire होते.

लग्न कार्यात पुढची बिस्लरी समोर आली, की हातातील पाण्याची अर्धी असलेली बाटली expire होते आणि फेकून दिली जाते.

वाळवंटात प्रवास करताना जोपर्यंत पाणी दिसत नाही, तोपर्यंत जवळचे पाणी चालते..

धरणातील पाणी पुढच्या पावसाळ्या पर्यंत चालून जाते.

जर दुष्काळ परिस्थिती आली तर दोन तीन वर्षे चालते…

जिथे 50 फूट बोरवेल मधून पाणी काढले जाते तिथे ते जमिनी खाली शेकडो वर्षे जुने असते म्हणजे शेकडो वर्षे झालेले पाणी पिण्यास चालते – expiry date शेकडो वर्षे.

जिथे पाणी 400 ते 500 फुटावर पाणी बोरवेल खोदून काढले जातात, तिथे ते हजारो वर्षांपूर्वी भूगर्भात साठलेले असते, तरीही ते चालते..

एकूणच पाण्याची expiry ही आपल्या कमकुवत बुद्धिमत्तेवर Flash जाते…😢

पाणी जपून वापरा, आपले विचारच आपला घात करतील…

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘पद्मश्री डाॅ.विष्णू श्रीधर वाकणकर…’ – डाॅ.अस्मिता हवालदार ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘पद्मश्री डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर…’ – डाॅ.अस्मिता हवालदार ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

पद्मश्री डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर

पद्मश्री डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर उर्फ हरिभाऊ वाकणकर, भारताच्या पुरातत्व शास्त्राचे  पितामह. संपूर्ण जगात पुरातत्व संशोधनात हे नाव आदराने घेतलं जातं….. त्यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आदरांजली.

वाकणकर म्हटल्यावर डोळ्यासमोर येते ते भीमबेटका. भोपाळच्या जवळ असलेल्या भीमबेटकाच्या गुहांत पुराश्म युगातली दगडावरची चित्रे शोधली ती हरिभाऊनी. भीमबेटकाला जगाच्या नकाशावर आणून त्यांनी मानाचे स्थान दिले. अलेक्झांडरच्या आधी भारताला इतिहासच नव्हता. किंबहुना भारत  हे नावच अस्तित्वात नव्हते, ते देण्याची महान कृपाही इंग्रजांनी  केली असं आपल्या डोक्यावर मारलं जात होतं. शत्रूच्या मनावर हल्ला केला,आत्मबल खच्ची केलं की राज्य करणं सोपं जात हे त्या धूर्त, मतलबी व्यापाऱ्यांना उमजले नसते तरच आश्चर्य. आपला इतिहास विकृत पद्धतीने मांडण्याचे यशस्वी प्रयत्न  त्यांनी केले आणि आपल्याकडच्या काही ‘थोर’ विद्वानांनी त्यावर विश्वास ठेवला ! हरिभाऊंच्या या शोधामुळे आपला देश किती पुरातन आहे, इथली संस्कृती किती प्राचीन आहे याचे सज्जड पुरावे मिळाले. हा मोठा विजय आहे. प्रत्येकाची लढाई वेगळी,रणांगण वेगळं,शस्त्र वेगळी आणि शत्रूही वेगळे. समानता फक्त एकच –लक्ष्याप्रती असलेली प्रतिबद्धता ! हरिभाऊंनी याच बळावर लढाई जिंकली होती.

भीमबेटकातली शैलचित्रे त्यांनी कशी शोधली यापाठी एक लहानशी कथा आहे. ते कामाच्या निमित्ताने भोपाल  ते नागपूर ट्रेनने प्रवास करत असत. भोपाळजवळ असलेल्या जंगलात त्यांना नेहमी दगडांचे उंच सुळके दिसत. इथे काय असेल याबद्दल त्यांना नेहमीच कुतूहल वाटायचं. सहप्रवाशांना विचारल्यावर तिथे गुहा आहेत, दाट जंगल आहे, तिथे कोणी जात नाही, असं समजलं. हरिभाऊना आता आंतरिक उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी चालत्या ट्रेनमधून उडी मारून सरळ भीमबेटका गाठलं आणि आजवर काळोखात दडपून राहिलेला इतिहास जगासमोर आला. १९६१ पासून सलग सहा वर्ष त्यांनी भीमबेटकामध्ये संशोधन केले. साडेआठशे गुहांत पुराश्म आणि मध्य पुराश्म युगात राहिलेल्या माणसांनी दगडांवर काढलेली  चित्रे सापडली. प्राणी, पक्षी,  माणसे, झाडे, पाने,फुले आदी त्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या सगळ्याची चित्रे सापडली. पांढऱ्या आणि लाल नैसर्गिक, खनिज रंगांत असलेल्या या चित्रांत काही ठिकाणी हिरवे ठिपके दिसतात. जणू मोठा खजिना हाती लागला होता. माणसाच्या विकासाचा एक टप्पा उलगडायला मदत होणार होती.

त्यांनी सहा वर्षे सलग संशोधन कसं केल असेल हा विचार मनात येताच त्यांच्याविषयी आदर दाटून येतो. एवढे निबिड अरण्य, तिथे खायलाप्यायला काय मिळणार? ते पिशवीत बटाटे घेऊन जात.  जंगलात गेल्यावर ते जमिनीत गाडत. सूर्याच्या प्रकाशाने, मातीच्या उबेने बटाटे शिजले की सोलून खात. हेच अन्न …. किती कठोर तपश्चर्या आहे ही ! भीमबेटकाचं महत्व सरकारच्या लक्षात आलं नव्हतं. त्यांनी हरिभाऊना वार्षिक १०००० रुपये इतके  (घसघशीत !) अनुदान दिले होते. या रकमेतून त्यांचा चरितार्थ चालवणेही अवघड होते, मग संशोधनाला पैसा कुठून पुरणार ? तरीही संशोधनात खंड पडला नाही. रानात प्राण्यांचे भय असतेच. इतक्या जुन्या गुहांत वटवाघळाचा कुबट वास असतो. तिथेच तासनतास संशोधन करायचं योद्ध्याप्रमाणे ! युनेस्कोने भीमबेटका (भीमाची बैठक ) जागतिक वारसा जाहीर केलं. भारतात सापडलेले पुरातत्वीय पुरावे,वस्तू,चित्र आदी बाकी जगात सापडणाऱ्या पुराव्यांपेक्षा अधिक मोलाचे आहेत, पण त्यांची काळजी घेतली जात नाही, महत्व समजलं जात नाही याची त्यांना खंत होती.

‘सरस्वती शोध अभियान ‘ हाही त्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प होता. सरस्वती नदीचा उल्लेख वेदात वारंवार येतो. पण प्रत्यक्षात ती शोधता आलेली नव्हती. वैदिक संस्कृती सरस्वतीच्या काठावर फुलली होती. या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेऊन इस्त्रोने त्यांना मदत केली. पाकिस्तानातल्या आदिबिद्री पासून कच्छच्या रणापर्यंतचा चार हजार किलोमीटरचा प्रदेश त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यासला.  हरीभाऊनी सरस्वती नदीचा शोध लावण्यासाठी संस्था स्थापन केली.  त्यांच्याबरोबर पुरातत्व शास्त्रज्ञ, लोककला अभ्यासक, फोटोग्राफर आदी तज्ञ मंडळी होती. सेटेलाईट चित्रांच्या आधाराने त्यांनी सरस्वतीचा मार्ग शोधला. वैज्ञानिक कसोटी लावून तिची लुप्त होण्याची कारणे सिद्ध केली. आर्यांनी सिंधू सरस्वती संस्कृती नष्ट केली ही समजूत चुकीची आहे हे सिद्ध केलं. आर्य युरोपातून भारतात आले असा शोध युरोपियन लोकांनी लावला होता. तसे नसून आर्य मूळचे इथलेच आहेत हे त्यांनी ठासून सांगितले.  सरस्वतीच्या अस्तित्वाबद्दल अविश्वास दाखवणाऱ्या लोकांसमोर भरभक्कम पुरावा ठेवला. तरीही लोक या संशोधनाला दुजोरा द्यायला धजावत नव्हते.  कारण युरोपीय संशोधकांच्या विरुद्ध बोलल्यावर आपली किंमत कमी होईल अशी मनोधारणा होती. त्यांना गुलामगिरीच्या मानसिकतेचे वैषम्य वाटत असे. स्वातंत्र्य मिळाले तरीही मनाने स्वतंत्र झालो नाही. हरिभाऊनी जगासमोर पूर्ण आत्मविश्वासाने संशोधन ठेवले आणि आजवर थोपलेल्या मिथकांना आव्हान दिले.

१९५४ पासून त्यांनी भारतात आणि बाहेरच्या जगात शैलचित्र अभ्यासायला सुरवात केली. त्यांनी युरोप, अमेरिका आणि मध्य पूर्वेला शैलचित्रांचा अभ्यास करून पुरातत्वावर पुस्तके लिहिली. केवळ भारतात त्यांनी ४००० गुहा शोधल्या. त्यांनी चंबळ आणि नर्मदेच्या खोऱ्यांत संशोधन केले. त्यांनी महेश्वर, नेवाडा, मनोती, आवरा, इंद्रगड,कायथा, मंदसौर, आझाद नगर, दंगवाडा भागांत खोदकाम करून पुरातत्वीय पुरावे गोळा केले. त्यांनी इंग्लंड, फ्रांस, जर्मनी, इटली, स्पेन, ग्रीसमध्ये १९६१-६२ साली संशोधन केले.  ते उत्कृष्ट चित्रकार होते. त्यामुळे शैलचित्र त्यांनी कागदावर उतरवली. अशी ७५०० चित्र वाकणकर संस्थानाकडे आहेत. त्यांनी सहा पुस्तके आणि ४०० शोधनिबंध प्रकाशित केले. ‘ वाकणकर भारतीय संस्कृती अन्वेषण न्यासा ‘च्या संग्रहालयात त्यांनी गोळा केलेली ५००० नाणी आहेत. ते नाणकशास्त्राचे तज्ञ होते. जी.डी.आर्ट्सची पदवी संपादन केल्यावर त्यांना पुरातत्वात विशेष रस वाटू लागला. भारतीय कलांमध्ये त्यांना रस होताच. कलांच्या संवर्धनासाठी त्यांनी संस्कारभारतीची स्थापना केली. उज्जैनच्या विश्व विद्यालयातल्या पुरातत्व उत्खनन विभागाचे आणि रॉक आर्ट इन्स्टिट्यूटचे ते संस्थापक आहेत. ललित कला संस्थान आणि शैलचित्र कला संस्थानाचे ते संचालक होते. त्यांनी ‘मेरा पुरातत्त्वीय उत्खनन ‘आणि ‘भारतीय शैलचित्र कला’ ही पुस्तके लिहिली.  हिंदीमध्ये कथासंग्रह प्रसिद्ध केला आणि आर्य प्रश्नावर रोबर्ट आर. यांच्यासह लेख लिहिला. २५० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले. भीम बेटकाच्या शैलचित्रांवर प्रदर्शने भरवली. १९७५ साली हरिभाऊना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

माळव्यातल्या मंदसौर जिल्ह्यातल्या नीमचमध्ये ४ मे १९१९ रोजी हरीभाउंचा जन्म झाला. त्यांच्या पत्नीला सर्वजण लक्ष्मीवाहिनी नावाने ओळखत. पतीच्या कार्यात त्यांचा तन मन धन अर्पून सहभाग होता. लक्ष्मी वहिनींचा त्याग तितकाच मोठा आहे.  हरिभाऊच्या पायावर चक्र पडलं होत. अशा व्यक्तीबरोबर संसार करणे किती कठीण असते ते लक्ष्मी वहिनीच जाणो. हरिभाऊचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या सबळ नसले तरी समाजकार्य आणि राष्ट्रप्रेम या शिकवणीची शिदोरी त्यांना कुटुंबाकडून मिळाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी उज्जैनमध्ये एक आर्ट सेंटर चालवून अर्थार्जन केले. कालिदासाने मेघदूत लिहिले ती जागा या परिसरात असायला हवी असे त्यांना वाटत असे. त्यानुसार त्यांनी रामगिरी पर्वतावर जाऊन शोधायला सुरुवात केली, पूर्ण प्रदेश विंचरून काढल्यावर एका गुहेवर ‘मेघदूत’ अशी अक्षरे सापडली. एका बाजूला ‘सुतनुका’ लिहिलेले दिसले आणि थोडे पुढे गेल्यावर ‘कालिदास’ असे लिहिलेले दिसले. पुढे कालिदासावर अधिक संशोधन केल्यावर हेच ते स्थान हे सिद्ध झाले. 

त्यांनी अजून एक महत्त्वाचे संशोधन केले. उज्जैनजवळच्या डोंगला गावात २१ जून रोजी सूर्यकिरण पृथ्वीशी लंबकर्ण अवस्थेत  पडतात. त्यामुळे सावली पडत नाही. हे गाव प्राचीन काळाचे time meridian होते.  कर्कवृत्त आणि रेखावृत्त इथे एकमेकांना छेद देतात. हरिभाऊनी कुठल्याही आधुनिक उपकरणांचा वापर न करता ती जागा दाखवून दिली. प्राचीन काळी हे वृत्त उज्जैनमधून जात असल्याने तिथे कर्कराजेश्वर मंदिर बांधले होते ! उज्जैनच्या वेधशाळेला वाकणकरांचे नाव दिले आहे. भारतीय पुरातत्व खात्यातर्फे हरिभाऊंच्या नावे पुरस्कार दिला जातो. पुरातत्वात रचनात्मक आणि सृजनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तीला दोन लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

१९८८ साली सिंगापूरला एका हिंदू संमेलनाच्या निमित्ताने गेले असताना खिडकीतून दिसणाऱ्या चित्राचे रेखाटन करताना त्यांना मृत्यू आला. उणेपुरे सत्तर वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले, जे खऱ्या अर्थाने ‘जीवन’ होते. संशोधकाचा मूळ पिंड असलेले हरिभाऊ कलाकार होतेच, राष्ट्रभक्तही होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करताना महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण करत  होते. आनंदी,खेळकर स्वभावामुळे संकटाना सहज सामोरे जात. आपला ‘खरा’ इतिहास समोर येण्याची नितांत गरज आहे याची त्यांना जाणीव होती आणि त्यासाठी ते आयुष्यभर झटले. हरिभाऊनी सुरु केलेल्या कार्याची पताका पुढे नेण्यासाठी संशोधक काम करत आहेत, निश्चितच हे कार्य लवकर सुफळ होईल. मानसिक गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झालेला त्यांच्या स्वप्नातला भारत नवा, स्वाभिमानी, आत्मविश्वासपूर्ण भारत असेल, हीच आपणा सर्वांकडून त्यांना वाहिलेली आदरांजली असेल.

कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळींची इथे आठवण होते:

रात सरे ये प्राचीवरती तेजाची रेषा, 

नव्या मनूचा घोष घुमे हा, दुमदुमतात दिशा…  

जागृत झाल्या दलित जगाच्या बलशाली आशा …. 

डॉ. अस्मिता हवालदार

इंदूर

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खुळ्या कळ्या… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ खुळ्या कळ्या… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

खुळ्या कळ्या…

पूजेसाठी आलेल्या फुलपुड्यामध्ये निशिगंधाच्या काही कळ्या आल्या. आणि मग त्यांना नीट फुलायला मिळावं म्हणून मी एका हिरव्या बाऊलमध्ये थोडसं पाणी घालून त्यांना खिडकीत ठेवलं. किती प्रयत्न केला पण त्या काही उभ्या राहात नव्हत्या. सारख्या आडव्या होत होत्या. मग मला जाणवलं की त्यांची अजूनही त्यांची नीज उतरली नाहीये‌. हा मंदधुंद श्वास जणू त्यांच्या गोड झोपेची साक्षच !…. काय बरं स्वप्नं पहात या निजल्या असतील. आपण आपल्या हिरव्या आईच्या कुशीत नाही आहोत हे कळलं असेल का त्यांना.‌.. उठल्यावर जेव्हा त्या बघतील की आपण भलतीकडेच आहोत तेव्हा त्या काय विचार करतील… दुःख होईल का त्यांना… काय बरं वाटत असेल या कळ्यांना….. 

… आणि वाटीतल्या कळ्या उमलल्या नाही तरी.. माझ्या मनात मात्र त्या कळ्या उमलू लागल्या…

साध्या भोळ्या शब्दांत फुलूही लागल्या……. 

हिरव्यागार वाटीत

निजवलं होतं कळ्यांना

किती वेळ झोपावं 

कळेनाच की खुळ्यांना 

झोपेतही चालू होता 

त्यांचा मंद मंद श्वास

अन् घरभर दरवळला 

त्यांचा निरागस सुवास 

इवलुसा देह त्यांचा

इवलुसं हे जगणं 

इवलुशा या जीवांचं  

इवलुसंच स्वप्नं 

असू कुठेही आपण

फांदीत अथवा मातीत 

दुःखी नाही व्हायचं

नि:स्वार्थतेनं जगायचं 

सोनुले किरण आले की 

त्यांच्या संग खेळायचं

वाऱ्यासंगे सुगंधाला

सुरेल गुणगुण द्यायचं 

कधी पडायचं परडीत

कधी सजायचं वेणीत

कधी गुंफायचं हारात

तर कधी झुलायचं दारात 

इवलुसं हे आपलं आयुष्य

सदा घमघमत ठेवायचं

अखेरच्या क्षणीदेखील 

अत्तर होऊन जगायचं …

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares