मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बाकी नेहेमी २ च… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? इंद्रधनुष्य ?

☆ बाकी नेहेमी २ च… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

श्री तुलसीदासांना एकदा एका भक्ताने विचारले की…”महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता, तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का ?”

तुलसीदास म्हणाले :- “हो”

भक्त :- “ मला पण दर्शन घडवाल का ???” 

तुलसीदास :- “हो नक्की”

तुलसीदासांनी त्याला खूप समर्पक उत्तर दिले आहे, जे एखाद्या गणिती तज्ञाला ही लाजवेल !!!

तुलसीदास म्हणाले, “अरे हे खूप सोप्पं आहे !!!  तू रामाचे दर्शन तुझ्यातच घेऊ शकशील.”

प्रत्येकाच्या नावांत देखील शेवटी आपल्याला रामाचेच दर्शन घेता येईल. 

— त्यासाठी तुला मी एक ” सूत्र श्लोक ” सांगतो. त्याप्रमाणे कोणाच्याही नावाला ते सूत्र लागू होईल!!!

भक्त :- “कोणते सूत्र ?”

तुलसीदास :- ते सूत्र पुढीलप्रमाणे आहे …

|| नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन तासां द्विगुण प्रमाण ||

|| तुलसी अष्ट सोभाग्ये अंत मे शेष राम ही राम || 

वरील सूत्राप्रमाणे…

★ आता कोणाचेही नाव घ्या, त्याची अक्षरे माेजा…

१) त्याला (चतुर्गुण) ४ ने गुणा…

२) त्यात (पंचतत्व मिलन) ५ मिळवा…

३) त्याची (द्विगुण प्रमाण) दुप्पट करा…

४) आलेल्या संख्येला (अष्ट सो भागे) ८ ने भागा…

पूर्ण भाग जात नाही!!!

दरवेळेस २ बाकी शिल्लक राहतेच… 

ती दोन अक्षरे म्हणजेच “राम”  नाम होय…

★ विश्वासच बसत नाही ना ???

उदा. घेऊ…

कोणतेही एक नाव निवडा, अक्षरे कितीही असोत !!!

★ उदा…निरंजन…४ अक्षरे

१) ४ ने गुणा ४x४= १६

२) ५ मिळवा १६+५= २१

३) दुप्पट करा २१×२= ४२

४) ८ ने भागा ४२÷८= ५=४० पुर्णांक,

५) ४२ – ४० = बाकी २ राहते…

 

प्रत्येक वेळी, दोनच अक्षरे उरतील ती म्हणजे – “राम” !!!

विशेष म्हणजे सुत्रश्लोकातील संख्यांना सुद्धा तुलसीदासांनी फार महत्व दिलं आहे !!!

★ १) चतुर्गुण म्हणजे ४ पुरुषार्थ :- धर्म, अर्थ, काम, मोक्ष !!!

★ २) पंचतत्व म्हणजे पंचमहाभौतिक/भूते :- पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश !!!

★ ३) द्विगुण प्रमाण म्हणजे माया व ब्रह्म असे दोन !!!

★ ४) अष्ट सो भागे म्हणजे अाठ दिशांनी ( चार दिशा :-पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण , चार उपदिशा :- आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य,  

 

आठ प्रकारची लक्ष्मी :- (आग्घ, विद्या, सौभाग्य, अमृत, काम, सत्य, भोग आणि योगलक्ष्मी )

★ आता प्रत्येकाने स्वतःच्या नावाने हे तपासून पहा… विस्मयकारक वाटेल पण बाकी नेहमी २ च येईल…

म्हणजेच “राम” नाम सत्य है!

यात तुलसीदासांच्या बुद्धिचातुर्याची व अतूट रामभक्तीची ओळख पटते !!! ॥ जय श्रीराम ॥

संग्रहिका : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “रुजणे…” – सुश्री प्रिया कोल्हापुरे ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ “रुजणे…” – सुश्री प्रिया कोल्हापुरे ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

चार दिवसांपूर्वी झाडांची माती बदलण्यासाठी वेळ काढला. सगळी झाडं झाली, एक वेल राहिला- गोकर्णचा. त्याला फुलं कमी यायला लागलेली,  पण वेल काढायचा म्हणजे रिस्कच. त्यात एकाच कुंडीत पाच बिया लावून त्या एकाच दोऱ्याने वर गेलेल्या. एकात एक गुंतलेल्या पाच वेलींना बाहेर काढून परत मातीत रुजवायचं म्हणजे दिव्यच वाटलं. फुलं नाही दिली तरी जिव्हाळा जमला होता त्यांच्यासोबत. काढून परत लावल्याने त्या वेली जगतील की नाही समजत नव्हतं. रिस्क घेतली आणि बदलली माती.

संध्याकाळपर्यंत वेल सुकल्यासारखी झाली. जीव झुरझुरला. सकाळी उठल्या उठल्या वेलीकडे गेले. बघितलं तर वेल पूर्ण सुकला, जीव गेल्यासारखा वाकला होता. खूप वाईट वाटलं.पण पाणी घालत राहिले, आणि आज चार दिवसांनी त्याच्यात हिरवेपण दिसू लागलं.

त्यावरून असं वाटलं की आपण बायका पण त्या झाडासारख्याच असतो .काही वेलीसारख्या नाजूक,  तर काही डेरेदार – काही रुक्ष, तर काही अल्लड, सुबक, सुंदर – काही नुसताच दिखावा, तर काही दिसायला बेढब पण उपयुक्त – काही लाजऱ्या -बुजऱ्या, तर काही स्वतःच्या अस्तित्वाने आकर्षित करणाऱ्या – काही बोचऱ्या तर काही मुलायम. 

आपणही लहानपणी माहेरी रुजतो, फुलतो, बहरतो. लग्नानंतर आपली पाळेमुळे उखडून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला रुजवलं जातं. आपणही या वेलीसारखं थोडं सुकतो, बिचकतो ,नवीन बदल पचवतो आणि आपली मुळे रोवायला सुरुवात करतो, बहरायला लागतो.  तिथं आपल्याला खत,पाणी, वातावरण कसं मिळतं त्यावर प्रत्येकीचं बहरणं वेगवेगळे होतं. काहींना खूप खत, पाणी, काळजी मिळते, त्या खूप बहरतात, फुलतात. काहींना मिळतं पाणी खत, पण त्या दुर्लक्षित असतात. अशावेळी त्या फक्त वाढतात.  पण फुलण्याची, बहरण्याची उमेद नसते.  त्या स्वतःला हरवून बसतात. काहींना काहीच मिळत नाही.  त्या हळूहळू एक एक पान गळून गळून जातात.

असे हे झाडांशी बाईपण जुळतं- 

लेखक : सुश्री प्रिया कोल्हापुरे 

मो. -9762154497

संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बंद घराचे आत्मवृत्त… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ बंद घराचे आत्मवृत्त… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

राहत्या घराला चार-आठ दिवसांसाठी कुलूप लावून जाताना जरा जीवावरच येतं नं…! 

एक हुरहूर वाटते बंद दाराकडे बघून.. निरोप देताना मग मनातल्या मनात आपणच घरात सांगतो, “येतो परत आठ दिवसांत तोवर सांभाळ रे बाबा”.. तेव्हा घरही उदासल्यासारखं भासतं ! 

मग कधी कधी आठ दिवसांनी परतण्याचा वायदा पाळायला जमत नाही.. आणखी चारेक दिवस जास्तीचे घेऊन आपण जेव्हा परततो आणि आपल्या घराच्या दरवाजा समोर उभे राहतो ना तेव्हाचा सुकून काही वेगळाच असतो..! पण बहुधा वाट पाहून घर जरा रुसलेलं असतं..!

दार उघडल्यानंतर घराचं हिरमुसलेपण जागोजागी जाणवतं.. जाताना बदललेले कपडे कुठल्याशा खुर्चीवर, बेडवर नाहीतर सोफ्यावर तसेच आळशासारखे गपचिप पडून असतात. तेव्हा गडबडीत विसळलेल्या कपबश्या तशाच ओट्यावर उपड्या निपचीत असतात … पोरांची वह्यापुस्तकं अन् खेळण्यांचा पसारा कोपऱ्यातल्या टेबलावर निवांत हातपाय पसरून बसलेला असतो.. कपाटाच्या आरश्यात स्वतः आरशालाही बघू वाटू नये असा एक धुळीचा बारीक थर चढलेला असतो..! रोजचीच फरशी डोळ्यांना अन् पायांना वेगळीच लागते, किचन मधली काही भांडी जाळीत मान टाकून बसलेली असतात.. फ्रीज उघडल्यावर त्यात उरल्या सुरल्या भाज्या, फळे, लोणची, तुपाचे डबे, विरजण दाटीवाटीने डोळे वटारून बघायला लागतात.. आपण गेल्यावर जागावाटपासाठी यांच्यातही युद्ध झालेलं असतं बहुतेक! त्याच हातापायीत कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो अन् दोनचार फळंही शहीद झालेली असतात..!! बेडरूमच्या दरवाजामागे निघताना खराखर विंचरलेल्या केसांची गुंतावळ लपून बसलेली असते… सिंक वॉशबेसिन बाथरूम बिचारे सुकून गेलेले असतात..वाट पाहून घराच्या छताचा जीव त्याला टांगलेल्या फॅन सारखाच टांगणीला लागलेला असतो …भरीस भर म्हणून प्रवासातून आणलेल्या बॅगा व सामान हॉलमध्येच अंग पसरून बसलेलं असतं… आता सांगा बरं, घर कसं रुसणार नाही! 

रुसलेल्या रागावलेल्या घराला मग “ती” आवरायला घेते! मलूल झालेल्या तुळस, मोगरी, गुलाबाच्या रोपट्यांना न्हाऊ घातलं जातं, इतके दिवस अंधार पांघरून बसलेल्या खिडक्यांचे पडदे सर्रकन दूर होतात आणि श्वास कोंडलेल्या घराला ताज्या हवेच्या झुळुकीने हायसं वाटते..! दोन तीन तासांत सारं काही जाग्यावर पोहचतं ! ती भरभर तिच्या लाडक्या घराला पुन्हा “देखणं” करते.. गोंजारते.. त्याला त्याचं “घरपण” पुन्हा मिळवून देते.. घराच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते ..त्या ओळखीच्या स्पर्शाने मग मरगळलेलं घरही विरघळतं अन् सुखावून खुदकन हसू लागतं..!

घराला स्पर्श कळतात???.. हो कळतात !! त्याला आपली माणसेही कळतात.. आपली सुखदुःखंही त्याला ठाऊक असतात .. आठवून पहा, काही आनंदाश्रू, काही हुंदके, दुःखाचे कढ कधीकधी फक्त घराच्या भिंतींनाच माहिती असतात.. !!

तर अशा आवरलेल्या घराला मग हातात चहाचा कप घेऊन थोडी दमलेली ती समाधानाने न्याहाळत दोन घटका बसते तेव्हा लाडात आलेल्या लेकरासारखं घर तिच्याकडे पाहत असतं.. तिलाही  मनात वाटतं, “कोणाची दृष्ट न लागो”…!

शेवटी “बाई” घराचीही “आई”च असते..!! हो नं! 

लेखक : अज्ञात

संग्रहिका : मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “१ मे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “१ मे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एक मे. हा दिवस प्रत्येक कामगारासाठी आणि प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्ती साठी खास आनंदाचा,सोनियाचा दिवस. कामगार दिनाबद्दल बोलायचं तर ह्या दिवशी कामगारांसाठी फायद्याची आणि फायदा होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कायद्याची रुपरेषा आखली गेली. आधी कामगार वर्गावर जी आपबिती होती नं ती नुसती कळूनही किंवा वाचूनही हळहळ वाटत होती.कामगारांचा आधी अक्षरशः कोणीही वाली नव्हता. पिळवणूक म्हणजे कशी असेल हे जेव्हा आम्ही लोकं आठ तास काम करुन माना टाकतो नं तेव्हा पूर्वी हा कामगार वर्ग पंधरा पंधरा तास नाँनस्टाँप काम करीत होता नं तेव्हा खरी जाणीव होते. आजच्या सुधारणांमुळे आम्ही काम करु त्या प्रमाणात, वाढत्या महागाई नुसार  आम्हाला त्या कामाचा मोबदला मिळतोयं पण खरचं पूर्वी जी वेठबिगारी होती नं ती फार भयानक होती हे आधीच्या कामगार मंडळींकडूनच समजतं आणि त्यांनी सहन केलेल्या आणि जिद्दीने तोंड दिलेल्या संकटाची कल्पना येते आणि तशी जाणीवही होते. बरं ह्या रुपरेषेत अनेक नानाविध मुद्द्यांमध्ये बदल फायदेशीर बदल करण्यात आले. ह्या मुद्द्यांमध्ये प्रामुख्याने बालकामगारांवर बंदी, महिला कामगारांच्या कामावर मर्यादा, तसेच रात्रीच्या व धोक्याच्या कामासाठी वेगळे नियम, कायद्याने साप्ताहिक सुट्टी, कामाचा मोबदला वस्तू रुपात न मिळता तो नगदी स्वरूपात मिळणे, समान काम तर समान वेतनं इत्यादी नियम अंतर्भूत केल्या गेलेत.भारतात कामगार दिनाची सुरवात 1 मे 1923 पासून झाली.

महाराष्ट्र दिन म्हंटला की ह्या बद्दलच्या आठवणींची सुरुवात शालेय जीवनापासून होते.

ह्या दिवशी शाळेत सकाळी झेंडावंदन व्हायचे. एक मे नंतर मग दोन तीन तारखेकडे निकाल लागून मग उन्हाळी सुट्ट्यांची सुरूवात व्हायची

1 मे ह्या दिवशी खास ऐकू येणारी गीतं म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचं”बहु असोत सुंदर संपन्न की महा,प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा”, आणि दुसरं गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी ह्यांच “प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा”.

अन्याय, पिळवणूक ह्यांची सुट्टी होऊन कामगारांना स्वावलंबनाने रोजीरोटी मिळवून देणारा हा कामगार दिवस व महाराष्ट्रातील जनतेला आपलं असं वेगळं अस्तित्व, जागा मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र दिन चिरायू होवो.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी सुट्टी… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

??

☆ माझी सुट्टी… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

खूप दिवसांपूर्वीची गोष्ट. दिवस कुठले, वर्षे लोटली. म्हणजे वीस – पंचवीस वर्षे सहज. आणि गोष्ट म्हणजे काय, तर हकीकत. त्यावेळी मी डी. एड. कॉलेज सांगलीमधे अध्यापन करत होते. मला शिकवायला आवडायचं आणि मुलींमध्ये रमायलाही. तेवढंच तरुण झाल्यासारखं वाटायचं. म्हणजे जॉब सटिस्फॅक्शन वगैरे म्हणतात न, ते होतं, पण तरीही दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीचे वेध लागायचेच. तेव्हा सुट्टी लागली, की मी यंव करीन अन् त्यव करीन असे मांडे मनात भाजत आणि खात रहायची. त्यातले काही मांडे असे —

पहाटे लवकर उठून व्यायाम आणि प्राणायाम करणे. सकाळी फिरायला जाणे. हे अगदी मस्टच, मी ठरवलं. सुट्टी असल्यामुळे सगळं आही आरामात आवरायचं, दुपारी पंख्याखाली अडवारायचं आणि मनसोक्त दिवाळी अंक किंवा पुस्तकं वाचायची. संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे, हाही आखलेला बेत असे. एरवी कॉलेजमधून घरी येताना नजरेच्या टप्प्यात जेवढ्या येतील, त्यांना ‘काय कसं काय?’ विचारणं आणि ‘ठीकय. ’ ऐकणं, या पलीकडे संवादाची मजल जात नसे.

 पहाटे उठण्यासाठी गजर लागे. आधी घड्याळाचा, नंतरच्या काळात मोबाईलचा. गजर झाला की मनात येई, लवकर उठणं नि नंतरची लगबग नेहमीचीच आहे मेली. आज आरामात पांघरूणात गुरफटून पडून राहण्याचं सुख अनुभवू या. उद्यापासून सुरुवात करू. पण तो उद्या कधी उजाडत नसे. तो ‘आज’ होऊनच उगवे. व्यायाम, प्राणायाम, पक्ष्यांची किलबिल हे सगळं राहूनच जायचं. नाही तरी किलबिल ऐकायला आता शहरात पक्षी राहिलेतच कुठे, मी मनाशी म्हणे. मला आणि मुलांना सुट्टी असे, पण यांना ऑफीस असल्यामुळे यांचा डबा साडे नऊला तयार असणं गरजेचं असे. त्यामुळे सकाळची कामाची धांदल नेहमीसाराखीच करावी लागे, सुट्टी असूनसुद्धा. माझ्याप्रमाणे मुलांनीही सुट्टीचे कार्यक्रम ठरवलेले असायचे. पोर्चमध्ये उभे राहून गप्पा, किंवा मोबाईलवर चॅटिंग, यू ट्यूबवरचे सिनेमे बघणे, घरात पसारे करणे, त्यांच्या सवडीने जेवायला येणे, आई घरात आहे, म्हंटल्यावर आईनेच जेवायला वाढणे, अपेक्षित. त्यातून बाहेर पडले की माझे लक्ष, कपड्यांनी, भांड्यांनी, पुस्तकांनी ओसंडून वहाणार्‍या कपाटांकडे जाई॰ दिवाळीसारखा महत्वाचा सण. घर स्वच्छ, नीटनेटकं नको, असं मला आणि मलाच फक्त वाटे. घरातल्या इतर कुणाला नाही. ही आवरा-सावर होईपर्यंत दिवाळीचे पदार्थ करायचीच वेळ येई. पणत्या, वाती, उटणं, नवा साबण किती म्हणून तयारी करावी लागायची. दिवाळीच्या दिवसात रोज एक नवीन पक्वान्न हवंच. ‘तुझं गोड नको बाई, काही तरी चमचमीत कर’, अशी मुलांची मागणी. मागणी तसा पुरवठा करायलाच हवा ना, शेवटी आपलीच मुलं. जेवणं- मागचं आवरणं. दुपारचे सहज तीन वाजून जात. मग एखादा दिवाळी अंक घेऊन फॅनखाली पडावं, तर डोळे मिटू मिटू होत. मासिकातील अक्षरे पुसट होत जात आणि मासिक हातातून कधी गळून पडे, कळतच नसे. नाही म्हणायला, संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे, हा आखलेला बेत बराचसा तडीला जाई.

 दिवाळी येई-जाई. कॉलेज पुन्हा सुरू होई. दिवस- महिने संपत. मार्च उगवे. पोर्शन शिकवून संपलेला असे आणि आता पुन्हा मोठ्या सुट्टीचे वेध लागत. आता मांडे मनात नाही, ताटात घेऊन खायचे, मी नक्की ठरवते. वाटतं, सुट्टीत कुठेतरी फिरून यावं. नवा प्रदेश पहावा. निसर्गाच्या सहवासात काही काळ घालवावा. ताजंतवान होऊन, नवी ऊर्जा घेऊन परत यावं आणि नव्या दमाने, नव्या उत्साहाने नेहमीच्या दिनचर्येला सुरुवात करावी. पण या महिन्यातल्या क्लासचे, परीक्षांचे मुलांचे वेळापत्रक, कधी कुणाचे आजारपण, घरातली, जवळच्या नात्यातील लग्ने या गोष्टी अ‍ॅडजेस्ट करता करता ट्रीपचं वेळापत्रक कोलमडून जाई. दिवाळी काय किंवा उन्हाळी सुट्टी काय, दरवर्षी थोड्या-फार फरकाने असंच काही-बाही होत राहिलं.

 दिवस- महिने- वर्षे सरत आली. माझ्यासाठी कॉलेजची शेवटची घंटा वाजण्याची वेळ आली. एकीकडे कासावीस होत असतानाच मी मनाला समजावू लागले,

 आता मला सुट्टी मिळणार मिळणार

 खूप खूप मज्जा मी करणार करणार.

 आता मला खरंच सुट्टी मिळाली आहे. आता आरामात उठायला हरकत नाही. आता साडे नऊच्या डब्याची घाई नाही. मुलांची जबाबदारी पण आता उरलेली नाही. ती आपापल्या नोकरीच्या गावी, आपआपल्या संसारात, मुलाबाळात रमली आहेत. सकाळी आता उशिरा, आरामात उठायचं. मी निश्चय करते. पण काय करू? जागच लवकार येते आणि एकदा जाग आल्यावर नुसतंच आंथरूणावर पडून रहावत नाही. पूर्वी पाहिलेली स्वप्ने आता आळोखे- पिळोखे देत जागी होऊ लागली.

 आता सकाळी जाग आल्यावर उहून फिरायला जायचं मी ठरवलं. उत्साहाने जिना उतरू लागले, तर गुढगे आणि कंबर म्हणाली, ‘बाई ग, आता आमचा छळ थांबव!’ कमरेला चुचकारत नवा महागडा कंबरपट्टा आणून तिला नटवलं. गुढग्यांवरही छान उबदार वेष्टण चढवलं. पण त्यांचं तोंड वाकडंच. ते काही बेटे सहकार्य करेनात. शेवटी डॉक्टरांशी बोलले. डॉक्टरांनी क्ष-किरण फोटो काढला. फोटो बघत ते म्हणाले, ‘ आता या गुढग्यांना निरोप द्या काकू! आता नवे गुढगे आणा!’ तसे केले. नवे गुढगे घेऊन आले पण चालताना, इतकंच काय, बसताना, झोपतानाही पायाला वेदना होऊ लागल्या. पुन्हा डॉक्टर. पुन्हा क्ष-किरण फोटो. डॉक्टर म्हणाले, ‘ पाठीच्या कण्याच्या चौथ्या – पाचव्या मणक्यांनी गळामिठी घातलीय, ती सोडवायला हवी. ती सोडवली. मग मात्र माझे पाय वेदनारहित झाले. हळू हळू फिरणं वगैरे जमू लागलं. पण डॉक्टरांनी बजावलं, ‘आता चालताना हातात काठी घ्या. ’ आणि एक लोढणं गळ्यात नव्हे हातात आलं.

 आता टी. व्ही. बाघायला वेळच वेळ होता. पण हळू हळू लक्षात येत गेलं, आपल्याला सिरियल्समधले संवाद नीट ऐकू येत नाहीयेत. टी. व्ही. च्या जरी जवळ बसलं, तरी फारसा उपयोग होत नाहीये. कानांकडे तशी तक्रार केली, तर ते म्हणाले, ‘आम्हाला गळामिठी घालायला एक सखा आण. त्याचे लाड-कोड पुरवले. पण त्यांचा हा सखा इतका नाठाळ निघाला, सगळा गलकाच ऐकवू लागला. नको ते आवाज मोठ्या प्रमाणात घुमवू लागला. हवे ते दडवून ठेवू लागला. थोडक्यात, हा कांनांचा सखा, असून अडचण अन नसून खोळंबा झाला. शेवटी मूकपट पाहून नाही का आपण आनंद घेत, तसाच टी. व्ही. बाघायचा, असं ठरवून टाकलं.

 आता वाचायला खूप वेळ होता. चांगली पुस्तकेही हाताशी होती. पण—-

इथेही पण आलाच. निवृत्तीपूर्वीच डोळ्यांवर डोळे चढवून झाले होते. ते साथही चांगली देत होते. पण बालहट्टाप्रमाणे त्याचे काही हट्ट पुरवावे लागायचे. बसून वाचायाचं. झोपून वाचायाचं नाही. तसं वाचलंच तर उताणं झोपायचं कुशीवर नाही. हे हट्ट पुरवल्यावर त्याची काही तक्रार नसायची. पण तो डोळयांवरचा डोळा जरी चांगलं काम करत असला, तरी मूळ डोळा अधून मधून म्हणायला लागला, ‘आता मी शिणलो. आता पुरे कर तुझं वाचन!’ मी नाहीच ऐकलं, तर तो सारखी उघड –मीट करत स्वत:ला मिटूनच घ्यायचा.

 तर असं हे माझं सुट्टीपुराण. . . . . जेव्हा दात होते, तेव्हा चणे नव्हते. आता भरपूर चणे आहेत, तर खायला दातच नाहीत.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 65 – याची देही याची डोळा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 65 – याची देही याची डोळा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

भारतभूमीवर पाऊल ठेवले आणि स्वामीजींचे स्वागत सोहोळे व स्वामीजींना भेटायला ,पाहायला येणार्‍यांची ही गर्दी या वातावरणाने सारा प्रदेश भारून गेला होता. २७ जानेवारीला स्वामीजी जाफन्याहून पांबन येथे आले. ते रामनाद संस्थानमध्ये उतरले. संस्थांनचे राजे भास्कर सेतुपती स्वत: स्वामीजींना सन्मानपूर्वक घेऊन आले.आल्या आल्याच स्वामीजींना त्यांनी व सर्व अधिकार्‍यानी साष्टांग नमस्कार केला. खास शामियान्यात औपचारिक स्वागत झालं.विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेला शिकागोला जावे म्हणून प्रयत्न करणार्‍यात राजे भास्कर सेतुपती होते. स्वागत समारंभा ठिकाणी घोडा गाडीने नेण्यात येत असताना लगेचच गाडीचे घोडे काढून लोकांनी स्वता ती गाडी ओढली आणि एव्हढेच काय स्वता राजे सुधा गाडी ओढण्यात सहभागी झाले होते स्वामीजीं बद्दल एव्हढा आदर सर्वांनी दाखवला. एका संस्थांनाचा अधिपति एका संन्याश्याची गाडी ओढत होता हे दृश्य प्राचीन परंपरेची आठवण करून देत होते.

पांबन नंतर ते रामेश्वरला गेले. स्वामीजी स्वागताला उत्तर देण्यासाठी भाषणकर्ते झाले. त्यांच्या इंग्रजी भाषणाचे तमिळ भाषेत रूपांतर करून सांगण्यात येत होते. सर्वश्रेष्ठ धर्मपुरुषाचा सन्मान मंदिरातील पुजारी व व्यवस्थापक यांनी केला. सजवलेले ऊंट, हत्ती, घोडे असलेली मिरवणूक काढून रामेश्वर मंदिरापर्यन्त नेण्यात आली. इथल्या भाषणात त्यांनी सांगितले की, “केवळ मूर्तिपूजा करण्यापेक्षा दरिद्री माणसाला दोन घास अन्न आणि अंग झाकण्यासाठी वस्त्र देणे हाच खरा धर्म आहे”.

रामेश्वर नंतर रामनाद च्या सीमेवर जोरदार स्वागत करण्यात आले. स्वामीजींच्या आगमनार्थ तोफांची सलामीदिली, भुईनळे आतषबाजी केली, हर हर महादेव च्या प्रचंड घोषणा देण्यात आल्या. रामनाद चे राजे स्वता स्वामीजींच्या गाडी समोर पायी चालत होते, पुढे पुढे तर स्वामीजींना घोडागाडीतून ऊतरवून, सजवलेल्या पालखीत बसविण्यात आले, भाषणे झाली, नक्षीकाम केलेल्या सोन्याच्या करंडकातून स्वामिजिना मानपत्र अर्पण केले गेले. सत्कारादाखल उत्तर देताना स्वामीजी म्हणाले, “प्रदीर्घ कालावधीची रात्र संपत आहे, अत्यंत क्लेशकारक दु:ख मावळू लागले आहे, मृतप्राय वाटणार्‍या शरीरात नवी चेतना जागी होत आहे, जाग्या होणार्‍या या भारताला आता कोणी रोखू शकणार नाही, तो पुन्हा निद्रित होणार नाही, बाहेरची कोणतीही शक्ति त्याला मागे खेचू शकणार नाही. अमर्याद सामर्थ्य असणारी ही भारतभूमी आपल्या पायांवर ताठ उभी राहत आहे”. केवळ या सुरुवातीच्या स्वागतासाठी उत्साहाने जमलेल्या स्वदेशातील बांधवांकडे बघून स्वामीजींना एव्हढा विश्वास वाटला होता. आणि आपला देश आता पुढे स्वत:च्या बळावर ताठपणे उभा राहील अशी खात्री त्यांना वाटली होती. एका निष्कांचन संन्याशाचा उत्स्फूर्तपणे होणारा गौरव ही स्वामीजींच्या जगातील कामाची पावती होती.

रामनाद सोडल्यानंतर स्वामी विवेकानंद मद्रासच्या दिशेने रवाना झाले. आतापर्यंत छोट्या छोट्या शहरात व गावातील उत्साह आणि आनंद एव्हढा होता, आता तर मद्रास सारख्या मोठ्या शहरात मोठ्या लोकवस्तीच्या ठिकाणी भव्य सोहळे होणार होते. रामनाद, परमपुडी, मानमदुराई,मीनाक्षी मंदिरचे मदुराई,तंजावर असे करत स्वामीजी कुंभकोणमला आले.कुम्भकोणम नंतरच्या एका रेल्वे स्थानकावर गाडी थांबणार नव्हती तिथेही लोक स्वामीजींना बघायला आणि एकदा तरी त्यांचे दर्शन घ्यायला प्रचंड प्रमाणात जमले होते. गाडी थांबणार नाही असे दिसताचा लोक रेल्वे रुळांवर आडवे झाले आणि गाडी थांबवावी लागली तेंव्हा स्वामीजी डब्यातून बाहेर येऊन शेकडो लोकांनी  केलेले स्वागत स्वीकारले, छोटेसे भाषण केले. त्यांच्याप्रती आदर दाखवला.

कुंभकोणमहून स्वामीजी मद्रासला आले. हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वामीजींनी अमेरिकेला जावे यासाठी मद्रास मध्ये खूप प्रयत्न केले गेले होते. त्यामुळे पाश्चात्य देशात उदंड किर्ति मिळवून वेदांतचा प्रचार करून आलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या स्वागताची तयारी खूप आधीपासून केली होती, एक स्वागत समिति स्थापन करण्यात आली होती, पद्धतशीरपणे  नियोजन केले गेले होते. वृत्तपत्रातून लेख प्रसिद्ध केले गेले. स्वामीजींच्या धडक स्वागत समारंभाची  वृत्ते प्रसिद्ध होत होती. त्यांनी पाश्चात्य देशात केलेल्या कामांवर अग्रलेख लिहिले गेले. विविध शाळा, संस्था, महाविद्यालये बाजारपेठा सार्वजनिक ठिकाणे येथे स्वामीजींना बोलावण्याचा धडाका सुरू होता. मद्रास मध्ये रस्ते, विविध १७ ठिकाणी कमानी, फलक,पताका, असे उत्सवी वातावरण होते. एगमोर स्थानकावर उतरल्यावर (६ फेब्रुवारी १८९७) स्वागत समितीने स्वागत केले. घोष पथकाने स्वागतपर धून वाजविली. मिरवणूक काढण्यात आली दुतर्फा लोक जमले होते, मोठ्या संख्येने स्त्रिया, मुले, प्रौढ, सर्व सामान्य नागरिक ते सर्व क्षेत्रातील नामवंत मंडळी आवर्जून उपस्थित होती.

मद्रासमध्ये ९ दिवस मुक्काम होता. अनेक कार्यक्रम झाले, वेगवेगळ्या भाषेतील २४ मानपत्रे त्यांना देण्यात आली. खेतडीचे राजा अजितसिंग यांनी मुन्शी जगमोहनलाल यांच्याबरोबर स्वागत पत्र पाठवले होते. कोणी स्वागतपर संस्कृत मध्ये कविता लिहून सादर केली.

७ फेब्रुवारीला मद्रास मध्ये विक्टोरिया हॉल मध्ये मद्रास शहराच्या वतीने स्वामीजींचा मोठा सत्कार समारंभ झाला. जवळ जवळ दहा हजार लोक उपस्थित होते. असे सत्कार स्वामीजींनी याची देही याची डोळा अनुभवले, लोकांचे प्रेम आणि असलेला आदर अनुभवला. पण मनात, शिकागो ल जाण्यापूर्वी आणि शिकागो मध्ये गेल्यावर सुद्धा ब्राम्हो समाज आणि थिओसोफिकल सोसायटीने जो विरोध केला होता, असत्य प्रचार केला होता, वृत्तपत्रातून लेख, अग्रलेख यातून स्वामीजींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता त्याचे शल्य होतेच, त्याचे तरंग आता मनात उमटणे साहजिकच होते. यातील काही अपप्रचाराला उत्तर देण्याची खर तर संधी आता मिळाली होती आणि ती थोडी स्वामीजींनी घेतली सुद्धा. त्यांनी भाषण करताना अनेक खुलासे केले. धर्म नाकारणार्‍या समाज सुधारकांचा परखड परामर्श घेतला. भारताचे पुनरुत्थान घडवायचे असेल तर त्याचा मूळ आधार धर्म असायला हवा असे विवेकानंद यांना वाटत होते. भारतातील सुधारणावाद्यांचा भर सतत धर्मावर आणि भारतीय संस्कृतीवर केवळ टीका करण्यावर होता ते स्वामीजींना अजिबात मान्य नव्हते. मद्रासला त्यांची या वेळी चार  महत्वपूर्ण प्रकट व्याख्याने झाली. एका व्याख्यानात त्यांनी म्हटले की, “आम्हाला असा धर्म हवा आहे की, जो माणूस तयार करील, आम्हाला असे विचार हवे आहेत की, जो माणूस उभा करतील”.

स्वामीजींचे मद्रासला आल्यावर जसे जोरदार स्वागत झाले तसे ते नऊ दिवसांनी परत जाताना त्यांचा निरोप समारंभसुद्धा जोरदार झाला. इथून ते कलकत्त्याला गेले. स्वामीजींचे मन केव्हढे आनंदी झाले असणार आपल्या जन्मगावी परतताना, याची कल्पना आपण करू शकतो. बंगालचा हा सुपुत्र त्रिखंडात किर्ति संपादन करून येत होता.                  

कलकत्त्याला स्वागता साठी एक समिति नेमली होती, अनेक जण ही धावपळ करत होते. कलकत्त्यातील सियालदाह रेल्वे स्थानकावर स्वागतासाठी वीस हजार लोक जमा झाले होते.फलाट माणसांनी फुलून गेला होता. त्यांच्या बरोबर काही गुरु बंधु, संन्यासी, गुडविन, सेव्हियर पती पत्नी, अलासिंगा पेरूमल, नरसिंहाचार्य या सगळ्यांचे स्वागत केले गेले. सनई चौघड्याच्या निनादात आणि जयजयकारांच्या घोषणेत स्वामीजींचे पुष्प हार घालून स्वागत केले गेले. यावेळी परदेशातून सुद्धा अनेक मान्यवरांनी गौरवपर पत्रे पाठवली, त्याचे ही वाचन झाले व सर्वांना ती वाटण्यात आली.केवळ चौतीस वर्षाच्या युवकाने आपल्या कर्तृत्वाचीअसामान्य छाप उमटवली होती, त्याने बंगाली माणसाची मान अभिमानाने उंचावली होती. रिपण महाविद्यालय, बागबझार,काशीपूरचे उद्यान गृह, आलम बझार मठ, जिथे गुरूंचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प सारदा देवींसमोर सहा वर्षापूर्वी नरेंद्रने सोडला होता तिथे पाय ठेवताच आपण दिलेले वचन पुरे केले याचे समाधान स्वामीजींना वाटले, येथे रामकृष्णांनंद आणि अखंडांनंद यांनी दाराताच आपल्या नरेन चे स्वागत केले. पुजाघरात जाऊन श्रीरामकृष्णांना नरेन ने कृतार्थ होऊन अत्यंत नम्रतेने नमस्कार केला. नरेन ने ठाकूरांना नमस्कार केला तो क्षण गुरुबंधुना पण धन्य करून गेला.आता पुढच्या कार्याची आखणी व दिशा ठरणार होती.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मला भेटलेली माणसे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

??

☆ मला भेटलेली माणसे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आपल्याला आयुष्यात खूप माणसे भेटतात. आणि कायमच्या आठवणी देऊन जातात. आज सहज एक कार्यक्रम बघताना एक जुनी आठवण जागी झाली. कारण म्हणजे तो कार्यक्रम सादर करणारा आपल्या सर्वांचा लाडका उत्साहाने भरलेला सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव.

२७/११/२०१५ रोजी आमच्या शाळेतील रखवालदाराचे लग्न मुंबईत होते. बोलावले की जाणे या तत्वानुसार आम्ही काही मंडळी कारने जाण्यास निघालो. लग्न संध्याकाळी ७ वाजता होते. पण चाललोच आहोत तर थोडी मुंबई बघू या म्हणून लवकर निघालो. मुंबईतले मला तर काहीच समजत नाही. एका पुलावर गेल्या नंतर मैत्रिणीने एक फोन लावला. व आलोच असे सांगितले. एका पॉश इमारती जवळ थांबलो. गाडी पार्क करून वर गेलो तर स्वागताला साक्षात सिद्धार्थ जाधव! डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्यांनीच आगत्याने घरात नेले. त्या धक्क्यातून बाहेर त्यांनीच काढले. आणि मग काय मन मिळणारा आनंद स्वीकारायला तयार झाले. माणसाने किती साधे, प्रेमळ व अगत्यशील असावे याचे प्रत्यंतर येत होते. आमच्या सोबत एकच टेबलवर आमच्या शेजारी बसून आम्ही बरोबर नेलेला खाऊ साधी शंकरपाळी त्यांनी आवडीने चहात बुडवून चमच्याने खाल्ली. आमच्या चकलीचा आस्वाद घेतला. तेही मुक्त कंठाने आमचे कौतुक करत. नंतर मैैत्रिणीने सांगितले ते तिचे भाचे जावई आहेत. तो पर्यंत किती वेळा त्यांचे आम्हाला आत्या म्हणून हाक मारणे झाले होते. नंतर लहान मुलाला लाजवेल अशा उत्साहात सगळे घर दाखवले. घराच्या आठवणी सांगितल्या. त्यातून एक जाणवले की त्यांच्या दृष्टीने घर, फॅमिली किती महत्वाची आहे. मुलीच्या अगदी छोट्या छोट्या बाललिला मोठ्या कौतुकाने व आत्ताच घडल्या प्रमाणे भरभरून सांगत होते. मधे मधे महत्वाचे फोन चालू होतेच. पण घरी गेस्ट आहेत, लांबून आले आहेत. आज सगळे कार्यक्रम रद्द आहेत असे सांगितले जात होते. आम्हाला उगीचच व्ही. आय. पी असल्या सारखे वाटत होते. दरम्यान त्यांच्या मिसेस ने जेवायला बोलावले. काय जेवलो आठवत नाही. कारण सगळे लक्ष त्यांच्याच बोलण्याकडे होते. मला फक्त एवढेच आठवते, ते मला म्हणाले होते आत्या तू नॉनव्हेज खात नाहीस ना म्हणून कोबीची भाजी खायची वेळ आली आहे. जेवणा नंतर परत गप्पा, घरातील वस्तू ( प्रात्यक्षिका सह ) दाखवणे चालूच होते. आम्हाला पण ट्रायल मिळत होती. त्या वेळी एखादे लहान मूल असल्या प्रमाणे ते भासत होते. आत्ता पर्यंत त्यांना फक्त छोट्या, मोठ्या पडद्यावर बघत होतो. तिच व्यक्ती साध्या रूपात अगदी घरगुती गप्पात रंगून गेली होती. त्यांनाही त्या वेळी कलाकार आहोत याचा विसर पडला असावा. एकच व्यक्ती किती वेगळी असू शकते याचे प्रत्यंतर घेत होतो. आमच्या प्रश्नांना खरी व मनमोकळी उत्तरे मिळत होती. मधेच लग्ना नंतर परत या. आज इथेच रहा असा आग्रह पण चालू होता. मधेच तुमच्या शाळेत ( म. न. पा. च्या शाळेत माझी नोकरी झाली आहे. ) बोलवा. असेही त्यांनी आग्रहाने सांगितले. त्यांचे शिक्षण महानगर पालिकेच्या शाळेत झाले आहे ही गोष्ट ते अभिमानाने सांगतात. व माझ्या येण्याने तुमच्या शाळेतून एक तरी सिद्धार्थ तयार होईल असे म्हणतात. संध्याकाळी ते जेव्हा जिम मध्ये जायला निघाले तेव्हा त्यांनीच आठवण करून दिली. माझ्या बरोबर सेल्फी घ्यायचा नाही का? असे त्यांनी गमतीने विचारल्यावर आम्ही फोटो काढले. त्या नंतर आम्हाला पण लग्नाच्या कार्यक्रमासाठी निघायचे होते. व परत कधी भेट होईल माहित नव्हते. निघताना आम्हाला वाकून नमस्कार ( पाया पडणे ) केला.

इतक्या प्रसिद्ध पण डोक्यात हवा न गेलेल्या एका सच्च्या कलाकाराने आमचा दिवस भारून टाकला होता.

एक कलाकार किती साधा, सच्चा असू शकतो. पण जीवनातील मोठी तत्वे अंगीकारतो याचा अनुभव खूप जवळून घेतला होता. विशेष म्हणजे त्यांच्या चित्रपटाच्या प्रीमिअर चे पास येतात त्या वेळी आवर्जून माझ्या नावाचा पास त्यात असतो. त्या नंतर आम्ही त्यांना आमच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनास बोलावले होते. ते पण आवर्जून आले होते. मग काय शाळेत गर्दीच गर्दी पोलीस संरक्षण मागवावे लागले होते. एवढ्या गर्दीत पण त्यांनी माझ्या घरी आलेली आत्या कुठे आहे? म्हणून माझी विचारणा केली होती. माझ्या सारख्या व्यक्तीला लक्षात ठेवणे हे माझ्या साठी मोठे आश्चर्यच होते.

साधी रहाणी, खरेपणा, सर्वांना मदत करणे, उत्साह, बाल्य जपणे, माणसे धरून असणे असे अनेक पैलू समोर आले. आणि हा दिवस सिद्धार्थ दिवस ठरला तो कायम स्वरूपी आठवण ठेवून आहे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उसळ-चपाती… ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? वाचताना वेचलेले ?

☆ उसळ-चपाती…  ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

एकदा भीमसेन जोशी (अण्णा) गाण्याच्या मैफलीसाठी गुलबर्ग्यात गेले होते. ते आटपून अण्णांची गाडी परतीच्या प्रवासात होती. रात्रीची दोनची वेळ असेल. गाडी चालवता चालवता अण्णांनी मुख्य रस्ता सोडला आणि एका आडगावाच्या वाटेला लागले. साथीदारांना कळेचना की हे कुठे चाललेत.

तेवढ्यात अण्णा म्हणाले, “आमचे एक गुरुजी इथून जवळच राहतात. आता अनायसे या वाटेनं चाललोच आहोत तर त्यांना भेटू या. . !”

रात्री दोनची वेळ असल्यामुळे गावात सामसूम होती. थोड्या वेळाने एका अंधार्‍या खोपटापुढे अण्णांची गाडी उभी राहिली. . मंडळी गाडीतून उतरली.

अण्णांनी खोपटाचं दार ठोठावलं. एका वयस्कर बाईनं दार उघडलं. चिमणी मोठी केली आणि खोपटात प्रकाश पसरला. खाटेवर एक वयस्कर गृहस्थ पहुडला होता. त्याचं नाव रामण्णा. . !

अण्णा त्यांच्यापाशी गेले आणि त्यांना हात देऊन बसतं केलं. . अण्णा म्हणाले, ‘काय, कसं काय? ओळखलंत का? बर्‍याच दिवसांनी आलो, अलीकडे वेळच मिळत नाही. . ‘ अण्णा कानडीतनं बोलत होते.

रामण्णाही ओळखीचं हसले. . थोड्या गप्पा आणि विचारपूस झाल्यावर अण्णांनी रामण्णाच्या पायांवर डोकं ठेऊन त्यांना नमस्कार केला आणि खिशातलं २०-२५ हजारांचं बिदागीचं पाकिट त्यांच्या हातात दिलं. . आणि त्यांचा निरोप घेतला. .

साथीदार मंडळींना हा प्रकार काय आहे, हेच कळेना. तेव्हा अण्णांनीच खुलासा केला –

“इथून जवळच्याच एका रेल्वे स्थानकात (होटगीच्या आसपास) एके काळी मी बेवारशी राहायचो. सायडिंगला जे डबे लागत त्यातच झोपायचो. तिथेच रेल्वेच्या थंडगार पाण्याने आंघोळ उरकायचो. खिशात दमडा नव्हता. गाणं शिकण्यासाठी घरातून पळालो होतो. कानडीशिवाय दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. भिकारी अवस्थाच होती.

स्टेशनच्या बाहेरच तेव्हा हा रामण्णा त्याची हातगाडी लावत असे. मुगाची पातळ उसळ आणि चपात्या तो विकायचा. मस्त वास यायचा त्याच्या गाडीभोवती. मी तिथेच घुटमळायचा. . आमची ओळख झाली. गदगच्या जोशी मास्तरांचा मुलगा. गाणं शिकायचं आहे. इतपत जुजबी ओळख मी त्याला दिली”.

“उसळ-चपाती पाहिजे काय?”, असं तो मला विचारायचा. माझ्या खिशात दमडा नव्हता.

रामण्णा म्हणायचा, “तुला गाणं येतं ना? मग मला म्हणून दाखव. तरच मी तुला खायला देईन. फुकट नाही देणार. . !”

“घरी माझी आई जी काही कानडी भजनं आणि अभंग गायची, तेवढीच मला गाता येत होती. रामण्णाला दोन भजनं म्हणून दाखवली की तो मला पोटभर खायला द्यायचा. . !”

“जो पर्यंत त्या स्टेशनात मुक्काम ठोकून होतो, तोपर्यंत मला रामण्णा खायला द्यायचा. पण फुकट कधीही नाही.

रामण्णा म्हणायचा, “तुला गाणं येतं ना? मग कशाला उगाच चिंता करतोस पोटाची ?”

रामण्णाचा निरोप घेऊन गाडी पुन्हा परतीच्या वाटेवर भरधाव वेगाने निघाली होती. . साथीदार मंडळी गप्प होती. . गाडीमध्ये शांतता होती. धीरगंभीर चेहेर्‍याचे स्वरभास्कर गाडी चालवत होते. .

रामण्णाच्या खोपटात भविष्यातला भारतरत्न येऊन मुगाची उसळ आणि चपातीच्या खाल्ल्या अन्नाला नमस्कार करून गेला होता.

तात्पर्य – हात आभाळाला टेकले तरी पाय जमिनीवर असावेत.🙏🏻

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जरतारी हे वस्त्र मानवा… — लेखक – श्रीनिवास बेलसरे ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? विविधा ?

☆ जरतारी हे वस्त्र मानवा… — लेखक – श्रीनिवास बेलसरे ☆ डॉ. ज्योती गोडबोले

‘जगाच्या पाठीवर’ हा आजही अनेकांच्या स्मरणात असलेला सिनेमा आला होता १९६०ला. म्हणजे तब्बल ६२वर्षापूर्वी! त्यातली जवळजवळ सर्वच गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत. गीतकार होते ग.दि.मा.! या सिनेमाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जसे मनोजकुमारच्या सिनेमात ‘सबकुछ मनोजकुमार’ असे असते तसेच इथे राजा परांजपे यांचे होते. दिग्दर्शक राजा परांजपे, लेखक राजा परांजपे आणि निर्मातेही राजाभाऊच!

तशी त्याकाळी राजाभाऊ परांजपे ही मोठी हस्ती होती. त्यांच्या कोणत्याच सिनेमात सिनेमाचे संवादलेखन कुणीतरी मुद्दाम केले आहे, पटकथा कुणीतरी ‘रचली’ आहे, चटकदार संवाद जाणीवपूर्वक ‘पेरले आहेत’ असे वाटतच नसे. एखाद्या ठिकाणी, एखाद्याच्या घरात किंवा एखाद्या कार्यालयात अगदी नैसर्गिकपणे जे घडू शकते तेच राजाभाऊंच्या सिनेमात दिसायचे. जणू राजाभाऊ कोणतीही तयारी न करता अशा एखाद्या ठिकाणी नुसते हळूच कॅमेरा घेऊन गेलेत आणि त्यांनी तिथे जे घडले ते सगळे शूट करून आणले, असेच वाटायचे! इतका त्यांचा सिनेमा खरा वाटे!

या सिद्धहस्त मराठी कलाकाराने एकूण २९ सिनेमांचे दिग्दर्शन केले आणि २० सिनेमात तर स्वत: कामही केले. आज किती मराठी प्रेक्षकांना हे माहित असेल की ‘मेरा साया’ (१९६६) हा हिंदी सिनेमा राजाभाऊंच्या ‘पाठलाग’ (१९६४)चा रिमेक होता! येत्या २४ एप्रिलला राजा परांजपेंचा ११३वा वाढदिवस येतो आहे. ‘पेडगावचे शहाणे’, ‘लाखाची गोष्ट’, ‘पाठलाग’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘आधी कळस मग पाया’, ‘सुवासिनी’, ‘पडछाया’, ‘आधार’, ‘ऊन पाउस’, ‘पुढच पाउल’ असे एकापेक्षा एक सिनेमे देण्या-या या मराठी कलाकाराची आठवण निदान मराठी चित्रपट सृष्टीत तरी कितीजण ठेवतात बघू या!

‘जगाच्या पाठीवर’ची सगळी गाणी गदीमांनी अर्थात मराठीच्या वाल्मिकी मुनींनी लिहिली होती. एकेक गाणे ऐकले की गदीमांना त्रिवार वंदन करावेसे वाटते. केवढी प्रतिभा, केवढी अचाट कल्पनाशक्ती, कसल्या चपखल उपमा आणि केवढे महान तत्वज्ञान गाण्यातल्या चार शब्दांच्या पेन ड्राईव्हमध्ये कोंबून बसवायची त्यांची जादू! गदिमांना शब्दप्रभू नाही म्हणायचे तर कुणाला? या सिनेमात गदिमांनी चक्क एक छोटीशी भूमिकाही केली होती. सिनेमात सुधीर फडके यांनी गायलेले एक अत्यंत सुंदर गाणे होते-

‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे…’

हे त्या वेळच्या समाजाचे सर्वसाधारण वास्तव गदिमांनी नेमक्या शब्दात पकडले होते. त्या गाण्याशी सर्वांना आपली परिस्थिती जुळवून घेता यायची आणि कदाचित म्हणूनच ते अतिशय लोकप्रियही झाले होते. हल्ली जसे गगनचुंबी इमारत बांधताना मोठमोठ्या यंत्राचा वापर होतो, प्रचंड लोखंडी फाळ जमिनीत घुसवून मोठमोठ्या यंत्रानीच माती उपसली जाते, खोल पाया खणला जातो, तसे औद्योगिक जगाने त्याकाळी आपली राक्षसी नखे भूमातेच्या पोटात खुपसून तिची आतडी बाहेर काढून भौतिक सुबत्ता वाढवलेली नव्हती!! त्यामुळे माणसाच्या जीवनात ‘एकच धागा’ सुखाचा असे. दुखाचे धागे मात्र शंभर असायचे! कारण सगळ्याच गोष्टींची कमतरता होती. वस्तू कमी, नोक-या कमी, पगार कमी, दळणवळ कमी, सुखाची सगळीच साधने कमी. त्यामुळे ‘चित्ती कितीही समाधान’ असले तरी भौतिक सुखाची वानवाच होती. म्हणून कवी गदिमांनी म्हटले होते-

‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे… जरतारी हे वस्‍त्र माणसा तुझिया आयुष्याचे..’

इथे गदिमा समग्र जीवनाचे तत्वज्ञान एका अगदी वरच्या पतळीवर जाऊन सांगत आहेत. ते म्हणतात, ‘मानवा, तुझ्या आयुष्याचे वस्त्र हे दोन धाग्यांनी विणलेले आहे. त्यात एक धागा सुखाचा आहे आणि शंभर धागे दु:खाचे आहेत. तू जरी या जगात असे हे जरतारी वस्त्र पांघरत असला तरीही येताना तू उघडाच येतोस आणि हे जग सोडून जातानाही तू उघडाच असतोस.’ खरे तर श्रीकृष्णाने गीतेत ज्याला ‘आत्म्याचे वस्त्र’ म्हटले आहे ते शरीरही आपण इथेच सोडून जात असतो. मग ‘या जगातल्या व्यर्थ बडेजावासाठी कशाला खोट्या स्वप्नात रंगतोस रे?’ असा त्यांचा प्रश्न आहे. 

‘पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा, जासी उघडा.     कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे.’

आपली उपमा अधिक स्पष्ट करताना गदिमा किती चित्रमय शैली वापरून सगळे समजायला सोपे करून टाकतात ते पहाणे मोठे रंजक आहे. त्यांनी अलगद शेक्सपियरने आयुष्याला दिलेली तीन अंकी नाटकाची उपमा सूचित केली आहे.

गदिमा म्हणतात लहानपणी बाळाला कौतुकाने जी अंगडी-टोपडी घालतात ती जणू शरीराचीच प्रतीके आहेत. त्या बाळाला काही कळत नसते. आईवडील आजी आजोबा कौतुकाने जे काही घालतील त्यात ते खुश असते. मात्र तरुणपणी एकंदरच शारीरभावना सर्वार्थाने तीव्र होते. आपले शरीर हा आपला प्रेमविषय झालेला असतो. मग यौवनातील व्यक्ती हौशीने रंगीबेरंगी कपडे परिधान करते. पण कपडे म्हणजे केवळ वस्त्रे का? कविता गदिमांची आहे, त्यांना एवढा मर्यादित अर्थ कसा अपेक्षित असेल? त्यांचा अंगुलीनिर्देश आहे तारुण्यातील आसक्तीकडे, विषयात रममाण होण्याच्या वृत्तीकडे! त्याचे वर्णन ते फक्त तीन शब्दात करतात ‘रंगीत वसने तारुण्याची’.

‘मुकी अंगडी बालपणाची.. रंगीत वसने तारुण्याची..जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे’

गदिमांची प्रत्येक उपमा किती यथार्थ आहे ते पहा! म्हातारपणी शरीर थकलेले असते, ते झिजलेले, आकसलेले, छोट्याशाही आघाताला बाध्य झालेले असते. म्हणून ते वृद्धपणातील शरीराला जीर्ण शालीची उपमा देतात.  

शेवटी कवी स्वत:च अंतर्मुख होतो कारण त्याला श्रोत्यालाही अंतर्मुख करायचे आहे. शेवटच्या कडव्यात काहीशा स्वगतासारख्या ओळीत तो स्वत:लाच विचारतो? ‘हे माणसाच्या जीवनाचे असे सुखदुखाचा असमतोल निर्माण करणारे वस्त्र निर्माण करतो तरी कोण?’ तरीही किती विविधता असते या वस्त्रांत! कोणत्याच दोन माणसांचे आयुष्य सारखे असत नाही. अगदी जुळ्या भावंडातही काही ना काही वेगळेपणा असतोच.

इथे गदिमा थांबतात आणि स्वत:च पुन्हा स्वत:च्या प्रश्नाचे उत्तर देतात. तेच म्हणतात, युगानुयुगे माणसांच्या कोट्यावधी पिढ्यांच्या आयुष्याची वेगवेगळी वस्त्र विणणारा तो ‘वरचा’ विणकर तर अदृश्यच आहे. अखंड चालणारे त्याचे हातही अदृश्यच आहेत-

‘या वस्‍त्रांते विणतो कोण? एकसारखी नसती दोन. कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकराचे.’

असे अगदी साधेसाधे विषय घेऊन जुने कवी त्यातून जीवनाचा केवढातरी गूढ अर्थ सहज सांगून जात असत. म्हणून तर ही अनमोल गाणी आठवायची. त्यासाठीच तर आपला हा ‘नॉस्टॅल्जिया’!

♥ ♥ ♥ ♥ ♥

लेखक – श्रीनिवास बेलसरे.

संग्रहिका – डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विठ्ठल गोरा की सावळा? ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

??

☆ विठ्ठल गोरा की सावळा? ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

भारतीय सनातन परंपरेतील विविध देवतांची नावे ही गुणदर्शक आहेत. शं म्हणजे शुभ;  शुभ करणारा तो शंकर, तर वर्णाने काळा असणारा तो कृष्ण , सुंदर व मोहक गर्दन असणारा तो सुग्रीव आणि रमविणारा तो राम. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.   शंकरांचे वर्णन कर्पूरगौरा म्हणजे कापरासारखा गोरा असे असून देखील काही चित्रकारांनी महादेवाला काळे दाखवून त्याचा कृष्ण वर्ण प्रचलित केला आहे. 

तसेच पांडु म्हणजे पांढरा किंवा गोरा; पांडुरंग या संज्ञेचाच अर्थ जो रंगाने गोरा आहे असा होतो.  असे असतांना  आजकालच्या बहुतेक साहित्यिकांनी विट्ठलाचे सावळा किंवा काळा असे वर्णन  का केले आहे हेच समजत नाही ! पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती काळ्या पाषाणातून बनविलेली असल्याने कदाचित हा अपप्रचार झाला असावा. तथापि तशा अनेक देवतांच्या मूर्ती काळ्या पाषाणाच्याच असतात की !

माझे स्पष्ट मत आहे की विट्ठल ऊर्फ पांडुरंग ही देवता गोऱ्या रंगाचीच आहे.  

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares